पाणकोळी : ( पेलिकॅन पेलिकॅनस फिलिपेन्सिस)पाणकोळी : पेलिकॅनिडी कुलातला हा पक्षी जगाच्या उष्ण प्रदेशांत आणि काही समशीतोष्ण भागांत आढळतो. हा पाणपक्षी असून सर्वांत मोठ्या पक्ष्यांमध्ये त्याची गणना होते. याचे इंग्रजी भाषेतील नाव पेलिकन आहे.

पाणकोळ्याच्या आठ–दहा जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या पाणकोळ्याला ‘भुरकट पाणकोळी’ म्हणतात. या जातीचे शास्त्रीय नाव पेलिकॅनस फिलिपेन्सिस  असे आहे. हा पाकिस्तान, श्रीलंका व ब्रह्मदेशातही आढळतो. हिवाळ्यात मध्य आशियातून उत्तर भारतात पाहुणा म्हणून एका जातीचा पाणकोळी येतो. याचे शास्त्रीय नाव पेलिकॅनस क्रिस्पस  असे आहे.

भुरकट पाणकोळी गिधाडापेक्षा मोठा असतो. शरीराची ठेवण बसकी रंग प्रामुख्याने करडा आणि भुरकट पांढरा मानेवरच्या तुऱ्याची पिसे तपकिरी पाय आखूड, जाड व गर्द तपकिरी बोटे पातळ कातडीने जोडलेली चोच अतिशय मोठी, चपटी आणि पिवळसर चोचीच्या वरच्या अर्ध्या भागाच्या बाजूवर निळसर काळे ठिपके आणि टोकावर आकडी चोचीच्या खालच्या अर्ध्या भागापासून जांभळ्या रंगाची लवचिक पिशवी लोंबत असते. उडण्याची पिसे काळसर तपकिरी आणि शेपटी भुरकट तपकिरी, नर व मादी यांत फरक नसतो.

सरोवरे, मोठे तलाव इ. ठिकाणी यांचे लहान मोठे थवे असतात. हे पाण्यावर तरंगत असतात किंवा काठावर विश्रांती घेत असतात. नीटसे चालता येत नसल्यामुळे ते जमिनीवर सहसा येत नाहीत. हे माशांवर उदरनिर्वाह करतात. कोळी ज्याप्रमाणे जाळ्यात मासे पकडतो, त्याप्रमाणे हा पक्षी पाण्यात चोच खुपसून पिशवीत मासे पकडतो. जमावाने मासे पकडण्याची यांची पद्धत मजेदार असते. एका कळपातले पोहत असलेले सगळे पक्षी पाण्यात एका ओळीत येतात व पंख एकसारखे पाण्यावर आपटून माशांना हाकलून उथळ पाण्यात आणतात आणि नंतर उथळ पाण्यात चोची खुपसून मासे पकडतात व खातात. 

पाणकोळी फार उंचावरून व फार अंतरापर्यंत चांगल्या तऱ्हेने उडू शकतो. उडताना डोके दोन्ही खांद्यांमध्ये मागे ओढून घेतलेले असते. यांचे थवे सरळ ओळीने वा दोन ओळींचा कोन (Λच्या आकाराचा) करून उडत जातात. 

पाणकोळ्यांचा विणीचा हंगाम नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत असतो. या हंगामात हे पक्षी आपल्या वसाहती स्थापन करून तेथे घरटी बांधतात. भारतात फक्त तमिळनाडू राज्यात काही वसाहती आढळतात तेथे त्यांची वीण होते. या जातीचे बहुतेक पक्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रह्मदेशात जातात व तेथे वसाहती करून घरटी बांधतात. ब्रह्मदेशातील सितांगच्या अरण्यातील अशा एका वसाहतीचे वर्णन ओट्स यांनी केलेले आहे ही वसाहत ३२ किमी. लांब व ८ किमी. रुंद असून तिच्यात लाखो पाणकोळी होते.

पाणकोळ्यांची घरटी ओबडधोबड असून काटक्यांची बनविलेली असतात. एका झाडावर तीनपासून पंधरा घरटी असून ती जमिनीपासून ३० मी. उंचीवर असतात. मादी तीन पांढरी अंडी घालते. 

कर्वे, ज. नी.