चिकित्साशास्त्र : रोगग्रस्ताला रोगापासून मुक्त करण्यासाठी अथवा रोगलक्षणांच्या परिहारासाठी ज्या प्रक्रियांचा (उपचारात्मक घटनांचा) उपयोग केला जातो त्या सर्व प्रक्रियांचा चिकित्सेत समावेश होतो. काही लोकांच्या मते स्वास्थ्यसंपन्न मनुष्याला रोग होऊ न देण्यासाठी ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यांचा अंतर्भावही चिकित्साशास्त्रात करण्यात यावा. या दृष्टीने भारताच्या प्राचीन चिकित्साशास्त्रात व्याधिपरिमोक्षाइतकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिक महत्त्व स्वास्थ्यरक्षणाला दिलेले आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

‘रोग’ म्हणजे काय याची कल्पना जसजशी सुस्पष्ट, तर्कशुद्ध आणि प्रयोगसिद्ध होऊ लागली तसतसे चिकित्साशास्त्रातील प्रक्रियांमध्येही बदल होत जाणे साहजिकच होते. रोग हा दैवी प्रकोपामुळे होतो अशी प्राचीन कल्पना होती. त्या वेळी मंत्रतंत्र, जादूटोणा वगैरे प्रकार चिकित्साशास्त्रात वापरले जात. रोग, रोगकारणे व रोगप्रतिकार यांबद्दलचे ज्ञान हळूहळू वाढत गेले व औषधे, भौतिक उपचार वगैरे गोष्टींचा चिकित्साशास्त्रात अंतर्भाव होऊ लागला. रसायनशास्त्राच्या प्रगतीमुळे जी औषधे ‘अनुभव’ म्हणून वापरली जात, त्यांमध्ये काही प्रभावी गुणकारी रसायने आहेत, असे आढळून आले आहे. अशा रीतीने औषधांच्या वापरामध्ये हळूहळू तर्कशुद्ध विचारसरणी येत आहे.

तर्कशुद्ध आणि अनुभवसिद्ध असे चिकित्सेचे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारांत रोग्याला बाह्य औषधे दिली जाऊन रोगोपशमन करण्याचा प्रयत्न होत असतो. बाह्य औषधे न देता निसर्गावर अवलंबून असलेली अशी एक चिकित्सापद्धती आहे. तिला ⇨निसर्गोपचार  असे म्हणतात. आहारनियमन, लंघन, मृत्तिकास्नान, आतपस्नान (सूर्यस्नान), बाष्पस्नान वगैरे गोष्टी या पद्धतीत वापरण्यात येतात म्हणून त्या पद्धतीला भौतिक चिकित्सा असे म्हणण्यास हरकत नाही.

चिकित्सा पद्धती : (१) पॅथॉस म्हणजे रोग. त्याच्या विरुद्ध प्रक्रिया शरीरात करण्यासाठी जे उपचार करतात त्या पद्धतीला ‘ॲलोपॅथी’ अथवा ‘विषमचिकित्सा’ म्हणतात. या पद्धतीमध्ये रोगविरोधी औषधे देणे व शस्त्रचिकित्सा यांचा अंतर्भाव होतो. आधुनिक चिकित्सापद्धतीमध्ये अनेक उपचारांचा अंतर्भाव होत असल्यामुळे या पद्धतीला ॲलोपॅथी म्हणजे चुकीचे आहे, असे एक मत आहे. ‘आधुनिक चिकित्सापद्धती’ हे नाव अधिक समर्पक आहे. (२) शरीरातील धातूंमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे रोग होतात. ते दोष वायु-पित्त-कफ असे तीन असून त्यांच्यामधील समतोल बिघडल्यास रोग उत्पन्न होतो, अशी प्राचीन भारतातील चिकित्सापद्धती मानते. हे दोष शोधून काढून रोग बरा करता येतो असे या पद्धतीत मानले जाते. या पद्धतीला ⇨आयुर्वेद  असे म्हणतात. (३) प्राकृत (नेहमीच्या-निरोगी) शरीरात रोगासारखी लक्षणे ज्या औषधांमुळे होतात, ती औषधे अगदी सूक्ष्म प्रमाणात दिली असता रोग बरा होतो असे प्रख्यात जर्मन वैद्य हानेमान यांनी प्रतिपादिले. या तत्त्वावर आधारलेल्या चिकित्सा पद्धतीला त्यांनी ⇨ होमिओपॅथी  असे नाव दिले. तिलाच समचिकित्सा पद्धती असे म्हणतात. (४) शरीरातील रोग बारा प्रमुख क्षारांपैकी (लवणांपैकी) एक वा अनेक क्षार कमी पडल्याने होतात व ते क्षार  सूक्ष्म प्रमाणात दिल्यास रोग बरा होतो असे समजणाऱ्या चिकित्सा  पद्धतीला ‘बारा-क्षार-पद्धती’ असे म्हणतात [→ बारा-क्षार-चिकित्सा]. (५) विशिष्ट रंगाचा उपयोग केला असता रोग बरे होतात असे  मानणाऱ्या चिकित्सा पद्धतीला ⇨ वर्णचिकित्सा  असे म्हणतात. (६) रोगांचा मनाशी निकटचा संबध असून मन हेच शरीर व्यापारांचे नियंत्रण करीत असते म्हणून संमोहनावस्थेत (मर्यादित शुद्धिहरण करून सूचना समजण्याच्या  अवस्थेत) असताना रोग्याला विशिष्ट संदेश देऊन रोगमुक्त करता येते असे मानणाऱ्या पद्धतीला ‘संमोहनचिकित्सा’ म्हणतात [→ संमोहविद्या] (७) मनावर भय, दुःख, विफलता वगैरे संस्कार सुप्त  चेतनावस्थेत होतात व त्यांमुळे रोग होऊ शकतो. ह्या सुप्तविकारांचे विश्लेषण करून रोग नाहीसे करणाऱ्या पद्धतीला ⇨ मानसोपचार  पद्धती असे म्हणतात. [→ मनोविश्लेषण]. (८) पाठीच्या मणक्यांच्या सांध्यांची  विशिष्ट हालचाल करून रोग-मुक्ती करता येते असे मानणाऱ्या  पद्धतीला ⇨ अस्थिचिकित्सा  पद्धती असे म्हणतात. (९) आयर्वेद पद्धतीमध्ये उपयुक्त ठरलेली द्रव्ये सूक्ष्म मात्रेत दिली असता रोगपरिहार होतो असे मानणाऱ्या पद्धतीला ‘संजीवन-चिकित्सा’ असे म्हणतात. (१०) चीनमध्ये शरीराच्या विशिष्ट भागात सुया टोचून रोग बरे करतात. त्या पद्धतीला ⇨ सूचिचिकित्सा  म्हणतात. 

वरील सर्व प्रचिकित्सा पद्धती कमीअधिक प्रमाणात सर्व देशांत प्रचलित असल्या, तरी प्रयोगशाळा आणि रुग्णशय्या या ठिकाणीच त्यांची परीक्षा होत असते. आज जगातील सर्व देशांत अधिक प्रमाणात वापरली जाणारी आधुनिक चिकित्सा पद्धती सर्वाधिक मान्यता  पावलेली आहे. श्रद्धेमुळे काही रोग बरे होणे शक्य आहे, हे या पद्धतीला मान्य आहे. तसेच कृत्रिम पद्धतीने बनविलेली औषधेही या पद्धतीत वापरण्यात येतात. 

आधुनिक चिकित्साशास्त्राचे विभाग : (१) स्थानपरत्वे, (२) प्रक्रियापरत्वे, (३) द्रव्यपरत्वे आणि (४) इतर, असे आधुनिक चिकित्साशास्त्राचे विभाग मानलेले आहेत. 

(१) स्थानपरत्वे : (अ) पोटात औषधे देऊन रोगप्रतिकार करणे. या विभागाला अन्नमार्गीय असे म्हणतात, (आ) दंतचिकित्सा, (इ) गुदमार्गे औषधे देऊन रोगपरिहार करणे, (ई) त्वचेखाली वा स्नायूवाटे व नीलेवाटे औषधे टोचून घालणे याला ‘अंतःक्षेपणचिकित्सा’ असे म्हणतात. 

(२) प्रक्रियापरत्वे : (अ) शस्त्रक्रिया, (आ) परिफुप्फुसात (फुप्फुसाभोवतालच्या द्रवयुक्त आवरणात) हवा भरून क्षयरोगाचे  निवारण करणे, (इ) काही मानसिक रोगांत शरीरात इन्शुलीन टोचून रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे जो आघात होतो त्याचा उपयोग करणे, (ई) विद्युत उपकरणांनी शरीरात खोलवर उष्णता उत्पन्न करणे, [→ ऊतकतापन चिकित्सा], (उ) क्ष-किरण किंवा जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलिकडील अदृश्य) किरण वापरून केलेली चिकित्सा, (ऊ) शरीरात कृत्रिम रीतीने ज्वरोत्पादन करणे (ज्वरचिकित्सा), (ए) उत्सर्गी किरण (विशिष्ट  मूलद्रव्यांपासून बाहेर पडणारे भेदक किरण) वापरून ग्रंथीवर व अर्बुदांवर (नवीन पेशींच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठींवर) उपचार करणे [→ प्रारण चिकित्सा]. 

(३) द्रव्यपरत्वे : (अ) अंतःस्राव अंतःस्रावी (वाहिनीविना सरळ रक्तात स्राव मिसळविणाऱ्या) ग्रंथीचा उपयोग करणे [अंतःस्रावी चिकित्सा, → अंतःस्रावी ग्रंथि], (आ) कृत्रिम रसायने वापरणे [→ रासायनी चिकित्सा], (इ) प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ वापरणे [प्रतिजैव चिकित्सा, → प्रतिजैव पदार्थ], (ई) रक्तरस (प्रतिकारशक्ती उत्पन्न केलेल्या जनावरातील रक्तद्रव) वापरून रोग निवारणे करणे [रक्तरसचिकित्सा  → रक्तरसविज्ञान], (उ) जंतुविषनाशक लस वापरणे [लसचिकित्सा, → लस  व अंतःक्रामण], (ऊ) वनस्पतिजन्य वा प्राणिजन्य पदार्थ वापरणे [→ औषधिचिकित्सा]. 

(४) इतर : (अ) अपंग व्यक्तींच्या ग्रस्त अवयवांचे कार्य पुन्हा चालू करणे (व्यावसायिक चिकित्सा), (आ) उष्मा, जल, संमर्दन इ. भौतिक उपाय करणे [→ भौतिकी चिकित्सा], (इ) मानसोपचार-चिकित्सा. 

अशा विविध प्रकारांनी जरूर तेथे योग्य वाटेल असे उपचार या पद्धतीत करण्यात येतात, या पद्धतीत आज वापरण्यात येणारी औषधे आणि प्रक्रिया प्रथम अतज्ञ लोकांनी वापरल्या व अनुभव आल्यानंतर त्यांचे संशोधन करून त्या चिकित्सापद्धतीत अंतर्भूत केल्या. हिवतापावर क्विनाइन, हृद्रोगावर डिजिटॅलीस, रेचक म्हणून वापरण्यात येणारे एप्सम सॉल्ट अशी अनेक उदाहरणे या संबंधात देता येतील. आधुनिक रसायन चिकित्सेत वापरली जाणारी ⇨ सल्फा औषधे  डोमाक नावाच्या एका शास्त्रज्ञांना लोकरीवर रंग देण्याचे प्रयोग करीत असता सापडली, तर सर ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलीन हे औषध अकस्मातच सापडले. प्रथम अनुभवसिद्ध ठरलेल्या औषधांचे प्रयोगशाळेत पृथःकरण करून त्यांतील मूलभूत घटकांचे संशोधन करून त्यांना तर्कशुद्ध आधार देणे, ही गोष्ट जगातील सर्व प्रयोगशाळांत चालू आहे. त्यावरून औषधांचा कार्यकारण संबंध प्रस्थापित होऊन औषधे तर्कशुद्ध पद्धतीत कायम होत असतात. 

चिकित्साशास्त्रातील प्रयोगांमुळे मनुष्याचे किती हित झाले आहे, हे शेजारील कोष्टकावरून दिसून येईल.  

अमेरिकेतील नवजात बालकाची अपेक्षित आयुर्मर्यादा

वर्ष

आयुर्मर्यादा

१९००

४९·२ वर्षे

१९४०

६३·३ वर्षे

१९४८

६८ वर्षे

१९५५

७० वर्षे

विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात फुप्फुसशोध (फुप्फुसाची दाहयुक्त सूज), घटसर्प, आंत्रज्वर (टायफॉइड), परिमस्तिष्कज्वर (मेंदूच्या आवरणांना सूज आल्यामुळे येणारा ज्वर) आणि देवी या रोगांनी दगावले असते असे असंख्य लोक वाचविता आले. भारतातील नवजातांची अपेक्षित आयुमर्यादा ३२ वर्षांपासून आता ६० वर्षांपर्यंत गेलेली आहे. 

औषधांच्या विशिष्ट गुणांचे प्रमाणीकरण करून त्यांची योग्य मात्रा ठरविणे याकरिता शासकीय नियंत्रणाची आवश्यकता असल्यामुळे शासनाने त्यासाठी खास यंत्रणा उभी केलेली आहे. [→ औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम औषधिकोश]. 

संदर्भ : 1. Bottcher, H. M. Tr. Kawerau, E. Miracle Drugs, A History of Antibiotics, London, 1963.            

           2. Garrison, F. H. History of Medicine, London, 1960.

           3. Havard, C. W. H. Fundamentals of Current Medical Treatment, London, 1970.

आपटे, ना. रा.