पेन्झिआस(पेनझीयस), आर्नोए. : (२६ एप्रिल १९३३- ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांनी आणि ð रॉबर्ट बुडरो विलस्न यांनी अवकाशातील सूक्ष्मतरंग प्रारणाविषयी (कमी तरंगलांबीच्या रेडिओ तरंगांविषयी) संशोधन केले. या संशोधनामुळे विश्वाच्या उत्पत्तीच्या महास्फोट (बिग बँग) सिद्धांताला [हायड्रोजन अणूंच्या आद्य अग्निगोलाचा अतिप्रचंड स्फोट होऊन विश्व निर्माण झाले व ते अजून प्रसरण पावत आहे, असे प्रतिपादणाऱ्या सिद्धांताला विश्वोत्पत्तिशास्त्र] प्रत्यक्ष पुरावा मिळाला आहे. या कार्याबद्दल वरील दोघांना व नीच तापमान भौतिकीविषयी संशोधन केल्याबद्दल ð पीटर ल्येआँन्यीदव्ह्यिच काप्यिट्स यांना एकत्रितपणे १९७८ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

पेन्झिआस यांचा जन्म जर्मनीत म्यूनिक येथे झाला. नाझी लोकांच्या छळामुळे १९४० मध्ये त्यांच्या आईवडिलांनी आपल्या कुटुंबीयासह अमेरिकेत आसरा घेतला. त्यांचे शालेय शिक्षण ब्राँक्स (न्यूयॉर्क) आणि ब्रुकलिन टेक्निकल हायस्कूलमध्ये झाले. १९५४ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क सिटी कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी यू. एस्. सिग्नल कोअरमध्ये रडार-अधिकारी म्हणून काम केले. तदनंतर कोलंबिया विद्यापीठात दाखल होऊन त्यांनी एम्. एस्सी. (१९५८) व पीएच्. डी. (१९६२) या पदव्या मिळविल्या. १९६१ सालीच त्यांनी बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. १९७२ मध्ये ते तेथील रेडिओ टेक्निकल डिपार्टमेंटचे प्रमुख झाले व पुढे तेथील रेडिओ रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक झाले. बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये रेडिओ ज्योतिषशास्त्र, रेडिओ प्रेषण व ग्रहण आणि उपग्रहांद्वारे संदेशवहन या शाखांमध्ये त्यांचे संशोधन चालू आहेच. त्याशिवाय प्रिन्स्टन विद्यापीठात अभ्यागत व्याख्याते, स्टोनी ब्रुक येथील न्यूयॉर्क राज्य विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक आणि हार्व्हर्ड विद्यापीठात संशोधन सहकारी या नात्यानेही ते काम करतात. शास्त्रज्ञांना राजकीय दडपणापासून स्वातंत्र्य मिळावे यासाठी कार्य करणाऱ्या कमिटी ऑफ कन्सर्नड सायंटिस्टस या समितीचे ते उपाध्यक्ष आहेत.

पेन्झिआस व त्यांचे सहकारी रॉबर्ट वुडरो विल्सन हे बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये रेडिओ ज्योतिषशास्त्र व कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने संदेशवहन यांविषयी १९६४ मध्ये प्रयोग करीत होते. या प्रयोगात त्यांना असे दिसून आले की, सूक्ष्म तरंग विभागातील एक दुर्बल गोंगाट (अनिष्ट संकेत) अवकाशातून सर्व दिशांनी सारख्याच तीव्रतेने येत आहे. अत्यंत काळजीपूर्वक प्रयोग करूनही त्यांना या गोंगाटाचे निराकरण करता आले नाही. या गोंगाटाचे एकूण स्वरूप (सुमारे) ३º के. तापमानाच्या ð कृष्ण पदार्थांपासून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांसारखे आहे, हेही त्यांना दिसून आले परंतु आपल्या या शोधाचे महत्त्व त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांनी तो ताबडतोब प्रसिद्ध केला नाही. योगयोगाने त्यांना प्रिन्स्टन विद्यापीठातील रॉबर्ट एच्. डिक यांनी विश्वोत्पत्तीबद्दलच्या महास्फोट सिद्धांताविषयी केलेल्या सैद्धांतिक कार्याची माहिती मिळाली. त्यावरून पेन्झिआस यांनी डिक यांना आपल्या प्रयोगशाळेला भेट देण्यासाठी बोलाविले. पेन्झिआस यांच्या उपकरणाची काळजीपूर्वक पहाणी केल्यानंतर डिक यांनी असा निर्वाळा दिला की, पेन्झिआस यांना आढळून आलेला गोंगाट हा उपकरणातील कोणत्याही त्रुटीमुळे उत्पन्न झालेला नसून २० अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटामुळे उत्पन्न झालेल्या प्रारणाचाच तो अवशिष्ट भाग आहे. अशा अवशिष्ट प्रारणाची शक्यता १९४८ मध्येच जॉर्ज गॅमो यांनी वर्तविली होती. या शोधामुळे विश्वोत्पत्तीबद्दलच्या महास्फोट सिद्धांताला मान्यता प्राप्त झाली.

अलीकडे पेन्झिआस यांनी ताऱ्यांमध्ये कित्येक मूलभूत रसायने अस्तित्वात असल्याचा शोध लावला आहे. त्याचप्रमाणे आंतरतारकीय मेघांमध्ये कार्बन मोनॉक्साइड व तसे कित्येक साध्या रचनेचे रेणू असल्याचा शोध लावला आहे. हे रेणू जुन्या नष्ट झालेल्या ताऱ्यांपासून तयार झालेले असून नव्या ताऱ्यांच्या निर्मितीत त्यांचा वाटा असतो, त्यामुळे ताऱ्यांचे संघटन आणि एकूण जीवनक्रम यांच्या अभ्यासात या शोधाला अतिशय महत्त्व आहे.

नोबेल पारितोषिकाखेरीज इतर अनेक सन्मान पेन्झिआस यांना त्यांच्या शोधासाठी मिळाले आहेत : त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत पॅरिस ऑब्झर्वेटरीची सन्माननीय डॉक्टरेट पदवी (१९७६) इंटरनॅशनल युनियन ऑफ रेडिओ सायन्सेस, अमेरिकन फिजिकल सोसायटी, अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे सन्माननीय सदस्यत्व.

ठाकूर, अ. ना.