ऑयलरकेल्पिन, हान्स कार्ल आउगुस्ट सायमन फोन : (१५ फेब्रुवारी १८७३–७ नोव्हेंबर १९६४). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांना १९२९ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक सर आर्थर हार्डेन यांच्या बरोबर विभागून देण्यात आले. यांचा जन्म बव्हेरियामधील आउग्जबर्ग या गावी झाला. म्यूनिक, वर्त्सबर्ग, बर्लिन व गॉटिंगेन या विद्यापीठांत तसेच पॅरिसमधील पाश्चर संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. डब्ल्यू. नेर्न्स्ट व जे. एच्. व्हां हॉफ हे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ त्यांचे शिक्षक होते. १८९५ साली ते बर्लिन विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. १८९७ साली ते एस्. ए. अऱ्हेनियस यांच्या हाताखाली भौतिकीचे साहाय्यक होते. त्यांची स्टॉकहोम येथे भौतिकी रसायनशास्त्राचे अधिव्याख्याते म्हणून १९०० मध्ये नेमणूक झाली. तेथेच १९०६ साली ते सामान्य व अकार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. पण नंतर त्यांनी आपले कार्यक्षेत्र बदलले व ते कार्बनी रसायनशास्त्राकडे वळले. त्यानंतर १९२९ साली त्यांची व्हिटॅमिन इन्स्टिट्यूट व इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री या संस्थांच्या संचालकपदी नेमणूक झाली.

एंझाइम (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) व शर्करेचे किण्वन (आंबविण्याची क्रिया) यांवरील त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल नोबेल पारितोषिकाचा बहुमान त्यांना मिळाला. एंझाइमांवरील त्यांच्या संशोधनाने असे दिसून आले की, जेव्हा एखाद्या एंझाइमाची दुसऱ्या पदार्थावर (कार्यद्रव्य) विक्रिया होते, तेव्हा एंझाइम व पदार्थ यांमधील रासायनिक आसक्ती (पदार्थाची रासायनिक विक्रिया घडण्याची प्रवृत्ती) ही अम्ल गट व क्षारीय (अल्कली) गट यांमधील बंधांसारखी असते. विशिष्ट एंझाइमांवर ज्यांची विक्रिया होते त्यांचा व त्यांच्या विक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या को-एंझाइमांचा त्यांनी प्रामुख्याने व सखोल अभ्यास केला. झायमेज या एंझाइमाचे, को-झायमेज हे को-एंझाइम त्यांनी वेगळे केले व त्याचे रासायनिक स्वरूप निश्चित केले. हे को-एंझाइम फॉस्फोरिक अम्‍लाच्या जोडीला शर्करा अवशेष व प्युरीन अवशेष असलेले न्यूक्लिओटाइड [→ न्यूक्लिइक अम्‍ले] असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शर्करा अवशेष व प्युरीन अवशेष यांचे स्‍नायूमध्ये वेगळ्या रूपात आढळणाऱ्या ॲडेनिलिक अम्‍लाशी खूपच साधर्म्य असते हे त्यांनी निदर्शनास आणले. तसेच को-एंझाइमांच्या सहक्रियेवरून त्यांची शुद्धता मोजण्याच्या पद्धतीचा शोध लावणे त्यांना शक्य झाले. अशा तऱ्हेने शर्करा व फॉस्फेटे यांच्याविषयीच्या जीवरसायनशास्त्रीय ज्ञानात अधिक भर पडली. ते स्टॉकहोम येथे मृत्यू पावले.

जमदाडे, वि.