मुक्ता मासा : कॅरापिडी कुलातील हा मासा सामान्यपणे परजीवी आहे म्हणजे अन्न अथवा आसरा मिळविण्यासाठी हा दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात राहतो. याच्या एकूण सु. २७ जाती असून कॅरापस डेंटॅटसकॅ. ॲक्यूस या दोन जाती विशेष परिचित आहेत. हे मासे सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व उथळ समुद्रांत आढळतात. सामान्यतः याची लांबी १५ सेंमी. पेक्षा कमी (कधीकधी २२ सेंमी. पर्यंत) असते. याचे शरीर लांबट व ईल (वांब) माशा प्रमाणे सडपातळ असते. शेपटी लांब, निमुळती व टोकदार असून पृष्ठपक्ष व गुदपक्ष (पक्ष म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयुक्त असेलेली त्वचेची स्नायुमय घडी) हे शेपटीच्या टोकाशी एकत्र आलेले असतात. यांच्या शरीरावर खवले नसतात. हे फिकट रंगाचे असून बहुधा पारदर्शक असतात. यांची अंडी पाण्यात तरंगणारी असून मादी आश्रयी प्राण्याच्या शरीरातून बाहेर येऊन पाण्यात अंडी घालते.

सामान्यपणे हा मासा होलोथूरॉयडिया वर्गातील सागरी काकडी या प्राण्याच्या शरीरात राहतो. शरीर अत्यंत निमुळते असल्याने हा सागरी काकडीच्या गुदद्वारातून आत जाऊन तिच्या आतड्यात आसरा घेतो. यामुळे याला संरक्षण तर मिळतेच शिवाय काही जाती सागरी काकडीच्या प्रजोत्पादक व श्वसनोपयोगी अवयवांचा खाण्यासाठी उपयोग करतात.

काही वेळा हा मासा मोत्यांच्या कालवाचा आश्रय घेतो. हा आत असताना कालवाने आपले कवच बंद करून घेतले, तर हा त्यात अडकतो आणि त्याच्या शरीरावर मुक्ता द्रव्याचा (शिंपल्याच्या चकाकणाऱ्या आतल्या थराप्रमाणे दिसणाऱ्या मोत्याच्या द्रव्याचा) लेप बसतो. यावरूनच याला मुक्ता मासा (पर्ल फिश) असे नाव पडले आहे व असा मासा ही एक दुर्लभ वस्तू ठरते.

काही जातींचे मुक्ता मासे तारामीन व इतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांतही परजीवी म्हणून रहात असतात, तर काही मासे अन्न मिळविण्यासाठी आश्रय देणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातून बाहेर येतात आणि काही जातींचे मासे मात्र दुसऱ्या प्राण्यात आश्रय न घेता खडकांच्या भेगांत राहतात.

जोशी, लीना ठाकूर, अ. ना.