शिलारस२ : लिक्विडँबर या वनस्पतीच्या प्रजातीतील वृक्षांपासून राळ अथवा शिलारस हे सुगंधी व तेलकट द्रव्य मिळते. शिलारस देणाऱ्या एकूण सहा जाती असाव्यात असे वनस्पतितज्ज्ञ मानतात. हे वृक्ष पानझडी आहेत. त्यांना तीन ते सात खंडांत विभागलेली, हस्ताकृती, एकाआड एक, तळाशी लहान उपांगे असलेली पाने आणि एकलिंगी व पाकळ्या नसलेली फुले असतात. पुं-पुष्पात अनेक केसरदले (पुं-केसर) असून फांद्यांच्या टोकांस त्यांचे झुपके असतात. प्रत्येक स्त्री-पुष्पात दोन कप्प्यांचा एकच किंजपुट (स्त्री-केसराचा तळभाग) असून त्याची दोन किंजले स्पष्ट असतात. एका लांब दांड्यावर अनेक स्त्री-पुष्पांचा गुच्छ असतो. तडकणारी अनेक शुष्कफळे (बोंडे) एकत्र जुळलेली असून त्यांचा गोलासर व काहीसा काटेरी झुपक्यासारख्या गोळा बनतो. मोठ्या वाऱ्याने हलल्यास त्यातून बिया बाहेर पडतात व सर्वत्र पसरतात.

शिलारस स्रवणाऱ्या वृक्षाची (स्वीटगमची) पाने व फळांच्या गुच्छासह फांदी

ओरिएंटल स्वीटगम (लिक्विडँबर ओरिएंटॅलिस) हा मध्यम आकाराचा व अनेक फांद्या असलेला सु. ६–१२ मी. उंच वृक्ष असून त्याला पाच खंडांत विभागलेली पाने व गोलसर गुच्छात असलेली लहान पिवळी फुले येतात. आशिया मायनरच्या नैर्ऋत्य भागात या वृक्षांची मोठी वने आहेत. भारतीय उद्यानांत तो फ्रान्स, ग्रेट ब्रिटन व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतून आणून लावला आहे. हा वृक्ष सु. तीन ते चार वर्षांचा झाल्यावर त्यापासून राळ काढणे सुरू करतात.

स्वीटगम (रेडगम) हा १५ ते ४० मी. उंच वृक्ष पिरॅमिडासारखा असून तो अटलांटिक किनाऱ्यावर  कनेक्टिकपासून दक्षिणेकडे मध्य अमेरिकेपर्यंत आढळतो.

फ्रेग्रंट मॅपल हा सु. २५–३० मी. उंच व आकर्षक वृक्ष असून त्याला ३–५ खंडांत विभागलेली पाने असतात. तो दक्षिण व मध्य चीनमधील असून भारतात बंगलोरच्या लालबागेत आणून लावलेला आहे. अल्टिंजिया एक्सेल्सा हा पानझडी वृक्ष आसाम व भूतानमध्ये आढळतो.

उपरोक्त झाडांपासून राळ (शिलारस) मिळविण्याच्या वा मिळण्याच्या विविध तऱ्हा व प्रकार आहेत. जेव्हा वनस्पतींवर घाव पडतो व खाच निर्माण होते त्यावेळी ऊतककरांपासून [द्वितीयक वाढ व नवीन पेशींच्या निर्मितीस जबाबदार पेशींचा थर → ऊतककर] नवीन काष्ठ निर्माण होते. त्यात राळ निर्माण करणाऱ्या पोकळ्या व नलिका तयार होऊन त्यांत तो पदार्थ साचतो. हाच शिलारस होय. शिलारस जमा करण्याच्या पद्धती जातीप्रमाणे भिन्न भिन्न असून त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहेत. खोडाच्या सालीला खाच करणे, परिणामी त्यातून राळयुक्त रस बाजूस पाझरू लागतो. बाहेरील साल सोलल्यानंतर रसाने पूर्णपणे भरलेला आतील भाग पाण्यात उकळतात. नंतर पृष्ठभागावर जी राळ जमते ती काढून डब्यात वा पिंपात भरतात. ही मिळणारी राळ अशुद्ध स्थितीत असते. सामान्यपणे शिलारस मिळविण्याची ही पद्धत आहे. ‘लेवांट’ किंवा ‘आशियायी स्टोरॅक्स’ ही नावेही शिलारसास आहेत.

फ्रेग्रंट मॅपल या वृक्षापासून मिळणाऱ्या राळेला चिनी स्टोरॅक्स म्हणतात. निरनिराळ्या वृक्षांपासून मिळणाऱ्या राळेत साधारणतः सिनॅमिक अम्ल, बोर्निओल, संमिश्र अल्कोहॉल व व्यापारी उत्पादनात टर्पेंटाइन, रोझीन, ऑलिव्ह तेल, रेझिने व अन्य घटक प्रामुख्याने आढळतात. अशुद्ध राळ अपारदर्शक, करडी किंवा तपकिरी असते. शुद्ध राळ पिवळट तपकिरी व पारदर्शक दिसते.

शिलारसाचा (राळेचा) उपयोग साबण, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, औषधे आदींच्या निर्मितीत होतो. उत्तेजक, कफोत्सारक व जंतुनाशक म्हणूनही तो वापरात आहे. काही प्राचीन ग्रंथांत शिलारसाचा उल्लेख केलेला आढळतो.

कुलकर्णी, सतीश वि.