उमर खय्याम: (सु. १०४८–सु. ११२३). एक ख्यातनाम फार्सी कवी व विद्वान. त्याचे संपूर्ण नाव गियासुद्दीन अबुल फत्‌ह उमर बिन इब्राहिम अल्-खय्यामी. खय्यामया नावानेच तो ओळखला जाई. खेमाम्हणजे तंबू. यावरून त्याचे पूर्वज तंबू तयार करण्याचा व्यवसाय करीत असावेत, असे दिसते. त्याच्या मित्रांनी व शिष्यांनी केलेल्या निर्देशांवरून त्याचा जीवनकाल स्थूल मानाने अनुमानिता येतो. त्याचा जन्म इराणच्या खोरासान प्रांतातील नीशापूर या संपन्न व विद्येचे केंद्र असलेल्या नगरात झाला. उच्च प्रतिमा आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती त्यास लाभलेली होती. त्यामुळे तो ज्योतिष, गणित, वैद्यक, विज्ञान, तत्त्वज्ञान ह्या सर्वच विषयांत पारंगत झाला. प्रख्यात विद्वान इमाम मुवफ्फिक हा त्याचा गुरू होता.

सुलतान मलिकशाह याने पंचांगात सुधारणा करण्यासाठी ज्या आठ प्रसिद्ध ज्योतिर्विदांची समिती नेमली होती, तीत खय्यामही होता. यावेळीच खय्यामने जीजे मलिकशाही ना चा ग्रंथ लिहिला. प्रस्तुत ग्रंथात त्याने ज्योतिषविषयक कोष्टके दिली आहेत. त्याने जुन्या पर्शियन कालगणनापद्धतीत सुधारणा सुचविली व ती १०७९ मध्ये कार्यवाहीत आली. या सुधारणेमुळे ५,००० वर्षात फक्त एका दिवसाची चूक होईल, असे गणित त्याने केले होते. त्याने अरबी भाषेत लिहिलेला बीजगणितावरील ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. या ग्रंथात त्याने तृतीय घातापर्यंतच्या समीकरणांचे सामान्य व संयुक्त असे वर्गीकरण केलेले आहे. द्विघाती समीकरणाचा निर्वाह काढण्याची रीतही त्याने दिली आहे. तृतीय घाती समीकरणांची घन बीजे असलेल्या तेरा प्रकारांचा त्याने निर्देश केलेला आहे. या समीकरणांची बीजे त्याने दोन शांकवांच्या छेदनाच्या स्वरूपात मिळविली. भूमितीय व अंकगणितीय निर्वाहांमध्ये भेद असल्याचे त्याने दाखविले. उमर खय्यामच्या बीजगणितीय कार्यासंबंधी डी. एस्. कासीर यांनी १९३१ मध्ये लिहिलेला द आलजिब्रा ऑफ उमर खय्याम  हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. याशिवाय यूक्लिड संबंधीही उमर खय्यामने काही लेखन केले आहे.

नौ राज नामा  हा त्याचा फार्सी ग्रंथ यूनानी वैद्यका संबंधी आहे. त्यात जव (फार्सी – खवेद, संस्कृत यव व इंग्रजी – बार्ली) या गुणकारी औषधीचा उल्लेख असून जवाचे पाणी प्याल्याने पोटाचे अनेक विकार बरे होतात, असे म्हटले आहे. प्रस्तुत ग्रंथ अभ्यसनीय असून तो मुज्तबा मिनोवी याने तेहरान येथून १९३३ मध्ये प्रकाशित केला.

उमर खय्याम हा फावल्या वेळात रुबाया (रुबाइयाँ) लिहीत असे. ह्या रुबायांमुळेच त्याची कीर्ती अजरामर झाली. त्याच्या रुबायांमुळे अनेक देशांत उमर खय्याम क्लब स्थापन झाले. तेथे त्याच्या रुबायांचे मोठ्या आवडीने अध्ययन अध्यापन केले जाते. त्याच्या रुबायांचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. अर्थात त्यांतील उमर खय्यामच्या रुबाया किती व प्रक्षिप्त रुबाया किती हे सांगणे खरोखरीच कठीण आहे. त्याच्या रुबायांतील प्रमुख विचार पुढीलप्रमाणे आहेत : नियती अत्यंत प्रबळ असून जे आपल्या नशिबी असते ते घडल्यावाचून राहत नाही. माणसाने आहे त्या स्थितीतच सुख व समाधान मानावे. परोपकार करावा. सुखदुःखे जशी येतात, तशीच निघूनही जातात. ईश्वराच्या दयाळूपणावर श्रद्धा ठेवावी. मद्य जरूर प्यावयास हवे कारण त्यामुळे दुःखाचा विसर पडतो. अर्थात हे मद्य सूफी तत्त्वज्ञानानुसार आध्यात्मिक संकेत म्हणूनही समजता येईल.

फिट्सजेरल्डने केलेल्या रुबायांच्या इंग्रजी अनुवादामुळे (१८५९) जगाला खय्यामच्या उत्कृष्ट कवित्वाचा प्रथम परिचय झाला. आधुनिक भारतीय भाषांतही त्याच्या रुबायांचे अनेक अनुवाद झाले आहेत. माधव ज्यूलियन (मराठी), मैथिलीशरण गुप्ता (हिंदी), भ. द. वर्मा (हिंदुस्तानी), मीर वली अल्ला (उर्दू), नरेंद्र देव (बंगाली) हे त्यांतील काही उल्लेखनीय अनुवादक होत.

संदर्भ : 1. Allen, E. H. The Text Translation of the Oldest Ms. Of the Quatrains Ascribed to ‘Umar Khayyam’. London,1898.

           2. Shirvaze, T. N. Life of Omar Al-Khayyam, Edinburgh, 1905.

वर्मा, भ. द. (हिं.) सुर्वे, भा. ग. (म.) भदे, व. ग.