तेलंग, काशिनाथ त्र्यंबक : (३० ऑगस्ट १८५०–१ सप्टेंबर १८९३) प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित, सुधारक आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक. मुंबई येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. गोव्याहून मुंबईस जी दहा–बारा सारस्वत ब्राह्मणांची घराणी आली त्यांपैकी त्यांचे एक घराणे. त्यांच्या वडिलांचे नाव बापूभाई. त्र्यंबकराव या त्यांच्या थोरल्या चुलत्यांना मुल नसल्यामुळे त्यांना दत्तक घेतले. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रीक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे ते पहिले विद्यार्थी होत. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात प्रवेश केला. १८६८ मध्ये बी. ए. झाले. १८६९च्या शेवटी ते एम्. ए. झाले. एम्. ए. करता करताच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. ते वयाच्या १९व्या वर्षी एम्. ए. एल्‌एल्. बी. झाले. नेहमीच प्रथम क्रमांक राहिल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व बक्षिसे मिळाली. पुढे ते एल्फीस्टन महाविद्यालयात अधिछात्र होते. (१८६७–७२) तत्पूर्वी भैरवनाथ कानविंदे यांच्या पुतळाबेन (अन्नपूर्णाबाई) या मुलीशी त्यांचा विवाह झाला. नंतर त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे १८८९ मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली. हिंदु कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतिवयाच्या कायद्यास त्यांची मान्यता होती. मुंबईला काँग्रेस स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काँग्रेसचे ते १८८५–८९ पर्यंत चिटणीस होते. पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी महत्त्वाच्या ठरावावर भाषणे केली. १८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.

काशिनाथ त्र्यंबक तेलंगकायद्याप्रमाणेच इतिहास, राज्यशास्त्र, भाषासाहित्य या विषयांचा त्यांचा व्यासंग मोठा होता. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, तर फ्रेंच, जर्मन या भाषाही त्यांना अवगत होत्या. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनिय आहे. स्टुडंट्‌स लिटररी ॲड सायंटिफिक सोसायटी व हिंदू युनियन क्लब या दोन संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते स्टुडंट्‌स सोसायटीचे सचिव होते. (१८७२–८९) आद्य शंकराचार्य हे पश्चिम मगधचा राजा पुर्ववर्मा याच्या कारकिर्दीत होऊन (इ. स. ५९०) गेल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. डॉ. वेबर यांनी रामायण–काळासंबंधीचा मांडलेला सिद्धान्त तसेच लेरिंगेर याचे भगवत्‌गीते संबंधीचे प्रतिपादन त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढले. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, इ. सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदु कायद्यात सुधारणा केल्या. ईल्बर्ट बिलाविरुद्ध युरोपियन लोकांनी केलेल्या चळवळीस तय्यबजी व फिरोझशहा यांच्याबरोबर त्यांनीही विरोध केला.

मराठी भाषा व मराठी वाङ्‌मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता. त्यांचे बहुतेक ग्रंथ अनुवादित स्वरूपाचे आहेत. त्यांचे स्फुट लेख जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी  इंडियन अ‍ँटिक्वेरी या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. ‘शास्त्र व रूढी यांच्या बलाबलांविषयी विचार’ ‘सामाजिक विषयांसंबंधी तडजोड’ हे त्यांचे मराठी निबंध प्रसिद्ध असून त्यातून त्यांनी धार्मिक सुधारणांसंबंधी विचार मांडले. भर्तृहरीची नीती व वैराग्य शतकेमुद्राराक्षस नाटक हे त्यांचे संपादित ग्रंथ. त्यांनी इंग्रजीत गीतेचा गद्यपद्यात्मक अनुवाद केला. शहाणा नाथन आणि स्थानिक स्वराज्यव्यवस्था हे त्यांचे आणखी दोन अनुवादित ग्रंथ. त्यांची व्याख्यानेही ग्रंथरूपाने पुढे प्रसिद्ध झाली.

आईबापाची मर्जी राखण्याकरिता त्यांना सतत सतावणाऱ्या मूळव्याधीचे ऑपरेशन करण्यास त्यांनी नकार दिला व त्यातच त्यांचा अंत झाला.

संदर्भ : कर्नाटकी, श्री. ना. तेलंग, मुंबई, १९३१.

खोडवे, अच्युत