ऑक्टोपस : (अष्टबाहू). मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या), संघाच्या सेफॅलोपोडा (शीर्षपाद-वर्ग) वर्गातील ऑक्टोपोडा गणातला आठ बाहू असलेला सागरी प्राणी. हा ऑक्टोपोडिडी कुलातील ऑक्टोपस  वंशाचा आहे. ऑक्टोस  वंशाच्या लहानमोठ्या ५० जाती आहेत. लहानात लहान २·५ सेंमी. व मोठ्यात मोठी ९·७ मी. असते. ऑक्टोपस उथळ त्याचप्रमाणे खोल पाण्यातही राहातो. ऑक्टोपसांच्या क्रौर्याविषयी अनेक अतिरंजित गोष्टी प्रचलित आहेत. मोठे ऑक्टोपस माणसावर हल्ला करून त्याला ठार करू शकतात.

ऑक्टोपस सर्व जगभर आढळतो. ऑक्टोपस व्हल्गॅरिस  ही सामान्य जाती जगातील उष्ण आणि समशीतोष्ण कंटिबंधातील समुद्रांत आढळते. या जातीचे ऑक्टोपस तळाच्या खडकाळ भागातील मोठाल्या फटीत व भोकात राहतात. याचे शरीर वाटोळे, पिशवीसारखे असून डोके मोठे असते. डोक्यावर मोठे डोळे आणि मुखाभोवती आठ आकुंचनशील बाहू असतात. ते बुडापाशी पातळ त्वचेने एकमेकांना जोडलेले असतात. सगळे बाहू सारखे असतात पण नराचा उजवीकडून तिसरा बाहू मोठा होतो व त्याच्या परिवर्तनाने मैथुनांग (मैथुनाकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) तयार होते. प्रत्येक बाहूवर अवृंत (देठ नसलेल्या) चूषकांच्या दोन ओळी असतात. भक्ष्य किंवा इतर वस्तू घट्ट पकडण्याकरिता चूषक उपयोगी पडतात. भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता मुखात चोचीसारखे दोन जंभ (आहारनालाच्या पुढच्या टोकाशी असणाऱ्या संरचना) आणि मांस किसून खाण्याकरिता रेत्रिका (दातांच्या ओळी असलेली मुखातील पट्टी) असते. सगळे ऑक्टोपस रात्रिंचर असतात. खेकडे हे जरी त्यांचे आवडते खाद्य असले तरी ते इतर क्रस्टेशियन (कवचधारी) आणि मॉलस्क प्राणी व मासे खातात.

ऑक्टोपस (अष्टबाहू) : (१) डोळा, (२) बाहू, (३) चूषक

प्रावार (त्वचेची बाहेरची मऊ घडी) डोक्याला जोडलेला असतो. पर (हालचालीसाठी किंवा तोल सांभाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्‍नायुमय घड्या) नसतात. ऑक्टोपस बाहूंचा उपयोग करून खडकांवर जलद चालतात. संकटाची चाहूल लागताच ते माखलीप्रमाणे (सेपिया नावाच्या माशाप्रमाणे) आपल्या शरीराच्या खालच्या भागात असणाऱ्या नसराळ्यातून पाण्याचा फवारा जोराने सोडून वेगाने मागे पोहत जातात किंवा आपल्या मसीकोशातून (शाईसारख्या रंगद्रव्याने भरलेल्या पिशवीतून) काळा रंग सोडून आपल्या भोवतालचे पाणी काळे करतात व या काळ्या आवरणाखालून गुपचूप निसटून जातात. ऑक्टोपसांच्या त्वचेत अतिविकसित वर्णककोशिका (रंगद्रव्ययुक्त पेशी) असतात, त्यांच्या साहाय्याने ते जरूर पडेल तेव्हा आपले रंग झपाट्याने बदलू शकतात.

 प्रजोत्पादनाच्या वेळी नर आपल्या निषेचनांग बाहूने (अंड्याच्या निषेचनासाठी मादीच्या शरीरात शुक्राणू सोडण्याकरिता विशेषित झालेल्या एका बाहूने) मादीच्या प्रावारगुहेत (प्रावार आणि शरीर यांच्यामध्ये असणाऱ्या जागेत) शुक्राणुधर (शुक्राणूंची जुडी असलेली डबी) सोडतो. मादी ५०,००० किंवा त्यापेक्षाही जास्त अंडी घालते. त्यांच्या माळा किंवा द्राक्षांसारखे घड असून मादी ते आपल्या राहत्या भेगेच्या अथवा भोकाच्या छताला चिकटविते.अंडी फुटून पिल्ले बाहेर पडायला ४–८ आठवडे लागतात. या काळात मादी अंड्यांचे रक्षण करते. पिल्लांचे मातापितरांशी बरेच साम्य असते.

जगाच्या बऱ्याच भागांतील लोक ऑक्टोपसांचा अन्न म्हणून उपयोग करतात. जपान, चीन, ग्रीस, इटली इ. देशांत यांच्यापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात.

पहा : माखली.

जोशी, मीनाक्षी