बोडो भाषा : भारताच्या ईशान्य प्रदेशातील डोंगराळ भागात ज्या अनेक तिबेटो-ब्रह्मी भाषा बोलल्या जातात त्यांपैकी बोडो ही एक आहे. तिबेटो-ब्रह्मी समूहातील बहुतांश भाषा एकावयवी आहेत. त्यांचे उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून पुढे होणाऱ्या भाषिक परिवर्तनात त्यांचा टिकाव न लागल्यामुळे त्यांना शुद्ध एकावयवी स्वरूप प्राप्त झाले. परंतु याच समूहातल्या काही भाषांच्या गटांत प्रत्ययोपसर्गांची झीज न झाल्यामुळे त्यांचे स्वरुप अनेकावयवी बनले. या शाखेत काचिन, बोडो, नागा व कुकि-चीन यांचा समावेश होतो. त्यापैकी बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे. मात्र नष्ट झालेल्या प्रत्ययोपसर्गाच्या जागी नवी रुपे आणून या भाषांनी आपल्या विनिमयप्रक्रियेची गरज भागवलेली आहे.

बोडो हा तिबेटो-ब्रह्मी भाषांचा आसामातला गट असून त्याला ग्रिअर्सनच्या  भाषिक पाहणीत ‘आसामी-ब्रह्मी शाखा’ असे नाव आहे. बोडो ही त्यातली प्रमुख बोली.

बोडो भाषिकांची १९६१ साली संख्या २,८६,३३९ होती आणि हीच बोली कचारी व मेच या नावांखाली अनुक्रमे ६५,२५९ आणि १०,२०३ लोकांकडून बोलली जात होती. बोडो गटात गारो (३,०७,०२६), त्रिपुरी (२,१५,६२४) व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत.

या ठिकाणी मात्र बोडोच्या प्रमाण रुपाचा परिचय करून द्यायचा आहे.

व्याकरण : नाम : सजीव प्राण्याचे लिंग प्रत्यय लावून नक्की करण्यात येते. माणसांत पु.-होआ, स्त्री.-हिंग्झहाउ पक्ष्यांत पु.-झला, स्त्री.-झु इत्यादी. अनेकवचनाचे प्रत्यय फुर्, फर्, फ्रा हे आहेत. प्रथमा ते सप्तमी अशा सात विभक्ती आहेत.

सर्वनाम : आङ् ‘मी’, नङ् ‘तू’, बी ‘तो-ती-ते’-झाङ्, झाङ्फुर् ‘आम्ही’, नङ्सुर ‘तुम्ही’, बीसूर ‘ते-त्या-ती’.

संबंध सर्वनाम : झि, झइ. प्रश्नवाचक सुर् ‘कोण’, मा ‘काय’, बाबे ‘(अनेकांपैकी ) कोण’. दर्शक बे ‘हा’, बोइ, बोइहा ‘तो’, बी ‘तो (दूरचा )’.

क्रियापद : क्रियापदाची रुपे कर्त्याप्रमाणे बदलत नाहीत. फक्त स्वरांत धातूना कालवाचक प्रत्यय लागण्यापूर्वी इ हा प्रत्यय लागतो : थाङ्-उ ‘जा’, पण नु-इ-उ ‘पहा-’. नु ‘पहा-’ याची काही रुपे पुढीलप्रमाणे : आङ् नुईउ ‘मी पहातो’, आङ् नुदङ् ‘मी पहातो आहे’, आङ् नुदङ्‌मन् ‘मी पहात होतो’, आङ् नुबइ ‘मी पाहिलं’, आङ् नुनइ, आङ् नुदङ्‌मन् ‘मी पाहिलं होतं’, आङ् नुगन ‘मी पाहीन’, आङ् नुसिगन् ‘मी पहाणार आहे’ इत्यादी. नकारवाचक प्रत्यय वेगळे आहेत. ते क्रियापदाला आधी आ हा प्रत्यय लागून येतात.

वाक्यरचना : सा-सो मान्सुइ-हा फ्सा झला सा-नुइदङ्मन ‘एका माणसाला दोन मुलगे होते.’ बोइ समइ-आउ बीनि गदत् फ्सा-झलइ-आ दुब्लि-आउदङ्‌मन् ‘त्यावेळी त्याचा मोठा मुलगा शेतात होता.’

पहा : तिबेटो-ब्रह्मी भाषासमुह.

संदर्भ : 1. Cohen, M. Meillet, A. Les langues du monde, Paris, 1952.              2. Government of India, Census of India 1961, Vol. I, Part II-C (ii), Language Tables, Delhi, 1969.  

कालेलकर, ना. गो.