बाली : इंडोनेशियाच्या नुसा तेंगारा किंवा छोटी सूंदा द्वीपसमूहातील बेट. हे बेट जावा बेटाच्या पूर्वेस ३ किमी. वर असून दोन्ही बेटांदरम्यान बाली सामुद्रधुनी आहे.

भातशेतीची दृश्ये, बाली बेट : (१) वरचे- लागवडपूर्व जमिनीची मशागत, (२) खालचे- पायऱ्यांच्या भातशेतीचा नमुना.

पूर्वेस लाँबॉक बेट असून ते लाँबॉक सामुद्रधुनीने बाली बेटापासून अलग झाले आहे. बेटाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ७५४’ द. ते ८५२’ द. अक्षांश व ११४ २५’ पू. ते ११५ ४२’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर विस्तार अनुक्रमे १४५ किमी. व ८८ किमी. असून क्षेत्रफळ ५,५६१ चौ. किमी. आहे. लोकसंख्या २२,१७,००० (१९७४).बेटाच्या मध्यभागी आबांग, ताबानान, आगुंग ह्या डोंगरांची रांग असून त्यांतील आगुंग वा बाली हे बेटावरील सर्वोच्च (३,१४२मी.) ज्वालामुखी शिखर आहे. बातूर हा येथील जागृत ज्वालामुखी असून त्याच्या मार्च १९६३ मधील उद्रेकामुळे १,६०० लोक मृत्यूमुखी पडले व हजारो लोक बेघर झाले. बेटावरून अनेक नदीप्रवाह वाहत असले, तरी जलवाहतुकीच्या दृष्टीने ते फारसे उपयुक्त नाहीत. ब्रातान, बातूर व बूजान ही येथील ज्वालामुखीजन्य सरोवरे आहेत.

 

बाली बेटावरील हवामान मोसमी प्रकारचे आहे. आग्नेय मोसमी वाऱ्यांचा काळ कोरडाच जातो. उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. वर्षभर सरासरी तपमान २६° ते ३०° से. आढळते. बेटाच्या वायव्य भागात तुरळक मिश्रवने व गवताळ प्रदेश आहेत, तर पर्वतीय भागात उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षारण्ये आढळतात. मध्यवर्ती डोंगररांगेच्या दक्षिणेकडील भाग मात्र सुपीक, मैदानी असून तेथे भातशेती महत्वाची आहे. येथील जंगलांत सागाचे प्रमाण जास्त आहे. वाघ, रानडुक्कर, हरिण हे प्राणी बेटावर आढळतात. बाली बेटावरील वनस्पती व प्राणिजीवन जावा बेटाप्रमाणेच आढळते. [जावा].

पुरातत्वीय संशोधनानुसार येथील संस्कृतीवर हिंदू धर्माचा प्रभाव प्राचीन काळापासून पडल्याचा पुरावा मिळतो. सुरुवातीस हा प्रभाव भारताशी प्रत्यक्ष व्यापारी व सांस्कृतिक संपर्कांतून उद्भवला. बाली बेटात अजूनही हिंदू संस्कृतीच्या परंपरा व चालीरीती पहावयास मिळतात. सांप्रतच्या काळातही तेथे जातिपद्धत अस्तित्वात आहे.

इसवी सनाच्या दहाव्या शतकाआधी बालीमध्ये बौद्ध धर्म आणि शैवपंथ यांचा प्रभाव होता. नवव्या शतकातील बौद्ध स्तूप सध्याही तेथे पहावयास मिळतात. दहाव्या – अकराव्या शतकांत श्रीविजय साम्राज्याच्यावेळी बाली आणि जावाचे संबंध निकटचे होऊन हिंदू धर्माचा प्रभाव वाढला. याच सुमारास जावाची संस्कृतीही बाली बेटात मूळ धरू लागली. हिंदू धर्माचा प्रभाव चौदाव्या शतकानंतरही दृढ होता.

 या सांस्कृतिक संपर्काचे निदर्शक असे अनेक अवशेष बालीत सापडले आहेत. आठव्या-दहाव्या शतकांतील बहुधा लाकडी मंदिरांशी संलग्न असलेली अनेक शिल्पे बाली बेटावर आहेत. याशिवाय दहाव्या शतकातील एरलंग्ग या राजाची व त्याच्या राण्यांची तम्पक-सिरिंगची शैलोत्कीर्ण थडगी, गोआ गज येथील तेराव्या शतकातील कालमकर प्रतिमान असलेली गुहा, ये गंग येथील चौदाव्या शतकातील मंदिरे व पुष्करिणी तसेच सतराव्या शतकातील मंदिरे आणि त्यांवरील अद् भूत शिल्पे बालीची वैशिष्ट्ये मानली जातात.

 

डचांनी याला १५९७ मध्ये प्रथम भेट दिली व पुढे डच ईस्ट इंडिया कंपनीचे ह्या बेटाशी व्यापारी संबंध सुरू झाले. १८४० मध्ये त्यांनी प्रथम आक्रमण केले व १९०८ पर्यंत डचांनी संपूर्ण बेटाचा ताबा घेतला. दुसऱ्या महायुद्धकाळात ते जपानच्या ताब्यात गेले. युद्धानंतर मात्र हे बेट पुन्हा डचांच्या आधिपत्याखालील ईस्ट इंडोनेशिया राज्याचा एक भाग बनले. १९४९ मध्ये इंडोनेशिया स्वतंत्र झाल्यावर बाली हा त्यातील एक प्रांत बनला.

बाली बेटावरील ११ छपरांचे शिवमंदिर

बेटावर जलसिंचनाच्या सोयींचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. जमीन लाव्हारसापासून बनलेली असल्यामुळे सुपीक असली, तरी तिच्या उंचसखलपणामुळे भाताच्या लागवडीसाठी सोपान, सखोल शेती पद्धतीचा अवलंब केला जातो. तांदूळ, मका, कसावा, माडाचे तेल, खोबरे, भाजीपाला, फळे, कॉफी, तंबाखू, सुरण ही बेटावरील प्रमुख उत्पादने आहेत. उद्योगधंद्यांचा मात्र अभावच आहे. हस्तव्यवसाय, अन्नप्रक्रिया, पर्यटन हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. गुरे व डुकरे पाळली जातात. गुरे, डुकरे, मांस, कॉफी, खोबरे, माडतेल यांची या बेटावरून निर्यात केली जाते. अन्नधान्याची मात्र आयात करावी लागते. एकूण जमिनीपैकी शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी आहे. लोकसंख्येची घनताही जास्त आहे. बेटावरील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ३८१ असून हेच प्रमाण सखल प्रदेशात ५८० पर्यंत आढळते. बेकारी ही मोठी समस्या आहे.

बाली बेट आकाराने लहान असले, तरी सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या हे इंडोनेशियाचा एक महत्त्वाचा घटक बनले आहे. निसर्गसौंदर्यामुळे ते एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र बनले आहे.बेटावर बालिनीज लोकांचे आधिक्य आहे. सोने, चांदी, तांबे इत्यादींचे दागदागिने व वस्तू तसेच लाकडाच्या व मातीच्या वस्तू यांवरील कलाकुसर व रंगकाम हा येथील लोकांचा परंपरागत व्यवसाय प्रसिद्ध आहे. बाली स्त्रिया रेशमी व सुती कापड विणणे व त्यावर नक्षीदार भरतकाम करणे यांत निष्णात आहेत. बाली लोकांच्या संगीत, नृत्य व नाट्य या कला जगभर प्रसिद्ध आहेत. बाली नाटके रामायण व महाभारतातील कथानकांवरच आधारित असतात. बेटावर अनेक ठिकाणी सुंदर शिवालये पहावयास मिळतात. हिंदू संस्कृतीचा पगडा अजूनही येथे जाणवतो [बृहद्भारत].

देनपासार हे या बेटावरील सर्वांत मोठे शहर (लोकसंख्या ५६,०००-१९६१) बेटाच्या द. किनाऱ्यावर असून बाली परगण्याचे प्रमुख ठिकाण आहे. देनपासारजवळील टूबान येथे बेटावरील प्रमुख विमानतळ आहे. याशिवाय उ. भागातील सिंगराज (३३,०००) हे बेटावरील दुसरे महत्त्वाचे शहर आहे. सिंगराजजवळील बूलेलंग हे ठिकाण लहान असले,तरी बेटावरील प्रमुख बंदर आहे. क्लुंगकुंग हे लाकडावरील कोरीवकामासाठी व सोने, चांदीच्या अलंकारांसाठी प्रसिद्ध आहे. यांशिवाय गिआंजार व उबूद ही बेटावरील महत्वाची ठिकाणे आहेत.

 

पहा : इंडोनेशिया.

चौधरी, वसंत देव, शां. भा.