मॅनिझालेस : दक्षिण अमेरिकेच्या कोलंबिया देशातील कॉफीच्या व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र व काल्डास विभागाची (डिपार्टमेंटची) राजधानी. लोकसंख्या २,४७,२८० (१९७९ अंदाज). हे बोगोटाच्या पश्चिमेस १६० किमी. अँडीज पर्वतातील कॉडिंलेरा सेंट्रलच्या उतारावर सस. पासून २,१५३ मी. उंचीवर वसलेले आहे. रस्ते, लोहमार्ग इ. दळणवळणाच्या सुविधा येथे असून हवाई रज्जुमार्गाने हे मारीकीटा व रीओ मॅग्डालीना या शहरांशी जोडलेले आहे. परिसरातील विकसित शेती व कॉफीचे मळे यांमुळे यास महत्त्व आहे.

सोन्याच्या खाणींच्या शोधार्थ निघालेल्या लोकांनी १८४७ मध्ये हे वसविले भूकंपामुळे १८७८ मध्ये व आगीमुळे १९२५ मध्ये या शहराचे अतोनात नुकसान झाले होते. पुढे शहराची पुनर्रचना करण्यात आली. येथे शेती अवजारे, सिमेंट, रसायने, कातडी वस्तू, चॉकोलेट, कापड इ. उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. येथे काल्डास विद्यापीठ (१९४३) असून इतरही अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. शहरात आधुनिक शासकीय इमारती, राष्ट्रीय प्रासाद, प्रेक्षागृह, ग्रंथालये, सर्व बाजूंनी दिसणारे कॅथीड्रल, चित्रपटगृहे, उद्याने, बैलझोंबीचे रंगण इ. आकर्षणस्थळे आहेत.

गाडे, ना. स.