बेलग्रेड: यूरोपातील यूगोस्लाव्हिया देशाची राजधनी लोकसंख्या ९,७६,००० (१९८० अंदाज). `बेअग्राड’ हे स्थानिक नाव देखील १९२९ नंतर अल्पकाळ प्रचलित होते. डॅन्यूज व तिची उपनदी साव्हा यांच्या संगमावर हे वसले आहे. बाल्कन द्वीपकल्पातील डॅन्यूबच्या खोऱ्यात ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात केल्ट, इलिरियन व नंतर रोमन लोकांनी लहान गढ्या बांधल्या होत्या. अशा एकाच गढीभोवती वस्ती वाढून बेलग्रेड शहराचा पाया घातला गेला. मोक्याच्या ठिकाणी असल्याने पूर्वीपासून त्याला लष्करी महत्व होते. डॅन्यूबमधील रोमन आरमाराचे हे केंद्र `सिंजड्यूनम’ या नावाने ओळखले जाई.

बेलगेडचा मध्ययुगीन इतिहास राजकीय हस्तांतराचा इतिहास आहे. ख्रिस्तोत्तर ६व्या शतकात सम्राट पहिल्या जस्टिनिअनने हे जिंकले. पुढे फ्रॅंक (आठवे शतक), बल्गर (नववे ते अकरावे शतक) आणि बायझंटिन (बारावे शतक) यांच्या ताब्यात हे होते. बाराव्या शतकात सर्बियाची राजधानी येथे होती. १५२१ साली हंगेरीयन लोकांकडुन ऑटोमन तुर्कंनी हे जिंकले. ऑस्ट्रियन फौजा अनेकवेळा यांवा चाल करून गेल्या व १७१७ मध्ये राजपुत्र युझेनने (१६६३-१७३६) यशस्वी वेढा घालून बेलग्रेड जिंकले. १८०६ च्या सर्बियन उठावानंतर, १८१३ मध्ये तुर्कांनी ही व्यापले. तुर्की लष्कर १८६७ पर्यंत येथे होते. सर्बियन साम्राज्याची राजधानी म्हणून १८८२ मध्ये याला मान्यता मिळाली. पहिल्या महायुद्धात येथे ऑस्ट्रियन फौजा होत्या. महायुद्धानंतर सर्बियन, क्रोट व स्लोव्हाक या लोकांच्या राष्ट्रांची ही राजधानी झाली. (या राष्ट्राला पुढे युगोस्लाव्हिया म्हटले जाऊ लागले). बेलग्रेडचाकाहीसा पौर्वात्य चेहरामोहरा पहिल्या महायुद्धात संपूर्ण नष्ट झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजा येथे होत्या. त्यावेळी या शहराचे अतोनात नुकसान झाले. रशियाच्या मदतीने युगोस्लाव्हियन देशभक्तांनी बेलग्रेड मुक्त केले. (१९४४).

बेलगे्रड हे देशाचे राजकीय आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. बाल्कन द्वीपकल्पातील हे सर्वात जास्त विकसित औद्यागिक शहर आहे. धातू, रसायने, सुती व लोकरी कापड, मोटरी, टॅ्रक्टर, विद्युत उपकरणे, बांधकाम साहित्य, यंत्रसामुग्री, पादत्राणे, साखर, मांसावरील प्रक्रिया इ. अनेक उद्योगधंदे येथे आढळतात. हे महत्वाचे बंदरही आहे. देशातील ते सर्वात मोठे व्यापारी केंद्र असून देशाचा निम्म्याहुन अधिक निर्यात व्यापार या बंदरातुन हाताळला जातो. पॅरिस-इस्तंबूल लोहमार्ग येथून जातो. शहराजवळ ल्यूब्ल्याना येथे मोठा विमानतळ आहे. शहरातुन तीन आंतरराष्ट्रीय लोहमार्ग जातात. याशिवाय दहा हमरस्ते सहा नद्यांचे जलमार्ग यांनीही बेलग्रेड इतर शहरांशी जोडलेले आहे. येथील बेलग्रेड विद्यापीठ (१८६३), मध्ययुगीन सैनिकीवस्तुसंग्रहालय इ. संस्था उल्लेखनीय आहे. येथे तीस संग्रहालय आणि कालावीथी (राष्ट्रीय संग्रहालय-१८४४), सात

बेलग्रेड

रंगमंदिरे आहेत. शिल्पकला व चित्रपटउद्योग यांचे हे प्रमुख केंद्र असुन शहरात अनेक रमणीय उद्याने व उपवने आहेत.

पंडीत, अविनाशलिमये, दि. ह.