बोलिव्हिया : दक्षिण अमेरिकेतील एक भूवेष्टित प्रजासत्ताक देश. याचा विस्तार ९ ३४’ ५०’’ ते २३ १३’ द. अक्षांश व ५७ २९’ ४०’’ ते ६९ ३३’ ३६’’ प. रेखांश यांदरम्यान आहे. या देशाची दक्षिणोत्तर लांबी १,५२९ किमी. पूर्व-पश्चिम रुंदी १,४४८ किमी. व क्षेत्रफळ १०,९८,५८० चौ.किमी. आहे. लोकसंख्या ५१,५०,५०० (१९८०) याच्या पश्चिमेस चिली व पेरू, उत्तरेस आणि पूर्वेस ब्राझील, आग्नेयीस पॅराग्वाय व दक्षिणेस अर्जेंटिना हे देश आहेत. चिली व पेरू या देशांमुळे हा पॅसिफिक महासागरापासून दूर गेला आहे. सूक्रे (लोकसंख्या ६३,२५९-१९७६) ही देशाची वैधानिक व न्यायिक आणि ला पास (६,५४,७१३-१९७६) राजकीय व व्यापारी राजधानी आहे.

भूवर्णन : बोलिव्हियाचा सु. एक-तृतीयांश प्रदेश पर्वतीय असून तो प्रामुख्याने अँडीज पर्वतश्रेण्यांनी व्यापलेला आहे. बोलिव्हियात अँडीजच्या दोन शाखा आहेत. पश्चिम सरहद्दीवरील शाखा कॉर्डिलेरा ऑक्सिडेंटाल नावाने ओळखली जात असून पूर्वेकडील शाखेमध्ये कॉर्डिलेरा रेआल, कॉर्डिलेरा सेंट्रल व कॉर्डिलेरा ओरेंटाल या पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. अँडीजची सर्वांत जास्त रुंदीही (६५० किमी.) या देशातच आढळते.

भूरचनेच्या दृष्टीने बोलिव्हियाचे (१) आल्तीप्लानो, (२) यूंग्गास व (३) ट्रॉपिकल लोलँड असे तीन प्राकृतिक विभाग पडतात. (१) आल्तीप्लानो हा प्रदेश देशाच्या पश्चिम भागात असून तो पश्चिमेकडील उंचवट्याचा किंवा पठारी प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. देशाच्या पश्चिम सरहद्दीवरील कॉर्डिलेरा ऑक्सीडेंटाल व पूर्वेकडील अँडीज पर्वतश्रेण्यांच्या दरम्यानचा पठारी प्रदेश या विभागात मोडतो. या प्रदेशाची सस. पासून उंची ३,८१० मी. असून तो सपाट व वनस्पतिविरहित आहे. प्रदेशाची लांबी सु. ६४० किमी. व रुंदी सु. १४० किमी. आहे. आल्तीप्लानो प्रदेश हा देशातील उद्योगधंद्यांनी गजबजलेला भाग असून इतक्या उंचीवरील असा औद्योगिक प्रदेश जगात क्वचितच आढळतो. प्रदेशाच्या उत्तर टोकाला बोलिव्हिया व पेरू यांच्या सरहद्दीदरम्यान जगातील सर्वांत अधिक उंचीवरील (सस. पासून ३,८०२ मी.) ⇨तितिकाका (क्षेत्रफळ ८,२८८ चौ.किमी.) हे सरोवर व दक्षिणेस पोओपो (क्षेत्रफळ २,५९० चौ. किमी.) व कॉइपसा ही सरोवरे आहेत. तितिकाका सरोवराच्या जवळच ईयांपू (६,३६२ मी.), तर अगदी दक्षिण भागात बोलिव्हिया-चिली सरहद्दीवर तोकोर्पूरी (५,८३३ मी.) ही महत्त्वाची शिखरे आहेत. तितिकाका सरोवराच्या ईशान्येकडील पर्वतीय प्रदेशाची उंची अधिक असून जास्त उंचीचा काही भाग बर्फाच्छादितही असतो. त्याच भागात इयीमानी (६,४६२ मी.), वाइना पोटोसी (६,२०० मी.), कोलोलो (५,९१५ मी.) इ. पर्वतशिखरे आहेत. देशातील सर्वांत उंच सहामा शिखर (६,५२० मी.) याच सरोवराच्या दक्षिण भागात आहे.

(२) यूंग्गास : आल्तीप्लानोच्या पूर्वेकडील जास्त उंचीच्या अँडीज पूर्वतरांगांचा या प्रदेशात समावेश होतो. दक्षिणेस कोचाव्हांबा व सांता क्रूसपर्यंत याचा विस्तार आढळतो. या प्रदेशांतर्गत असलेल्या कॉर्डिलेरा रेआल पर्वतश्रेणीच्या पूर्व उतारावर अनेक दऱ्यांची व निदऱ्यांची निर्मिती झालेली आढळते. भरपूर पर्जन्याचा हा प्रदेश घनदाट अरण्ये, झपाट्याने वाढणाऱ्या वेली, शैवल व नेचा यांनी व्यापलेला आहे. कॉर्डिलेरा रेआलच्या पूर्वेस प्रदेशाचा उतार मंद होत जातो. कॉर्डिलेरा ओरेंटाल पर्वतश्रेणीतील दऱ्या-खोऱ्यांचा प्रदेश वसाहतयोग्य असून तो ‘पुनो’ या नावाने ओळखला जातो.

(३) ट्रॉपिकल लोलँड : पश्चिमेकडील सस. पासून ३० ते ४५७ मी. उंचीच्या प्रदेशाचा यात समावेश होत असून बोलिव्हियाचा दोन तृतीयांश प्रदेश या विभागात येतो. या प्रदेशाचे प्रमुख दोन भाग पडतात. (अ) उत्तरेकडील मामोरे –बेनी नद्यांचा मैदानी प्रदेश : याचा जवळजवळ निम्मा भाग विषुववृत्तीय प्रकारच्या दाट अरण्यांनी व बाकीचा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. (ब) दक्षिणेकडील चाको-सांता क्रूस प्रदेश : यात गवताळ प्रदेश व खुरट्या वनस्पतींचे आधिक्य आहे.

खनिजे : कथिल हे येथील प्रमुख धातुक असून त्याच्या उत्पादनात बोलिव्हिया जात अग्रेसर आहे. त्याखालोखाल चांदी, खनिज तेल व नैसर्गिक वायूचा क्रमांक लागतो. अलीकडे मात्र चांदीचे उत्पादन कमीकमी होत आहे. याशिवाय जस्त, बिस्मथ, टंगस्टन, अँटिमनी, शिसे, तांबे, सोने, नायट्रेट, ॲस्बेस्टस, लोह, सैंधव इ. देशात सापडतात. पोओपो सरोवराजवळ सैंधवाचे साठे सापडले आहेत. उंचवट्याच्या प्रदेशात कथिल व चांदी यांची खजिने, तर सखल प्रदेशात खजिन तेल सापडते. बहुतेक खनिजांची निर्यात केली जाते. अँडीजमध्ये कथिल धातुक, तर सांता क्रूस व चाको विभागांत खजिन तेल महत्त्वाचे आहे.

नद्या : बोलिव्हियामध्ये तीन नदीप्रणाली आढळतात : (१) उत्तरेकडील ॲमेझॉन नदीप्रणाली, (२) आग्नेय कोपऱ्यातील रीओ द ला प्लाता नदीप्रणाली व (३) पश्चिमेकडील तितिकाका सरोवर नदीप्रणाली. बेनी, मामोरे, ग्वपूरे, माद्रे दे द्योस या ॲमेझॉन नदीप्रणालीतील शीर्ष प्रवाह व उपप्रवाहांनी बोलिव्हियाचा मध्य व उत्तरेकडील विस्तृत प्रदेश व्यापला आहे. या असंख्य नद्या व उपनद्यांचा संयुक्त प्रवाह देशाच्या उत्तर कोपऱ्यात ‘मादीरा’ नावाने ओळखला जातो. हा प्रवाह पुढे ब्राझीलमध्ये प्रवेश करून ॲमेझॉन नदीला मिळतो. दलदलयुक्त विस्तृत असा हा प्रदेश सॅव्हाना व विषुववृत्तीय अरण्यांनी व्यापलेला असून नेहमी पूरग्रस्त असतो. अनेक सरोवरे त्याचप्रमाणे खाजणे आढळत असून रोगोआग्वादो, रोगाग्वा, युसाल, ईतोनामास, लॉस आरोयोस, हुआची ही त्यांपैकी काही प्रमुख सरोवरे होत.

देशाच्या आग्नेय कोपऱ्यात अनेक सरोवर असून त्यांतून ठिकठिकाणी नदी प्रवाहांची निर्मिती झालेली आढळते. या सर्व नद्या देशाबाहेर पॅराग्वाय नदीस जाऊन मिळतात. पॅराग्वाय नदी मात्र बोलिव्हियात प्रवेश न करता देशाच्या आग्नेय कोपऱ्यातील सरहद्दीवरून जाते. ईशान्य भागाप्रमाणेच हाही भाग उन्हाळ्यात जलमय होतो. त्यामुळे या भागातही अनेक खारकच्छे व दलदली निर्माण झालेल्या असून, येथील नद्यांचे प्रवाह ठिकठिकाणी तुटलेले आढळतात. देशाच्या दक्षिण भागातून पील्कोमायो ही प्रमुख नदी वाहते.


तिसरी नदीप्रणाली म्हणजे तितिकाका सरोवर नदीप्रणाली किंवा पश्चिमेकडील पठारी प्रदेशातील (आल्तीप्लानो) नदीप्रणाली होय. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वांत उंचीवर असलेली ही अंतर्गत नदीप्रणाली असल्याने नद्या समुद्राला न मिळता या प्रदेशातील खाजण किंवा सरोवरांना मिळतात. येथील नद्यांचे व पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते किंवा कोरडी जमीन ते पाणी शोषून घेते. देसाग्वादेरो ही या प्रदेशातील प्रमुख नदी (लांबी ३२२ किमी.) असून ती उत्तरेकडील तितिकाका सरोवरात उगम पावून दक्षिणेकडे पोओपो या खाऱ्या सरोवराला येऊन मिळते. त्याचप्रमाणे पोओपो व त्याच्याच पश्चिमेला असलेले कॉइपसा सरोवर ही एकमेकांशी लाकाजाहुइरा नदीने जोडलेली आहेत. कॉइपसा सरोवराच्याच दक्षिणेस सलार दे कॉइपसा खाजण आहे. याशिवाय पोओपो सरोवराच्या दक्षिणेकडील सालार दे ऊयूनी (क्षेत्र ९,०६५ चौ. किमी.) या विस्तृत खाजणाला मिळणाऱ्या नद्यांची एक स्वतंत्रच नदीप्रणाली निर्माण झालेली आढळते. देशात, विशेषतः यूंग्गास प्रदेशात, अनेक धबधबे व द्रुतवाह असले, तरी जलविद्युत्‌शक्तिनिर्मितीसाठी त्यांचा विशेष उपयोग केलेला नाही. देशात अनेक लहानमोठी सरोवरे, खारकच्छ, खाजण व दलदली आढळतात. तितिकाका सरोवराशिवाय देशातील पोओपो हे दुसरे महत्त्वाचे सरोवर आल्तीप्लानो प्रदेशात असून ते सस.पासून ३,६८६ मी. उंचीवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर उथळ असून सभोवतालच्या प्रदेशापेक्षा याची खोली सामान्यपणे ४.५ मी. आहे.

हवामान : बोलिव्हिया हा देश जरी उष्ण कटिबंधात येत असला, तरी येथील तपमान व पर्जन्य यांमध्ये मात्र उंचीनुसार फरक आढळतो. प्राकृतिक विभागांना अनुसरूनच हवामानाचे तीन विभाग पडतात. आल्तीप्लानो विभाग ३,३५३ ते ४,२६४ मी. उंचीच्या प्रदेशात हवामान सतत थंड आहे. उन्हाळ्यात पर्जन्यवृष्टी होते, तर हिवाळ्यात कधीकधी हिमवृष्टी होते. वर्षभर थंड वारे वाहत असून रात्री तपमान गोठणबिंदूखाली जाते. दिवसा मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. ला पास येथे वार्षिक सरासरी तपमान १० से. आढळते. रेआल पर्वतश्रेणीतील हिमरेषेपेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात ध्रुवीय प्रकारचे हवामान आढळते. या भागातील तपमानकक्षा जास्त असते. वार्षिक पर्जन्यमान ३८ ते ७१ सेंमी. असून पाऊस डिसेंबर ते फेब्रुवारी यांदरम्यान पडतो. शेतीच्या दृष्टीने हे पर्जन्यमान अपुरे असल्यामुळे कृत्रिम पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासते. पठाराच्या उत्तर भागात व तितिकाका सरोवराच्या परिसरात उन्हाळ्यात तीव्र झंझावात येतात. यूंग्गास प्रदेशातील जास्त उंचीच्या भागात हवामान उपोष्ण कटिबंधाप्रमाणेच आर्द्र प्रकारचे असून पूर्वेकडे हवामान क्रमाक्रमाने उबदार होत जाते. पर्जन्यमान अधिक (६६ ते १२७ सेंमी.) असून पर्जन्य वर्षभर पडतो. तपमानकक्षा कमी आढळते. जास्त उंचीच्या भागात तपमान १० ते १३से. व पर्जन्य ६४ सेंमी., तर कमी उंचीच्या भागात तपमान १६ ते २१से. व पर्जन्य ८९ सेंमी. आढळतो. २,८९५ मी. ते ३,०७८ मी. उंचीच्या प्रदेशात पर्जन्यमान बरेच कमी असून हिवाळ्यात कधीकधी हिमतुषार आढळतात. ईशान्येकडील सपाट प्रदेशात मात्र पर्वतीय प्रदेशापेक्षा वेगळ्या प्रकारचे हवामान आढळते. या मैदानी प्रदेशातील हवामान विषुववृत्तीय उष्ण व बाष्पयुक्त असते. वार्षिक सरासरी पर्जन्य १८० सेंमी. पडतो. भरपूर पर्जन्यामुळे वारंवार पूरस्थिती गंभीर बनते. उत्तरेकडून दक्षिणकडे पर्जन्यमान कमी होत जाऊन हवामान अधिकाधिक कोरडे बनते. मध्यभागात पर्जन्य १४० सेंमी., तर दक्षिणेकडे चाको प्रदेशात तो केवळ १५ सेंमी. पडतो. त्यामुळे या प्रदेशात नेहमी दुष्काळाची छाया असते.

वनस्पती व प्राणी : शेजारील देशांपेक्षा बोलिव्हियातील वनस्पती व प्राणी जीवनात विविधता आढळते. हवामानाच्या वेगवेगळ्या विभागांनुसार व भू-पृष्ठाच्या कमी-अधिक उंचीनुसार ॲमेझॉन खोऱ्यातील विषुववृत्तीय प्रकारच्या अरण्यांपासून ते ध्रुवीय प्रकारच्या वनस्पतींपर्यंतचे प्रकार आढळतात. आल्तीप्लानो विभागातील कमी पर्जन्याच्या प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण विरळ आहे. ३,०४८ मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात ‘ईचू’ नावाचे झुबकेदार गवत आढळते. याचा उपयोग गुरांसाठी, तसेच झोपड्या व चट्या बनविण्यासाठी केला जातो. तितिकाका सरोवराच्या परिसरात तोतोरा नावाची वेताच्या प्रकारातील वनस्पती आढळते. तिचा उपयोग, ‘बलसास’ (छोट्या मासेमारी बोटी) तयार करण्यासाठी, तर तोला आणि यारेटा वनस्पतींचा सरपणासाठी उपयोग केला जातो. तितिकाका विभाग बटाट्याचे उगमस्थान मानले जाते. यूंग्गास प्रदेशातील अधिक उंचीच्या प्रदेशात दाट अरण्ये आढळतात. यांमध्ये प्रामुख्याने हिरवा पाइन, काळा अक्रोड, अलीसो, लॉरेल, सीडार, तार्को (छाया देणारी वनस्पती), साउको व सिंकोना (औषधी वनस्पती) इ. वृक्षप्रकार आढळतात. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात उष्ण कटिबंधीय दाट वर्षारण्ये आहेत. या प्रदेशात कठीण लाकडाचे सु. २,००० वर वनस्पती प्रकार आढळतात. रबर, ब्राझील नट, मॅहॉगनी, ताडवृक्ष इ. येथील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती आहेत. लाकूड उद्योगाच्या दृष्टीने उपयोगी ठरणारे शंभरांवर वनस्पती प्रकार असून काहींचा उपयोग फळे, तेल व रेझिनसाठी होतो. सु. १४ प्रकारचे ताडवृक्ष असून काही ठिकाणी उंच ताडवृक्षांची अरण्येही आढळतात. चाको प्रदेशात खुरट्या वनस्पती असून अधूनमधून दलदली व सॅव्हाना प्रकारच्या वनस्पतींचे पट्टे आढळतात. क्वेब्राचो, पालो सांतो, मिस्टॉल, कॅरोब हे येथील प्रमुख वृक्षप्रकार होत.

बोलिव्हियातील प्राणिजीवनाचे अर्जेंटिना, ब्राझील व पेरूमधील प्राणिजीवनाशी बरेच साम्य आढळते. ॲमेझॉन खोऱ्यात प्यूमा, जॅगुआर, ससा, माकड, कोआटी, खार, टॅपिर, आर्माडिलो, स्लॉथ, पेकारी, कॅपिबारा, मोठा मुंगीखाऊ (अँटबेअर), चष्म्यासारखे ठिपके असणारे अस्वल हे प्राणी, तर चाको भागात हरणे आढळतात. यूंग्गास भागात सामान्यपणे कॅपिबारा, पेकारी, टॅपिर व इतर प्राणी आढळतात. आल्तीप्लानो भागात प्रामुख्याने लामा व अल्पाका हे प्राणी असून त्यांचा उपयोग वाहतूक, लोकर व खाद्यासाठी केला जातो. जास्त उंचीचे भाग वगळता इतरत्र यांची जागा आता गाढवे, गुरे, डुकरे व मेंढ्या यांनी घेतलेली आढळते. त्याशिवाय तेथे ग्वानाको, रानटी व्हिकुना, चिंचिल्ला, व्हिस्काचा, विविध प्रकारचे गिनीपिग इ. प्राणी आढळतात. तितिकाका सरोवरात ट्राउट, सार्डिन इ. मासे, तर नद्यांमधून पर्च, ट्राउट व इतर प्रकारचे मासे पकडले जातात.

पक्षिजीवन विविध व समृद्ध आहे. विविध प्रकारचे पोपट, गरुड, करकोचे, गिधाडे, तालशुक (मॅको), बदके, हंस, कबूतरे, लावा इ. पक्षी आढळतात. ३,०४८ मी. उंचीखालील प्रदेशात सरडे, ॲलिगेटर, अजगर इ. सरपटणारे प्राणी, विविध कीटक, तर नद्यांमध्ये ॲलिगेटरसारखे केमन आढळतात.

चौधरी, वसंत.


इतिहास व राज्यव्यवस्था : पुरातत्त्वीय अवशेषांवरून बोलिव्हियाचा प्राचीन इतिहास ख्रि. पू. काळापासून सुरू होतो. तितिकाका सरोवराच्या दक्षिणेकडील तीआवानाको परिसरात जे अवशेष सापडले, त्यांवरून विद्यमान बोलिव्हियाच्या परिसरातील ख्रि. पू. काळातील समाजाची तसेच इसवी सनाच्या पहिल्या सहा शतकांत भरभराटीस आलेल्या एका संस्कृतीचीही कल्पना येते. तीआवानाको संस्कृती असाच या संस्कृतीचा निर्देष केला जातो. या संस्कृतीच्या निदर्शक अशा अनेक गोष्टी पुरातत्त्वीय उत्खननात सापडल्या आहेत. त्यांपैकी रंगीत मृत्पात्रे, सु.१०० टन वजनाच्या मोठ्या घडीव शिळा व घोटीव चौकोनी दगडांत बांधलेली घरे उल्लेखनीय आहेत. इ. स. सहाव्या शतकानंतर या प्रदेशात स्थानिक इंडियन जमातीची छोटी छोटी राज्ये उदयास आली. पुढे अकराव्या शतकात आयमारा या प्रभावी जमातीच्या नेतृत्वाखाली संघटित राज्य उदयास आले. आयमारांच्या ताब्यात लॅटिन अमेरिकेतील विस्तृत प्रदेश होता. पुढे इंका जमातीच्या लोकांनी पंधराव्या शतकात आयमारांची सत्ता नष्ट केली. तथापि [⟶ इंका] इंका-कालखंडातही आयमारांची पशुपालक-कृषी संस्कृती व पितृसत्ताक कुटुंबपद्धती टिकून राहिली. ⇨आयमारा भाषासमूहातील विविध बोली व त्या वेळी प्रचारात होत्या. आधुनिक बोलिव्हियन संस्कृतीत आयमारांचा वारसा मिसळून गेलेला आहे.

इ. स. १५३२ मध्ये फ्रांथीस्को आणि एर्नान्दो पिझारो या दोन स्पॅनिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्पेनने इंका साम्राज्य बुडविले [⟶ पिझारो बंधु] व १५३८ पर्यंत या प्रदेशातील इंडियन टोळ्यांचा विरोध पूर्णपणे मोडून काढला. तेव्हापासून बोलिव्हियातील स्पॅनिश वसाहतवादाचा कालखंड सुरू झाला. या प्रदेशात १५४५ मध्ये पोटोसी येथे चांदीच्या खाणींचा शोध लागला. त्यामुळे बोलिव्हियात स्पॅनिश वसाहतकारांची गर्दी होऊ लागली. ओरुरो, चूकीसाका, ला पास, कोचाव्हांबा यांसारखी शहरे उदयास आली. स्पॅनिश वसाहतकारांनी खाणकामात इंडियन लोकांना सक्तीने गुंतविले. याच कामासाठी आफ्रिकेतूनही निग्रो गुलाम आणण्यात आले. तेव्हापासूनच बोलिव्हियाच्या नैसर्गिक संपत्तीची लूट व मनुष्यबळाची पिळवणूक सुरू झाली. १५५९ मध्ये या प्रदेशाची व्यवस्था चारकासच्या ‘ऑडेशिया’ म्हणजे प्रशासकीय केंद्राकडे सोपविण्यात आली. त्यानंतर १७७६ पर्यंत पेरूचा स्पॅनिश व्हाइसरॉय या भागाचा कारभार पाहत असे. नंतर ला प्लाताच्या व्हाइसरॉयकडे कारभार गेला. वसाहतकाळात वेठबिगारीखाली राबविण्यात येणाऱ्या इंडियन लोकांनी अनेकदा उठाव केले. त्यांपैकी तूपाक आमारू याच्या नेतृत्वाखालील १७८० चा उठाव मोठा होता. उत्तर पेरूमधील चूकीसाका आणि बोलिव्हियातील ला पास या शहरांत मे १८०९ मध्ये स्वातंत्र्य चळवळीस सुरुवात झाली व गनिमी युद्धतंत्राने क्रांतिकारकांनी वसाहतवाल्यांना जेरीस आणले. बोलिव्हिया हे दक्षिण अमेरिकेतील मुक्तिआंदोलनात सहभागी झालेले पहिले राष्ट्र होते पण या आंदोलनात यश मिळविणारे ते अखेरचे राष्ट्र ठरले. १८०९ ते१८२५ दरम्यान स्वातंत्र्यसैनिक व स्पेनचे शाही लष्कर यांत अनेक चकमकी व लढाया झाल्या. या लढायांतून व्हेनेझुएला वसाहत स्वतंत्र करण्यात मुक्तिसेनेस यश आले. ⇨सीमॉन बोलीव्हारने काराकास, आराउर व्हिक्टोरिया, मारेओ, कॅरॉबाबी आदी ठिकाणच्या लढायांत स्पॅनिश सैन्याचा पराभव केला. तुरळक पराभव वगळता दुर्गम अँडीज पर्वत पार करून त्याने बॉइआका येथील महत्वाची लढाई जिंकली. (७ ऑगस्ट १८१९) आणि स्वतंत्र अशा कोलंबिया प्रजासत्ताकाची घोषणा केली. त्यानंतर जनरल आंतोन्यो होसे दे सूक्रे (१७९५-१८३०) याच्या नेतृत्वाखाली मुक्तिसैन्याने आयाकूचो (पेरू) येथे स्पॅनिश सैन्याचा पराभव केला व व्हेनेझुएला तसेच बोलिव्हिया हे देश मुक्त झाले. (९ डिसेंबर १८२४). ६ ऑगस्ट १८२५ रोजी ला प्लाता येथे मुक्तिनेत्यांची परिषद होऊन पेरूचा आग्नेय भाग व्हेनेझुएलात समाविष्ट करण्यात आला आणि बोलीव्हारच्या स्मरणार्थ त्याला बोलिव्हिया हे नाव देण्यात आले. या नवीन प्रजासत्ताकाकरिता बोलीव्हारने केलेले संविधान मान्य करण्यात आले आणि जनरल सूक्रेची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राजकीय अस्थिरता, दीर्घकालीन लढाया व खाणींतून घटत गेलेले चांदीचे उत्पादन यांमुळे बोलिव्हियाची आर्थिक स्थिती खालावली होती. पुढे बोलीव्हार व सूक्रे यांच्यातील मतभेद विकोपाला जाऊन सूक्रेने राजीनामा दिला (१८२८). तेव्हा मार्शल आंद्रेस सांता क्रूस या लष्करी अधिकाऱ्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली (कार. १८२९-३९). त्याने बोलिव्हिया व पेरू यांचे संघराज्य स्थापन करून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. चिलीला हा संघराज्य धोक्याचा वाटू लागला तेव्हा चिलीने बोलिव्हियावर आक्रमण करून त्याचा पराभव केला (१८३९) व आंद्रेस परागंदा होऊन हे संघराज्य संपुष्टात आले. यानंतरची सु. पन्नास वर्षे बोलिव्हियाला अंतर्गत कलह, बंडे, खालावलेली आर्थिक स्थिती आणि भ्रष्टाचार यांना तोंड द्यावे लागले. या काळात होसे बायीव्ह्यान (कार. १८४१-४७), मॅन्यूएल बेल्सू (कार. १८४८-५५), होसे लिनारेस (कार. १८५७-६१), होसे आका (कार. १८६१-६५), माऱ्यानो मेल्‌गारेहो (कार.१८६५-७१), ईलाऱ्यॉन दासा (कार. १८७६-७९) हे लष्करी सेनानी बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष होते. यांपैकी बायीव्ह्यान याने नवीन संविधान अंमलात आणून प्रशासनात काही सुधारणा केल्या व आर्थिक स्थिती सुधारली पण ईलाऱ्यॉन दासाच्या वेळी भ्रष्टाचार वाढून चिली लोकांचा हस्तक्षेप व प्रभाव वाढला. यातून युद्धाला तोंड फुटले (१८७९). ‘पॅसिफिकचे युद्ध’ या नावाने ते ओळखले जाते. त्यात बोलिव्हियाचा पराभव झाला आणि पॅसिफिक किनारपट्टी व नायट्रेटचा साठा असलेला आटाकामा प्रदेश चिलीला द्यावा लागला. होसे पांदो (कार. १८९९-१९०४) याच्या कारकीर्दीत बोलिव्हियाने पॅसिफिक युद्धातील नुकसानभरपाई म्हणून आक्री नदीजवळील रबराचे उत्पन्न असणारा प्रदेश ब्राझीलला दिला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पक्षांतर्गत स्पर्धा, लष्करी क्रांत्या, यादवी युद्धे आणि हुकूमशाही राजवटी यांमुळे बोलिव्हियात अनागोंदी माजली. इस्माएल माँतेससारखा कर्तबगार सेनानी राष्ट्राध्यक्ष झाला (कार. १९०४-०९ १९१३-१७) तेव्हा त्याने चिलीबरोबर शांतता तह करून युद्धविराम केला आणि नंतर प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी काही योजना आखल्या. त्यांपैकी रेल्वेमार्गाचा विस्तार खाणकामगारांना वरदान ठरला. माँतेसनंतर देशात मंदीची लाट आली आणि परकीयांचे हस्तक्षेप वाढून येथील खाणी आणि तेलसाठे यांत अमेरिका व इतर पाश्चात्त्य देश यांनी आर्थिक गुंतवणूक केली. पॅसिफिक युद्धांनंतर चाको या सीमावर्ती खनिज तेलसंपन्न प्रदेशाच्या हक्काबाबत वाद निर्माण होऊन पॅराग्वायबरोबर युद्ध (१९३२-३५) उद्‌भवले आणि बोलिव्हियाचा पराभव झाला. चाको युद्धाचे दूरगामी परिणाम, विशेषतः आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांवर झाले. या दोन्ही क्षेत्रांत अराजक माजले. १९३६ साली डेव्हिड तोरो (कार. १९३६-३७) आणि त्यानंतर हेर्मान बुश (कार. १९३७ – ३९) यांनी सत्ता हस्तगत केली. या काळात कामगार कायदे आणि प्रागतिक संविधान अंमलात आले. या सुमारास बोलिव्हियात विविध राजकीय पक्षही उदयास आले. त्यांपैकी उदारमतवादी नॅशनल रेव्होल्यूशनरी मूव्हमेन्ट (एम्. एन्. आर्.) आणि साम्यवादी रशियाधार्जिणा (पी. आय्. आर्.) या दोन प्रभावी पक्षांचा उदय झाला. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४३ साली बोलिव्हियाने दोस्त राष्ट्रांची बाजू घेतली. त्या वेळी जनरल एन्‌रीके पेन्यारांदा हा जुलमी हुकूमशहा सत्तेवर होता. एम्. एन्. आर्. पक्षाने केलेल्या उठावामुळे पेन्यारांदाला पदच्युत करण्यात आले व कर्नल व्हिल्लारोएल हा राष्ट्राध्यक्ष झाला (कार. १८४४-४६). शेतकरी, खाणकामगार यांच्या समस्यांवर भर देऊन शेती व खाणउद्योग यांत सुधारणा करण्याचे त्याने प्रयत्न केले. पण या जनकल्याणाच्या मोहिमेत चुका झाल्या व अंतर्गत बेबनाव निर्माण झाले. हितशत्रू गटांनी याचे भांडवल करून या पुरोगामी सुधारणांना विरोध करण्याचे ठरविले. देशभर निदर्शने, जाळपोळ इ. प्रकार सुरू केले. परिणामतः १९४६ साली ला पास येथे उठाव होऊन राष्ट्राध्यक्ष व्हिल्लारोएल व त्याचे काही सहकारी यांना ठार करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर देशात १९५२ ची क्रांती घडून आली. एम्. एन्. आर्. पक्षाचा व व्हिल्लारोएल याचा ज्येष्ठ सहकारी व्हीक्तॉर पास एस्तेंसोरो हा त्याच्या अनुपस्थितीत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला (१९५१). तथापि तत्कालीन लष्करी राजवटीने त्यास विरोध केला. त्यामुळे देशभर उठाव झाले. १९५२ मध्ये खाणकामगारांनी फार मोठा क्रांतिकारक उठाव करून एस्तेंसोरो यास पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी प्रस्थापित केले. या क्रांतीचा बोलिव्हियाच्या नंतरच्या प्रगतीत मोठा वाटा आहे.

व्हीक्तॉर पास एस्तेंसोरो (कार. १९५२-५६ १९६०-६४) याने आपल्या पक्षाची ध्येयधोरणे अंमलात आणली. त्याने कथिल उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण केले आणि मजुरांचे जीवनमान सुधारले. शिवाय सैन्यातील सरंजामदार कमी करून सामान्यांना गुणवत्तेनुसार सैन्यात भरती करण्यास प्रारंभ केला. १९५३ च्या ऑगस्टमध्ये कृषिभूविषयक कायद्यात सुधारणा करून ‘कसेल त्याची जमीन’ हे धोरण स्वीकारले व शेतजमिनीचे त्यानुसार फेरवाटप केले. समाजकल्याणासाठी सामाजिक संस्था स्थापन केल्या. एकवीस वर्षांवरील सर्वांना मतदानाचा हक्क दिला. मध्यंतरीच्या काळात एर्नान्दो झ्यूएझो (कार. १९५६-६०) हा एम्. एन्. आर्. पक्षाचा उमेदवार अध्यक्ष झाला.

त्याने अमेरिकेच्या मदतीने चलनफुगवटा कमी करून राष्ट्रीयीकृत नऊ कंपन्यांतील कामगार प्रशासन रद्द केले तसेच अमेरिकेतील तेलकंपन्यांना बोलिव्हियात भाग भांडवल गुंतविण्यास परवानगी दिली. या त्याच्या धोरणामुळे एम्. एन्. आर्. पक्षाने एस्तेंसोरो यास अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आणले. १९५२ च्या राष्ट्रीय क्रांतीनंतर एम्.एन्. आर्. पक्षाचे वर्चस्व वाढले आणि राष्ट्राध्यक्षपद त्या पक्षाकडे गेले. लष्करी अंमल जारी होईपर्यंत (१९६४) या पक्षाकडेच देशाची राजकीय सत्ता होती. लष्करी प्रशासनात रेने ओर्तुनो (कार. १९६४-६९), लूईस आदॉल्फो सालीनास (कार.१९६९-७०), आल्फ्रेदो कन्दिया (कार. १९७०-ऑक्टोबर १९७०), ह्‌वान तोरेस (१९७०-७१), ह्यूगो स्वारेथ (कार. १९७१-७४) इ. लष्करी सेनानी राष्ट्राच्या अध्यक्षपदी आले पण कोणाचीही कारकीर्द दीर्घकाळ टिकली नाही. हुकूमशाही राजवटीतील तेलकंपन्यांचे राष्ट्रीयीकरण व रशियाशी दृढ मैत्री याच काय त्या महत्त्वाच्या घटना घडल्या.


बोलिव्हिया १८२५ साली स्वतंत्र झाला व १८२६ मध्ये या नवजात राष्ट्राचे पहिले संविधान तयार झाले. तेव्हापासून १९६४ पर्यंत देशात सु. १७५ राजकीय स्थित्यंतरे झाली आणि देशाचे संविधान सोळा वेळा बदलण्यात आले. १९६९ पासून लष्करी राजवटीखाली देशाचे संविधान जवळजवळ स्थगितच करण्यात आले आहे. तथापि विद्यमान शासनयंत्रणेची चौकट १९४७ सालच्या संविधानानुसार आहे. १९६४ मधील लष्करी उठावानंतर या संविधानाचे पुररुज्जीवन करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुखही असून त्याची निवड प्रत्यक्ष सार्वत्रिक मतदानाने ४ वर्षांसाठी केली जाते. राष्ट्राध्यक्ष १५ सदस्यांच्या मंत्रिमंडळाच्या मदतीने राज्यकारभार पाहतो. मंत्री, राजदूत, रोमन कॅथलिक आर्चबिशप, नगरपरिषदांचे प्रशासक इत्यादिकांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करतो. परराष्ट्रीय व्यवहार खाते राष्ट्राध्यक्षाच्या अखत्यारीत आहे. वरिष्ठ गृह (सीनेट) व कनिष्ठ गृह (चेंबर ऑफ डेप्युटीज) मिळून काँग्रेस बनते. प्रतिवर्षी ६ ऑगस्ट रोजी काँग्रेसची बैठक ला पास येथे भरते. येथेच राष्ट्राध्यक्षांचे व इतर शासकीय कार्यालये आहेत. सीनेट-सदस्यांची मुदत ६ वर्षांची असून त्यांपैकी एकतृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. देशातील ९ विभागांतून (डिपार्टमेंट) प्रत्येकी ३ याप्रमाणे सीनेट सदस्यांची निवडणूक होते. कनिष्ठ गृहात १०२ सदस्य असून त्यांची मुदत ४ वर्षांची असते. १९५२ पासून मतदानाचा हक्क सार्वत्रिक करण्यात आला. २१ वर्षांवरील पुरुष व १९ वर्षांवरील स्त्रिया यांना मतदानाचा अधिकार आहे. देशाच्या प्रमुख अशा नऊ विभागांवर राष्ट्राध्यक्षाने नियुक्त केलेल्या प्रीफेक्ट हा शासकीय मुख्याधिकारी असतो. या नऊ विभागांच्या अंतर्गत, देशात एकूण ९८ प्रांत आणि त्यांखालोखाल १,२७२ कँटन असे प्रशासकीय विभाग असून त्यांचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालतो. प्रत्येक विभागाच्या राजधानीच्या ठिकाणी नगरपरिषदा आहेत. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था, शिक्षण व हमरस्ते हे विषय केंद्रीय शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत. इतर बाबी विभागीय प्रशासनाच्या अखत्यारीत आहेत.

देशातील राजकीय पक्षांच्या कार्यावर १९७४ साली बंदी घालण्यात आली. तथापि जुलै १९७८ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तत्पूर्वी ही बंदी उठविण्यात आली. देशातील प्रमुख राजकीय पक्षांत डावे पक्ष व उजवे पक्ष अशी स्पष्ट विभागणी झालेली असून या दोन्ही गटांतील आघाड्या निवडणुका लढवीत असतात. राष्ट्रवादी, क्रांतिकारक, मार्क्सवादी, लेनिनवादी, ट्रॉट्स्कीवादी, समाजवादी, लोकशाहीवादी अशा विचारसरणीचे हे पक्षोपपक्ष असून स्थानिक इंडियन लोकांचा प्रभाव असणाराही एक पक्ष देशात आहे. १३ जानेवारी १९८० रोजी काँग्रेसने राष्ट्राध्यक्षपदाच्या, तसेच सार्वत्रिक निवडणुका त्याच वर्षाच्या मध्यास घेण्याचे ठरविले व हंगामी राष्ट्राध्यक्षा म्हणून लिडिया ग्वेइर हिला काम पाहण्यास सांगितले. बोलिव्हियातील राष्ट्राध्यक्ष होणारी ही पहिली स्त्री १७ जुलैपर्यंत आणि त्यानंतर मेजर जनरल लूईस गार्सिया मेझा तेहादा हे त्या पदावर होते. १९७९ साली पेसो या राष्ट्रीय चलनाचे १९ टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले होते. परिणामतः १९८०-८१ मध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई झाली. कामगारवर्गाचे मोठ्या प्रमाणावर संप घडून आले. याही परिस्थितीत २९ जून १९८० रोजी देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकींत राष्ट्राध्यक्षपदाच्या कोणत्याच उमेदवाराला एकूण मतदानापैकी निम्मीही मते न मिळाल्याने काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात अध्यक्षीय निवडणुकीसंबंधी निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. तथापि १७ जुलै १९८० रोजी मे. ज. लूईस गार्सिया मेझा तेहादा याने उठाव करून सत्ता हाती घेतली व हंगामी राष्ट्राध्यक्ष लिडिया ग्वेइर हिला दूर करून निवडणुका रद्दबातल ठरविल्या. या नव्या सैनिकी शासनाने राजकीय पक्षांच्या व कामगार संघटनांच्या नेत्यांना अटक केली, तसेच विद्यापीठातील शिक्षक, न्यायदंडाधिकारी वगैरेंना कामावरून दूर केले. परिणामतः अमेरिकेने आपली आर्थिक व लष्करी मदत बंद केली व बोलिव्हियातील आपल्या राजदूतालाही परत बोलाविले. अँडिअन गटातील कोलंबिया, एक्वादोर, पेरू व व्हेनेझुएला या देशांनीही लष्करी राजवटीच्या निवडणुका रद्दबातल ठरविण्याच्या निर्णयाचा निषेध केला. एक्वादोरने तर बोलिव्हियाशी असलेले राजनैतिक संबंधही तोडून टाकले. ग्रेट ब्रिटनने १ कोटी ९० लक्ष पौंडांची खाणउद्योगासाठी देऊ केलेली मदत रोखली. प. जर्मनी व बेल्जियम यांनीही मदतीत कपात केली. तथापि नव्या राजवटीला ब्राझील, यूरग्वाय, पॅराग्वाय, चिली, तैवान, इझ्राएल व दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक इत्यादींनी अधिकृत मान्यता दिली. विशेषतः अर्जेंटिनाने अन्नधान्य व इतर आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर दिली.

न्यायव्यवस्था : देशात सर्वोच्च न्यायालय असून त्याचे कार्यालय सूक्रे या राजधानीच्या ठिकाणी आहे. त्यात काँगेसने नेमलेले व १० वर्षांची मुदत असलेले १२ सदस्य असतात. प्रत्येकी तीन न्यायाधीशांच्या चार विभागांत सर्वोच्च न्यायालय विभागलेले आहे. यांपैकी दोन विभाग दिवाणी खटले, एक विभाग फौजदारी खटले व उरलेले एक प्रशासकीय, सामाजिक व खाणउद्योगाशी निगडित अशा खटल्यांचा निर्णय देते. देशाच्या ९ विभागांत प्रत्येकी एक जिल्हा न्यायालय असून त्याखाली इतर कनिष्ठ न्यायालये आहेत. महान्यायवाद्याची (ॲटर्नी जनरल) नेमणूक सीनेटच्या प्रस्तावानुसार राष्ट्राध्यक्ष करतो. प्रत्येक विभागासाठी एक सरकारी अधिवक्ता असतो.

संरक्षण : देशाची आठ सैनिकी जिह्यांत विभागणी केली असून सहा ठिकाणी प्रादेशिक सैनिकी कार्यालये आहेत. १९४३च्या अधिनियमाप्रमाणे १५,००० सैनिकांची कायमची भूसेना ठेवण्याची तरतूद असली, तरी १९८१ मधील ही संख्या २०,००० होती. सैनिकी सेवा ही सक्तीची आहे. भूसेनेत १३ पायदळ रेजिमेंट असून चार घोडदळ विभाग व तीन तोफखाना दले आहेत. गनिमी युद्धतंत्राच्या प्रतिकारार्थ दोन रेंजर रेजिमेंट खास तयार करण्यात आल्या आहेत. बालिव्हियन वायुसेनेची स्थापना १९२३ साली झाली. तीत तीन स्क्वॉड्रन असून बाँबफेकी व लढाऊ विमानांचा यात अंतर्भाव होतो. वायुसेनेची संख्या ४,००० होती मात्र नौसेना मर्यादित असून सैनिकी संख्या २,३०० होती (१९८०). नद्या आणि तितिकाका सरोवर यांवरील टेहळणीसाठी नौसेनेचा उपयोग होतो.

जाधव.रा. ग. जोशी,ग. भा. देशपांडे, सु. र.

आर्थिक स्थिती : नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेला हा देश कृषिउत्पादनात मात्र मागासलेला राहिला. चांदी, कथिल यांच्या खनिजांच्या निर्यातीवर, पण अन्नधान्याच्या आयातीवरच वसाहतकाळापासून या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून होती. तथापि १९५२ च्या क्रांतीनंतर अर्थव्यवस्थेला कृषिविकासाचे आणि औद्यागिकीकरणाचे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू वसाहतकालीन असमतोल दूर करून स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.


देशातील जवळजवळ ३८% जमीन नापीक आहे. शेतीयोग्य जमिनीची उत्पादकताही अत्यंत कमी असून मनुष्यबळाची विषम वाटणी व वाहतुकीच्या सोयींचा अभाव यांमुळे उत्पादनवाढ होऊ शकत नाही. १९५३ सालापासून देशात कृषिभूविषयक कायदा करण्यात आला. त्यानुसार मोठी जमीनदारी नष्ट करून ‘कसेल त्याची जमीन’ या तत्त्वावर शेतीची फेरवाटणी करण्यात आली. राष्ट्रीय कृषिभूसुधारणा सेवा या संस्थेमार्फत वरील कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. १९६७ पर्यंत १,९१,४५९ शेतकरी कुटुंबाना ७,९६,२८३ हे. जमीन वाटण्यात आली. तितिकाका सरोवराचा परिसर सोडला, तर आल्तीप्लानोच्या पठारी प्रदेशात सामान्यपणे जिराइत शेती शक्य आहे. तेथे कीनोआ (ज्वारीसारखे धान्य), बटाटे, बार्ली, घेवडे, गहू इ. प्रमुख पिके घेतली जातात. पूर्वेकडील यूंग्गास व इतर सुपीक नदीखोऱ्यांतून जवळजवळ देशातील ४०% कृषिक्षेत्र एकवटलेले आहे. डोंगररांगांच्या पूर्व उतारावर सोपानशेती केली जाते. यूंग्गास भागात प्रामुख्याने कोका वनस्पतीची लागवड करण्यात आली असून तिच्यापासून कोकेन करतात. कॉफी, केळी, काकाओ, युका इ. पिकेही या खोऱ्यात घेतली जातात. कोकाऐवजी कॉफी, चहा व काकाओ (कोको) यांच्या लागवडीत प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण आहे. जलसिंचनाच्या सोयी असलेल्या नदीखोऱ्यांतून गहू, बार्ली, ओट, भाजीपाला इ. पिके घेतली जातात. तारीहा विभाग द्राक्षे, ऑलिव्ह व इतर फळे यांसाठी प्रसिद्ध आहे. सांता क्रूस दे ला स्येरा याच्या पूर्वेकडील सुपीक क्षेत्र हे देशाच्या भावी कृषिविकासाचे आशास्थान आहे. या सखल भागातील भाताचे पीक वाढत असून त्यामुळे देशाची गरज जवळजवळ भागली जाते. या भागात होणारा बहुतांश ऊस अल्कोहॉल-निर्मितीसाठी वापरला जातो. १९६० नंतर साखरकारखान्यांची उत्पादनक्षमता वाढवून साखरेच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील कापूस उत्पादनातून फक्त २०% स्थानिक गरज भागते. सखल भागांत मका, युका इ. पिके घेतली जातात. तारीहा भागात लांब धाग्याचा कापूस होतो. ईशान्येकडील उष्णकटिबंधीय वनप्रदेशात इंडियन लोक जंगलतोड करून व जमीन जाळून शेती करतात. हा देश ऊस, भात व कापूस यांबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. १९७८ मध्ये देशातील कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे होते : ऊस ३२,४६,६२० टन तांदूळ ८८,५८० कॉफी २२,२५० मका १,३२,४५४ गुरांचा चारा (मका) १,९८,६८१ बटाटे ७,९३,००० गहू ५९,९२५ सरकी काढलेला कापूस (रूई) १७,३३५.

देशातील २०% जमीन गुरांच्या चाऱ्यासाठी वापरली जाते. देशातील एकूण पशुपालन व्यवसाय हा पुरेसा प्रगत झालेला नाही. रोगराई, पशूंची अल्पसंख्या आणि पशुपैदाशीमधील नियोजनाचा अभाव, ही त्याची काही कारणे होत. अमेरिकेच्या शेतीविभागातर्फे तज्ञांची मदत घेऊन पशुपालनाचा व्यवसाय अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या ईशान्येकडील उष्णकटिबंधात मोडणाऱ्या बेनी या प्रांतात तसेच सांता क्रूस विभागात पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. देशातील सु.३०% पशूंची पैदास या भागात होते. कोचाव्हांबा हा भाग दुग्धव्यवसायाचे केंद्र असून तेथे दुधाच्या भुकटीचे कारखाने आहेत. इंडियन जमातीत लामा या जनावराचा उपयोग वाहतुकीसाठी होतो. या प्राण्यांचे कातडे, मांस इत्यादींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. कातडी, आल्पाका व व्हिकुना जातीच्या मेंढ्यांची लोकर, फर इत्यादींची देशातून निर्यात केली जाते. देशात मत्स्यव्यवसायही चालतो परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. १९७९ मध्ये देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते : एकूण गुरांची संख्या सु. ३९,९०,००० घोडे ३,९३,००० गाढवे ७,८४,००० डुकरे १४,१०,००० मेंढ्यां ८७,००,००० शेळ्या ३०,००,००० कोंबड्या ८४,५०,०००.

देशातील वनसंपत्ती समृद्ध आहे. उत्तम प्रकारचे कठीण लाकूड देणारे जवळजवळ २,००० वृक्षप्रकार देशात आढळतात. तथापि लाकूड कापण्याच्या गिरण्यांचा अभाव आणि वाहतुकीची अपुरी साधने यांमुळे लाकूडउद्योग पुरेसा प्रगत झालेला नाही. सांता क्रूस प्रांतात लाकूड कापण्याच्या बऱ्याच गिरण्या आहेत. रबर हे अत्यंत महत्त्वाचे वनउत्पादन होय. देशात स्वतंत्र वनसेवा विभाग असून त्याच्यामार्फत वनसंपत्तीचे जतन केले जाते. १९६८ साली ५,००,००० डॉलर किंमतीच रबर निर्यात करण्यात आले. लॅटिन अमेरिकेत हा देश रबर निर्यातीत अग्रेसर आहे.

देशातील बहुतांश जलविद्युत्‌निर्मिती बोलिव्हियन पॉवर कंपनीमार्फत होते. १९७८ अखेर देशातील एकूण वीजनिर्मिती ४,२८,५९५ किवॉ. होती.

खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचे साठे सांता क्रूस व कामीरी या भागांत सामावले आहेत. अशुद्ध खनिज तेलाच्या पुरवठ्यासाठी सांता क्रूस ते आरीका (चिली) असा नळ टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बोलिव्हिया आणि अर्जेटिना यांमध्येही नैसर्गिक वायूचे नळ टाकण्यात आले (१९७२). खनिज तेल उत्पादनाच्या बाबतीत हा देश स्वयंपूर्ण आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची निर्मिती, शुद्धीकरण आणि वितरण करणारी स्वतंत्र शासकीय संस्था देशात आहे. या क्षेत्रातील खाजगी कंपन्यांचे ऑक्टोबर १९६९ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९७९ साली खनिज तेल आणि खनिज तेल उत्पादने १,०२,५०,००० बॅरल होते. याच वर्षीचे नैसर्गिक वायूचे उत्पादन सु. १,९४,२०,००,००० घ.मी. होते.

खाणउद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच असून त्यातून ६९% परदेशी चलन देशाला प्राप्त होते. एकूण खनिज उत्पादनांपैकी कथिलाचे उत्पादन जवळवजळ ५०% आहे. तथापि कथिलाच्या खनिजाच्या खाणी समुद्रसपाटीपासून सु. ३,६५० ते ५,५०० मी. उंचीवर असल्याने वाहतुकीची अडचण आणि एकूणच कामाची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळे उत्पादनखर्च फार वाढतो. १९७९ मधील कथिल उत्पादन सु. २७,३०० टन होते. १९५२ साली खाजगी खाण कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. खाणउद्योगांचे नियंत्रण करणारे स्वतंत्र निगम असून त्यात गुंतलेले एकूण मनुष्यबळ सु २३,००० आहे. आल्तो-बेनी विभागात सोन्याच्या खाणी आहेत. तीप्वानी विभागातील सहकारी खाणीतून १९७८ साली ७७० किग्रॅ. सोने काढण्यात आले. देशात युरेनियमचेही साठे विशेषतः पोटोसी प्रांतात आढळले आहेत. ऑक्टोबर १९७९ मध्ये कोटाजे येथे युरेनियम प्रक्रिया संयंत्र सुरू करण्यात आले आहे.

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने देश हळूहळू प्रगती करीत आहे. १९७१ मध्ये भांडवल गुंतवणूकविषयक एक नवा अधिनियम देशात करण्यात आला. त्याअन्वये उद्योगधंद्यातील परदेशी भांडवल गुंतवणुकीलाही प्रोत्साहन देण्यात आले. विशेषतः वस्तुनिर्मितिउद्योगात, खाणकाम, शेती, बांधकाम आणि पर्यटन या क्षेत्रांच्या विकासावर भर देण्यात आला. देशातील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या संशोधनासाठी परदेशी सहकार्य मिळविण्यात आले.

 

दैनंदिन उपभोग्य वस्तू तसेच प्रक्रियित अन्नपदार्थ यांचे देशातील उत्पादन एकूण गरजेच्या फक्त २५% आहे. फार मोठे उद्योगधंदे देशात नाहीत. अन्नप्रक्रिया आणि विविध प्रकारची पेये यांचे उत्पादन सु. ३५% आहे. त्याखालोखाल कापड व कातडी वस्तू, फर्निचर, रसायने, तंबाखू इ. उद्योगधंदे येतात. अल्पप्रमाणावर सिमेंट, कागद, काच, आगपेट्या, रबरी टायर आणि स्फोटक पदार्थ यांचे उत्पादन केले जाते. ला पास या शहरात देशातील दोन-तृतीयांश निर्मितिउद्योग केंद्रित झालेले आहेत. १९७८ मधील साखरेचे उत्पादन २,७०,००० मेट्रिक टन होते.


मोठ्या शहरांतून खरेदी-विक्रीची केंद्रे आढळतात. ग्रामीण भागात आठवड्याच्या बाजारांतून व जत्रा-उत्सवांतून वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते. देशाच्या निर्यात पदार्थांत कथिल, खनिज तेल, चांदी, टंगस्टन, तांबे, अँटिमनी, जस्त इ. महत्त्वाचे होत. आयात पदार्थांत मुख्यतः यंत्रसामग्री, मोटारगाड्या आणि त्यांचे सुटे भाग, लोखंडी व पोलादी वस्तू, औषधे, कापड, कागदवस्तू इत्यादींचा अंतर्भाव होतो. आयात-निर्यातीच्या बाबतीत अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांच्याशी बोलिव्हियाचा विशेष संबंध आहे. १९७९ मध्ये एकूण ५४,६०,००,००० अमेरिकन डॉलर किंमतीच्या खनिजांची निर्यात करण्यात आली.

देशात नियोजन मंत्रालय आहे. त्याच्या आकडेवाडीनुसार १९७० साली १४,८०,००० लोक उत्पादन व्यवसायांत गुंतलेले होते. यांपैकी १०,००,००० लोक शेती १,१८,३०० लोक वस्तुनिर्मिती उद्योगांत ३५,१०० लोक बांधकाम उद्योगात ७४,००० व्यापार आणि तत्सम आर्थिक व्यवहारांत ६५,००० केंद्रीय व प्रांतिक प्रशासनात ४७,८०० खाणकाम उद्योगात आणि ४१,९०० लोक वाहतूक व्यवसायात होते. १९७४ साली कामगार संघटनांवर घातलेली बंदी १९७८ साली उठवण्यात आली.

बँको सेंट्रल द बोलिव्हिया (स्था. १९११ व पुनर्रचना १९२८) या मध्यवर्ती बँकेचे १९३९ साली राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९४५ साली याच बँकेचे दोन स्वायत्त विभागांत विभाजन करण्यात आले. त्यांपैकी मुद्राविभागाकडे नोटा छापणे, चलननियंत्रण इ. कामे सोपविलेली आहेत. दुसऱ्या विभागातर्फे बँकिंगचे इतर सर्व व्यवहार केले जातात. यांशिवाय देशात अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांच्या स्वतंत्र बँका असून यांशिवाय अनेक खाजगी बँकाही आहेत. ‘पेसो बोलिव्हिआनो’ हे देशाचे अधिकृत चलन असून (१ जानेवारी १९६३ पासून) मार्च १९८१ मध्ये या चलनाचा आंतरराष्ट्रीय विनिमयदर पुढीलप्रमाणे होता : १ अमेरिकन डॉलर = २५ पेसो व १ स्टर्लिंग पौंड = ५४ पेसो. देशात वजनमापाची मेट्रिक पद्धती अधिकृतपणे वापरली जाते.

वाहतूक व संदेशवहन : कोचाव्हांबापासून सांता क्रूसपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग ४९७ किमी. लांबीचा आहे. अर्थात त्याची एकूण स्थिती फारशी चांगली नाही. ला पास, ओरुरो या शहरांना जोडणारा पक्का रस्ताही आहे. देशातील एकूण सडकांची लांबी ३७,७०८ किमी. होती (१९७७). १९७९ साली देशात ८९,४४५ मोटारगाड्यांची नोंद झाली होती. त्याच वर्षी देशात ५०,२५५ जडवाहने (बसगाड्यांसह) व १,०५० ट्रॅक्टर होते. १९६४ साली ‘बोलिव्हियन नॅशनल रेल्वेज’ ही संस्था स्थापन करण्यात आली. तत्पूवीच्या इतर सर्व रेल्वेकंपन्या वरील संस्थेत विलीन करण्यात आल्या. १९७९ मध्ये देशातील एकूण लोहमार्ग ३,५३८ किमी. लांबीचे होते. देशाला समुद्रकिनारा नसल्यामुळे पॅसिफिक किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीच्या सोयी वेगवगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लॉइड एअरिओ बोलिव्हिआनो ही राष्ट्रीय हवाई वाहतूक करणारी संस्था आहे. ला पास येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून इतर लॅटिन अमेरिकन नियमित हवाई सेवा उपलब्ध आहे. अमेरिका तसेच यूरोप खंडातील देशांतून हवाई दळणवळणाच्या सोयी उपलब्ध आहेत. देशात अनेक आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपन्या आहेत. तितिकाका सरोवरातून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक चालते. एकूण जलवाहन मार्ग १९,२०० किमी. असून हे मार्ग चार वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे नियंत्रित केले जातात.

देशात १९७८ मध्ये ४५८ टपालकचेऱ्या होत्या. त्यांपैकी २०५ कचेऱ्यांत तार व दूरध्वनीची सोय उपलब्ध होती. याशिवाय देशात स्वतंत्र अशी २४५ तार व दूरध्वनी कार्यालये असून बहुतेक मोठ्या शहरांतून दूरध्वनिसेवा उपलब्ध आहे. देशात १,०१,५०० दूरध्वनी होते (१९७८). त्याच वर्षी देशात ११९ रेडिओ प्रक्षेपण केंद्रे होती व त्यांपैकी ७ शासननियंत्रित आहेत. देशात शासननियंत्रित दूरचित्रवाणी यंत्रणा आहे. १९७८ साली ला पास शहरातून ७, कोचाव्हांबा येथून २, सांता क्रूस येथून ४ व ओरुरो येथून २ दैनिके प्रसिद्ध होत होती. देशात इतरही वृत्तपत्रे असून ती स्थानिक-प्रादेशिक स्वरूपाची आहेत. सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रे स्पॅनिश भाषेतील आहेत.

लोक व समाजजीवन : विद्यमान बोलिव्हियन समाजातील सु. पन्नास टक्क्यांहून अधिक लोक इंडियन जमातींचे आहेत. त्यांत पर्वतीय भागात राहणारे आयमारा आणि नदीखोऱ्यांतून राहणारे केचुआ ह्या प्रमुख जमाती होत. जंगली भागातही काही अल्पसंख्य जमाती आढळतात. स्पॅनिश वसाहतकारांनी आफ्रिकेतून आणलेल्या निग्रो गुलामांचे वंशजही यूंग्गास भागात राहतात. जवळजवळ एक-चतुर्थांश लोक हे मेस्तिझो किंवा कोलो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पॅनिश-इंडियन ह्या मिश्र वंशाचे आहेत. यूरोपियनांची, विशेषतः स्पॅनिशांची, संख्या अल्प असून ते आणि मेस्तिझो हे बहुतेक शहरवासी आहेत. येथील विद्यमान लोकजीवन हे स्पॅनिश वसाहतकाळापासून नव्या-जुन्या परंपरांनी घडत आलेले आहे. इंडियन लोकांतील कौटुंबिक जीवन हे पारंपरिकच आहे. आयमारा आणि केचुआ या भाषा ते बोलतात. वसाहतकाळात इंडियन लोकांनी स्पॅनिश भाषा वापरण्यावर निर्बंध होते त्यामुळे बहुतांश स्थानिक लोकांत आयमारा व केचुआ या भाषा आजही प्रचलित आहेत. स्पॅनिश भाषिक यूरोपियनांतही या भाषांचा प्रसार झालेला आहे. भाषा, पोशाखपद्धती व एकूण राहणीमान या बाबतींत वेगवेगळ्या जमातींमधील फरक ठसठशीतपणे जाणवतो. १९५२ सालापासून येथील इंडियन लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे मोठे प्रयत्न करण्यात आले. काही व्यवसायांत त्यांना मज्जाव होता, तो काढून टाकण्यात आला तथापि त्यांची स्थिती फारशी सुधारलेली नाही. बहुसंख्य इंडियनांच्या आहारात बटाटे, कडधान्ये, क्वचित थोडेसे मांस आणि फळे यांचा अंतर्भाव होतो. स्त्री-पुरुषांत मद्यपान मोठ्या प्रमाणावर केले जाते. नव्या औद्योगिक शहरांमध्ये जागेचा प्रश्न आहेच. एकूण विद्यमान बोलिव्हियन समाजात कमालीची आर्थिक विषमता दिसून येते.

स्पॅनिश वसाहतकारांनी येथील इंडियनांचे धर्मांतर घडवून आणल्याने देशातील सु. ९३ टक्के लोक रोमन कॅथलिक आहेत. १९६१ च्या संविधानानुसार रोमन कॅथलिक चर्चला असलेला शासनाचा अधिकृत पाठींबा काढून टाकण्यात आला व लोकांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले तथापि अजूनही पाच रोमन कॅथलिक बिशप व दोन आर्चबिशप यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्षामार्फतच होते. देशात प्रॉटेस्टंट पंथीय तसेच ज्यू लोकही आढळतात.

समाजकल्याण व आरोग्य : देशात १९५६ साली सामाजिक सुरक्षा संहिता तयार करण्यात आली. या संहितेत पूर्वीच्या अनेक कायदेशीर तरतुदी विस्तृत व सुटसुटीत स्वरूपात अंतर्भूत केलेल्या आहेत. सामाजिक सुरक्षा विमा हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बाबतीत सक्तीचा असला तरी, प्रत्यक्षात मात्र तो खाणी, कारखाने, वाहतूक इ. व्यवसायांतील कामगारांपुरता मर्यादित आहे. या योजनेखाली कामगार व त्यांचे कुटुंब यांना वैद्यकीय मदत मिळते.


५५ वर्षांच्या पुरुषांना व ५० वर्षांच्या स्त्रियांना वार्धक्यवेतन तसेच विविध प्रकारचे कुटुंबभत्ते देण्याची तरतूद आहे. यासाठी कामगारांच्या, मालकांच्या वर्गणीतून तसेच सरकारी-तिजोरीतून निधी उभारण्यात येतो. बेकारी, अपघात, मृत्यू यांसाठी शासकीय मदत देण्याची कायदेशीर तरतूद आहे. १९७८ साली सामाजिक सुरक्षा व आरोग्य या योजनेखाली सु. १६ लाख ग्रामीण कामगारांना मदत देण्याची कार्यवाही करण्यात आली. १९७८-७९ च्या आर्थिक वर्षात रुग्णालयांच्या बांधणीसाठीही अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. सामाजिक सुरक्षा कार्यक्रम अंमलात आणणारी एक स्वतंत्र केंद्रीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. १९७२ साली देशात २,१४३ डॉक्टर होते.

शिक्षण : देशात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. १९७४ च्या अंदाजानुसार या वयोगटातील ९,८९,८५८ विद्यार्थी शिकत होते. देशात साक्षरताप्रसाराचा दशवार्षिक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे १५ ते ५० वर्षे वयोगटातील निरक्षर व्यक्तींना शिक्षण दिले जाते. १९७७ च्या अंदाजानुसार एकूण लोकसंख्येपैकी सु. ४०% लोकांनी या योजनेचा फायदा घेतला. शाळांमधून १९७९ पासून केचुआ व आयमारा या भाषा सक्तीच्या केल्या आहेत. याच वर्षी देशात एकूण नऊ विद्यापीठे होती व त्यांपैकी ला पास येथील सान आंद्रेस विद्यापीठ मोठे आहे. सूक्रे येथील सॅन फ्रॅन्सिस्को झेविअर द चूकीसाका हे विद्यापीठ सर्वांत जुने (स्था. १६२४) आहे.

देशात १९५२ पासून इंडियन लोकांत शिक्षणाचा प्रसार वेगाने होत आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे इंडियन लोकांच्या शाळांना शिक्षक व इतर शिक्षणसाहित्य पुरविले जाते. त्यामुळे ग्रामीण भागांत छोट्या शाळांची संख्या वाढत आहे. रोमन कॅथलिक चर्चने वसाहतकाळापासून प्राथमिक शिक्षणाचा प्रसार ग्रामीण व नागरी भागांत मोठ्या प्रमाणावर केला.

कला व क्रिडा : सोन्याचांदीचे दागदागिने व वस्तू, लोकरी रग, मृत्पात्री इ. बोलिव्हियातील पारंपरिक हस्तव्यवसाय होत. यूरोपीयांच्या आगमनापूर्वीपासून या हस्तकला विकसित झालेल्या दिसून येतात. तथापि हस्तकलांचा अपवाद वगळता उच्च बोलिव्हियन कला ही स्थानिक परंपरा व यूरोपीय कला अशा मिश्र प्रभावांतूनच निर्माण झाली. चित्रकला, साहित्य, संगीत व इतर कनिष्ठ कला या सर्वांवरच हा मिश्र प्रभाव दिसून येतो. प्राचीन काळच्या त्यावानाको संस्कृतीमधील संपन्न अशा वास्तुकलेचे आकृतिबंध बोलिव्हियन चित्रकलेत आढळून येतात. स्पॅनिश संगीताचा प्रभाव सखल प्रदेशातील संगीतावर विशेष जाणवतो. तँगोसारखे नृत्यप्रकारही तेथे विशेष लोकप्रिय आहेत. डोंगराळ प्रदेश व नदीखोऱ्यांतून प्रचलित असलेल्या लोकनृत्यांतूनही स्पॅनिश प्रभाव जाणवतो. वेळुवाद्ये विशेष प्रसिद्ध असून ती स्थानिक लोकच तयार करतात.

बोलिव्हियन साहित्य मुख्यतः स्पॅनिश भाषेतील आहे. त्याची निर्मिती कमी असली, तरी महत्त्वाची आहे. एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखक पुढीलप्रमाणे : रिकार्दो बस्तमँती हा कवी बोलिव्हियाच्या राष्ट्रगीताचा जनक होय. नादान्येल आगीरे हा देशातील पहिला महत्त्वाचा कादंबरीकार व नाटककार होय. फेलिक्स रेरेये ऑर्तिझ हा कादंबरीकार, नाटककार व कवी उल्लेखनीय आहे. हाइमे लारेदो (१९४२- ) हा व्हायोलिनवादक जगप्रसिद्ध आहे.

गाब्रीएल रेने मोरेनो (१८३६-१९०९) हा इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक म्हणून बोलिव्हियन वाङ्‌मयक्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रिकार्दो हाइमेस फ्रेर (१८६८-१९३३) हा कवी नवसाहित्यसंप्रदायाचा एक प्रवर्तक समजला जातो. फ्रांट्‌स तामायो (१८७९-१९५६) हा कवी स्पॅनिश सरदार घराण्यातील असूनही दलित इंडियन समाजाचा पुरस्कर्ता होता. १९३५ साली तो राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला, तथापि लष्करी उठावामुळे त्याला हे सर्वोच्च पद लाभू शकले नाही. आल्सीदेस आर्गेदास (१८७९-१९४६) हा त्याच्या बोलिव्हियावरील इतिहासलेखन तसेच कादंबऱ्यांमुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत ख्यातनाम आहे. इंडियन समाजाची दु:स्थिती त्याच्या कादंबऱ्यांतून वर्णिलेली आहे. प्वेब्लो एन्‌फर्मो हे त्याचे अत्यंत गाजलेले व वादग्रस्त असे समाजशास्त्रीय पुस्तक होय. यांशिवाय हाइमे मेंदोदा हा कादंबरीकार व निबंधकार, ग्रेगोऱ्या रेनल्झ हा कवी व नाटककार उल्लेखनीय आहेत. आर्तूरो पॉझनान्स्की (१८७४-१९४६) याने तितिकाका सरोवराच्या परिसरातील त्यावानाको संस्कृतीचा प्रथम अभ्यास केला.

बोलिव्हियातील नागरी वास्तुरचनेवरही इंडियन व यूरोपीय शैलींचा प्रभाव दिसून येतो. ग्रामीण गृहरचना म्हणजे लंबचौकोनी आकाराच्या सपाट छपरांच्या झोपड्या असतात. ला पास हे देशाचे सांस्कृतिक केंद्र आहे. येथे राष्ट्रीय संग्रहालय, ललित कला अकादमी इ. आहेत. देशात खाजगी पुरावस्तुसंग्रहालये आढळतात. पोटोसी येथील प्रसिद्ध टाकसाळीत वसाहतकालीन चांदीची नाणी तयार करण्याची हत्यारे तसेच इतर कलावस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. ला पासच्या जवळच दोन अत्याधुनिक संशोधन संस्था असून तेथे उंच प्रदेशातील प्राणी व वनस्पतिजीवन यांचा अभ्यास केला जातो.

महत्त्वाची स्थळे : बोलिव्हिया हा हिमाच्छादित पर्वत शिखरे, तितिकाकासारखी प्रसिद्ध सरोवरे, विस्तृत पठारी प्रदेश आणि वनविभाग अशा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. तथापि सौंदर्यापक्षा भव्यता हेच या देशाचे वैशिष्ट्य आहे. निसर्गात आढळणारे रंगवैचित्र्य येथील इंडियन जमातींच्या परिवेशातही दिसून येते. येथील शहरांना यूरोपियन शहरांप्रमाणे नेटकेपणा आहे. इंडियन व स्पॅनिश संस्कृती यांचा वेधक संगम देशात सर्वत्र दिसून येतो. देशातील बहुतेक प्रमुख शहरे अँडीजच्या प्रदेशात आहेत. ला पास हे राष्ट्रीय प्रशासनाचे केंद्र असून कमाल उंचीवर वसलेले जगातील एक मोठे शहर असून उद्योगधंद्यांचे केंद्रही आहे. कोचाव्हांबा हे निसर्गसंपन्न अशा ॲमेझॉन खोऱ्यातील दुसरे महत्त्वाचे शहर असून तेथे तेलशुद्धीकरण कारखाना आहे. सांता क्रूस हे मोठे शहर ऊस, कोको, क्विनीन, तंबाखू यांच्या व्यवसायांसाठी प्रसिद्ध आहे. ओरुरो हे कथिलखाणीसाठी तर पोटोसी हे चांदीच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. सूक्रे ही देशाची अधिकृत राजधानी असून तेथे सर्वोच्च न्यायालय आहे. देशातील बहुतेक शहरांतून भव्य कॅथीड्रल-वास्तू दिसून येतात. सूक्रे येथील सतराव्या शतकातील ‘बॅसिलिका मेट्रोपोलिटाना’ विशेष प्रसिद्ध आहे. तितिकाका सरोवराचा परिसर प्राचीन त्यावानाको संस्कृतीच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.

जाधव, रा. ग.

संदर्भ :   1. Alexander, Robert J. The Bolivian National Revolution, New Brunswick (N. J.), 1958              2. Barton, Robert, A short History of the Republic of Bolivia, 1968              3. Carter, W. E. Bolivia : A Profile, 1971.              4. Heat, D. B. Historical Dictionary of Bolivia, Metuchen (N. J.), 1972.              5. Mitchell, C. The Legacy of Populism in Bolivla, New York, 1977              6. Osborne, H. Bolivia : A Land Divided, London, 1952.              7. Zondag, Cornelius H. The Bolivian Economy, 1952-65, New York, 1967.


 बोलिव्हिया


राजधानी ला पास : एक दृश्य

आदिवासींच्या विवाहविधीशी निगडित असलेले पद

कोचाव्हांबा येथील तेलशुद्धीकरण कारखाना

ला पासच्या परिसरातील प्राचीन दगडी मूर्ती

यूंग्गास विभागातील कोका वनस्पतीची पाने खुडणाऱ्या आयमारा मायलेकी

आदिवासींच्या धार्मिक उत्सवप्रसंगी वापरण्यात येणारा राक्षसाचा मुखवटा

तितिकाका सरोवरातील कोळ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण तराफे

त्यावानाको संस्कृतिकालीन पुरुषमुखाकार मातीचा कुंभ

डोंगराळ भागातील लामांचा तांडा

बोरोरोअन स्त्रीपुरुषांचे कर्णभूषण