भाक्रा-नानगल प्रकल्प : भारतातील पंजाब, हरयाणा व राजस्थान या तीन राज्यांनी संयुक्तपणे सतलज नदीवर उभारलेला सर्वांत मोठा बहुद्देशीय प्रकल्प. हिमाचल प्रदेश राज्यातील बिलास

नानगल जलविद्युत् केंद्राचा परिसर

पूरच्या वायव्येस भाक्रा येथे एक भारस्थायी काँक्रीटचे धरण बांधण्यात आले. भाक्रा धरणातील पाण्याचा प्रतिदिनी होणारा वापर लक्षात घेऊन भाक्रा धरणाच्या खालच्या बाजूस सु.१३ किमी. अंतरावर रुपार जिल्ह्यातील (पंजाब राज्य) नानगल येथे दुसरे धरण बांधण्यात आले. त्यातील पाण्याचा उपयोग मुख्यत्वे वीजनिर्मीतीसाठी करुन घेण्यात आलेला आहे.

भाक्रा-नानगल प्रकल्पास १९४६ मध्ये प्रारंभ झाला. यातील भाक्रा व नानगल ही दोन्ही धरणे तसेच नानगल हायडेल चॅनेल यांचे बांधकाम जुलै १९५४ मध्ये पूर्ण करण्यात आले. जानेवारी १९५५ मध्ये नानगल वीज उप्तादनकेंद्राच्या पूर्ततेनंतर प्रकल्पाची एकूण प्रतिष्ठापित वीज उत्पादनक्षमता ४८,००० किवॉ. होती, ती जुलै १९५६ मध्ये गंगवाल व कोटला वीज उत्पादनकेद्रांच्या निर्मितीमुळे दुप्पट झाली. १९५८-५९ मध्ये भाक्रा धरणातून कालव्यांद्वारे पंजाब व राजस्थान राज्यांच्या काही भांगास पाणीपुरवठा होऊ लागला. हा २३६ कोटी रु. खर्चाचा संपूर्ण प्रकल्प १९६३ मध्ये पूर्ण होऊन २२ ऑक्टोबर १९६३ रोजी पंडित नेहरुंच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला. हा प्रकल्प म्हणजे ‘देशाच्या प्रगतीचे प्रतीक’ असे गौरवोद्‌गार पंडितजींनी काढले. या प्रकल्पामुळे हरयाणा राज्यातील सर्व गावांना वीज उपलब्ध झाली, तसेच पंजाब व हरयाणा या दोन्ही राज्यांची कृषिक व औद्योगिक प्रगती शक्य झाली. राजस्थान राज्य व केंद्रशासित प्रदेश दिल्ली या दोघांनाही या प्रकल्पामुळे वीज उपलब्ध झाली आहे.

भाक्रा-नानगल प्रकल्पापैकी भाक्रा धरणाची लांबी ५१८ मी. व उंची २२६ मी. असून त्याची जलधारण-क्षमता ९८६.८ कोटी घ. मी. आहे. भाक्रा धरणाच्या डाव्या तीरावर दोन विद्युत् उत्पादनकेंद्रे उभारण्यात आलेली आहेत. नानगल येथे भाक्रा धरणाला पूरक व साहाय्यकारी म्हणून दुसरे धरण बांधण्यात आले. नानगल धरण म्हणजे काँक्रीटचा प्रचंड बंधारा असून त्याची लांबी ३४३ मी., रुंदी १३३ मी., उंची २९ मी. व पाया १७ मी. खोल आहे. नानगल धरणातील पाणी नदीच्या डाव्या बाजूने काढण्यात आलेल्या ६४ किमी. लांबीच्या नानगल हायडेल चॅनेलमधून पुढे नेण्यात आले आहे. नानगलपासून अनुक्रमे १८ किमी. व २७ किमी. अंतरावर गंगवाल व कोटला येथे आणखी दोन वीज उत्पादनकेंद्रे उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पाची एकूण अधिष्ठापित वीज उत्पादनक्षमता १,२०४ मेवॉ. आहे. या प्रकल्पापासून सु. १,१०० किमी. लांबीचे कालवे व सु. ३,४०० किमी. लांबीचे फाटे काढण्यात आले असून त्यायोगे एकूण १४.६ लक्ष हे. जमिनीला सिंचन केले जात आहे. मात्र सु. २७.४ लक्ष हे. जमिन सिंचनाखाली आणण्याचे अंतिम उद्दिष्ट आहे.

गद्रे, वि. रा.