एकच सिंहमुख असलेला अशोकस्तंभ, लौडिया-नंदनगढ.लौडिया–नंदनगढ : बिहार राज्यातील बौद्ध अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेली एकमेकांजवळ वसलेली दोन प्राचीन स्थळे.लौडिया-नंदनगढ या जोड नावांनी ती चंपारण्य जिल्ह्यात ख्यातनाम आहेत. नेपाळच्या मार्गावर लौडिया (लडिया) या मोठ्या खेड्यात मथियाच्या उत्तरेस व बेथियाच्या वायव्येस सु. २५ किमी. वर ती वसली आहेत. लौडियाजवळ सम्राट अशोकाचा लेखयुक्त स्तंभ आहे. या स्तंभाजवळ पंधरा स्तूप आहेत. या स्तंभाचा आकृतिबंध सामान्यतः बाखिराच्या स्तंभासारखाच असून तो एकसंध वालुकाश्मात घडविला आहे फक्त त्याचा व्यास, आकार व वजन बाखिरा स्तंभापक्षा कमी आहे. त्याची उंची मु. १२ मी. असून गुळगुळीत मध्यभाग  सु. १० मी., पायथ्याचा व्यास सु. ८९ सेंमी. आणि घंटाकृती स्तंभशीर्षाचा व्यास सु. ५६ सेंमी. एवढा आहे. पायथ्याकडून  माथ्याकडे तो पिरॅमिडप्रमाणे निमुळता होत गेला असून स्तंभशीर्षावरील लहानशा वेदीवर पूर्वाभिमुख सिंहाचे शिल्प आहे. औरंगजेब (कार. १६५६-१७०७) याच्या वेळी त्याच्या सैन्यातील कुणीतरी सैनिकाने त्यावर तोफेचा मारा केला, तेव्हा त्याचे तोंड तुटून गेले. स्तंभशीर्षाची एकूण उंची २.१० मी. आहे. त्याचा सिंहाखालील वर्तुळाकार फलक हंसांच्या शिल्पांनी अलंकृत केला आहे. स्तंभाचा दर्शनी भाग आकर्षक व सुबक असून त्यावर उपदेशपर चार लेख आहेत.

या स्तंभाच्या पश्चिमेस सु. एक किमी.वर आणि लौडिया गावाच्या वायव्येस नंदनगढ नावाचे सु. पंचवीस मीटर उंचीचे टेकाड आहे. तेथे पक्क्या विटा आढळल्या. काही विटा ६० x ३० x १४ सेंमी. एवढ्या मोठ्या आहेत. दक्षिणेकडे सु. तीन मीटर उंचीची भिंत असून टेकडावर पूर्वी एखादी इमारत असावी, असा तज्ञांचा अंदाज आहे. येथील अवशेष प्रथम १८७१ मध्ये उजेडात आले. त्यानंतर १९०५-०६ साली येथे उत्खनने झाली. उत्खनित टेकाडांत मानवी हाडे, कोळसा आणि सोन्याच्या पत्र्यावर उभ्या स्त्रीमूर्तीची आकृती काढलेली सापडली. या व इतर पुराव्यांवरून हे टेकाड वेदकालीन दफनाचे असावे, असे मत सुरुवातीस मांडण्यात आले पण नंतर १९३५-३६ च्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून ही टेकाडे बौद्धकालीन अवशेषांची असावीत, हे निश्चित झाले. या उत्खननांत नंदनगढला चौथऱ्यावर बांधलेल्या स्तूपाचे अवशेष मिळाले. याशिवाय आहत नाणी, मातीच्या मूर्ती आणि इ. स. पू. दुसऱ्या-पहिल्या शतकांतील मृण्मुद्राही मिळाल्या. येथे एका तांब्याच्या भांड्यात ठेवलेले चौथ्या शतकात लिहिलेले ताडपत्र महत्त्वपूर्ण असून त्यावर बौद्ध धर्म ग्रंथातील काही मजकूर लिहिलेला आहे.

या प्राचीन अवशेषांशिवाय लौडिया हे चंपारण्य जिल्ह्यातील एक औद्योगिक व्यापारी गाव आहे. त्याची लोकसंख्या ३,५७७ (१९५१) होती. तेथे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांव्यतिरिक्त एक संस्कृत पाठशाळाही आहे. गावाचे आरोग्य व पाणीपुरवठा यांसाठी ग्रामपंचायत सर्व सुविधा पुरविते. गावात शासकीय रुग्णालय व साखर कारखाना असून निळीचा उद्योगही चालतो.

संदर्भ : 1. Government of India, Archaeological Survey of India : Reports for 1935-36 and 1936-37, Delhi, 1938 and 1940.

2. Roy Choudhary, P. C. Ed. Bihar District Gazetteers : Champaran, Patana, 1960.

देव, शां. भा.