व्हँकूव्हर बेट : कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एक बेट. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे सर्वांत मोठे बेट असून, ते कॅनडाच्या पॅसिफिक किनाऱ्यावर, ब्रिटिश कोलंबियाच्या नैर्ऋत्येस आहे. क्षेत्रफळ ३१,२८५ चौ. किमी., लोकसंख्या ५,१०,३३३ (१९८६). कॅनडाच्या मुख्य भूमीजवळ वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या या बेटाची रुंदी ५० ते १३० किमी. व लांबी ४६० किमी. आहे. जॉर्जिया, जॉन्स्टन व क्वीन शार्लट या सामुद्रधुनींनी हे बेट कॅनडाच्या (ब्रिटिश कोलंबिया) मुख्य भूमीपासून, तर जॉर्जिया, हॅरो, ह्यान द फ्यूका या सामुद्रधुनींनी संयुक्त संस्थानांच्या (वॉशिंग्टन राज्य) मुख्य भूमीपासून अलग केले आहे. प्रत्यक्षात हे बेट म्हणजे किनाऱ्या वरील निमज्जित पर्वताच्या माथ्याचा भाग आहे. बेट बरेचसे ओबडधोबड विच्छेदित, वनाच्छादित व पर्वतीय अंतर्भाग अशा स्वरूपाचे आहे. यावरील बरीचशी शिखरे २,१०० मी. पेक्षा अधिक उंचीची आहेत. व्हिक्टोरिया (उंची २,१६३ मी.), मौंट एल्कहॉर्न (२,१९५ मी.) व गोल्डन हाईंड (२,२०० मी.) ही त्यांपैकी प्रमुख शिखरे आहेत. बेटाची पूर्व किनारपट्टी मैदानी स्वरूपाची असून पश्चिम किनारपट्टी खूपच दंतुर व फ्योर्ड स्वरूपाची आहे. बार्क्ली, क्लॅक्वत, नुट्का, क्यूक्वत व क्वॉत्सीनो हे येथील प्रमुख साउंड आहेत. बेटावरील सर्वसाधारण हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे. उत्तर अमेरिकेतील सर्वाधिक वृष्टी (वार्षिक ७६० सेंमी. पेक्षा अधिक) बेटाच्या पश्चिम भागात होते. आग्नेय भागातील व्हिक्टोरिया येथील हवामानही सौम्य असते. तेथील जानेवारीतील सरासरी तापमान गोठणबिंदूच्या वर असून उन्हाळे थंड व कोरडे असतात. बेटाच्या उत्तर भागात व पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात हिवाळे कडक असतात. तेथेच वृष्टी अधिक होते. व्हँकूव्हर बेटावर अनेक सरोवरे व नदीप्रवाह आढळतात. निंप्किश व काउइचन ही मोठी सरोवरे आहेत.

कॅप्टन जेम्स कुक हा व्हँकूव्हर बेटावर उतरणारा पहिला युरोपीय समन्वेषक (इ. स. १७७८) असला, तरी १७७४ मध्ये स्पॅनिश समन्वेषक ह्यान पेरेद याने हे बेट पाहिले होते. १७८१ मध्ये ब्रिटिशांनी त्यावर वसाहत स्थापन केली. १७८८ मध्ये ब्रिटिश व्यापारी जॉन मीर्झ याने येथील नुट्का साउंडवर एक किल्ला बांधला. त्यानंतर १७८९ मध्ये ते स्पॅनिश सैन्याने काबीज केले. १७९२ मध्ये जेम्स कुकच्या सफरीतील एक सहकारी कॅप्टन जॉर्ज व्हँकूव्हर या समन्वेषकाने गलबतातून बेटाभोवती प्रदक्षिणा घालून बेटाची पाहणी केली व त्यावर आपला हक्क प्रस्थापित केला. त्याचेच नाव बेटाला देण्यात आले. १८४३ मध्ये हडसन उपसागर कंपनीने व्हिक्टोरिया येथे ‘फोर्ट कॅमोसन’ बांधला. १८४६ मध्ये त्यावर ब्रिटिश सत्ता आली. त्याच वेळी ह्यान द फ्यूका सामुद्रधुनीतून संयुक्त संस्थाने-कॅनडा यांदरम्यानची सरहद्द निश्चित करण्यात आली. १८४९ मध्ये बेटाचा ब्रिटिश वसाहतीत समावेश करण्यात आला. १८५८ च्या दरम्यान मुख्य भूमीवर सोन्याच्या व्यापाऱ्यांची वर्दळ वाढल्याने या बेटाचे महत्त्व अधिक वाढले. १८६६ मध्ये राजकीयदृष्ट्या ते मुख्य भूमीवरील ब्रिटिश कोलंबियाच्या वसाहतीला जोडण्यात आले. १८७१ मध्ये व्हँकूव्हर बेट कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात समाविष्ट करण्यात आले.

लाकूडतोड, लाकूडकाम, मासेमारी, खाणकाम, शेती, पर्यटन हे बेटावरील प्रमुख व्यवसाय आहेत. फर, सीडार व हेमलॉक वृक्षांचे आधिक्य असल्याने लाकडाचा लगदा, लाकूड चिरकाम व प्लायवुड निर्मिती इ. उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. कोळसा, लोहखनिज, सोने, तांबे, मँगॅनीज ह्या खनिज द्रव्यांचे उत्पादन येथे घेतले जाते. धुकेविरहीत काळात फळे व भाजीपाल्याची उत्पादने घेतली जातात. याशिवाय कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायही केले जातात. पूर्व किनाऱ्यावर दाट लोकवस्ती आहे. सालीश, नुट्का व कोमॉक्स ह्या इंडियन जमातींचे वंशज बेटावर आढळतात. व्हिक्टोरिया महानगरातच जवळजवळ निम्मी लोकवस्ती आढळते. व्हिक्टोरियाशिवाय डंकन, ननाइमो, पोर्ट ॲल्बर्नी, कोर्टनी, नॉर्थ काउइचन, कँपबेल रिव्हर व अस्क्वाइमॉल्ट ही बेटावरील प्रमुख नगरे आहेत. आकर्षक सृष्टिसौंदर्य, उत्साहवर्धक हवामान व करमणुकीच्या सुविधा यांमुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक येतात. बेटाच्या मध्यवर्ती भागातील स्ट्रॅथकोना प्रॉव्हिन्शल पार्क (क्षेत्र २,३१,४३६ हे.), पश्चिम किनाऱ्यावर तीन भागांत असलेले पॅसिफिक रिम नॅशनल पार्क (३८,८५० हे.), वायव्य टोकावरील केप स्कॉट प्रॉव्हिन्शल पार्क (१५,०५४ हे.) आणि फोर्ट रॉड हिल नॅशनल हिस्टॉरिक पार्क प्रसिद्ध आहेत. अस्क्वाइमॉल्ट येथे मोठा नाविक तळ आहे. बेटावर अनेक लहान बंदरे व मच्छीमार वसाहती आहेत. फेरीमार्गांनी व हवाईमार्गांनी हे बेट कॅनडा व संयुक्त संस्थानांशी जोडलेले आहे.

चौधरी, वसंत