दरी : दोन टेकड्या, डोंगर किंवा पर्वत यांमधील लांबट, अरूंद व खोलगट भूभागास दरी म्हणतात. अशा दरीतून सामान्यतः ओहोळ, ओढे, नदी इ. जलप्रवाह वाहतात. तथापि त्यांमध्ये पाणी असलेच पाहिजे असे नाही. पावसाचे पाणी जमिनीवरून वाहू लागले म्हणजे ते भूपृष्ठावर लहानमोठ्या नाळी, भेगा, घळ्या पाडते. त्यांतून वाहणारे छोटे प्रवाह एकत्र होऊन मोठा प्रवाह वाहू लागला म्हणजे तो भूपृष्ठावर दरी निर्माण करतो.

दरी निर्माण होण्यास कारणीभूत असलेला प्रमुख घटक म्हणजे नदीचे अपक्षय (झीज) कार्य होय. आरंभीच्या टप्प्यात नदी डोंगराळ भागातून, तीव्र उतारावरून वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह फार वेगवान असतो. त्यामुळे प्रवाहाबरोबर वाहून येत असलेले दगड, धोंडे, वाळू इत्यादींसह प्रवाह भूभागावर आदळतो, तेव्हा तो त्याचा पृष्ठभाग खरवडून काढण्याचे म्हणजे दरी निर्माण करण्याचे कार्य करतो. प्रवाहमार्गाच्या तळावर व कडांवर पाण्याचे आणि दगडधोंड्यांचे जोराने घर्षण होऊन तेथील पृष्ठभाग खरवडून काढला जातो. प्रवाहाच्या काठापेक्षा तळावर अधिक घर्षण झाल्यामुळे नदीचा तळ जास्त खोल होत जातो व काही काळानंतर नदीच्या पात्राला इंग्रजी ‘व्ही’ अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. अशा प्रकारे निर्माण झालेल्या भूरूपाला नदीची दरी म्हणतात. अरूंद इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या दऱ्या भूपृष्ठावर सामान्यतः अतिपर्जन्याच्या व मृदू खडकांच्या प्रदेशात आढळतात.

नदीच्या टप्प्यात जर कठीण खडक असतील, तर त्यांची फारशी झीज होत नाही व पात्र रूंदावण्याचे कार्यही विशेष होत नाही. तळभागाचेच घर्षण अधिक प्रमाणात होते व त्यामुळे दोन्ही बाजू उभ्या भिंतीसारख्या तशाच राहतात. परिणामतः अशा भागात उभी व अरूंद दरी तयार होते आणि ती ‘घळई’ किंवा ‘निदरी’ म्हणून ओळखली  जाते. ब्रह्मपुत्रा, सतलज व सिंधू नद्यांनी त्यांच्या प्रारंभीच्या टप्प्यात भूपृष्ठाच्या हालचालींमुळे ते उंचावण्याच्या क्रियेस न जुमानता अशा प्रकारच्या अत्यंत खोल व अरूंद ‘घळ्या’ खोदून काढल्या आहेत. अन्यत्र कोरडे हवामान असणाऱ्या प्रदेशात वाहणाऱ्या नद्यादेखील अशा घळ्या निर्माण करतात. अशा घळ्यांना ⇨ कॅन्यन  म्हणतात. उ. अमेरिकेतील कोलोरॅडो पठारावरील कोलोरॅडो नदीची ३०० किमी.हून अधिक लांबीची व काही ठिकाणी १·५ ते २·५ किमी. खोलीची ‘ग्रँड कॅन्यन’ जगप्रसिद्ध आहे.

काही दऱ्या भूकवचात होणाऱ्या भूसांरचनिक हालचालींमुळे निर्माण होतात. त्या सांरचनिक दऱ्या म्हणून ओळखल्या जातात. भूसांरचनिक हालचालींमुळे भूकवचाचा बराच भाग सर्वसामान्य पातळीपेक्षा खाली खचतो व तेथे मोठी दरी तयार होते. अशा दरीस ⇨ खचदरी  म्हणतात. नदीच्या अपक्षय कार्यामुळे तयार होणाऱ्या दऱ्‍यांपेक्षा अशा दऱ्या लहान असतात. आफ्रिकेतील खचदऱ्या, कॅलिफोर्नियातील ओवेन्स दरी, जॉर्डन नदीचे खोरे या सांरचनिक दऱ्या आहेत.

हिमनद्यांच्या कार्यामुळेही काही दऱ्या निर्माण होतात. अतिउंच डोंगराळ भागात दरीत साचलेले बर्फ हिमनदीच्या रूपाने खाली घसरू लागते व त्यामुळे दरीचा तळ व बाजूंची झीज होते. कालांतराने अशा प्रकारे हिमनदीने खरवडून काढलेल्या दरीचा आकार इंग्रजी ‘यू’ अक्षरासारखा होतो. नॉर्वेमधील फ्योर्ड तसेच स्कॉटलंडमधील काही फर्थ व लॉख ह्या अशा दऱ्या आहेत. मुख्य नदीच्या दरीच्या काठावरून धबधब्याने किंवा द्रुतवाहांनी खाली कोसळणाऱ्या उपनदीच्या दरीला लोंबती दरी म्हणतात. अशा लोंबत्या दऱ्या मुख्यतः यू–दरीच्या काठावर आढळतात. मुख्य नदीची दरी अधिक वेगाच्या क्षरणकार्यामुळे उपनदीच्या दरीपेक्षा अधिक खोल असली म्हणजे ही उपनदीची दरी लोंबती दरी होते.

नदीने मार्ग बदलल्यामुळे किंवा भूपृष्ठ अत्यंत जलभेद्य असल्यामुळे नदीची मूळ दरी कोरडी पडते किंवा तिच्यातून थोडेसेच पाणी वाहते,  अशा दरीला ‘कोरडी दरी’ किंवा ‘मृत दरी’ म्हणतात. नदीच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या दऱ्या युवावस्था, प्रौढावस्था व वृद्धावस्था अशा तीन अवस्थांमधून संक्रमण करतात असे मानले जाते. युवावस्था ही प्रारंभीची अवस्था होय व तीमध्ये भूपृष्ठाचा उतार तीव्र असतो दरी अरुंद असते व तळ खोल करण्याचे कार्य प्रमुख असते. प्रौढावस्थेत उतार मध्यम असून दरी विकसित झालेली असते व ती प्रारंभीच्या अवस्थेतील दरीपेक्षा अधिक रुंद असते. दरीविकासाचा शेवट म्हणजे दरीची वृद्धावस्था होय. या अवस्थेत नदी सपाट प्रदेशातून वाहते व पात्र फार रुंद असते. तिचा तळ आधार प्रतलाइतका खोल गेलेला असतो.

शिंदे, सु. द.