गझनीचा प्रसिद्ध मीनार

गझनी : अफगाणिस्तानच्या गझनी प्रांताची राजधानी व प्रसिद्ध ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ४३,४२३ (१९६९ अंदाज). समुद्रसपाटीपासून ३,०४८ मी. उंचीवर, गझनी नदीच्या दोन्ही तीरांवर, हे काबूलच्या १५० किमी. दक्षिण-नैर्ऋत्येस व कंदाहारच्या ३५८ किमी. उत्तरईशान्येस वसले आहे. ग्रीकांचे गाझोस अथवा टॉलेमीचे गाझाका ते हेच काय याबद्दल दुमत असले, तरी सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने वर्णिलेले होसीना हेच असावे. त्याच्या वेळेस गझनीच्या आसमंतात बलवान बौद्ध राजा राज्य करीत होता. आठव्या शतकापासून यावर अरबांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. अरब भूगोलवेत्त्यांनी या भागास झाबुलीस्तान नाव दिले आहे. ९६३ मध्ये अलप्तगीन या तुर्की सरदाराने गझनीस आपली राजधानी वसवली. त्याचा जावई सबक्तगीन याने गझनीचे साम्राज्य खूप वाढविले. सबक्तगीनचा मुलगा महंमूद याच्या कारकीर्दीत (९९८–१०३०) गझनी वैभवशिखरावर पोहोचले. भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीमुळे गझनीला सौंदर्यशाली नगरी बनविणाऱ्या अनेक वास्तू तेथे निर्माण झाल्या. ११५३ साली अलाउद्दीन घोरी याने गझनी बेचिराख केले. त्यानंतर गझनीस पुन्हा ऊर्जितावस्था आली नाही. मोगलांकडून ते नादिरशाहने व त्याच्याकडून आधुनिक अफगाणिस्तानचा निर्माता अहमदशाह दुर्रानीने घेतले. १८३९–४२ मधील इंग्रज-अफगाणयुद्धात काही दिवस इंग्रजांचा येथे अंमल होता. १९४८-४९ साली जुन्या गझनीच्या उत्खननामुळे जगाचे पुन्हा इकडे लक्ष वेधले. विसाव्या शतकात काबूल–कंदाहार महामार्गाच्या निर्मितीनंतर मधला टप्पा म्हणून गझनीस पुन्हा महत्त्व मिळाले. शेतमालाचे ते व्यापारकेंद्र बनले. येथे कातडी कमावणे, मेंढीच्या कातडीचे कोट बनविणे, रेशीम विणणे इत्यादींचे धंदे असून धान्य, लोकर, अफू, फळफळावळ, गुरे यांचा व्यापार चालतो. जुन्या गझनीमध्ये अनेक पडक्या वास्तू असून सु. ४२ मी. उंचीचे दोन कुतुबमीनारसदृश मीनार आहेत. काबूल रस्त्यावर सु. १·५ किमी. वरील रौझा येथे महंमूदाची कबर असून अनेक संत, कवी इत्यादींच्या कबरी गझनीत असल्याने शहराला धार्मिक महत्त्व आहे. गझनीजवळ बौद्ध अवशेषही मिळाले आहेत. १९६० नंतर अद्ययावत गझनीची उभारणी होत असून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, चित्रपटगृहे इत्यादींच्या सोयी झाल्या आहेत. 

शाह, र. रू.