नकाशा : भूपृष्ठावर जी अनेक नैसर्गिक वा मानवनिर्मित वैशिष्ट्ये आढळतात, त्यांपैकी काही वैशिष्ट्यांची सपाट पृष्ठभागावर विशिष्ट चिन्हे आणि खुणा यांनी लहान प्रमाणात केलेली मांडणी. भूपृष्ठावरील अशा गोष्टींचे पारस्परिक स्थान आकृतींच्या द्वारे रेखांकित करणे, हा नकाशाचा मूळ उद्देश असतो. पारस्परिक स्थान त्या गोष्टींतील प्रत्यक्ष अंतरे मोजून व दिशा पाहून नंतर नकाशात व्यक्त केले जाते.

दोन ठिकाणांमधील अंतर दाखविणे, ही नकाशाची पहिली महत्त्वाची बाब आहे. फार पूर्वी हे अंतर वेळेच्या एककात (उदा., अ हे स्थान आ पासून पाच दिवसांच्या अंतरावर आहे.) व्यक्त करीत व वेळेचे हे प्रमाण एकाच नकाशात निरनिराळ्या भागांतील जमिनीच्या उंचसखलपणानुसार निरनिराळे राही. आता मात्र अंतरे लांबीच्या एककातच व्यक्त केली जातात व त्यासाठी जमिनीची नीट मोजणी-मापणी करूनच दोन स्थानांमधील अंतरे नकाशात दाखवितात.

दिशा ही नकाशाची दुसरी महत्त्वाची बाब आहे. पूर्वीच्या काळी या बाबीला फारसे महत्त्व नसे. अंशतः याच कारणामुळे इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत नकाशात अचूक दिशा दाखविण्याचा प्रयत्‍न झाला नाही. पुढे होकायंत्राचा शोध लागला, तेव्हा नकाशात अचूक दिशा दाखविणे शक्य झाले.

नकाशे हेतुपुरस्सर काही ठराविक प्रमाणावर तयार केले जातात. त्यांतील प्रत्येक गोष्ट, दर्शविलेल्या दुसऱ्या गोष्टीपासून अचूक दिशेला, तसेच प्रमाणित अंतरावर दाखविली जाते. नकाशाच्या हेतुला पूरक ठरणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीच नकाशात दाखवितात. त्यांतही काही निवडक गोष्टींवर अधिक भर दिला जातो. या सर्व गोष्टी विशिष्ट सांकेतिक चिन्हांनी वा संकेताक्षरांनी दाखविलेल्या असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकाशांवर अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची जाळीही काढलेली असते.

आपले विचार आकृत्यांच्या द्वारे व्यक्त करण्याची कला मानवामध्ये फार पूर्वीपासून आढळते. एस्किमो आणि बेदूईन यांसारख्या अप्रगत जमातींतील लोकांतही नकाशा काढण्याचे कौशल्य जात्याच असते, हे त्यांनी काढलेल्या काही नकाशांवरून दिसून येते.

मातीच्या विटेवरील सर्वांत जुना नकाशा, गा-सूर उत्खनन, इ. स. पू. २५००.

प्राचीन नकाशे : प्रवाशांना मार्गदर्शन म्हणून नकाशे तयार करण्याची कल्पना बरीच जुनी आहे. प्राचीन ॲसिरियामध्ये इ. स. पू. १८०० च्या काळातील मातीची एक जुनी वीट सापडली असून तिच्या पृष्ठभागावर मेसोपोटेमियाचा उत्तर भाग रेखांकित केला आहे. हार्व्हर्ड विद्यापीठाच्या सेमेटिक संग्रहालयात अशीच एक दुसरी वीट ठेवली असून ती इ. स. पू. २५०० च्या काळातील आहे. बॅबिलनच्या उत्तरेस ३२० किमी. अंतरावर गा-सूर या गावी उत्खननात ती मिळाली. त्या विटेवर एक नदी, कदाचित ती युफ्रेटीस असावी, दाखविली असून तिच्या दोन्ही बाजूंस पर्वत दाखविले आहेत. नदीचे तीन फाटे दक्षिणेकडील समुद्रास किंवा सरोवरास मिळतात. नकाशातील उत्तर, पूर्व आणि पश्चिम या दिशा वर्तुळांनी दाखविल्या आहेत.

ब्रिटिश संग्रहालयात अशा पुष्कळ विटा ठेवल्या असून त्यांत बॅबिलोनिया वा त्यातील काही भाग जुन्या पद्धतीने दाखविलेले आहेत. त्यांपैकी एका विटेवर पृथ्वी ही वर्तुळाकार तबकडी म्हणून दाखविली असून तिच्याभोवती समुद्र आणि वर आकाशाचा घुमट दाखविला आहे. ही विश्वाची कल्पना पुढे ग्रीक व रोमन लोकांनी ग्राह्य मानली व उचलून धरली. पुढे ती धर्मग्रंथांतून मध्ययुगीन यूरोपातील ख्रिस्ती समाजात रूढ झालेली दिसते.

ईजिप्तमध्ये भूमितीच्या साहाय्याने जमिनीची मोजणी होत असे. शेतसारा जमिनीच्या क्षेत्रावर अवलंबून असल्याने शेतजमिनीचे क्षेत्र निश्चित करणे, त्या काळी महत्त्वाची बाब होती. इ. स. पू. तेराव्या शतकात ईजिप्तमध्ये भूसर्वेक्षण पद्धतशीर केले जात असे. त्या नोंदी नकाशात दाखविलेल्या असण्याची फार मोठी शक्यता आहे. पुढील काळात एराटॉस्थीनीझ या ग्रीक शास्त्रज्ञाने त्या नोंदींचा नीट उपयोग करून घेतला.

चिनी नकाशे : नकाशे काढण्याचे शास्त्र चीनमध्येही फार पूर्वीपासून अस्तित्वात होते, असे दिसते. इ. स. पू. २२७ च्या सुमारास चिनी वाङ्‌मयात नकाशाबद्दल उल्लेख आढळतो. पुढे कागदाचा शोध लागल्यावर (इ. स. सु. १०५) चिनी साम्राज्याच्या निरनिराळ्या भागांचे स्थानिक नकाशे तयार होऊ लागले.


ग्रीक नकाशे : इ. स. पू. पाचव्या शतकात ग्रीक लोकांना फक्त पूर्वेकडील सिंधू नदीपासून पश्चिमेकडे अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेला प्रदेश ज्ञात होता. त्यापुढील शतकात पृथ्वी ही गोल तबकडी नसून चेंडूसारखी वाटोळी आहे, ही कल्पना प्लेटोने आपल्या लिखाणात मांडलेली आढळते. पण या कल्पनेचा मूळ जनक कोण, याबद्दल वाद आहे. पुढे इ. स. पू. ३५०० मध्ये ॲरिस्टॉटलने पृथ्वी वाटोळी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केले. पृथ्वीच्या परिभ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे हे सिद्ध केले जाऊन, निरनिराळ्या स्थानांचे अक्षांश निश्चित केले गेले. अशा रीतीने पृथ्वीबद्दलच्या ज्ञानात भर पडत गेली.

अर्वाचीन नकाशांचा पाया मुख्यत्वेकरून प्राचीन काळातील ग्रीक लोकांनी घातलेला आहे. पृथ्वीचा वाटोळेपणा, तिचे ध्रुव, विषुववृत्त व उष्ण कटिबंध या सर्व गोष्टी प्रथम त्यांनी ओळखल्या. पुढे अक्षवृत्ते व रेखावृत्ते या कल्पना त्यांनी मांडल्या व प्रक्षेपणाची पद्धत सुचविली. पृथ्वीचे आकारमानही ठरविले. ग्रीक लोकांनी नकाशाशास्त्रात केलेल्या या प्रगतीची माहिती आपणास हीरॉडोटस व स्ट्रेबो यांच्या लेखनांतून मिळते. त्या काळात आयोनियन लोकांनी या शास्त्रात बरीच प्रगती केलेली आढळते. इ. स. पू. सहाव्या शतकात ॲनॅक्सिमँडर याने सर्वप्रथम ‘ग्रीक नकाशा’ तयार केला, असे म्हटले जाते. त्यानंतर म्हणजे पाचव्या शतकात हेकाटीअस हा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने तत्कालीन नकाशा-मांडणीत पुष्कळ सुधारणा केली. पण पृथ्वीबद्दल त्याची कल्पना जुनीच होती. पृथ्वी ही गोल तबकडीप्रमाणे असून तिच्याभोवती महासागराच्या पाण्याचा वेढा आहे, असाच त्याचा समज होता. आयोनियन लोकांचा व्यापार भूमध्य समुद्राच्या पूर्व भागातच प्रामुख्याने चाले व तोही किनाऱ्याकिनाऱ्याने होई. त्यामुळे त्या काळात तयार झालेले नकाशे समुद्रकिनाऱ्याजवळच्या प्रदेशांचे आढळतात. म्हणून त्याकाळी समुद्रपट तयार झालेले आढळत नाहीत.

एराटॉस्थीनीझचा नकाशा

एराटॉस्थीनीझ (इ. स. पू. सु. २७६ ते १९४) ने पृथ्वीचा परिघ सर्वांत प्रथम शोधून काढला. तो २,५२,००० स्टेडिया (म्हणजेच २४,६६२ मैल किंवा सु. ३९,२१३ किमी.) भरला. त्यानुसार एक अंश अक्षांश किंवा रेखावृत्तावरील एक अंश म्हणजे ६८·५ मैल किंवा सु. ११० किमी. जमिनीवरचे अंतर असते. एराटॉस्थीनीझने काढलेला हा निर्णय आज माहीत असलेल्या गोष्टींप्रमाणे बराचसा अचूक होता पण दुर्दैवाने त्यानंतरच्या शास्त्रज्ञांनी हा निर्णय ग्राह्य धरला नाही. त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या नकाशांत चुका निर्माण झाल्या. एराटॉस्थीनीझने त्यावेळी ज्ञात असलेल्या जगाचा नकाशा काढला होता दुर्दैवाने तो गहाळ झालेला आहे. पण इतर ग्रंथांत सखोल माहिती आलेली आहे. त्यावरून त्याने आपल्या नकाशात ७ अक्षवृत्ते व ७ रेखावृत्ते दाखविली होती, असे दिसून येते. त्याने नकाशात दाखविलेले मूळ रेखावृत्त डॉन नदीच्या मुखावरून दक्षिणेस रोड्झ, ॲलेक्झांड्रिया, आस्वान आणि मेरोईवरून जाते. अशा रीतीने वृत्तांची जाळी काढून त्यांच्या साहाय्याने नकाशे तयार करण्याचे प्रयत्‍न झाले. सुरुवातीला ही वृत्ते अनियमित ठिकाणी दाखविली जात पण पुढे हिपार्कस या प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञाने अनेक स्थानांचे अक्षांश निश्चित करून नकाशात सुधारणा केली. त्याने काढलेल्या जगाच्या नकाशात ११ अक्षवृत्ते सारख्या अंतरावर दाखविलेली आहेत.


ग्रीकांनी तयार केलेले नकाशे बघता, त्यांच्या विचारांवर निसर्गातील समानतेच्या कल्पनेचा बराच पगडा दिसून येतो. याचे निदर्शक म्हणून ॲलेक्झांड्रियाच्या क्लॉडियस टॉलेमीने काढलेल्या उत्कृष्ट नकाशाचे उदाहरण देता येईल. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात टायर (सूर) चा मेरिनस व टॉलेमी हे दोन महत्त्वाचे शास्त्रज्ञ ग्रीक इतिहासात होऊन गेले. मेरिनसने अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची नकाशावर जाळी काढण्याची पद्धत अधिक प्रगत केली. त्याने काढलेल्या नकाशात दोन्ही वृत्ते सरळ दाखविली असून ती एकमेकांशी काटकोन करतात. लहानसे क्षेत्र दाखविण्यासाठी ही पद्धत सदोष नाही, असा त्याचा दावा होता. टॉलेमीने मात्र त्यावर टीका करून आपल्या नकाशात सुधारणा केली.

टॉलेमीचा जिऑग्रॅफिया ग्रंथ आठ खंडांत प्रसिद्ध झाला आहे. ह्या ग्रंथात नकाशा-शास्त्र, प्रक्षेपणे आणि मेरिनसच्या कल्पना यांवर स्फुटे असून त्यांशिवाय जवळजवळ ८,००० स्थानांचे भौगोलिक संदर्भ (अक्षांश व रेखांश) दिलेले आहेत. टॉलेमीच्या हस्तलिखित ग्रंथाचे दोन भाग आहेत. त्यांपैकी एका भागात जगाचा नकाशा आणि २६ किरकोळ नकाशे आहेत. दुसऱ्या भागात लहान क्षेत्रांचे ६७ नकाशे आहेत. यांपैकी जगाचा नकाशा हा एक प्रमाण अक्षवृत्ताच्या शंक्वाकृती प्रक्षेपणावर काढलेला आहे. इतर काही ठराविक अक्षवृत्ते व रेखावृत्ते एकमेकांशी काटकोन करणाऱ्या सरळ रेषांनी दाखविली आहेत.

टॉलेमीच्या हस्तलिखितात जे नकाशे ग्रथित केले आहेत, ते त्यानेच काढले किंवा नाही याबद्दल दुमत आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते ते टॉलेमीच्या नंतर तयार करण्यात आले असून या हस्तलिखितास जोडलेले आहेत. ते काहीही असले, तरी त्याचे लेखन व नकाशे ह्यांच्यामुळे पुढील काळात सुधारलेले नकाशे काढण्यास बरीच चालना मिळाली, हे निश्चित. टॉलेमीच्या जगाच्या नकाशातील काही ठळक गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्याच्या नकाशाच्या एका बाजूस कमाल दिनमानदर्शक वृत्ते मांडली आहेत. तत्कालीन ज्ञात जगाचा पूर्व-पश्चिम विस्तार १८०° रेखांशापर्यंत मर्यादित होता, असे त्या नकाशावरून दिसते. ह्या नकाशात दोष आहेत. नैसर्गिक समानता दाखविण्यासाठी त्याने भूमध्य समुद्राप्रमाणेच हिंदी महासागर भूवेष्टित दाखविलेला आहे. भारतीय द्वीपकल्प प्रमाणापेक्षा फारच लहान व श्रीलंका बेट प्रमाणापेक्षा मोठे दाखवले आहे. इतरही अनेक चुका या नकाशात आहेत. उदा., भूमध्य समुद्राचा विस्तार ४२° रेखांश असता नकाशात तो ६२° रेखांशाइतका दाखविलेला आहे. या व इतर काही चुका यूरोपीय नकाशांत १७०० पर्यंत ठिकठिकाणी चालू राहिलेल्या दिसतात.

रोमन नकाशे : ग्रीक लोकांनी नकाशा-शास्त्रात केलेल्या प्रगतीबाबत रोमन लोक सर्वथा अनभिज्ञ राहिले. गणितीय भूगोलात त्यांनी रस घेतला नाही किंवा खगोलीय निरीक्षणे केली नाहीत. अक्षांश-रेखांश ठरविण्याच्या पद्धती व प्रक्षेपणे यांचाही त्यांनी कधी विचार केलेला दिसत नाही. त्यांनी तयार केलेले जे काही नकाशे उपलब्ध आहेत, त्यांवरून त्यांच्या प्रवासवर्णनांची ती रेखाचित्रे आहेत असे वाटते.

प्लिनीने त्याच्या नॅचरल हिस्टरी ह्या ग्रंथात ‘जगाचे सर्वेक्षण’ या नकाशाचा उल्लेख केला आहे. इ. स. बाराव्या शतकात रोमन बादशाह ऑगस्टस याचा जावई आग्रिपा याने तो तयार केला होता. आज तो उपलब्ध नाही पण त्यासंबंधीच्या उल्लेखावरून तो वर्तुळाकार होता. हे स्पष्ट होते. पृथ्वी ही सपाट, गोल तबकडीसारखी आहे, ही आयोनियन लोकांची कल्पना रोमन लोकांनी उचलून धरली हे त्यावरून स्पष्ट होते. रोमन लोकांनी जे रस्ते बांधले होते, त्यांवरील अंतरांच्या आधारे हा नकाशा तयार केला असावा. त्यातील ८०% जागा रोमन साम्राज्याचा विस्तार दाखविते. उरलेल्या लहानशा जागेत भारत, चीन, रशिया इ. देश नकाशाच्या सरहद्दीवर दाखविले आहेत.

टी इन् ओ नकाशा

मध्ययुगीन नकाशे : मध्ययुगात भौगोलिक ज्ञानात भर पडली नाही, तर पृथ्वीच्या आकारासंबंधीच्या रोमन लोकांच्या कल्पनाच लोकांनी उचलून धरल्या. त्यामुळे नकाशा-शास्त्रात प्रगती झाली नाही. उलट त्यात चुकांची भरच पडत गेली. इसवी सनाच्या आठव्या शतकापासून ते पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंत अनेक नकाशे तयार झाले, त्यांपैकी ६०० पेक्षा अधिक नकाशे आता उपलब्ध झाले आहेत. ते बरेचसे साधे आहेत. त्यांतील उल्लेखनीय नकाशे म्हणजे ‘टी इन् ओ’ किंवा चाकाच्या आकारचे नकाशे होत. ह्या नकाशांचा शिरोभाग पूर्व दिशा दाखवी. ह्या नकाशांच्या आकाराने ज्ञात जगाची सीमा दर्शविली जाई व त्यात T हे अक्षर आडवे बसविले जाई. या अक्षराची आडवी रेषा डॉन (प्राचीन टॅनीअस) नदी ते नाईल नदीपर्यंतचे अंतर दाखवी व उभी रेषा भूमध्य समुद्राइतकी लांब दाखविली जाई. या नकाशातही पुढे ख्रिस्ती धर्मशास्त्राप्रमाणे बदल करण्यात येऊन पृथ्वी ही परमेश्वराची परिपूर्ण सुसंगत कलाकृती आहे व जेरूसलेम तिच्या मध्यभागी आहे हे दाखविण्याचा प्रयत्‍न केला गेला. अरब देशांतही अशाच प्रकारचे गोल नकाशे थोडाफार बदल करून प्रचारात होते.

वाघ, दि. मु.


भारतीय नकाशे : इब्न हौकल (दहावे शतक) या अरब ग्रंथकाराच्या सुरत-अल्-अर्ज या ग्रंथात सिंधचा नकाशा आहे. तो एलियट व डौसन यांनी प्रकाशित केलेल्या हिस्टरी ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टोरियन्स या मालेच्या पहिल्या खंडात (पृ. ३२ व ३३ मध्ये) प्रसिद्ध झाला आहे. समरकंदचा रहिवासी ऊलुगबेग याने तत्कालीन ज्ञात असलेल्या जगातील अनेक स्थळांचे अक्षांश-रेखांश दिले आहेत. त्याला झीज-इ-ऊलुगबेग (झीज ऊलुगबेग) असे म्हणतात. हा १४३७—३८ मध्ये तयार झाला. अकबराच्या कारकीर्दीत अबुल फज्लने केलेल्या आईन-इ-अकबरीमध्ये भारतातील व भारताबाहेरच्या कित्येक स्थळांचे अक्षांश-रेखांश दिले आहेत. जहांगीराच्या काही चित्रांत त्याचे जहांगीर (जगज्जेता) हे नाव सार्थ आहे हे दाखविण्यासाठी त्याच्या हातात पृथ्वीचा गोल दिला आहे. या गोलावर त्या वेळी ठाऊक असलेले जग अक्षांश-रेखांशांच्या साहाय्याने दाखविले आहे.

यानंतर तीन वर्षांच्या परिश्रमांनी सादिक इस्फहानीने १६४७ मध्ये संपविलेल्या शहीद-इ-सादिक या आपल्या ग्रंथामध्ये तत्कालीन जगाचे चौतीस नकाशे दिले आहेत. त्यांत सहा नकाशे भारताचे आहेत. यांत बदाऊन, बऱ्हाणपूर इ. काही गावांची स्थलनिश्चिती चुकली असली, तरी गंगा–यमुनांचे प्रवाह अचूक दाखविले आहेत. 

औरंगजेब पंचवीस वर्षे दक्षिणच्या स्वारीवर होता. अनेक वेळा तो निरनिराळ्या स्थानांचे किंवा प्रदेशांचे नकाशे व काही गावांची अंतरे मुद्दाम मागवीत असे. जिंजी ते तिरुवन्नामलई या दोन गावांमधील त्याला कळविलेले अंतर अचूक म्हणजे बारा कोस होते. एकदा त्याने कोकणातून देशावर येण्यासाठी एकंदर घाट किती आहेत, त्यांपैकी केवळ माणसे जाऊ शकतील असे किती व जनावरेही जाऊ शकतील असे किती, याची विचारणा केली होती त्याचे त्यास तीनशे घाट केवळ माणसे जाण्यासारखे व साठ घाट जनावरे जाण्यासारखे होते, असे उत्तर मिळाले.

सवाई जयसिंगने (१६६९—१७४३) नकाशे किती तयार केले, हे समजण्यास मार्ग नाही पण त्याने ऊलुगबेगच्या धर्तीवर शेकडो स्थानांचे अक्षांश-रेखांश दाखविणारे तक्ते तयार केले होते. त्यांना झीज-इ-मुहम्मदशाही (मुहम्मदशाहाच्या वेळची कोष्टके) असे नाव आहे.

महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर भारतात मध्ययुगात डोंगरी वा भुईकोट आणि पाण्यातील किल्ल्यांना विशेष महत्त्व असे. म्हणून अशा किल्ल्यांचे किंवा काही यात्रास्थानांचे आराखडे काढलेले आढळतात. ते भारतीय किंवा प्रादेशिक नकाशांचे मूळ समजण्यास हरकत नाही. जयपूरकरांची मूळ राजधानी आंबेर येथील देवीच्या देवळात मथुरा, काशी, प्रयाग इ. तीर्थस्थानांचे मोठे आराखडे भिंतींवर रंगविलेले आहेत. हैदराबादच्या अभिलेखागारात अनेक किल्ल्यांचे आराखडे पहावयास मिळतात. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात व डेक्कन कॉलेजमध्ये पेशवाईत काढलेले नकाशे आहेत. त्यांपैकी काही नकाशांत वरच्या बाजूस पूर्व, खालच्या बाजूस पश्चिम, उजव्या बाजूस दक्षिण व डाव्या बाजूस उत्तर अशा दिशा दर्शविलेल्या आहेत. डेक्कन कॉलेजमधील धारवाड किल्ल्याचा आराखडा विसाजी नारायण वाडदेकर याने १७९१—९२ मध्ये काढलेला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात कोकणातील निरनिराळ्या प्रदेशांचे १८३५ मध्ये काढलेले नकाशे उपलब्ध आहेत. ते स्थानिक कुलकर्ण्याने काढलेले असून त्यांत वरची बाजू पूर्व व खालची पश्चिम ही समजूत असल्याचे दिसते. उलट याच मंडळात पुण्याच्या दक्षिणेस असलेल्या संपूर्ण भारताचा नकाशा आहे पण त्यात दिशा पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे वरच्या बाजूस उत्तर, खाली दक्षिण, उजवीकडे पूर्व व डावीकडे पश्चिम धरल्या असून समुद्र निळ्या रंगाने दाखविला आहे.

इंग्रज व फ्रेंच यांच्या संगतीने मराठ्यांना आपल्याजवळ नकाशे असण्याची आवश्यकता वाटू लागली होती. या बाबतीत नाना फडणीसाने नकाशे मिळविण्याचा किंवा नकाशे काढवून घेण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो. त्याने सवाई माधवरावाच्या भूगोलाच्या शिक्षणाकरिता एक पृथ्वीचा गोल आणविला होता.

येथे जे भारतीय ज्योतिषी होऊन गेले, त्यांपैकी काही ज्योतिषांकडे ॲस्ट्रॉलेब नावाचे एक किंवा अनेक तबकड्या असलेले यंत्र असे. त्यावर अक्षांश-रेखांश काढलेले असत, तर काही तबकड्यांवर भारतातील काही नगरांचे अक्षांश-रेशांशही दिलेले आढळतात. ॲस्ट्रॉलेबची कल्पना पाश्चात्त्यांकडून घेतलेली असावी.


प्राचीन काळी व मध्ययुगात हजारो लोक चार धामे, बारा ज्योतिर्लिंगे इत्यादींचे दर्शन घेण्यासाठी मान सरोवर ते कन्याकुमारी येथपर्यंत किंवा द्वारका ते कामाक्षी येथपर्यंत प्रवास करीत. हा प्रवास करताना त्यांच्याजवळ नकाशे होते किंवा नाही, हे कळावयास साधन नाही पण ह्या यात्रा करताना मुक्काम कोठे कोठे करावयाचे याच्या सूची यात्रेकरूंजवळ असत, असे म्हणण्यास हरकत नाही. हे मुक्काम निरनिराळी तीर्थे करीत मुख्य यात्रास्थानापर्यंत जाण्याच्या दृष्टीने आखलेले असत.

कोसकशी : आजच्याप्रमाणे पूर्वीही सैनिकी हालचाली करताना गावांची एखाद्या प्रमुख गावापासूनची अंतरे, तेथे असलेला पाणीपुरवठा, सैनिकी तळ ठोकण्याच्या जागा इ. भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती ठाऊक असणे आवश्यक असे. म्हणून सामान्यतः परगण्याचे (तालुक्याचे) मुख्य गाव केंद्र धरून त्यापासूनचे त्या परगण्यातील प्रत्येक गावाचे अंतर, तेथील पाणीपुरवठा, तेथील सैनिकी तळांची जागा इत्यादींची माहिती असलेल्या चिठ्ठ्या तयार करून त्या एकत्र ठेवीत. त्या चिठ्ठ्यांना ‘कोसकशी’ म्हणत. वाई परगण्याच्या कोसकशीचे काही कागद सापडले आहेत. ते बहुधा शिवकालीन असावेत, असे त्यांतील अक्षरांच्या वळणावरून वाटते.

खरे, ग. ह.

मध्ययुगाच्या उत्तरार्धात म्हणजे इसवी सनाच्या तेराव्या ते सोळाव्या शतकांपर्यंतच्या काळात पोर्टोलन नकाशे तयार करण्यात आले. ते मुख्यत्वेकरून इटालियन आणि कॅटॅलन (पूर्व स्पेनमधील दर्यावर्दी लोक) लोकांनी होकायंत्राच्या साहाय्याने तयार केले. या लोकांनी अगोदर लहानलहान प्रदेशांचे सर्वेक्षण केले व मग त्या सर्वेक्षणाच्या नोंदी एकत्रित आणून मोठे नकाशे तयार केले. त्यांत प्रामुख्याने भूमध्य समुद्र, त्याजवळचे समुद्र आणि अटलांटिक महासागर यांच्या किनाऱ्यालगतचे प्रदेश दाखविलेले असत. त्यांत क्वचित अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखविली जात. मात्र अनेक बिंदूंपासून निरनिराळ्या दिशांना जाणाऱ्या सरळ रेषा काढलेल्या असत. या रेषांच्या व होकायंत्राच्या साहाय्याने मिळणाऱ्या दिशांत फारच साम्य असल्याने या नकाशांचा जलपर्यटनासाठी फार उपयोग होई.

नकाशा-शास्त्राचे पुनरुज्‍जीवन : सोळाव्या शतकाच्या सुमारास खोदकाम व मुद्रणकला यांचा शोध लागला. ग्रीक आणि रोमन संस्कृतींस पुन्हा चेतना मिळून टॉलेमीच्या नकाशासंग्रहाच्या अनेक प्रती छापल्या गेल्या. त्याशिवाय नवीन तयार नकाशेही मुद्रित झाले. याच सुमारास नवीन प्रदेशांचा शोध लागण्यास सुरुवात झाली. त्यांचे नकाशे तयार करणे आवश्यक असल्याने नकाशा-शास्त्रात भर पडत गेली.

खोदकाम करून तयार केलेला ग्रेट ब्रिटनचा नकाशा सर्वप्रथम रोममध्ये इ. स. १५४६ मध्ये प्रकाशित झाला. इ. स. १५७० मध्ये ऑर्तीलिअसने जगाचा नकाशा प्रकाशित केला. क्रिस्तोफर सॅक्स्टनने ग्रेट ब्रिटनसाठी इ. स. १५७९ मध्ये राष्ट्रीय नकाशासंग्रह तयार केला. अशा रीतीने तयार केलेला हा पहिला राष्ट्रीय नकाशासंग्रह होय.

सतराव्या शतकात उत्तम प्रकारचे नकाशे नेदर्लंड्समध्ये तयार करण्यात आले. या भागात मर्केटर, ऑर्तीलिअस, हाँडियस, ब्ल्यू जानसून इ. नकाशा-शास्त्रज्ञ त्या काळातच निर्माण झाले. या काळात डच लोकांचे साम्राज्य फार लांबपर्यंत समुद्रापलीकडेही पसरले असल्याने व त्यांना ठिकठिकाणची माहिती व पैसा या दोन्ही गोष्टी मिळत राहिल्याने समुद्रपट नकाशे व नकाशासंग्रह तयार करणे डच शास्त्रज्ञांना शक्य झाले. या सुमारास जानसूनचा नकाशासंग्रह चार खंडांत प्रसिद्ध होऊन तो डच, फ्रेंच, जर्मन आणि लॅटिन भाषांत प्रकाशित झाला.

सतराव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच अकादमीने निरनिराळ्या ठिकाणांचे रेखांश निश्चित केले. या सुमारास निरनिराळ्या देशांत राष्ट्रीयतेची भावना निर्माण होऊन त्यांच्या प्रदेशांचे सर्वेक्षण करण्यात आले. शास्त्रीय संशोधन करण्यात येऊन रेखावृत्तांतील अंतरे निश्चित करण्यात आली. भूगोल, भूमापन-शास्त्र, जलविद्या, सर्वेक्षण, खोदकाम, वर्णलेखन, चित्रकला व सजावटकला इ. क्षेत्रांत यूरोपमध्ये बरीच प्रगती झाली.

बाराव्या शतकात आधुनिक नकाशा-शास्त्र उदयास आले. इ. स. १७४७ ते १७९३ च्या दरम्यान फ्रान्समध्ये कासीनीच्या मार्गदर्शनाखाली प्राकृतिक नकाशे तयार करण्यात आले. खगोलीय निरीक्षण आणि त्रिकोणांकित सर्वेक्षण या दोन पद्धतींचा मिलाप करून हे नकाशे तयार करण्यात आले. हे नकाशे १ : ८६,४०० या प्रमाणावर तयार केले असून त्यांत भूमिस्वरूपे हॅच्युअर्सनी म्हणजे तुटक तुटक रेषांनी दाखविली आहेत.

या सुमारास विल्यम रॉय याने एका इंचास एक हजार गज या प्रमाणावर स्कॉटलंडचा नकाशा तयार केला. ब्रिटिश संग्रहालयात तो नकाशा जपून ठेवला आहे. तत्कालीन नकाशांच्या तुलनेत तो एक अप्रतिम नकाशा आहे. पुढे रॉयने ब्रिटनचे त्रिकोणांकित सर्वेक्षण थियोडोलाईटच्या साहाय्याने करून ब्रिटनचा एक उत्कृष्ट नकाशा तयार केला. त्याच्या मृत्युनंतर त्याने उपयोगात आणलेली सर्वेक्षण पद्धत ब्रिटनच्या लष्करी साहित्य खात्याच्या मंडळाने अंमलात आणली व नकाशे तयार केले. ते लष्करी साहित्य मंडळाने तयार केलेले नकाशे म्हणून प्रसिद्ध आहेत.


अर्वाचीन नकाशे : नकाशाच्या प्रमाणानुसार अर्वाचीन नकाशांचे तीन मुख्य प्रकार आहेत. (१) नकाशासंग्रहातील नकाशे—या नकाशांचे प्रमाण सर्वसाधारणपणे १ : ६,३३,६०० पेक्षा मोठे असते. (२) सखोल नकाशे—या नकाशांचे प्रमाण १ : ६३,३६० पेक्षा मोठे असते. (३) स्थलवर्णनविषयक नकाशे.

(१) नकाशासंग्रहातील नकाशे : सोळाव्या शतकात जेव्हा तांब्याच्या तबकडीवर खोदकामास सुरुवात झाली आणि नकाशांचे मुद्रण सुरू झाले, तेव्हा मुद्रित नकाशांची संख्या वाढू लागली. त्यावेळी नकाशांच्या संग्रहाला विशेष असे नाव नसे. ऑर्तीलिअसने थिएट्रम नावाचा नकाशासंग्रह सर्वप्रथम प्रसिद्ध केला. त्याचे इंग्रजी भाषांतर थिएटर ह्या नावाने झाले. इतर नकाशासंग्रह जिऑग्रॅफिया, सेक्यूलम, कॉस्मोग्रॅफिया या नावांनी प्रसिद्ध झाले. मर्केटरने तयार केलेल्या नकाशासंग्रहाला ‘ॲटलास’ असे नाव दिले, ते आजतागायत चालूच आहे.

अर्वाचीन नकाशासंग्रह निरनिराळ्या आकारांत प्रसिद्ध झाले आहेत. या संग्रहांतील नकाशांत व इतर नकाशांत जो भेद आढळतो, तो त्यात वापरलेल्या प्रमाणात दिसून येतो. संग्रहातील नकाशांत फार मोठे प्रमाण क्वचितच वापरले जाते. जगाचे नकाशे साधारणपणे १ : २२५ दशलक्ष किंवा एका इंचास तीन ते चार हजार मैल या लघुप्रमाणावर काढलेले असतात. त्यामुळे नकाशात दाखविलेला मोठा भूप्रदेश कमी जागी दाखविला जाऊन त्या प्रदेशासंबंधी तपशीलवार माहिती त्यात देणे अशक्य होते. भूप्रदेशाचा चढ-उतारही केवळ स्थूलमानाने त्यात दाखविता येतो. अशा रीतीने या नकाशात काही अडचणी निर्माण होतात.

पण ह्या नकाशांपासून इतरही काही फायदे होतात. त्यांच्या मदतीने एकाच दृष्टिक्षेपात सबंध खंडामध्ये आढळणारे पर्जन्यमान, तपमान, खनिजे, नैसर्गिक वनस्पती इ. गोष्टींची वाटणी कशी झाली आहे, ह्याची कल्पना करता येते.

या नकाशात सांकेतिक रंगपद्धतीचा उपयोग करण्यात येतो. प्राकृतिक नकाशात सखल प्रदेश हिरव्या रंगात व उंच प्रदेश तपकिरी रंगात दाखवला जातो. पर्जन्यमानाच्या नकाशात जास्त पावसाचा प्रदेश निळ्या किंवा जांभळ्या रंगात दाखवला जातो. पावसाचे प्रमाण कमी झालेले दाखविताना रंगाच्या छटा बदलत जाऊन शेवटी अगदी कमी पावसाचे प्रदेश पिवळ्या किंवा तपकिरी रंगाने दाखवितात. नैसर्गिक वनस्पतींच्या नकाशात जंगले हिरव्या रंगाने, गवताळ प्रदेश पिवळ्या रंगाने आणि खुरट्या वनस्पतींचे प्रदेश तपकिरी रंगाने दाखविलेले असतात. या रंगपद्धतीच्या साहाय्याने नकाशावाचन करणे सुलभ जाते.

या नकाशात दाखविलेला प्रादेशिक विस्तार बराच मोठा असल्याने पृथ्वीच्या वक्राकार पृष्ठभागाचाही विचार नकाशावाचन करताना करावा लागतो. त्यासाठी नकाशात वापरलेल्या प्रक्षेपणाबद्दलही आपल्याला अधिक माहिती करून घ्यावी लागते. ती नसल्यास नकाशातील दाखविलेले मार्ग, निरनिराळ्या विभागांचे तुलनात्मक क्षेत्रफळ अंतरे आणि दिशा यांबद्दल चुकीची कल्पना निर्माण होते.

(२) सखोल नकाशे : ज्या नकाशांचे प्रमाण एका इंचास एक मैलापेक्षा मोठे असते, म्हणजे एका इंचात १ मैलापेक्षा कमी अंतर दाखविलेले असते, त्यांना सखोल नकाशे म्हणतात. ब्रिटनमध्ये सहा इंचांस एक मैल या प्रमाणावर सर्व प्रदेशांचे नकाशे तयार केले गेले असून त्याच्या बऱ्याचशा भागाचे नकाशे २५ इंचांस एक मैल या प्रमाणावरही तयार केलेले आहेत. संयुक्त संस्थानांत अशा प्रकारचे नकाशे तयार करण्याचे काम भूशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या स्थलवर्णन शाखेतर्फे केले जाते. त्याशिवाय समुद्रकिनारा आणि भूमापन संस्थेतर्फे अशा प्रकारचे नकाशे तयार केले जातात. दोन इंचांस एक मैल या प्रमाणावरही अमेरिकेच्या प्रमुख भूमिकार्यालयाने शहरांचे आणि गावांचे नकाशे तयार केले आहेत. त्यांत सांस्कृतिक गोष्टी दाखविलेल्या असतात पण समोच्च रेषा दाखविलेल्या नसतात. यांशिवाय याच प्रमाणावर तयार केलेल्या इतर नकाशांत मात्र समोच्च रेषा दाखविण्यात येऊन त्या प्रदेशाची भूरचना, भूमिस्वरूपे, खनिजांचे साठे इ. गोष्टी दाखविलेल्या असतात. काही नकाशे आणखी मोठ्या प्रमाणावर (१ : १०,००० किंवा १ : २०,०००) काढलेले आहेत. 

नकाशाला मोठे प्रमाण वापरून सबंध देशाचे नकाशे तयार करणे फारच खर्चाचे असते. म्हणून हे काम सर्वसाधारणपणे त्या त्या देशाच्या सरकारकडून केले जाते. खाजगी संस्थांनी तयार केलेल्या नकाशांपेक्षा या नकाशांत अधिक सुसज्‍जता आणि सुसंबद्धता आढळते. हे नकाशे तयार झाले, की त्यांचा उपयोग नगररचनेच्या योजना, वाहतुकीच्या साधनांचा विकास, पाणीपुरवठा योजना इ. अनेक गोष्टींसाठी केला जातो. तसेच त्यांचा उपयोग आधारभूत नकाशे म्हणून इतरही अनेक प्रकारचे नकाशे (उदा., भूस्तररचना, मृदाप्रकार इ.) तयार करण्यासाठी केला जातो.


सखोल नकाशांचे प्रमाण १ : १,२५० (५०·७ इंचांस १ मैल किंवा ८० सेंमी.स १ किमी.) पासून ते १ : ३१,६८० (२ इंचांस १ मैल किंवा सु. ३·१६ सेंमी.स १ किमी.) असते. सर्वसाधारणपणे ५० इंचांस किंवा २५ इंचांस १ मैल अथवा ७९ सेंमी.स किंवा ३९·५ सेंमी. स १ किमी. किंवा ८० सेंमी. स अथवा ४० सेंमी. स १ किमी. या प्रमाणावरचे नकाशे अधिक सखोल समजले जातात.

ब्रिटिश सैनिकी खात्याच्या सर्वेक्षण संस्थेने तयार केलेले सखोल नकाशे : दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभापर्यंत फक्त सहा इंची व २५ इंची सखोल नकाशे तयार केलेले होते. ६ इंची नकाशे (६ इंचांस १ मैल) एकूण पंधरा हजार असून प्रत्येकी ६ चौरस मैलाचा प्रदेश दाखवितात.

हल्लीच्या योजनेनुसार ब्रिटनच्या सैनिकी सर्वेक्षण खात्याने खालील प्रकारचे नकाशे तयार करावयाचे ठरविले आहे : (१) ६ इंची (६ इंचांस १ मैल) सखोल नकाशांवर संर्दभरेषांची जाळी दाखवून आणि त्या दाखविलेल्या प्रदेशाचे त्रिकोणांकित सर्वेक्षण करून आणि त्याप्रमाणे नकाशांत आवश्यक तो फेरबदल करून ते प्रसिद्ध करावयाचे. (२) नागरी क्षेत्राचे नकाशे : ५० इंचांस १ मैल या प्रमाणावर तयार करावयाचे आणि २५ इंची (२५ इंचांस १ मैल) नकाशे पुन्हा तयार करावयाचे. हे सर्व नकाशे चौकोनी आकाराचे व तिर्यक मर्केटर प्रक्षेपणावर केले जाणार आहेत. त्यांवर राष्ट्रीय संदर्भ जाळे दाखविण्यात येईल.

नागरी प्रदेशासाठी १ : १,२५० या प्रमाणावर जे नकाशे तयार होतील, त्यांच्या आधारे आणखी मोठ्या प्रमाणावर (१ : ५००) नकाशे तयार करावयाचे असा ब्रिटनच्या सैनिकी खात्याचा विचार आहे.

ब्रिटनच्या २५ इंची नकाशांची एकूण संख्या ५०,००० भरते. या नकाशांचे खरे प्रमाण २५·३४४ इंचांस १ मैल किंवा १ : २,५०० असे आहे. अशा नकाशांत जमिनीवरील अनेक बारीकसारीक गोष्टी दाखविणे शक्य होते. काही नकाशांचा उपयोग जमीनजुमला व त्यांच्या सरहद्दी दाखविण्यासाठीही केला जातो. अशा नकाशांना कॅडॅस्ट्रल नकाशे म्हणतात.

२५ इंची सखोल नकाशात जमिनीची उंची स्थलांकाने, बेंच मार्कने किंवा त्रिकोण पद्धतीने दाखविलेली असते. प्रत्येक नकाशात नकाशाची प्रत्येक बाजू जमिनीवरील १ किमी. लांबी दाखविते. जमिनीवरील भौगोलिक व सांस्कृतिक गोष्टी सांकेतिक चिन्हांनी व सांकेतिक अक्षरांनी दाखविलेल्या असतात. ६ इंची सखोल नकाशे २५ इंची नकाशांसारखेच असातात पण त्यांत तितकासा तपशील दिलेला नसतो, कारण तो दाखविणे शक्य नसते. मात्र जमिनीचा उंचसखलपणा, समोच्च रेषा व रंगपद्धती यांचा उपयोग करून दाखविला जातो. या नकाशांचा उपयोग स्थानिक भौगोलिक अभ्यास करण्यासाठी तसेच शहरातील सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते व लोहमार्ग यांच्या योजना, वीजतारांचे जाळे पसरविण्याच्या योजना इत्यादींसाठी केला जातो.

/इंचांस १ मैल (खरे प्रमाण १ : २५,००० म्हणजेच ४ सेंमी.स १ किमी.) ह्या प्रमाणावर ब्रिटनमध्ये नकाशे तयार होत आहेत. प्रत्येक नकाशात १० X १० किमी. एवढे क्षेत्र दाखविलेले असते. एकेक किमी. अंतरावर संदर्भरेषा काढलेल्या असतात. शिवाय समोच्च रेषा व रंगपद्धती यांचाही उपयोग केलेला आढळतो. मोकळ्या प्रदेशातील उंची बेंच मार्कने दाखविली जाते.

(३) स्थलवर्णनविषयक नकाशे : हे नकाशे काढण्याचा हेतू जमिनीवरील भौगोलिक आणि सांस्कृतिक गोष्टी कोठेकोठे व कशा प्रमाणात पसरल्या आहेत, हे दाखविणे हा असतो. अशा प्रकारचे नकाशे ब्रिटनच्या सैनिकी सर्वेक्षण खात्याने केले आहेत. त्या नकाशांना १ इंची नकाशे म्हणतात. कारण नकाशांचे प्रमाण १ इंचास १ मैल अथवा १ : ६३,३६० एवढे असते. संयुक्त संस्थानांतही हे नकाशे १ : ६२,५०० या प्रमाणावर केलेले आहेत. इतर काही देशांत अशाच प्रकारच्या तयार केलेल्या नकाशांचे प्रमाण १ : ५०,००० आहे. एक इंची नकाशे जमिनीचा उंचसखपणा समोच्च रेषांनी दाखवितात आणि इतर गोष्टी उदा., शहरे, गावे, लोहमार्ग, पाऊलवाटा, उद्याने, नदीवरचे पूल, जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या सरहद्दी इ. गोष्टी सांकेतिक चिन्हांनी अथवा संकेताक्षरांनी दाखवितात. ब्रिटन, भारत, संयुक्त संस्थाने, कॅनडा इ. देशांत अशा प्रकारचे नकाशे तयार केलेले आहेत.

(१) ब्रिटनच्या सैनिकी सर्वेक्षण खात्याने तयार केलेले नकाशे : हे नकाशे निरनिराळ्या प्रमाणांवर तयार केलेले असून ते लंडन येथील स्टेशनरी ऑफिसने प्रकाशित केले आहेत. ते ‘कॅटलॉग ऑफ स्मॉल स्केल मॅप्स’ मध्ये पहावयास मिळतात.


(अ) १ इंची नकाशे : हे नकाशे निरनिराळ्या प्रक्षेपणांवर तयार करण्यात येत आहेत. या नकाशांची सहावी आवृत्ती आता प्रसिद्ध झाली आहे. तीत प्रत्येक नकाशात संदर्भरेषांची जाळी दिली असून ४५ किमी. दक्षिणोत्तर लांबीचा आणि ४० किमी. पूर्व–पश्चिम लांबीचा प्रदेश दाखविला आहे. संदर्भरेषांच्या जाळीतील लहान चौकोनाची बाजू १ किमी. अंतर दाखविते. समोच्च रेषा जमिनीचा उंचसखलपणा दाखवितात व त्यांतील उंचीचे अंतर ५० फूट असते. रंगपद्धतीचा उपयोग नकाशांत केलेला असतो. अलीकडच्या काळात भूमिउपयोजन या संस्थेतर्फे सर्वेक्षण करून तयार केलेले १ इंची नकाशे विशेष उल्लेखनीय आहेत. त्या नकाशांत ब्रिटनच्या लहानसहान भागांतील अरण्ये, राने, शेतीच्या उपयोगी जमीन, गवताळ प्रदेश, ओसाड जमीन आणि पाणथळ इ. गोष्टी चांगल्या रीतीने दाखविल्या आहेत.

(ब) अर्धा इंची नकाशे : या नकाशांचे प्रमाण / इंचास १ मैल असते. या नकाशांत इतर गोष्टी १ इंची नकाशांसारख्याच दाखविलेल्या असतात. नकाशांतील समोच्च रेषांतर मात्र १०० फूट असते. नकाशांत रंगपद्धती व छायापद्धती या दोन्ही पद्धतींचा उपयोग केलेला असतो. सायकलने किंवा मोटारीने प्रवास करण्यासाठी व राज्यकारभारासाठी या नकाशांचा उपयोग होतो.

(क) पाव इंची नकाशे : या नकाशांचे प्रमाण / इंचास १ मैल किंवा १ इंचास ४ मैल इतके असते. नकाशांतील समोच्च रेषांतर २०० फूट असते. रंगपद्धतीचा उपयोगही नकाशांत केला जातो, पण प्रदेशाचे तपशीलवार दर्शन या नकाशांत मिळत नाही. याच प्रमाणावर तयार केलेले मुलकी वायुमार्गाचे नकाशे उल्लेखनीय आहेत. या नकाशांत विमानातून दिसणाऱ्या गोष्टी (उदा., रस्ते, लोहमार्ग, नद्या इ. गोष्टी) शिवाय विमानतळ दाखविलेले असतात. जमिनीचा उंचसखलपणा त्यांत फारसा दाखविला जात नाही, पण ज्यामुळे विमानाला धोका पोहोचू शकेल अशी उंच टेकडी, पर्वत वा जमिनीचा कोणताही उंच भाग हा जांभळ्या रंगाने दाखविलेला असतो.

(ड) दहा मैल नकाशे : या नकाशांचे प्रमाण १ इंचास १० मैल इतके लहान असते. या नकाशांत लहानलहान शहरे व गावे ठिपक्याठिपक्यांनी दाखविलेली दिसतात. छायापद्धतीचा उपयोग उंचसखलपणा दाखविण्यास व रंगपद्धतीचा उपयोग इतर गोष्टी दाखविण्यासाठी केला जातो. या नकाशांचा उपयोग मुख्यत्वेकरून मोटार प्रवासासाठी होतो.

(२) संयुक्त संस्थानांचे नकाशे : या देशातील प्रचलित नकाशांचे प्रमाण १ : ६२,५०० असून प्रत्येक नकाशा १५′ रेखांश X १५′ अक्षांश एवढे क्षेत्र दाखवितो. त्यांत समोच्च रेषा तपकिरी रंगात काढल्या असून जल व हिमस्वरूपे निळ्या रंगाने आणि इतर तपशील काळ्या रंगाने दाखविलेला असतो. भूरचनेनुसार नकाशांतील समोच्च रेषांतर ५ फूट ते १०० फूट असते. कमी महत्त्वाचे प्रदेश मात्र लहान प्रमाणावर (१ : १,२५,०००) काढलेल्या नकाशांत दाखविले असून विविध प्रकारचे काही नकाशे यापेक्षाही लहान प्रमाणावर (१ : ५,००,०००) काढले आहेत. अशा नकाशांत वायुमार्गांचे विभागीय नकाशे विशेष उल्लेखनीय असून ते १ इंचास ८ मैल या प्रमाणावर काढले आहेत. अशा नकाशांत भूमिस्वरूपांचा तपशील मात्र दिलेला नसतो. छायाचित्रण पद्धतींचा उपयोग हे नकाशे तयार करताना विशेषेकरून केलेला असतो. संयुक्त संस्थाने व कॅनडा या देशांतील बऱ्याचशा नकाशांच्या मलपृष्ठांवर नकाशांतील प्रदेशांचे छायाचित्र दिलेले असते, ही एक उल्लेखनीय बाब आहे.

(३) कॅनडाचे नकाशे : कॅनडात भूसर्वेक्षण अजूनही पूर्ण झालेले नाही. पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील बऱ्याचशा प्रदेशांचे सर्वेक्षण ‘द टोपोग्रॅफिकल अँड एअर सर्व्हे ब्यूरो’ या संस्थेतर्फे चालू आहे. आकाशछायाचित्रणाचाही त्या कामी उपयोग जात असून १ इंची, अर्धा इंची, पाव इंची व / इंची नकाशे तयार केले जात आहेत.

(४) ऑस्ट्रेलियातील नकाशे : ऑस्ट्रेलियाच्या लष्करी विभागातर्फे त्या विभागाच्याच उपयोगासाठी १ इंची नकाशे तयार केले आहेत. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर काही महत्त्वाच्या प्रदेशांचे पाव इंची व / इंची नकाशे तयार केलेले आढळतात. इतरही सरकारी खात्यांनी काही नकाशे तयार केले आहेत पण ते केवळ स्थानीय महत्त्वाचे आहेत.

(५) दक्षिण आफ्रिकेच्या संघराज्याचे भूसर्वेक्षण व आकाश-छायाचित्रण पूर्ण झाले असून नकाशे तयार करण्याचे काम चालू आहे.

(६) न्यूझीलंडमध्ये सर्व भागांचे सर्वेक्षण अजून पूर्ण झालेले नाही, तरीपण महत्त्वाच्या सर्व भागांचे भूसर्वेक्षण व आकाश-छायाचित्रण पूर्ण झालेले आहे.


(७) फ्रान्समधील The Carte Ge’ome’trique de la France चे १८२ नकाशे १ : ८६,४०० या प्रमाणावर काढले आहेत. आॅस्ट्रियाचे १ : २८,००० या प्रमाणावर तयार केलेले नकाशे तसेच त्यांवर आधारलेले विशेष नकाशे (Spezia karte, १ : ७५,०००) हे यूरोपमधील फार उत्तम नकाशे समजले जातात. जर्मनीचे १ : १,००,००० या प्रमाणावरील नकाशे (Reichskarte) जगप्रसिद्ध आहेत.

(८) भारतीय सर्वेक्षण संस्थेने तयार केलेले नकाशे : इ. स. १७६७ मध्ये लॉर्ड क्लाइव्हने मेजर जेम्स रेनल यांची बंगालचा प्रमुख सर्वेक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली आणि तेव्हापासूनच या देशात खऱ्या अर्थाने सर्वेक्षणास व त्याबरोबर नकाशे प्रसिद्ध करण्यात सुरुवात झाली. रेनलपूर्वी १७१९ मध्ये बूशे या फ्रेंच मिशनऱ्याने १७२३ मध्ये दलील या फ्रेंच भूगोलज्ञाने, मॅनव्हिल या फ्रेंच नाविकाने व इतरही काही लोकांनी हिंदुस्थानच्या प्रदेशांचे नकाशे तयार केले होते. त्यांचा उपयोग करून आंव्हील याने १७३७ मध्ये आपला दक्षिण भारताचा पहिला नकाशा तयार केला. प्रवाशांनी वर्णिलेले मार्ग आणि किनाऱ्याचा ढोबळ आराखडा यांवरून त्याने १७५२ मध्ये हिंदुस्थानचा पहिला विश्वासार्ह नकाशा प्रसिद्ध केला. हिंदुस्थानातील ब्रिटिशांकित प्रदेशांचे नकाशे तयार करण्याच्या कामास मात्र लॉर्ड क्लाइव्ह यानेच जोराची चालना दिली. रेनलने भारताचा १ इंचास १° या प्रमाणावर इ. स. १७८३ मध्ये नकाशा तयार केला. त्या नकाशाची दुसरी व तिसरी आवृत्ती अनुक्रमे १७८८ व १७९३ साली प्रसिद्ध झाली. त्याशिवाय त्याने बंगाल, बिहार, अयोध्या, अलाहाबाद, आग्रा (काही भाग) आणि दिल्ली या तत्कालीन प्रांतांचे नकाशे तयार केले. इ. स. १८०२ मध्ये त्रिकोणांकित सर्वेक्षणाचे काम मद्रासमध्ये हाती घेण्यात आले व पुढे ते पूर्ण करण्यात आले. भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश व त्यांच्या शेजारच्या प्रदेशांचे भूसर्वेक्षण झालेले आहे. इ. स. १९०५ मध्ये भारत सरकारच्या आदेशानुसार या संस्थेने अर्वाचीन स्थलवर्णानात्मक नकाशे तयार करण्यात सुरुवात केली. त्यात बरेच यशही मिळविले. या संस्थेने आतापर्यंत १ इंची, अर्धा इंची, पाव इंची नकाशे तयार केले आहेतच, पण त्यांशिवाय मोठ्या व महत्त्वाच्या शहरांचे व लष्करी ठिकाणांचे मार्गदर्शक नकाशे तयार केले आहेत. याशिवाय १ लक्ष चौरस मैल प्रदेशाचे आकाश-छायाचित्रण केलेले आहे.

इ. स. १९०५ पर्यंत या संस्थेने महसूल क्षेत्र दाखविणारे मोठ्या प्रमाणावरचे नकाशे व स्थलवर्णनात्मक लहान प्रमाणावरचे साधे नकाशे तयार केले होते. त्यानंतरचे नकाशे त्रिकोणांकित सर्वेक्षणावर आधारलेले, रंगीत, समोच्च रेषांकित असून त्यांत छायाचित्रण पद्धतीचाही उपयोग केलेला आहे. प्रमुख आधारभूत नकाशा १ : १० लक्ष या प्रमाणावर तयार केला असून त्यात प्रत्येकी ४° X ४° क्षेत्र दाखविलेले असते. अशा प्रत्येक भागाचा (१° X १° क्षेत्राचा) नकाशा पाव इंचास १ मैल या प्रमाणावर काढला आहे. या मोठ्या प्रमाणावर तयार केलेल्या नकाशातील क्षेत्राचे पुन्हा १६ भाग पाडले असून त्या प्रत्येक भागाचा (१५′ X १५′ क्षेत्राचा) नकाशा १ इंचास १ मैल या प्रमाणावर तयार केला आहे. सर्व नकाशे पॉलिकॉनिक प्रक्षेपणावर काढलेले आहेत. अलीकडे मेट्रिक परिमाणांचा वापर करून नवीन नकाशे तयार केले जात आहेत.

जगाचा आंतरराष्ट्रीय नकाशा : सर्व राष्ट्रांनी मिळून जगाचा एक आंतरराष्ट्रीय नकाशा तयार करावा व त्याचे प्रमाण १ : १ दशलक्ष असे असावे आणि या नकाशाची स्वतंत्र अशी पद्धत असावी, असे इ. स. १८९१ साली ठरविण्यात आले. या योजनेनुसार सु. १,५०० नकाशे तयार होतील आणि प्रत्येक नकाशात साधारणपणे ६° रेखांश X ४° अक्षांश इतके क्षेत्र दाखविले जाईल. ६०° अक्षवृत्तापलीकडील देशांत या नकाशांचा पूर्व-पश्चिम विस्तार १२° पर्यंत ठेवावा. नकाशांत सुधारलेले पॉलिकॉनिक प्रक्षेपण वापरावे, असेही सर्व देशांमध्ये ठरले. आपापल्या प्रदेशांचे नकाशे त्या त्या देशांनी करावे असेही ठरले. या योजनेनुसार आतापर्यंत सु. तीनशेवर नकाशे तयार झाले आहेत.

वर उल्लेखिलेल्या नकाशांच्या प्रमुख प्रकारांशिवाय एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे राष्ट्रीय ॲटलास हा होय. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस राष्ट्रीय ॲटलासची निर्मिती सुरू झाली. हा ॲटलास एका राष्ट्रीय योजनेचाच भाग होय. त्यात त्या देशासंबंधी माहिती (उदा., भूरचना, हवामान, मृदांचे प्रकार, आर्थिक उत्पन्ने, समाजस्वास्थ्य आणि इतर सामाजिक परिस्थिती) दाखविणारे नकाशे-आकृती, रेखाचित्रे दिलेली असतात. या ॲलटासच्या साहाय्याने त्या त्या देशांचा भौगोलिक अभ्यास करणे सुलभ जाते. फिनलंड, स्वीडन, स्कॉटलंड, फ्रान्स, चेकोस्लोव्हाकिया इ. देशांनी तयार केलेले राष्ट्रीय ॲटलास फार चांगल्या प्रकारचे आहेत. १९३७ मध्ये रशियाने प्रसिद्ध केलेला ॲटलास (द ग्रँड सोव्हिएट ॲटलास) विशेष उल्लेखनीय आहे. संयुक्त संस्थानांत तयार झालेला ‘अमेरिकन ‍ॲटलास ऑफ ॲग्रिकल्चर’ याच सदरात मोडतो. भारतात नैसर्गिक संपत्ती व शास्त्रीय संशोधन या केंद्र सरकारच्या खात्यांतर्फे राष्ट्रीय ॲटलास तयार करण्याचे ठरविले गेले. यासाठी एक संस्था (नॅशनल ॲटलास ऑर्गनायझेशन) कलकत्ता विद्यापीठात डॉ. एस्. पी. चतर्जी यांच्या संचालनाखाली स्थापन करण्यात आली. या संस्थेने भारतीय नॅशनल ॲटलास प्रसिद्ध केला आहे.


आकाश-छायाचित्रण : विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विमानातून भूप्रदेशाच्या काढलेल्या छायाचित्रणामुळे नकाशा-शास्त्रात बरीच सुधारणा घडून आली. आतापर्यंत प्रदेशाचे सर्वेक्षण त्रिकोणांकित सर्वेक्षण पद्धतीने व इतर पद्धतींनी करावे लागे. या पद्धती फार खर्चिक व फार कष्टाच्या आहेत. जंगले आणि दलदलींच्या दुर्गम भागांत तर या पद्धतींनी सर्वेक्षण करण्यास फार कठीण जाते. विमानातून छायाचित्र घेऊन प्रदेशाचा तपशील बनविणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे वेळेत आणि खर्चातही बचत झाली आहे. आकाशातून घेतलेल्या छायाचित्रात समोच्च रेषा यंत्राच्या साहाय्याने काढता येतात.

नकाशा तयार करणाऱ्या संस्था : या संस्था दोन प्रकारच्या आहेत—खाजगी आणि सरकारी. अमेरिकेतील जनरल लँड ऑफिस ही सरकारी संस्था होय. तसेच इ. स. १८७८ साली स्थापिलेली यू. एस्. जिऑलॉजिकल सर्व्हे ही दुसरी सरकारी संस्था आहे. अमेरिकन जिऑग्रॅफिकल सोसायटी (स्थापना इ. स. १८७२) व नॅशनल जिऑग्रॅफिक सोसायटी (वॉशिंग्टन) या दोन महत्त्वाच्या खाजगी संस्थांनी अतिशय उत्कृष्ट नकाशे तयार केले आहेत. एकोणिसाव्या शतकात जर्मनीत अनेक खाजगी संस्थांनी नकाशे प्रसिद्ध केले. त्यांपैकी उल्लेखनीय जिऑग्रॅफिकल इन्स्टिट्यूट ऑफ युस्टुस पेर्टेस इन् गॉथ या संस्थेने तयार केलेले नकाशे सुप्रसिद्ध आहेत. ब्रिटनमधील रॉयल जिऑग्रॅफिक सोसायटीने तयार केलेले नकाशे प्रसिद्ध आहेतच, पण त्यांशिवाय बारथॉलोम्यू, जॉर्ज फिलिप यांनी तयार केलेले नकाशे प्रसिद्ध आहेत. टाइम्स ॲटलासमधील नकाशे पाच खंडांत प्रसिद्ध झाले आहेत, नकाशांचे वर्गीकरण त्यांत दिलेल्या माहितीनुसार केल्यास नकाशांचे विविध प्रकार आढळतात. त्यांपैकी काही महत्त्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

(अ) प्राकृतिक नकाशे : या नकाशांत जमिनीचा उंचसखलपणा निरनिराळ्या पद्धतींनी दाखविलेला असतो. नद्यांचे प्रवाह, प्रदेशांच्या सरहद्दी, महत्त्वाची स्थाने या गोष्टी दिलेल्या असतात.

(ब) राष्ट्रीय नकाशे : या नकाशांत एखादा खंड, देश, प्रांत किंवा तत्सम एखादा राजकीय विभाग दाखविला जातो. या विभागाच्या सरहद्दी सांकेतिक रेषांनी तसेच त्या विभागातील प्राकृतिक आणि सांस्कृतिक गोष्टी निरनिराळ्या पद्धतींनी दाखविलेल्या असतात.

(क) सांख्यिकीय नकाशे : निरनिराळ्या भौगोलिक घटकांची आकडेवार माहिती गोळा करून तिच्या पार्श्वभूमीवर त्या प्रदेशातील सामाजिक, आर्थिक जीवनाच्या निरनिराळ्या बाजू या नकाशांत दाखविलेल्या असतात. नकाशांत एखाद्या प्रदेशातील कृषी, उद्योगधंदे, व्यापार, दळणवळणाचे मार्ग, लोकसंख्येची वाटणी इ. गोष्टी दाखविल्या जातात.

(ड) यांशिवाय भूस्तर नकाशे : स्थलवर्णनदर्शक नकाशे, नगर नकाशे, जमीनजुमला दाखविणारे नकाशे, जलपर्यटन व आकाशपर्यटन करण्यास उपयुक्त असे जलपट हे विशेष नकाशे होत. त्यासंबंधीची काही माहिती वर आलेली आहेच. निरनिराळ्या देशांत रोज ठराविक वेळेला त्या देशात आढळणाऱ्या वातावरणाच्या स्थितीची माहिती देणारे नकाशे (हवामान दर्शक) प्रसिद्ध होतात. हेही नकाशे याच सदरात मोडतात.

नकाशांचे उपयोग : नकाशांचे अनेक उपयोग आहेत. त्यांच्यामुळे एखाद्या भूप्रदेशाची भोगौलिक माहिती तर मिळतेच पण त्याबरोबरच त्या त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यांसंबंधी योजना तयार करण्यास त्यांचे फार साहाय्य होते. धरणे कोठे बांधावीत, नद्यांवर पूल कोठे उभारावेत, रस्ते कोणत्या दिशेने तयार करावेत इ. गोष्टी नकाशांच्या साहाय्यानेच कळतात. युद्धकाळात तर नकाशांसारखे दुसरे कोणतेही चांगले साधन नाही. शत्रू-प्रदेशातील भूरचना व शत्रू सैन्याची मांडणी या दोन्हीही गोष्टी माहित झाल्यास शत्रूशी युद्ध करणे केव्हाही फायद्याचे ठरते. एका अर्थाने नकाशे म्हणजे विविध ज्ञानांचे भांडार आहे. मात्र त्यांचा अभ्यास करून त्यांपासून बोध घेणे, हे मनुष्याच्या हातात आहे.

संदर्भ 1. Birch, J. W. Maps Topographical and Statistical, London, 1960.

         2. Crone, G. R. Maps and Their Makers, London, 1964.

         3. Raisz, Erwin, Principles of Cartography, Tokyo, 1962.

         4. Raisz, Erwin, General Cartography, Cambridge, Massachusetts, 1948.

वाघ, दि. मु.

नकाशा