हेग : द हेग. नेदर्लंड्समधील तिसऱ्या क्रमांकाचे निसर्गरम्य शहर.येथे दक्षिण हॉलंड प्रांताची राजधानी, डच राजघराण्याचे १९४८ पर्यंतचे निवासस्थान आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्याचे डच भाषेत अधिकृत नाव स्क्रॉव्हनहॉग (शाही कुंपण) असून सांप्रत नेदर्लंड्सचे ते शासकीय मुख्यालय आहे. त्याची लोकसंख्या अंदाजे ५,१०,९०९ (२०१४) होती. ते नैर्ऋत्य किनारवर्ती मैदानी प्रदेशात उत्तर समुद्रापासून सहा किमी.वर अंतर्गत प्रदेशात अन्य डच शहरांच्या तुलनेत समुद्रसपाटीपासून उंचीवर वसले आहे. 

 

पीस पॅलेस (आंतरराष्ट्रीय न्यायालयाची वास्तू)
 

हेग हे मूलतः १२४२ मध्ये हॉलंडच्या उमरावाचे निवासस्थान होते. तत्पूर्वी दुसऱ्या विल्यमने तिथे किल्ला बांधला (१२४९). त्याचे अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. या किल्ल्याभोवतीच प्रथम नगराचा विस्तार झाला. मध्ययुगात स्पेनच्या हॅप्सबर्ग राजवटीस डचांनी प्रतिकार केला. पहिला विल्यम याने हेग येथे १५५९ मध्ये राजधानी केली. त्याच्या मॉरिस या मुलाच्या कारकिर्दीत स्टेट्स जनरल (प्रतिनिधिगृह) व डच वसाहतींचा कारभार हेग येथून चालत असे (१५८५). मॉरिसने शहराभोवती अनेक कालवे खोदले. सतराव्या शतकात डच प्रजा-सत्ताकामुळे हेग हे अनेक यूरोपीय घडामोडींचे केंद्र बनले. हॉलंड १७९५–१८०८ दरम्यान फ्रेंचांच्या नियंत्रणाखाली असताना त्यांची राजधानी हेग येथे होती. फ्रेंचांपासून स्वतंत्र झाल्यानंतर १८१५–३० दरम्यान नेदरर्लंड्सच्या संसदेच्या सभा हेग व ब्रूसेल्स येथे आळीपाळीने होत असत. पुढे डच ईस्ट इंडिज कंपनीने हेगच्या विकासात मोलाची भर घातली (१८५०). वसाहतींच्या संघर्षास पायबंद घालण्यासाठी विसाव्या शतकात येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली. १८९९ व १९०७ मध्ये हेग येथे आंतरराष्ट्रीय शांतता परिषदांचे आयोजन करण्यात आले. हेग शहराचा विकास झाला आणि स्केव्हनिंजन, राईसव्हाइक, व्होअरबर्ग यांसारखी उपनगरे निर्माण झाली. स्केव्हनिंजन हे मच्छीमारीसाठी प्रसिद्ध आहे. आरोग्यधाम म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने ते पादाक्रांत केले (१९४०) आणि स्केव्हनिंजन येथे संरक्षण फळी उभारली. दोस्त राष्ट्रांनी त्यावर अनेकदा बॉम्ब वर्षाव करून जर्मनांना हाकलून लावले (१९५०) पण त्यात शहराचे अपरिमित नुकसान झाले. 

 

हेग येथे फार कमी प्रमाणात अवजड उद्योग आहेत. व्यापार, बँकिंग, विमा व इतर सेवा हे येथील व्यापारी संस्थांचे मुख्य कार्य होय. याशिवाय शहरात इलेक्ट्रॉनिक्स, अन्नप्रक्रिया, सिरॅमिक उत्पादन, फर्निचर, काच, चैनीच्या विविध वस्तू, छपाई व प्रकाशन इ. उद्योग चालतात. येथे अनेक मोठ्या तेल कंपन्यांची मुख्यालये आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांचे हेग हे प्रमुख केंद्र असून परराष्ट्रीय राजदूतवासांची कार्यालये येथे आहेत. 

 

हेग हे निसर्गरम्य शहर असून रस्त्यांच्या दुतर्फा झाडी आहे. शहरात किल्ल्याच्या प्रांगणात (बिन्नेनहॉफ) कृत्रिम सरोवर (१३५०), नाइट्स हॉल (संसद भरते ते सभागृह) व काही जुन्या इमारती आहेत. तसेच सेंट जॅकोब्ज चर्च (१३९९), शाही राजप्रासाद (ह्यूस टेन बॉश-१६४०), न्यू चर्च (१६५४), नगर सभागृह, पीस पॅलेस (आंतरराष्ट्रीय न्यायालयाची वास्तू) इ. आहेत. यांशिवाय शहरात अनेक वस्तुसंग्रहालये असून त्यांपैकी शाही चित्रवीथी (मॉरित्शूईस – १६३३-३४) थोर चित्रकारांच्या कला-कृतींसाठी प्रसिद्ध आहेत. ब्रेडियस म्यूझीयम (प्राचीन चित्रांसाठी), क्रोलर म्यूलर म्यूझीयम (व्हिन्सेंट गॉख व आधुनिक चित्रकारांच्या कलाकृती), कॉश्‍च्युम म्यूझीयम, मेसदाग म्यूझीयम इ. संग्रहालये असून रॉयल ग्रंथालयात दुर्मिळ व जुन्या पुस्तकांचा व दस्तऐवजांचा तसेच हस्तलिखितांचा मोठा संग्रह आढळतो. हेगमध्ये अनेक कला व संगीत अकादमी असून त्यांपैकी द हेग फिलहॉर्मोनिक ऑर्केस्ट्रा ख्यातनाम आहे. शहरात अनेक उद्याने व क्रीडांगणे आहेत. 

येळणे, नारायणराव