सायप्रस : भूमध्य समुद्रातील एक प्रजासत्ताक देश. भूमध्य सागरी भागातील सिसिली व सार्डिनियानंतरचे हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. भूमध्य समुद्राच्या ईशान्य भागात असलेले हे बेट तुर्कस्तानच्या दक्षिणेस ६४ किमी., सिरियाच्या पश्चिमेस ९७ किमी., तर ईजिप्तच्या उत्तरेस ४०२ किमी. आहे. अक्षवृत्तीय विस्तार ३४° ३०’ उ. ते ३५° ४५’ उ. अक्षांश व रेखावृत्तीय विस्तार ३२° १५’ पू. ते ३४° ३०’ पू. रेखांश असा आहे. सायप्रस बेटाचा उत्तर-दक्षिण विस्तार ९७ किमी. व पूर्व-पश्चिम विस्तार २२५ किमी. आहे. बेटाच्या किनाऱ्याची एकूण लांबी ७८२ किमी. आहे. सायप्रसचे एकूण क्षेत्रफळ ९,२५१ चौ. किमी. व लोकसंख्या ८,८२,००० (२०१०अंदाज) आहे. प्रशासकीय दृष्ट्या सायप्रसचे रिपब्लिक ऑफ सायप्रस (ग्रीक सेक्टर) व टर्किश रिपब्लिक ऑफ नॉर्दर्न सायप्रस-टीआर्एन्सी (तुर्की सेक्टर) असे दोन भाग आहेत. अट्टीला लाइन किंवा ग्रीन लाइनच्या उत्तरेकडील प्रदेश तुर्की सायप्रस होय. टर्किश रिपब्लिक ऑफ नॉर्दर्न सायप्रस विभागाचे क्षेत्रफळ ३,३३५ चौ. किमी. व लोकसंख्या २,५६,६४४ (२००६) आहे. निकोसीआ (लोकसंख्या ३,१०,९००–२००७ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. निकोसीआमधीलच लेफकोसा भागात तुर्की सायप्रसची राजधानी आहे.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या सायप्रसचे उत्तरेकडून दक्षिणेकडे चार विभाग पडतात. कायरीन्या पर्वत (लांबी १६० किमी.) बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर आणि कार्पास द्वीपकल्पावर पसरला आहे. या चुनखडीयुक्त अरुंद पर्वतश्रेणीची सरासरी उंची ९०० मी. पेक्षा अधिक आढळत नाही. बेटाच्या नैर्ऋत्येकडील सुमारे निम्मा भाग ट्रॉऑदॉस गिरिपिंडाने व्यापलेला असून त्यात मौंट ऑलिंपस (मौंट ट्रॉऑदॉस) या देशातील सर्वोच्च (१,९५१मी.) शिखराचा समावेश होतो. हे दोन पर्वतीय प्रदेश १२९ किमी. लांबी व २४ ते ४८ किमी. रुंदीच्या मेसाओरिअन या मध्यवर्ती सुपीक मैदानी प्रदेशाने अलग केले आहेत. बेटाचा आग्नेय भाग उंच पठारी प्रदेशाने व्यापला असून हे पठार किनाऱ्यावरील सुपीक मैदानी प्रदेशात विलीन झाले आहे. मेसाओरिया मैदानात गाळाची सुपीक मृदा आढळते. तांबे, क्रोमाइट, जिप्सम, लोह, पायराइट, ॲस्बेस्टस या खनिजांचे साठे येथे आहेत.

बेटावरील सर्व प्रमुख नद्या ट्रॉऑदॉस उच्चभूमी प्रदेशात उगम पावतात. पीद्यास ही देशातील सर्वांत मोठी नदी पूर्वेकडे फामागूस्टा उपसागराकडे वाहत जाते. कारयोटी नदी पश्चिमेकडे मॉरफू उपसागराकडे, तर काउरिस नदी दक्षिणेकडील एपीस्कोपी उपसागराकडे वाहत जाते. प्रत्येक नदी वर्षातील काही काळ कोरडी पडते.

सायप्रसचे हवामान भूमध्य सागरी प्रकारचे असून उन्हाळे उष्ण व कोरडे तर हिवाळे सौम्य व आर्द्र असतात. जुलै-ऑगस्टमध्ये कमाल तापमान ४४·५° से. पर्यंत वाढते. हिवाळ्यातील किमान तापमान पर्वतीय प्रदेशात −५·५° से. पर्यंत खाली जाते. या काळात तेथे हिमवृष्टीही होते. मेसाओरिअन मैदानी प्रदेशातील निकोसीआ येथील वार्षिक सरासरी तापमान १९° से. असते. वार्षिक सरासरी वृष्टिमान ५० सेंमी.असून निम्म्यापेक्षा अधिक वृष्टी हिवाळ्यात, तर एक अष्टमांशपेक्षा कमी वृष्टी उन्हाळ्यात होते. काही वेळा अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते.

देशातील १,७२,००० हे. (२००४) क्षेत्र अरण्याखाली असून ते प्रामुख्याने पर्वतीय व पेफॉस प्रदेशात आहे. सुमारे १·५ द. ल. वर्षांपूर्वी पोहणारे हत्ती व हिप्पोपोटॅमस हे सायप्रसमधील प्राणी असावेत. आज या बेटावर ७ जातींचे सस्तन प्राणी, २६ जातींचे जळीस्थळी राहणारे व सरपटणारे प्राणी, ३५७ प्रकारचे पक्षी व असंख्य कीटक आहेत. लगतच्या जलाशयांत १९७ प्रकारचे मासे व जलचर आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : सायप्रस बेटावर नवाश्मयुगाच्या सुरुवातीच्या काळात (इ. स. पू. नऊ ते दहा हजार वर्षांपूर्वी) वस्ती झाली असून ताम्रपाषाण युगाच्या अखेरीस (इ. स. पू. १६०० ते १०५०) हे व्यापारी केंद्र बनले होते. मात्र सीनीयन व अचीनीयन लोकांनी या बेटाला भेट देऊन तेथे वस्तीही केली. त्यांनी ग्रीक संस्कृती व भाषेचा पाया घातला. इ. स. पू. ८०० मध्ये फिनिशियन लोकांनी तेथे वस्ती करण्यास सुरुवात केली. इ. स. पू. सातव्या शतकात ११ प्रसिद्घ सायप्रीअट (सायप्रसमधील रहिवासी) राजांनी असिरियाच्या वर्चस्वाखाली प्रचंड संपत्ती मिळविली.

यूरोप व आशिया यांदरम्यानच्या प्रमुख मार्गावर मोक्याच्या ठिकाणी सायप्रसचे स्थान असल्यामुळे सायप्रसचा दीर्घ इतिहास अशांततेतच गेल्याचे दिसते. या प्रदेशातील प्रबळ सत्तांच्या मेहरबानीवर नेहमीच सायप्रसला रहावे लागले आहे. प्रबळ सत्ताधिशांनी या बेटावरील जनतेच्या मताचा किंवा भावनेचा कसलाही विचार न करता वारंवार एका शासकाकडून दुसऱ्या शासकाकडे हे बेट हस्तांतरित केले. त्याबरोबरच अधूनमधून भूकंप, अवर्षण, दुष्काळ या समस्यांनाही येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागले आहे.

अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर (इ. स. पू. ३२३) सायप्रस ईजिप्तच्या टॉलेमी राजांच्या ताब्यात आले. इ. स. पू. ५८ मध्ये रोमनांनी ते आपल्या प्रदेशाला जोडले. इ. स. ४५ च्या सुमारास येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. पॉल या धर्मप्रचारकाचा मदतनीस बर्नाबास हा येथील रहिवासी असून पॉल यांनीही येथे उद्बोधन केल्याचे मानले जाते. पहिल्या शतकाच्या अखेरीस जेरुसलेमवरून ज्यू निर्वासित येथे आले. इ. स. ११६ मध्ये रोमन सम्राट हॅड्रियन याने ज्यूंचे बंड मोडून काढले आणि त्यांना या बेटावरून पिटाळून लावले. रोमन साम्राज्य विभागले गेल्यानंतर (इ. स. ३९५) सायप्रस बायझंटिन अंमलाखाली आले. तो अंमल बराच काळ राहिला. सातव्या शतकात मुस्लिम अरबांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. इ. स. ९६५ पर्यंत या बेटांवर बायझंटिन व अरब यांची संयुक्त सत्ता राहिली. त्यानंतर येथे पूर्णपणे बायझंटिन सत्ता आली. इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) याने ११९१ मध्ये हे बेट जिंकले. ११९३ मध्ये येथे फ्रँकिश सत्ता आली. इ. स. १४८९–१५७१ या कालावधीत हे बेट व्हिनीशियनांचा संरक्षित प्रदेश म्हणून राहिला. १५७१ मध्ये ऑटोमन तुर्कांनी याचा ताबा घेतला. ऑटोमन अंमल असतानाच येथील लोकसंख्या मुस्लिम तुर्क व ख्रिश्चन ग्रीक अशी विभागली गेली. ग्रेट ब्रिटन व ऑटोमन यांच्यात १८७८ मध्ये झालेल्या सायप्रस करारानुसार हा ब्रिटनचा संरक्षित प्रदेश बनला.

पहिल्या महायुद्घकाळात (१९१४) सायप्रस ब्रिटनला जोडण्यात आले. १९२५ मध्ये ही राजसत्ताक वसाहत (क्राऊन कॉलनी) बनली. १६ ऑगस्ट १९६० रोजी सायप्रस हे स्वतंत्र प्रजासत्ताक बनले परंतु डिसेंबर १९६३ मध्ये तुर्की सायप्रीअटांनी सरकारमधून बाहेर पडून बेटाच्या विभाजनासाठी आंदोलन सुरू केले. तेव्हा मार्च १९६४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचे सैन्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी या बेटावर पाठविण्यात आले. १५ जुलै १९७४ रोजी ‘ग्रीक सायप्रीअट नॅशनल गार्ड’ ने अथेन्सच्या पाठिंब्याने उठाव करून राष्ट्राध्यक्ष माकारयॉस यांना पदच्युत केले. २० जुलै १९७४ रोजी तुर्कांनी सायप्रसवर आक्रमण केले. तुर्की फौजांनी या बेटाचा उत्तरेकडील एक तृतीयांश प्रदेश काबीज केला. तेथे तुर्की सायप्रीअटांनी आपले स्वतःचे स्वयंशासन स्थापन केले परंतु त्याला सार्वभौमम देश म्हणून तुर्कस्तानव्यतिरिक्त कोणीही मान्यता दिली नाही. उठाव शांत झाल्यानंतर बेटाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडण्यात आले. डिसेंबर १९७४ मध्ये माकारयॉस पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आले.

तुर्की सायप्रीअटांनी १९७५ मध्ये तुर्कीसंघीय संविधानाची घोषणा करून राऊफ डेंक्टास याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. नोव्हेंबर १९८३ मध्ये तुर्की राज्याचे एकपक्षीय ‘टर्किश रिपब्लिक ऑफ नॉर्दर्न सायप्रस’ या नावाने प्रजासत्ताक राज्य अस्तित्त्वात आले. १९८५ मध्ये त्यांनी आपले नवीन स्वतंत्र संविधान स्वीकारले. राऊफ डेंक्टास यांनी ‘टीआर्एन्सी’ ची विभक्त होण्याची केलेली मागणी संयुक्त राष्ट्रांनी अमान्य केली (१९९१). ग्रीक सेक्टरचे शासकीय कामकाज १९६० च्या संविधानानुसार चालते. नोव्हेंबर २००२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ग्रीक व तुर्की सायप्रीअट नेत्यांपुढे एक शांतता योजना मांडली. त्यामध्ये दोन घटक राज्यांचे मिळून एक ‘सामाईक राज्य’ स्थापन करून त्याचे राष्ट्राध्यक्षपद दोन्ही राज्यांना आळीपाळीने दिले जावे असे नमूद होते परंतु या योजनेसंदर्भातील बोलणी निष्फळ ठरली. एप्रिल २००३ मध्ये बेटाच्या दोन विभागांना वेगळ्या करणाऱ्या सरहद्दीसंदर्भातील बंधने शिथिल करण्यात आली. सन २००४ मध्ये दोन्ही बाजूकडील सायप्रीअटांनी ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच ही सरहद्द ओलांडली. २४ एप्रिल २००४ रोजी दोन्ही विभागांच्या एकत्रीकरणाबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या योजनेवर जनमतचाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तुर्की सायप्रीअटांनी योजनेच्या समर्थनार्थ तर ग्रीक सायप्रीअटांनी विरोधात मतदान केले. १ मे २००४ रोजी सायप्रस यूरोपीय संघाचा सदस्य झाला. दोन्ही विभागांच्या एकत्रीकरणाचा प्रश्न अद्याप अनिर्णितच आहे (२००८). ग्रीस व तुर्कस्तान या दोन देशांची गुंतवणूक सायप्रसमध्ये असल्याने येथील राजकीय परिस्थिती सतत अस्थिर राहिली आहे.

निकोसीआ, पेफॉस, लारनाका, लिमसॉल, फामागूस्टा व कायरीन्या या सहा प्रशासकीय जिल्ह्यांत सायप्रस विभागलेले असून त्यांपैकी फामागूस्टा व कायरीन्या हे जिल्हे तुर्की सेक्टरमध्ये आहेत. १९६० च्या संविधानानुसार कार्यकारिणी सार्वत्रिक मतदान पद्घतीने पाच वर्षांसाठी निवडली जाते.ती सार्वत्रिक मतदानाने निवडलेल्या प्रतिनिधींमधून होते.त्यांपैकी ५६ प्रतिनिधी ग्रीक सायप्रीअटांकडून तर २४ प्रतिनिधी तुर्की सायप्रीअटांकडून निवडून दिले जातात परंतु १९६३ पासून तुर्की सायप्रीअटांनी मतदानावर व प्रतिनिधिगृहावर बहिष्कार घातलेला आहे. तरीही संविधानातील तरतुदीनुसार तुर्की सायप्रीअटांच्या जागा रिकाम्याच ठेवण्यात आल्या आहेत. टीआर्एन्सीच्या विधानसभेचे ५० सदस्य असून त्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्घतीनुसार केली जाते. सायप्रसमध्ये सर्वोच्च न्यालयाशिवाय असाइझ व जिल्हा न्यायालये आहेत. इ. स. २००२ पासून येथे मृत्युदंडाची शिक्षा बंद करण्यात आली आहे.

आर्थिक स्थिती : सायप्रसमध्ये मुक्त अर्थव्यवस्था असून ती प्रामुख्याने व्यापार व कारखानदारीवर आधारित आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वेगाने वाढ होत आहे. सायप्रस प्रजासत्ताकाच्या तुलनेत तुर्की सेक्टरमध्ये दर डोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन कमी आहे. ग्रीक सेक्टरमधील स्थूल राष्ट्रीय उत्पादन प्रामुख्याने व्यापार, सार्वजनिक प्रशासन, वित्तव्यवस्था, वाहतूक व संदेशवहन क्षेत्राकडून मिळते.

बेटावरील १,३८,५०० हे. क्षेत्र मशागतयोग्य असून ते प्रामुख्याने मेसाओरिया मैदानात व पेफॉसच्या सभोवताली आहे. कारण तेथे गाळाची सुपीक मृदा आहे. पुरेशा पाणीपुरवठ्याअभावी कृषी उत्पादन मर्यादित आहे. लागवडीखालील एकूण कृषिक्षेत्रापैकी ३२,६०० हे. क्षेत्र जलसिंचित आहे (२००६). अधूनमधून अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. एकूण कामकरी लोकांपैकी ६·९ टक्के लोक शेतीत गुंतले आहेत (२००२). सन २००२ मध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादने झाली (उत्पादन ०००टन). लिंबू जातीची फळे १३७·८, बटाटे १४८·५, द्राक्षे ६२·४, गहू, बार्ली ही तृणधान्ये १४१·३, ऑलिव्ह २७·५, बदाम २·००, गाजर १·९, इतर भाजीपाला १४१·२, कॅरोब ७·२.

देशातील एक दशांश क्षेत्र कुरणांखाली आहे. गुरे ५८,३०० मेंढरे २,९४,००० शेळ्या ४,५९,५०० डुकरे ४,९१,४०० कोंबड्या ३·५९ द. ल. याप्रमाणे पशुधन असून प्राणिज उत्पादने (००० टन)– दूध २००·६, मांस १०४·१ व अंडी १२·३ याप्रमाणे झाली (२००२). इमारती लाकडाचे एकूण उत्पादन १२,०००घ.मी. (२००३) व मत्स्योत्पादन १,९१६ टन आहे (२००५).

खनिजांवर आधारित उद्योग ग्रीक सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे विकसित झाले आहेत. चुनखडी, चिकणमाती, जिप्सम, संगमरवर, बेंटोनाइट माती, लोह, पायराइट, क्रोम खनिज ही खनिजोत्पादने घेतली जातात. त्यांपैकी जिप्सम २,३४,००० टन, बेंटोनाइट १,७०,००० टन, अंबर ५,२०५ टन व तांबे १,२४० टन अशी खनिज उत्पादने झाली (२००४). सन १९७४ मधील तुर्की आक्रमणाच्या वेळी बहुतांश औद्योगिक प्रकल्प तुर्कांच्या ताब्यात गेले होते. यावेळी उद्योगांचे खूप नुकसान झाले होते परंतु त्यानंतर सायप्रसने आपल्या उद्योगधंद्यांची पुनःस्थापना केली. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात औद्योगिक क्षेत्राचा वाटा ९ टक्के आहे (२००३). शुद्घीकृत खनिज तेल उत्पादने, सिमेंट, कवडी फरशी, वाइन, बीअर, सिगारेटी, पादत्राणे, कपडे, विटा, खाद्यपदार्थ, धातू उत्पादने, यंत्रे व उपकरणे, रसायन व रासायनिक उत्पादने, प्लास्टिक ही उत्पादने येथे घेतली जातात. ग्रीक सेक्टरमधील संपूर्ण वीज औष्णिक विद्युत् उत्पादन केंद्रांकडून निर्माण केली जाते. पाण्याच्या मोबदल्यात ग्रीक सेक्टरकडून तुर्की सेक्टरला वीज पुरविली जाते. पर्यटन हा परकीय चलन मिळवून देणारा प्रमुख व्यवसाय आहे. सन २००२ मध्ये २४,१८,००० पर्यटकांनी सायप्रसला भेट दिली. तुर्की सेक्टरला प्रामुख्याने तुर्की पर्यटक भेट देतात. देशातील ८० टक्के कामगार संघटित असून दोन प्रमुख कामगार संघटना आहेत. बेरोजगारीचे प्रमाण ३·१ टक्के होते. (२००३).

सायप्रसने जानेवारी २००८ मध्ये यूरो हे चलन स्वीकारले. टीआर्एन्सीचे स्वतंत्र मौद्रिक धोरण नाही. तेथे तुर्की लिरा हे चलन वापरले जाते. सेंट्रल बँक ऑफ सायप्रस (स्था.१९६३) ही बँक चलन निर्गमित करते. देशात १४ स्थानिक बँका, २९ आंतरराष्ट्रीय बँका आणि परदेशी बँकांचे एक प्रतिनिधी कार्यालय आहे (२००४). निकोसीआ येथे शेअरबाजार आहे.

सायप्रसमधील रस्त्यांची एकूण लांबी ११,५९३ किमी. आहे. येथे ३,२१,६३४ प्रवासी मोटार गाड्या, १,१७,८१९ मालवाहतूक गाड्या, ३,१९९ बसगाड्या व कोच आणि ४१,३९६ दुचाकी गाड्या आहेत (२००४). १९७४ मधील तुर्की आक्रमणापासून निकोसीआ येथील विमानतळ बंद करण्यात आला आहे. लारनाका व पेफॉस येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. एरकान हा तुर्की सायप्रसचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. १९७४ मध्ये तुर्कांकडे गेलेल्या बंदरांची उणीव भरून काढण्यासाठी ग्रीक सायप्रसने लारनाका व लिमसॉल येथे बंदरांची बांधणी केली. फामागूस्टा हे तुर्की सायप्रसचे खुले बंदर आहे. ग्रीक सायप्रसमधून औषधे, कापड यांची निर्यात, तर प्रसाधनाच्या व भांडवली वस्तू, खनिज तेल यांची आयात केली जाते. रशिया, ग्रीस, ब्रिटन, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इटली, जर्मनी या देशांबरोबर सायप्रसचा व्यापार चालतो. तुर्की सायप्रसमधून तयार कपडे, लिंबू जातीची फळे यांची निर्यात आणि वाहतूक साधने, खाद्यपदार्थ यांची आयात केली जाते. तुर्की सायप्रसचा व्यापार मुख्यतः तुर्कस्तान व ग्रेट ब्रिटनशी चालतो. येथे सार्वजनिक आणि खाजगी नभोवाणी व दूरदर्शन केंद्रे कार्यरत आहेत.

लोक व समाजजीवन : सायप्रसमध्ये ग्रीक व तुर्की असे दोन मुख्य वांशिक गट आहेत. त्यांपैकी ग्रीक भाषिक दीर्घकालापासून येथे राहत आहेत. तुर्की भाषिक सायप्रीअट (सायप्रसमधील रहिवासी) हे ऑटोमन तुर्कांचे वंशज असून ते १५७१ ते १८७८ याकालावधीत येथे आले. ग्रीक सायप्रीअट प्रामुख्याने ईस्टर्न ऑर्थडॉक्स ख्रिश्चन असून तुर्की सायप्रीअट हे सुन्नी मुस्लिम आहेत. एकूण लोकसंख्येत ६,४२,६०० ग्रीक सायप्रीअट, ८७,४०० तुर्की सायप्रीअट आणि ७२,५०० इतर वांशिक गटांचे लोक होते (२००२). आर्मेनियन, रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथीय अल्पसंख्येने होते. ग्रीक व तुर्की या दोन अधिकृत भाषा असून इंग्रजी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. चार पंचमांश लोक ग्रीक भाषिक असून ते ग्रीक सेक्टरमध्ये राहतात. तुर्की भाषिक तुर्की सेक्टरमध्ये राहतात. देशांतर्गत रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक सायप्रीअट परदेशी– प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनमध्ये– नोकरीनिमित्त राहतात. १९६० मध्ये ग्रेट ब्रिटनकडून सायप्रसला स्वातंत्र्य देण्यात आल्यानंतर येथून परदेशी जाणाऱ्यांची संख्या वाढली.

लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ९० आहे. दर हजारी जन्मप्रमाण १०·९ व मृत्युमान ७·२ (२००५) असून १९९२–२००२ या दशकातील वार्षिक लोकसंख्यावाढ १·२ टक्के होती. आयुर्मर्यादा पुरुषांच्या बाबतीत ७६·१ वर्षे व स्त्रियांच्या बाबतीत ८१·१ वर्षे आहे (२००३). सरासरी प्रसूतिमान प्रती स्त्री १·६ मुले असे आहे (२००४). ६९·२ टक्के लोक नागरी भागात राहतात (२००३). साक्षरतेचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

सायप्रसमध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावरील पहिल्या तीन वर्षांचे शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. ग्रीक सेक्टरमध्ये कला, वनविज्ञान, अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्रविषयक महाविद्यालये आहेत. मूक-बधिर व अपंगांसाठी स्वतंत्र शिक्षणसंस्था आहेत. येथील ३४८ प्राथमिक शाळांत ५८,३७३ विद्यार्थी व ४,४०९ शिक्षक, १२० माध्यमिक शाळांत ५६,६३४ विद्यार्थी व ६,२०० शिक्षक, तर सायप्रस विद्यापीठात (स्था.१९८९) ४,६०९ विद्यार्थी आहेत (२००४). तुर्की सेक्टरमध्ये रीतसर व प्रौढ शिक्षण अशी विभागणी केली आहे. रीतसर शिक्षणात प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाचा समावेश होतो. तुर्की सायप्रसमधील प्राथमिक शाळांत १५,४८२ विद्यार्थी व १,१५६ शिक्षक, माध्यमिक विद्यालयात १५,९१० विद्यार्थी व १,५०४ शिक्षक, तांत्रिक व व्यावसायिक विद्यालयांत १,९८५ विद्यार्थी व ४३५ शिक्षक आणि उच्च शिक्षणसंस्थेत २९,०५४ विद्यार्थी आहेत (२००३). ईस्टर्न मेडिटेरॅनियन विद्यापीठ(स्था.१९७९) येथे आहे.

सायप्रसमध्ये ८४ नोंदणीकृत खाजगी रुग्णालये व चिकित्सालये, ५ शासकीय रुग्णालये, ३ ग्रामीण रुग्णालये, २५ ग्रामीण आरोग्य केंद्रे, एक शासकीय मनोरुग्ण चिकित्सालय आणि १,९५२ डॉक्टर, ७१४ दंतवैद्य, ३,६१३ परिचारिका व ८०० औषधनिर्माते आहेत (२००४). तुर्की सायप्रसमध्ये ३३८ डॉक्टर, ११५ दंतवैद्यक, १६७ औषधनिर्माणशास्त्र आणि राज्य व खाजगी रुग्णालयांत मिळून एकूण १,१२१ खाटांची सोय आहे (२००२).

सायप्रसमध्ये संगीत, नृत्य व हस्तकलाविषयक शिक्षणसंस्था असून निकोसीआ येथील संग्रहालयात परंपरागत सुंदर हस्तकला-वस्तूंचे प्रदर्शन भरते. गोल्फ हा लोकप्रिय खेळ असून त्याशिवाय सॉकर, टेनिस हे खेळही खेळले जातात. सॅलमिस हे येथील पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ आहे. राजधानी निकोसीआशिवाय ग्रीक सेक्टरमधील लिमसॉल (लोक. २,२६,७००) लारनाका (१,३१,९००) पेफॉस (७६,१००–२००७ अंदाज) आणि तुर्की सेक्टरमधील फामागूस्टा व कायरीन्या ही प्रमुख नगरे आहेत. (चित्रपत्र).

चौधरी, वसंत

सायप्रस

कायरीन्या : उत्तर सायप्रसमधील प्रसिद्ध जुने बंदर.

लारनाका शहरातील प्रसिद्ध सेंट लाझारुस चर्च.