दलदल : चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. जेथे जमिनीतील पाण्याची पातळी पृष्ठभागावर आलेली असते तेथे दलदली तयार होतात. सपाट प्रदेशात पावसाचे पाणी साचून, हिमगाळाच्या मैदानात, पूरमैदानातील पूरतटांपलीकडे, त्रिभुज प्रदेशात, अधोगामी हालचालींमुळे किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली बुडलेला राहून दलदली तयार होतात. सर्व दलदलींच्या भागात जलनिकास (पाण्याचा निचरा) निसर्गतः न झाल्याने (म्हणजे पाणी वाहून जाण्याची नैसर्गिक योजना नसल्याने) पाणी साचते. भिन्न प्रकारच्या दलदलींना वेगवेगळ्या प्रकारची नावे निरनिराळ्या देशांत दिली जातात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या फ्लॉरिडा राज्यात त्यांना ‘एव्हरग्लेड्स’ असे नाव आहे, तर कॅनडामधील उत्तर ध्रुवाच्या जवळील प्रदेशात त्यांना ‘मस्केग’ असे म्हणतात. इंग्लंडमध्ये त्यांना ‘मूर’, ‘बॉग’, ‘फेन’ अशी नावे आहेत.

आग्नेय आशियातील द्वीपसमूहात किनारपट्टीवर दलदली आढळून येतात. चतुर्थ कल्पातील (सु. ६ लक्ष वर्षांपूर्वीच्या कालखंडातील) हिमस्तर वितळल्यानंतर आग्नेय आशियातील सूंदा व मंचाच्या सीमावर्ती प्रदेशात समुद्रपातळी ३६–८० मी. ने वाढली आणि त्यामुळे सुमात्राचा पूर्व किनारा, बोर्निओ, सुलावेसी (सेलेबीझ), जावा ह्या प्रदेशांत दलदली निर्माण झाल्या. इंडोनेशियन द्वीपसमूहात प्रत्येक बेटावर दलदली आढळतात. या विभागांत आरोह प्रकारचा पाऊस पडतो. परिणामी उष्णतेमुळे व पावसाच्या पाण्यात वनस्पतींचे अवशेष कुजून त्यांतील रासायनिक द्रव्य मिसळल्यामुळे आणि ते पाणी खडकांवरून वाहिल्याने खडकांची जलद गतीने फूटतूट होते. खडक फुटून तयार झालेला गाळ किनाऱ्यावर पसरला जातो व तेथे दलदली तयार होतात. अशा दलदलींत काही ठिकाणी खार जमिनीस अनुकूल अशी जंगले वाढतात व डासांचा प्रादुर्भाव होतो. ह्या दलदलींच्या प्रदेशात शेती करता येत नाही. त्यामुळे अशा दलदली मानवी वसाहतींना उपयुक्त नसतात. जावा बेटाव्यतिरिक्त आग्नेय आशियातील इतर बेटांचा विकास न होण्याचे कारण दलदलीच होत. दलदलींच्या प्रदेशातून वाहतूक होऊच शकत नाही. त्यामुळे वरील विभागात यूरोपीय वसाहतवाले मोठ्या प्रमाणात वस्ती करू शकले नाहीत.

फ्लॉरिडाच्या विभागात असलेल्या एका भागास एव्हरग्लेड्स असे नाव आहे. या विभागात खडकांनी नैसर्गिक रीत्या बंदिस्त केलेला एक खोलगट भाग आहे. येथे अनेक सरोवरे व दलदली आहेत. या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्या तयार झालेल्या आढळतात. दलदलीत काही बेटांसारखे भाग असून त्यावर सायप्रस, जंगली रबर, ओक इ. वृक्ष वाढलेले आहेत. जेथे दलदली नाहीशा करून जमीन तयार केलेली आहे तेथे जमिनीतून ऊस आणि भाजीपाला यांचे भरपूर उत्पन्न मिळते.

हिमक्षयी प्रदेशात खोलगट भाग तयार झालेले असतात अशा ठिकाणी पाणी साचून दलदली तयार होतात. रशियाचा उत्तर भाग, कॅनडा, फिनलंड इ. देशांमध्ये अशा दलदली आहेत.

सायबीरियाच्या उत्तर भागात नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यामुळे दलदली तयार झालेल्या आढळून येतात. उत्तर सायबीरिया शीत कटिबंधात येतो. या प्रदेशातून ओब, येनिसे, लीना या मोठ्या नद्या उत्तर समुद्राला मिळतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस हा समुद्र गोठलेला असतो त्या वेळी गोठलेल्या नद्यांतील बर्फ वितळते व पाणी उत्तरेकडे वाहते परंतु नद्यांची मुखे गोठलेली असल्याने या उत्तरवाहिनी नद्यांचे पाणी पूर्व-पश्चिम पसरते व दलदली तयार होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस अशा दलदली आढळून येतात. टंड्रा प्रदेशातदेखील उन्हाळ्यात बर्फ वितळल्यानंतर अशी परिस्थिती आढळून येते. प. सायबीरियात ‘वास्युगान’ या नावाने ओळखला जाणारा एक मोठा दलदली भाग आहे.

पेनाइन पर्वताच्या पठारावर काही ठिकाणी खडकाळ किंवा दगडगोट्याची जमीन आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी जमिनीत मुरू शकत नाही आणि तेथे ‘डार्टमूर’ सारख्या दलदली तयार झालेल्या आहेत. जास्त व विशेषतः वर्षभर पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशात अशा दलदली तयार होतात. इंग्लंडमध्ये पर्थशर व इर्न्व्हर्नेस येथे सपाट भूमी व भरपूर पाऊस यांमुळे तयार झालेल्या दलदलींना ‘ब्लँकेट बॉग’ असे इंग्रजी नाव आहे.


आयर्लंडमध्ये व इतर काही ठिकाणी दलदलींच्या प्रदेशात एक प्रकारचे शेवाळ जमते आणि त्यापासून कालांतराने ⇨ पीट  नावाचा पदार्थ बनतो, म्हणून त्यांना दक्षिण ‘पीट बॉग्ज’ असे म्हणतात भारतात उटकमंडजवळील खोलगट भागात अशा दलदली तयार झालेल्या आहेत. पीट बॉग्जमधून निकृष्ट प्रकारचा परंतु ज्वलनाला उपयोगी असा कोळसा मिळतो.

नेदर्लंड्समध्ये दलदलींना ‘लागव्हीन’ असे नाव आहे. इंग्लंडमध्ये या दलदलींना ‘फेन’ असे म्हणतात. त्यांत कॅल्शियम कार्बोनेटाचे (चुनखडीच्या द्रव्याचे) संचयन होते. परंतु अशा दलदलीतून पाणी काढून टाकल्यानंतर तेथील काही वनस्पतींच्या अवशेषांनी बनलेल्या ह्यूमस द्रव्याने युक्त अशी सुपीक जमीन तयार होते.

कॅनडाच्या भागातील दलदलींना ‘मस्केग’असे नाव आहे. कॅनडाच्या काही भागांत बर्फाने झीज होऊन खोलगट भाग तयार झालेले आहेत. अशा खोलगट भागांत कुजलेल्या वनस्पती व पाणी एकजीव होऊन दलदली तयार होतात. काही दिवसांनी त्यावर वनस्पतींच्या साहाय्याने एक कवच तयार होते परंतु ते भुसभुशीत व चिकट असते. त्यात मनुष्य किंवा प्राणी पूर्णपणे बुडण्याचा व रुतून बसण्याचा धोका असते. अशा दलदलीमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.

किनाऱ्यावर व त्रिभुज प्रदेशातही दलदली असतात. भरती–ओहोटीमुळे त्यांतील पाणी कमीजास्त होत असते. दलदलींवरून भूमिस्वरूप नवीन आहे का जुने आहे, हे समजू शकते. लहान दलदल नवीन भूमिस्वरूपाचे द्योतक असते, तर पूरमैदाने व सागरी मैदाने यांवरील दलदली जुनाट भूमिस्वरूपांच्या द्योतक समजल्या जातात. उ. अमेरिका व यूरेशिया येथील दलदलींचे आकारमान काही हेक्टरांपासून हजारो किलोमीटरांपर्यंत असते. त्यांचा पृष्ठभाग साधारणपणे सपाट असून काही मोठ्या दलदलींत उंचवटे असतात, भू–हिमोढांच्या विभागातही दलदली आढळून येतात. दोन देशांच्या सीमेवर दलदल असल्यास सीमारक्षण करणे सोपे असते. पहिल्या महायुद्धाच्या काळात यूरोपातील ‘प्रिपेट मार्श’या दलदलीस व्यूहरचनेच्या दृष्टीने फारच महत्त्व प्राप्त झालेले होते.

भागवत, अ. वि.

दलदली व वनस्पती : थंड किंवा अतिथंड प्रदेशांत केव्हा केव्हा फार उंचीवर किंवा फार खालच्या पातळीवर दलदली आढळतात. तेथील जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे आणि इतर सर्व परिस्थितीमुळे भिन्न प्रदेशांत भिन्न प्रकारच्या वनस्पती वाढत असलेल्या आढळतात. भिन्न दलदलींतील वनस्पतिसमूह सापेक्षतः कायम स्वरूपाचे दिसले, तरी दलदलीत होणाऱ्या नैसर्गिक किंवा कृत्रिम फरकांमुळे त्यांतील जाती व वंश किंवा त्यांची संख्या आणि आकारमान बदलत राहते. तेथील संपूर्ण वनस्पतिसमूहाच्या संदर्भात रुतण (बॉग), फेन,मूर, खारी दलदल, पंक (मार्श) आणि अनूप (स्वँप) इ. नावांनी दलदलींचे विविध प्रकार ओळखले जातात.

सपाट जमिनीवरच्या पाणथळ जागी फक्त ओषधीय[⟶ ओषधि] वनस्पतीच वाढत राहिल्यास तिला ‘पंक’म्हणतात व तेथे आढळणाऱ्या वनस्पतींच्या समुदायास ‘पंक–समावास’म्हणतात [⟶ परिस्थितिविज्ञान] परंतु ओषधींशिवाय तेथे झुडपांची व वृक्षांचीही वाढ होत राहिल्यास त्या ठिकाणाला ‘अनूप’व वनस्पतिसमुदायाला ‘अनूप–समावास’म्हणतात. या दोन्हींत फारच थोडे पीट असते परंतु रुतणात त्याचे एकदोन थर असतात.

ज्या दलदलीमध्ये मऊ, ओला व जैव पदार्थ साचून त्यात अनेक प्रकारांचे लव्हाळे [मुस्तक कुल⟶ सायपेरेसी], काही ⇨ गवते  (बोरू व नरकूल यांसारखी), ⇨ जुंकेसी  कुलातील (प्रनड कुलातील) जाती (रशेस) व शेवाळी [विशेषतः स्फॅग्नम⟶शेवाळी]आणि काही झुडपे वाढतात, तिला ‘रुतण’ म्हणतात. पंक, अनूप व रुतण यांत काटेकोर फरक करणे बरेच कठीण आहे. कोणत्याही रुतणामध्ये त्यातल्या वनस्पतिसमुदायाची एकएक विकासावस्था असते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड व आयर्लंड या प्रदेशांत रुतणे आढळतात. कॅनडा व अलास्कातील ‘टंड्रा’ व ‘मस्केग’ यांचे रुतणाशी थोडेफार साम्य असते.


आरंभीच्या अवस्थेत रुतणात फक्त शेवाळीच असतात त्यांत स्फॅग्नम  हे प्रमुख असते. यांच्या अपघटनांमुळे (घटक अलग झाल्यामुळे) जैव भाग वाढत असतो. रुतणात जर पाण्याचा काही भाग उघडा असेल, तर त्याच्या काठाने कमळासारख्या (वॉटर-लिली) व लव्हाळ्यासारख्या (इं. सेजीस) ⇨  जलवनस्पती  असतात. हा तरता समुदाय तळापासून व टोकापासून घट्ट बनत जाऊन नंतर तो मनुष्याचेही वजन सहन करू शकेल इतका घट्ट बनतो. रुतणाची खोली कधी १२ मी. पेक्षाही अधिक असू शकते. पाण्याचा अंश केव्हा केव्हा वाढून रुतण फुटते व भोवताली पसरून वाहू लागते. रुतणांचे सामान्यपणे काळे व लाल असे प्रकार ओळखले जातात. लाल रुतणातील जैव पदार्थांचे अपघटन पूर्ण होत नसल्याने त्यात बनणारे पीट अधिक सूत्रल (तंतुमय) व हलके बनते. लाल रुतणे अधिक मोठी व सर्वांत खोल असतात. काळ्या रुतणातील पीट अधिक जड व कमी सूत्रल असते. रुतणांचा निचरा करून आणि खते घालून भूमि-उद्धार करता येतो. पाश्चिमात्य देशांत असा भूमि-उद्धार मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. पीट रुतणांचे वैशिष्ट्य असे की, त्यात पडलेल्या वृक्षांची मुळे व खोडे उत्तम परिरक्षित (खराब न होता टिकून राहिलेल्या) स्थितीत पृष्ठाखाली अनेक मीटरांपर्यंत आढळतात अनेकदा ती त्या परिसरात न आढळणाऱ्या वृक्षांची असतात. यावरून असा निष्कर्ष निघतो की, ही रुतणे भूतपूर्व जंगलांच्या अपघटनातच उदयास आली. हे बुडलेले ओंडके केव्हा केव्हा इतके सुरेख असतात की, कापण्यास व तासण्यास मुळीच अडचण पडत नाही. तसेच कित्येक प्राण्यांची मृत शरीरे (आणि यूरोपात मनुष्यांचीसुद्धा शरीरे) चांगली परिरक्षित असतात याची कारणे रुतणातील अम्लता, तेथील कमी तापमान व ऑक्सिजनाचा अभाव ही होत. रुतणात भोके पडल्यावर येणारे बुडबुडे हे मिथेन व हायड्रोजन सल्फाइड ह्या वायूंचे असतात. ⇨ परागांचे  जीवाश्म (शिळारूप अवशेष) रुतणात सामान्यपणे आढळतात व ते तपासून भिन्नभिन्न अवस्थेत कोणकोणते वृक्ष पूर्वी तेथे वाढत होते, हे समजून घेता येते.

पीटमधील जैव पदार्थांशिवाय कित्येक रुतणांत खनिज द्रव्येही असल्याने त्या अनुरोधाने त्यांचे तीन प्रकार आढळतात. (१) कठीण जल (साबणाचा फेस ज्यात कमी प्रमाणावर होतो अशा) क्षेत्रातील काही रुतणांत चुनामिश्रित मातीचा (मार्ल) थर, वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमुळे (सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत हरितद्रव्याच्या साहाय्याने होणाऱ्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेमुळे) वेगळा झाल्याचे आढळून येते. (२) रुतण-विकासाच्या एखाद्या अवस्थेत विशिष्ट परिस्थितीत ⇨ डायाटम  नावाच्या सिलिकावरणाच्या एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच पेशीचे बनलेले आहे अशा) करंडक वनस्पतींची वाढ भरमसाट झाल्याने त्यांच्या जीवाश्मांचाही लहानमोठा थर आढळतो. (३) ज्वालामुखीच्या सान्निध्यात बनलेल्या रुतणात पूर्वी ज्वालामुखीतून पृष्ठभागावर आलेल्या राखेचा थर त्यात बुडून खाली असलेल्या पिटाच्या थरावर पडून साचल्याने, आज ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेचा पिटाचा पृष्ठभाग निश्चितपणे ओळखता येतो.

फेन : दलदलीच्या या प्रकारात पाण्याची पातळी सदैव जमिनीवर असते परंतु तेथे जमीन क्षारधर्मी (अल्कलाइन) असल्याने अम्ली रुतणाहून वेगळी असते. येथे अनेक वृक्ष असतात तेव्हा त्यास ‘कार्र’ म्हणतात. यूरोप, इंग्लंड, आयर्लंड व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील काही प्रदेशांत या दलदली भरपूर आहेत. यातील वनस्पती मेंढ्या व गुरे यांना चारण्यास उपयुक्त असून यात इतर अनेक प्राणीही असतात. सु. एक मी. पर्यंत खोलीवर काळी जमीन असून रुतणाप्रमाणे तिची सुधारणा करता येते. याबाबत इंग्लंडमधल्या बेडफर्ड लेव्हलचे उदाहरण सुपरिचित आहे. सतराव्या शतकात एका डच अभियंत्याच्या मदतीने या फेनचा निचरा करून घेतल्यावर पुढे त्याची उत्तम पिकाऊ जमीन झाली व तिच्यामध्ये नित्य धान्ये तर पिकलीच पण भाज्या, बटाटेव फळेही पिकवली गेली. पॉप्लर, विलो (वाळुंज), ॲश, एल्म, एल्डर, हॉथॉर्न  इ. वृक्ष फेनमध्ये वाढतात.

मूर : उ. अमेरिकेत ज्याला बॉग (रुतण) म्हणतात त्याला यूरोपात थोड्याफार फरकाने मूर व हीथ म्हणतात.

खारी दलदल : खाऱ्या किंवा मचूळ पाण्याने डबडबलेल्या जमिनीखालच्या पातळीवरच्या समुद्रकिनारी, किनाऱ्याच्या आतील बाजूस, खाड्यांमध्ये, नद्यांच्या मुखांशी व रूक्ष प्रदेशांत खाऱ्या दलदली आढळतात. समुद्रकिनाऱ्यावरच्या दलदली अंतर्भागात (तटवर्ती) बऱ्याच अंतरावर असूनही भरती–ओहोटीशी संबंधित असतात. भारतात पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यांवर कोठे कोठे खाऱ्या दलदली आढळतात त्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी कच्छ वनश्री (क्षुपे आणि वृक्षांची) आढळते [⟶ वनश्री (कच्छ वनश्री)]आणि तसेच ओषधीय वनस्पती व शैवलेही आढळतात. समशीतोष्ण प्रदेशात अशा ठिकाणी ओषधीय ⇨ लवण  वनस्पती फक्त आढळतात. उष्ण प्रदेशात कोठे कोठे कच्छ वनस्पतींची जंगले आहेत.दलदल असून येथे (प्राप्य) पाण्याचे दुर्भिक्ष्य असते व त्यामुळे येथील वनस्पतींत ⇨मरुवनस्पतीसारख्या अनुयोजना (परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शरीररचनेत झालेले बदल) असतात. येथील ⇨ शैवलांत एकांगी वाढ आणि फक्त शाकीय (एरवी केवळ पोषणाचे कार्य करणाऱ्या अवयवांपासून होणारे) प्रजोत्पादन दिसते.

बालकृष्णन्, एम्. एस्. (इं.) जमदाडे, ज. वि. (म.)


समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातील खाऱ्या जमिनी : (खार किंवा खाजण). समुद्राच्या पाण्याने निरुपयोगी झालेल्या खाऱ्या जमिनी भारतात प. बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र व गुजरात राज्यांत समुद्रकिनारी भागात आढळून येतात आणि त्यांचे एकूण क्षेत्रफळ ५२,००० ते ७८,००० चौ. किमी. असावे असा अंदाज आहे. त्यापैकी निम्म्या जमिनीत सुधारणा करून त्या पिकांच्या लागवडीखाली आणता येण्याजोग्या आहेत. प. बंगालमधील सुंदरबन या नावाने ओळखला जाणारा भाग, कृष्णा, गोदावरी आणि कावेरी नद्या समुद्राला मिळतात तेथील त्रिभुज प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि कच्छचे रण या प्रदेशांतील खाऱ्या जमिनी महत्त्वाच्या असून त्या सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात या जमिनी खार व खाजण या नावाने, तमिळनाडूत ‘उप्पू’ आणि केरळात ‘कारी’ या नावाने ओळखल्या जातात. प्रत्येक राज्यातील खाऱ्या जमिनीच्या सुधारणेचे स्वरूप वेगवेगळे आहे. गुजरातमध्ये पाऊस फार कमी प्रमाणात पडतो. इतरराज्यांत तो मध्यम ते पुष्कळ प्रमाणात पडतो. केरळमधील काही जमिनी पीट स्वरूपाच्या असून त्यांत१०–४०% जैव पदार्थ असतात. पावसाळ्यात त्या पाण्याखाली असतात.

महाराष्ट्रातील खार व खाजण जमिनी ठाणे, कुलाबा व रत्नागिरी या जिल्ह्यांत आहेत. या जमिनींची सुधारणा करण्याचे काम खार जमीन विकास मंडळामार्फत होत आहे [⟶जमीन सुधारणा]. सुधारलेल्या जमिनीत (३ ते ४ वर्षांनंतर) भाताचे पीक उत्तम प्रकारे वाढते. पहिली दोन वर्षे जाड्या व लवणनिरोधक भाताच्या प्रकारांची लागवड करतात. कुलाबा जिल्ह्यात पनवेल येथे खार जमीन संशोधन केंद्र असून तेथील संशोधनावरून असे आढळून आले आहे की, सुधारलेल्या जमिनीत रोहू (मोड आलेले भाताचे बी) फोकून पेरण्याऐवजी रोप लावणी पद्धत जास्त चांगली असून त्यामुळे पिकाचे उत्पन्न जास्त येते. जास्त पाणी असलेल्या शेतात रोहू कुजतो आणि उलटपक्षी रोहू टाकल्यावर पाऊस उघडला व जमिनीतील पाणी आटले, तर रोपे वाळतात. लावणी केलेली रोपे कुजत नाहीत व पावसाने उघडीप दिली, तरी सहसा वाळत नाहीत.

पहा : जमीन सुधारणा निचरा.

दीक्षित, गो. नि.

संदर्भ : 1. Committee on Natural Resources Planning Commission, Study on Wastelands Including Saline, Alkaline and Waterlog of Lands and Their Reclamation Measures, New Delhi, 1963.

           2. Hardy, M. E. A Junior Plant Geography, Oxford, 1954.

           3. McDougall, W. B. Plant Ecology, Philadelphia, 1949.

           4. Mitra, J. N. Systemic Botany And Ecology, Calcutta, 1964.