प्राग: चेकोस्लोव्हाकियाची राजधानी. एल्बची उपनदी व्हल्टाव्हा हिच्या पूर्व-पश्चिम काठांवर पायऱ्यापायऱ्यांच्या टेकाडांवर हे शहर वसलेले आहे. ते बर्लिनच्या आग्नेयीस २८१ किमी. व व्हिएन्नाच्या वायव्येस २५७ किमी. आहे. शहराचा विस्तार २९० चौ. किमी. असून त्यापैकी चौथा भाग हिरवळीखाली आहे. खंडांतर्गत स्थानामुळे प्रागचे हवामान विषम आहे. लोकसंख्या ११,८२,८५३ (१९७७).

प्राग इ. स. नवव्या शतकापूर्वी वसले असावे. मध्ययुगात ते बोहीमियन सत्तेखाली होते. त्यातील पर्झेमिसल घराणे १३०६ पर्यंत सत्तेवर होते. बोहीमिया राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून प्रागची त्या काळात भरभराट झाली. नंतरच्या लक्सेंबर्ग घराण्यातील चौथ्या चार्ल्सने १३४८ मध्ये चार्ल्स विद्यापीठाची (युनिव्हर्झिटा कार्लोव्हा) येथे स्थापना केली. १३४४ मध्ये येथे आर्चबिशपचे कार्यालय सुरू झाले. नंतरच्या

'ओल्ड टाउन स्क्वेअर', प्राग.

दोनशे वर्षांच्या कालखंडात प्रागमध्ये गॉथिक शैलीतील अनेक चर्च व कॅथीड्रल उभी राहिली. रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट यांच्या संघर्षात १६२० मध्ये प्रागजवळील बिला होरा (व्हाइट मौंटन) लढाईत प्रॉटेस्टंट सैन्याचा निर्णायक पराभव झाला. प्राग जर्मन साम्राज्याची राजधानी राहिली नाही. १६३१ मध्ये हे शहर सॅक्सनांनी, १६४८ मध्ये स्वीडिश लोकांनी, १७४१ मध्ये फ्रेंचांनी, तर १७४४ व १८६६ मध्ये प्रशियन सैन्याने बळकावले. १७५७ मध्ये सप्तवर्षीय युद्धाच्या दुसऱ्या वर्षीच ते प्रशियनांच्या हाती पडले. दोन वेळा प्लेगची साथ उद्‌भवून प्राग शहराचा ऱ्हास होत गेला.

जुने शहर, नवे शहर, लेसर क्वार्टर, हूराचानी किल्ला हे सर्व भाग १७८४ मध्ये प्रशासकीय दृष्ट्या एकवटण्यात आले. या काळात नामवंत स्थापत्यविशारदांनी शहरात भव्य प्रासाद व उद्याने निर्माण केली. चर्चवास्तूंच्या वैपुल्यामुळे प्राग हे ‘शंभर मनोऱ्यांचे शहर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रागचे ‘कार्लीन’ हे पहिले उपनगर १८१७ मध्ये स्थापन झाले आणि पुढील वीस वर्षांत शहरात व शहराच्या परिसरात अनेक कारखाने उदयास आले. १८४५ मध्ये पहिला लोहमार्ग येथे सुरू झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्राग हे चेक संस्कृतीच्या प्रबोधनाचे केंद्रस्थान बनले. ‘नीओक्लासिकल नॅशनल म्यूझीयम’ (१८८५) व ‘नॅशनल थिएटर’ (१८६८) या दोन भव्य वास्तू त्या प्रबोधनाच्याच निदर्शक होत. १८९० च्या सुमारास प्रागमध्ये प्रथमच विजेवरील ट्रामगाड्या धावू लागल्या. फ्रान्समधील ‘आयफेल टॉवर’ ची प्रतिकृती ‘पेट्रिन हिल’ या डोंगरावर उभारण्यात आली. १९१८ मध्ये प्राग ही नवस्वतंत्र चेकोस्लोव्हाकियाची राजधानी बनली. म्यूनिक करारानुसार (२९ सप्टेंबर १९३८) चेकोस्लोव्हाकिया जर्मनीच्या ताब्यात गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर या शहराचा विकास नियोजनपूर्वक करण्यात आला.

प्रागची अर्थव्यवस्था विविध उत्पादनाभिमुखी असून शहरातील ६ लक्ष कामगारांपैकी ३३ % कामगार निर्मितीउद्योगांत, तर उर्वरित व्यापारवाणिज्य, बांधकाम, शिक्षण, दळणवळण, विज्ञानसंशोधन या क्षेत्रांत गुंतलेले आहेत. सुमारे ५० % श्रमबल स्त्रीकामगारांचे आहे. निर्मितीउद्योगांत यंत्रे व यंत्रावजारे, अन्नपदार्थ, कापड, छपाई, औषधे, रसायने आदींचा समावेश होतो. येथील ‘प्राग बीर’ प्रसिद्ध आहे.

नगरपालिकीय प्रशासन १९४५ पासून १५० सदस्य असलेल्या प्रागच्या राष्ट्रीय समितीद्वारा पाहिले जाते. महापौरांचे स्थान राष्ट्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या दर्जाचे असते. शहरात १९७० मध्ये सु. १३० शिशुविहारगृहे होती. सार्वजनिक स्नानगृहे व सरोवरे पुष्कळ आहेत. ट्राम, ट्रॉलीबस व बस सेवा उपलब्ध आहे. भुयारी मार्गांचे बांधकाम चालू असून प्राग रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येत आहे. व्हल्टाव्हा नदीतून प्रवासी बोटींची वाहतूक चालते. प्रागच्या पश्चिमेकडे ८ किमी.वर रुझिन्ये येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरात १८ मोठी रुग्णालये आहेत.

प्रागमध्ये नऊ उच्च शिक्षणसंस्था असून त्यांपैकी दोन विद्यापीठे आहेत. यांशिवाय ‘कला अकादमी’ व ‘संगीत अकादमी’ ह्या उल्लेखनीय आहेत. ‘युनिव्हर्सिटी ऑफ द सेव्हन्टींथ ऑफ नोव्हेंबर’ (१७ नोव्हेंबर १९३९ रोजी सैन्याकडून अनेक चेक विद्यार्थी मारले गेले, त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठास देण्यात आलेले नाव) या विद्यापीठाची इमारतही भव्य आहे. या विद्यापीठात सु. ९० देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. सतराव्या शतकातील प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ ट्यूको ब्राए व योहानेस केप्लर यांचे या शहरात वास्तव्य होते. जगद्‌विख्यात भौतिकीविज्ञ ॲल्बर्ट आइन्स्टाइन हे प्रागमध्ये १९११-१२ च्या दरम्यान प्राध्यापक होते.

प्राग येथे जगप्रसिद्ध ‘स्प्रिंग म्यूझिक फेस्टिव्हल’ हा संगीतोत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. ‘प्राग सिंफनी’ व ‘प्राग फिलार्मानिक’ या वाद्यवृंदांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेली आहे. शहरात पंधरांवर रंगमंदिरे तसेच अनेक वस्तुसंग्रहालये व प्रदर्शनगृहे आहेत. येथे रोमनेस्क, गॉथिक, बरोक, रोकोको, नवअभिजात शैलींतील अनेक कलावस्तू व स्मारके आहेत. त्यांपैकी ‘सेंट जॉर्ज चर्च’ (दहावे शतक), ‘सेंट व्हाइटस कॅथीड्रल’ (चौदावे शतक) उल्लेखनीय आहेत. जुन्या शहर चौकातील टिन चर्च, भव्य पॉवडर टॉवर, बेथलीएम चॅपेल व १३२४ मधील ‘सेंट ॲग्नेस कॉन्व्हेंट’ हे गॉथिक शैलीचे आणखी नमुने होत. ‘ओल्ड–न्यू सिनॅगॉग’ व ‘ओल्ड ज्यूइश सेमिटरी’, वॉल्स्टन तसेच क्लॅम गॅलास हे राजवाडे, सेंट निकोलस चर्च, आंतॉन्यीन द्व्हॉरझाक म्यूझीयम या इतर उल्लेखनीय वास्तू होत. अभिजात वास्तुशिल्पांमध्ये बेडर्झिख स्मेताना संग्रहालय वास्तू, बेल्व्हडीर हा उन्हाळी राजप्रासाद आदींचा समावेश होतो. नवअभिजात वास्तुशिल्पांमध्ये ‘नॅशनल म्यूझीयम’ व ‘नॅशनल थिएटर’ यांचा अंतर्भाव होतो. प्रागचे सौंदर्य त्यामधील अनेक रमणीय उद्याने, उपवने यांमुळे द्विगुणित झाले आहे. मनोरंजन सुविधांपैकी ‘स्ट्रॅहॉव्ह स्टेडियम’ या भव्य प्रेक्षागारात २·५ लक्ष प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था आहे. प्रागच्या सरहद्दीवरच बॅरॅन्‌डॉव्ह येथे प्रसिद्ध चित्रपटनिर्मितीगृहे आहेत. आंतॉन्यीन द्व्हॉरझाक (१८४१ –१९०४) हा संगीतकार, आउगुस्त्यिन स्मेताना (१८१४ –५१) हा तत्त्वज्ञ, बेडर्झिख स्मेताना (१८२४ –८४) हा पियानोवादक व आधुनिक चेक संगीताचा जनक, राइनर मारीआ रिल्के (१८७५ –१९२६) हा जर्मन भावकवी व लेखक, फ्रांट्स काफ्का (१८८३-१९२४) हा जर्मन कथाकादंबरीकार, कारेल चापेक (१८९० –१९३८) हा नाटककार व कादंबरीकार या सुविख्यात व्यक्तींचे प्राग हे जन्मस्थल होय.

गद्रे, वि. रा.