हीहॉन : स्पेनच्या उत्तर किनाऱ्यावरील ओव्हिडो प्रांतातील बिस्के उपसागरावरील प्रमुख बंदर व अस्टुरियाझ विभागातील सर्वांत मोठेव्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या २,८१,६४९ (२०११). इ. स. पूर्व पाचव्या शतकात या शहराची स्थापना झाली. ह्या शहरावर बरीच वर्षे मूरांचा अंमल होता. त्यांच्याकडून ख्रिस्ती लोकांनी परत जिंकून घेतलेले हे पहिले शहर आहे. मध्ययुगीन कालखंडात या शहराचा गिगिआ असा उल्लेख आढळतो. अनुकूल हवामान, शेती व पशुपालनाचा विकास व खनिजांची उपलब्धता यांमुळे या शहराची झपाट्याने प्रगती होत गेली. अलीकडच्या काळात या शहरामध्ये सेवाक्षेत्रातील व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हे स्पेनमधील एक महत्त्वाचे बंदर असून येथून पोलाद, कोळसा, फळे, मासे, पशूत्पादने यांची प्रामुख्याने देशाच्या इतर भागांत व यूरोपीय देशांत निर्यात होते. हे स्पेनमधील प्रमुख सांस्कृतिक, कलाक्रीडा केंद्र असून त्याच्या मध्यवर्ती भागात १३सार्वजनिक ग्रंथालये व अनेक क्रीडाकेंद्रे आहेत. हे शहर खेळांसाठी प्रसिद्ध असून फुटबॉल, हॉकी, बेसबॉल हे येथील प्रमुख व्यावसायिक क्रीडाप्रकार आहेत. हीहॉनचा क्रीडा क्लब हा अस्टुरियाझ प्रांतातील सर्वांत मोठा क्रीडासंघ आहे. भव्य राजवाडे, चर्चे, सागर किनारी प्रदेश, उबदार सूर्यप्रकाश आणि प्रसिद्ध क्रीडा केंद्रे यांमुळे शहरात पर्यटन व्यवसायाची विशेष प्रगती झाली आहे. 

आजगेकर, बी. ए.