नॅझारेथ: (अरबी–एन् नासरा, हिब्रू–नाझरात). इझ्राएलच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टचे शासकीय केंद्र व ख्रिश्चनांचे एक मोठे धर्मक्षेत्र. लोकसंख्या ३४,००० (१९७०). उत्तर इझ्राएलमध्ये गॅलिली समुद्राच्या नैर्ऋत्येस २४ किमी., भूमध्य समुद्रापासून ३२ किमी. व बेथलिएमच्या उत्तरेस ११२ किमी. वर टेकड्यांच्या परिसरात हे इतिहासप्रसिद्ध शहर वसलेले आहे. येशू ख्रिस्ताचे बालपण येथे गेले असल्यामुळे हे ख्रिस्ती लोकांचे मोठे धर्मक्षेत्र व यात्रास्थान ठरले आहे.

नॅझारेथचे विहंगम दृश्य

धर्मयुद्धे (क्रूसेड्स) चालू झाल्यानंतर नॅझारेथचा कबजा घेण्यासाठी ख्रिस्ती व इस्लाम धर्मीयांनी खूप प्रयत्न केले. अकराव्या शतकाच्या शेवटी नॉर्मन-सिसिलियन राजपुत्र तँक्रेदने नॅझारेथ ही आपली राजधानी केली होती. परंतु सॅलदीन याने ११८७ नंतर ख्रिस्ती लोकांना नॅझारेथहून हुसकावून लावले. लेबाननचा अमीर फक्रुद्दीन याने सतराव्या शतकात ख्रिस्ती लोकांना नॅझारेथला वस्ती करण्याची परवानगी दिली. सध्या नॅझारेथमध्ये सुमारे एकतृतीयांश लोक यहुदी आहेत. ख्रिस्ती बहुसंख्य असून त्यांखालोखाल मुस्लिमांची वस्ती आहे.

पहिल्या महायुद्धानंतर पॅलेस्टाइन महादेशाप्रमाणे नॅझारेथ ब्रिटिशांकडे आले. दुसऱ्या महायुद्धानंतर महादेश संपला आणि इझ्राएलच्या स्थापनेनंतर जुलै १९४८ मध्ये, इझ्राएलने अरबांकडून नॅझारेथ जिंकून घेतले.

गॅलिलीच्या प्रदेशातील लोकांची नॅझारेथ ही एक मोठी व्यापारपेठ आहे. अन्नावर प्रक्रिया करण्याचे, मोटारींचे सुटे भाग जुळविण्याचे व वस्त्रोत्पादनाचे कारखाने या शहरात आहेत. नॅझारेथमधील चर्च हे शहराचे मुख्य वैभव आहे. १९६६ मध्ये बांधून पूर्ण झालेले रोमन कॅथलिक चर्च (यालाच ॲनन्सिएशन चर्च असेही म्हणतात) हे शहराचे मुख्य आकर्षण आहे. हे मध्यपूर्वेतील सर्वांत मोठे चर्च आहे. येथेच गाब्रिएलने मेरीला तू येशूची माता होशील असे सांगितले. येथे ग्रीक कॅथलिक लोकांचे चर्च, सिनॅगॉग, जोसेफचे चर्च इ. प्रमुख ठिकाणे आहेत. ‘मेन्सा ख्रिस्ती’ म्हणजे ज्या टेबलावर येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर भोजन केले असे म्हणतात, ते चर्चमध्ये ठेवलेले आहे. बऱ्याच चर्चमधील संग्रहालयांत येशू ख्रिस्ताच्या वेळच्या अनेक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. येथे मुलांची शाळा, मुलींची शाळा, रुग्णालय, मोफत दवाखाना इ. चर्चच्या मार्गदर्शनाखाली चालविलेली आहेत. सभोवतीच्या टेकड्यांवरून रंगमंडलाकार रचनेचे नॅझारेथचे दृश्य मोठे मनोवेधक दिसते. पर्यटक व यात्रेकरू यांचे नॅझारेथ हे एक मोठेच आकर्षण आहे.

भागवत, अ. वि.