गुंतूर : आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व किनाऱ्यावरील गुंतूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर व तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारकेंद्र. लोकसंख्या २,६९,९९१ (१९७१). हे हैदराबादच्या ४०० कि.मी. आग्नेयीस, मद्रास-कलकत्ता महामार्गावर, विजयवाड्याच्या नैर्ऋत्येस २९ किमी. असून गुंटकल, नागार्जुनसागर, तेनाली, विजयवाडा या शहरांना लोहमार्गांनी जोडलेले आहे. उत्तर सरकार परगण्याच्या राजधानीचे मुर्तझानगर नावाचे प्रसिद्ध असलेले हे शहर निजामाकडून १७८८ मध्ये ब्रिटिशांना मिळाले. कृष्णा कालव्यांनी समृद्ध बनलेल्या परिसरामुळे गुंतूर पूर्वीपासूनच मोठी व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. तंबाखू, धान्य, कापूस, भुईमूग यांचा मोठा व्यापार येथे असून तंबाखूच्या मोठ्या उद्योगाशिवाय भात सडणे, भाताच्या कोंड्यापासून व भुईमुगापासून तेल काढणे, कातडी कमावणे, धातूच्या विविध वस्तू, नित्योपयोगी वस्तू इत्यादींचे अनेक उद्योग येथे आहेत. सहा महाविद्यालये व अनेक शैक्षणिक संस्था येथे असल्याने हे शिक्षणाचेही केंद्र मानले जाते. ३० किमी.वरील नागार्जुनसागराच्या सान्निध्यामुळे गुंतूरला मोठा भविष्यकाळ आहे.

शाह, र. रू.