बाणकोट : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील दुय्यम प्रतीचे बंदर. हे सावित्री नदीमुखाशी आणि बाणकोट खाडीच्या किनाऱ्यावर मुंबईच्या आग्नेयीस सु. ११७ किमी.वर वसले आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस ‘बानकूट’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे गाव इंग्रजांच्या काळात ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ म्हणून ओळखले जाई. मराठ्यांचे आरमारप्रमुख आंग्रे यांचेही येथे ठाणे होते. १७५६ मध्ये घेरीया गढीच्या मोबदल्यात मराठ्यांनी बाणकोट इंग्रजांना दिले. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांची ही पहिली वसाहत बनली. त्या काळात मुंबईला रसद पुरवठा करणारे गाव म्हणून ते प्रसिद्ध होते. हवापालट करण्यासाठी तसेच निसर्गरम्य स्थळ म्हणून प्रवाशांची येथे वर्दळ असे. १७७१ मध्ये जेम्स फॉर्ब्झने याला भेट दिली होती.१८२२ पर्यंत जिल्ह्यातील एक प्रमुख शहर म्हणून याची गणना होत असे. पावसाळा सोडल्यास हे बंदर वाहतुकीसाठी खुले असते. प्रवासी वाहतूक लाँचने केली जाते. येथून मासळीचा मोठा व्यापार चालतो. डोंगरावरील किल्ल्यात हरिहरेश्वराचे मंदिर आहे. येथून जवळच (सु.३ किमी.) असलेल्या वेळास या नाना फडणीसांच्या मूळ गावी १९५५ मध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाणकोटमधील सीमाशुल्क कार्यालय आणि टेकडीवरील डाकबंगला या वास्तू उल्लेखनीय आहेत.

कापडी, सुलभा.