पश्चिम बंगाल राज्य : भारताच्या पूर्व विभागातील एक राज्य विस्तार २१ ३८’ उ. ते २७ १०’ उ. व ८५५०’. ते ८९ ५०’ पू. यांदरम्यान असून, या राज्याच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. क्षेत्रफळ ८७, ८५३ चौ. किमी., लोकसंख्या ४,४३,१२,०११ (१९७१), १९४७ साली फाळणी होऊन प.बंगालचे राज्य अस्तित्वात आले, तेव्हा उत्तरेकडील जिल्ह्ये दक्षिणेकडील भागाशी जोडण्यासाठी बिहारमधील माल्डा जिल्ह्याचा काही भाग या राज्यात समाविष्ट करण्यात आला. १९५० साली कुचबिहार व २ ऑक्टोबर १९५४ रोजी चंद्रनगरची फ्रेंच वसाहत बंगालमध्ये विलीन करण्यात आली . १९५६ साली  राज्यपुनर्रचनेच्या वेळी बिहारमधील पुरूलिया जिल्ह्याचा बराच भाग भाषिक तत्त्वावर प. बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आला. प. बंगाल राज्याच्या सीमा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या राज्यातील केवळ १५ किमी. रुंदीच्या नक्षलबारी पट्टीने आसामसारख्या ईशान्येकडील राज्यांशी संपर्क राहतो. उत्तरेस नेपाळ, सिक्कीम व भूतान यांच्या सीमा प. बंगालला भिडल्या आहेत. पश्चिमेस बिहार व ओरिसा ही राज्ये, तर पूर्वेस आसाम व बांगला देशाची सीमा असून, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातील ही सीमा अत्यंत गुंतागुंतीची  आहे. राज्याची दक्षिणोत्तर लांबी ८०० किमी. व रुंदी ३०० किमी. आहे. कलकत्ता हे राजधानीचे शहर आहे.

भूवर्णन :प. बंगाल हे राज्य मुख्यतः मैदानी असून, उत्तरेकडे फक्त पर्वतप्रदेश आहे, पश्चिमेकडील पठारकडा व पुरूलियाचा उंच प्रदेश एकत्रितपणे ६ % क्षेत्र व्यापतात. उरलेला ९४ % भाग गंगेचे मैदान व त्रिभुज प्रदेश यांनी बनला आहे. उत्तरेकडील पर्वतरांगा नेपाळ सिक्कीममधील पर्वतरांगांचे दक्षिणेकडील भाग असून, येथून कांचनजंघा व अन्य शिखरे दिसतात, पण दार्जिलिंग परिसरात राज्यातील सर्वोच्च उंची ३, ६५८ मी. आहे. मैदानी प्रदेश उत्तरेस जलपैगुरीपासून दक्षिणेस सुंदरबनपर्यंत सलग पसरला आहे. माल्डा भागातून (बिहारमधून) गंगा येते व बांगला देशाच्या सीमेवरच तिच्या दोन शाखा होतात एक शाखा आग्नेयीस बांगला देशामध्ये जाऊन ब्रह्मपुत्रेस मिळाल्यानंतर ‘पद्मा’ या नावाने वाहते तर दुसरी दक्षिणेस पश्चिम बंगालमधून वाहते. तिला ‘भागीरथी – हुगळी’ म्हणतात. हुगळी व बांगला देशाची सीमा यांमधील भागास ‘मोरिबंद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात तर हुगळीच्या पश्चिमेकडील भागास ‘हॉर्न मैदान’ म्हणतात. गंगा नदीचे बरेच पाणी बांगला देशातील पद्मा नदीतूनच वाहते व त्यामानाने भागीरथी-हुगळी नदीतील प्रवाह दिवसेंदिवस  क्षीण होत आहे, इतका की वर्षातील आठ महिने गंगा व भागीरथीचा संबंधच नसतो (हुगळीलाच बंगालच्या उत्तर भागात भागीरथी म्हणतात) म्हणून पद्मा, भागीरथी यांच्या विभाजनपूर्व पात्रात भारताने गंगेवर फराक्का बंधारा बांधला आहे व गंगेचे जादा पाणी भागीरथी-हुगळीमध्ये सोडावयाची व्यवस्था केलेली आहे. एप्रिल १९७७ मध्येच भारत-बांगला देश यांमधील फराक्का वाद शांततेने मिटला आहे. दक्षिणेस सुंदरबन हा त्रिभूज प्रदेशाचा नवीन भाग आहे. यातील काही भरून काढलेल्या भागास ‘अबड’ म्हणतात. या भागाच्या शेवटी किनाऱ्‍यालगत नवीन भरून काढलेले भाग आहेत, त्यांस ‘हरिभंगा’ म्हणतात. या भागांत निर्वसितांचे पुनर्वसन करण्यात येत आहे.

गंगेचा फारच थोडा भाग या राज्यातून पश्चिम-पूर्व दिशेने वाहतो व पूर्वेस बांगला देशाच्या सीमेवरून भागीरथी-हुगळी हा प्रवाह पश्चिम बंगालमध्ये येतो. सुंदरबनात अनेक मुखांनी तो प्रवाह बंगालच्या उपसागरास मिळतो. येथे अनेक रुंद खाड्या आहेत. त्यांत हुगळी ही खाडी सागर बेटाजवळ २० किमी. रुंद आहे, तर मातला ही दुसरी खाडी १५ किमी. रुंद आहे. गुआसाबा व हरिभंगा या इतर रुंद खाड्या आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पौर्णिमा-अमावास्येस या खाड्यांत प्रचंड पाणभिंती निर्माण होतात आणि मोठे नुकसान होते.

भागीरथीच्या पश्चिमेकडील उपनद्याच भागीरथीचा प्रवाह फराक्का धरणापूर्वी उऱ्‍हाळ्यात जिवंत ठेवीत आसत. मयूराक्षी ही नदी आपल्या ब्राह्मणी, द्वारका, वक्रेश्वर व कोपाई या उपनद्यांसह भागीरथीला मिळते भागीरथीच्या उंच पूरतटामुळे मयूराक्षी भागीरथीला ३० किमी. समांतर वाहते व नंतर त्यांचा संगम होतो. दक्षिणेस अजय व तिच्या दक्षिणेस खारी, बंका व बेहुला या छोट्या नद्या आहेत. एकेकाळी दामोदर नदी या नद्यांतून वाहत होती, पण जलापहरणमुळे दामोदर नदीचा प्रवाह आज या प्रवाहांच्या दक्षिणेस आढळतो. दामोदर नदी पश्चिमे कडून सरळ प. बंगालमध्ये वाहते आणि शक्तिगढजवळ अचानक दक्षिणवाहिनी बनते. शक्तिगढ ते पानगढपर्यंतचा ७० किमी. नदीचा प्रवाह रुंद, उथळ व वाळूने भरलेला असून या भागातच भयानक पूर येतात. या भागात नदीला चुकीच्या पद्धतीने बांधलेले तट हे मुख्यतः भयानक पुरांचे कारण असून त्यांमुळे वाळूचे प्रचंड संचयन होऊन तदीचे पात्र पूरमैदानापेक्षा उंचावले आहे. १९४३ सालच्या पुरामुळे कलकत्ताचे भारताच्या इतर भागांबरोबरचे संबंध तीन महिने तुटले. ग्रँड ट्रंक रोड व लोहमार्ग वाहून गेले, शेतीचे अपरिमित नुकसान झाले. दामोदरचे पूरनियंत्रण करण्याच्या प्रमुख उद्देशाने दामोदर खोरे प्रकल्प हा बहूद्देशीय प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे पण प्रकल्पाची प्रमुख धरणे बिहारमध्ये प. बंगाल सीमेवर आहेत. दामोदरच्या दक्षिणेस रूपनारायण व कांगसाबती ( कासई) या हुगळीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

बंगालमध्ये मातीचे प्रकार फारसे नाहीत. पर्वतीय भागात मुरमाड माती, तर पश्चिमेकडे पठारी भागात लाल विदारित माती व मैदानी प्रदेशात गाळजमीन आढळते. किनाऱ्‍यालगत खारजमीनही बरीच आहे.

खनिज संपत्ती :राज्यात अनेक खनिजे आढळतात, तरी त्यांत दगडी कोळसा व आगबंद माती ही दोन खनिजे मूल्यदृष्ट्या ९९% उत्पादन देतात. भारतातील कोळशाची पहिली आधुनिक खाण राणीगंज येथे याच राज्यात सुरू झाली. भारतातील दगडी कोळशापैकी ३३% कोळसा या क्षेत्रात असावा, असा अंदाज आहे. आज आसनसोल व दुर्गापूर या क्षेत्रांतही कोळशाचे उत्पादन सुरू झाले आहे. देशातील ३०% कोळसा प. बंगालमध्ये निघत असून, कोळसा उत्पादनात या राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे. दार्जिलिंग कोळसाक्षेत्र हे विकसित करण्यात आलेले असून, बाग्राकोट व माल येथे खाणी आहेत. कोळशाच्या काही खाणींत आगबंद माती सापडते, ती उच्चतापसह द्रव्ये व भांडी यांसाठी वापरली जाते. शिवाय चिनी माती, डोलोमाइट, शंखजिरे इ. खनिजे व टंगस्टन, मँगॅनीज, लोह, आर्सेनिक यांची धातुके अल्प प्रमाणात सापडतात.

हवामान : पश्चिम बंगालचे उष्ण, आर्द्र आणि मान्सून प्रकारचे आहे. भारताच्या इतर भागांत आढळणारे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हेच ऋतू येथेही अनुभवास येतात. १ मार्च ते १० जूनपर्यंत उन्हाळा आढळतो. दिवसा तापमान ३८ से. पेक्षाही जास्त असते, तर रात्री ते २२ से, पर्यंत कमी होते. १० जून ते १० ऑगस्टपर्यंतचा काळ पावसाळ्याचा आहे. राज्यातील सरासरी वार्षिक पर्जन्य १७५ सेंमी. आहे, पैकी १२५ सेंमी. जून ते सप्टेंबर या काळात पडतो. उत्तरेकडे पर्वतीय भागात पर्जन्यमान ४०० सेंमी. असून, नैर्ऋत्येस ते कमी होते. बांकुरा जिल्ह्यात केवळ ११८ सेंमी. पाऊस पडतो. पूर्वेस चोवीस परगणा, मिदनापूर, हावडा व दक्षिणेस सुंदरबन या भागांत पावसाची सरासरी १४० ते १६० सेंमी. आहे. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा काळ मान्सूनच्या परतीचा असून या काळात तपमान पुन्हा वाढते व उच्च आर्द्रतेमुळे हा काळ अत्यंत त्रासदायक ठरतो. १५ नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात उत्तरेकडील पर्वतांचा भाग सोडल्यास तपमान कधीही १५ से. खाली जात नाही. दिवसा तपमान २० ते २८ से. पर्यंत आढळते, रात्री ते १५ ते २० से. पर्यंत कमी होते. उत्तरेस दार्जिलिंगजवळच्या सिंगलिला डोंगररांगेवर मात्र हिमवर्षाव होतो व बर्फ मार्च महिन्या पर्यंत टिकते. काही वेळा उत्तरेकडून येणाऱ्‍या थंडीच्या लाटा संपूर्ण राज्यातील तपमान अचानक घटवितात. मे, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात चक्री वादळे बंगालच्या उपसागरावरून राज्यात येतात. त्यामुळे मुसळधार वृष्टी आणि वेगवान समुद्राच्या लाटा यांमुळे खूपच नुकसान होते.


वनस्पती व प्राणी :राज्याचा १२,००० चौ. किमी. किंवा १४ % भाग जंगलव्याप्त आहे. जंगल मुख्यतः उत्तरेस डोंगराळ भागात असून त्यात उष्ण कटिबंधीय वृक्ष आढळतात. पश्चिमेकडील पठार कड्यावर पानझडी अरण्ये आहेत, तर सुंदरबनात खाजणी जंगल आहे. उत्तरेस डोंगरपायथ्याच्या भागांत सदाहरित जंगले आहेत, पण १,००० मीटरनंतर हिरडा, तून, सोनचाफा, लॉरेल आणि बांबू आढळतात. १,५००–३,००० मीटरच्या भागात ओक व पाइन ही झाडे व उंचीवर कवठी चाफा, ऱ्‍होडोडेंड्रॉनची झाडे व त्यांत सिल्व्हर फरचे मिश्रण आहे. पठाराच्या पश्चिमेकडच्या भागात शाल, पळस, मोह, लाल सावर , हिरडा आणि बांबू आहेत. घाणेरी, वनतुलसी आणि आखरा ही झुडुपेही या भागात आहेत. सुंदरबनच्या  भागात सुंद्री, गोरान, गेवा, तिवर व धुंडाल ही खारजमिनीत वाढणारी झाडे आहेत. किनाऱ्‍यावर केवड्याची झुडुपे आढळतात. मैदानी भागात फारसे जंगल नाही. काही तुरळक  छायावृक्ष व शेतकऱ्‍यांनी राखलेले वृक्ष आहेत. त्यांत वड, पिंपळ व आंबा हे प्रमुख असून, पश्चिमेस बाभळीची झाडे आहेत. एकूण जंगले कमी असल्याने वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊन उत्तरेस साग व शाल वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊन येत आहेत. त्याचबरीबर खैर, शिसू, शिवण, चिलौनी आदी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

वन्य प्राणिजीवन राज्याच्या उत्तर भागात विपुल आहे. जलपैगुरी, दार्जिलिंग व प. दिनाजपूर या जिल्ह्यांत गेंडा, हत्ती, हरिण आणि वाघ हे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी जलदापारा अभयारण्य विकसित करण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ ९३ चौ. किमी. आहे. जलभाग विशेष असल्याने अनेक प्रकारचे पाणपक्षी व साप या प्रदेशात आहेत. सुंदरबनमध्ये समुद्रतटीय विपुल प्राणिजीवन आहे, खास परवानगी घेऊन शिकार करण्याची काही भागांत व्यवस्था आहे.

डिसूझा, आ. रे.

इतिहास :प्राचीन काळी ‘वंग’ नावाची जमात या प्रदेशात राहत होती, असे ऐतरेय आरण्यक व बौधायन धर्मसूत्र यांवरून दिसते. आईन- इ-अकबरीत वंग  व बंगाल एकच होते असे म्हटले आहे पण कोरीव लेखांवरून ते वेगळे असण्याची शक्यता जास्त आहे. बंग+आल (= बांध) अशी नावाची व्युत्पत्ती आहे. महापाषाणयुगाचे अवशेष गोपीनाथपुर ( बांकुरा) व राणीगंज (बरद्वान) येथे आढळतात. झारग्राम, तामलूक, दुर्गापूर, राणीगंज, कालिंपाँग, किआयचंद (मेदिनीपुर), छातना येथे उभे पाषाण आढळतात. हरिनारायणपूर (डायमंड हार्बरजवळ) व चंद्रकेतुगढ (चोवीस परगणा) येथील अवशेष हडप्पाकालीन असावेत, असा तज्ञांचा कयास आहे. हुगळी जिल्ह्यात समरांगणी पडलेल्यांच्या प्राचीन स्मृतिशिला आढळतात. वैदिक काळात या भागातील लोकांना दस्यू समजत परंतु रामायण-महाभारताच्या काळात आर्यसंस्कृतीचा येथे प्रसार झालेला दिसतो. या महाकाव्यांत व बौद्ध ग्रंथ संयुत्तनिकाया मध्ये येथील पुंड्र, सुम्ह या जमातींचा उल्लेख आढळतो. पाणिनीने गौडपुराचा तर पतंजली आणि कौटिल्य यांनी गौडांचा उल्लेख केला आहे. जैनांच्या आचारांग- सूत्रात राढ (बरद्वान विभाग) भागातील बिकट प्रवासाचे वर्णन आहे. ग्रीक इतिहासकार येथील लोकांना ‘गंगारिदाई’ म्हणत. मौर्य साम्राज्यापूर्वी  व नंतर या भागात स्वतंत्र राज्ये असावीत. इ. स. चौथ्या  शतकात हा भाग गुप्त साम्राज्यात समाविष्ट होता. सहाव्या शतकाच्या सुरुवातीस वैन्यगुप्त हा गुप्तांचा सामंत समतट (पूर्व व दक्षिण बंगाल) येथे स्वतंत्र राज्य करू लागला. कोरीव लेखांत गोपचंद्र, धर्मादित्य, समाचारदेव ही या शतकातील येथील इतर स्वतंत्र राजांची नावे आढळतात. गौडावरील प्रभुत्वासाठी गुप्तांना मौखरींशी संघर्ष करावा लागला. समतटातील स्वतंत्र राज्यांचा शेवट गौडाच्या शशांकाने, की चालुक्य नृपती कीर्तिवर्मनने केला हे समजत नाही. शशांकाचा उदय गौडामध्ये सातव्या शतकाच्या सुरुवातीस झाला. हा बंगालचा पहिला कर्तबगार सम्राट. याने बंगालबाहेरही राज्यविस्तार केला. बाणभट्ट व यूआन च्वांग यांच्या मते, तो बौद्धांचा शत्रू होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य विस्कळित झाले. इ. स. ६३८ मध्ये या भागातील पुंड्रवर्धन, कर्णसुवर्ण, ताम्रलिप्ती व समतट राज्यांचा उल्लेख यूआन च्वांग करतो. सातव्या शतकात बंगालच्या काही भागात राज्य करणाऱ्‍या  खड‌्ग, शैल, भद्र अशा वंशांची नावे आढळतात. कनौजच्या यशोवर्माने बंगाल जिंकला, पण काश्मीरच्या ललितादित्याने त्याचा पराभव केल्याने गौडाला ललितादित्याचे मांडलिकत्व पतकरावे लागले. पालांचा उदय होईपर्यंत बंगालमध्ये एकछत्री कारभार नव्हता. गोपाल हा पहिला पालराजा लोकनियुक्त दिसतो. पाल राजे बौद्धधर्मी होते, त्यांनी बंगालवर सु. चार शतके राज्य केले व बंगालच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घातली धर्मपाल (७८०–८१५) व देवपाल (८१५ –८५५) यांनी पालांच्या सत्तेची वाढ केली. यानंतर राष्ट्रकूट व प्रतीहार राजांशी पालांना संघर्ष करावा लागला. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व बंगाल स्वतंत्र होऊन तेथे चंद्र व वर्मवंशीय राजे उदयाला आले. खिळखिळे झालेले पालांचे राज्य महीपाल (सु. ९८० – १०३०) याने सावरले. त्याला दक्षिणेतील राजेंद्र चोल व उत्तरेतील कलचुरी गांगेयदेव यांचा प्रतिकार करावा लागला. त्यानंतर कैवर्त दिव्य याने उत्तर बंगाल (वरेंद्री) बळकावला. रामपालाने राज्य सावरण्याचा केलेला प्रयत्न अखेरचा ठरला. चालुक्य, पूर्वेकडील गंग, गाहडवाल आदी राजे आणि अंतःकलह यांमुळे बारव्या शतकात पालांची सत्ता नामशेष झाली. अकराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिणेतून येऊन राढ भागात स्थायिक झालेल्या सेनवंशीयांनी बंगालवर प्रभुत्व स्थापले. त्यातील विजयसेनाने गौड व वंग जिंकून सत्ताविस्तार केला. या वंशातील बल्लालसेन हा विद्येचा मोठा  भोक्ता होता. त्याचा मुलगा लक्ष्मणसेन याने पश्चिमेला राज्यविस्तार केला. त्याने स्वतः ग्रंथरचना केली असून विद्वानांना त्याने आश्रम दिला. सेनांनी हिंदू धर्माचे पुनरुत्थान केले. मुसलमानांची आक्रमणे आणि प्रबळ होऊ लागलेले मांडलिक राजे यांमुळे तेराव्या शतकाच्या मध्यास सेनांच्या सत्तेचा ऱ्‍हास झाला. सेनकालात संस्कृतला उत्तेजन मिळाले. याच काळात पूर्व बंगालमध्ये देव वंशाचे राज्य होते. एव्हापट्टीबोरा (टिपेरा) येथील राज्य स्वतंत्र असून त्याचे ब्रह्मदेशाशी संबंध होते.


तेराव्या शतकाच्या सुरुवातीस बख्तियार खल्जी या धाडसी मुसलमानाने नडिया येथे लक्ष्मणसेनावर हल्ला केला, वरेंद्री भाग बळकावला आणि गौड-लखनावतीच्या मुस्लिम सत्तेचा पाया घातला. त्याच्या मूत्यूनंतर झालेल्या बंडाळीत घियासुद्दीन इवाझ याने सत्ता बळकावली. दिल्लीच्या मामलूक सुलतानांनीही (गुलाम वंश) या भागात अधिसत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत बंगालमधील त्यांच्या सुभेदारांनी बंडाळ्या कराव्यात, त्यांचा बिमोड व्हावा पण त्यांनी पुन्हा डोके वर काढावे असा प्रकार चालला होता. तुघ्रिल तुघानने केलेले बंड स्वतः बल्बनने जातीने शमविले आणि स्वतःच्या घराण्याचे बंगालवर वर्चस्व स्थापिले. गुलाम घराण्यातील सुलतानांनी १३२८ पर्यंत येथे सत्ता गाजविली. लखनावती, सातगांव, सोनारगांव आणि चितगाँग असे त्यांच्या राज्याचे विभाग होते. ते दिल्लीच्या सुलतानांपासून स्वतंत्रपणे वागत. यानंतर तुघलकांचा बंगालवर वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न अल्पकालीन ठरला. या काळातील बंगालचे वर्णन इब्न बतूता या प्रसिद्ध प्रवाशाने केले आहे. चौदाव्या शतकाच्या मध्यात हाजी इलियास बंगालचा स्वतंत्र सुलतान बनला. त्याने बराच राज्यविस्तार केला. त्याचा मुलगा सिकंदरशाह याने अनेक सुंदर वास्तू बांधल्या. इल्यास वंशातील आजमशाहाने आसामातील आहोमांशी युद्ध केले, जौनपूरचे शर्की व चीन यांबरोबरही राजनैतिक संबंध प्रस्थापिले. नंतरच्या दुर्बल सुलतानांमुळे पंधराव्या शतकाच्या सुरुवातीस दिनाजपूरचा जमीनदार गणेश याने सत्ता बळकाविली पण शर्कीच्या प्रभावाने त्याचा मुलगा जदुसेन मुसलमान झाला व जलालुद्दीन या नावाने कारभार करू लागला. त्याची राजधानी काही काळ पंडुआला होती पण पुढे गौडांकडे परत आली. पंधराव्या शतकाच्या मध्यास इल्यासवंशीयांचे पुनरुज्जीवन झाले. शर्कींचा धोका न राहिल्याने या घराण्यातील नासिरूद्दीनने कलेकडे लक्ष दिले. त्याचा मुलगा तुर्बक याने कामरूप, ओरिसावर स्वाऱ्‍या केल्या व बंगाली वाङ्मयातही रस घेतला, परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याने सैन्यात भरती केलेल्या हबशांनी सत्ता बळकाविली ( १४८६–९३ ). त्यांच्या क्रौर्यामुळे माजलेल्या बंडाळीतून वझीर हुसेनशाह याने राज्यसूत्रे हाती घेतली. १५३८ पर्यंत बंगालमध्ये हुसेनशाही घराण्याची राजवट होती. या काळात या घराण्याने बिहार, ओरिसा, टिपेरा, कामरूप येथे लढाया करून राज्यविस्तार केला बंगाली वाङ्मयाचा विकास झाला व चैतन्य संप्रदायी वैष्णवपंथाने मूळ धरले. १५३८ नंतर हुमायून- शेरशाहच्या सत्ताद्वंद्वात बंगाल हे सुद्धा एक युद्धक्षेत्र बनले. शेरशाहने हुसेनशाही घराण्याचा शेवट करून स्वतःची सत्ता स्थापली. त्याचा वंश बंगालमध्ये १५६४ पर्यंत टिकला नंतर याच काळात प्रबळ झालेल्या अफगाणांपैकी कर्रानी वंशाच्या हाती सत्ता गेली त्यांतल्या सुलेमानाने राज्यविस्तारही केला.

अकबराने १५७६ मध्ये बंगाल मोगल साम्राज्याला जोडला. त्यासाठी त्याला प्रथम येथील बंडाळ्यांचा बीमोड करावा लागला, तरीही जहांगीरच्या काळात मोगल सत्तेला स्थानिक राजांकडून विरोध होत राहिला. त्यांना ‘बारा भुयाँ ’ अशी संज्ञा होती. जेसोरचा प्रतापादित्य हा त्यातला प्रमुख. सतराव्या शतकात मोगलसत्ता पूर्व बंगालसह सर्वत्र दृढ झाली. मोगल सुभेदारांनी आराकान, कामरूप, काचर, कुचबिहार, ओरिसा या प्रदेशांत ती वाढविली व हुगळी, चितगाँग येथील पोर्तुगीज चाचेगिरीचा बंदोबस्त केला. याच काळात वैष्णव संप्रदायाचा प्रसार झाला. यूरोपीयनांनी व्यापारासाठी बंगालमध्ये वखारी उघडल्या. डाक्का ही मोगल सुभ्याची राजधानी. शाहजहान आणि शुजाअ यांच्या बापाविरुद्धाच्या बंडाळ्या सोडल्या, तर मोगल काळात बंगालला शांतता लाभली. शुजाअ, मीरजुम्ला, शायिस्तेखान आणि औरंगजेबाचा मुलगा अजीमुद्दीन हे बंगालचे मोगल सुभेदार. याला बंगालबरोबर बिहार-ओरिसाचीही सुभेदारी मिळाली होती. अठराव्या शतकात मुर्शिद कुलीखान (१७०३–२७) व शुजाउद्दीन (१७२८—३९) या नाममात्र मोगल पण जवळजवळ स्वतंत्र सुभेदारांनी बंगालचे कार्यक्षम प्रशासन करून महसूल पद्धतीचा पाया घातला. मुर्शिदकुलीने आपले ठाणे मुर्शिदाबादेला हलविले. शुजाउद्दीनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सर्फराझखान याला मारून अलीवर्दिखानाने बंगाल-बिहार- ओरिसाची सुभेदारी बळकावली (१७४०) व दुर्बळ मोगल सत्तेने ते मान्य केले. अलीवर्दीच्या काळातच नागपूरकर भोसल्यांच्या बंगालवरील स्वाऱ्‍या सुरू झाल्या. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा नातू सिराजउद्दौला गादीवर आला (१७५६).

इंग्रज-फ्रेंच युद्धानंतर अठराव्या शतकात त्यांनी आपापल्या वखारींना तटबंदी करण्याचा प्रयत्न केला, पण अलीवर्दीखानाने त्याला परवानगी दिली नाही. इंग्रजांनी सिराजउद्दौलाच्या सुभेदारीतील अंतःकलहाचा फायदा घेऊन त्याच्या संमतीवाचूंनच कलकत्त्याची तटबंदी सुरू केली आणि नबाबाच्या शत्रूंना आश्रय दिला, तेव्हा सिराजउद्दौलाने कलकत्त्यावर हल्ला केला. क्लाइव्हने शहर पुन्हा जिंकले व ⇨ प्लासीच्या लढाईत (१७५७) सिराजउद्दौला याचा पराभव झाला. इंग्रजांनी मीर जाफरला सुभेदारी दिली पण प्रत्यक्ष सत्ता मात्र क्लाइव्हच्या हाती राहली. त्याला कंपनीने बंगालचा गव्हर्नर नेमले. त्याची मुदत संपून तो परत गेल्यावर इंग्राजांनी पैसा उकळण्यासाठी मीर कासीमला सुभेदारीवर आणले पण खाजगी व्यापाराच्या प्रश्नावरून त्याचा कंपनीशी संघर्ष निर्माण झाला. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याचा वतीने लढणाऱ्‍या शुजाउद्दौला या अयोध्येच्या नबाबाचा बक्सरच्या लढाईत पराभव झाल्यामुळे (१७६४) कंपनीने बंगालवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापिले. पुढील तहात कंपनीने बिहार-ओरिसा-बंगालच्या महसूल वसूलीवर हक्क मिळविले. १७६९-७० मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. पुढे कंपनीच्या गैरकारभाराचे नियंत्रण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने रेग्युलेटिंग ॲक्ट संमत केला आणि तत्पूर्वी वॉरन हेस्टिंग्जला बंगालचे गव्हर्नर-जनरल नेमले (१७७२). नंतर कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल झाला (१७८६). बंगालची कंपनीच्या इतर इलाख्यांवरही अधिसत्ता चालू झाली. हेस्टिंग्ज व कॉर्नवॉलिस यांनी बंगालमध्ये ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला. कॉर्नवॉलिसने अंमलात आणलेल्या कायमधाऱ्‍याच्या पद्धतीतील रयतेवरील जुलूम एकोणिसाव्या शतकात कायदे करून कमी करण्यात आला. १८५४ मध्ये गव्हर्नर-जनरलला बंगालच्या कारभारातून मोकळे करून प्रांत नायब राज्यपालाकडे सोपविण्यात आला.

एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्य जीवनाच्या प्रभावाने भारतात झालेल्या प्रबोधनाचा उगम बंगालमध्ये झाला. राजा राममोहन रॉय हे या प्रबोधनाचे प्रणेते. त्यानी ब्राह्मो समाजाची स्थापना करून हिंदू धर्मातील सुधारणेचा, सतीसारख्या चालीरीतींविरुद्ध प्रचार करून सामाजिक स्थित्यंतराचा आणि हिंदू कॉलेजच्या (१८१७) स्थापनेत पुढाकार घेऊन शौक्षणिक विकासाचा पाया घातला. डेव्हिड हेयर व हेन्री डेरोझिओ यांसारखे परकीय आणि द्वारकानाथ व देवेंद्रनाथ टागोरांसारखे स्वकीय यांचे त्यांना साह्य झाले. पुढे ईश्वरचंद्र विद्यासागरांनी सामाजिक सुधारणेला आणखी चालना दिली. १८५१ मध्ये कलकत्त्याला स्थापन झालेल्या ब्रिटिश इंडिया असोसिएशनने अर्ज विनंत्यांचे राजकारण चालू केले. १८५७ च्या उठावात बंगालमधल्या फक्त शिपायांच्या पलटणीनीच भाग घेतला, पण निळीच्या मळेवाल्यांच्या जुलमाविरुद्ध विशेषतः जेसोर, नडिया जिल्ह्यांत झालेल्या आंदोलनाने राजकीय असंतोषालाही वाचा फुटली (१८५९—६९). मायकेल मधुसूदन दत्त आणि बंकिमचंद्र चतर्जी यांनी केवळ वाङ्मय समृध्द केले नाही, तर राष्ट्रवादाची नवी विचारधारा निर्माण केली. केशवचंद्र सेनांनी ब्राह्मोसमाजात नवचैतन्य आणले, तर रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी परदेशात हिंदू धर्माविषयी आस्था निर्माण केली. वाङ्मयीन कार्यांबरोबरच विश्वभारती विद्यापीठासारखे अभिनव शौक्षणिक प्रयोग करणारे रवींद्रनाथ टागोर हे बंगालमधील प्रबोधनाचा परमोच्चबिंदू होत. याचबरोबर हिंदमेळे (१८६७), इंडियन ॲसोसिएशन (१८७६), बंगाल प्रांतिक परिषद (१८८८) यांसारख्या संस्थानी आणि अमृत बझार पत्रिकेसारख्या वृत्तपत्रांनी राजकीय जागृतीला प्रभावी साधन पुरविले. १९०५ मध्ये बंगालची फाळणी करून ब्रिटिश सरकारने राष्ट्रवादाला आळा घालण्याचा प्रयत्न केला. या फाळणीनुसार डाक्का, चितगाँग, मैमनसिंग, टिपेरा हे जिल्हे आसामला जोडण्यात आलेपण त्याविरुद्ध देशभर आंदोलन झाले. स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण यांवरही भर देण्यात आला. १९०६ मध्ये डाक्क्याला स्थापन झालेल्या मुस्लिम लीगने ब्रिटिशांना पाठिंबा दिला. १९१२ मध्ये फाळणी रद्द झाली. हिंदुस्थानची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली आणि बंगाल हा गव्हर्नरचा प्रांत बनला. याच काळात दहशतवादी क्रांतिकारकांच्या बंगालमधील चळवळींना भऱ आला बारींद्रकुमार, अरविंद घोष, भूपेंद्रनाथ दत्त, ब्रह्माबांध उपाध्याय इ. क्रांतिकारक प्रमुख होते. संध्या, युगांतर, वंदेमातरम् यांसारखी वृत्तपत्रे व अनुशीलन समितीसारख्या गुप्त संस्थांनी चळवळीला उत्तेजन दिले पण अलीपूर बाँब खटला, पुढे चिनगाँगच्या शस्त्रागारावरील धाड यांसारख्या प्रकारणांतून क्रांतिकारकांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. विसाव्या शतकातील काँग्रेसप्रणीत स्वातंत्र्याच्या सर्व आंदोलनांतूनही बंगालने भाग घेतला आणि सुरेंद्रनाथ बानर्जी, बिपिनचंद्र पाल, चित्तरंजन दास व सुभाषचंद्र बोस यांसारखे नेते पुरविले. १९३५ च्या कायद्यानुसार बंगालला स्वायत्तता मिळाली. १९४६ मध्ये मुस्लिम लीगने कलकत्त्याला हत्याकांड सुरू केले, १९२२ च्या हिंदू-मुस्लिम दंग्यांची मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती नोआखाली, टिपेरा येथेही झाली. गांधीजींनी नोआखालीची पदयात्रा केली. १९४७ मध्ये बंगालची पुन्हा फाळणी होऊन मुसलमान बहुसंख्य असलेले पूर्वेकडील जिल्हे पूर्व पाकिस्तानात गेले. ब्रिटिश अमदानीत आसाम (१८७४) , बिहार व ओरिसा (१९१२) हे आधीच बंगालपासून अलग झाले होते. भारतातील बंगालच्या भागाला पश्चिम बंगाल हे नाव मिळाले. स्वातंत्र्योत्तर कुचबिहार संस्थान पश्चिम बंगालमध्ये विलीन झाले. १९५० च्या राज्यघटनेनुसार राज्याला ‘अ’ दर्जा मिळाला. चंद्रनगर हा फ्रेंच शासनाखालील छोटासा प्रदेश १९५४ मध्ये प. बंगालमध्ये विलीन करण्यात आला. १९५६ मध्ये राज्यपुनर्रचना समितीच्या अहवालानुसार बिहारमधील सु. ८,१७७ चौ. किमी. प्रदेश शासनाच्या सोयीसाठी प. बंगालला जोडण्यात आला. १९५८ मध्ये जलपैगुरी जिल्ह्यातील बेरुबाडी हा छोटासा विलग प्रदेश पूर्व पाकिस्तानात समाविष्ट करायला लोकसभेने संमती दिली.


राजकीय स्थिती : १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य अधिनियमाने प. बंगाल हे राज्य प्रथम अस्तित्वात आले. १ जानेवारी १९५० रोजी कुचबिहार हा प्रदेश प. बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि फ्रेंचांच्या ताब्यात असलेले चंद्रनगर हे २ ऑक्टोबर १९५४ पासून बंगालचा भाग बनले. १९५६ च्या राज्यपुनर्रचना अधिनियमानुसार बिहार राज्यातील (८,१७७ चौ. किमी.) प्रदेश प. बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आला. भारतीय संघराज्यातील हे घटकराज्य असून राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीनुसार मंत्रीमंडळ कारभार पाहते. मंत्रीमंडळ विधिमंडळाला जबाबदार असते. विधिमंडळ एकसदनी असून याचे २९४ सदस्य आहेत (१९७७). राज्यातून लोकसभेवर ४० आणि राज्यसभेवर १६ सदस्य निवडून दिले जातात. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे बरद्वान, जलपैगुरी व प्रेसिडेन्सी असे तीन विभाग पाडलेले आहेत. नडिया, बीरभूम, दार्जिलिंग, जलपैगुरी, पश्चिम दिनाजपूर, चोवीस परगणा, माल्डा, कुचबिहार, मुर्शिदाबाद, कलकत्ता, हावडा, हुगळी, बरद्वान, बांकुरा, मेदिनीपूर व पुरूलिया असे १६ जिल्हे असून जलपैगुरी व बरद्वान विभागांत प्रत्येकी सहा आणि प्रेसिडेन्सी विभागात दोन जिल्हे आहेत. कलकत्ता ही राजधानी असून उच्च न्यायासन तेथेच आहे. १९६४ मध्ये पंचायत राज्याची त्रिसूत्री योजना अंमलात येऊन १५ जिल्हा परिषदा, ३२५ अंचलिक परिषदा, १९,६६२ ग्रामपंचायती, २,९२६ अंचलपंचायती व ५२ न्यायपंचायती स्थापन झाल्या याशिवाय राज्यात एकूण ९० नगरपरिषदा असून कलकत्ता महानगरपालिकेची पुनर्रचना १९६९ मध्ये करण्यात आली. न्याय व अंमलबजावणी यांची चार जिल्ह्यांतून फारकत करण्याचा शासनाचा विचार आहे. स्वातंत्र्योत्तर शासनाला पूर्व पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले, तो प्रश्न अजूनही समाधानकारक रीत्या सुटलेला नाही. तरीही शिक्षण, वाहतूक, आरोग्य, उद्योगधंदे, कृषी, पशुसंवर्धन या क्षेत्रांत पंचवार्षिक योजनांद्वारा प्रगती झाली आहे. अस्थिर राजकीय परिस्थिती हा विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. १९७७ च्या निवडणुकीत सी. पी. आय. (एम्.) ने विधिमंडळात बहुमत मिळविले. त्यापूर्वी १९६७ पासून राज्यात काँग्रेसेतर पक्षांचे वर्चस्व वाढले होते. डाव्या पक्षांच्या संयुक्त आघाडीने बनवलेली मंत्रिमंडळे फार काळ टिकली नाहीत, म्हणून १९७१ पर्यंत राष्ट्रपतींची राजवट दोनदा जारी करावी लागली (जानेवारी १९६८ – फेब्रुवारी १९६९ मार्च १९७० – मार्च १९७२). १९७७ च्या निवडणुकीनंतर विधिमंडळातील पक्षोपक्षांचे बल पुढीलप्रमाणे आहे : सी. पी. आय. (एम्.) १७८, जनता २९, काँग्रेस २०, सी. पी. आय. २, इतर पक्ष ५५ व अपक्ष ९. या निवडणुका सुरळीत झाल्या तरी १९६७ पासून नक्षलवाद्यांची घातपाती कृत्ये व ‘घेराओ’, ‘बंद’ असे प्रकार काही भागात चालू असतात. तथापि सी. पी. आय. (एम्.) च्या हाती सत्ता आल्यानंतर राज्यातील अस्थिर वातावरण निवळले आहे.

गोखले, कमल

आर्थिक स्थिती : शेती हा राज्यातील प्रमुख उद्योग असून ५७.५% लोक शेतीमध्ये होते (१९७५). एकूण जमिनीपैकी ६२·६% किंवा ५५ लाख हे. जमीन शेतीखाली असून २६% वा १५ लाख हेक्टरांस जलसिंचन उपलब्ध झाले. शेतीमध्ये ७२,२७,१०८ लोक प्रत्यक्ष काम करीत होते. दामोदर खोरे, मयूराक्षी वकांगसाबती हे प्रमुख प्रकल्प असून फराक्का बंधारा मुख्यत:  हुगळीतील प्रवाह वाढविण्यासाठी बांधण्यात आला आहे. मयूराक्षी व कांगसाबती यांपासून अनुक्रमे २,४६,८६१ ३,८४,४६५ हेक्टरांस पाणी मिळते. १९७६ मध्ये ३८ छोट्या जलसिंचन योजनांस मान्यता देण्यात आली. भात, ताग व गहू  ही राज्यातील प्रमुख पिके असून, १९७४-७५ मध्ये त्यांच्याखालील क्षेत्र व उत्पादन अनुक्रमे ५४·२० लक्ष ४·९ लक्ष व ४·२२ लक्ष हे. आणि ६५·४३ लक्ष २६·०७ लक्ष व ८·३७ लक्ष टन झाले. नारळाखाली ३६,००७ हे. जमीन असून १३ कोटी नारळ मिळाले. यांशिवाय २,८४,००० टन कडधान्ये ७,६५,००० टन तेलबिया यांचे उत्पादन झाले. नवीन बियांणामुळे बटाट्याचे उत्पादन ९ लाख टनांवरून १९७५-७६ साली १६ लाख टनांवर गेले. चहाखालील क्षेत्रफळ व उत्पादन यांत प. बंगाल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून चहामळे दार्जिलिंग व जलपैगुरी या जिल्ह्यांत आहेत. चहाखाली १९७५ साली ८८,७८५ हे. क्षेत्र व २९७ मळे होते त्यांमधून १,८३,००० मजूर होते. १९७५ साली १,१७७·२३ लक्ष किग्रॅ. चहाचे उत्पादन झाले. देशातील ५०% ताग, २४% चहा व २५% मेस्ता उत्पादन या राज्यात होते. दार्जिलिंगच्या भागात थंड हवामानातील फळे मोठ्या प्रमाणात पिकतात. राज्यात १९७१ मध्ये ६९२ ट्रॅक्टर होते. मासेमारी व्यवसायाचा बराच विकास झाला असून, गोड्या पाण्यातील मासेमारी महत्त्वाची आहे. १९७५-७६ साली गोड्या पाण्यातून २·५ लक्ष मे. टन उत्पादन झाले. कोंताई येथे माशांची भुकटी बनविण्याचा व मासे डब्यात भरण्याचा कारखाना असून, कल्याणी व जनपत येथे मत्स्यसंवर्धन केंद्रे आहेत. देशातील ५·६% पशुसंपत्ती प. बंगालमध्ये असून १९७१ च्या पशुधन गणनेनुसार राज्यात गुरे १,१८,७८,०८३ म्हशी ८,२४,१६१ मेंढ्या ७,९३,३६९ बकऱ्या ५२,११,४४५ घोडे १४,५४८ व कोंबड्या १,५४,९१,९०५ होत्या. राज्यात कोळसा हे महत्त्वाचे शक्तिसाधन असून येथे असलेल्या कोळशाच्या एकूण २२० खाणींत १,१६,४६० मजूर काम करीत आहेत. १९७३-७४ मध्ये विजेचे एकूण उत्पादन ५,५३५ द.ल. किवॉ.ता.होते व १९७४-७५ पर्यंत राज्यातील १०,००० गावांस वीजपुरवठा करण्यात आला होता. प्रमुख वीजप्रकल्पांत बांदेल (औष्णिक) ३३० मेवॉ., कलकत्ता वीजमंडळाची चार केंद्रे ४२० मेवॉ., दुर्गापूर (औष्णिक) ४३५ मेवॉ., जलढाका (जलविद्युत्) २७ मेवॉ., संताल्दिह (औष्णिक) ४८० मेवॉ., दुर्गापूर (दामोदर खोरे योजनांतर्गत प्रकल्प–औष्णिक) २९० मेवॉ. यांचा समावेश होतो. १९७५ मधील राज्यातील अधिष्ठापित विद्युत्‌क्षमता १,३६७ मेवॉ. होती.

उद्योगधंदे : राज्यातील नोंदविलेल्या कारखान्यांची संख्या ५,९७७ होती (१९७५). राज्यातील औद्योगिक उत्पादन सबंध देशातील एकूण औद्योगिक उत्पादनाच्या २०%, तर कोळसा उत्पादन ३०% आहे. देशातील औद्योगिक कामगारांपैकी २२·५% कामगार या राज्यातच होते. १९७४ मध्ये राज्यातील नोंदणीकृत कारखान्यांत कामगारासंख्या सरासरीने ८·५४ लक्ष होती. त्याच वर्षी विविध उत्पादन क्षेत्रांत पुढीलप्रमाणे श्रमबल होते (आकडे लक्षांत) : कारखाने ८·५४ कोळसाखाणी १·२६ मळे २·१८ राज्य सरकारी सेवा २·८९ केंद्र सरकारी सेवा ४·१९ अर्ध-शासकीय सेवा ३·२२ इतर ४·५८. कृषिउद्योगात (शेतकरी व शेतमजूर) ७२,२७,१०८ लोक गुंतलेले होते (१९७१). कापड उद्योग हा सर्वांत महत्त्वाचा उद्योग असून, त्यात ३३% कामगारांस रोजगार मिळतो. ताग गिरण्या हा प्रमुख उद्योग असून देशातील ६५ तागगिरण्यांपैकी राज्यात असलेल्या ५३ गिरण्यांत २,९७,००० मजुरांस रोजगार आहे. येथे ४१ कापड गिरण्या असून हातमाग-यंत्रमागही बरेच आहेत. तागाचे कापड ९·५ लाख टन, तर सूत ५४५ लाख किग्रॅ. व सुती कापड २,००० लाख मी. असे उत्पादन झाले (१९७४). हे उद्योग कलकत्ता शहर परिसरात हुगळीच्या दोन्ही काठांवर ७० किमी. मध्ये आहेत. लोह-पोलाद उद्योग हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग असून, राज्यात दोन पोलादाचे कारखाने आहेत. बर्नपूर येथील पोलाद कारखाना व कुल्टी येथील ओतशाळा इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीची असून कारखाना १८७५ साली स्थापन झाला. नियमित उत्पादन मात्र १९२२ पासून सुरू झाले. त्याची क्षमता वार्षिक १० लाख टन पोलादाची असून उत्पादन ४ लाख टन आहे. दुसरा कारखाना सार्वजनिक क्षेत्रात दुर्गापूर येथे असून त्याची अधिकृत क्षमता २५ लाख टन आहे. १९७४ साली पोलाद उत्पादन १४·३८ लक्ष टन होते. चित्तरंजन येथे रेल्वेएंजिन कारखाना व रूपनारायणपूर येथे हिंदुस्थान केबल्स कारखाना आहे. दुर्गापूरजवळ खाणयंत्रे कारखाना, कलकत्त्यामध्ये नॅशनल इंस्ट्रुमेंट्‌स कारखाना, उत्तरपाडा येथील हिंदुस्थान मोटर्स कारखाना, आसनसोल व कलकत्ता येथील सायकलींचे कारखाने, गार्डन रीच येथील जहाजबांधणी कारखाना, बेलूर व आसनसोल येथे ॲल्युमिनियम कारखाने, टिटाघर, राणीगंज, नैहाटी व त्रिवेणी या ठिकाणी चार कागद कारखाने आहेत. रसायन उद्योग महत्त्वाचा असून गंधकाम्ल, रंग, रसायने, छपाईची शाई, तसेच औषध कारखाने, कॉस्टिक सोडा कारखाने, बर्नपूर आणि दुर्गापूर येथे खत कारखाने आहेत. हल्‌डिया येथे खनिज तेलशुद्धीकरण कारखाना व नत्रखत कारखाना हे स्थापण्यात आले आहेत. साखर कारखाने, चिनी मातीच्या भांड्यांचे प्रसिद्ध बेंगॉल पॉटरी वर्क्स कारखाने, बाटानगर येथील पादत्राणे व चामड्याच्या वस्तूंचा कारखाना, शिवण यंत्रे व विद्युत् उपकरणांचे कारखाने प्रसिद्ध आहेत. देशातील १८% कागद, ८८% शिवणयंत्रे, ४६% विद्युत्पंखे, ४८% रेल्वेडबे यांचे उत्पादन प. बंगालमध्ये होते पण इतर कोणत्याही राज्यापेक्षा प. बंगालमध्ये औद्योगिक अशांतता व कलह जास्त आहेत. राज्यात नोंदणीकृत ९८२ कामगार संघटना व ८३,३७७ कामगार सदस्य होते (१९७२). राज्यातील लघू व कुटिरोद्योगांची गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली असून, १९७२-७३ मध्ये त्यांची संख्या व त्यांमधील कामगार अनुक्रमे ११,९२७ व १,१८,४५० होते हेच आकडे १९७६-७७ मध्ये अनुक्रमे ९६,६२३ व ६,७८,६८१ होते.


भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा या राज्यात अंतर्गत जलमार्ग अधिक महत्त्वाचे आहेत. फराक्का बंधारा पूर्ण होण्यापूर्वी राज्यात हावडा पूल वगळता अन्य पूल नव्हता आणि तोही हुगळीपुरताच होता म्हणून अंतर्गत जलमार्ग महत्त्वाचे आहेत. फराक्का बंधाऱ्यामुळे हुगळी नदीत आता पुरेसे पाणी नेहमीच राहते, पण वाळूचे संचयन हा नेहमीचा प्रश्न आहे. राज्यात एकूण ७७९ किमी. लांबीचे जलवाहतूकयोग्य कालवे आहेत. दक्षिण-पूर्व व पूर्व रेल्वेची केंद्रीय कार्यालये कलकत्ता येथे आहेत. दर १,००० चौ. किमी.प्रदेशामागे ४२ किमी. लांबीचे लोहमार्ग राज्यात असून त्यांची लांबी ४,६५४ किमी. होती (१९७४-७५). फराक्का बंधाऱ्यावरून रेल्वेपूल बांधण्यात आल्याने कलकत्याहून सरळ आसाममध्ये रेल्वेने जाता येते. दर १०० चौ. किमी. क्षेत्रामागे ६४ किमी. लांबीचे रस्ते असून त्यांची एकूण लांबी ५६,०७२ किमी. होती. त्यांपैकी २१,९०५ किमी. डांबरी व १,६३७ किमी. राष्ट्रीय महामार्ग आहेत (१९७५). ग्रँड ट्रंक रोड राष्ट्रीय महामार्ग क्र. १ हा कलकत्याहूनच सुरू होतो. शिवाय कलकत्ता–नागपूर (क्र. ६), कलकत्ता–मद्रास (क्र. ५), कलकत्ता–आसाम (फराक्का पूलमार्गे) हे राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचे आहेत. ३१ मार्च १९७३ अखेर राज्यात ३६,३९८ मोटरसायकली ३५० ऑटोरिक्षा १,९०० जीपगाड्या ४३,३८८ खाजगी मोटारगाड्या ६,५८० टॅक्सी १,०८० बसगाड्या ३३,४५३ ट्रक व १६,१६० इतर वाहने होती. कलकत्ता शहरात देशातील अवशिष्ट असलेला एकमेव ट्राममार्ग असून १९७३-७४ मध्ये त्यातून २,७९,९५५ प्रवाशांनी प्रवास केला. येथे आकाशवाणी केंद्र व दूरदर्शन केंद्रही आहे.

लोक व समाजजीवन : राज्याची १९६१ साली लोकसंख्या ३,४९,२६,२७९ होती, ती १९७१ साली ४,४३,१२,०११ इतकी झाली. १९७८ च्या मध्यास ती अंदाजे ५·२० कोटी होती. १९६१-७१ या दशकात सरासरी वाढ २७.२% झाली. एकूण संख्येपैकी २४·६% संख्या नागरी आहे. राज्यात एकूण १३७ शहरे आणि ३८,५५० खेडी आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ५०४ असून केरळखालोखाल या राज्याचा क्रम लागतो. राज्यातील लोकसंख्येची घनता कलकत्ता शहरात दर चौ. किमी. स ३०,४९७ इतकी होती, तर कलकत्याभोवतालची शहरे धरून बनलेल्या नागरी प्रदेशात १२,४१९ इतकी होती. जलपैगुरी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांतच विरळ लोकवस्ती आहे. स्त्री-पुरुष प्रमाण दर हजारी पुरुषांमागे ८९२ स्त्रिया इतके होते. राज्यात ८८,१६,०२८ अनुसूचित जातींचे व २५,३२,९६९ अनुसूचित जमातींचे लोक होते. राज्यातील लोकांपैकी ३,४६,११,८६४ हिंदू ९०,६४,३३८ मुस्लिम २,५१,७३२ ख्रिस्ती १,२१,५०४ बौद्ध ३५,०८४ शीख व ३२,२०३ जैन होते (१९७१).

शिक्षण: १९७१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण ३३·०५% असून पुरुष व स्त्रियांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४२.८४% व २२·०८% होते. १९६१-७१ या काळात पुरुषवर्गांची साक्षरता जास्त वाढली आहे. कलकत्ता शहरात मात्र गेल्या दहा वर्षांत साक्षरता १·८% वाढली आहे. राज्यात १९७३-७४ साली ४०,५१६ प्राथमिक शाळा ३,२४० पूर्वमाध्यमिक शाळा २,३४८ माध्यमिक शाळा २,०६१ उच्च माध्यमिक व बहूद्देशीय शाळा ७ विद्यापीठे २५३ महाविद्यालये २९ तंत्रनिकेतने व ६ वैद्यकीय महाविद्यालये होती. कलकत्ता विद्यापीठ हे भारतातील पहिल्या स्थापन केलेल्या विद्यापीठांपैकी (स्था. १८५७) एक असून १९७३-७४ साली तेथे १,९६,२५७ विद्यार्थी, जादवपूर विद्यापीठात (१९५५) ४,७६० विद्यार्थी, बरद्वान विद्यापीठात (१९६०) ३६,०६७ विद्यार्थी, कल्याणी विद्यापीठात (१९६१) २,०७४ विद्यार्थी, नॉर्थ बेंगॉल विद्यापीठात २६,१९१, रवींद्र भारती विद्यापीठात ३,८५४ अशी विद्यार्थिसंख्या होती. यांशिवाय विश्वभारती विद्यापीठ, राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था, भारतीय तंत्रविज्ञान संस्था या प्रसिद्ध शिक्षणसंस्था या राज्यात आहेत. प्रफुल्लचंद्र रॉय संस्था, जगदीशचंद्र बोस संस्था, भारतीय सांख्यिकी संस्था यांसारख्या उच्च संशोधन संस्थाही आहेत. कलकत्ता शहरात विविध प्रकारच्या अभ्यास, संशोधन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. १९७२ साली राज्यात एकूण ४२,७८६ मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था आणि ५० लाख विद्यार्थी होते.

राज्यात १९७४ मध्ये एकूण ३० दैनिके, २३१ साप्ताहिके, ६ पाक्षिके व इतर ९०७ नियतकालिके होती. त्यांपैकी १७ दैनिके, १७७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, ५३८ इतर नियतकालिके बंगाली भाषेमध्ये होती. आनंद बझार पत्रिका या बंगाली भाषिक दैनिकाचा देशातील सर्व दैनिकांमध्ये सर्वाधिक खप (२,६८,४०३–१९७४) होता. जुगांतर या दुसऱ्या बंगाली दैनिकाचा खप १,९९,३४३ होता व ते देशातील तिसऱ्या क्रमांकाचे दैनिक होते. शिवाय स्टेट्‌समन (१,४७,९९७), अमृत बझार पत्रिका (१,१०,५६३) या इंग्रजी दैनिकांचा खपही लाखापेक्षा जास्त होता. इतर दैनिकांत हिंदुस्तान स्टँडर्ड हे इंग्रजी (६३,७२१), तर विश्व मित्र (४४,९५१), सन्मार्ग (२५,९७८) ही प्रमुख हिंदी दैनिके आहेत.

राज्यात १९७४ साली ३०० इस्पितळे व ३७,७१३ खाटांची सोय होती. याशिवाय राज्यात ४४१ दवाखाने व ६७९ चिकित्सालये असून ५१ खाटांची सोय होती. आरोग्यकेंद्रांची संख्या ८४७ आणि ७,२५४ खाटांची सोय होती. राज्यात ग्रामीण व नागरी भागांत अनुक्रमे ३३५ व ७२ कुटुंबनियोजन केंद्रे होती (१९७५-७६).

कलकत्ता शहर व त्याचा परिसर सोडला, तर प. बंगालचा भाग अत्यंत ग्रामीण आहे. राज्यातील ६७% नागरी वस्ती कलकत्त्यामध्ये एकवटलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शहरी प्रभाव अजूनही अल्प आहे. बहुसंख्य घरे मातीची असतात. जेथून माती काढलेली असते, तेथे खोलगट भागात छोटे तलाव बनतात व हे तलाव माशांच्या वाढीसाठी वापरतात. मासे हे प्रथिन पुरवठ्याचे प. बंगालमधील प्रमुख साधन आहे. सरकारनेसुद्धा अशा तलावांतील मत्स्यविकासास प्रोत्साहन दिले आहे. रोहू व कटला हे मासे विशेष प्रिय आहेत. ग्रामीण भागातील घरांच्या भिंती मातीच्या आणि कुड्याच्या असून त्या स्वच्छ सारवून त्यांवर चित्रे काढतात. पुरुष धोतर, कुडते व वर स्वच्छ उपरणे किंवा शाल पांघरतात. स्त्रिया गोल पातळ नेसून डोकीवर लांब पदर घेतात. बंगाली स्त्री-पुरुषांस पांढऱ्या रंगाचे वेड आहे. विशेषत: गडद रंगाची रुंद किनार असणाऱ्या पांढऱ्या साड्या हे बंगाली रमणींच्या पोशाखाचे वैशिष्ट्य आहे. लोक केसांस खोबऱ्याचे तेल व अंगास मोहरीचे तेल लावतात. बंगाली लोकांत वैष्णव व शाक्त हे दोन्ही पंथ प्रचलित आहेत. दुर्गापूजा हा सण सर्वांत मोठा असून तो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतो. तो चार दिवस चालतो. दिवाळीच्या दिवशी राज्यात कालीपूजेचा सण असतो. हे दोनच प्रमुख सण आहेत.


भाषा व साहित्य : या राज्यातील बहुसंख्य लोकांची मातृभाषा बंगाली असली तरी हिंदी, बिहारी, ओडिया, इंग्रजी इ. भाषाही तेथे बोलल्या जातात. बंगालीचा उगम साधारणपणे दहाव्या शतकात झाला असल्याचे अभ्यासक मानतात. इंडो-यूरोपीय भाषासमूहातील ही एक भाषा असून तिची उत्क्रांती इतर भारतीय भाषांप्रमाणेच प्राकृत भाषांच्या मधल्या टप्प्यातून (मागधी अपभ्रंश) झाली. तिच्यातील साहित्य स्थूलमानाने दहाव्या शतकापासून निर्माण होत गेल्याचे दिसते. नेपाळात सापडलेली व दहावे ते तेरावे शतक यांदरम्यानच्या काळात रचलेली ‘चर्चापदे’ किंवा ‘चर्यागीत’ यांतील महायान बौद्धांच्या सहस्रयान नावाच्या एका गूढवादी पंथाच्या रचनेत प्राचीन बंगालीचे आद्यरूप पहावयास मिळते. चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बंगाली वाङ्‌मयनिर्मितीचा फारसा पुरावा मिळत नाही. रामायण-महाभारताधिष्ठित महाकाव्य आणि राधाकृष्णविषयक पदावली यांचाही मध्ययुगीन कालखंडातील रचनेत समावेश होतो. महाकाव्यात पंधराव्या शतकातील ⇨ कृत्तिवास ओझाचे श्रीराम-पाँचाली हे स्वतंत्र बंगाली ‘रामायण’ मानले जाते. त्यात आणि काशिरामदासांच्या बंगाली महाभारतात तत्कालीन बंगालचे प्रतिबिंब दिसून येते. पंधरा ते अठराव्या शतकांपर्यंत मनसा, काली, चंडी, शीतल, धर्मठाकुर इ. देवतांवरील मंगल काव्ये रचली गेली. विप्रदास, माणिक दत्त, मुकुंदराम चक्रवर्ती, श्रीधर, रूपराम चक्रवर्ती इ. कवींनी ही मंगल काव्ये रचली. ह्या मंगल काव्यांत कविकंकण मुकुंदराम चक्रवर्तींचे चंडीमंगल हे काव्य विशेष महत्त्वाचे मानले जाते. सोळाव्या शतकाच्या प्रथमार्धात श्रीचैतन्याच्या शिकवणुकीने पदावलीचे प्रेमगीतात्मक स्वरूप बदलून ते उत्कट भक्तिपर झाले. लोचनदास, गोविंददास, चंडीदास इ. थोर पदकर्ते सोळाव्या व सतराव्या शतकांत होऊन गेले. सतराव्या शतकातच दौलत काजी व सैयद आलाओल हे दोन प्रसिद्ध मुसलमान कवी होऊन गेले. त्यांनी निधर्मी प्रेमाचा पुरस्कार करणारी उत्कृष्ट काव्यरचना केली. १८०० मध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारक विल्यम केरीने व त्याच्याबरोबर रामराम बसू व मृत्युंजय विद्यालंकार या पंडितांनी बंगाली गद्य लेखनाचा वापर सुरू केला. केरीने बायबलचे भाषांतर व पाठ्यपुस्तके बंगालीत तयार केली. बसूंचे १८०१ मधील राजा प्रतापादित्य चरित्र हे बंगालीतील पहिले गद्य पुस्तक होय. १८१८ मध्ये बॅप्टिस्ट धर्मोपदेशक जॉन मार्शमन याने समाचार दर्पण हे पहिले बंगाली वृत्तपत्र काढल्यावर १८२१ मध्ये राजा राममोहन रॉय यांचे संवाद कौमुदी, भवानीचरण बंदोपाध्यायांचे समाचार चंद्रिका यांसारखी अनेक नियतकालिके नंतरच्या दशकात निघाली. तदनंतरच्या काळात देवेंद्रनाथ टागोरांचे तत्वबोधिनी पत्रिकाबंकिमचंद्रांचे वंगदर्शन अशा महत्त्वाच्या नियतकालिकांनी समाजजागृतीचे कार्य केले. अक्षयकुमार दत्त आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या लेखनाने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाली गद्याला साहित्यिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. बंकिमचंद्र चतर्जी आणि ⇨ रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली कादंबरी प्रगल्भ केली. बंगाली कादंबरीकारांत ⇨ शरत्‌चंद्र चतर्जी व विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचेही स्थान मोठे आहे. कुलीन कुलसर्वस्व हे सामाजिक व उपरोधिक स्वरूपाचे नाटक १८५४ मध्ये रामनारायण तर्करत्न यांनी लिहिले आणि नंतरच्या दशकात मायकेल मधुसूदन दत्त, दीनबंधू मित्र इत्यादींनी दर्जेदार नाटके लिहिली. १८७२ मध्ये कलकत्त्यास ‘नॅशनल थिएटर’ या सार्वजनिक रंगमंचाची स्थापना झाली. त्यामुळे बंगाली रंगभूमीचा चांगला विकास झाला. गिरीशचंद्र घोष हे बंगालचे श्रेष्ठ नट व नाटककार. राजकृष्ण राय, अमृतलाल बसू, उपेंद्रनाथ दास, द्विजेंद्रलाल राय, मन्मथ राय हे उल्लेखनीय नाटककार होते. तसे प्रतिभाशाली बंगाली नाटककार म्हणजे रवींद्रनाथ टागोरच होत. काव्याचा प्रांतात एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ईश्वरचंद्र गुप्तांच्या रचनेत देशभक्तीची तळमळ होती. १८६० पासून आधुनिक कालखंड सुरू झाला. नवी वृत्ते व विषय घेऊन व्यक्तिस्वातंत्र्य, देशप्रेम अशा भावनांना बहर आला. निर्यमक कविता लिहिणारे मायकेल मधुसूदन दत्त, निसर्गसौंदर्यातून स्फूर्ती घेणारे सारदा मंगलकार बिहारीलाल चक्रवर्ती तसेच हेमचंद्र बंदोपाध्याय, काजी नज्रूल इस्लाम व कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे बंगालमधील श्रेष्ठ कवी होत. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलि या काव्यसंग्रहाला साहित्यातील नोबेल पारोतोषिक देण्यात आले (१३ नोव्हेंबर १९१३). हे सर्वोच्च पारितोषिक मिळविणारे ते एकमेव भारतीय कवी होत. विभूतिभूषण मुखोपाध्याय, ताराशंकर बंडोपाध्याय, बुद्धदेव बसू, जीवनानंद दास, प्रेमेंद्र मित्र, अमिय चक्रवर्ती, बिष्णु दे, सुधींद्रनाथ दत्त इ. साहित्यिकांच्या नावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल [→ बंगाली भाषा बंगाली साहित्य].

कला व क्रीडा : बंगाली रंगभूमी व चित्रपट आज अत्यंत विकसित अवस्थेत आहेत. तसेच सतार, बासरी वादनातही बंगाली कलाकारांची नावे (पं. रविशंकर, स्व. पन्नालाल घोष इ.) सर्वत्र विख्यात आहेत. हस्तकलांमध्ये चिनी मातीची भांडी, हस्तिदंती कोरीव काम, कृशनगरच्या मातीच्या वस्तू आणि टेराकोटा कलाकृती देशभर प्रसिद्ध आहेत. अत्यंत सुंदर व मुलायम चटया, चामड्याच्या वस्तूही बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होतात. दगडांची उणीव असल्याने माती व विटा हेच माध्यम मंदिरशिल्पासाठी जास्त प्रमाणात वापरलेले दिसते. रवींद्रनाथ टागोर हे साहित्याप्रमाणेच चित्रकलेमध्येही प. बंगालचे प्रेरणास्थान व मानदंड आहेत.

अनेक देशी-विदेशी क्रीडांमध्ये आज प. बंगाल आघाडीचे राज्य आहे. फुटबॉलमध्ये कलकत्त्याचे मोहन बगान आणि मॉहमेडन स्पोर्टिंग क्लब हे देशातील अव्वल दर्जाचे संघ आहेत. टेनिसमध्येही बंगालचे खेळाडू आघाडीवर आहेत (प्रेमजीतलाल, जयदीप मुकर्जी). यांशिवाय क्रिकेट, नौका वल्हविणे, पोहणे या क्रीडाप्रकारांमध्येही पं. बंगालची कामगिरी महत्त्वाची आहे. पोलो, वॉटर पोलो व गोल्फ हे खेळही लोकप्रिय असून अश्वशर्यतींचे कलकत्ता हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

प्रेक्षणीय स्थळे : कलकत्ता व परिसर हा देशातील सर्वांत मोठा नागरी प्रदेश आहे. त्याची वस्ती ७०,०५,३६२ (१९७१) होती व या शतकाअखेर या परिसराची वस्ती १,२०,००,००० पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. हे शहर देशातील अत्यंत गर्दीचे असल्याने तेथे जास्त वेगाने वस्ती वाढू नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. १९११ पर्यंत हे शहर ब्रिटिश भारताची राजधानी, तसेच दीर्घकाळ देशातील प्रथम क्रमांकाचे बंदर होते. देशाचा ५०% दर्यापार व्यापार या बंदरातूनच चाले आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय, शासकीय आणि व्यापारी इमारती झाल्या. डलहौसी चौक, प्रधान डाकघर, उच्च न्यायालय या व इतर अनेक इमारती विख्यात आणि प्रेक्षणीय आहेत. कलकत्याशिवाय दुर्गापूर, खरगपूर, आसनसोल, बरद्वान ही महत्त्वाची शहरे आहेत. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण चहाबागांसाठीही प्रसिद्ध आहे. रामकृष्ण परमहंसांचा बेलूर मठ व कालीमातेचे दक्षिणेश्वर मंदिर ही भाविकांची क्षेत्रे आहेत. (चित्रपत्रे ४,१६).

डिसूझा, आ. रे.

संदर्भ : 1. Bose, S. C. Ed. Geography of West Bengal, New Delhi, 1968. 2. Irani, C. K. Bengal: A Communist Challenge, Calcutta, 1968. 3. Majumdar, R. C. Ed. History of Bengal, Vol. I,  Dhakka, 1943. 4. Sarkar, J. N. Ed. The History of Bengal Vol. II, Patna, 1973. 5. Sarkar, Sushobhan, Bengal Renaissance, New Delhi, 1970. 6. Singh, R. L. Ed. India: A Regional Geography, Varanasi, 1971. 7. Sur, A. K. History and Culture of Bengal, Calcutta, 1963. 8. Tripathi, Amales, The Extremist Challenge, Bombay, 1967.


पश्चिम बंगाल राज्य

दक्षिणेश्वर मंदिर, कलकत्ता दुर्गापूजा : एक दृश. शिल्पखचित शिवमंदिर, बहुलारा, ११ वे शतक. भातसडीची ग्रामीण पद्धत रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमधील ‘पुनश्च’ गृह. तिलपारा बंधारा, मयूराक्षी प्रकल्प. हिंदुस्थान पोलाद कारखाना, दुर्गापूर : एक दृश्य. तागाचा मळा कलकत्ता बंदर, उजवीकडे नवे मंत्रालय. कोळसाखाण, राणीगंज : एक दृश्य.