कोल्हापूर जिल्हा : महाराष्ट्राचा अगदी दक्षिणेकडील जिल्हा. क्षेत्रफळ ८,१३५ चौ. किमी. लोकसंख्या २०,४८,०४९ (१९७१). १५ ४३’ उ. ते १७ १०’ उ. आणि ७३ ४०’ पू. ते ७४ ४२’ पू. यांदरम्यानच्या या जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी सु. १६० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सरासरी सु. ६० किमी. आहे. याच्या पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस सांगली आणि पूर्व व दक्षिण बाजूंस कर्नाटक राज्यातील बेळगाव हे जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या २·६% क्षेत्रफळ व ४·०६% लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचे बारा तालुके आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ हे तालुके उत्तरेस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल मध्यभागी आणि आजरा, गडहिंग्लज व चंदगड हे तालुके दक्षिणेस आहेत. पूर्वीचे ⇨ कोल्हापूर संस्थान   विलीन झाले, तेव्हा त्याचा रायबाग विभाग हल्लीच्या कर्नाटक राज्यात व बेळगाव जिल्ह्याचा चंदगड तालुका या जिल्ह्यात समाविष्ट करून आणि इतर किरकोळ प्रादेशिक बदल करून कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यात आला.

भूवर्णन : गगनबावडा तालुक्यातील तळकोकणात मोडणारी ३९ गावे सोडली, तर हा सर्व जिल्हा दख्खन पठाराच्या पश्चिम भागात सु. ३९० ते ५५० मी. उंचीवर आहे. जास्तीत जास्त उंची ९०० मी. पर्यंत आहे. सह्याद्रीची मुख्य रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेलेली असून तिचा एक प्रमुख फाटा उत्तर भागात पूर्वेस गेलेला आहे. इतर फाटे लहान असून नैर्ऋत्य-ईशान्य गेलेले आहेत. जिल्ह्याचा पूर्वभाग त्या मानाने सखल व सपाट आहे. या जिल्ह्यातून कोकणात उतरण्याच्या अनेक वाटा आहेत त्यांपैकी आंबा, फोंडा व आंबोली हे घाट प्रमुख आहेत. जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.

कृष्णा आणि तिच्या उपनद्या वारणा, पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या येथील प्रमुख नद्या होत. घटप्रभेला मिळणारी मलप्रभा व ताम्रपर्णी याही या जिल्ह्यातून वाहतात. कृष्णा ईशान्य सरहद्दीवरून ६० किमी. वाहते. वारणा उत्तर सरहद्दीवरून वाहते. कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती या चार नद्या व सरस्वती ही पाचवी गुप्त नदी मिळून झालेली पंचगंगा नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. तिचे खोरे संपूर्णपणे या जिल्ह्यात आहे. बाकीच्या नद्यांच्या खोऱ्यांचा फक्त काही भागच या जिल्ह्यात आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी तपमान उन्हाळ्यात २९ से. आणि हिवाळ्यात २१ से. असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४१·५ से. पर्यंत जाते आणि हिवाळ्यात १४ से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात ते १७ से.पेक्षा कमी होत नाही. गगनबावडा, आजरा, चंदगड, राधानगरी व शाहूवाडी या तालुक्यांत पाऊस २०० सेंमी. पेक्षा जास्त पडतो. गगनबावडा येथे तो ७०० सेंमी. पेक्षाही जास्त पडतो. भुदरगड व पन्हाळा या तालुक्यांत १२० सेंमी. ते २०० सेंमी. पर्यंत पडतो. गडहिंग्लज आणि करवीर तालुक्यांत ९० सेंमी. ते १२० सेंमी., तर कागल तालुक्यांत तो ६५ सेंमी. ते ९५ सेंमी. पडतो. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मात्र ६५ सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो.

शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व बावडा तालुक्यांत तसेच करवीर, भुदरगड व आजरा तालुक्यांच्या पश्चिम भागात तांबडी, जांभ्या   दगडाची माती आढळते. हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड व आजरा यांच्या काही भागांत हलकी काळी माती आढळते शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल व गडहिंग्लज या तालुक्यांत मध्यम व भारी काळी माती आहे. नद्यांच्या खोऱ्यांत ती खोल आहे.

जिल्ह्याचा सु. १८·८% भाग वनाच्छादित आहे. तो मुख्यत: पश्चिमेकडील डोंगराळ भागातच आहे. त्यात जांभूळ, हिरडा, फणस, आंबा, कोकम, अंजन, सावर, शिसव, किंजळ, चंदन इ. सदापर्णी साग, धावडा, ऐन, हेद, बाभूळ खैर इ. ऋतुपर्णी व कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, बेडकी, बिब्बा, बाहवा इ. औषधी वनस्पती आहेत. साग, काजू व सावर यांच्या लागवडी मुद्दाम केल्या आहेत. इमारती व जळाऊ लाकूड, कोळसा, चंदन, मध, मेण, हिरडा, काजू, शिकेकाई, चराऊ गवत यांचे चांगले उत्पन्न होते.

गवा, वाघ, चित्ता, बिबळ्या, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, तरस, चितळ, ससा, लांडगा, रानकोंबडा इ. प्राणी जंगलात आढळतात. कावळा, चिमणी, पोपट, मोर, तित्तिर, घुबड वगैरे नेहमीचे पक्षी येथेही आहेत. साप, अजगर वगैरे सरपटणारे प्राणी व अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे वगैरे आहेत. राधानगरी तालुक्यात गवा अभयारण्य स्थापन झालेले असून जंगली प्राणी नैसर्गिक अवस्थेत पाहण्याची सोय येथे केलेली आहे.

आर्थिक स्थिती : शेती हा जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय असून एकूण कामकरी लोकांपैकी ७१·४०% लोक शेतावर काम करतात. जिल्ह्यातील एकूण जमिनीपैकी सु. ६७% जमीन शेतीसाठी उपलब्ध आहे. तीपैकी ७४·३% जमीन १९६९-७० मध्ये प्रत्यक्ष लागवडीखाली होती. प्रत्यक्ष्‍ा लागवडीखालील जमिनीपैकी ५२.४% अन्नधान्यांखाली, १०% उसाखाली, १३·५% भुईमुगाखाली व फक्त २१ हे. म्हणजे ०·१३% जमीन कापसाखाली होती. पिकाखालील जमिनीपैकी  ७·८९% जमीन ओलीताखाली होती. ओलीताखालील एकूण जमिनीपैकी ४·८% जमिनीला कालव्याचे पाणी होते. २३·९% जमिनीला विहिरींचे व बाकीच्या जमिनीला इतर मार्गांनी पाणी मिळाले. राधानगरी येथे भोगावती नदीवर मोठे धरण बांधलेले असून तेथे सु. १·१ लक्ष किवॉ. तास वीज उत्पन्न होते. इतर लहान पाटबंधारे बरेच आहेत.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तांबडमातीच्या प्रदेशातील चिंचोळ्या सखल भागात भात व ऊस आणि डोंगरउतारावर नाचणी ही पिके होतात. मध्यभागातील हलक्या काळ्या जमिनीत भात, जोंधळा, भुईमूग, भाजीपाला, ऊस ही पिके होतात. पूर्वभागातील कसदार काळ्या जमिनीत जोंधळा, भुईमूग, मिरची, हळद, तंबाखू, कापूस, भाजीपाला, ऊस इत्यादींचे उत्पादन होते. १९७२ मध्ये जिल्ह्यात २,९०,००० गाईबैल, ३,३३,००० म्हशी, २,५२,००० मेंढ्या व शेळ्या ६,००० इतर जनावरे आणि ५,५०,००० कोंबड्या व बदके होती.


उद्योगधंदे : कोल्हापूरातील एक कापडगिरणी व बिद्री, परिते, कुडित्रे, कोल्हापूर, शिरोळ, कोडोली आणि इचलकरंजी येथील सात साखर कारखाने हे या जिल्ह्यातील प्रमुख कारखाने होत. याशिवाय डीझेल एंजिने तयार करण्याचे ऐंशीहून अधिक छोटे कारखाने कोल्हापूरात आहेत. इचलकरंजीस पाच-सहा हजार यंत्रमाग व हातमाग चालतात. कोल्हापूर, कुरुंदवाड, रेंदाळ, वडगाव, कागल, कोडोली, नांदणी, सरुड, हलकर्णी इ. गावी हातमाग आहेत. आळते, कबनूर, वडगाव, हुपरी व कोडोली येथे लाखकामाचा आणि वडगाव, हलकर्णी, कोडोली व कोल्हापूर येथे भुईमुगाचे तेल गाळण्याचा धंदा चालतो. हुपरी येथे चांदीचा माल तयार होतो. हिरड्यापासून टॅनिन तयार करण्याचा कारखाना घाटमाथ्यावर आंबा गावाजवळ आहे. कोल्हापूर व कापशी येथील पायताणे प्रसिद्ध असून अलीकडे त्यांस परदेशांतही मागणी येऊ लागली आहे. गूळ तयार करणे हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. कोल्हापूर ही गुळाची व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याशिवाय हळद, भुईमूग, मिरची यांचाही व्यापार येथे मोठा आहे. कोल्हापूरखालोखाल जयसिंगपूर व गडहिंग्लज याही व्यापारपेठा म्हणून प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात कापड, तंबाखू, छापखाना व प्रकाशन, धातुकाम, यंत्रे, विजेची यंत्रे, उपकरणे व साहित्य, इतर किरकोळ उद्योग यांचे लहानमोठे मिळून एकूण ३६६ कारखाने १९६९-७० मध्ये होते आणि त्या सर्वांत मिळून एकूण १६,६८८ म्हणजे एकूण कामगारांच्या सु. २४% किंवा शेतीकामगारांव्यतिरिक्त इतर कामगारांच्या सु.८३% लोक होते. महाराष्ट्रातील अग्रेसर औद्योगिक जिल्ह्यांपैकी कोल्हापूर हा एक जिल्हा आहे.

लोक व समाजजीवन : जिल्ह्याची लोकसंख्या १९६१ ते १९७१ या दशकात १५,९६,४९३ वरून २०,४८,०४९ वर गेली म्हणजे तिच्यात २८% वाढ झाली. २१·५% लोक शहरांत व ७८·५% लोक खेड्यांतून राहतात. जिल्ह्यात शहरे व मोठी गावे १९ आहेत, तर खेडी १,०७८ आहेत. यांपैकी ४४% गावांत वीज आलेली आहे. स्त्रियांचे पुरुषांशी प्रमाण हजारी ९६१ असून लोकवस्तीची घनता दर चौ. किमी.स. २५४ आहे. करवीर, हातकणंगले, शिरोळ या भागांत ती जास्त तर गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी या भागात ती कमी आहे. साक्षरता  ३५% असून पुरुषांत ती ५०% तर स्त्रियांत फक्त २०% आहे. बहुसंख्य लोकांची भाषा मराठी असून काही लोक कानडी व काही उर्दू बोलतात. १९६१ मध्ये १,११,२१० पुरुष व १७,३९६ स्त्रिया प्राथमिक शिक्षण घेतलेल्या, तर ५,१७७ पुरुष व ३४९ स्त्रिया माध्यमिक शालान्त परीक्षा पास झालेल्या किंवा त्याहून अधिक शिकलेल्या होत्या. १९६८-६९ मध्ये जिल्ह्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या २९ संस्थांमधून १,३८० मुले आणि १,०६३ मुली ५८ शिक्षकांच्या हाताखाली शिकत होत्या. प्राथमिक शाळा १,८०० होत्या त्यांत ९७,२३७ मुली व १,७१,७३५ मुले होती. प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक ६,०१५ व अप्रशिक्षित १,३०२ होते. माध्यमिक शिक्षणाच्या संस्था २१६ होत्या त्यांत ४०,७०९ मुले, ११,१७० मुली, १,६१६ प्रशिक्षित शिक्षक व ४९४ अप्रशिक्षित शिक्षक होते. उच्च शिक्षणाच्या सोळा संस्थांमधून ८,०७२ मुले, १,४०९ मुली व शिक्षकांची संख्या सु. ४५० होती. खास शिक्षणाच्या ३७ संस्थांत २,७३७ मुले, ६५८ मुली व ३०० हून अधिक शिक्षक होते. १९६७-६८ मध्ये वर्गीकृत जातींपैकी १८,८४१ मुले व ७,२५४ मुली शिकत होत्या आणि वर्गीकृत जमातींपैकी ३०३ मुले व ५५ मुली शिक्षण घेत होत्या. मागासवर्गापैकी ३५,२७० विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिक्षण मिळत होते. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ असून गारगोटी येथे मौनी विद्यापीठ हे ग्रामीण विद्यापीठ व त्याच्या संलग्न संस्था आहेत.

जिल्ह्यात ७८० ग्रामपंचायती असून कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, जयसिंगपूर, कागल, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, मुरगुड व गडहिंग्लज येथे नगरपालिका आहेत. १९६९ मध्ये जिल्ह्यात ६ रुग्णालये, ८० दवाखाने आणि १६ प्रसूतिगृहे होती. प्राथमिक वैद्यकीय केंद्रे २५ असून, ८७ डॉक्टर, ३४ वैद्य, १८९ परिचारिका व रुग्णांसाठी ६८४ खाटा होत्या. कोल्हापूरच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वर शेंडापार्क येथे कुष्ठधाम असून आणखी पाच-सहा ठिकाणी कुष्ठरोग निवारण केंद्रे आहेत.

जिल्ह्यातील ३२ गावांतून बँकांची सोय आहे. करमणुकीसाठी २२ चित्रपटगृहे व ११ फिरते चित्रपट तंबू आहेत. कोल्हापूर हे चित्रपट निर्मितीसाठी एकेकाळी फार गाजलेले होते व अजूनही तेथे चित्रपट निर्माण केले जातात.

कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्थांबाबत अग्रगण्य समजला जातो. १९६९-७० मध्ये सहकारी संस्थांची संख्या २,०९९ होती. जिल्ह्यात नोंदलेल्या सावकारांची संख्या ८७५ होती व त्यांनी एकूण २ कोटी ६० लाखांहून अधिक रक्कम कर्जाऊ दिली.


 

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांची राहणी मराठमोळा पद्धतीची आहे. धोतर, कुडते, मुंडासे व वहाणा आणि खांद्यावर कांबळे हा सर्वसाधारण खेडुतांचा वेश असतो, तर लुगडे व चोळी हा स्त्रियांचा वेश असतो. अलीकडे शहरी संपर्काने यात बराच फरक पडत आहे. तथापि कोल्हापूरी फेटा, कोल्हापूरी वहाणा, कोल्हापूरी रगेल व रंगेल भाषा यांचा प्रभाव जाणवतो. येथील सर्वसामान्य स्त्रिया प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापदे– गेलो, जातो– अशी वापरताना आढळतात. खेड्यांतील शहरांतील घरे महाराष्ट्राच्या इतर भागाप्रमाणेच दगडामातीची, कौलारू किंवा पत्र्याच्या छपराची, तर शहरांतून आधुनिक बांधणीची व काही भागांत केवळ गवती छपराच्या झोपड्यांच्या स्वरूपात आहेत. लोकांचे मुख्य अन्न जोंधळा व नाचणी, त्याच्या जोडीला भाजी, कांदा, आमटी, परवडेल तेव्हा भात, मांस व मासे असे परंतु झणझणीत असते. तमाशा व कुस्ती हे लोकांचे आवडते शौक आहेत. कोल्हापूर हे तर कुस्तीगीरांचे माहेरच आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत कुस्तीला विशेषच महत्त्व आले होते. त्यांनी व छत्रपती राजाराम महाराजांनी बहुजन समाजासाठी, मागासवर्गासाठी, हरिजनांसाठी मोठेच कार्य केले. कोल्हापूरची अंबाबाई व डोंगरावरचा जोतिबा ही कोल्हापूरच्याच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील लक्षावधी लोकांची कुलदैवते आहेत. तसेच एकूण महाराष्ट्राप्रमाणेच येथेही ऐतिहासिक वैभवाचा प्रभाव दिसून येतो. शेतकऱ्यांत आधुनिक अवजारे आणि पद्धती वापरण्याची, कामकऱ्यांत छोटीमोठी यंत्रे तयार करण्याची, दुकानदारांत व व्यापाऱ्यांत व्यापारउदीम वाढविण्याची, सामान्य माणसात शिक्षणाची जिद्द दिसून येते.

दळणवळण व संपर्कसाधने: कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण तालुक्यांच्या ठिकाणांशी व शेजारील जिल्ह्यांशी सडकांनी जोडलेले आहे. पुणे–बंगलोर राष्ट्रीय हमरस्ता कोल्हापूर व कागल शहरांवरून जातो. त्याची या जिल्ह्यातील लांबी ४४ किमी. आहे. १९७० साली जिल्ह्यात राज्यरस्ते ४१९ किमी., मोठे जिल्हारस्ते ४३८ किमी., इतर जिल्हारस्ते ५७१ किमी. व खेड्यांचे रस्ते ९५६ किमी. होते. एकूण ५६ किमी. रस्ते सिमेंटकाँक्रीटचे व ३५५ किमी. डांबरी होते. पुणे, मंबई, बेळगाव, निपाणी, रत्नागिरी, सावंतवाडी या बाजूंस प्रवासी गाड्यांची व मालमोटारींची सतत वाहतूक चालू असते. कोल्हापूर ही मोठी व्यापारपेठ असल्याने साहजिकच मालवाहतुकीचे ते महत्त्वाचे केंद्र बनले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ४४० गाड्या कोल्हापूर विभागात धावत होत्या. खाजगी ३५६ व भाड्याचे २,९८५ मालवाहू ट्रक होते. रुग्णवाहक गाड्या १५, शाळांच्या मुलांसाठी ६, ट्रेलर १,१८८, ट्रॅक्ट १,०६४ व इतर ६१ वाहने होती. कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण रेल्वेचा ३७·६८ किमी. लोहमार्ग गेलेला असून तो आता रुंदमापी झालेला आहे. कोल्हापूर–मुंबई जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस त्यावरून नियमित जाऊ लागली आहे. जिल्ह्यात ३४६ टपालकचेऱ्या, ४३ तारकचेऱ्या, २,५०१ दूरध्वनी व ४६,०८१ रेडिओ परवानाधारक होते. १७७ छापखाने असून ८ दैनिके, २१ साप्ताहिके (हातकणंगले २, भुदरगड १, करवीर १८ ) व ११ मासिके प्रसिद्ध होतात.

प्रेक्षणीय स्थळे : कोल्हापूर शहर हे एक प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. कोल्हापूरजवळील उत्खननात ब्रह्मगिरी येथे दुसऱ्या शतकापूर्वीचे अवशेष मिळाले आहेत. सु. दहाव्या-बाराव्या शतकांत कोल्हापूर शिलाहारांची राजधानी होती व कोल्हापूर जिल्ह्याचा प्रदेश जैनांचा बालेकिल्ला समजला जाई. आजचे महालक्ष्मीचे मंदिर आणि खिद्रापूर येथील जैन मंदिर हे त्यांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. जैनांच्या ऱ्हासकालात हे हिंदू धर्माचे केंद्र व एक शक्तिपीठ बनले शंकराचार्यांचा कडाप्पाचा मठ हा जुन्यापैकी एक समजला जातो. संस्थानी राजवटीत कोल्हापूरला वेगळेच महत्त्व चढले हाेते, त्याचे आधुनिक स्वरूपही विलोभनीय आहे. देवालये , तलाव, राजवाडे, चित्रपटगृहे, शैक्षणिक व इतर संस्था, नाट्यगृहे, कुस्तीचा आखाडा, पुतळे इत्यादींमुळे ते आकर्षक झाले आहे. पन्हाळा किल्ला जवळच आहे तेथे काही जुन्या इमारती व नवीन तबक उद्यान प्रेक्षणीय आहे. तेथे प्रवाशांसाठी राहण्याची सोयही केलेली आहे. विशाळगड किल्ल्यावर महादेवाचे देऊळ आहे. रांगणा व गगनगड हे अवघड किल्ले धाडसी प्रवाशांस आव्हान देतात व चढून गेल्यावर अपूर्व समाधान देतात. पंचगंगेवरील प्रयाग, सांगवड्याचे नृसिंहमंदिर, वाडीचा नरसोबा व त्याजवळील रम्य नदीघाट, डोंगरावरील जोतिबाचे देवालय, कुंभोजचे जैन तीर्थक्षेत्र व तेथील बाहुबलीचा अतिभव्य पुतळा ही भाविकांस आवाहन करतात. कोकणात जाणाऱ्या घाटातील वनश्री निसर्गरम्य आहे.

कुलकर्णी, गो. श्री. कुमठेकर, ज. ब.

जोतिबा मंदिर दत्तमंदिर, नरसोवाची वाङी हजरत मलिक दर्गा, विशाळगङ
बाहुबली मंदिर, कुंभोज मौनी विद्यापीठ, गारगोटी पम्हाळा किल्ला : एक दृश्य
राधानगरी धरण