अमेरिकेची संयुक्त संस्थाने : पश्चिम गोलार्धातील सर्वांत प्रगत देश. क्षेत्रफळ सु. ९० लक्ष चौ.किमी. लोकसंख्या २०,४७,६५,७७० (१९७०). भारतात सामान्यतः ‘अमेरिका’ म्हणून ओळखला जातो. यामध्ये डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियासह एकावन्न घटकराज्यांचा समावेश होतो. अलास्का व हवाई सोडल्यास इतर राज्ये सलग असून त्यांचा प्रादेशिक विस्तार २५७’ ते ४९ २३’ उ. आणि ६६ ५७’ ते १२४ ४४’ प. असा आहे. १०० प. रेखावृत्त या देशाच्या मध्यातून जाते. अलास्का उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागात असून हवाई बेटे उत्तर अमेरिकेच्या प. किनाऱ्यापासून ३,२०० ते ४,८०० किमी. अंतरावर पॅसिफिक महासागरात आहेत. मुख्य भूमीच्या उत्तरेस कॅनडा (६,४१६ किमी. सरहद्द), पूर्वेस अटलांटिक महासागर (८,९५५ किमी. किनारा), दक्षिणेस मेक्सिको (३,२४० किमी. सरहद्द) व पश्चिमेस पॅसिफिक महासागर (४,३९३ किमी. किनारा) असून पूर्व-पश्चिम अंतर ४,४८० किमी. व दक्षिणोत्तर अंतर २,५६० किमी. आहे.

रचना : या प्रदेशाचा तळभाग आर्कियन महाकल्पातील अतिप्राचीन कठीण प्रस्तरांनी तयार झालेला आहे. तळभागाचे हे प्रस्तर पश्चिमेकडील रॉकी पर्वत व पूर्वेकडील ॲपालॅचिअन पर्वतांच्या दरम्यान पसरले असून त्यांवर स्तरित खडकांचा एक पातळसा थर तयार झालेला आहे. अतिप्राचीन कालात हे कठीण प्रस्तर दुमडले जाऊन त्यांना वळ्या पडल्या होत्या. मात्र पुढे कँब्रियन-पूर्व-महाकल्पाच्या अखेरपर्यंत त्यांची झीज होऊन त्या नाहीशा झाल्या. आर्कियन महाकल्पात तयार झालेले हे प्रस्तर शिस्ट, ग्रॅनाइट आणि बेसाल्ट या खडकांचे बनले असून, ते कॅनडाच्या अर्ध्याअधिक भागात पृष्ठभागाशी वर उघडे पडलेले दिसतात म्हणूनच या भूस्तर-प्रदेशाला ‘कॅनडाची ढाल’ असे म्हणण्यात येते.

आर्कियन महाकल्पात तयार झालेले हे खडक संयुक्त संस्थानांत अनेक ठिकाणी पृष्ठभागाशी आढळतात. ॲडिराँडॅक पर्वत याच खडकांपासून सेंट लॉरेन्स व हडसन या नद्यांच्या दरम्यान तयार झालेला आहे. सुपीरिअर सरोवराच्या नैर्ऋत्येस व पश्चिमेस, टेक्सास राज्याच्या दक्षिण भागात ऑस्टिन शहराजवळ व कोलोरॅडो नदीच्या घळईच्या तळाशी हे खडक पृष्ठभागाशी दिसून येतात. इतरत्र ते नवीन खडकांखाली झाकले गेलेले आहेत.

प्राचीन कठीण खडकांनी बनलेल्या या गाभ्याच्या कडांशी स्तरित खडकांचे थर दुमडले गेल्यामुळे, पूर्वेस पुराजीव-महाकल्पात ॲपालॅचिअन पर्वत व पश्चिमेस मध्यजीव-व नवजीवन-महाकल्पांत रॉकी पर्वत व इतर श्रेणी तयार झाल्या आहेत.

ॲपालॅचिअन पर्वत पुराजीव-महाकल्पाच्या अखेरच्या काळात निर्माण झाले. त्यानंतर आतापर्यंत अनेक वेळा तेथील अपक्षरणचक्रामुळे त्यांची झीज होऊनही, समुद्रसपाटीत झालेल्या बदलामुळे ते पुनर्युवी झाले आहेत. मध्यजीव-महाकल्पाच्या आरंभकालात झिजेमुळे या प्रदेशात स्थलीप्राय तयार होऊन, जेथे पृष्ठभागावर माती, चुनखडक किंवा चुनामिश्रित माती होती, तेथे जास्त झीज होऊन दक्षिणोत्तर दऱ्या तयार झाल्या व जेथे पृष्ठभागावर वालुकाश्म किंवा पिंडाश्म हे खडक होते, तेथे कमी झीज होऊन दऱ्यांना समांतर वालुकटक तयार झाले.

पश्चिमेकडील रॉकी पर्वत व इतर श्रेणींची उंची ४,८०० मी. पेक्षा क्वचितच जास्त दिसून येते. भूवैज्ञानिकांच्या मते जूरॅसिक कल्प आणि नवजीवन-महाकल्प यांच्या दरम्यान या भागात तीन वेळा वलीभवन झालेले आहे. त्या काळात प्रस्तर भंग पावूनही, काही ठिकाणी प्रस्तर खाली खेचले गेले, तर काही ठिकाणी ते वर फेकले गेले. काही भागांत प्रस्तरांना घड्या पडल्या. या प्रदेशातील वायव्य भागात प्रस्तरभंग-रेषा लंबरूप व खोल असल्याने तेथे ज्वालामुखींचा उद्रेक होऊन लाव्हारस बाहेर आला व सभोवती पसरला. पुढे या प्रदेशाचे उत्थान होत असता त्याची झीज घडून आली. नद्यांनी आपली निकृत खोरी तयार केली. कोलोरॅडो नदीची अरुंद खोल दरी (कॅन्यन) अशाच रीतीने तयार झालेली आहे. या पर्वतप्रदेशांत पर्वतांतर्गत पठारे आहेत. पर्वतप्रदेशाच्या पश्चिमेस अरुंद समुद्रतटीय मैदान आहे.

पूर्वेस ॲपालॅचिअन पर्वत व अटलांटिक महासागर यांमध्ये पसरलेले समुद्रतटीय मैदान रुंदीने सर्वत्र सारखे नाही. हडसन नदीच्या पूर्वेस ते जवळजवळ नाहीसे होते. ह्या भागात समुद्रकाठची जमीन खचल्यामुळे डेलावेअर, सस्क्वेहॅना, हडसन इ. नद्यांच्या मुखांशी खाड्या तयार झाल्या आहेत.

आग्नेयीस फ्लॉरिडाचे द्वीपकल्प चुनखडीने बनलेले आहे. या द्वीपकल्पाचा पूर्वभाग दलदलीचा असून त्याच्या आग्नेयीस प्रवाळ बेटांची मालिका क्यूबापर्यंत पसरलेली आहे.

संयुक्त संस्थानांच्या मध्यवर्ती भागातून मिसिसिपी नदी वाहते. तिच्या खोऱ्यात पुराजीव-महाकल्पातील स्तरित खडक आढळतात. खोर्‍याच्या पश्चिमेस क्रिटेशस कल्पातील व आणखी पश्चिमेस नवजीवन-महाकल्पातील खडक आढळतात. मिसिसिपी नदी फार मोठ्या प्रमाणात खडकांचा गाळ मेक्सिकोच्या आखाताकडे वाहून नेत असल्याने, मेक्सिकोचे आखात हळूहळू उथळ होत चालले आहे. मिसिसिपी व तिच्या उपनद्या दरवर्षी खंडोगणती गाळ पुराच्या वेळी नदीकाठच्या प्रदेशात पसरवितात.

संयुक्त संस्थानांच्या उत्तरेकडचा पंचमहासरोवरांभोवतीचा प्रदेश चतुर्थक हिमकालात बर्फाच्छादित होता, त्यामुळे तेथे हिमानी-क्रियेमुळे निर्माण झालेले हिमोढ, नद्या व सरोवरे दिसून येतात.

भूवर्णन : मुख्य भूमीचे खालीलप्रमाणे सहा प्रमुख स्वाभाविक विभाग पडतात : (१) ईशान्येकडील प्रदेश, (२) आग्नेयीकडील सखल प्रदेश, (३) मध्यवर्ती सखल प्रदेश, (४) पश्चिमेकडील मैदानी उच्चप्रदेश, (५) रॉकी पर्वत-श्रेणी व पठारे, (६) पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश.

(१)ईशान्येकडील प्रदेश : भूविशेषांनुसार या प्रदेशाचे दोन भाग पडतात : (अ) न्यू इंग्‍लंड आणि (ब) ॲपालॅचिअन पर्वताचा मध्य भाग व त्यालगतचा प्रदेश. (अ) न्यू इंग्‍लंड- या प्रदेशात ॲपालॅचिअन पर्वताचा उत्तर भाग व त्याच्या पूर्वेकडील समुद्रतटीय मैदानाचा समावेश होतो. या प्रदेशाच्या पश्चिम सरहद्दीवरून हडसन नदी वाहते. ॲपालॅचिअन पर्वत या प्रदेशाच्या पश्चिम भागात असून तेथील प्राचीन प्रस्तरांमुळे प्रदेश सुपीक नाही. त्या भागातील मृदा खड्यांनी युक्त आहे. पर्वतश्रेणीची उंची १,८०० मी. पेक्षा थोडी जास्त आहे. समुद्राकाठचा प्रदेश खडकाळ असून तो खाली खचल्यामुळे त्या ठिकाणी रिया किनारा [→ किनारा व किनारपट्टी] तयार झाला आहे. या रिया किनाऱ्याच्या निर्मितीमुळे तेथे न्यूनॉर्क, बॉस्टन, पोर्टलंड इ. अनेक उत्तम नैसर्गिक बंदरे निर्माण झाली आहेत. न्यू इंग्‍लंडमधील बऱ्याचशा नद्या त्यांच्या मार्गातील धबधब्यांमुळे

नौकानयनास तितक्याशा उपयुक्त नाहीत. सर्वांत मोठ्या अशा कनेक्टिकट नदीची लांबी ५६० किमी. असून तिच्या मुखापासून फक्त ८० किमी. लांबीची मार्ग जलवाहतुकीस योग्य आहे. (ब) ॲपालॅचिअन पर्वताचा मध्यभाग व त्यालगतचा प्रदेश-या प्रदेशात पश्चिम भागी ॲपालॅचिअन पर्वत असून पूर्वेस अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापर्यंत मैदान पसरले आहे. समुद्रकिनारा बराच दंतुर आहे. समुद्राचे पाणी काही ठिकाणी बर्‍याच अंतरापर्यंत भूप्रदेशात शिरते व त्यामुळे डेलावेअर व चेसापीकसारखे उपसागर व खाड्या तयार झाल्या आहेत. पर्वतावरून हडसन, डेलावेअर, सस्क्वेहॅना इ. नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागरास मिळतात. या नद्यांच्या मार्गांत धबधबे असल्याने, नौकानयनास अडथळा होतो परंतु या जलविद्युत्‌निर्मितीस उपयुक्त आहेत.

(२)आग्नेयीकडील सखल प्रदेश : ॲपालॅचिअन पर्वत व आग्नेयीकडील समुद्र यांदरम्यान हा सखल प्रदेश पसरला असून, उत्तरेकडील समुद्रतटीय मैदानाचाच तो एक भाग आहे. या सखल प्रदेशाचा समुद्रकाठ बराचसा सरळ असून, तेथे वाळूचे दांडे व खारकच्छे तयार झालेली आहेत. या सखल प्रदेशाची सरासरी रुंदी ३२० किमी. असून, त्याच्या उत्तरेस व वायव्येस ॲपालॅचिअन पर्वताच्या पायथ्याशी १८० ते ३६० मी. उंचीचा पीडमाँट हा पठारी प्रदेश आहे. हे पठार व ॲपालॅचिअन पर्वत प्राचीन कठीण खडकांनी तयार झालेले असल्याने, त्यांच्या बाह्य सरहद्दींवर नद्यांनी मैदानी प्रदेशात प्रवेश करीत असताना मार्गांत धबधबे तयार केले आहेत. या धबधब्यांच्या जागी जलविद्युत् निर्माण होत असल्याने तेथे अनेक महत्त्वाची शहरे उदयास आली आहेत. फ्लॉरिडा द्वीपकल्पाचा या सखल प्रदेशात समावेश होतो. या द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात सरोवरे व दलदलीचा प्रदेश आहे.

(३)मध्यवर्ती सखल प्रदेश : याच प्रदेशात मिसिसिपी नदीचे खोरे तयार झाले आहे. मिसिसिपी व तिची उपनदी मिसूरी यांची लांबी (सु. ६,४०० किमी.) विचारात घेता ही नदी उत्तर अमेरिकेतील सर्वांत मोठी नदी होय. मेक्सिकोच्या आखाताशी या नदीने त्रिभुजप्रदेश तयार केला आहे. ही नदी आपल्या मुखाशी एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळाची भर टाकते, की त्यामुळे त्रिभुजप्रदेशाचे क्षेत्र दर वर्षी ६० ते ९० मी. इतके समुद्राकडे वाढत आहे. या नदीच्या मार्गावर पूर-तट तयार झालेले असून, काही भागांत तिचे पात्र भोवतालच्या पूरमैदानापेक्षा उंचावर आहे. अशा भागात पूर-तट मोडल्यास पुराचे पाणी सखल प्रदेशात पसरून फार नुकसान होते.

(४)पश्चिमेकडील मैदानी उच्च प्रदेश : मिसिसिपी नदीच्या खोऱ्याच्या पश्चिमेस सखल प्रदेशाची उंची वाढत जाऊन रॉकी पर्वताजवळ ती १,५०० ते १,८०० मी. पर्यंत वाढते. रॉकी पर्वत-श्रेणीच्या पूर्वेस ८०० किमी. रूंदीचा उच्च मैदानी प्रदेश असून तो त्या पर्वतश्रेणीच्या पर्जन्यछायेत येतो. या पर्वतावरून पूर्वेस, या मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांनी फार खोल दर्‍या तयार केल्या आहेत.

(५)रॉकी पर्वत-श्रेणी आणि पठारे : संयुक्त संस्थानांचा १/३ पश्चिम भाग पर्वतश्रेणींनी व पठारांनी व्यापलेला आहे. या प्रदेशाला जरी सर्वसाधारणपणे ‘रॉकी पर्वत-श्रेणी’ असे नामाभिधान असले, तरी त्यात रॉकी पर्वत-श्रेणीशिवाय सिएरा नेव्हाडा, कॅस्केड व कोस्टल या पर्वतरांगा मोडतात या रांगा दक्षिणोत्तर आहेत. यांची सरासरी उंची ५०० मी.पेक्षा जास्त आहे. पण त्यांची काही शिखरे ४,००० मी.पेक्षा उंच असून ती नेहमी बर्फाच्छादित असतात. या सर्वांत पूर्वेकडील रॉकी पर्वत बराच रुंद व उंच आहे. या पर्वत-श्रेणीच्या आणि कॅस्केड व सिएरा नेव्हाडा या पर्वतरांगांमध्ये कोलंबिया, ग्रेट बेसिन व कोलोरॅडो ही पर्वतांतर्गत पठारे तयार झालेली आहेत. कोलोरॅडो नदीच्या प्रवाहाने तयार झालेली ‘ग्रँड कॅन्यन’ नावाची घळई दीड किमी. खोल, ७ ते १८ किमी. रुंद व ३२० किमी. लांब आहे. रॉकी पर्वताच्या मध्य भागात उन्हाळी, गरम पाण्याचे झरे, घळ्या, सरोवरे व अरण्ये आढळतात. त्यामुळे तेथे स्‍नेक नदीच्या उत्तर भागी यलोस्टोन पार्क हे राष्ट्रीय उद्यान तयार करण्यात आलेले आहे.

(६) पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश : कोस्टल पर्वत-रांगा पॅसिफिक महासागराच्या किनार्‍यास समांतर व त्याच्या फार जवळून दक्षिणोत्तर पसरलेल्या असल्यामुळे पश्चिम भागी किनार्‍यालगत कॅलिफोर्नियाचा सपाट पण फार चिचोळा प्रदेश झाला आहे.

 नद्या, सरोवरे इ. : संयुक्त संस्थानांतील महत्त्वाच्या नद्यांत मिसिसिपी, सेंट लॉरेन्स, कोलंबिया आणि कोलोरॅडो या नद्यांची गणना होते. यांपैकी मिसिसिपी नदी सगळ्यांत मोठी असून मिसूरी, ओहायओ, आरकॅन्सॉ, रेड या तिच्या उपनद्या आहेत. या सर्व उपनद्या मिळून मिसिसिपी नदीचे पाणलोटाचे क्षेत्रफळ ४४,८७,६०० चौ. किमी. आहे. ही नदी दक्षिणेस मेक्सिकोच्या आखातास मिळते. या आखातास मिळणार्‍या इतर नद्या छोटी कोलोरॅडो, ब्रॅझस, रीओ ग्रँड इ. आहेत.

रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडील जवळजवळ सर्व नद्या पॅसिफिक महासागरास मिळतात. फक्त कोलोरॅडो नदी कॅलिफोर्नियाच्या आखातास मिळते. कोलंबिया ही या भागातील सर्वांत मोठी नदी होय. त्याशिवाय कोलोरॅडो, सॅक्रेमेंटो, सॅन वाकीन, क्लॅमथ या महत्त्वाच्या नद्या आहेत. कोलंबिया व कोलोरॅडो या नद्यांवर अनेक ठिकाणी धबधबे व द्रुतवाह आहेत. कोस्टल पर्वतरांगा आणि सिएरा नेव्हाडा यांच्या दरम्यान सॅक्रेमेंटो व सॅन वाकीन या नद्यांनी तयार केलेले मध्यवर्ती खोरे फारच महत्त्वाचे आहे. हे खोरे दक्षिणोत्तर पसरले असून त्याची लांबी ६४० किमी. आहे. सिएरा नेव्हाडाच्या आग्नेयीस डेथ व्हॅली असून संयुक्त संस्थानांतील हा सर्वांत सखल भाग आहे. ही दरी समुद्रसपाटीपेक्षाही ८३ मी. खोल असून तेथील तपमान बरेच जास्त असते.

ॲपालॅचिअन पर्वताच्या पूर्वेस वाहणार्‍या नद्यांपैकी बऱ्याचशा नद्या अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. त्यांपैकी हडसन व तिची उपनदी मोहॉक या फार महत्त्वाच्या आहेत. मोहॉक ही कालव्यांद्वारे पश्चिमेस ईअरी सरोवरास व उत्तरेस शँप्लेन सरोवरास जोडलेली असल्याने अटलांटिक महासागराकडून हडसन-मोहॉक जलमार्गे ईअरी सरोवरापर्यंत वाहतूक करता येते. डेलावेअर, सस्क्वेहॅना, पोटोमॅक इ. नद्यांनी मुखांशी खाड्या तयार केल्या आहेत. मैदानी क्षेत्रात या नद्या जलवाहतुकीस योग्य असून त्यांच्या वरच्या खोऱ्यांत धबधब्यांच्या जागी जलविद्युत् तयार करण्यात येते. ॲपालॅचिअन पर्वताच्या दक्षिण व अग्नेय भागांत नद्यांनी धबधबे तयार केले आहेत. त्या धबधब्यांस जोडणाऱ्या रेषेस ‘प्रपातरेषा’ म्हणतात. चट्टाहूची ही या भागातील सर्वांत मोठी नदी असून ती मेक्सिकोच्या आखातास मिळते. साव्हना नदी अटलांटिक महासागरास मिळते.

फ्लॉरिडाच्या दक्षिण भागात अनेक सरोवरे असून ओकीचोबी हे त्यांतील सर्वांत मोठे सरोवर होय. उत्तरेकडील गोड्या पाण्याची पंचमहासरोवरे प्रसिद्ध आहेत. सुपीरिअर, मिशिगन, ह्यूरन, ईअरी आणि आँटॅरिओ ही ती सरोवरे असून त्यांचे पाणी सेंट लॉरेन्स नदीस मिळते. ही सरोवरे एकमेकांना जोडलेली आहेत. त्यांना काही लहान नद्या येऊन मिळतात. ईअरी व आँटॅरिओ सरोवरांच्या दरम्यान नायगारा नदीवर जगप्रसिद्ध नायगारा धबधबा आहे. संयुक्त संस्थानांच्या अंतर्गत भागांत खाऱ्या पाण्याची सरोवरे व दऱ्याआहेत.

हवामान : संयुक्त संस्थानांचा बराचसा मोठा प्रदेश पश्चिमी वाऱ्यांच्या टापूत येतो. तरीही ठिकठिकाणी अक्षांश, समुद्रसपाटीपासून उंची, समुद्र-सान्निध्य, सागरी प्रवाह, भिन्न प्रकारच्या वायुप्रदेशांच्या हालचाली आणि दिशा इ. भौगोलिक घटकांचे स्वरूप बदलत असल्याने तेथील हवामानात बदल होत गेलेला आहे. हवामानातील हा बदल तपमानापेक्षा पर्जन्यमानात बर्‍याच प्रमाणात जाणवत असल्याने या देशाचे पर्जन्यमानानुसार विभाग पाडणे अधिक उपयुक्त होईल. पर्जन्यमानानुसार या देशाचे पाच विभाग पडतात. प्रत्येक विभागातील हवामानाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होत.

(१) अति दमट हवामानाचा प्रदेश : पश्चिमेकडील किनारपट्टीच्या उत्तर भागाचा या प्रदेशात समावेश होतो. हा प्रदेश पूर्वेस कॅस्केड पर्वतापर्यंत पसरलेला असून येथील पर्जन्यमान ७५ सेंमी. ते ३७५ सेंमी पर्यंत आढळते. येथील हिवाळा सौम्य असतो. त्या वेळी समुद्रसपाटीवर सरासरी तपमान ४.४ से असते. याच काळात आवर्तांपासून पाऊस पडतो पर्वतावर बर्फ पडते, त्याचे प्रमाण ३ ते ९ मी. असते. मार्च महिन्यापर्यंत बर्फ पडत असते. उन्हाळ्यात तपमान फारसे वाढत नाही. जुलै महिन्याचे सरासरी कमाल तपमान ३२.२ से. असते. या काळात फार थोडा पाऊस पडतो. समुद्रकाठाजवळ दाट धुके पसरलेले असते.

(२) दमट हवामानाचा प्रदेश : सुपीरिअर सरोवर ते टेक्सास राज्यापर्यंत एक सरळ रेषा काढल्यास त्या रेषेच्या पूर्वेकडील भाग या प्रदेशात मोडतो. येथील वार्षिक पर्जन्यमान ७५ सेंमी. ते १२५ सेंमी. असते. पाऊस मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पडतो. हिवाळ्यात अक्षवृत्तानुसार ठिकठिकाणच्या तपमानात बदल झालेला दिसतो. जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान दक्षिण फ्लॉरिडात २१.१से., गल्फ किनाऱ्यावर १३ से. व मिनेसोटा राज्याच्या उत्तर भागात १५से. इतके असते. यावेळी मध्येच उत्तरेकडच्या ध्रुवीय थंड हवेची लाट दक्षिणेकडे येऊन तपमान एकदम खाली उतरते. अशा वेळी किमान तपमानाची नोंद मिनेसोटा राज्यात -४५.६से., टेनेसी राज्यात -२८.९से. व फ्लॉरिडाच्या वायव्य भागात -१७.८से. अशी करण्यात आलेली आहे. ओहायओ नदीच्या उत्तरेस हिवाळ्यात बर्फ पडते व ते जमिनीवर १ ते ५ महिने टिकून राहते. उन्हाळ्यात परिस्थिती बदलते. त्या वेळी तपमानात होणारा बदल सरसकट सगळीकडे होतो. उत्तरेकडे जुलै महिन्याचे सरासरी तपमान १८से. असते. दक्षिण भागात ते २६.६से. असते. या वेळी दक्षिण फ्लॉरिडा व ईशान्येकडील मेन राज्याचा भाग सोडल्यास इतरत्र आतापर्यंत ३७.८से. कमाल तपमानाची नोंद झालेली आहे. याच सुमारास मेक्सिकोच्या आखाताकडून गरम वारे उत्तरेकडे वाहू लागतात व त्यामुळे उष्ण हवेची लाट पुष्कळ वेळा या प्रदेशात येऊन जाते. शरद ऋतूत हरीकेन या चक्री वादळाने फ्लॉरिडा व गल्फ या किनाऱ्यांवर मुसळधार पाऊस पडतो. दक्षिण भागात पुष्कळ वेळा टॉर्नेडो नावाची वादळे निर्माण होतात व त्यांमुळे नुकसान होते.

(३)कमी दमट हवामानाचा प्रदेश : वर वर्णन केलेल्या दमट प्रदेशाच्या पश्चिमेस पावसाचे प्रमाण कमी होऊन तेथे ५०० ते ८०० किमी. रुंदीचा कमी दमट हवामानाचा प्रदेश तयार झालेला आहे. पूर्वेकडील समुद्रकाठापासून हा प्रदेश लांब अंतरावर असल्याने येथे पावसाचे एकूण प्रमाण कमी आहे. तसेच ते पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. कॅनडाच्या सरहद्दीजवळ या प्रदेशाच्या पूर्व भागात ७५ सेंमी. पाऊस पडतो पण पश्चिम भागात ४५ सेंमी.पर्यंत पडतो. दक्षिणेस पर्जन्यमानाचे हे प्रमाण प्रदेशाच्या पूर्व भागात १०० सेंमी. असते, मात्र पश्चिमेस ते ६८ सेंमी. पर्यंत खाली उतरते. हिवाळ्यात मधूनमधून थंड हवेची लाट व हिमवादळे निर्माण होतात. त्या वेळी तपमान एकदम मोठ्या प्रमाणात खाली उतरते. अशा वेळी डकोटाच्या उत्तर भागात -४५.६से. व टेक्सासच्या मध्यभागात -१७.८से. इतके तपमान खाली गेल्याची नोंद आहे. उन्हाळ्यात तपमान  सर्वत्र जवळजवळ सारखेच असते. जुलै महिन्यात कमाल तपमान ४० से. ते ४६से. पर्यंत वर जाते. पाऊस मुख्यत्वेकरून वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या पूर्वार्धात पडतो. या काळात या प्रदेशात टॉर्नेडो निर्माण होतात.

(४) निमओसाड प्रदेश : रॉकी पर्वत आणि वरील कमी दमट हवामानाचा प्रदेश यांच्या दरम्यान ५०० ते ८०० किमी. रुंदीचा निमओसाड प्रदेश दक्षिणोत्तर पसरलेला आहे. समुद्रसपाटीपासून या प्रदेशाची उंची ९०० मी. असून तो रॉकी पर्वताच्या पर्जन्यछायेत येतो. त्यामुळे येथे पावसाचे व हिमवृष्टीचे प्रमाण बरेच कमी आहे. उत्तर माँटॅना राज्यात वार्षिक पर्जन्यमानाचे प्रमाण ३० सेंमी. तर दक्षिणेस टेक्सासमध्ये ते ६२ सेंमी. पर्यंत वाढते. हिवाळ्यात तपमान बरेच कमी असते. जानेवारी महिन्यात सरासरी तपमान यलोस्टोन पार्कमध्ये -५४.४ से असते, तर टेक्सासमध्ये -१२से. असते. हिवाळ्यात ५० सेंमी. ते १०० सेंमी. जाडीचे बर्फ पडते पण ते फार काळ टिकून राहत नाही. या काळात पश्चिमेकडील रॉकी पर्वत ओलांडून येणाऱ्या गरम चिनुक वाऱ्यांमुळे येथील तपमानात पुष्कळ वेळा एकदम वाढ झालेली दिसते. उन्हाळ्यात तपमानाची कमाल मर्यादा ४० से. ते ४६से. पर्यंत वाढते. त्यामुळे आरोह व आवर्त पर्जन्य पडतो. पर्वतांतर्गत भागांत पाऊस वर्षभर पडतो. वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या आरंभास गारा पडतात.

कॅलिफोर्नियाच्या खोऱ्यात पर्जन्यामानाचे प्रमाण वर सांगितल्याप्रमाणेच जरी असले, तरी तेथे मे ते सप्टेंबर हा काळ कोरडा जातो. आवर्तापासून तेथे हिवाळ्यात पाऊस पडतो.

(५) ओसाड प्रदेश : या प्रदेशात नेव्हाडा, उटा, न्यू मेक्सिको, कॅलिफोर्नियाचा आग्नेय भाग आणि टेक्सास राज्याचा नैर्ऋत्य भाग यांचा समावेश होतो. वार्षिक पर्जन्यमान २५ सेंमी.पेक्षा कमी. पाऊस बव्हंशी उन्हाळ्यातच पडतो. हिवाळ्यात या भागातील तपमान गोठणबिंदूपेक्षा बरेच वर असते, तरी पण कमीत कमी दोन महिन्यांत दहिवर पडतेच. उन्हाळ्यात जुलै महिन्याचे सरासरी तपमान २६.७ से. असले तरी त्या वेळी कमाल तपमानाची मर्यादा ४३.५ से. पर्यंत वाढते.

 मृदा :मृदांचे प्रकार स्थूलमानाने ठिकठिकाणच्या हवामानांशी व वनस्पतिप्रकारांशी निगडित आहेत. त्यामुळे न्यू इंग्‍लंडमध्ये पडझोल जातीची मृदा आढळते. शेतीच्या दृष्टीने हा मृदा-प्रकार फारसा उपयुक्त नाही. पूर्व भागात ॲपालॅचिअन पर्वत-उतारावर पिंगट रंगाची मृदा आढळते. या मृदेचा पट्टा थेट पूर्वकिनाऱ्यापर्यंत गेलेला आहे. आग्नेयीकडील दमट प्रदेशात जांभा खडकापासून तयार झालेली तांबडी मृदा दिसून येते. मिसिसिपी नदीच्या खोऱ्यात गाळाची जमीन आहे. त्या खोऱ्यालगतच्या पश्चिम बाजूस चेर्नोझम जातीच्या काळ्या मृदेचा पट्टा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या पट्ट्याच्या आणखी पश्चिमेस निमओसाड हवामानाच्या प्रदेशात चेस्टनट रंगाच्या मृदेचा पट्टा रॉकी पर्वताच्या पूर्व-उतरणीवर पसरलेला आहे. या पट्ट्याच्या पश्चिमेस पर्वतपठारावरील अपरिपक्व मृदा व ओसाड प्रदेशात वालुकामय मृदेचे पट्टे लागतात.

वनस्पती : हवामानानुसार वनस्पतींचे चार भिन्न प्रकार आढळतात. हे प्रकार ज्या प्रदेशात आढळतात त्यांना अनुक्रमे (१) अरण्यांचा प्रदेश, (२) गवताळ प्रदेश, (३) ओसाड प्रदेश व (४) उंच पर्वतावरील वनस्पतींचा प्रदेश, असे म्हणतात.

(१) अरण्यांचा प्रदेश : ईशान्येस मेन राज्यापासून मिनेसोटा राज्यापर्यंत रुंदी असलेला अरण्यांचा हा प्रदेश दक्षिणेस ॲपालॅचिअन पर्वताच्या टोकापर्यंत पसरलेला आहे. हा प्रदेश अगदी सलग नाही. या प्रदेशाच्या उत्तर भागात पांढरे व तांबडे पाईन, हेमलॉक, स्प्रूस, जॅक पाईन आणि बलसम फर हे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. त्याशिवाय हॅमरिस्क, पेपर बर्च, विलो, आल्डर, ॲस्पेन आणि पॉप्लर याही झाडांची वाढ तेथे होते. या प्रदेशाच्या दक्षिणेस सुरुवातीला मिश्र जातीची अरण्ये लागतात व नंतर त्यांच्याही दक्षिणेस कठीण लाकडाची रुंदपर्णी, पानझडी वृक्षांची अरण्ये लागतात. ही अरण्ये न्यू इंग्‍लंड ते मिसूरी व टेक्सासच्या पूर्व भागापर्यंत पसरलेली आहेत. त्यांत मॅपल, ओक, लोकस्ट, लिंडन, वॉलनट, हिकरी, बीच इ. प्रकारची झाडे आढळतात.

अटलांटिक आणि गल्फ किनार्‍यालगतच्या प्रदेशात पाईन, हिकरी, ओक, मॅग्नोलिया, व्हाईट सीडार, ॲश हे वृक्ष दिसून येतात. फ्लॉरिडाच्या दलदलीच्या भागात सायप्रस, ट्रॅपेलो आणि व्हाईट सीडार हे वृक्ष दिसून येतात.

(२) गवताळ प्रदेश : याच प्रदेशाला ‘प्रेअरी’ असे नाव असून हा प्रदेश उत्तर डकोटा राज्यापासून दक्षिणेस टेक्सासपर्यंत कमी दमट हवामानाच्या प्रदेशात दक्षिणोत्तर पसरलेला आहे. बफेलो, प्रागा, साईड ओक, बंच, व्हीट आणि नीडल हे व इतर अनेक गवतांचे प्रकार या प्रदेशात आढळतात. निरनिराळ्या प्रकारची क्षुपे दिसून येतात. तसेच पर्वत आणि पठारांच्या उंच भागी यलो पाईन, डग्‍लस फर, फर, स्प्रूस इ. प्रकारचे सूपचिर्णी वृक्षही या प्रदेशात आढळतात.

(३)ओसाड प्रदेश : रॉकी पर्वताच्या पश्चिमेस निमओसाड प्रदेशात सेज ब्रश नावाची क्षुपे आढळतात. थोड्या जास्त पावसाच्या पर्वत-उतरणीवर व लहान टेकड्यांवर ज्युनिपर, नट पाईन वृक्ष आढळतात. आग्नेय कॅलिफोर्नियापासून टेक्सासपर्यंत ओसाड, वाळवंटी प्रदेश असून त्यात निवडुंग, बाभूळ, जोशुआ इ. वनस्पतिप्रकार आहेत.

(४) पर्वताच्या उंच भागात तरुरेषेच्याही वर गवत व लहानलहान रोपे वाढतात. पण ती अल्प काळच टिकतात.

प्राणी : संयुक्त संस्थानांत आढळणार्‍या प्राणिसृष्टीत सस्तन प्राण्यांच्या ३१० जाती, पक्ष्यांच्या ७५६, सरपटणार्‍या प्राण्यांच्या २५७ आणि मृदू शरीर असणार्‍या प्राण्यांच्या १,००० वर जाती आहेत. मोठ्या मांसभक्षक प्राण्यांत अस्वले, लांडगे, प्यूमा, रानमांजर, कोळसुंदा, कोयाट इ. प्राणी आढळतात. रवंथ करणार्‍या प्राण्यांत हरिणाच्या निरनिराळ्या जाती, रेडे व म्हशी, टोकदार शिंगांच्या मेंढ्या गवताळ प्रदेशात दिसून येतात. कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जाती असून त्यांत बीव्हर हा प्राणी सर्वांत मोठा आहे पण दिवसेंदिवस तो दुर्मिळ होत चाललेला आहे. प्रेअरी गवताळ प्रदेशात जमिनीत बीळ करून राहणारे उंदीर, प्रेअरी-डॉग आणि निरनिराळ्या जातींच्या खारी दिसून येतात.

पक्ष्यांच्याही अनेक जाती आहेत. त्यांत गरुड, ससाणा व घुबड हे प्रमुख पक्षी आढळतात. त्याशिवाय पाणकोंबडी, कॅनडा-हंस, पाणकोळी, बदके इ. पाण्यातील पक्षीही दिसून येतात. इतर महत्त्वाच्या पक्ष्यांत रानटी टर्की, ग्राऊज व कबुतरांच्या निरनिराळ्या जाती लक्षात येण्यासारख्या आहेत. अलास्कात फरधारी सील आणि सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यात व अलास्काच्या शीत प्रदेशात फरधारी ऑटर, कोल्हे, मिंक मस्करॅट व स्कंक हे प्राणीही आढळतात.

खनिज संपत्ती : कथील, क्रोमियम, मँगॅनीज, निकेल आणि बॉक्साइट ही खनिजे वगळल्यास इतर खनिजांच्या बाबतीत संयुक्त संस्थाने हा एक अतिशय समृद्ध देश आहे. खनिजांच्या उत्पादनात या देशाचा बराच वर क्रमांक लागतो. या देशात एकूण जागतिक उत्पादनापैकी २५% तांबे (ॲरिझोना, उटा आणि न्यू मेक्सिको राज्यांत), १०%शिसे (मिसूरी, आयडाहो, उटा इ.), १३% जस्त (माँटॅना, आयडाहो, कोलोरॅडो, ओक्लाहोमा इ.), ७३% मॉलिब्डिनम (कोलोरॅडो), ३३% टिटॅनियम (सोव्हिएट रशियातील उत्पादन सोडून), ३०% बेरियम, ४% सोने (दक्षिण डकोटा, उटा आणि कॅलिफोर्निया) होते. याशिवाय प्लॅटिनम व चांदी यांचे उत्पादन आयडाहो, उटा, माँटॅना आणि ॲरिझोना या राज्यांत होते. वर वर्णन केलेल्या धातूंशिवाय संयुक्त संस्थानांत कोळशाच्या जागतिक उत्पादनापैकी २५% (पेनसिल्व्हेनिया, ॲलाबॅमा, पश्चिम व्हर्जिनिया, केंटकी इ. राज्यांत) उत्पादन होते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांचे उत्पादन मिसिसिपी राज्याचा दक्षिण भाग, कॅनझस, ओक्लाहोमा, लुइझिॲना, कॅलिफोर्निया आणि टेक्सास या राज्यांत होते. रासायनिक कारखान्यात लागणाऱ्या खनिज उत्पादनाच्या बाबतीतही हा देश अग्रेसर आहे. या देशात एकूण जागतिक उत्पादनापैकी फॉस्फेटचे ४०% (फ्लॉरिडा, टेनेसी, कॅरोलायना इ.), पोटॅशचे २७% (न्यू मेक्सिको, कॅलिफोर्निया, उटा आणि मिशिगन), गंधकाचे ६९% (लुइझिॲना आणि टेक्सास), खनिज किंवा सैंधव मिठाचे २८% (मिशिगन, न्यूयॉर्क, ओहायओ आणि कॅनझस) उत्पादन होते.

वाघ, दि. मु.

 इतिहास :प्राचीन काळ : अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत मानव केव्हा प्रथम वावरू लागला, हे निश्चित माहीत नाही. तथापि सुमारे १५,००० वर्षांपूर्वी इथे मानवाची वस्ती असावी, असे काही अश्मयुगीन अवशेषांवरून दिसते. तो येथे बेरिंगच्या सामुद्रधुनीमार्गे आला असावा. काही विद्वानांच्या मते पूर्व आशियातील मंगोलियन वंशाचे लोक अलास्कातून मॅकेंझी नदीच्या मार्गे अमेरिकेत शिरले असावेत. तेथून ते पुढे मिसूरी नदी ओलांडून दक्षिणेत आले.

येथील अश्मयुगीन मानव उघड्यावर व जेथे गुहा उपलब्ध होत्या तेथे गुहांतून राहत असे. न्यू मेक्सिकोत सँडिया येथे आणि ऑरेगन व उटा राज्यांत त्याने अशी वस्ती केली होती. तत्कालीन वन्य प्राणी व जनावरे यांची त्याने शिकार करून फेकलेली पुष्कळ हाडे आढळतात. या टोळ्या आंतराश्मयुगीन असाव्यात, असा तज्ञांचा कयास आहे.

सु. ७,००० वर्षांपूर्वी येथे मानव स्थायिक झाला असावा. कारण केंटकी व टेनेसी राज्यांत नद्यांच्या काठी खाऊन फेकलेल्या जलचर प्राण्यांच्या हाडांचे ढीग आढळून आले आहेत. ते कंदमुळे, फळे व रानबियाही खात. रानबियांचे पीठ करण्यासाठी पाटे-वरवंटे वापरीत. भाला हे त्यांचे शिकारीचे प्रमुख हत्यार होते. परंतु याच काळातील न्यूयॉर्क व न्यू इंग्‍लंड या भागांत राहणाऱ्या टोळ्या त्यांच्या तुलनेने जरा मागासलेल्या होत्या. त्यांचे जीवन भटके असून ते दगडी कुऱ्हाडी व भाले वापरीत. मासेमारीसाठी त्यांनी हाडांचे गळ तयार केले होते. याशिवाय कंदमुळे, रानबियाही ते गोळा करीत. परंतु कालांतराने त्यांची प्रगती होऊन ते हाडांच्या सुया व दगडी भांडी वापरू लागले. या टोळ्यांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असावा, हे त्यांनी मृतांच्या काळजीवपूर्वक केलेल्या दफनविधीवरून दिसून येते. शिवाय या टोळ्यांना संगीतात रस होता, असे कासवांच्या कवचांचे खुळखुळे, हाडांच्या बासऱ्या व शिट्या यांवरून आढळते. त्यांना आभूषणांचीही आवड होती. ते शंखांच्या मण्यांच्या माळा गळ्यात घालीत व त्यांत दातांचे ताईत ओवीत. यावरून त्यांचा सुसंस्कृत लोकांशी संबंध आला असावा असे दिसते. इ.स.पू. २,५०० च्या सुमारास त्यांची ही अवस्था संपून त्यांच्यात झपाट्याने सुधारणा होऊ लागल्याचे दिसते. पुढे ते निरनिराळ्या प्रकारची भांडी बनवू लागले. ह्याशिवाय त्यांनी टोपल्या विणण्याच्या कलेत खूपच केलेली प्रगती त्यांच्या अवशिष्ट नमुन्यांवरून दिसते. उत्कृष्ट टोपल्या व चटया बनविण्याचे श्रेय इंडियन लोकांना द्यावे लागेल. अमेरिकेत मक्याचे पीक काढीत असावेत, हे मेक्सिकोतील मक्याच्या अवशेषांवरून आढळले. कालांतराने मका हे अमेरिकेचे प्रमुख अन्न बनले.

वसाहतींपूर्वीचा काळ :कोलंबंसच्या पूर्वी कित्येक शतके अमेरिकेबाहेरचे लोक त्या खंडात गेले असावेत. अमेरिकेत आढळलेले प्राचीन अवशेष व अमेरिकेतल्या स्थानिक जमातींपैकी काहींमध्ये उमटलेले संस्कृतीचे ठसे यांवरून असे अनुमान काढण्यात आले आहे, की कोलंबसाच्या पूर्वी बाह्य जगातले लोक अमेरिकेत जात-येत असत. भारतीय, अरब, व्हायकिंग अशांचा अमेरिकेत प्रवेश झाला असावा. ज्ञात जगात समाविष्ट होत चाललेला हा भाग पुढे काही कारणांनी एकाकी झाला व काही शतके अज्ञात राहिला. यूरोपीय लोकांना अमेरिकेत ज्या वन्य जमाती भेटल्या त्यांमध्ये साम्य नव्हते. काही नरमांसभक्षण व नरबली हे प्रकार पाळण्याइतपत रानटी होत्या, तर काहींनी प्राथमिक पद्धतीची शेती, राज्यसंस्थेसारखी यंत्रणा, एक प्रकारची लिपी, कालगणनेचे काही अडाखे-अशी काही विशिष्ट संस्कृती आत्मसात केली होती. काही लोकांत विशिष्ट धार्मिक आचार व संप्रदाय रूढ होते. मेक्सिकोच्या उत्तरेकडील मुलखात पांगलेल्या अशा अनेक जमातींची लोकसंख्या चार-पाच लाख असावी.

यूरोपीय वसाहतींचा काळ : १४९२ च्या ऑक्टोबरात कोलंबस स्पेनच्या मदतीने बहामा बेटावर उतरला. यानंतर त्याने अमेरिकेच्या दोनतीन सफरी केल्या. अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्याचाही त्याने शोध लावला. कोलंबसमागून स्पेनमधले साहसी लोक अमेरिकेकडे वळू लागले. आमेरिगो व्हेसपूची, कोलंबसचा मुलगा डोगो, तसेच बॅल्बोआ, आल्फान्सो द पीनेॲडो, पिझारो, दे सोटो वगैरेंनी सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेकडे ये-जा चालू ठेवली. या लोकांचा ओढा उत्तर अमेरिकेपेक्षा मध्य व दक्षिण अमेरिकेकडे होता. १५५९ मध्ये कॉर्तेइन अमेरिकेकडे वळला. तेथील ⇨ॲझटेक ही जमात त्याने अडीच-तीन वर्षांत जिंकली. मेक्सिकोमधील सोन्याची लूट व वन्य जमातींचे ख्रिस्तीकरण, हे स्पॅनिशांचे प्रमुख उद्देश होते. मुद्रणालये व शिक्षणसंस्था काढून, तसेच काही स्त्रियांशी लग्न करून स्पॅनिश लोकांनी स्थानिकांना सुसंस्कृत बनविण्याचा प्रयत्‍न केला. मेक्सिको, कॅलिफोर्निया वगैरे भागांत स्पेनमधल्या लोकांनी पहिली वस्ती थाटली. त्यानंतर हॉलंड, स्वीडन, फ्रान्स, इंग्‍लंड वगैरे देशांतलेही काही लोक अमेरिकेकडे वळले. हॉलंडमधल्या लोकांच्या अमेरिकेच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या व त्यांनी न्यू नेदर्लंड्स वसाहत स्थापिली. स्वीडनमधल्या लोकांच्याही छोट्या वसाहती ‘न्यू स्वीडन’ या नावाने न्यू नेदर्लंड्सच्या आसपास नांदू लागल्या.

फ्रेंचांच्या अमेरिकेतल्या हालचाली इंग्रजांच्या हालचालींशी समकालीन होत्या. १६०८ च्या सुमारास त्यांनी क्वेबेक आणि १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत मिसिसिपीचे खोरे व सरोवरालगतचा प्रदेश व्यापला. आपली शहरे तटबंदी करून सुरक्षित बनविली. साहजिकच सर्वांच्या आधी आलेल्या स्पेनमधील लोकांचा फ्रेंच व इंग्रज यांच्या विस्तारवादी प्रवृत्तीमुळे कोंडमारा होऊ लागला. इंग्रजांंचे लक्ष पंधराव्या शतकातही अमेरिकेकडे वळले होते. जॉन कॅबट हा व्हेनिसचा खलाशी इंग्‍लंडच्या प्रोत्साहनाने १४९७ मध्ये न्यू फाउंडलंडला पोहोचला. सातवा हेन्‍री याने त्याला दहा पौंड बक्षिसादाखल दिले. या संबंधातून इंग्‍लंडच्या मच्छीमारीच्या किफायतशीर धंद्याची वाढ झाली. हॉकिंझ, ड्रेक यांसारखे इंग्रज खलाशी अमेरिकेतून यूरोपकडे येणारी स्पेनच्या गलबतांतील संपत्ती भर समुद्रात लुटीत त्यामुळेही इंग्रजांना अमेरिकेचे आकर्षण वाटत राहिले. इंग्‍लंडने आपले सगळे लक्ष अमेरिकेवर एकाग्र करावे, या मताचा पुरस्कार १५१०-१५११ च्या सुमारास होत होता. अमेरिकेत वसाहती स्थापण्यासाठी परवानगी मागणारा पहिला अर्ज १५७४ मधला आहे. एलिझाबेथनंतर स्ट्यूअर्ट राजे आले. ते कॅथलिक पंथाचे होते. इंग्रजांत प्रॉटेस्टंटांचा मोठा भरणा होता. त्यामुळे राजा व प्रजा यांचे संघर्ष चालू होऊन छळ चुकवावा म्हणून अमेरिकेत जाण्याची कल्पना प्रॉटेस्टंटांच्या मनात घोळू लागली. या लोकांना राजसत्तेने प्रोत्साहन देण्याचे ठरविले. साहसी लोकांना अमेरिकेत जाऊन वसाहती स्थापण्याला इंग्रजी सत्ता परवानगी देऊ लागली. त्यामुळे अमेरिकेत इंग्रजांनी व्हर्जिनिया, मेरिलंड, मॅसॅचुसेट्स, न्यू इंग्‍लंड आदी वसाहती स्थापन केल्या.

व्हर्जिनिया कंपनीतर्फे कॅप्टन न्यू पोर्ट १६०६ मध्ये तीन जहाजे व १२० प्रवासी घेऊन अमेरिकेकडे निघाला. या वसाहतवाल्यांचे पहिल्या तीन-चार वर्षांत मनस्वी हाल झाले. उपासमारीने व्याकूळ झालेली साठ माणसे १६१० मध्ये इंग्‍लंडला परत निघाली, पण ती कशीबशी टिकून राहिली. त्यांनी वसविलेल्या जेम्सटाउन या गावावर अनेक आपत्ती आल्या, पण कॅप्टन जॉर्ज स्मिथ याने सगळ्या प्रसंगांना तोंड दिले. १६२४ पर्यंत  या वसाहतीत इंग्‍लंडमधून ५,६४९ माणसे आली, परंतु त्या सुमारास १,०९५ हयात होती.

१६१३-१४ च्या सुमारास जॉन रॅल्फ याने तंबाकूचे पहिले पीक काढले. हे पीक व थोडी शेती यांची शाश्वती वाट लागताच व्हर्जिनियातले जीवन हळूहळू तजेलदार दिसू लागले. या वसाहतीत सगळे पुरुष होते. १६१९ साली इंग्‍लंडमधून आलेल्या नव्वद तरूणींबरोबर त्यांची पटापट लग्ने झाली. त्यामुळे आणखी तरुणी येऊ लागल्या. याच वर्षी एका डच जहाजातून आलेल्या आफ्रिकेतल्या निग्रो गुलामांपैकी वीस गुलाम या वसाहतीतल्या लोकांनी विकत घेतले. वसाहतींची पहिली लोकसभा १६१९ मध्ये अस्तित्वात येऊन वसाहतीचा सार्वजनिक कारभार तिच्या मताप्रमाणे चालू लागला. इंग्‍लंडमधल्या राजमान्य धर्मपंथातल्या लोकांनाच वसाहतीत कायदेशीर स्थान होते, पण माणसांचा तुटवडा असल्यामुळे धार्मिक मतांची घासाघीस करण्याची प्रवृत्ती नव्हती. त्यामुळे कॅथलिक पंथाचे काही लोकही वसाहतीत नांदू लागले होते. व्हर्जिनिया कंपनीने विकसित केलेली ही वसाहत १६२४ साली राजसत्तांकित झाली.

लॉर्ड बॉल्टिमोर या कॅथलिक उमरावाला पहिल्या चार्ल्‌स राजाने ही वसाहत स्थापण्याची सनद दिली. त्यामुळे व्हर्जिनियाच्या उत्तरेस मेरिलंड ही दुसरी एक वसाहत १६३२ च्या सुमारास निघाली. व्हर्जिनियातील लोक मेरिलंडकडे वळले. कॅथलिकांची संख्या बेताची, पण वजनदार तर प्रॉटेस्टंटांच्या बाजूला संख्याबल अधिक, अशी या वसाहतीची घडण बनली. त्यामुळे वसाहतीत १६४९ मध्ये धर्मसहिष्णुतेला कायदेशीर प्रतिष्ठा लाभली. याही वसाहतीचे प्रारंभीचे वैभव तंबाकूच्या पिकावर आधारलेले होते. १६९२ च्या सुमारास ही वसाहत राजसंत्तांकित झाली.

इंग्‍लंडमधल्या स्क्रूबी गावचे काही लोक धार्मिक छळाला कंटाळून हॉलंडमध्ये जाऊन राहिले होते. त्यांनी अमेरिकेत जाण्याची खटपट चालविली. जॉन रॉबिन्सन, विल्यम् ब्रुप्रुस्टर, विल्यम ब्रॅडफर्ड हे पुढारी ‘मे फ्लॉवर’ नावाच्या जहाजातून १०२ माणसे घेऊन अमेरिकेला निघाले. १६२० च्या डिसेंबरात ते व्हर्जिनिया वसाहतीच्या अलीकडे उतरले. अमेरिकेत गेल्यावर लोकशाही पद्धतीचे जीवन थाटण्याचा संकल्प त्यांनी प्रवासातच केला होता. ब्रॅडफर्डला गव्हर्नर नेमून प्लिमथ गावाजवळ त्यांनी वसाहत थाटली. पहिल्या हिवाळ्यात निम्मी माणसे मेली, तरी उरलेल्यांनी वसाहतीचा विकास चालू ठेविला. मासळीचे खत घालून धान्य पिकविण्याची व बीव्हर प्राण्याची शिकार करून अन्नवस्त्र संपादण्याची विद्या त्यांना स्थानिक वन्य जमातींनी शिकविली. या मेळाव्यात डच लोक होते त्यांनी हळूहळू न्यू अमस्टरडॅम गाव वसविले. मॅसॅचूसेट्स वसाहत नावारूपाला आणण्याचे काम या पिल्ग्रिम-फादर्सनी केले.

मॅसॅचूसेट्स वसाहतीची वाढ खूप झपाट्याने झाली. १६३० मध्ये जॉन विन्थ्रपबरोबर आलेल्या नऊशे लोकांनी बॉस्टन इ. नऊ गावे वसविली. भोवतालच्या लोकांना न पेलणार्‍या मतांबद्दल सेलेम शहर सोडण्याचा प्रसंग रॉजर विल्यम्स या धर्मोपदेशकावर आला. ऱ्होडआयलंडच्या वसाहतीचे काम हाती घेऊन त्याने १६३६ मध्ये प्रॉव्हिडन्स शहराची स्थापना केली. याच वर्षी टॉमस हूकर या धर्मोपदेशकाने केंब्रिज गावातले आपले अनुयायी बरोबर नेऊन कनेक्टिकट या वसाहतीचा मुहूर्त केला.

‘न्यू नेदर्लंड्स’ या नावाने डचांनी वसविलेल्या वसाहतीतले न्यू ॲमस्टरडॅम शहर ब्रिटिश वसाहतवाल्यांना मिळाले. डचांचा शेजार इंग्रजांच्या डोळ्यात खुपत होताच. इंग्‍लंडचा राजा दुसरा चार्ल्‌स याने आपला धाटका भाऊ ड्यूक ऑफ यॉर्क याला हा प्रदेश आंदण दिला. या ड्यूकने डचांना तेथून हुसकून लावण्याचे ठरविले. १६६४ मध्ये इंग्‍लंडहून तीन लढाऊ जहाजे या भागात धाडण्यात आली. कनेक्टिकटमधले स्थानिक लष्कर व ही जहाजे दृष्टिपथात आल्यावर शहरातल्या डच लोकांपुढे प्रश्न पडला. डच गव्हर्नर जुलमी असल्यामुळे ‘इंग्रजांची सत्ता बरी’ असे ठरवून डच लोकांनी गव्हर्नरला तोंडघशी पाडले. शहर ताब्यात आल्यावर इंग्रजांनी त्याला ‘न्यूयॉर्क’ हे नाव दिले. मॅसॅचूसेट्स, र्‍होड-आयलंड, मेन, कनेक्टिकट वगैरे वसाहतींचा संघ ‘न्यू इंग्‍लंड’ या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे दक्षिण कॅरोलायना व न्यू हँपशर या वसाहतीही न्यू इंग्‍लंड संघात समाविष्ट झाल्या.

न्यू जर्सी ही डचांची वसाहत १६६४ मध्ये इंग्‍लंडच्या अंकित झाली. डेलावेअर वसाहतीसच पुढे न्यू जर्सी म्हणू लागले. भिन्नभिन्न वसाहतींतून बाहेर पडलेल्या लोकांच्या सहकार्याने उत्तर ⇨कॅरोलायना वसाहत नावारूपाला आली. तिच्यावर १७२९ मध्ये शिक्कामोर्तब झाले. १६८२ च्या सुमारास स्थापन झालेल्या पेनसिल्व्हेनिया वसाहतीच्या उभारणीला विल्यम पेन या माणसाचे श्रम कारणीभूत झाले. क्वेकर पंथातल्या लोकांचा या वसाहतीत खूप भरणा होता. १७३२ मध्ये जॉर्जिया ही वसाहत स्थापिली गेली.

जवळजवळ सव्वा-दीड शतकाच्या काळात अमेरिकेत इंग्रजांच्या तेरा वसाहती नांदू लागल्या. या वसाहतींच्या उत्तरेस व वायव्येस फ्रेंचांची ठाणी नाकेबंदी करून बसली होती, तर त्यांचा दक्षिण भाग स्पेनमधून आलेल्या लोकांनी व्यापला होता. यामुळे इंग्रज वसाहतवाल्यांची कुचंबणा चालली होती. ती कशी कमी करावी, हा प्रश्न इंग्रजांना होता. अशा कामी आपले सरकार उपयोगी पडणार नाही. या जाणिवेने ते स्थानिक वन्य जमातींशी कधी सलोख्याने वागून, कधी त्यांना गुरू करून, तर प्रसंगी त्यांच्याशी संघर्षही करून वेळ निभावून नेत. त्यामुळे निकडीचे, पोटापाण्याचे प्रश्न सोडून अज्ञात मुलखाचे संशोधन करीत बसण्याचा किंवा अन्य जमातींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा छंद या वसाहतवाल्यांनी धरला नाही.

वसाहतींत येऊन राहिलेले लोक प्रायः मध्यमवर्गीय किंवा गरीब होते. जंगले साफ करावी, रानटांशी झगडावे, हवामान पचनी पाडावे, साधेल ती शेती करावी व जमतील ते लहानमोठे धंदे मांडावे, अशा क्रमाने त्यांनी सुखसमृद्धीच्या जीवनाच्या दिशेने वाटचाल केली व उदात्त परंपरा रुजविल्या. तंबाकू, भात, तीळ वगैरे निघतील ती पीके काढण्याचा त्यांनी यत्‍न केला. भूगर्भातले अशुद्ध लोखंड काढून त्यांनी लोहारकाम सुरू करावे, लोकर व चामडी यांच्या मुबलक पुरवठ्याचा फायदा घेऊन उपयुक्त वस्तू बनवाव्या, गरम करडे, साबण, मेणबत्या वगैरे जिन्नस तयार करावे-असे छंद वसाहतवाल्यांना जडले. या उद्योगांत स्त्रियाही भाग घेऊ लागल्या. मच्छीमारीच्या धंद्यातून मासे निर्यात करण्याचा व्यापार सुरू झाला. चामडी व लोकर यांचीही निर्यात किफायतशीर ठरू लागली. हळूहळू करवतकामाचे कारखाने उभे राहिले व पोलाद निर्माण करणारी केंद्रे गजबजू लागली. धान्याचा तुटवडा भासण्याची परिस्थिती पालटून धान्य निर्यात करण्याजोगी स्थिती आल्यावर धान्याऐवजी पीठ निर्यात करावे ही कल्पना सुचून पिठाच्या चक्क्या निघाल्या. आयातनिर्यातीच्या व्यापारी उलाढाली वाढू लागल्या. त्याबरोबर अडतीचा व्यवहार करणार्‍या पेढ्या प्रतिष्ठा पावू लागल्या. आयतनिर्यात-व्यापार करणारी गलबते बांधण्याचे काम जोराने सुरू झाले. वसाहतींचे जीवन या क्रमाने सुखी व समृद्ध होत चालले.

मॅग्ना कार्टापासून इंग्रजांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या झटापटींचा वारसा आपल्याला मिळाला आहे, याचे वसाहतीतल्या लोकांना विस्मरण झाले नव्हते. १६१९ मध्ये अस्तित्वात आलेल्या व्हर्जिनियाच्या परिषदेने आपल्या कारभाराविषयीचे कायदे संमत केले. पुढे ही वसाहत राजसत्तांकित झाली व तिच्या गव्हर्नरांची नेमणूक इंग्‍लंडच्या राजाकडून होऊ लागली तरी परिषदेने आपला स्वतंत्र बाणा टिकवून धरला. नागरिकांच्या इतर अधिकारांप्रमाणे ज्यूरी-पद्धतीने न्यायनिर्णय करून घेण्याच्या अधिकारांची परिषदेने फार जपणूक केली. मॅसॅचूसेट्स वसाहतीत जॉन विन्थ्रप हुकूमशहा बनल्याचा भास आरंभी थोडे दिवस झाला व त्याच्या कारभारावर धार्मिक मतांचा प्रभाव पडण्याची धास्ती वाटू लागली. विन्थ्रप व त्याचे अनुयायी यांच्या पकडीतून सत्ता सुटणार नाही, असे भय निर्माण झाले. पण १६३२ मध्ये या परिस्थितीतून लोकांनी आपली मुक्तता करून घेतली. १६९१ मध्ये ही वसाहत राजसत्तांकित झाली, तरी गव्हर्नराला लोकप्रतिनिधींच्या तंत्राने कारभार चालवावा लागे.

१६३९ मध्ये कनेक्टिकटमधल्या नेत्यांनी आपल्या वसाहतींच्या कारभाराची तत्त्वे लिहून कायम केली. यापूर्वी कोणत्याच प्रदेशात लिखित संविधान बनविण्यात आलेले नव्हते. कनेक्टिकटचे हे उदाहरण अमेरिकेने स्वतंत्र झाल्यावर उचलले. गव्हर्नर, त्यांचे सल्लागार आणि परिषद यांनी मिळून कारभार पाहावा, अशी तजवीज या संविधानात होती. वसाहतीतल्या प्रत्येक शहराचे चार लोकनियुक्त प्रतिनिधी परिषदेत असावे, असे संविधानाने ठरविले होते. क्रॉमवेलच्या मृत्यूनंतर स्ट्यूअर्ट घराणे इंग्‍लंडमध्ये पुन्हा सत्तारूढ झाले, तेव्हा कनेक्टिकटची सनद नव्या स्वरूपात देण्यात आली हे खरे पण तिने लोकांचे अधिकार कमी केले नाहीत. इंग्‍लंडमधल्या कायद्यांशी विरोधी किंवा विसंगत नसलेले कोणतेही कायदे करण्याची मुभा कनेक्टिकटला मिळाली. रॉजर विल्यम्सने ऱ्होड-आयलंडवसाहतीला लोकशासित संस्थांबाबत कनेक्टिकटचा दर्जा मिळवून दिला. ब्रिटिश साम्राज्यातले दोन स्वतंत्र लोकशासित घटक, अशा थाटात या वसाहती सतराव्या शतकाच्या अखेरीस नांदू लागल्या.

तेरा वसाहती स्थिरस्थावर होत होत्या, पण प्रत्येक वसाहत एक स्वतंत्र घटक ही भावना दीर्घकाळपर्यत टिकली. प्रत्येक वसाहतीत मुलामुलींच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय होई, तरी पण उच्च शिक्षणासाठी मुलांना इंग्‍लंडला पाठविण्यात सधन वर्ग अभिमान बाळगीत असे व तेथून शिकून आलेल्या लोकांचे संधान गव्हर्नर व इतर उच्चभ्रू लोकांशी असे. या मिरासदारीविरुद्ध नाथॅन्येल बेकन व त्याचे अनुयायी यांनी बंड पुकारले, तेव्हा ते शमविण्यासाठी गव्हर्नर बर्क्लीला लष्करीची मदत घ्यावी लागली.

सगळ्याच वसाहतींतून भिन्नभिन्न धर्मांचे व पंथांतले, अनेक राष्ट्रांतले व वंशांचे लोक भरले होते. काही वसाहतींचे शासन इंग्‍लंडमधल्या सरकार मान्य धर्मपंथाचा पुरस्कार करीत असे व धर्मोपदेशकांच्या पोटापाण्याचीही सोय लावीत असे. सहिष्णू वृत्ती धारण केल्याशिवाय चालणार नाही, ही सर्वांचीच खात्री पटली असल्यामुळे लोकशाही-पद्धतीच्या प्रातिनिधिक जीवनाच्या संगोपनाबरोबरच सहिष्णू वृत्तीदेखील अमेरिकन स्वभावाचे एक वौशिष्ट्य म्हणून वाढीस लागली. तसेच कष्टाळूपणाबरोबरच आशावादही अमेरिकेतल्या वसाहतवाल्यांच्या वृत्तीचा एक स्थायीभाव ठरून गेला.

जर्मनी, आयर्लंड, स्कॉटलंड या देशांतले लोक तिथल्या परिस्थितीला विटून वसाहतीत आले. पेनसिल्व्हेनियामध्ये तर अठराव्या शतकाच्या मध्यास लोकवस्तीतले तिसरा हिस्सा लोक जर्मन होते. कागद, कापड, मद्य, काचसामान असे अनेक धंदे त्यांनी सुरू केले. या लोकांनी १७३९ मध्ये जर्मन भाषेत निघणारे एक वृत्तपत्रही काढले, पण व्यवहारातील इंग्रजी भाषेला त्यांनी विरोध केला नाही. बरीच वर्षे प्रत्येक वसाहतीचा स्थानिक अभिमान जागृत होता. हा अभिमान जाऊन ‘अमेरिका’ नावाचे राष्ट्र हे आपले राष्ट्र आहे, ही भावना दृढमूल होण्याला बराच काळ जावा लागला.

स्वातंत्र्य-युद्धाचा काळ : सतरावे शतक व अठराव्या शतकाचा आरंभ या कालावधीत थाटत गेलेल्या तेरा ब्रिटिश वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, जर्मन, डच, स्पॅनिश आदी यूरोपीय, असा संकीर्ण समाज नांदू लागला. यात इंग्रजांचे प्रमाण अधिक होते व त्यांच्या भाषेला सर्वमान्यता लाभली होती. लोकशाही पद्धतीच्या प्रातिनिधिक संस्था चालविण्याचे वळण सगळ्याच वसाहतींच्या वृत्तीत होते. आपले व आपल्या नव्या देशाचे भवितव्य एकरूप आहे, ही जाणीव त्यांच्या वृत्तीत वाढत चालली. सर्व वसाहतींना आपल्या माय- पोटात सामावून घेणारा अमेरिका म्हणून एक देश आहे, ही जाणीव अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊ लागली. १७६३ च्या पॅरिस-तहानंतर फ्रेंचांची अमेरिकेतली सत्ता संपुष्टात आली.

यूरोपात उदय पावणारे नवेनवे विचार आत्मसात करणाऱ्या वसाहतवाल्यांच्या पुढाऱ्यांना दूर असलेल्या मायदेशाने आपल्यावर सत्ता गाजवावी व आपले भवितव्य ठरवावे हे मान्य नव्हते. इंग्‍लंडच्या संसदेत संमत केलेल्या कायद्यांचे अधिराज्य आपल्यावर चालावे हे अन्यायाचे आहे, हा विचार व त्याचा प्रचार वसाहतींत होऊ लागला. अशा कायद्यांपैकी स्टँप ॲक्ट १७६६च्या मार्चमध्ये रद्द झाला. तरी पण चहा, कागद अशा मोजक्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची चळवळ १७६८ मध्ये बॉस्टनमध्ये सुरू झाली व ती चौफेर पसरली. चहाव्यतिरिक्त वस्तूंवरील कर पुढे रद्द झाले, तरी चळवळ मंदावली नाही. उलट वसाहतींमधील क्षोभ भडकू लागला व त्याला संघटित स्वरूप येऊ लागले. १७७४ च्या सप्टेंबरात बारा वसाहतींमधील पुढारी फिलाडेल्फिया शहरी जमून त्यांनी आपल्या सभेला ‘काँटिनेंटल काँग्रेस’ हे नाव दिले. युद्ध अटळ आहे, या जाणिवेने दोन्ही पक्ष वागू लागले. जूनच्या मध्यास ⇨बंकरहिलच्या लढ्यात ब्रिटिश सैनिकांची कत्तल झाली. या प्रसंगाने अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामास तोंड लागले. ⇨जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेन सैन्याचा सरसेनापती नेमून युद्ध चालविण्याचे काँग्रेसने ठरविले. काँटिनेंटल काँग्रेस अमेरिकेचे सरकार म्हणून वावरू लागली आणि तिने ४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून ‘अमेरिकेची संयुक्त संस्थाने स्वतंत्र व स्वायत्त आहेत’ असे जाहीर केले. त्यानंतर वसाहतवाले व ब्रिटिश ह्यांत अनेक लहानमोठ्या लढाया होऊन १७८३ च्या पॅरिस-तहाने अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध संपले व अमेरिका हा एक स्वतंत्र देश अस्तित्वात आला.

स्वातंत्र्योत्तर काळ : अमेरिका १७८३ च्या सप्टेंबरमध्ये स्वतंत्र राष्ट्र झाले. युद्धकाळात अनेक घटक राज्यांनी कायदे केले होते. सार्वभौमत्व गाजविण्याची त्यांची चटक आणि लगतच्या राज्यांच्या भिन्न आर्थिक गरजा यांमुळे घटक राज्यांतून बखेडे माजण्याची भीती उत्पन्न झाली. राष्ट्राचा कारभार चालविण्याची कुवत अंगी असलेल्या राज्ययंत्राच्या अभावी आर्थिक क्षेत्राच बजबजपुरी माजली. डॅन्येल शेझच्या पुढाकाराखाली शेतकऱ्यांनी बंड केले. लष्कराने बंड मोडले पण त्यामुळे भक्कम राज्ययंत्रणेची गरज सर्वांना पटली. काँटिनेंटल काँग्रेस त्या मानाने अपुरी आहे, ह्या जाणिवेतून १७८७ च्या मे महिन्यात बारा घटक राज्यांतले पंचावन्न प्रतिनिधी फिलाडेल्फिया येथे संविधान घडविण्यासाठी जमले. १७ सप्टेंबर १७८७ रोजी त्यांची शेवटची बैठक होऊन तीत तीन घटकराज्यांव्यातिरिक्त सर्वांनी संविधानास मान्यता दर्शविली. पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन व उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जॉन ॲडम्स ही जोडी कारभार पाहू लागली. वॉशिंग्टन लागोपाठ दोनदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला गेला. तिसर्‍या वेळी उभे राहावयाचे नाही असे ठरवून तो १७९६ च्या शेवटी निवृत्त झाला. वॉशिंग्टनच्या कारकिर्दीत स्वातंत्र्यसंग्रमाच्या काळात घटक राज्यांनी उभारलेल्या कर्जांना राष्ट्रीय कर्ज म्हणून मान्यता देण्यात आली, त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा विश्वास इतर राष्ट्रांत निर्माण झाला. दारूवरील उत्पादनकरामुळे काही घटक राज्यांत बंडे झाली. त्यांचा बंदोबस्त करून सरकारने केंद्रसत्तेच्या सामर्थ्याची चुणूक दाखविली. ॲडम्स, ⇨जेफर्सन, मॅडिसन या राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दींना यूरोपातली धामधूम पुरून उरली. तटस्थ अमेरिकेचे या काळात ब्रिटनशी युद्ध सुरू झाले, पण ते चिघळले नाही. जेफर्सनच्या कारकिर्दीत अमेरिकेने नेपोलियनजवळून लुइझिॲना हा विस्तीर्ण मुलूख सव्वा लक्ष डॉलरना खरेदी केला. अटलांटिक व पॅसिफिक या महासागरांच्या चिमट्यात अमेरिकेचा जो मुलूख सध्या पसरला आहे, त्यातला तिसरा हिस्सा यामुळे अमेरिकेच्या पदारात पडला. पुढे १८१७ पासून आठ वर्षे ⇨जेम्स मन्‍रो राष्ट्राध्यक्ष होता. फ्रान्सपासून विकत घेतलेला लुइझिॲना मुळात स्पेनचा, तो गेला तरी स्पेनचा मुलूख थोडा नव्हता. कमजोर झालेल्या स्पेनला हा मुलूख सांभाळण्याचे त्राण नाही हे पाहून मन्‍रोने १८२३ मध्ये घोषणा केली, ती मन्‍रो डॉक्ट्रिन म्हणून ओळखली जाते. अलास्कात पाय पसरू पाहणार्‍या रशियाला व इतर यूरोपीय राष्ट्रांना रोखणे, हाही या घोषणेचा हेतू होता.

वॉशिंग्टनपासून अँड्र्यूूूू जॅक्सनपर्यंतच्या सु. चाळीस वर्षांच्या काळात पक्षनिष्ठ जीवन सुरू झाले, पण फेडरॅलिस्ट पक्ष दुर्बल होऊन या वेळी रिपब्‍लिकन पक्षच सत्तारूढ राहिला. तथापि या पक्षाला फेडरॅलिस्टांची पुष्कळ तत्त्वे स्वीकारावी लागली. नव्या मुलखात वस्ती वाढली व नवी घटक राज्ये नांदू लागली. त्यामुळे जुन्या घटक राज्यांचे महत्त्व घटण्याचा संभव निर्माण झाला. सरोवरे व कालवे यांतून नाविक वाहतूक सुरू झाल्यामुळेही घटक राज्यांची परस्परावलंबित्वाची भावना जोपासली जाऊ लागली. वृत्तपत्रांची वाढ व शिक्षणप्रसार यांमुळे जीवन सुसंस्कृत होत चालले. कपाशीचे पीक, सरकी काढणाऱ्या यंत्राचा प्रसार, कापडगिरण्यांची स्थापना, लोखडपोलादाचे उत्पादन यांमुळे जीवन संपन्न होत चालले. गुलामांची विक्री कायद्याने थांबली पण ते बाळगण्याची मुभा मात्र राहिली. काही नव्या वसाहतींत गुलामगिरीला विरोध, तर काहींत अनुकूलता होती. त्यामुळे नवी घटक राज्ये केंद्रात घेताना घासाघीस होऊ लागली.

१८२८-३७ या अवधीत राष्ट्राध्यक्ष असलेला अँड्र्यू जॅक्सन पूर्वीच्या अध्यक्षांहून वेगळा होता. अनुभवामुळे मुरलेला माणूस राष्ट्राध्याक्षपदाला योग्य, हे ज्यांना मान्य नव्हते, अशा नव्या घटक राज्यांतल्या बहुमताने जॅक्सनला निवडला होता. केंद्र सरकारचे जकातविषयक धोरण आपल्याला अमान्य असल्यामुळे आपण ते मानणार नाही, अशी दांडगाईची भाषा दक्षिण कॅरोलायनाने काढली. त्याला इतर काही घटक राज्यांचा पाठिंबा मिळण्याचा संभव दिसू लागला. ही प्रवृत्ती सशस्त्र बंडाचे रूप धारण करते की काय, अशी भीती पडली. पण केंद्र सरकारने खंबीरपणा दाखविला व इतर घटक राज्यांनी हातपाय गाळले. त्यामुळे यादवी युद्धाचा धोका तात्पुरता टळला.

टेक्सासमधली स्पेनची सत्ता १८२० च्या सुमारास संपली. या भागातल्या जमिनी भाडेपट्ट्याने घेऊन तेथे अमेरिकन नागरिकांना वसविण्याचा उद्योग जॅक्सनच्या कारकिर्दीपूर्वी सुरू झाला होता. या लोकांनी स्थानिक सत्तेविरुद्ध बंड पुकारून टेक्सासचे स्वातंत्र्य जाहीर केले. जॅक्सनने त्याला मान्यता दिली. हा मुलूख व लगतचा ऑरेगन हा भाग अमेरिकेत समाविष्ट होण्याला वेळ लागला. पण हा मुलूख पचनी पाडण्याच्या क्‍लृप्त्या जॅक्सनच्या काळात सूरू झाल्या.

जॅक्सनचा अस्त आणि ⇨अब्राहम लिंकनचा उदय यांच्या दरम्यान दोन तपे गेली. या काळांतले राष्ट्राध्यक्ष सर्वसाधारण दर्जाचे होते. राष्ट्रापुढे गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहत होते राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूंमूळे उपराष्ट्राध्यक्षांचे राष्ट्राध्यक्ष बनले, तरीही टायलर व फिलमोर यांनी काम निभावून नेले. या काळात मेक्सिकोमधल्या सत्ताधार्‍यांशी लढून अमेरिकेने टेक्सास हस्तगत केले. टेक्सास बरोबर कॅलिफोर्नियाचा काही भाग अमेरिकाने बळकावल्यामुळे अमेरिका पॅसिफिक महासागराला जाऊन भिडली.

लुइझिॲनाच्या पश्चिमेकडचा भाग शेतीला निरुपयोगी आहे, हा समज झटकून तिकडे घुसलेल्या लोकांनी शेती करण्याला सुरुवात केली. मॉर्मन्स मतसंप्रदायातल्या लोकांनी सॉल्ट लेक भागात वस्ती थाटल्यामुळे उटा हे घटक राज्य नावारूपाला आले. मूळची तेरा घटक राज्ये १८१९ च्या सुमारास बावीस झाली त्यानंतर तीस वर्षांत आर्‌कॅन्सॉ, मिशिगन, ओहायओ, फ्लॉरिडा, टेक्सास, कॅलिफोर्निया, उटा, मिसूरी, मेन या घटक-राज्यांच्या समावेश त्यांत झाला. पॅसिफिक महासागरालगतच्या भागात १८४८ मध्ये सोन्याचा शोध लागला. लोकांचा ओघ त्या दिशेने वाहू लागल्यामुळे कॅलिफोर्निया वगैरे घटक राज्ये झपाट्याने उत्कर्ष पावली. औद्योगिक उत्कर्षामुळे श्रीमंती वाढली, ज्ञानार्जनाची साधने प्रसार पावली. छोटे लोहमार्ग आखण्याला अमेरिकेने १८३३ मध्ये आरंभ केला. पॅसिफिक महासागराच्या बाजूचा भाग वस्तीने गजबजून गेल्याबरोबर, पूर्वपश्चिमेचा सांधा जोडणाऱ्या लोहमार्गाची निकड १८५० पासून भासू लागली. इलिनॉय, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको अशी घटक राज्ये पॅसिफिक महासागरालगत ऊर्जितावस्थेला आली आणि संघराज्यातला त्यांचा प्रवेश हा प्रश्न निकरावर आला.

हा प्रश्न अनिर्णित असतानाच अमेरिकेत यादवी युद्ध पेटले. या युद्धाच्या कारणांबद्दल इतिहासज्ञांत मतभेद आहेत. पण गुलामांच्या श्रमावर आधारलेली दक्षिणेकडील ग्रामीण जीवनपद्धती व गुलामगिरीला विरोध करणारी उत्तरेकडील शहरी व औद्योगिक जीवनपद्धती यांमधील संघर्ष या लढ्याच्या मुळाशी होता. अब्राहम लिंकन अध्यक्षपदी निवडून येताच (१८६०) दक्षिण कॅरोलायना राज्य संघाबाहेर पडले. ‘कॉनफिडरेटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ हे दक्षिणेचे नवे संघराज्य स्थापून जेफर्सन डेव्हिसची अध्यक्ष व अलेक्झांडर स्टीव्हेंझची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करून नव्या सार्वभौम राज्यांच्या संघाचे उद्‌घाटन करण्यात आले.

गुलामगिरी प्रचलित असलेल्या राज्यात हस्तक्षेप करण्याचा लिंकनचा विचार नसला, तरी ‘कोणत्याही घटक राज्याला कायदेशीरपणे संघातून बाहेर पडता येणार नाही’ असे त्याचे ठाम मत असल्याने संघ सरकारच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी फुटीर राज्यांविरुद्ध शस्त्र उपसणे त्याला भाग पडले. १२ एप्रिल १८६१ रोजी दक्षिणी संघाने फोर्ड सम्टरवर हल्ला चढविल्याने प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली व दक्षिण सैन्याच्या शेवटच्या टोळीने शरणागती पतकरल्याने २६ मे १८६५ ला ते युद्ध संपले. लिंकनची राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवडणूक होऊन बंडखोर घटक-राज्यांना आत्मसात कसे करून घ्यावयाचे, याविषयी तो विचार करीत होता, तोच १४ एप्रिल १८६५ रोजी त्याचा खून झाला व उपराष्ट्राध्यक्ष अँड्र्यूूूू  जॉन्सनवर राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी आली.

बंडखोर घटक राज्यांतल्या गोऱ्यांची खोड मोडू पाहणार्‍या लोकप्रतिनिधींनी त्या भागातल्या मुक्त गुलामांना शेफारून ठेवले. अँड्र्यू जॉन्सनला राष्ट्राध्यक्ष म्हणून अधिकार होते, त्यांतले महत्त्वाचे अधिकार हिरावून घेण्यात आले. मुक्त गुलामांना हाताशी धरून आपले बांधवच आपला छळ करीत आहेत, त्यांना ताळ्यावर आणण्याचा उपाय आपल्याजवळ नाही, ही विफलतेची जाणीव पराभूत घटक-राज्यांत फैलावली. त्यामुळे त्या भागांत ⇨कू क्‍लक्स क्‍लॅन ही गुप्त दहशतवादी संघटना निघाली. या सुमारास विरोधकांनी अँड्र्यू जॉन्सनवर संसदीय अभियोग दाखल केला. त्यात अँड्र्यू जॉन्सन निर्दोषी ठरला. हे चालू असताना राष्ट्राध्यक्षाची निवडंणूक झाली व यादवी युद्धातला सरसेनापती युलिसीझ ग्रँट रिपब्‍लिकन पक्षातर्फे निवडून आला. रशियापासून अलास्का खरेदी करण्याचे काम जॉन्सनच्या काळात झाले. त्याच वेळी सेंट्रल पॅसिफिक व युनियन पॅसिफिक या संघटनांनी चालू केलेले लोहमार्गांच्या आखणीचे कामही पुरे झाले. त्यामुळे मिसिसिपी खोऱ्यापलीकडचा पश्चिम अमेरिकेचा भाग वस्तीने गजबजू लागला व तेथे मांसाची कारखानदारी उदयास आली. या काळात दक्षिणेकडची घटक राज्येही सावरली. शेतीचे स्वरूप बदलून तिकडच्या लोकांनी ती किफायतशीर करून दाखविली आणि या लोकांनी उद्योगधंद्याकडेही लक्ष पुरविले. अमेरिकेच्या सर्व भागांत प्रचंड लोकवस्तीची शहरे या काळात थाटली गेली. एकंदरीत लोकवस्तीचे शहरांत, सत्तेचे रिपब्‍लिकन पक्षात व संपत्तीचे श्रीमंतांच्या हाती केंद्रीकरण-हे या काळाचे विशेष ठरले.

१८७६ साली झालेल्या स्वातंत्र्यशताब्दीपर्यंत ग्रँट राष्ट्राध्यक्ष राहिला परंतु पुढे त्यास लोकप्रियता लाभली नाही. सॅम्युएल टिल्डन हा त्याच पक्षातील उभेदवार डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडणुकीत उतरला. मतमोजणीतल्या गोंधळामुळे निवडणुकीचा निकाल एका आयोगाकडे सोपविण्यात आला. हेज हा रिपाब्‍लिकन पक्षाचा उमेदवार निवडून आल्याचे आयोगाने जाहीर केले. हेजला विरोध करणारे लोक त्याच्या पक्षात पुष्कळ होते. असे असूनसुद्धा ‘सरकारी नोकरांची भरती सिव्हिल सर्व्हिस कमिशनच्याद्वारा व्हावी’ ही सुधारणा त्याने अंमलात आणली. शिवाय जकातवसुली खात्यातल्या गोंधळाला पायबंद घालून सोन्याप्रमाणे चांदीचे डॉलरही प्रचारात यावेत म्हणून त्याने यत्‍न केला. हेजच्या ह्या धोरणास त्याच्या पक्षातले काही लोक व विरोधक ह्यांनी विरोध केला. त्यानंतर १८८१ च्या आरंभी जेम्स गारफिल्ड रिपब्‍लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष निवडला गेला पण त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचा खून झाल्यामुळे उपराष्ट्राध्यक्ष चेस्टर आर्थर राष्ट्राध्यक्ष झाला. सरकारी नोकरांच्या हजारो जागा पब्‍लिक सर्व्हिस कमिशनच्या कक्षेत नेणारा पेंडलटन कायदा त्याच्या कारकिर्दीत झाला. आयात मालवरचा कर कमी करण्याला आर्थरच्या पक्षातल्या लोकांनी विरोध केला. त्याला फेरनिवडणुकीची संधी न देता रिपब्‍लिकन पक्षाने १८८४ अखेरची निवडणूक लढविली. डेमोक्रॅटिक पक्षाचा स्टीव्हेन ग्रोव्हर क्लीव्हलंड यशस्वी झाल्यामुळे रिपब्‍लिकन पक्षाची सत्ताक्षेत्रातली मक्तेदारी संपली. क्लीव्हलंडने निवृत्त सैनिकांच्या नावावर चाललेली सरकारी तिजोरीची लूट कमी करण्याचा प्रयत्‍न केला. लक्षावधी हेक्टर जमीन खाजगी मालकीची होती. तीपैकी बरीचशी क्लीव्हलंडने सरकारी ठरवून घेतली. चांदीचे चलन वारेमाप खेळते ठेवणे धोक्याचे आहे, म्हणून जकातीचे दर उतरविणे आवश्यक आहे हे क्लीव्हलंडने दाखविले तथापि १८८८ च्या शेवटी झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत क्लीव्हलंड पराभूत होऊन रिपब्‍लिकन पक्षाचा जनरल हॅरिसन निवडून आला.

चांदीच्या चलनाचा बेसुमार वापर, जकातीच्या दरांची तटबंदी आणि निवृत्त सैनिकांचे लाड यांमुळे हॅरिसनच्या कारकिर्दीतील पहिली दोन वर्षे चिंतेत गेली. त्या सुमारास झालेल्या काँग्रेसच्या निवणुकीत रिपब्‍लिकन पक्षाने मार खाल्ला. त्यामुळे हॅरिसनच्या कारकिर्दीची उरलेली वर्षे थोडी बरी गेली. १८९२ च्या शेवटी क्लीव्हलंड पुन्हा निवडला गेला. चांदीचे चलन नियंत्रित करणारा कायदा १८९३ च्या शेवटी संमत झाला. व्यवहारात फिरत राहणाऱ्या सरकारी रोख्यांमुळे तिजोरीतले सोने धुवून जात होते. सराफकट्ट्यावरील एका प्रमुखाच्या पेढीच्या गळ्यात खूप मोठ्या किंमतीचे रोखे बांधून सुवर्णसंचय संपुष्टात येण्याचा धोका क्लीव्हलंडने टाळला. क्लीव्हलंडच्या कारकिर्दीत शेतकरी-कामकरी वर्गात असंतोष वाढत होता. व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतल्या भागाबद्दलचा ब्रिटन व अमेरिका यांच्या दरम्यानचा वाद लवादाकडे सोपविण्यात आला. सामोआ या पॅसिफिक महासागरातल्या बेटात अमेरिकेचे हितसंबंध गुंतले होते. अमेरिका व जर्मनी यांच्या दरम्यान या मुलखाची विभागणी करण्याची योजना क्लीव्हलंडच्या काळात वाटचालीला लागली. वॉशिंग्टन वगैरे पॅसिफिक महासागरालगतची घटक राज्ये संघात सामील झाल्यामुळे पश्चिमेकडे सरकत जाण्याच्या अमेरिकनांच्या लालसेला आळा बसणार, हे स्पष्ट झाले.

क्लीव्हलंडच्या मागून रिपब्‍लिकन पक्षाचा मॅकिन्ली राष्ट्राध्यक्ष आणि आरमार खात्यात नोकरीस असलेला ⇨ थीओडोर रूझवेल्ट उपराष्ट्राध्यक्ष झाला. दुर्बळ झालेल्या स्पेनचे अटलांटिक महासागरातले क्यूबा, प्वेर्त रीको हे भाग अमेरिकेने घेऊन पॅसिफिक महासागरातला फिलिपीन द्वीपसमूहही घेतला. याच्या कारकिर्दीत चीनमधल्या व्यापारात हिस्सा मिळविण्याची खटपट झाली. दुसर्‍या अध्यक्षीय कारकिर्दीतही मॅकिन्लीला या गोष्टी पुरल्या. १९०१ च्या मार्च महिन्यात मॅकिन्लीचा खून होऊन उपराष्ट्राध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट राष्ट्राध्यक्ष झाला आणि १९०४ मध्ये रूझवेल्टच पुन्हा निवडून आला. ट्रस्ट, कार्टेल यांसारख्या संघटना उभारून औद्योगिक क्षेत्रास त्याने उत्तेजन दिले आणि आरोग्यदृष्ट्या सुधारणा करून खाद्यपदार्थांतल्या भेसळीला प्रतिबंध केला पनामा कालव्याची योजना चालू केली. १९०४ साली सुरू झालेल्या रशिया-जपान-युद्धात त्याने यशस्वी मध्यस्थी केली. त्याकरिता शांततेचे नोबेल पारितोषिक त्याला मिळाले (१९०६).

रूझवेल्टच्या जागी विल्यम हौअर्ड टॅफ्ट हा रिपब्‍लिकन पक्षाचा उभेदवार निवडून आला. पोस्टल सेव्हिंग्ज बँकेची स्थापना, पोस्टाने पार्सले धाडण्याच्या पद्धतीची सुरुवात, सीनेटमधल्या लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष-मतदान-पद्धतीने निवड या गोष्टी त्याच्या काळात घडल्या.

१९१२ च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे ⇨ वुड्रो विल्सन निवडून आला. विल्सनने उत्पादित मालावरील कर कमी केले. जीवनावश्यक वस्तूंवरील कर माफ व्हावेत यासाठी यत्‍न केले. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची सोय त्याने केली आणि बँकांमार्फत होणाऱ्या सट्टेबाजीच्या व्यवहारांवर नियंत्रण घातले. पैसे पेरून मुलूख हस्तगत करण्याचे धोरण विल्सनला पसंत नव्हते, तरीही त्याला क्यूबाच्या भानगडीत पडावे लागले.

पहिल्या महायुद्धाचा काळ : १९१४ त सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात पहिली दोन-अडीच वर्षे अमेरिका तटस्थ राहिली. महायुद्धामुळे अमेरिकेचा व्यापार खूप भरभराटला मात्र महायुद्धातले दोन्ही पक्ष अमेरिकेच्या तटस्थपणाबद्दल शंका व्यक्त करू लागले. १९१५ च्या मध्यास जर्मन पाणबुड्यांनी बुडविलेल्या दोन ब्रिटिश आगबोटींतले अमेरिकन नागरिक मेले. त्यामुळे अमेरिकन लोकमत बिथरले पण प्रसंग निभावून गेला. युद्ध लांबू नये म्हणून विल्सनने कर्नल हाउस या शांतिदूताला यूरोपात धाडले व दुसऱ्या बाजूने लष्कर व आरमार यांमधील वाढ आणि लष्करी शिक्षणाचा प्रसार इ. गोष्टींकडेही लक्ष पुरविले. १९१७ च्या आरंभी अमेरिकेच्या बोटी अधिकाधिक प्रमाणात जर्मन पाणबुड्यांचे भक्ष्य बनू लागल्या. जर्मनी मेक्सिकोला युद्धास प्रवृत्त करीत असल्याचा पुरावा १९१७ च्या फेब्रुवारीत विल्सनच्या हाती पडला. तो प्रसिद्ध झाल्याबरोबर अमेरिकेतले लोकमत युद्धोत्सुक झाले. ६ एप्रिल १९१७ रोजी दोस्तांचे सहकारी राष्ट्र म्हणून अमेरिकेने युद्धप्रवेश केला. जर्मन पाणबुड्यांना पुरून उरेल असे नाविक सामर्थ्य वाढविण्याला अमेरिकेने सुरुवात केली. अमेरिकन सैनिकांची संख्या पावणेचार लक्षांवरून अठ्ठेचाळीस लक्षांवर गेली. अमेरिकेतल्या सावकारांनी ब्रिटनसाठी कर्जे उभारली होती. युद्धप्रवेशानंतर सरकारने प्रचंड कर्जे उभारली व करांच्या रूपानेही प्रजेकडून अमाप पैसा काढला. अमेरिकन नागरिकांना ही अर्थव्यवस्था आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अपहार करणारे कायदे पसंत नव्हते. त्यामुळे विल्सन अप्रिय होऊ लागला. हिंडेनबर्ग लाइन या जर्मनीने उभारलेल्या संरक्षणफळीवरील दोस्तांच्या हल्ल्यातही अमेरिकन सेनाविभागाने चांगली कामगिरी केली. पण यापूर्वीच जर्मनीचा प्रतिकार थंडावत चालला होता. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धतहकुबीच्या अटी मान्य होऊन पहिले महायुद्ध थांबले.

प्रथममहायुद्धोत्तर काळ : अमेरिकेच्या युद्धप्रवेशाच्या वेळेपासून सीनेटमधल्या विरोधी नेत्यांनी विल्सनला विरोध सुरू केला होता. पॅरिस येथे तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या, तेव्हा तहाच्या मान्यतेचे अधिकार सीनेटचे, हे लक्षात घेऊनही विल्सनने विरोधी सीनेटरांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे त्याची परवड झाली तथापि त्याने सीनेटरांना तहाचे महत्त्व पटवून दिले. १८ जून १९१९ रोजी जर्मनीने ⇨व्हर्सायतहावरस्वाक्षरी केली. स्वदेशी परतल्यावर तहाला व ⇨ राष्ट्रसंघाच्या योजनेला सीनेटची मान्यता मिळविण्याची खटपट विल्सनने चालवली. विल्सन दोऱ्यावर निघाला. २५ सप्टेंबर रोजी दौऱ्यात त्याला अर्धांगाचा झटका आला. दीड वर्ष तो अंथरुणावर पडून काम पाही. या सुमारास संविधानात दोन महत्त्वाच्या दुरुस्त्या झाल्या. एकीने दारूबंदीचा कायदा बनविला आणि दुसरीने निवडणुकांत मत देण्याचा व उभे राहण्याचा महिलांचा अधिकार मान्य केला. या सुमारास अमेरिकेच्या मालाला चांगली मागणी होती. युद्धकाळात रेल्वेवाहतुकीसारखे धंदे सरकार-नियंत्रित होते. १९१९-२० मध्ये अमेरिकेत संपामागून संप झाले. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका असणारे संप सर्वस्वी असमर्थनीयच, असे बजावणारा कॅल्व्हिन कूलीज या काळात श्रेष्ठ प्रतीचा राष्ट्रनेता ठरला. रिपब्‍लिकन पक्षाचा वॉरेन हार्डिंग व कॅल्व्हिन कूलीज हे राष्ट्राध्यक्ष-उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. स्वस्त परदेशी मालाचे संकट टळावे, म्हणून अशा मालांवर कर-आकारणी करण्याकरिता टॅरिफ कमिशन अस्तित्वात आले.

सु. वीस राष्ट्रांकडून अमेरिकेचे कर्ज वसूल व्हावयाचे होते. त्याची फेड अशक्य झाल्यामुळे वसुलीचा पश्न बिकट बनला. तसेच या वेळी महत्त्वाच्या खात्यांतली लाचलुचपत हार्डिंगच्या लक्षात येऊ लागली. इभ्रत सावरण्याच्या उद्देशाने तो २० जून १९२३ रोजी दौर्‍यावर निघाला. सॅन फ्रॅन्सिस्को शहरी तो आजारी पडला व तेथेच २ ऑगस्ट रोजी ख्रिस्तवासी झाला. तेव्हा कूलीज राष्ट्राध्यक्ष झाला आणि पुढील वर्षी निवडणूक जिंकून तोच १९२८ अखेर राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिला. हार्डिंगच्या काळातले दोष कूलीजला काढावे लागले तत्संबंधीची काही प्रकरणे १९३०-३१ पर्यंत न्यायालयात रेंगाळली. १९२४ मध्ये जपान्यांचा अमेरिका-प्रवेश बंद झाला. निवृत्त सैनिकांची अमेरिकन लीजन ही संघटना या काळात शास्त्यांना ताप देऊ लागली. या लोकांना वीस वर्षे मुदतीची विमापत्रे द्यावी व त्यांचे हप्ते सरकारने भरावे, अशी योजना लोकप्रतिनिधींपुढे आली व राष्ट्रावर डोईजड बोजा लादणारी ही योजना मान्यही झाली. महायुद्धकाळात मालाचा उठाव होत गेल्यामुळे शेतीची कामे यंत्रांच्या मदतीने होऊ लागली. त्यामुळे सामान्य शेतकर्‍याला शेती परवडेनाशी झाली. शेतकरी मजूर म्हणून शहरांकडे जाऊ लागले. शेतकर्‍यांसाठी जॉर्ज पीक व ह्यू जॉन्सन यांनी पीक-जॉन्सन-योजना काढली. पण ती कागदावरच राहिली. अमेरिका कर्जवसुलीसाठी डॉझ-योजना, यंग-योजना आदी योजना आखण्यात पुढाकार घेत होती. कू. क्लक्स क्लॅन ही अत्याचारी संघटना राजकारणावर छाप पाडू लागली. चोरट्या दारूधंद्यावर पोसलेले अल् कपोनीसारखे लोक नेत्यांचे दादा बनले. बोलपट, रेडिओ यांचे वेड, मोटारींची वाढ इत्यादींमुळे समाजात उच्छृंखलपणा बोकाळला.

१९२८ च्या शेवटी हर्बर्ट हूव्हर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला गेला. त्या वेळी अमेरिकेत शेअरबाजाराला महत्त्व आले होते आणि दलालांच्या हातचलाखीमुळे शेअर्सचे आकर्षण वाढले. शेअर्समुळे त्यात बँका गोवल्या गेल्या व शेअरबाजारात घबराट उडाली. हूव्हरचे उपाय अपुरे ठरले मात्र सार्वजनिक उपयुक्ततेच्या बाबतीत त्याने काही गोष्टी करून दाखविल्या. तसेच जपानची चीनवरील आक्रमणे, यूरोपातील मंदीची लाट व अमेरिकेची कर्जवसुली ह्या हूव्हरच्या कारकिर्दीतील आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, सर्वांना त्याने तोंड दिले. १९३२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा ⇨फ्रँकलिन रूझवेल्ट निवडून आला. त्याने बँकांची पाहणी करून ठेवींच्या सुरक्षिततेबद्दल लोकांना निर्वाळा दिला. बँकांच्या व्यवहारांवर फेडरल रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण बसले. त्यामुळे रोखेबाजाराला शिस्त लागली. तसेच नॅशनल लेबर बोर्डावर मालक व मजूर यांचे प्रतिनिधी घेऊन रूझवेल्टने शेतीविषयक कटकटी टाळल्या आणि दारूबंदी शिथिल केली. थोडक्यात, रूझवेल्टच्या ⇨न्यू डील योजनेने अमेरिकेच्या मंदावलेल्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणले. १९३३ च्या शेवटी अमेरिकेने व्यापारवृद्धीच्या हेतूने रशियाच्या कम्युनिस्ट सरकारला मान्यता दिली. रूझवेल्ट पुन्हा १९३६ मध्ये निवडून आला. ह्या वेळी जर्मनीत हिटलरची सत्ता, इटलीत मुसोलिनीची सत्ता स्थापन होऊन स्पेनमध्ये यादवी-युद्ध सुरू होते. तटस्थता-कायदा करून अमेरिका हे पाहत बसली. नवीन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा अडथळा होतो, म्हणून रूझवेल्टने १९३७ मध्ये न्यायालयाच्या पुनर्घटनेची योजना जाहीर केली त्याच्या योजनेला विरोध झाला, म्हणून त्याने आग्रह धरला नाही. देशाच्या कारभाराचे स्वरूप पालटण्याचा प्रयत्‍नही रूझवेल्टने यथाशक्ती केला. रूझवेल्टने लष्करी खर्चात वाढ केली आणि तटस्थतेच्या कायद्यातले दोष तो दाखवू लागला. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. हे महायुद्ध सहा वर्षे चालले. पहिली अडीच वर्षे अमेरिका तटस्थ होती. पण १९४० च्या अखेरीस रूझवेल्ट तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला आणि अमेरिकेची तटस्थता क्रमशः बदलली. रोख किंमत देऊन ब्रिटन-फ्रान्स आपल्या बोटींतून माल नेतील तर तो पुरविण्याला अमेरिका तयार आहे, असे १९३९ च्या शेवटी रूझवेल्टने जाहीर केले. नऊ लाख नागरिकांना दरसाल लष्करी शिक्षण देण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला. अमेरिकेजवळचे ब्रिटिश भूभाग अमेरिकेला तळ म्हणून वापरायला मिळावेत, याबद्दल मोबदला म्हणून अमेरिकेने जुन्या पन्नास विनाशिका ब्रिटनला पुरविल्या. त्याचप्रमाणे ⇨अटलांटिक सनद त्याने प्रसिद्ध केली. अमेरिकेला शांततेच्या थापांवर झुलवीत ठेवून जपानने १९४१ च्या शेवटी पॅसिफिक महासागरातल्या पर्ल हार्बर या अमेरिकन आरमारी तळावर हल्ला चढविला. यामुळे अमेरिका महायुद्धात सामील झाली. यानंतर साडेतीन वर्षांनी यूरोपातले युद्ध थांबले. जपानी शहरांवरील अणुबाँब-हल्ले व जपानची शरणागती या घटना त्यानंतरच्या चारसहा महिन्यांतील होत. १९४४ च्या शेवटी रूझवेल्ट चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला गेला. युद्धात अमेरिकेने अफाट खर्च केला. क्वेवेक मॉस्को, तेहरान, पॉट्सडॅम अशा ठिकाणी जमून अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन व रशिया यांच्या नेत्यांनी व सेनापतींनी विचारविनिमय करून काही योजनांचे एकसूत्रीकरण केले.

दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ : १९४५ च्या एप्रिलमध्ये रूझवेल्ट ख्रिस्तवासी झाला. त्याआधी त्याने युद्धोत्तर जगाला वळण लावणारी आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आणली होती. मे १९४५ मध्ये जर्मनी व पुढे ऑगस्टमध्ये जपान शरण आले. त्या वेळी ट्‌रूमन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला होता. ⇨ ट्‌रूमन (१९४५-५२), ⇨आयझनहौअर (१९५३-६१), ⇨केनेडी (१९६१-६३), जॉन्सन (१९६३-६९), निक्सन (१९६९-७४) यांच्या कारकिर्दीत अमेरिकेला युद्धोत्तर काळातील अनेक बिकट समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. ट्‌रूमन अध्यक्षपदी येताच जपानविरुद्ध अणुबाँबचा वापर करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात येऊन जागतिक राजकारणातील अणुयुगाची सुरुवात झाली. पूर्वींची अलिप्तता सोडून साम्यवादाच्या जागतिक प्रसाराला आळा घालण्यासाठी व लोकशाहीच्या मार्गाने जाणाऱ्या देशांना साहाय्य करण्याच्या उद्देशपूर्तीसाठीमार्शल योजना व ⇨नाटो, ⇨सीटोसारख्या संघटना उभारण्यात आल्या. परंतु या उपायांनी रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाला आळा बसला नाही. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीची स्थापना, बर्लिनचा प्रश्न, ⇨कोरियन युद्ध, मध्यपूर्वेकडील अरब-इझ्राएल-संघर्ष, ⇨ सुएझचा प्रश्न, तसेच अतिपूर्वेकडील कंबोडिया, लाओस, ⇨व्हिएटनाम आदी गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊन उभय देशांतील तेढ वाढतच गेली. १९६० मध्ये अमेरिकेचे यू-२ हे टेहळणी-विमान पाडून रशियाने वैमानिक पॉवर्सला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याने उभय देशांतील संघर्षाला प्रत्यक्ष युद्धाचे स्वरूप आल्यासारखे झाले. याच प्रकरणामुळे पॅरिसची शिखर-परिषद उधळली गेली आणि जागतिक परिस्थितीवर सर्वमान्य तोडगा निघण्याची शक्यता दुरावली. केनेडीच्या काळात क्यूबामध्ये रशियाने उभारलेल्या अण्वस्त्रप्रक्षेपण-केंद्रामुळे जागतिक युद्ध पेटण्याचा संभव होता. पण ⇨ख्रुश्वाव्हने वेळीच माघार घेतल्यामुळे तो प्रसंग टळला.

संयुक्त राष्ट्रे या संस्थेचा सभासद न होण्याची चूक अमेरिकेने केली नाही. मात्र तेथेही अमेरिका-ब्रिटनचा एक गट व रशिया, हंगेरी आदी कम्युनिस्ट राष्ट्रांचा दुसरा गट पडून शीतयुद्धाचे डावपेच खेळले जाऊ लागले. १९६३ मध्ये केनेडीच्या प्रयत्‍नाने अमेरिका, ब्रिटन, रशिया व इतर शंभर राष्ट्रांनी भूमिगत अण्वस्त्रस्फोटाव्यतिरिक्त अन्य स्फोटांना बंदी घालण्याचा तह स्वीकारल्याने जागतिक संघर्षाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, यात शंका नाही.

साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आशिया-आफ्रिका खंडातील अविकसित देशांना साहाय्य करण्याच्या प्रचंड योजना अमेरिकेने अंमलात आणल्या पण अलिप्त व तटस्थ देशांना अशा मदतीचा लाभ देण्याच्या बाबतीत आखडता हात घेण्याचेच अमेरिकेने धोरण अवलंबिले. महायुद्धानंतरचा वीस वर्षांचा काळ अमेरिकेला वैभवाचा ठरलेला आहे. युद्धसमाप्तीनंतर संभाव्य बेकारीच्या व वाढत्या महागाईच्या भीतीने मजूरवर्गात असंतोष पसरून संपांची लाट उसळली. परंतु रूझवेल्टच्या नवोपक्रमाप्रमाणे ट्‌रूमनने न्याय्य उपक्रमाचा उद्‌घोष करून नवे-नवे कार्यक्रम आखल्याने बेकारी फारशी वाढली नाही. आयझनहौअरच्या कारकिर्दीतही ह्या कार्यक्रमात खंड पडला नाही. आरोग्य, शिक्षण, लोककल्याण यांसाठी त्याने स्वतंत्र खातीही सुरू केली. १९५७ च्या सुमारास आलेल्या मंदीमुळे उत्पादनात घट आली, घरबांधणीसारख्या कार्यक्रमात शिथिलता आली. परंतु केनेडीच्या वेळी आर्थिक स्थिती सुधारून बेकारीचे प्रमाण कमी झाले. या कालखंडात राष्ट्रीय कर्ज अमाप वाढले पण उत्पन्नातही वाढ झाल्याने ही वाढ कोणालाही चिंताजनक वाटली नाही.

युद्धोत्तरकाळात अमेरिकेने अवकाशसंधोनात अश्चर्यकारक प्रगती केली आहे. १९६९ मध्ये अमेरिकेच्या अवकाशवीरांनी अनेक प्रयोगांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर उड्डाण केले आणि जुलैमध्ये चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल ठेवले. सामाजिक समानतेच्या अनेक घोषणा होऊनही निग्रोंना गोऱ्यांच्या बरोबरीचे हक्क अद्यापि मिळालेले नाहीत. ह्या दृष्टीने महायुद्धकाळात रूझवेल्टला निग्रोंसाठी खास हुकूम काढावा लागला. निग्रो व गोऱ्या मुलांना एकत्रच शिक्षण दिले पाहिजे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याची खटपट अनेक घटकराज्ये करीत आहेत. निग्रोंच्या हक्कासाठी ⇨मार्टिन ल्यूथर किंगसारख्या विख्यात निग्रो पुढाऱ्यांनी अहिंसात्मक आंदोलनही केले. तथापि काळ्यागोऱ्यांचा लढा अद्यापि संपलेला नाही.

शिक्षणाची पुनर्रचना, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येतील वाढ, मजूरसंघटनांमुळे शासनाला आखाव्या लागणार्‍या योजना, मध्यमवर्गाच्या उत्पन्नातील वाढ इ. चांगल्या व आशादायक घटनांबरोबरच, वंशभेदावर आधारलेले संघर्ष व भांडवलदारांची राष्ट्रीय जीवनावरील पकड अशा काही गंभीर समस्या निर्माण होत आहेत. केनेडीबंधू व मार्टिन ल्यूथर किंग यांचे खून अशा समस्यांचीच दुश्चिन्हे होत. [→अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा अमेरिकेचे यादवी युद्ध.]

करंदीकर, शि. ल.

राजकीय स्थिती : अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे ठरविल्यानंतर अशा लढ्यात सुसूत्रता यावी म्हणून एक अनौपचारिक संघटना निर्माण केली. ह्या संघटनेस ‘काँटिनेन्टल काँग्रेस’ असे म्हणण्यात येत असे. या संघटनेने कामाच्या सोयीसाठी काही नियम तयार केले, त्यांस ‘राज्यसंघाचे नियम’ अशी संज्ञा मिळाली. विशेषतः ४ जुलै १७७६ रोजी ह्या वसाहतींनी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ प्रसृत केल्यापासून एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र अस्तित्वात आले असे मानण्यात येऊ लागले व त्यासाठी एक संविधान असणे अत्यंत आवश्यक झाले. स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर १७७७ मध्ये वरील राज्यसंघाच्या नियमांस काँग्रेसने संमती दिली व घटक-राज्यांनी स्वतंत्रपणे अनुमती दिल्यानंतर १७८१ मध्ये हे नियम कार्यवाहीत आले.

१७८३ मध्ये स्वातंत्र्ययुद्ध पूर्ण झाल्यानंतर राष्ट्राच्या त्या वेळच्या पुढाऱ्यांच्या ध्यानात येऊ लागले, की युद्धकाळात प्रसृत केलेले नियम एका स्वतंत्र व प्रगतिशील राष्ट्राच्या राजकीय जीवनासाठी अत्यंत अपुरे व असमाधानकारक आहेत. मध्यवर्ती सरकारचे अधिकार अत्यंत मर्यादित होते. प्रत्येक घटक राज्य आपापले स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राहावे म्हणून मध्यवर्ती सरकारास प्रत्यक्ष अधिकार देण्यास तयार नव्हते. राष्ट्राचा कारभार चालविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे अधिकार मध्यवर्ती सरकारास नव्हते व वादाच्या प्रसंगी निर्णय देण्यासाठी आवश्यक अशी केंद्रीय न्यायमंडळाची तरतूद करता येण्यासारखीही नव्हती. राष्ट्रीय व्यापार-उद्योगाचे नियमन, राज्यकारभाराच्या खर्चासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद व शेवटी घटक राज्यांतील आपापसातील तंट्यांचे निवारण यांसारख्या आवश्यक गोष्टींसाठी मध्यवर्ती सरकार यंत्रणा निर्माण करू शकले नाही. त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी त्या सरकारास घटक राज्यांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागे. थोडक्यात, मध्यवर्ती काँग्रेस ही राष्ट्राची सर्वशक्तिमान संस्था असण्याऐवजी ‘निरनिराळ्या घटकराज्यांनी पाठविलेल्या राजदूतांची परिषद’ असे तिचे स्वरूप होते.

या सर्व गोष्टींचा राष्ट्राच्या राजकीय व आर्थिक जीवनावर फार विपरीत परिणाम होऊ लागला. प्रत्येक घटक राज्य स्वतःस स्वतंत्र समजू लागले व आपला राज्यकारभार, देशहिताचा विचार न करता, केवळ आपल्या स्वार्थांच्या दृष्टीने करू लागले. प्रत्येक राज्यात वेगवेगळी चलन-पद्धती असल्यामुळे व्यापारावर अत्यंत अनिष्ट परिणाम होऊ लागला. एकमेकांविरुद्ध जकात वाढवून आंतरराज्यीय व्यापारात अडथळे निर्माण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्यापारांत ब्रिटनकडून सहकार्य मिळणे अशक्य झाल्याने त्या दृष्टीनेही हानी होऊ लागली. शेवटी काही राज्यांनी तर स्वातंत्र्ययुद्धात झालेल्या खर्चाचा आपला वाटाही देण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत मॅसॅचूसेट्स राज्यात १७८६ मध्ये कॅप्टन डॅन्येल शेझ याच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सशस्त्र बंडही पुकारले. बंडाचा लवकर बीमोड करण्यात आला असला, तरी त्यामुळे देशाच्या ऐक्याला गंभीर भय असल्याची जाणीव अमेरिकेतील पुढाऱ्यांना झाली ह्यात शंका नाही. स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान निष्फळ ठरणार की काय, अशी भीती जॉर्ज वॉशिंग्टन, अलेक्झांडर हॅमिल्टन इ. पुढाऱ्यांना वाटू लागली व त्याबरोबर अंतर्गत व्यवहारात अधिकार गाजवू शकेल व आंतरराष्ट्रीय व्यवहारात प्रतिष्ठा मिळवू शकेल, असे एक राष्ट्रीय सरकार असण्याची आवश्यकता त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली.

ह्या दृष्टीने अमेरिकेतील पाच घटक राज्यांची आनापूलीस येथे प्राथमिक स्वरूपाची परिषद १७८६ मध्ये भरली व अखिल-राष्ट्रीय पातळीवर सर्व राज्यांची संविधान-परिषद मे १७८७ मध्ये फिलाडेल्फिया येथे भरविण्याचे ह्या परिषदेत ठरविण्यात आले. त्या ठरावास अनुसरून मे ते सप्टेंबर १७८७ ह्या काळात फिलाडेल्फिया येथे अमेरिकेची पहिली संविधान-परिषद भरली. तेरा राज्यांपैकी बारांनी आपले प्रतिनिधी ह्या परिषदेस पाठविले फक्त ऱ्होड-आयलंड राज्याने तीवर बहिष्कार घातला. एकंदर ५५ प्रतिनिधींनी ह्या परिषदेत भाग घेतला. जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, जेम्स मॅडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन वगैरे पुढारी त्यात होते. त्याखेरीज भिन्नभिन्न क्षेत्रांतील विद्वान व अनुभवी प्रतिनिधींच्या ज्ञानाचा फायदा परिषदेस झाला. ब्रिटनमधल्या लोकशाहीच्या प्रगतीचा इतिहास तर त्यांच्या डोळ्यापुढे होताच, त्याखेरीज अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींच्या अंतर्गत राज्यकारभारातील गुणदोषही मार्गदर्शक होतेच. विशेषतः न्यूयॉर्क व मॅसॅचूसेट्स ह्या दोन राज्यातील संविधानांचा परिषदेस फार उपयोग झाला.

परिषदेमध्ये अनेक योजना विचारार्थ घेण्यात आल्या त्यात ‘व्हर्जिनिया प्लॅन’ व ‘न्यू जर्सी प्लॅन’ ह्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या योजनांचा प्रामुख्याने विचार झाला. पहिल्या योजनेचा पुरस्कार मोठ्या राज्यांनी केला व त्यान्वये राष्ट्रीय विधिमंडळात लोकवस्तीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला. लहान राज्यांना ही योजना मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी दुसऱ्या योजनेचा पाठपुरावा केला. सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्वाचा अधिकार असला पाहिजे, असा ह्या दुसऱ्या योजनेचा मथितार्थ होता. तो मोठ्या राज्यांना मान्य होणे शक्य नव्हते. या मतभेदामुळे परिषद निरर्थक ठरणार, अशीही भीती एके काळी निर्माण झाली होती. केवळ मोठी व लहान राज्ये एवढ्यापुरताच मतभेद होता असे नाही, तर उत्तरेकडील उद्योगप्रधान राज्ये व दक्षिणेकडील शेतीप्रधान राज्ये ह्यांच्यातही तीव्र मतभेद दिसून आला. स्थूलमानाने प्रत्येक राज्य आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या दृष्टीने ह्या राष्ट्रीय प्रश्नाकडे पाहू लागल्यामुळे परिषदेत निरनिराळ्या विचारप्रवाहांचा गोंधळ निर्माण झाला. ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कनेक्टिकट राज्याचा प्रतिनिधी रोजर शर्मन ह्याने तडजोड सुचविली व ती ‘कनेक्टिकट तडजोड ’ ऊर्फ ‘महान तडजोड’ ह्या नावाने अमेरिकन संविधानाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. ह्या योजनेप्रमाणे मध्यवर्ती विधिमंडळाचे दोन विभाग करण्यात आले. एका विभागात सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व व दुसऱ्या भागात लोकवस्तीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे, अशी तडजोड सुचवून दोनही मतप्रणालींच्या समन्वयाचा प्रयत्‍न करण्यात आला व ती तडजोड शेवटी सर्वमान्य झाली. ‘लोकसंख्येच्या प्रमाणावर प्रतिनिधित्व’ हे तत्त्व मान्य झाल्यानंतरही दक्षिण व उत्तर संस्थानांतील मतभेद गुलामांच्या प्रश्नावरून पुन्हा विकोपास गेले. ‘गुलामांना जरी मताधिकार नसला तरी लोकसंख्येत त्यांची गणना झालीच पाहिजे’ असे दक्षिणेकडील संस्थानांचे म्हणणे, तर ‘त्यांची गणनाच होता कामा नये’ असे उत्तरेकडील संस्थानांचे प्रतिपादन होते. शेवटी ‘गुलामांच्या संख्येच्या तीन पंचमांश संख्येचा प्रतिनिधित्वासाठी जनगणनेत समावेश करावा, अशी तडजोड सर्वसंमत झाल्याने वाद संपला.

२५ मे १७८७ रोजी सुरू झालेले संविधान-परिषदेचे अधिवेशन १७ सप्टेंबर १७८७ रोजी अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या संविधानावर प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर समाप्त झाले. ह्या सु. चार महिन्यांच्या काळात अनेक मतभेद निर्माण झाले काही मतभेद इतके तीव्र होते, की त्यांवरून परिषद भंग पावण्याची भीतीही दिसू लागली होती. तथापि त्या सर्व मतभेदांपेक्षा राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रखर होती. प्रत्येक प्रतिनिधीस ‘आपले राष्ट्रीय सरकार मजबूत असावे व सामान्य नागरिकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारे असावे’ असे मनापासून वाटत असल्यामुळे आणीबाणीचे प्रसंग येऊनही परिषदेतील ऐक्याचा भंग झाला नाही. तथापि सुरुवातीच्या ५५ प्रतिनिधींपैकी परिषदेच्या शेवटी संविधानावर सह्या करण्यास फक्त ३९ प्रतिनिधीच शिल्लक होते व ह्या ३९ जणांना अमेरिकन संविधानाचे ‘संस्थापक जनक’ (फाउंडिंग फादर्स) अशी संज्ञा मिळाली आहे.

नियोजित संविधानास अनुसरून नवीन शासनाची स्थापना होण्यापूर्वी कमीत कमी ९ घटक राज्यांची अनुमती आवश्यक ठरविण्यात आली होती व काही राज्यांतून संविधानाला विरोध होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली होती. विशेषतः न्यूयॉर्क व व्हर्जिनिया ह्या मोठ्या राज्यांत संघटित विरोध निर्माण झाला. काहींच्या मते संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा उल्लेख कोठेच नव्हता, अध्यक्षास अवास्तव स्वतंत्र अधिकार देण्यात आले होते, काँग्रेसची सत्ता सर्वश्रेष्ठ होती व ह्या सर्व कारणांमुळे घटक राज्यांचे स्वातंत्र्य नाममात्र झाले होते. संविधानाचे पाठीराखे व विरोधक ह्यांनी आपापल्या बाजूचा प्रचार हिरिरीने केला. संविधानाला पुष्टी देणाऱ्यास ‘फेडरॅलिस्ट’ व विरोधी बाजूस ‘अँटी-फेडरॅलिस्ट’ अशा संज्ञा रूढ झाल्या व त्यांतूनच अमेरिकेतील राजकीय पक्षांचा उदय

झाला. शेवटी न्यूयॉर्क व व्हर्जिनियासह ११ घटक राज्यांनी अनुमती दिल्यावर अमेरिकन संयुक्त संस्थानांचे संविधान ४ मार्च १७८९ पासून अंमलात आले व त्यास अनुसरून काँग्रेसचे पहिले अधिवेशन ४ मार्च १७८९ ला सुरू झाले. परंतु हे करण्यापूर्वी ‘संविधानाच्या पाठीराख्यांना पहिल्याच अधिवेशनात मूलभूत हक्कांसंबंधी आवश्यक अशी संविधानदुरूस्ती सुचविण्यात येईल’ असे आश्वासन विरोधकांना द्यावे लागले, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तरीदेखील उत्तर कॅरोलायना व र्‍होड-आयलंड यांनी अशा प्रकारच्या सुधारणेसंबंधी काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष चर्चा सुरू होईपर्यंत संविधानास आपली अनुमती देण्याचे साफ नाकारले होते.

जगातील कोणत्याही संविधानापेक्षा अमेरिकेचे संविधान अगोदरचे असून आजपावेतो त्यात फक्त पंचवीसच दुरुस्त्या झाल्या आहेत. चार हजार शब्दांच्या ह्या संविधानाची भाषा सोपी व ओघवती आहे. कायद्यातील किचकटपणा त्यात दिसत नाही. संविधान लिखित असले तरी काल-परिस्थितीस अनुसरून त्यात आवश्यक असलेला लवचिकपणा त्यास प्राप्त झालेला आहे. काँग्रेसने केलेले अनेक विधिनियम, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय, विशेष प्रसंगी प्रसृत करण्यात आलेल्या अध्यक्षीय आज्ञा व अनेक वर्षांच्या व्यवहारातून रूढ झालेल्या प्रथा- ह्या सर्वांमुळे अमेरिकेचे संविधान बदलत्या राजकीय प्रवाहाशी सुसंगत राहू शकले आहे.

हे संविधान म्हणजेच अमेरिकन राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ कायदा व त्याबद्दलची निष्ठा म्हणजेच राष्ट्रनिष्ठा होय. राज्यकारभाराच्या सर्व प्रकारच्या यंत्रणेवर त्याचा अधिकार आहे. राष्ट्राध्यक्षापासून अगदी सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकास ते बंधनकारक आहे. ‘आम जनतेचे सार्वभौमत्व हा लोकशाहीचा पाया आहे’ व हे सार्वभौमत्व ‘‘आम्ही संयुक्त संस्थानांतील लोक… हे संविधान स्थापन करीत आहोत,’’ ह्या संविधानातील वचनावरून सिद्ध होते. म्हणूनच ह्या संविधानाशी विसंगत असा कोणताही कायदा अगर अशी कोणतीही शासकीय आज्ञा अवैध ठरविण्याची तरतूद संविधानात केली आहे.

ह्या संविधानामुळे पूर्वीच्या स्वतंत्र वसाहतींचे अगर राज्यांचे एक संघराज्य निर्माण झाले असून ह्या संघराज्यास विशिष्ट प्रकारचे अधिकार देण्यात आले आहेत व तेवढ्यापुरती घटक राज्यांनी आपल्या सार्वभौम अधिकारास मर्यादा घातली आहे. संघराज्य व घटक राज्ये यांच्यात अधिकाराची विभागणी केली असून संघराज्यास काही निश्चित अधिकार देण्यात आले आहेत व त्याखेरीजचे सर्व अधिकार घटक राज्यांकडे आहेत असे मानण्यात येते. अशा रीतीने संघराज्याच्या व घटक राज्यांच्या अधिकारक्षेत्रात एक प्रकारचा समतोलपणा निर्माण केला आहे. असे असले तरी गेल्या दोन शतकांतील अंतर्गत, आर्थिक व राजकीय परिस्थिती व अमेरिकेचे जागतिक राजकारणातील स्थान या गोष्टींस अनुसरून संघराज्याचे अधिकारक्षेत्र निःसंशय वाढले आहे व त्यास अमेरिकन जनतेची संमती आहे, असे समजण्यास हरकत नाही.

संघराज्यास संविधानाप्रमाणे खालील काही महत्त्वाचे अधिकार आहेत : (१) संघराज्याच्या कार्यासाठी कर बसविणे (२) संघराज्यासाठी कर्ज उभारणे (३) आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय व्यापारासाठी आवश्यक योजना करणे (४) राष्ट्रीय चलन व नाणी (५) आंतरराष्ट्रीय संबंध व आंतरराष्ट्रीय तहनामे (६) संरक्षण (७) टपालाची व्यवस्था (८) पेटंट व कॉपीराईट ह्यासंबंधी नियम (९) वजने व मापे यांचे प्रमाण व स्वरूप ह्यांची योजना व (१०) नव्या प्रदेशांचा संघराज्यात प्रवेश.

ह्या संविधानाप्रमाणे संघराज्याच्या कार्यक्षेत्राचे तीन प्रमुख विभाग करण्यात आले आहेत. कार्यकारी मंडळ (ज्यात राष्ट्राचा अध्यक्ष प्रमुख असतो), विधिमंडळ (ज्यात काँग्रेसच्या दोनही सदनांचा समावेश होतो) व न्यायमंडळ (ज्यात सर्वोच्च न्यायालय व तदानुषंगिक न्यायालयांचा समावेश होतो), हे ते विभाग होत. ह्या प्रत्येक विभागास आपापल्या क्षेत्रात स्वातंत्र्य दिले असून एका विभागाने दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करू नये, असा दंडक आहे. अशा रीतीने संविधानात सत्ताविभाजनाच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आला आहे. तथापि ह्या तत्त्वाचा अतिरेक होऊ नये, म्हणून ह्या तिन्ही विभागांचे एकमेकांवर पर्यायाने नियंत्रण राहावे अशीही योजना आहे. उदा., काँग्रेसने केलेले विधिनियम अध्यक्ष अमान्य करू शकतो, तर पुन्हा तेच नियम काँग्रेस विशेष बहुमताने मान्य करून अध्यक्षाचा नकार निरर्थक करू शकते. अध्यक्षाने केलेल्या महत्त्वाच्या नेमणुकांना सीनेटची मान्यता लागते. सर्वोच्च न्यायालय काँग्रेसचे विधिनियम अगर अध्यक्षाच्या शासकीय आज्ञा अवैध ठरवू शकते तर प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका अध्यक्ष सीनेटच्या संमतीने करीत असतो. अशा रीतीने एका विभागाचे दुसर्‍या विभागावर काहीसे नियंत्रण असल्यामुळे संघराज्याच्या शासनयंत्रणेमध्ये एक प्रकारचा समतोलपणा निर्माण केला गेला आहे.

अमेरिकेच्या ह्या संविधानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेले श्रेष्ठ स्थान हे होय. राज्यकारभाराच्या प्रमुख घटकांचे अधिकार संविधानाने निश्चित केल्यानंतर त्या अधिकारांचे अतिक्रमण होत नाही, असे पाहण्याची जबाबदारी ह्या संविधानाने सर्वोच्च न्यायालयावर सोपविली आहे. अमेरिकेच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाने आवश्यक त्या वेळी काँग्रेसने केलेले विधिनियम अगर अध्यक्षीय आज्ञा अवैध ठरवून आपली जबाबदारी पार पाडली आहे. इंग्‍लंडमध्ये संसद सार्वभौम असल्यामुळे संसदेने मान्य केलेल्या विधिनियमांचे पालन करणे एवढेच कार्यकारी अगर न्यायसंस्थांचे काम असते. संविधानाने घालून दिलेल्या मर्यादा उल्लंघिल्या जात नाहीत हे पाहण्याचे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे असल्यामुळे अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात संविधानाचा रक्षक समजण्यात येते.

संविधानाप्रमाणे अमेरिकन संघराज्याच्या कार्यक्षेत्राचे तीन विभाग कल्पिले आहेत. त्यांपैकी कार्यकारी मंडळ हा एक होय. राष्ट्राचा अध्यक्ष हाच ह्या विभागाचा प्रमुख असून त्याची कर्तव्ये व अधिकार संविधानाच्या अनुच्छेद—२ मध्ये वर्णिली आहेत. आज अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे त्या देशातील सर्वांत प्रमुख व्यक्ती होय. तो संघराज्याचा प्रमुख आहे व ह्या नात्याने अमेरिकेचा पहिला नागरिक आहे. तो शासन विभागाचा प्रमुख आणि संरक्षक दलाचा सरसेनापती आहे. संविधानात स्पष्टपणे नमूद केलेल्या अधिकारात काँग्रेसने वेळोवेळी केलेल्या विधिनियमांमुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या काही निवाड्यांमुळे, अथवा युद्धासारख्या आणीबाणीच्या वेळी पडलेल्या प्रथांमुळे आज अमेरिकेच्या अध्यक्षाचे अधिकार कोणत्याही हुकूमशहाच्या तोडीचे आहेत तथापि तो हुकूमशहा नाही, कारण त्याला जनतेच्या मताने निवडून यावे लागते, त्याच्या नेमणुकीची मुदत निश्चित असते, काँग्रेस व सर्वोच्च न्यायालयाचा संविधानात्मक अधिकार त्यासही मानावा लागतो.

अध्यक्षीय निवडणुकीसाठी एक विशेष प्रकारची योजना करण्यात आली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक घटक राज्यात प्रथम अध्यक्षीय मतदारांची निवड करण्यात येते. पुढे हे मतदार अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करतात. अशा रीतीने ही निवडणूक अप्रत्यक्ष वाटली, तरी जनमानसाचे प्रतिबिंब त्यात स्पष्ट होते असा अनुभव आहे. अमेरिकेचा अध्यक्ष जन्मत: अमेरिकेचा नागरिक असला पाहिजे, कमीत कमी ३५ वर्षांचा असून किमान १४ वर्षे अमेरिकेचा रहिवासीही असला पाहिजे. अध्यक्षपदाची मुदत ४ वर्षांची असते. १९५१ मध्ये करण्यात आलेल्या २२ व्या संविधानदुरुस्तीप्रमाणे एका व्यक्तीला दोन वेळांहून अधिक वेळा अध्यक्ष होता येत नाही. अध्यक्षाच्या बरोबरच उपाध्यक्षाचीही निवड करण्यात येत असते. उपाध्यक्ष हा सीनेटचा अध्यक्ष असतो. मृत्यूने अगर अन्य कारणाने अध्यक्ष आपले काम करण्यास असमर्थ झाल्यास उपाध्यक्ष त्याच्या जागी अध्यक्ष म्हणून काम करू लागतो.

संविधानाप्रमाणे सर्व कायद्यांचे पालन होते किंवा नाही, हे पाहण्याची अध्यक्षाची जबाबदारी आहे. मंत्रिमंडळाचे सभासद, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राजदूत इ. महत्त्वाच्या नेमणुका अध्यक्ष करतो. मात्र ह्या नेमणुकांना सीनेटची मान्यता लागते. राज्यकारभाराचे धोरण ठरविणे व त्याची अंमलबजावणी करणे हे त्याचे कर्तव्य आहे. ज्या मोठ्या अधिकाऱ्यांना तो नेमू शकतो त्यांना तो बडतर्फही करू शकतो, अशी प्रथा आहे. परराष्ट्रीय धोरण तोच ठरवितो मात्र कोणताही आंतरराष्ट्रीय तह अगर करार करण्यापूर्वी सीनेटच्या दोन-तृतीयांश सभासदांची मान्यता मिळवावी लागते. संरक्षक दलांचा सरसेनापती ह्या नात्याने शांततेच्या अगर युद्धाच्या काळात संरक्षक दलाचे नियोजन व नियंत्रण त्यालाच करावे लागते. अण्वस्त्रांच्या साठ्यावर त्याचीच संपूर्ण हुकूमत असून त्याच्या आज्ञेशिवाय कोणीही अशा अस्त्रांचा वापर करू शकत नाही. काँग्रेसने मान्य केलेल्या विधिनियमांस नकार देण्याचा अधिकार त्यास आहे. मात्र तेच नियम काँग्रेसने दोन-तृतीयांश मतांनी मान्य केल्यास अध्यक्षाचा नकार निरर्थक ठरतो. न्यायालयांनी दिलेल्या शिक्षा माफ करण्याचा अगर कमी करण्याचा अधिकारही अध्यक्षास आहे. अध्यक्ष अगर उपाध्यक्ष ह्याला राजद्रोह, भ्रष्टाचार अगर अन्य भयंकर गुन्ह्यांसाठी काढण्याचा अधिकार संविधानाने सीनेटला दिला आहे. परंतु त्यासाठी प्रतिनिधिसभेने त्याच्यावर आरोपपत्र ठेवून त्याच्यावर महाभियोग केला पाहिजे व सीनेटच्या दोन-तृतीयांश मतांनी अध्यक्षास दोषी ठरविले पाहिजे. अशा रीतीने अध्यक्षास काढून टाकल्याचे एकही उदाहरण अमेरिकेच्या इतिहासात घडले नाही.

अमेरिकेच्या संविधानाप्रमाणे कायदे करण्याचा अधिकार काँग्रेसचा (विधिमंडळ) आहे. काँग्रेस द्विसदनी असून, सीनेट व हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्‌ज (प्रतिनिधिसदन) ही ती दोन सदने होत. सीनेटमध्ये प्रत्येक राज्यास दोन प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार आहे व त्यांची निवडणूक सहा वर्षांसाठी असते. प्रत्येक सीनेटर कमीत कमी ३० वर्षांचा असून ज्या राज्यातून निवडून आला असेल त्या राज्याचा रहिवासी असला पाहिजे व तो अमेरिकेचा कमीत कमी नऊ वर्षे नागरिक असला पाहिजे. सीनेटच्या सभासदांपैकी प्रत्येक समवर्षी एक तृतीयांश सभासद निवृत्त होऊन त्या जागांसाठी नव्या निवडणुका होतात. अमेरिकेत सध्या ५० घटक राज्ये असल्यामुळे सीनेटच्या सभासदांची संख्या १०० आहे. प्रत्येक घटक राज्याला दोन सीनेटर निवडण्याचा अधिकार देऊन संविधानाने घटक राज्यांच्या समान प्रतिनिधित्वास मान्यता दिली आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे ५१ वे घटक राज्य म्हणून म्हटले जाते. अमेरिकेचा उपाध्यक्ष हा सीनेटचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

प्रतिनिधिसदनात सध्या ४३५ सभासद असून प्रत्येक राज्यास लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्रतिनिधिसदनातील प्रत्येक सभासद कमीत कमी २५ वर्षांचा असून अमेरिकेचा कमीत कमी सात वर्षे नागरिक असला पाहिजे. शिवाय ज्या राज्यातून तो निवडणुकीस उभा असेल त्या राज्याचा तो रहिवासी असला पाहिजे. प्रतिनिधींची निवड फक्त दोन वर्षांपुरतीच असते, त्यामुळे दर दोन वर्षांनी नवीन निवडणूक होते व नवे प्रतिनिधिसदन अस्तित्वात येते. ह्या सदनाच्या अध्यक्षास स्पीकर (सभापती) म्हणतात.

ब्रिटिश संसदेप्रमाणे सर्व, म्हणजे कोणत्याही, विषयांसंबंधी कायदे करण्याचा अधिकार अमेरिकन काँग्रेसला नाही. संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदाच्या आठव्या पोटकलमात काही आधिकार नमूद केले आहेत. त्यांत कर बसविणे, कर्ज काढणे, आंतरराष्ट्रीय अगर अंतर्गत व्यापारासंबंधी नियम करणे, राष्ट्राच्या संरक्षणाची व्यवस्था करणे, चलन व वजनेमापे ह्यांसंबंधी नियम करणे व सर्वोच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयांसंबंधी नियम करणे इ. अधिकार स्पष्टपणे देण्यात आले आहेत. त्याखेरीज आवश्यक व योग्य विषयांसंबंधी संविधानाने कायदे करण्याचा अधिकार दिला असल्याने काँग्रेसच्या अधिकाराचे क्षेत्र बरेच विस्तृत झाले आहे. अमेरिकेचा अध्यक्ष हा जरी संरक्षक दलांचा सरसेनापती असला, तरी प्रत्यक्ष युद्ध पुकारण्याचा अधिकार फक्त काँग्रेसचाच आहे.

काँग्रेसच्या दोन्ही सदनांपुढे विचारार्थ येणाऱ्या‍ विधेयकाची चर्चा प्रथम त्यासाठी नेमलेल्या समितीमार्फत करण्यात येते. काँग्रेसच्या दोन्ही सदनांत ते विधेयक स्वतंत्रपणे मांडण्यात येते व त्यास साध्या बहुमताने मान्यता देण्यात येते. दोन्ही सदनांनी मान्यता दिल्यावर ते अध्यक्षाकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येते. आवश्यक वाटल्यास अध्यक्ष त्यास नकार देऊन काँग्रेसकडे कारणांसहित परत पाठवू शकतो. अशा रीतीने परत आलेल्या विधेयकास पुनश्च काँग्रेसने दोन-तृतीयांश बहुमताने संमती दिल्यास विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते व अध्यक्षाचा नकार निरर्थक ठरतो.

कायदे करण्याखेरीज काही विशेष अधिकार संविधानाने काँग्रेसला दिले आहेत. संविधानाची दुरुस्ती करणे, आपल्या अधिकारक्षेत्रात ये‍णाऱ्या कोणत्याही बाबीसंबंधी तपास करणे, शासनक्षेत्रातील कोणत्याही प्रश्नावर चर्चा करणे, अध्यक्षीय निवडणुकीचा निर्णय करणे व शेवटी संघराज्याच्या कक्षेतील कोणत्याही कर्मचाऱ्यावरील अभियोग अगर अन्य कारवाई करणे, हे ते विशेष अधिकार होत. त्यांखेरीज आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कोणत्याही करारात सीनेटने दोन-तृतीयांश बहुमताने दिलेली संमती आवश्यक असते.

संघराज्याच्या कार्यक्षेत्रातील तिसरा महत्त्वाचा विभाग न्यायदानाचा होय. संविधानाचा रक्षक ह्या नात्याने सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्व वर वर्णिले आहे. संविधानाच्या अनुच्छेद–३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख असून त्याच्या खालील न्यायालयांची व्यवस्था काँग्रेसने करावी असे म्हटले आहे. त्याप्रमाणे संघराज्याच्या अधिकारक्षेत्रात निरनिराळ्या राज्यांतून जिल्हा व अपील-न्यायालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. संघराज्याच्या अधिकाराशी संबंधित अशा प्रकारचे दावे ह्या न्यायालयांपुढे दाखल होतात. प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र उच्च व त्याखालील न्यायालये असून ती त्या त्या राज्याच्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असतात.

संविधानाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार अध्यक्षास दिला आहे. परंतु अशा नेमणुकांना सीनेटची संमती लागते. त्याखेरीज अशा न्यायाधीशांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून सर्व न्यायाधीश आजन्म सेवा करू शकतात व एकदा निश्चित केलेले वेतन कोणासही कमी करता येत नाही. सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे सरन्यायाधीश व इतर आठ मिळून सर्वोच्च न्यायालयात नऊ न्यायाधीश असतात. संविधानाने त्यांच्या नेमणुकीसाठी विशेष गुणवत्ता ठरविलेली नाही, तथापि व्यवहारात सर्व न्यायाधीश अनुभवी व कायद्याचे तज्ञ असतात.

सर्वोच्च न्यायालयाला संविधानाच्या संबंधित सर्व प्रश्नांचा न्यायालयीन विचार करण्याचा हक्क आहेच. त्याखेरीज काही प्रकारचे दावे स्वत:च्या मूळ अधिकारात न्यायालयाला दाखल करून घेता येतात. राजदूत, राज्यमंत्री व तत्सम अधिकारी ह्यांविरुद्ध असलेले दावे आणि ज्या दाव्यात अमेरिकेच्या घटक राज्यांपैकी एखादे राज्य पक्षकार असेल, अशा प्रकारच्या दाव्यांचा त्यात समावेश होतो. इतर बाबतींत खालच्या न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध अपील ऐकण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयात आहे.

अमेरिकेचे संविधान लिखित असल्यामुळे त्यात दुरुस्ती करण्याची व्यवस्था संविधानात असणे आवश्यक होते. संविधान-अनुच्छेद–५ मध्ये ह्यासाठी योजना आहे. त्याप्रमाणे संविधान-दुरुस्तीची सूचना दोन मार्गांनी करता येते : (१) काँग्रेसच्या दोन्ही सदनांत दोन-तृतीयांश बहुमताने ठराव संमत करून किंवा (२) दोन-तृतीयांश घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या विनंतीवरून एक परिषद भरवून. आजपर्यंत करण्यात आलेल्या सर्व दुरुस्त्या पहिल्या मार्गानेच सुचविण्यात आल्या आहेत. दुरुस्ती सुचविल्यानंतर ती सर्व राज्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येते. अशी मान्यता दोन मार्गांनी देता येते : (१) तीन-चतुर्थांश राज्यांच्या विधिमंडळांनी संमती देऊन किंवा (२) तीन-चतुर्थांश राज्यांत बोलावण्यात आलेल्या विशेष परिषदांमध्ये संमती मिळवून. ह्या रीतीने मान्यता मिळताच दुरुस्ती अंमलात येते–म्हणजेच संविधानाचा भाग बनते. अशा दुरुस्तीला अध्यक्षाच्या अनुमतीची गरज नाही. परंतु सीनेटमध्ये प्रत्येक घटक राज्याला असलेल्या समान प्रतिनिधित्वात त्या राज्याच्या संमतीशिवाय बदल करता येत नाही. १७८९ मध्ये कार्यवाहीत आलेल्या अमेरिकेच्या संविधानात आजपावेतो फक्त २५ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी मूलभूत हक्कांसंबंधीच्या पहिल्या १० दुरुस्त्या १७९१ मध्ये संविधानात समाविष्ट करण्यात आल्या. म्हणजे त्यानंतरच्या सु. पावणेदोनशे वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात फक्त १५ दुरुस्त्याच करण्याची आवश्यकता अमेरिकन राष्ट्रास वाटली आहे व त्या दुरुस्त्यांमध्ये अमेरिकन संविधानांच्या मूलभूत तत्त्वज्ञानात आमूलाग्र बदल करणारी अशी एकही दुरुस्ती नाही, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.

प्रत्येक घटक राज्याने आपल्या विशिष्ट पद्धतीने आपले संविधान बनविले असल्याने त्याच्या शासननियंत्रणेत फरक असणे अपरिहार्य आहे. तथापि त्या सर्वांत महत्त्वाच्या बाबतींत साम्य आहे. विस्ताराचा अगर लोकसंख्येचा विचार न करता सर्व राज्ये समान मानण्यात येतात. प्रत्येक राज्यात लिखित संविधान असून ते स्थानिक विधिमंडळाने अगर संविधान-परिषदेने बनविलेले आहे. प्रत्येक राज्याच्या शासनाचा प्रमुख गव्हर्नर असतो व तो निवडलेला असतो. प्रत्येकात द्विसदनी विधिमंडळ असून वरच्या सदनास ‘सीनेट’ व खालच्या सदनास ‘प्रतिनिधिमंडळ’ म्हणण्यात येते. फक्त नेब्रॅस्का राज्यात एकच सदन आहे. स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयांची श्रेणी प्रत्येक राज्यात आहे. सत्ताविभाजनाचे तत्त्व घटक राज्यांच्या संविधानांतही दृष्टीस पडते. थोडक्यात म्हणजे प्रत्येक राज्याचे संविधान जरी भिन्न असले, तरी सर्व राज्यांच्या संविधानांवर व कार्यपद्धतींवर राष्ट्रीय संविधानाचा व कार्यपद्धतीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो.

लोकशाही राज्यपद्धतीत राजकीय पक्षांचे अस्तित्व अपरिहार्य समजण्यात येते. अमेरिकेत डेमोक्रॅटिक व रिपब्‍लिकन असे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. स्थानिक राजकारणात अन्य पक्ष दृष्टोत्पत्तीस आले तरी त्यांना राष्ट्रीय महत्त्व कधीही मिळत नाही. परंतु सामान्यपणे डेमोक्रॅटिक व रिपब्‍लिकन ह्या पक्षांमध्ये तात्त्विक मतभेद फारसे दिसत नाहीत. इंग्‍लंड मधील हुजूर व मजूर पक्ष ह्यांच्यात सुस्पष्ट वैचारिक मतभेद दिसतात. प्रत्येक पक्ष विशिष्ट तत्त्वाचा, अर्थव्यवस्थेचा व समाजरचनेचा पुरस्कर्ता असतो. तसा भेद अमेरिकेत आढळत नाही. अंतर्गत राजकीय व्यवस्थेत अगर अर्थव्यवस्थेत, त्याचप्रमाणे परराष्ट्रीय धोरणात दोन्ही पक्षांत फारसा भेद दिसत नाही. तरीदेखील अनेक वर्षांच्या राजकीय अनुभवांवरून काही ठळक अनुमाने निघू शकतात. सार्वत्रिक निवडणुकीत जी मते पडतात त्यांवरून असे दिसते की श्रीमंतवर्ग, काहीसा मध्यमवर्ग आणि उद्योगधंद्यांतील लोक ह्यांचा रिपब्‍लिकन पक्षाला पाठिंबा असतो. उलट शेतकरी वर्ग, बराचसा मध्यम वर्ग व बहुसंख्य गरीब वर्ग डेमोक्रॅटिक पक्षास जवळचा मानतो. भौगोलिक दृष्टीने विचार केल्यास उत्तर भाग प्रामुख्याने रिपब्‍लिकन तर दक्षिण भाग जवळजवळ डेमोक्रॅटिक आहे.

आंतरराष्ट्रीय जीवनामध्ये अमेरिकेचे पारंपरिक धोरण जगातील अमेरिका खंडाखेरीज इतर खंडांच्या राजकारणापासून शक्यतो अलग राहण्याचे होते. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची मूलभूत कल्पना त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन यांची, तरी पण अमेरिका त्यात सामील होऊ शकली नाही. परंतु दुसऱ्या‍ महायुद्धानंतर त्या धोरणात आमूलाग्र बदल झाला. दुस‍ऱ्या महायुद्धातील विजयामुळे अमेरिकेस जगाच्या राजकारणात आर्थिक व राजकीय श्रेष्ठत्व प्राप्त झाले व ते टिकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या कामी पुढाकार घेणे योग्य आहे याची जाणीव अमेरिकन नेत्यांना झाली. ह्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांत अमेरिकेचा प्रमुख भाग आहे, ह्यावरून हे सिद्ध होते. संयुक्त राष्ट्रे ह्या जागतिक संस्थेचे मुख्य कार्यालय अमेरिकेत आहे. त्याचप्रमाणे, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलननिधी ह्या संस्थांची प्रमुख कार्यालयेही तेथेच आहेत. दुस‍ऱ्या महायुद्धानंतर भांडवलदारी राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट असे दोन तट आंतरराष्ट्रीय राजकारणात स्पष्ट झाले व साम्यवादविरुद्ध जगाचे नेतृत्व अमेरिकेकडे आल्याने नाटो-सीटोंसारख्या लष्करी करारांत अमेरिकेस पुढारीपण घेणे भाग पडले. थोडक्यात म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेचे अलग राहण्याचे धोरण संपूर्णपणे बदलले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य हा अमेरिकेच्या परराष्ट्रीय राजकारणाचा आज अविभाज्य भाग आहे, असे म्हणणे अतिशयोक्त्तीचे नाही.

नरवणे, द. ना.

संरक्षण : सैनिकी सामर्थ्यात अग्रगण्य आणि संरक्षणदृष्ट्या परिपूर्ण अशा राष्ट्रांत अमेरिकेची गणना होते. १९६८ मध्ये अमेरिकेचे सैन्य पस्तीस लाखांहून जास्त होते. १९६८ च्या अर्थसंकल्पानुसार अमेरिकेने एकूण उत्पन्नाच्या पन्नास टक्क्यांहून जास्तच खर्च संरक्षणावर केला होता. नाटो, सीटो, सेंटो आदी संघटनांमध्ये अमेरिकेचा मोठा भाग असल्यामुळे अमेरिकेचे ४० टक्के सैन्य जगातील निरनिराळ्या भागांत गुंतलेले आहे.

अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष हा तिन्ही दलांचा प्रमुख आहे. १९४७ च्या अधिनियमांनुसार तिन्ही दलांची व्यवस्था संरक्षण-मंत्रालयाखाली एकत्र केलेली असून त्यांवर राष्ट्राध्यक्षाने नेमलेला सचिव काम पाहतो. राष्ट्राध्यक्षाला सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा-समिती असून सचिवाच्या हाताखाली प्रत्येक दलाचा एक सचिव व तिन्ही दलप्रमुखांची संयुक्त समिती असते.

अठरा ते सव्वीस वर्षांच्या अमेरिकन नागरिकाला कमीत कमी दोन वर्षे लष्करी सेवेत व ६ ते ८ वर्षे राखीव सेवेत काढावी लागतात. ‘नॅशनल गार्ड’ ही नागरी संघटना असून त्यात नागरिक स्वखुषीने दाखल होऊ शकतात. या संघटनेचा सर्व खर्च मध्यवर्ती सरकारच सोसते.

अमेरिकेचे भूसैन्य सतरा डिव्हिजनमध्ये विभागलेले असून शिवाय २० डिव्हिजन राखीव सैन्य, नॅशनल गार्ड या स्वरूपात आहे. अमेरिकेतील सैन्याची रचना कोठेही उपयोगी पडेल अशा पद्धतीने केलेली असून तिला अद्ययावत शस्त्रास्त्रांचा पुरवठा केलेला आहे. अमेरिकेच्या नौदलाचे १५ विभाग (फ्लीट) असून ९ गोद्या, २९ केंद्रे, ४ शिक्षण-केंद्रे व एक अकादमी आहे. अमेरिकेच्या नौदलांत लहानमोठ्या मिळून ३,४०० बोटींचा समावेश असून त्यांतील १,५४९ प्रत्यक्ष युद्धाच्या दृष्टीने उपयुक्त होतील अशा आहेत. त्यांमध्ये ३५० विनाशिका, ३७ क्रूझर्स, ४ युद्धनौका, १३७ पाणबुड्या, ७० अणुशक्तीवर चालणाऱ्‍या पाणबुड्या, ५७ विमानवाहू जहाजे, २६० जलस्थल वाहने इत्यादींचा समावेश होतो. १९७१ अखेर अणुशक्तीवर चालणाऱ्‍या १०३ (त्यांपैकी ४१ मध्ये क्षेपणास्त्रे असलेल्या) पाणबुड्या बनविण्याची अमेरिकेची योजना होती. अमेरिकेच्या वायुसेनेत १९६६ मध्ये १४,२०० विमाने होती. त्यांमध्ये अद्ययावत धर्तीची व अद्ययावत सामग्री (क्षेपणास्त्रे इ.) असलेली लढाऊ विमाने, बाँबफेकी विमाने इत्यादींचा समावेश होतो.

शहाणे, मो. ज्ञा.

आर्थिक इतिहास : अमेरिका हा आज जगातील सर्वांत श्रीमान देश समजला जातो. गेल्या दोनशे वर्षांत अमेरिकेने सर्व क्षेत्रांत जी नेत्रदीपक प्रगती केली, तीत जलद आर्थिक विकासाचा फार मोठा वाटा आहे. अमेरिकेतील वसाहती स्वतंत्र झाल्या, तेव्हा अमेरिका शेतीप्रधान देश होता. सुमारे ऐंशी टक्के मनुष्यबळ शेतीत गुंतलेले होते. सर्व प्रकारचा माल बाहेरून येत होता. त्यानंतरच्या सु. दोनशे वर्षांच्या काळात विस्तीर्ण भूमी, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, अनुकूल हवामान आणि उत्साही व कल्पक मनुष्यबळ यांचा लाभ अमेरिकेला सतत मिळत राहिला. या काळात झालेल्या अविरत प्रगतीमुळे अमेरिका आज समृद्धतेच्या बाबतीत जगाच्या आघाडीवर आहे व ही समृद्धी सातत्याने व वेगाने वाढत जाणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसतात.

अमेरिकेचा उदय वसाहतींच्या स्वरूपात झाला. अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर बरीच वर्षे अमेरिकेचा प्रचंड भूभाग निर्मनुष्य होता. पण त्यानंतर धार्मिक, राजकीय व मुख्यतः आर्थिक कारणांमुळे स्पेन, फ्रान्स, हॉलंड व इंग्‍लंड या चार देशांतील लोकांनी अमेरिकेत आपल्या वसाहती निर्माण केल्या. अठराव्या शतकात स्थलांतराचे प्रमाण वाढले. वसाहती करणाऱ्यांत त्या सुमारास चार-पंचमांश लोक इंग्‍लंडहून आलेले होते. अमेरिकन वसाहतींतील आर्थिक जीवन इंग्‍लंडमधील ग्रामीण भागातील जीवनाप्रमाणे होते. दरम्यान, यूरोपमध्ये कारखानदारी जसजशी वाढू लागली, तसतसे कच्च्या मालाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने व पक्क्या मालाला बाजारपेठा उपलब्‍ध होण्याच्या दृष्टीने वसाहतींचे महत्त्व किती आहे, ते यूरोपातील देशांना उमजू लागले, वसाहतींचा आर्थिक विकास मायदेशाच्या आर्थिक विकासाला पूरक ठरावा, या दृष्टीने वसाहतींबाबतची आर्थिक धोरणे इंग्‍लंडसारख्या देशांनी आखली. वसाहतींत कारखानदारी वाढून मायदेशाशी स्पर्धा होऊ नये, या उद्देशाने इंग्‍लंडने अमेरिकेतील वसाहतींच्या व्यापारउद्योगावर जाचक नियंत्रणे लादली.

वसाहतकालीन अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीप्रधान होती. दक्षिणेकडे तंबाखू व नीळ पिकविणारे बागाईतदार होते, पण छोटी शेते पिकविणारे स्वयंपूर्ण शेतकरी हा समाजाचा प्रमुख घटक होता. गुलामाचे जीवन जगणारा कामगार हे या काळाचे आणखी एक वैशिष्ट्य. उद्योगक्षेत्र प्रामुख्याने घरगुती अवस्थेत होते. कौटुंबिक उपयोगासाठी जवळपासच्या भागात विकण्यासाठी आणि काही भागांत निर्यातीसाठी औद्योगिक उत्पादन होत गेले, पण बहुतांशी ते अल्प प्रमाणात होते. तथापि ब्रिटिश सरकारच्या धोरणामुळे उत्पादन वाढण्यास फारसा वाव नव्हता. कच्च्या मालाची निर्यात व पक्क्या मालाची आयात, हे प्रामुख्याने वसाहतकालीन व्यापाराचे स्वरूप होते.

ब्रिटिश सरकारच्या धोरणाच्या मर्यादेतही अमेरिकेचे आर्थिक हित काही प्रमाणात साधले गेले, हे नमूद केले पाहिजे. त्याचे कारण असे की, कारखानदारीपेक्षा कृषी व खनिज वस्तूंचा उपसा हे अर्थोद्योग परिणामी वसाहतींच्या हिताचे ठरले. पायाभूत वस्तूचे उत्पादन वाढविणे, भावी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने श्रेयस्कर म्हटले पाहिजे. या उत्पादनाला ब्रिटिश सरकारने हरप्रकारे उत्तेजन दिले. अमेरिकेच्या ते पथ्यावर पडले. असे असले, तरी ब्रिटिशांनी अमेरिकेतील वसाहतींचा व्यापार, कारखानदारी, वाहतूक, चलनव्यवस्था यांबाबत स्वार्थी भूमिका घेऊन जी नियंत्रणे बसविली होती व त्यांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची जी गळचेपी होत होती, तिने असंतोषाचे बीज रोवण्यास मदत केली. सप्तवार्षिक युद्धानंतर (१७५६–६३) इंग्‍लंडने वसाहतींवर भरमसाट कर लादण्यास सुरुवात केली. अमेरिकेतील ब्रिटिश सैन्यबलाच्या खर्चासाठी इंग्‍लंडने स्टँप फी (१७६५) व चहा-साखरेवरील कर (१७७३) यांत वाढ केल्यामुळे असंतोषाचा सौम्य उद्रेक प्रथम १७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथील परिषदेत ब्रिटनशी आर्थिक असहकाराचे धोरण पुकारण्यात झाला. ब्रिटिश सरकारने प्रथमपासून अनुसरलेल्या व्यापारवादी आर्थिक नीतीविरुद्ध अमेरिकन वसाहतींत जो असंतोष निर्माण झाला, तेच ⇨ अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे महत्त्वाचे आर्थिक कारण मानता येईल. हा असंतोष स्वातंत्र्ययुद्धापूर्वीच्या लगतच्या काळात भडकला गेला, याचे कारण तेव्हाची आर्थिक मंदी हे होय. या आर्थिक मंदीचा शेतीवर विपरीत परिणाम झाला व वसाहतींतील जमीनदार वर्गही नाराज झाला. साहजिकच ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणे सुलभ गेले. परकीय सत्ता झुगारून देणे हे  उद्दिष्ट जनतेच्या मनात होतेच. शिवाय भूमिविभाजन व भूमिविषयक कायद्यांत दिसून येणारे जमीनदारांचे जे आर्थिक वर्चस्व होते, ते तत्कालीन मध्यम व कनिष्ठ वर्गांच्या मनात डाचत होते. १७७५–८३ या काळातील स्वातंत्र्ययुद्धाने अमेरिकेला स्वातंत्र्य तर लाभलेच, पण अमेरिकेच्या भावी राजकारणाचा व अर्थकारणाचा पाया घातला गेला.

अमेरिकेतील १७८३–८९ ही वर्षे अनिश्चिततेची व अराजकतेची होती. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या तेरा राज्यांमध्ये आपापसांत जास्तीत जास्त अधिकार मिळविण्यासाठी चुरस लागली. या काळात चलनवाढ झाली. मध्यवर्ती सरकारला कर बसविण्याचा अधिकार नव्हता. आर्थिक अराजकतेमुळे मध्यवर्ती शासनयंत्रणा कणखर व्हावी, असे सर्वांना वाटू लागले. परदेशी व्यापार करणाऱ्यांना समुद्रावर संरक्षण हवे होते उत्पादकांना संरक्षक जकातीची आवश्यकता भासत होती भांडवलदारांना स्थिर चलनमूल्य हवे होते शेतक‍ऱ्यांना व जमिनीचे लिलाव करणाऱ्‍यांना कायदा व सुव्यवस्था हवी होती. या सर्व हितसंबंधी वर्गांनी संघराज्याच्या संविधानाची दुरुस्ती करण्यात आणि मध्यवर्ती शासनाचे अधिकार विस्तृत करण्यात पुढाकार घेतला. १७८९ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांची पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमताने नियुक्ती झाली. वॉशिंग्टनना हॅमिल्टन व जेफर्सन हे अलौकिक बुद्धीचे व कर्तृत्वाचे सहकारी लाभले.

स्वातंत्र्योत्तर काळात यादवी युद्धापर्यंत हॅमिल्टन-जेफर्सन यांच्या संघर्षातून राज्यसंस्थेच्या आर्थिक नीतीचे स्वरूप ठरले. व्यक्तीच्या उपक्रमशीलतेला उत्तेजन देण्याच्या हेतूने अर्थव्यवस्थेला मार्गदर्शन करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे, अशी हॅमिल्टनची विचारसरणी होती. त्याचे आर्थिक तत्त्वज्ञान व्यापारवादी होते. या विचारसरणीला तत्कालीन उद्योगपतींचा पाठिंबा होता. अमेरिकन प्रजासत्ताकाच्या प्रारंभीच्या काळात अर्थखात्याचा प्रमुख या नात्याने आर्थिक नीतीवर हॅमिल्टनचा प्रभाव पडला. हॅमिल्टनच्या अमदानीत अमेरिकेची पहिली मध्यवर्ती बँक (१७९१–१८११) अस्तित्वात आली. राष्ट्रीय टाकसाळ सुरू झाली. आयातीवर जकाती बसवून अंतर्गत उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्यात आले. कालवे व नद्या यांवरील अंतर्गत जलवाहतुकीला राज्यांच्या पुढाकाराने चालना देण्यात आली. त्यामुळे वाहतूक-खर्च कमी होऊन व्यापारउद्योग फोफावण्यास मदत झाली. हॅमिल्टनने अंतर्गत व परकीय कर्ज फेडण्याची सर्व जबाबदारी मध्यवर्ती सरकारने घ्यावी असे ठरविले. त्यामुळे केंद्रसरकारची पतप्रतिष्ठा अमेरिकेत वाढली. अमेरिकेतील चलनव्यवस्थेचा व सरकारी अर्थकारणाचा पाया हॅमिल्टनने घातला व त्याच्या धोरणामुळे अमेरिकेच्या आर्थिक विकासाचाही पाया अप्रत्यक्षपणे घातला गेला, असे म्हणता येईल.

वॉशिंग्टनच्या कारकिर्दीत जेफर्सन गृहखात्याचा प्रमुख होता. हॅमिल्टनच्या धोरणाला त्याचा विरोध असल्याने त्याने राजीनामा दिला. पण १८०१ मध्ये तो राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. जेफर्सन ⇨ अनिर्बंध अर्थव्यवस्थेचा कट्टा पुरस्कर्ता होता. आर्थिक व्यवहारात कमीतकमी हस्तक्षेप करणारे राज्य ते सर्वोत्कृष्ट राज्य, या विचारसरणीला त्याचा पाठिंबा होता. आयातीवरील जकातीस त्याचप्रमाणे बँकव्यवसायात राज्याने केलेल्या प्रवेशास त्याचा विरोध होता. सरकारने अर्थक्षेत्रात मुळीच लुडबूड करू नये, असे त्याचे मत होते. त्याचे हे मत तत्कालीन जमीनदारवर्गाला मंजूर होते. कारण हॅमिल्टनप्रणीत आर्थिक धोरण कारखानदारवर्गाला अनुकूल व जमीनदारवर्गाला प्रतिकूल, अशी त्या वर्गाची समजूत होती. मध्यवर्ती सरकार प्रबल करण्याचा हॅमिल्टनचा प्रयत्‍नही जेफर्सनला पसंत नव्हता. जेफर्सन शेतकी-व्यवसायाच्या बाजूचा होता व त्याच्या कारकिर्दीत त्याने विविध शेतकी-सुधारणांचा पुरस्कार केला. कारखानदारीला अनुकूल अशी त्याची मनोभूमिका नसली, तरी आर्थिक स्वातंत्र्याचा तो पुरस्कर्ता असल्याने कारखानदारीला विरोधी अशा प्रत्यक्ष गोष्टी त्याने केल्या नाहीत. सारांश, अनिर्बंध अर्थव्यवस्थेचे तत्त्वज्ञान अमेरिकेत रुजविण्यास तो बऱ्‍याच प्रमाणात कारणीभूत झाला.

अमेरिकेतील तत्कालीन कारखानदारांना जेफर्सनचे तत्त्वज्ञान रुचले नसले, तरी कालांतराने ते आपण होऊन अनिर्बंध अर्थव्यवस्थेची मागणी करू लागले. त्याचे कारण जॅक्सन या अध्यक्षाच्या (१८२८–३६) आर्थिक धोरणात दिसते. जॅक्सनचा जेफर्सनप्रमाणे शेतकी-हितसंबंधांना पाठिंबा होता, मात्र जेफर्सनप्रमाणे अनिर्बंध अर्थव्यवस्थेचा त्याने पाठपुरावा केला नाही. आपल्या अधिकाराचा उपयोग त्याने जकाती कमी करण्यासाठी व १८९६ मध्ये स्थापन झालेली दुसरी मध्यवर्ती बँक नष्ट करण्यासाठी केला. या गोष्टी कारखानदारीची वाढ होण्यास अनुकूल नव्हत्या. या घटनेमुळे उद्योगपतिवर्गाला जाणीव झाली की, अर्थकारणात राज्यसंसदेला हस्तक्षेप करण्यास मान्यता दिली तर ती आपल्या बाजूने निर्णय घेईल असा भरवसा नाही, त्यापेक्षा अनिर्बंध अर्थव्यवस्था बरी. या तत्त्वज्ञानाला जोरदार पाठिंबा दिला केरी या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने पण केरीपुरस्कृत अनिर्बंध अर्थव्यवस्थेचा सूर वेगळा होता. बाल्यावस्थेतील अमेरिकन उद्योगधंद्यांना जकातकरांचा उपयोग करून संरक्षण द्यावे व बाह्य बाजारपेठांवर विसंबून राहण्यापेक्षा, अंतर्गत बाजारपेठांच्या विकासावर भर द्यावा असे धोरण अमेरिकेने आखावे आणि याव्यतिरिक्त शासनाने अर्थकारणात लुडबूड करू नये, हा त्याचा युक्तिवाद औद्योगिकीकरणाला जोराची चालना देण्यास उपकारक ठरला.

१८६० मध्ये अमेरिकेत उत्तर विरुद्ध दक्षिण या यादवी युद्धाला तोंड लागले. या यादवी युद्धाची कारणे प्रामुख्याने आर्थिक होती. गुलामगिरीच्या प्रश्नाला या युद्धात महत्व प्राप्त झाले असले, तरी मूलतः कृषिप्रधान दक्षिणेचे आर्थिक हितसंबंध व उद्योगाभिमुख होत असलेल्या उत्तरेचे आर्थिक हितसंबंध यांच्यातील तो झगडा होता. दक्षिणेकडील आर्थिक जीवनावर प्रामुख्याने निर्यातीसाठी कापूस, तंबाखू, भात व ऊस पिकविणाऱ्‍या बागाईतदारांचा पगडा होता, तर उत्तरेकडील आर्थिक जीवन नव्याने उदयास आलेल्या औद्योगिक भांडवलदारांच्या हातात होते. दक्षिणेकडील बागाईतदारांना गुलामगिरी चालू राहणे फायदेशीर वाटत होते कारण १८०७–६० या काळात अडीच लाखांहून अधिक गुलामांचा अमेरिकेत भरणा झाला होता. याउलट उत्तरेकडील भांडवलदारवर्गाला गुलामगिरी नष्ट व्हावयास हवी होती, कारण तसे झाल्यास वाढत्या उद्योगधंद्यासाठी विपुल मनुष्यबळ मिळेल, हे त्यांनी ओळखले होते. कामगार स्वतंत्र व संतुष्ट असेल, तर त्याची कार्यक्षमता वाढते, हेही ते ओळखून होते. परराष्ट्र व्यापारनीती हे दक्षिण व उत्तर यांतील आर्थिक संघर्षाचे आणखी एक कारण होते. उत्तरेकडील उद्योगधंदे वाढावेत म्हणून परकी स्पर्धेपासून त्यांना संरक्षण दिले पाहिजे व त्यासाठी जकातकर जबर बसविले पाहिजेत, अशी उत्तरेची मागणी होती. याउलट निर्यात पिके काढणाऱ्‍या दक्षिणेकडील बागाईतदारांचा संरक्षणकारी जकातींना विरोध होता, कारण त्यामुळे अन्नाच्या व कारखानदारी मालाच्या किंमती वाढतात असा त्यांचा दावा होता. त्याचप्रमाणे इतर देशांनी प्रतिकार म्हणून संरक्षण तत्त्व स्वीकारले तर आपला निर्यात व्यापार धोक्यात येईल, अशी भीतीही दक्षिणेकडील बागाईतदारांना वाटत होती. हा आर्थिक संघर्ष चलनक्षेत्रातही होता. उत्तरेचा आग्रह सुलभ चलन प्राप्त व्हावे असा होता, तर रूढिप्रिय दक्षिणेचा कागदी चलनास विरोध होता. संपूर्णपणे धातुचलनाधिष्ठित चलनव्यवस्था दक्षिणेकडील कृषकवर्गाला हवी होती. जमिनीच्या विक्रीबाबत दक्षिण व उत्तर यांत मतभेद होता. वसाहत न झालेली जमीन अल्प दराने व लहानलहान तुकड्यांत विकली जावी असा उत्तरेचा आग्रह, तर तीच जमीन मोठ्या तुकड्यांच्या रूपाने विकली जावी व तेथे बागायतीला उत्तेजन मिळावे, असा दक्षिणेचा आग्रह होता.

अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर यादवी युद्धापंर्यंत बराच काळ अमेरिकेच्या राजकारणावर मोठमोठ्या बागाईतदारांचे म्हणजे पर्यायाने दक्षिणेकडील राज्यांचे वर्चस्व होते व त्याचे प्रत्यंतर तत्कालीन कायद्यांत येत होते. यादवी युद्धापर्यंतच्या काळात बहुतांशाने अमेरिकेच्या राजकारणाची सूत्रे बागाईतदारांच्या वर्चस्वाखाली असलेल्या डेमॉक्रॅट पक्षाच्या हातात होती पण १८५८ नंतर ही स्थिती हळूहळू पालटू लागली. कारखानदारीचा प्रसार व महत्त्व जसे वाढत गेले, तसे त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या रिपब्‍लिकन पक्षाचा जोर वाढत गेला. १८६० च्या निवडणुकीत रिपब्‍लिकन पक्षाचा अध्यक्ष निवडून आला आणि यापुढे संघराज्यात आपले चालणार नाही, हे ओळखून दक्षिणेने संघराज्यातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतरच्या यादवी युद्धात दक्षिणेचा पाडाव झाला याचाच एक अर्थ असा की, औद्योगिक भांडवलशाहीचा विजय होऊन यापुढे औद्योगिकीकरणाच्या मार्गाने देश वेगाने पुढे जाणार, हे निश्चित झाले.

यादवी युद्धानंतर अमेरिकेच्या औद्योगिकीकरणाची व आर्थिक विकासाची चक्रे अतिशय वेगाने फिरू लागली. शहरीकरणाच्या प्रक्रियेला विशेष गती प्राप्त झाली. १८६० मध्ये शेतीत गुंतलेले मनुष्यबळ ६० टक्के होते ते १९६८ मध्ये अवघ्या ५२ टक्क्यांवर आले. १८६० मध्ये शहरी लोकसंख्या वीस टक्के होती. हे प्रमाण १९५० पर्यंत साठ टक्के झाले. प्रा. कुझनेट्स यांच्या संशोधनानुसार, १८७० नंतरच्या ऐंशी–पंचाऐशी वर्षांत राष्ट्रीय उत्पन्न सरासरीने दर वर्षी चार टक्क्यांनी वाढले. दरडोई उत्पन्नात सरासरी दोन टक्क्यांनी वाढ झाली. १८६९–७८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न ९३० कोटी डॉ. होते, ते १९६८ मध्ये ७१,३०० कोटी डॉ. झाले.

आज जागतिक लोकसंख्येच्या सहा टक्क्यांइतकी अमेरिकेची लोकसंख्या आहे, परंतु जगाच्या एकंदर औद्योगिक उत्पादनाच्या एक तृतीयांश उत्पादन अमेरिकेचे आहे.

यादवी युद्धानंतरच्या शंभर वर्षांत अमेरिकेच्या आर्थिक विकासाला जी गतिमानता लाभली, तिचा परिणाम अपरिहार्यपणे जागतिक अर्थकारणातील अमेरिकेचे स्थानमाहात्म्य वाढण्यात झाला. पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात सर्वश्रेष्ठ उद्योगप्रधान राष्ट्र हे स्थान अमेरिकेला जागतिक अर्थकारणात प्राप्त झाले. पण तरीही कच्चा माल व अन्नवस्तूंचा बाहेरील जगाला पुरवठा करण्यातील अमेरिकेचे अग्रेसरत्व अबाधित राहिले. याचा अर्थ हा की, अमेरिकेच्या आर्थिक विकासात समतोलतेचा अभाव दिसून आला नाही.

विसाव्या शतकाच्या आरंभापासून अमेरिकेतील उत्पादन द्रुत गतीने वाढत गेले. पहिल्या महायुद्धापूर्वी अमेरिका ऋणको देश होता. औद्योगिकीकरणाला गती लाभावी म्हणून एकोणिसाव्या शतकात अमेरिकेने अनेक देशांकडून कर्जे काढली होती. परंतु पहिले महायुद्ध आर्थिक विकासाच्या दृष्टीने अमेरिकेच्या पथ्यावर पडले. महायुद्धात गुंतलेल्या दोस्त राष्ट्रांना आवश्यक ते अन्नपदार्थ, पोलाद, तांबे, कापूस, यंत्रसामग्री वगैंरे पुरविण्याची जबाबदारी अमेरिकन उद्योगधंद्यांवर पडली. परिणामी निर्यात दुपटीने वाढली युद्धोपयोगी वस्तू, दारूगोळा व शस्त्रे बनविणाऱ्‍या उद्योगांची चलती झाली. १९२० पर्यंत अमेरिकेने आपले सर्व कर्ज फेडून टाकले व आंतरराष्ट्रीय अर्थकारणात सावकाराची भूमिका घेऊन पदार्पण केले. महायुद्धातील तेजीनंतर १९२०–२२ ह्या दोन वर्षांच्या काळात उद्योगधंद्यांवर थोडीशी मंदीची छाया पडू लागली पण ती अल्प काळ टिकली. १९२२ नंतर सतत सात वर्षे उद्योगधंद्यांना तेजीचा काळ उपभोगावयास मिळाला. या काळात शेती, कोळसा व कापड या व्यवसायांत असमाधानकारक परिस्थिती असूनही मोटारी, यंत्रसामग्री, नागरी घरबांधणी, रस्तेबांधणी वगैरे धंद्यांत कमालीची वाढ झाल्यामुळे सार्वत्रिक अर्थव्यवस्थेत तेजीचे व उत्साहाचे वातावरण राहिले. उत्पादनाचा वेग इतका वाढला की, त्यामुळे अत्युत्पादन व उपभोगशून्यता यांच्या कात्रीत अमेरिकन अर्थकारण सापडले. उद्योगधंद्यांत गुंतवलेल्या प्रचंड भांडवलाला धोका निर्माण झाला. त्यातून ⇨ महामंदीचे संकट औद्योगिक जीवनावर कोसळले. १९३९ मध्ये शेअरच्या किंमती एकाएकी घसरल्या आणि शेअरबाजार कोलमडला. त्याचा परिणाम बँकव्यवसायावर झाला. १९२९–३३ या कालावधीत दोन-तृतीयांश अमेरिकन उद्योगधंदे बंद पडले, बेकारी अतोनात वाढली, शेतमालाचे भाव घसरले आणि शेतकरी निष्कांचन झाले. भांडवली वस्तूंचे उद्योग व उपभोग्य वस्तूंचे उद्योग या दोहोंनाही मंदीचा चांगलाच फटकारा बसला.

मंदीच्या संकटातून अमेरिकेला वाचविण्यासाठी १९३२ मध्ये राष्ट्राध्यक्ष ⇨ फ्रँकलिन रूझवेल्ट  ह्यांनी  ⇨न्यू डील  धोरण जाहीर केले उत्पादकवर्गात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ‘रिकन्स्ट्रक्शन फायनान्स कॉर्पोरेशन’ स्थापन करण्यात येऊन तिच्या व्दारा उद्योगधंद्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले. ‘डिपॉझिट इन्शुअरन्स स्कीम’ने बँकव्यवसायाला स्थैर्य आणले विमा कंपन्या आणि लोहमार्ग यांच्या पुनर्रचनेसाठी पैसा ओतण्यात आला रोजगारी वाढविण्यावर भर देण्यात आला. १९३५ मध्ये सामाजिक विमायोजनेद्वारा बेकारांना देण्यात येणारे आर्थिक संरक्षण वाढविण्यात आले. आवश्यक तितकी चलन-पत-पुरवठ्यात वाढ करण्यात आली. शेतीतील समस्या सोडविण्यासाठी उत्पादनावर नियंत्रण, नवीन बाजारपेठांचा शोध, शेती उत्पादनाला आर्थिक मदत इ. उपाययोजना ‘न्यू डील’ने अंमलात आणल्या. या सर्व योजना कार्यवाहीत आणण्यासाठी तुटीच्या अर्थकारणाचा अवलंब करण्यात आला. पण आर्थिक स्थैर्यासाठी ते अपरिहार्य होते.

या सर्वांचा सम्यक परिणाम होऊन उद्योगधंदे व रोजगारी यांत वाढ झाली. शेती व्यवसायाचा पाया मजबूत झाला. अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीतून पुनर्विकासाच्या मार्गावर येऊन ठेपली. ‘न्यू डील’च्या यशामुळे ‘अनिर्बंध अर्थव्यवस्था’ तत्त्वाचा निश्चितपणे ऱ्हास होऊ लागला.

जागतिक अर्थकारणातील आपले महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने दुसरे महायुद्ध ही अमेरिकेला आणखी एकदा लाभलेली सुवर्णसंधी होय. १९३९–४१ या दोन वर्षांत औद्योगिक उत्पादन दुपटीने वाढले. यातील बहुतेक माल मित्रराष्ट्रांकडे निर्यात होत असे. पाच हजार कोटी डॉ. किंमतीचे युद्धोपयोगी व इतर साहित्य अमेरिकेतून दोस्त राष्ट्रांना पुरविण्यात आले. अमेरिकेने १९४१ मध्ये युद्धात भाग घेतल्यानंतर साहजिकच युद्धोपयोगी साहित्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढले. नागरी गरजेच्या वस्तू निर्माण करण्यात गुंतलेल्या हजारो कारखान्यांनी युद्धोपयोगी वस्तु उत्पादन करण्याकडे मोहरा वळविला. मोटारी तयार करणार्‍या कारखान्यांत विमाने, रणगाडे आणि जीप तयार होऊ लागल्या.

एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांक १९४३ मध्ये २४० पर्यंत वाढला (१९३५–३९ = १००). यंत्रसामग्रीचे उत्पादन तिपटीने वाढले आणि वाहतूक-साधनांची निर्मिती सात पटींनी वाढली. १९३९ मध्ये अमेरिकेची दोन टक्क्यांहून कमी राष्ट्रीय साधनसामग्री युद्धासाठी उपयोगात आणली जात असे १९४४ ला हे प्रमाण ४० टक्क्यांवर गेले.

युद्धोत्तर काळात आर्थिक उन्नतीच्या दिशेने अमेरिकेची वेगवान प्रगती चालूच राहिली. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनक्षमता यूरोपमधील कोणत्याही देशांंच्या अडीच पट असून, रशियाच्या चौपटीहून अधिक आहे. गेल्या दोन दशकांत तांत्रिक ज्ञान, संशोधन आणि नवे शोध यांनी आर्थिक क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती केली आहे. अणुशक्ती, इलेक्ट्रॉनिकी, प्लॅस्टिक, नव्या धातू यांसारख्या गोष्टींमुळे जीवनमान उंचावण्यास फार मोठा हातभार लागला आहे.

युद्धोत्तर काळात अमेरिकेने पश्चिम जर्मनीला व यूरोपातील लहान राष्ट्रांना विकासासाठी साहित्य, कर्ज या रूपाने ⇨ मार्शल योजनेद्वारा फार मोठी आर्थिक मदत केली तसेच मध्यपूर्व व अतिपूर्वेकडील मागास राष्ट्रांचा विकास करण्यासाठी अमेरिकेने योजना आखली. आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक, पुनर्वसन बँक, आंतरराष्ट्रीय चलन निधी, गॅट, यूनेस्को, जागतिक आरोग्य संघटना, अन्न व शेती संघटना ह्या संस्थांच्या कार्यात अमेरिकेने हिरिरीने भाग घेतला आहे. स्वतःची आर्थिक उन्नती साधताना जगातील अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांना आपल्याबरोबर घेऊन वाटचाल केली पाहिजे, असा नवा विचारप्रवाह अमेरिकेत प्रबळ होत आहे.

कृषि: अमेरिकेतील सद्यःकालीन शेती उत्पादनक्षम आहे. सुपीक जमीन, अनुकूल हवामान आणि वेगाने होणाऱ्‍या सुधारणा यांचा मुख्यतः हा परिपाक आहे. अमेरिकेचा उत्तर भाग जगातील अत्यंत सुपीक प्रदेशांत मोडतो. यातील चाळीस टक्के जमीन लागवडीस योग्य असून जमिनीचे विविध प्रकार आणि हवामानाची अनुकूलता यांमुळे वेगवेगळ्या प्रकारची पिके काढता येतात. सुपीक जमिनीच्या विस्तीर्ण भागात अन्नधान्याची कमतरता कधीच पडत नाही.

अमेरिकेचा उत्तर भाग जगातील अत्यंत सुपीक प्रदेशांत मोडतो. यातील चाळीस टक्के जमीन लागवडीस योग्य असून जमिनीचे विविध प्रकार आणि हवामानाची अनुकूलता यांमुळे वेगवेगळ्या प्रकारची पिके काढता येतात. सुपीक जमिनीच्या विस्तीर्ण भागात अन्नधान्याची कमतरता कधीच पडत नाही.

अमेरिकेतील १९६४ मधील सर्वेक्षणानुसार सु. ९१·५ कोटी हेक्टर एकूण भूभागापैकी ४० टक्के जमीन गुरचरणासाठी, २८ टक्के जंगलांसाठी, २८ टक्के पिकांसाठी आणि उरलेली जमीन अन्य कारणांसाठी वापरण्यात येत असल्याचे आढळून येते. एकूण शेतकऱ्यांपैकी साठ टक्के शेतकरी जमीनमालक आहेत. १९७१ मध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीप्रमाणे, अमेरिकेत २८,७६,३१० शेते होती आणि सरासरी एका शेताचे क्षेत्रफळ १६५·५ हेक्टर होते. एका शेतापासून मिळणारे स्थूल व निव्वळ उत्पन्न अनुक्रमे १९,३५० व ५,३७४ डॉ. होते. जवळजवळ निम्मी शेते नगदी पिके काढणारी असून एकूण शेती-उत्पादनाच्या ९० टक्के उत्पादन या शेतांतून मिळते. १९७२ च्या आकडेवारीनुसार २८·३१ लक्ष शेते होती व एका शेतापासूनचे सरासरी निव्वळ उत्पन्न ५,५८१ डॉ. होते. १८२० मध्ये अमेरिकेतील एक शेतमजूर जेमतेम चार लोकांना पुरेल इतके अन्नधान्य पिकवू शकत असे. त्या काळात शेतीव्यवसायात नव्वद टक्के मनुष्यबळ गुंतलेले होते. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेबरोबर हे प्रमाण कमी होऊन १९६८ मध्ये १·०५ कोटी लोक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अवधे ५·२ टक्के मनुष्यबळ शेतीव्यवसायात गुंतलेले दिसते. तथापि हे पाच टक्के लोक एकूण लोकसंख्येला पुरून उरेल इतके धान्य पिकवितात. प्रत्येक शेतकरी स्वतःसाठी व अन्य अठ्ठावीस माणसांना पुरेल इतके धान्य पिकवितो. १९६८ मध्ये कृषि-उत्पादन २,०२० कोटी डॉ. किंमतीचे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३·२ टक्के होते.

यूरोपातील कोणत्याही देशाच्या तुलनेने अमेरिका नैसर्गिक साधन-सामग्रीच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. अमेरिकेच्या प्रचंड विस्तारात समशीतोष्ण कटिबंधातील हवेचे जवळजवळ सर्व प्रकार दिसून येतात. उष्ण, थंड, पावसाळी, कोरडी व मध्यम हवा असे हवेचे सर्व प्रकार त्यांत मोडतात. यामुळे विविध प्रकारची पिके काढता येतात. अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे पिकांप्रमाणे पशुधन व खनिजे या बाबतींत तेथे विपुलता आहे. कथिल व क्रोम यांसारखे काही धातू आणि नैसर्गिक रबर व कॉफी यांसारखी पिके वगळल्यास, आपल्या सर्व तऱ्हेच्या गरजा भागवून निर्यात करता येईल एवढा सर्व प्रकारचा माल अमेरिका प्रतिवर्षी निर्माण करते. मका, गहू, ओट, सोयाबीन, तंबाखू, कापूस व बटाटे ही अमेरिकेची प्रमुख पिके. मिसिसिपी खोऱ्‍यातील मोठा भाग मक्याच्या लागवडीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. जगातील एकूण मक्याच्या पिकाच्या पन्नास टक्के मका एकट्या अमेरिकेत पिकतो. एकूण ४१ राज्यांत मक्याचे पीक निघते. १९३० मध्ये गहू उत्पादनात अमेरिकेचा पहिला क्रमांक होता. सध्या जगात रशियाच्या खालोखाल अमेरिकेचा क्रमांक लागतो. अमेरिका जगातील एकूण कापूस उत्पादनाच्या २१ टक्के कापूस पिकविते आणि त्यासाठी ९३.०८ लक्ष हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी दोन-तृतीयांश कापूस निर्यात होत असे. आता दोन-तृतीयांशाहून अधिक कापूस अमेरिका स्वतः वापरते. तंबाखू पिकाच्या बाबतीत जगात अमेरिकेचा प्रथम क्रमांक असून जागतिक उत्पादनाच्या एक-षष्ठांश पीक अमेरिका काढते आणि एकूण पिकाच्या ३४  टक्के भाग निर्यात करते. एकूण जागतिक उत्पादनाच्या ७५ टक्के सोयाबीन अमेरिकेत पिकतो.

 अमेरिकेतील १९६८ सालातील प्रमुख पिकांचे उत्पादन व जगातील त्याच पिकांचे उत्पादन ह्यांची तुलना पुढील तक्त्त्यावरून करता येईल.

यादवी युद्धानंतर अमेरिकेतील कृषिपद्धतीत लक्षणीय बदल घडून आला. १८३० मध्ये शेतीच्या सर्व प्रक्रिया मनुष्यबळ व पशुबळ यांवर आधारलेल्या होत्या. दर शेतावर सरासरी पाच जनावरे असत. १९१० नंतर त्यांऐवजी यंत्रांचा वापर होऊ लागला. शेतीच्या वाढत्या आकारमानामुळे यांत्रिकीकरण आणि श्रमविभागणी यांस भरपूर वाव मिळाला. ट्रॅक्टर आणि एलिव्हेटर यांचा अधिकाधिक उपयोग करण्यात येऊ लागला. १८६० मध्ये शेतीसाठी वापरात असलेल्या एकूण यंत्रांची किंमत २५ कोटी डॉलर होती. १९०० मध्ये ती ७५ कोटी डॉलर झाली. १९६८ मध्ये एकूण ३,०९७ कोटी डॉ. किंमतीची यंत्रे शेतीसाठी उपयोगात आणली जात होती. ट्रॅक्टर, मोटरट्रक, दुग्धोत्पादन-यंत्रे, ग्रेन कंबाइन, कॉर्नपिकर आणि पिक-अप-बेलर ही यंत्रे शेती-उद्योगास अत्यावश्यक ठरली. १९२० मध्ये प्रत्येक ४०४ हेक्टरांमागे एक ट्रॅक्टर असे अमेरिकेतील शेती-उद्योगाचे चित्र होते १९६९ च्या सुमारास दर ४०४ हेक्टरांमागे सु. २३ ट्रॅक्टर (म्हणजेच सु. १७ हेक्टरांमागे एक ट्रॅक्टर) असे प्रमाण झाले. खताचा वाढता उपयोग, सतत सुधारणारे कृत्रिम खतांचे प्रकार, पिकांवरील रोगराईचे निर्मूलन, सुधारलेले पशुसंवर्धन इ. सुधारणांचाही कृषि-उत्पादन वाढविण्यास उपयोग झाला आहे. अमेरिकेत शेतीला केवळ एक परंपरागत चालत आलेली जीवनरीती न मानता अन्य अनेक उद्योगांप्रमाणे अर्थोद्योग म्हणून मानण्यात येते. अमेरिकेतील शेतकरी सुशिक्षित आहे. नवनव्या शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग उत्पादनवाढीसाठी कसा करता येईल, या प्रयत्‍नात तो असतो. शेतकी खाते आणि महाविद्यालये यांच्या सहकार्याने सर्व राज्यांत विस्तार-सेवा-योजना सुरू असतात. कृषि-प्रयोगकेंद्रे ठिकठिकाणी स्थापन करण्यात आली असून कृषिविषयक नियतकालिकांचा प्रसारही प्रचंड प्रमाणावर आहे.

ग्रामीण उद्योगधंद्यांत शेतकी अवजारे निर्माण करणे, मांस पॅकिंग करणे, फळे डबाबंद करणे, मद्याचे उत्पादन करणे आदींचा समावेश होतो. मांस, दूध आणि चामडी मिळविण्यासाठी शेतीवर गुरे राखण्यात येतात. १९७१ मध्ये ११.४५ कोटी गुरे शेतीवर होती. डुकरे पाळणे हा बहुतेक शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय आहे. चराऊ रानांचे क्षेत्रफळ प्रत्यक्ष शेतीच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे याचे कारण गुरे, डुकरे आणि मेंढ्या पाळणे हा शेतकऱ्यांना शेतीइतकाच-महत्त्वाचा व्यवसाय वाटतो. १९७१ च्या आकडेवारी- नुसार अमेरिकेतील शेतांवर ६.७५ कोटी डुकरे होती. एकूण मेंढ्यांची संख्या १.९० कोटी होती. अमेरिकेतील शेतांवर १९७० च्या सुरुवातीस ४३.२ कोटी कोंबड्या होत्या.

अमेरिकेतील कृषिव्यवसायाला वारंवार भेडसावणारी एक समस्या म्हणजे जरूरीपेक्षा अधिक होणारे उत्पादन आणि परिणामी कृषि-उत्पादनाच्या किंमतींत वारंवार होणारे चढउतार. महामंदीनंतर ‘न्यू डील’मध्ये लागवडीखाली असलेल्या शेतीच्या क्षेत्रफळात घट करून व उत्पादनावर निंर्बंध आणून किंमतींत स्थैर्य आणण्याचा प्रयत्‍न झाला होता.‘ॲग्रिकल्चरल ॲडजस्टमेंट ॲक्ट’प्रमाणे शेतक‍ऱ्याला किमान मिळकतीची हमी मिळण्याच्या दृष्टीने सरकार विविध उपाय योजत आहे. दुस‍ऱ्या महायुद्धाच्या काळात कृषि-उत्पादनाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे जादा उत्पादनाची समस्या सुटल्यासारखी झाली. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. तांत्रिक प्रगतीचा वापर कृषिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने उत्पादनात वाढ झाली व अन्नधान्याच्या किंमती भराभर खाली उतरू लागल्या. कृषीपासून मिळणारे उत्पन्न १९५१ मध्ये १,४८० कोटी डॉ. होते. ते १९६४ मध्ये १,२१० कोटी डॉ. पर्यंत कमी झाले. १९६९ मध्ये कृषीपासून मिळणारे स्थूल व निव्वळ उत्पन्न अनुक्रमे ५,४१६ कोटी व १,६१४ कोटी डॉ. होते. अध्यक्ष आयझनहौअरने ‘सॉइल बँक कार्यक्रमा’नुसार लागवडीखाली आणावयाच्या जमिनीवर मर्यादा घातली, परंतु दर हेक्टरमागे उत्पादनक्षमता वाढल्याने एकूण उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

उद्योग : आर्थिक विकास घडून येत असता शेतीतील मनुष्यबळप्रमाण कमी होत जाते आणि कारखानदारीतील मनुष्यबळ वाढत जाते. कामगारांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन औद्योगिक उत्पादन वाढू लागले की, मनुष्यबळ त्यातूनही मोकळे होऊन प्रामुख्याने सेवाकर्माच्या उत्पादनातील मनुष्यबळ-प्रमाण वाढते. निम्म्यापेक्षा अधिक मनुष्यबळ सेवाकर्मात असणे हे आर्थिक क्रांती पुरी झाल्याचे लक्षण मानले, तर अमेरिकेत हा बदल घडून येण्यास १८६० ते १९२० म्हणजे साठ वर्षे लागली. यादवी युद्धानंतरच्या काळात तंत्रक्रांती झाली आणि इतर क्रांत्यांप्रमाणे ती एकदाच न होता पुन्हा पुन्हा होत आहे. या तंत्रक्रांतीचा लाभ सर्व अर्थोद्योगांना मिळाला, तरी प्रामुख्याने तिचा फायदा कारखानदारीला झाला. कामगारांच्या कौशल्यांत वाढ, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, अधिक उत्पादनक्षम नवीन यंत्रे यांमुळे कारखानदारीची उत्पादनक्षमता सतत वाढत गेली व अजूनही वाढत आहे. उद्योगधंद्यांना अमेरिकन अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे. १९२९ मध्ये उद्योगधंद्यांतून मिळालेले एकूण उत्पन्न २,१९४.५ कोटी डॉ. किंमतीचे असून राष्ट्रीय उत्पन्नातील त्याचा वाटा २५ टक्के होता. १९६८ साली राष्ट्रीय उत्पन्नातील उद्योगधंद्यांचा भाग २१,५०० कोटी डॉ. म्हणजे ३० टक्के झाला. म्हणजे चाळीस वर्षांच्या काळात उद्योगधंद्यांपासून मिळणारे उत्पन्न जवळजवळ दहा पटींनी वाढल्याचे दिसते.

कोळसा, तेल व इतर खनिजे यांव्यतिरिक्त पाणी, लाकूड आदी निसर्गसाधनांनी अमेरिकेच्या औद्योगिक विकासाला मोठा हातभार लावलेला आहे. सध्या कोळशाच्या जागतिक उत्पादनाच्या सु. एक-षष्ठांश उत्पादन अमेरिकेचे आहे. परंतु जगातील कोळशाच्या एकूण राखीव साठ्यांपैकी एक-तृतीयांश साठे अमेरिकेत आहेत. कोळशापासून उत्पन्न होणारी अमेरिकेतील शक्ती, जगातील इतर देशांच्या तत्सम शक्तीपेक्षा अधिक स्वस्त आहे. खाणींची उच्च उत्पादनक्षमता आणि निसर्गाची कृपादृष्टी यांमुळे अमेरिकेतील उद्योगधंद्यांवर अनुकूल परिणाम झाला आहे. पेट्रोलियम उत्पादनात अमेरिका सुदैवी आहे. जगातील एकूण पेट्रोलियम उत्पादनाच्या चाळीच टक्के भाग अमेरिकेत उपलब्ध होतो. मिसूरी, कॅलिफोर्निया आणि गल्फ भागांत मिळणारे तेल खुद्द अमेरिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरीत आहे की, भूवैज्ञानिकांनी तेलाचे साठे संपतील अशी भीती व्यक्त केली आहे. दरम्यान गेल्या वीस वर्षांत मध्यपूर्व व व्हेनेझुएला भागांत तेलाचे नवे साठे उपलब्ध झाले आहेत. सिमेंट आणि नैसर्गिक वायू अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर मिळतो. जवळजवळ दोनशे कोटी डॉ. किंमतीच्या नैसर्गिक वायूचा चार-पंचमांश भाग उद्योगधंद्यांसाठी वापरला जातो. शक्तीचे साधन म्हणून कोळसा व पेट्रोलियम ह्यांच्या खालोखाल जलविद्युत्-शक्तीचा उपयोग केला जातो. नायगारा, उत्तर अटलांटिक राज्ये आणि पॅसिफिक राज्ये या भागांतील नद्यांचा वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. तथापि देशातील एकूण जलसंपत्तीचा अर्धा भागही अजून उपयोगात आणला गेला नाही असे दिसते.

सर्व त‍ऱ्हेची खनिजे अमेरिकेत मुबलक प्रमाणात सापडतात. १९६८ मध्ये एकूण खनिजांचे मूल्य २,४९८ कोटी डॉ. असून त्यात दोन-तृतीयांश वाटा इंधनशक्ति-खनिजांचा होता.

अमेरिकेतील बहुतेक सर्व राज्यांत लोखंड विपुल प्रमाणात मिळते. पुढील दोनशे वर्षे पुरेल इतके लोखंडाचे साठे अमेरिकेत आहेत, असा भूवैज्ञानिकांचा अंदाज आहे. १९६८ मधील अशोधित लोखंडाचे उत्पादन ८७२ लक्ष मेट्रिक टन असून त्यातील १६ टक्के भाग मोटार-उद्योगासाठी वापरण्यात आला. तांबे, जस्त व शिसे या खनिजांच्या उत्पादनात अमेरिका जगात आघाडीवर असून चांदी उत्पादनात अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो.

अमेरिकेत सु. ३०.७१ कोटी हेक्टर जमीन जंगलव्याप्त असून तीपैकी ७०% जमिनीत व्यापारी दृष्ट्या किफायतशीर अशा जंगलाची लागवड केली जाते. व्यापारी दृष्ट्या किफायतशीर जंगलांपैकी दोन-तृतीयांश जंगले खाजगी मालकीची असतात. जगातील एकूण लाकूड उत्पादनाच्या निम्मे लाकूड अमेरिकेत मिळते व ते तेथेच उपयोगात आणले जाते. इमारती लाकडाचे वार्षिक उत्पादन ३,२०० ते ४,००० कोटी बोर्ड फूट होते त्यापैकी मऊ लाकडाचे वार्षिक उत्पादन सु. २,८०० कोटी बोफू. होते. देशात सु. ४,२०० कोटी बोफू. लाकूड लागते त्यामुळे वर्षांकाठी ५०० ते ६०० कोटी बोफू. लाकडाची आयात करावी लागते. वृत्तपत्री कागदाच्या उत्पादनात सबंध जगात अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. १९६९ मध्ये हे उत्पादन ३० लक्ष टन झाले. वर्षाकाठी अमेरिकेला सु. ७३ लक्ष टन कागदाची गरज असल्याने तिला कॅनडाकडून मोठ्या प्रमाणावर कागदाची आयात करावी लागते. इमारती लाकडाला अमेरिकेत वाढती मागणी असल्याने जंगलातील साठा भावी कालात कमी पडू नये, म्हणून वृक्षावर पडणारी कीड व रोग नष्ट करण्याचे व जंगलांना लागणाऱ्‍या आगी विझविण्याचे अनेक उपाय योजण्यात येतात.

अमेरिकेतील मच्छीमारी व्यवसायाने वसाहतीच्या काळापासून हजारो लोकांना उदरनिर्वाहाचे साधन पुरविले आहे. १९३० मध्ये अमेरिकेत (अलास्कासह) १४६.२५ कोटी किलो माशांचे उत्पादन झाले आणि त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्‍यांना १०.१ कोटी डॉ. मिळकत झाली. वर्षाकाठी मत्स्यव्यवसाय १८६.३६ कोटी ते २२२.७२ कोटी किलो माशांचे उत्पादन करीत असतो आणि त्यापासून त्याला ३५४ कोटी डॉ. ते ५१७ कोटी डॉलरचे उत्पन्न मिळते (१९६०-६९). १९६८ मध्ये सु. ३,९६७ कंपन्या मत्स्य-पदार्थांच्या प्रक्रिया-उद्योगात गुंतलेल्या होत्या. सव्वा लाखाहून अधिक लोक या उद्योगात गुंतलेले आहेत. १९६५-६९ या काळात प्रदूषणामुळे सु. ७.८ कोटी मासे नष्ट झाले. ही प्रदूषण समस्या मत्स्यव्यवसायास भेडसावत आहे.

गेल्या शंभर वर्षांत अमेरिकेतील राहणीमान जसजसे बदलत गेले, तसतसे जुने उद्योगधंदे मागे पडून नव्या उद्योगांची वाढ झाली. काही उद्योगधंद्यांचे महत्त्व एकसारखे वाढत गेले. पेट्रोलियम उद्योगाचा उदय यादवी युद्धाच्या काळात झाला. १८९५ मध्ये उत्पादन १५.८ कोटी हेक्टोलीटर होते. १९१७ मध्ये उत्पादन ७९ कोटी हेली. झाले व पुढील दहा वर्षांत ते दुपटीने वाढले १९६८ मध्ये पेट्रोलियमचे उत्पादन ३९५ कोटी हेली. हून अधिक होते. १८७० मध्ये स्थापन झालेल्या रॉकफेलरच्या स्टँडर्ड ऑइल कंपनीच्या एकूण १४० देशांतून २५० दुय्यम कंपन्या असून देशातील एकूण उत्पादनाच्या ८५ टक्के व जगातील एकूण उत्पादनापैकी एक-षष्ठांश उत्पादन ही कंपनी करते. विद्युत्-उपकरणे बनविण्याचा व्यवसाय गेल्या चाळीस वर्षांत नव्याने उदयास आलेला व वाढलेला उद्योग होय. मोटार उद्योग हाही अलीकडच्या काळात झपाट्याने वाढलेला उद्योग आहे. १९०७ सालचे उत्पादन अवघे चार हजार गाड्या होते. त्यानंतरच्या सत्तर वर्षांत या उद्योगाची भरभराट वेगाने झाली आहे. हेन्‍री फोर्डने १९०३ मध्ये चालना दिलेल्या या उद्योगात आज साडेसात लाख कामगार गुंतलेले असून १९६८ मध्ये १.०७ कोटी गाड्यांची विक्री झाल्याचे आढळते. आज अमेरिकेतील जवळजवळ ऐंशी टक्के कुटुंबे स्वतः मोटारी बाळगतात. तुलनेने रेल्वेडब्यांची निर्मिती कमी होत आहे. १९०७ मध्ये उत्पादनाने पाच हजारांचा उच्चांक गाठला होता. आज ते एक हजाराच्या घरात आहे. पोर्टलँड सिमेंटचे उत्पादन वाढून अन्य प्रकारच्या सिमेंटचे कमी झाले, हा तांत्रिक प्रगतीचा परिणाम होय. तयार अन्न, तयार कपडे, कृत्रिम धाग्यांचे कापड हे उद्योग जसे वाढले, तसे परिणामी इतर उद्योगांचे महत्त्व कमी झाले. अलीकडे अमेरिकेत महत्त्व पावलेल्या उद्योगांत सल्फ्युरिक ॲसिड, सोडा ॲश, रंग, औषधे यांसारखे पदार्थ निर्माण करणाऱ्‍या रासायनिक उद्योगांचा समावेंश होतो. यांव्यतिरिक्त बिनतारी संदेशवाहक, रेडिओ, रेडार वगैरेंसाठी वापरण्यात येणाऱ्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे.

उद्योगक्षेत्रात अमेरिकेची जी भरभराट झाली, तिचे महत्त्वाचे कारण सातत्याने होत असलेली तांत्रिक प्रगती हे होय. यादवी युद्ध आणि पहिले महायुद्ध यांच्या दरम्यानच्या काळात झालेल्या तांत्रिक बदलाने यांत्रिकीकरणाला जोराची चालना दिली आणि ही प्रक्रिया दुसऱ्‍या महायुद्धानंतरही चालू राहिली. त्यानंतर शास्त्रीय ज्ञानात नव्याने झालेल्या संशोधनाचा (उदा., सायबर्नेटिक्स, संगणक इ.) वापर औद्योगिक प्रक्रियांसाठी होऊ लागल्याने आणि स्वयंचलित नियंत्रण पद्धतीमधे कल्पनातीत वाढ झाल्याने दुसरी औद्योगिक क्रांती आकार घेत आहे. संगणक, प्रतिसंभरण नियंत्रण आणि यंत्रांचा उच्चस्तरीय संयोग ही अमेरिकन उद्योगातील स्वयंचलनाची वैशिष्ट्ये मानली जातात. आज अमेरिकेतील उद्योगधंद्यात केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. उदा., १९७० मध्ये सु. १४ कोटी टन पोलादाची उत्पादनक्षमता असलेला लोखंड-पोलाद उद्योग हा दहा उत्पादनसंस्थांमध्ये संकेंद्रित झालेला होता. मोटार आणि मोटारीचे भाग उत्पादन करणारे उद्योगधंदे, रासायनिक उद्योगधंदे, कागद आदी उद्योगधंदे यांत प्रामुख्याने केंद्रीकरण झाल्याचे दिसते. ते केंद्रीकरण कमी होण्यासाठी १८९० पासून विश्वस्त-मक्तेदारी-विरोधी कायदे मंजूर करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या उद्योगधंद्यांचे प्राबल्य पुन्हा वाढले असून बहुतेक अमेरिकन लोक, खाजगी मालकीच्या मोठ्या उत्पादनसंस्थांवर सरकारी देखरेख असावी, या मताचे आहेत. उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण दूरगामी भरभराटीच्या दृष्टीने पोषकच आहे, अशी विचारसरणी आज अमेरिकेत मूळ धरीत आहे. जगातील सर्वांत मोठ्या अशा शंभर कंपन्यांच्या नामावलीत अमेरिकेतील जवळजवळ सत्तर कंपन्यांचा (उदा., जनरल इलेक्ट्रिक, स्टँडर्ड ऑइल, ईस्टमन कोडॅक, ड्यूपाँट, यू. एस्. स्टील, फोर्ड, आय. बी. एम्., जनरल मोटर्स वगैरे) समावेश होतो.

न्यूयॉर्क महानगरप्रदेश म्हणजे अमेरिकेतील निर्मिति-उद्योगांचे अग्रेसर केंद्रच मानले जाते त्याखालोखाल शिकागो, लॉस अँजेल्‌स-लाँग बीच, फिलाडेल्फिया, डिट्रॉइट, पिट्‌सबर्ग, क्लीव्हलँड, सेंट लूइस आणि न्यूयार्क ही महानगरे व त्यांचे आसमंतीय प्रदेश येतात.

अमेरिकन उद्योगक्षेत्रावर प्रचंड उत्पादनसंस्थांचा फार मोठा प्रभाव असल्याचे आढळून येते. १९७० च्या पहिल्या तीन महिन्यांच्या अखेरीस दहा कोटी डॉलरवर मालमत्ता असलेल्या

उत्पादनसंस्थाचे सरासरी नफ्याचे प्रमाण २८% होते, तर दहा लक्ष डॉ. पर्यंत मालमत्ता असलेल्या उत्पादनसंस्थांचे सरासरी नफ्याचे प्रमाण ६.२% होते. १९७० मध्ये १०२ उत्पादनसंस्थांची मालमत्ता प्रत्येकी १०० कोटी डॉलरहून अधिक होती२०० औद्योगिक निगमांजवळ सबंध देशाच्या एकूण मालमत्तेपैकी ५०% हून अधिक मालमत्ता होती. १९६९ मध्ये देशातील ५०० आघाडीच्या निगमांची एकूण गुंतवणूक-रक्कम व मालमत्ता रक्कम अनुक्रमे ४०,१६० कोटी डॉ. व २१,४७० कोटी डॉ. होती. १९७० मध्ये सर्व अमेरिकन निगमांची मालमत्ता-रक्कम ५५,४०० कोटी डॉ. झाली १९५५ मध्ये ही रक्कम २२,४०० कोटी डॉ. होती. (म्हणजेच १९७० मध्ये मालमत्ता रकमेत ८१% नी वाढ झाली.) १९६९ मध्ये १९ कंपन्यांनी प्रत्येकी २० कोटी डॉलरहून अधिक निव्वळ नफा मिळविला, हे खालील तक्त्यावरून स्पष्ट होईल :

नवीन संयंत्रे व साधनसामग्री ह्यांवर १९५०-५५ या काळात वर्षाकाठी २,००० कोटी डॉलर खर्च केला जात होता १९५७ मध्ये तो ३,७०० कोटी डॉलर म्हणजे सर्वाधिक झाला होता. १९६२-६९ या काळात वर्षाला हा खर्च दुप्पट झाल्याचे आढळते. १९५५, १९६५ व १९७० या वर्षांमधील नवीन संयंत्रे व साधनसामग्री ह्यांवर औद्याेगिक क्षेत्राच्या विविध शाखांत करण्यात आलेला खर्च तक्ता क्र. ३ वरून स्पष्ट होईल.

अमेरिकेत १९७० च्या मध्यास एकूण कामगारांची संख्या सु. ८,१९,६०,००० होती त्यांपैकी ७,४८,७७,००० (म्ह. ९१.४%) कामगार कृषिबाह्य व्यवसायांत व ३५,५२,००० (४.३%) कृषिउद्योगात गुंतलेले होते आणि ३५,५२,००० (४.३%) कामगार बेकार होते. कृषिबाह्य व्यवसायांत गुंतलेल्या एकूण कामगारांपैकी १,९५,६४,००० (२७.७%) कामगार निर्मिति-उद्योगांत १,४७,७८,००० (२१%) ठोक व किरकोळ व्यापार-व्यवसायांत१,२८,००,००० (१८.१%) केंद्र, राज्य व स्थानिक शासनांच्या सेवेत १,१४,३९,००००० (१६.२%) सेवा-व्यवसायांत ४४,४१,००० (६.३%) वाहतूक, संदेशवहन व लोकोपयोगी सेवा-उद्योगांत ३६,६७,००० (५.२%) आर्थिक व वित्तीय क्षेत्रांत ३२,७०,००० (४.६%) बांधकाम-उद्योगात तर ६,२३,००००० (०.९%) खाण-उद्योगात गुंतलेले होते. गेल्या शंभर वर्षांत कामगारांची आर्थिक परिस्थिती कमालीची सुधारली असून त्यांचे राहणीमान झपाट्याने उंचावले आहे. चारांपैकी तीन कामगार स्वतःची मोटार बाळगून आहेत. त्यांच्या कामाची कालमर्यादा १८५० मध्ये आठवड्यास ७० तास होती ती १९६१ च्या कायद्याप्रमाणे राज्यानुसार ३८.९ ते ४३.५ तासांवर आली आहे.  कामाचा प्रकार व देशाचा भाग यांनुसार कामगारांची मजुरी असते. १९६९ मध्ये मिसिसिपी राज्यात कामगाराचे आठवड्याचे सरासरी वेतन ९५.०६ डॉ. न्यू मेक्सिको १०४.४१ डॉ.कॅलिफोर्निया १४५.८९ डॉ. ओहायओ १५२.१० डॉ. कनेक्टिकट १३६.७८ डॉ. न्यूयॉर्क १२८.३० डॉ. आणि अलास्का १८५.२४ डॉ., असे होते.

कामगारसंघटनेचा प्रारंभ १९ व्या शतकाच्या सुरुवातीस झाला. प्रथम स्थानिक स्वरूपाच्या कामगारसंघटना उदयास आल्या. अनेक संघटनांनी एकत्र येऊन मोठ्या शहरांत संघटना करण्याचा प्रयत्‍न केला. यांतील बऱ्‍याचशा संघटना १८३७ च्या मंदीत कोलमडल्या. यादवी युद्धाच्या वेळी अमेरिकेतील कामगारवर्ग संपूर्णतया असंघटित होता. १८८० च्या सुमारास ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर’ या राष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना झाल्यानंतर, अमेरिकेतील कामगार चळवळीला खराखुरा जोर आला. १९६८ मध्ये एकूण १९० संघटना असून १.९१ कोटी कामगार संघटनांचे सदस्य होते. सत्तर टक्क्यांहून अधिक कामगार संघटनांबाहेर असल्याचे दिसते.

कामगार चळवळीची प्रगती काहीशी मंदगतीने झाली याचे कारण यूरोपातील कामगारांच्या तुलनेने अमेरिकेतील कामगारांची स्थिती नेहमीच चांगली राहिली. चळवळीचे स्वरूप जहाल कधी झाले नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत कामगारसंघटनांच्या नेत्यांचा स्वसामर्थ्यावर विश्वास होता. सरकारने कामगारांच्या हितरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे कारण नाही, संघटना ते करण्यास समर्थ आहेत असा संघटना-नेत्यांचा दावा होता. महामंदीच्या काळापर्यंत मालकवर्गाला कामगारांची संघटना व सांघिक सौदा करण्याचा हक्क फारसा मान्य नव्हता. संघटनेत सामील होणाऱ्यांविषयी त्यांचे मत अनुकूल नव्हते. महामंदीनंतर म्हणजे १९३३ पासून कामगार कल्याणासाठी सरकारने कायद्याचे अस्त्र वापरावे, असा कामगारांनी आग्रह धरला. यानंतर मात्र कामगारांची सर्वांगीण प्रगती झाल्याचे दिसून येते. १९३५ मध्ये‘नॅशनल लेबर रिलेशन्स ॲक्ट’

(‘वॅग्नर ॲक्ट’) मंजूर झाला आणि संघटना व सांघिक सौदा करण्याचा कामगारांचा हक्क मान्य करण्यात आला. कामगारांना आरोग्य व स्वास्थ्य लाभावे व त्यांचे कल्याण व्हावे, या हेतूने अमेरिकेत अनेक महत्त्वाचे कायदे केले आहेत. १९३८ च्या कायद्याने सोळा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली. त्याचप्रमाणे कामगारांना बेकारी व वार्धक्य-भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली. तांत्रिक क्रांतीमुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्‍हाड कोसळण्याची शक्यता असल्याने, आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी कारखान्यांच्या व्यवस्थापनात कामगारवर्ग अधिकाधिक भाग घेत आहे. सांघिक सौदा व संप ही दोन अस्त्रे प्रभावीपणे वापरून दुसऱ्‍या महायुद्धानंतरच्या काळात कामगारवर्गाने आपल्या स्थितीत सुधारणा करून घेतली आहे.

व्यापार, वाणिज्य व अर्थ : अमेरिकेचा अंतर्गत व्यापार १९१४ नंतरच्या कालावधीत प्रचंड प्रमाणावर वाढला. जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर व स्वस्त किंमतीत निर्माण होऊ लागल्या आणि सर्वसामान्य अमेरिकन ग्राहकाच्या जीवनमानाने उच्च पातळी गाठली ग्राहकांची क्रयशक्ती वाढली. दर वर्षी अमेरिकेतील नागरिक आपले निम्मे उत्पन्न किरकोळ विक्रीच्या दुकानात वस्तू घेण्यात खर्च करतो असे आढळून आले. वाढते उत्पादन व वाढती क्रयशक्ती यांमुळे अमेरिकन व्यापाऱ्यांना विक्रीसाठी नव्या संस्था, संघटना व विक्रीकेंद्रे स्थापन करणे आवश्यक वाटू लागले. सुपरमार्केट, साखळी दुकाने यांसारखी नवी विक्रीकेंद्रे सुरू झाली. हप्तेबंदीने पैसे देण्याची मोकळीक ठेवल्याने आणि ग्राहकांना नव्या सुखसोयी उपलब्ध करून देण्यात व्यापारी अहमहमिकेने पुढे आल्याने अंतर्गत व्यापार कमालीचा वाढला. किरकोळ विक्रेत्यांच्या मानाने घाऊक विक्रेत्यांचे महत्त्व कमी झाले. वाहतुकीच्या साधनांत सुधारणा झाली आणि जाहिरातींचे युग सुरू झाले. उत्पादकाला किरकोळ ग्राहकाशी प्रत्यक्ष संबंध ठेवता येऊ लागला. १९२९ मध्ये किरकोळ विक्रीकेंद्रे साडेपंधरा लाख होती आणि एकूण विक्री ४,९१० कोटी डॉ. होती. १९६३ मध्ये विक्रीचे प्रमाण २५,००० कोटी डॉलरपर्यंत वाढले. १९२९ मध्ये १.६८ लक्ष घाऊक केंद्रांतून एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.८ टक्के, म्हणजे ३,८०० कोटी डॉलरची विक्री झाली. १९६३ मध्ये हे विक्रीचे प्रमाण ५.८ टक्क्यांपर्यंत म्हणजे १६,००० कोटी डॉलरपर्यंत वाढले. १९६८ मध्ये किरकोळ व घाऊक व्यापारात गुंतलेले एकूण मनुष्यबळ १.४३ कोटी असून गेल्या शंभर वर्षांत ही संख्या दहा पटींनी वाढल्याचे दिसते.

१९६९ मध्ये बहुशाखीय किराणामालाच्या दुकानांमधून खाद्यपदार्थांची विक्री खाद्यपदार्थांच्या एकूण किरकोळ व्यापारापैकी सु. ५२% एवढी झाली. साखळी दुकाने, सुपरमार्केट, उत्पादक कारखानदारांची स्वतःची विक्रीदुकाने आणि मोठी विभागीय वस्तुभांडारे ही छोट्या दुकानदारांशी स्पर्धा करीत असतात. साखळी दुकानांच्या चालकांची, मध्यस्थ वा दलाल यांवर अवलंबून न राहता, थेट उत्पादकांकडून माल विकत घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे आढळते. बहुशाखीय साखळी दुकानांचा एकूण किरकोळ व्यापारात २८% एवढाच वाटा असला, तरी काही प्रकारच्या किरकोळ व्यापारांमध्ये साखळी दुकानांचे प्रभावी स्थान असते. विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्री-दुकानांच्या व्यापारापैकी सु. ७८%, विभागीय वस्तुभांडारांच्या व्यापारापैकी ७९%, पादत्राणांच्या व्यापारापैकी ५२% व्यापार साखळी दुकानांमार्फत चालतो, यावरून साखळी दुकानांचे वाणिज्य संघटनेत केवढे महत्त्वपूर्ण स्थान आहे हे दिसून येते.

हप्तेबंदी कर्ज-पद्धत ही अमेरिकेत अतिशय ग्राहकप्रिय झाली आहे. मार्च १९७० पर्यंत हप्तेबंदीरूपाने ९,६७० कोटी डॉ. रक्कम येणे होती. तीमध्ये मोटारगाड्यांसाठी ३,६१० कोटी डॉ. फर्निचर, उपकरणे व इतर उपभोग्य वस्तूंकरिता २,६८० कोटी डॉ. आणि वैयक्तिक कर्जाकरिता २,९८० कोटी डॉ., अशी विभागणी होती. हप्तेबंदीव्यतिरिक्त कर्जाची रक्कम २,३०० कोटी डॉ. होती.

अमेरिकेतील जाहिरात-उद्योग हा सबंध जगात सर्वाधिक प्रमाणात विकसित झालेला उद्योग आहे. अंतर्गत व्यापाराच्या क्षेत्रात जाहिरातीवरील खर्च गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणावर वाढला असून अनेक वेळा उत्पादन-खर्चापेक्षा वितरण-खर्च अधिक असल्याचे आढळून येते. १९६८ मध्ये जाहिरातींवर १,८१० कोटी डॉ. खर्च करण्यात आले १९४० मध्ये हाच खर्चाचा आकडा २०० कोटी डॉ. होता. जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचे स्थान अद्वितीय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत विकण्यात येणारा वीस टक्के माल अमेरिकेत निर्माण होतो आणि पंधरा टक्के माल अमेरिका खरेदी करते. अमेरिकेची एकूण आयात-निर्यात १९६९ मध्ये अनुक्रमे ३,६०५.२ व ३,७४४.४ कोटी डॉ. किंमतीची होती. १९७१ मधील ही आकडेवारी अनुक्रमे ४,५६०.२ कोटी डॉ. व ४,३५५.० कोटी डॉ. होती. दोन-तृतीयांशाहून अधिक निर्यात मोटारी, ट्रक, अन्नधान्य, औद्योगिक व कृषियंत्रे आणि विद्युत् उपकरणे व सामग्री यांची होती. त्यांशिवाय रासायनिक द्रव्ये, कापड, कापूस, तंबाखू, प्रशीतक, यांत्रिक उपकरणे ह्यांचाही निर्यात होणाऱ्या वस्तूंत समावेश होतो. १९६९ मधील एकूण निर्यातीच्या सु. ७० टक्के निर्यात विकसित देशांकडे व सु. ३० टक्के अविकसित देशांकडे झाली. आशिया व यूरोप खंडांतील कम्युनिस्ट देशांकडे अवघ्या २१ कोटी डॉ. किंमतीच्या मालाची निर्यात झाली.

अमेरिका मुख्यतः निकेल, मँगॅनीज, औद्योगिक उपयोगाचे हिरे, नैसर्गिक रबर, कॉफी, चहा, कोको आदी वस्तू परदेशांतून आयात करते. पेट्रोलियम व तांबे यांसाठीही अमेरिका काही अंशी आयातीवर अवलंबून आहे. अमेरिकेचा १९६९ सालातील आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद तक्ता क्र. ४ वरून स्पष्ट होईल.

अमेरिकेत मध्यवर्ती बँक नसली, तरी मध्यवर्ती बँकेकडे सोपविण्यात येणारी कामे १९१३ मध्ये अध्यक्ष विल्सनच्या कारकिर्दीत स्थापण्यात आलेली ‘फेडरल रिझर्व सिस्टिम’ पार पाडते. सर्व राष्ट्रीय बँकांनी‘सिस्टिम’चे सभासदत्व पतकरावे, असा नियम असून प्रत्येक बँकेला ‘सिस्टिम’कडे ठरावीक प्रमाणात ठेव ठेवावी लागते. गव्हर्नरांचे मंडळ, ‘संघराज्यीय खुला व्यवहार समिती’ (फेडरल ओपन मार्केट कमिटी),‘संघराज्यीय सल्लागारी परिषद’ (फेडरल ॲडव्हायझरी कौन्सिल), १२ संघराज्यीय रिझर्व बँका व त्यांच्या २४ शाखा आणि राष्ट्रीय बँका मिळून फेडरल रिझर्व सिस्टिम ही अमेरिकेची बँकिंग-यंत्रणा बनलेली आहे. फेडरल रिझर्व सिस्टिम म्हणजे अमेरिकेतील बँक व्यवसायाचा कणा असून व्यापारी बँकांच्या व्यवहारांवर तिचा मोठा प्रभाव आणि पैशाच्या पुरवठ्यावर तिचे अमर्याद नियंत्रण असते. मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ४,६०० व राज्यांच्या अखत्यारीत स्थापन झालेल्या ९,०००, अशा १३,६०० बँका अमेरिकन जनतेचे देण्याघेण्याचे व्यवहार पार पाडीत असतात. १९०० ते १९२० या काळात बँकांची संख्या ९,००० वरून तीस हजारांवर गेली होती, परंतु १९२१-२९ च्या दरम्यानच्या कालावधीत ५,४०० बँका कोसळल्या. १९३२ पासून बँकांमधील पाच हजार डॉलरपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरविण्याची तरतूद करण्यात आली. १९५० मध्ये हे प्रमाण दहा हजार डॉलरपर्यंत वाढविण्यात आले. सर्व बँकांतील ९८ टक्के ठेवींचा विमा उतरविण्यात आला आहे.

३१ डिसेंबर, १९६९ रोजी व्यापारी बँका व परस्परबचत बँका यांची एकूण मालमत्ता (परिसंपत्ती) ६१,०१० कोटी डॉ. होती तीपैकी ५३,५७० कोटी डॉ. मालमत्ता व्यापारी बँकांची होती. या दोन

प्रकारच्या बँकांनी १९६९ अखेरपर्यंत दिलेल्या कर्जाची रक्कम ३४,४७० कोटी डॉ. झाली त्यापैकी २८,६७० कोटी डॉ. कर्ज व्यापारी बँकांचे होते. व्यापारी बँकांनी दिलेल्या एकूण कर्जाऊ रकमेपैकी २४% व्यापारविषयक व औद्योगिक क्षेत्राला, १५% व्यक्तींना आणि १६% रक्कम स्थावर मालमत्ता क्षेत्रास मिळाली. १९६९ मध्ये देशातील सर्व बँकांच्या एकूण ठेवींची रक्कम ५१,७५० कोटी डॉ. होती यापैकी व्यापारी बँकांमधील ठेवींचे प्रमाण सर्वाधिक (४०,००० कोटी डॉलरवर) होते. त्या ठेवींमध्ये २४,२१० कोटी डॉलरच्या मागणी ठेवी व १९,७८० कोटी डॉलरच्या मुदती ठेवी होत्या.

बँकेमधील एकूण ठेवींचा विचार केल्यास, २८ डिसेंबर १९७२ रोजी अमेरिकेतील अग्रेसर बँका पुढीलप्रमाणे होत्या : (१) बँक ऑफ अमेरिका नॅशनल ट्रस्ट अँड सेव्हिंग्ज असोसिएशन (स्थापना १९०४) (ठेवी : ३,२३९.३० कोटी डॉ.) (२) फर्स्ट न‌‌ॅशनल सिटी कॉर्पोरेशन (स्था. १८१२) (२,५०३.५० कोटी डॉ.) (३) चेस मॅनहटन बँक (स्था. १९५५) (२,२८२.३० कोटी डॉ.) (४) मॅन्युफॅक्चरर्स हॅनोव्हर ट्रस्ट कंपनी (स्था. १९६१) (१,१९६.४० कोटी डॉ.) (५) केमिकल बँक (स्था. १८२४) (१,०७८.७० कोटी डॉ.)(६) मॉर्गन गॅरंटी ट्रस्टं कंपनी (स्था. १९५९) (१,०७१.७० कोटी डॉ.). पहिल्या बँकेचे प्रधान कार्यालय सॅन फ्रॅन्सिस्को येथे व इतर पाच बँकांची न्यूयॉर्क येथे आहेत.

अमेरिकेत ब्रँच बँकिंग पद्धतीवर भर असून एका बँकेच्या सरासरी दोन ते तीन शाखा असतात. बँकांकडून कर्जे घेणाऱ्यांत सरकारी व खाजगी संस्था यांना सारखेच महत्त्व असून चाळीस टक्के कर्ज व्यापारउदिमासाठी घेतले जाते. दुसऱ्‍या महायुद्धानंतर वाढते उत्पादन, भाववाढ, वाढते वेतनमान आणि व्यापारवृद्धी यांमुळे कर्जे चौपटीने वाढली आहेत.

अमेरिकन लोक सरासरीने आपल्या मिळकतीचा आठ टक्के भाग बचत करतात आणि ती बँकांत ठेवली जाते वा विमाकंपन्या, रोखे, इमारती व कर्जसंघटना आदींत गुंतविली जाते.

बँकखाती उघडणे व बँक-सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे ह्या गोष्टी अमेरिकन समाजाच्या सर्व वर्गांत व सर्व भागांत जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक प्रमाणात मुरलेल्या आहेत. ह्यामुळे बँकेचे कर्ज (बँक क्रेडिट) ही बाब चलनपुरवठ्यापेक्षा (करन्सी सप्लाय) अधिक महत्त्वाची असून ती अर्थव्यवस्थेच्या नियमनावर प्रभाव पाडणारी ठरली आहे. चेक वा धनादेश ह्यांचा अथवा चालू खात्यांचा उपयोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर केला जातो की, अमेरिका म्हणजे ‘रोकडरहित समाज’ (कॅशलेस सोसायटी) बनली असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. बँकिंग क्षेत्रातील अलीकडील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, बँकेच्या पतपत्रांचा वा उधार-पत्रांचा (क्रेडिट कार्ड) मोठ्या प्रमाणावरील वाढता वापर, ही होय. १९६५ मध्ये अशा पतपत्रांची संख्या ५० लक्ष होती १९७० च्या सुमारास ती पाच कोटी झाली व ८,००० च्या वर बँकांनी ती कार्डे वितरित केली. ह्याच्या पूर्वी प्रवास अथवा करमणूक मनोरंजन यांकरिता पतपत्रांचा (उदा., डायनर्स क्लब कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस कार्ड इ.) मोठा वापर होत होताच. अशा प्रकारच्या पतपत्रांची संख्या ५० लक्ष आहे. बँक-अमेरिकार्ड व इंटरबँक-मास्टरचार्ज या दोन बँकांची पतपत्रे देशात मोठ्या प्रमाणावर वापरात असून त्यांचे प्रत्येकी दोन कोटी पतपत्रधारक आहेत. ही पतपत्रे ३,५०० बँकांद्वारा वितरित करण्यात येतात. त्यांच्या वितरणाची, हिशोबाची व्यवस्था संगणक यंत्रांच्या साहाय्याने जलद केली जाते.

अमेरिकेतील प्रमुख बँकांनी १९६० नंतर अमेरिकेबाहेर आपले हितसंबंध मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित केले असल्याचे आढळून येते. १९६० साली यूरोपमध्ये अमेरिकन बँकांच्या केवळ १५ व अन्यत्र फार थोड्या शाखा होत्या १९७० च्या सुमारास देशाबाहेर ४० पेक्षा अधिक अमेरिकन बँकांच्या ४०० शाखा (त्यांपैकी यूरोपात १०० च्या वर) कार्य करीत होत्या ह्यांपैकी ३०० च्या वर बँकांच्या शाखांची वाढ होण्याची कारणे म्हणजे, (१) स्वदेशात बँकांच्या शाखाविस्तारावर कायद्याने घातलेले बंधन, (२) परदेशांमध्ये अमेरिकन उद्योगधंद्यांनी वाढविलेले आपले हितसंबंध आणि अमेरिकन बँकेद्वारा आपले आर्थिक व्यवहार करण्याची त्यांची इच्छा आणि (३) यूरोपमधील यूरो-डॉलर भांडवल-बाजारांमधून मिळणारे नफ्याचे आकर्षण, ही होत.

अमेरिकेत १९१४ मध्ये व्यवहारात असलेल्या एकूण पैशांत चलनाचे प्रमाण मोठे होते. सोन्याची व चांदीची नाणी, सुवर्णाची व चांदीची सर्टिफिकिटे आणि कागदी नोटा दैनंदिन व्यवहारात वापरल्या जात होत्या. त्या मानाने बँकांनी निर्मिलेला पैसा अल्प प्रमाणात होता. गेल्या चाळीस वर्षांत बँकांजवळील ठेवी विनिमयाचे माध्यम म्हणून अधिकाधिक प्रमाणात उपयोगात आणल्या जात आहेत. आज नगद पैसा केवळ सोयीखातर वापरण्यात येतो. अमेरिकेतील नव्वद टक्के व्यवहार चेकच्या साहाय्याने चालतात. अमेरिकेत १९७० मध्ये सु. १,८८० आयुर्विमाकंपन्या अस्तित्वात असून सर्व कंपन्यांकडे मिळून एकूण १,२८,५०० कोटी डॉलरचा आयुर्विमा उतरविण्यात आल्याचे दिसते. ८६% हून जास्त कुटुंबे विमा उतरवितात. १९६८ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक कुटुंबाचा सरासरी १८,४०० डॉलरचा विमा होता. ‘द मेट्रोपोलिटन लाइफ इन्शुरन्स कंपनी’ (१८६८) व ‘द प्रूडेन्शिअल कंपनी ऑफ अमेरिका’ (१८७५) ह्या विमाक्षेत्रातील दोन अग्रेसर कंपन्या होत. १९६६ मध्ये त्यांची मालमत्ता अनुक्रमे २,२५० कोटी व २,२४० कोटी डॉ. होती.

अमेरिकेत २० शेअर बाजार आहेत. १७९२ मध्ये न्यूयॉर्कला स्थापना झालेला ‘वॉल स्ट्रीट स्टॉक एक्स्चेंज’ हा शेअर बाजार सर्वांत मोठा होय. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये ‘अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज’ व ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ असून तिन्ही बाजारांत मिळून ९० टक्के उलाढाल होते. ऑगस्ट १९७० मध्ये सर्व शेअर बाजारांतील एकूण सूचित रोख्यांची किंमत ५५,५५० कोटी डॉ. होती त्यांपैकी १३,२०० कोटी डॉ. किंमतीची बंधपत्रे होती. दुसऱ्‍या महायुद्धानंतर अमेरिकेतील रोखेबाजारांत गुंतवणूक करणारांची संख्या वाढत चालल्याचे आढळते. १९७० मध्ये गुंतवणूकदारांची संख्या ३.०९ कोटी होती त्यांपैकी ७०% गुंतवणूकदारांचे उत्पन्न १०,००० डॉलरपेक्षा अधिक होते. निर्मिति-उद्योग आणि स्थावरसंपत्ती यांमध्ये गुंतवणूक करणारांचे प्रमाण अधिक आढळते. त्यानंतर वीज, वायू व इतर लोकोपयोगी सेवा उद्योग, वाणिज्यविषयक उद्योगधंदे व त्याखालोखाल वाहतूक व संदेशवहन उद्योग येतात. शेअर बाजारांतील व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन’ नेमले असून कंपन्यांनी नवे शेअर विक्रीस काढतेवेळी आपल्या आर्थिक स्थितीविषयीची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, यावर कमिशनचा कटाक्ष असतो.

सरकारी अर्थकारण : अमेरिकेच्या अर्थकारणाचे ढोबळपणे तीन टप्पे आहेत : पहिला १७७५-१८६१, दुसरा १८६१-१९२१ व तिसरा १९२१ नंतरचा आधुनिक स्वातंत्र्ययुद्धापासून तो यादवी युद्धापर्यंत हॅमिल्टनने आखून दिलेले कमीत कमी सरकारी हस्तक्षेपाचे धोरण चालू राहिल्यामुळे सरकारी खर्चात फारशी वाढ झाली नाही. तंबाखू, साखर व गुलाम ह्यांवरील जकाती ह्या सरकारी उत्पन्नांत प्रमुख, तर अंतर्गत शांतता, सुव्यवस्था, कारभार आणि लष्कर ह्या खर्चांच्या प्रमुख बाबी.

यादवी युद्धाच्या काळात मात्र प्रथमच सरकारी खर्चात वाढ करावी लागली त्यामुळे करांचे प्रमाणही वाढले. युद्धोत्तर काळात यूरोपातील देशांशी व्यापार वाढल्यामुळे आयात-निर्यातींचे उत्पन्नही वाढले. युद्धकालीन अर्थव्यवस्थेत करवाढ, सरकारी कर्जे, परदेशांस मदत, स्वदेशी धंद्यास संरक्षण देणाऱ्‍या जकाती ह्या विविध गोष्टींमुळे राष्ट्रीय अर्थकारणाचा व्याप वाढला.

१९२१ मध्ये सरकारी अर्थकारणाला औपचारिक व निश्चित स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय अर्थसंकल्प व हिशेबतपासणी ह्यांसंबंधी कायदा पास करण्यात आला. सरकारी अर्थकारणाची तेव्हापासून घालून दिलेली बहुतांश तीच व्यवस्था आजतागायत प्रचलित आहे. अर्थसंकल्प सल्लागार मंडळ, फेडरल रिझर्व्ह बोर्ड, अर्थतंत्राचे मंडळ, सरकारी कोषखाते ह्यांचा सल्ला घेतल्यावर राष्ट्राध्यक्षांनी अर्थसंकल्पाचे विधेयक प्रतिनिधिमंडळ व सीनेटपुढे सादर करावयाचे असते. ह्या अर्थसंकल्पात संघराज्याच्या आयव्यय, कर्ज, गुंतवणूक ह्या सर्व बाबींचा विचार करण्यात येतो.

सरकारी आयव्यय : चालू शतकात सरकारी अर्थकारणाचा विस्तार फार वेगाने झाला आहे. पहिले महायुद्ध, १९३० ची महामंदी, महामंदीनंतरचे आर्थिक पुनर्रचनेचे काम, दुसरे महायुद्ध व युद्धोत्तर काळात अविकसित देशांना आर्थिक साहाय्य देण्याचे धोरण, ह्या कारणांनी अमेरिकेच्या सरकारी खर्चात प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. तसेच आर्थिक बाबतींतील अनिर्बंध अर्थव्यवस्थेचे धोरण अव्यवहार्य भासू लागल्यामुळे शिक्षण, आरोग्य, रुग्णालये, राजरस्ते, सामाजिक विमा, सार्वजनिक स्वास्थ्य, सार्वजनिक बांधकामे आणि १९५० नंतर अणुशक्तीचा विधायक उपयोग, अंतरिक्ष-अभ्यास व चांद्रयाने इत्यादींमुळेही खर्चाचे प्रमाण वाढले आहे. ५ व ६ क्रमांकांच्या तक्त्यांवरून १९७१ व १९७२ ह्या दोन वर्षांतील सरकारी उत्पन्न व सरकारी खर्च ह्यांची सुस्पष्ट कल्पना येईल.

सरकारी खर्चात एकट्या संरक्षणावर प्रतिवर्षी सु. ४५ टक्क्यांच्याहून अधिक टक्के खर्च होतो. १९७२ मध्ये संरक्षणावर सु. ७८ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले. त्याच्या खालोखाल आरोग्य व कल्याण या बाबींना प्राधान्य दिले गेले आहे. अविकसित देशांशी तुलना करता अमेरिकेतील उत्पन्न-कराचे प्रमाण व समाजकल्याणावर होणाऱ्‍या खर्चाचे प्रमाण, ही दोन्हीही मोठी आहेत. संरक्षण-खर्चातील २५ टक्के खर्च केवळ व्हिएटनाम आघाडीवर होत आहे. १९६९-७० मधील व्हिएटनाम आघाडीचा खर्च सु. २५ अब्ज डॉलर होता.

कर : संघराज्याचे, राज्यांचे व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर विभिन्न आहेत. संघराज्याची मदार प्राप्तिकरावर असून करांचे प्रमाण उद्गामी आहे. उदा., जिच्यावर कोणीही अवलंबून नाही, अशा व्यक्तीला करपात्र २,००० डॉलरवर ८% कर द्यावा लागतो हे प्रमाण करपात्र पाच लक्ष डॉलरवर ६०% पर्यंत जाते. कंपन्यांवरील प्राप्तिकराचे प्रमाण वेगळे आहे. लहान कंपन्यांच्या बाबतीत करपद्धतीत अशी काही तरतूद करण्यात आली आहे की, या प्रकारच्या कंपन्यांना होणाऱ्या नफ्यातील पहिल्या २५,००० डॉलरवर ३०% कर भरावा लागतो आणि अमेरिकेतील दहा लक्ष कंपन्यांपैकी (निगमांपैकी) ८०% हून अधिक कंपन्यांना वरील तरतूद लागू होत असल्याने, सबंध देशाचा विचार केल्यास त्या तरतुदीचे महत्त्व उद्योगधंद्यांना फार मोठे वाटते. या दोन्ही करांचे उत्पन्न संघराज्याच्या एकूण करांच्या उत्पन्नाच्या ८०% आहे. १९७२ मध्ये वरील दोन्ही करांपासूनचे उत्पन्न १३,०४० कोटी डॉ. एवढे होते. त्यातील ९,३७० कोटी डॉ. व्यक्तींवरील आणि ३,६७० कोटी डॉ. कंपन्यांवरील करांपासून मिळाले.

बहुतेक राज्ये उत्पन्नासाठी उत्पादनकर, विक्रीकर आणि परवानाशुल्क यांवर अवलंबून असलेली दिसतात. उत्पादनकर प्रामुख्याने मद्यार्क (अल्कोहॉल) व मद्य, तंबाखू, गॅसोलीन, प्रशीतक, मोटारी व वातानुकूलित सामग्री यांवर लादण्यात येतो. १९६९ मध्ये उत्पादनकरापासून १,०६० कोटी डॉ. महसूल मिळाला. याशिवाय राज्यांना संघराज्याकडून अनुदाने मिळतात. १९६० नंतर अनुदानांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. १९६९ मध्ये राज्यांचे एकूण कर-उत्पन्न ३,६४० कोटी डॉ. होते. अनुदानांच्या रूपाने राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्था यांना १,९६० कोटी डॉ. मिळाले. राज्यांच्या एकूण उत्पन्नात विक्रीकराचा वाटा एकचतुर्थांश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मुख्यतः मालमत्तेवरील करापासून उत्पन्न मिळवितात. १९०२ मध्ये या करापासून मिळणारे उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या ८९ टक्के होते, ते १९६८-६९ मध्ये ४० टक्के (३,०६७.३ कोटी डॉ.) राहिले. सिगरेट-कर, हॉटेल-कर, प्रवासी-कर, व्यापारी संस्थांवरील कर इ. मार्गांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना १९६८-६९ मध्ये ४,७९० कोटी डॉ. उत्पन्न मिळाले.

आयात-निर्यात-जकाती : यादवी युद्धापासून ते पहिल्या जागतिक महायुद्धापर्यंत आयात-निर्यात जकातींचे दर अधिक होते. हॉली-स्मूट ह्यांचे १९३० मधील जकातींचे दर हे अमेरिकन इतिहासातील सर्वोच्च दर (५२.८%). पण १९३४ च्या व्यापारी करारानंतर संरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्यात येऊन, जकातींच्या दरांत कपात करण्यात आली आहे.

आपल्याला अनुकूल जकाती आकारणाऱ्‍या देशांना विशेष सवलती देण्याचे धोरण स्वीकारले गेले आहे. गॅटच्या सदस्यत्वामुळे अमेरिकेने सर्व देशांशी बऱ्‍याच प्रमाणावर खुला व्यापार सुरू व्हावा, असे प्रयत्‍न केले आहेत. यादवी युद्धापर्यंत जकाती हा सरकारी उत्पन्नाचा प्रमुख भाग होता १९६० पासून पुढील काळात त्यांचे एकूण उत्पन्नातील प्रमाण अतिशय गौण आहे (उदा., १९६४ मध्ये हे प्रमाण ७.२% होते).

अर्थसंकल्प : संघराज्याच्या एकूण जमाखर्चाची कल्पना यावी म्हणून १९७२ चा अर्थसंकल्प तक्ता क्र. ५ व ६ मध्ये दिला आहे.

राष्ट्रीय कर्ज : सार्वजनिक कर्जाचे प्रमाण खालीलप्रमाणे वाढले आहे :

वरील माहितीवरून असे आढळते, की खाजगी क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण सरकारी क्षेत्रातील कर्जाच्या जवळजवळ बरोबरीचे आहे.

परदेशी गुंतवणूक : अमेरिकेच्या परदेशांतील गुंतवणुकींनी १९६७ च्या अखेरीस त्या काळापर्यंतचा उच्चांक गाठला (१३,४७० कोटी डॉ.). ही रक्कम म्हणजे १९४५ मध्ये गुंतविलेल्या रकमेच्या सु. सहा पट होती. या रकमेपैकी दोन-तृतीयांशापेक्षा जास्त रक्कम खाजगी भांडवल स्वरूपात होती (सु. ५,९५० कोटी डॉ.). तीपैकी ३०.४% रक्कम कॅनडात (कारखानदारी व पेट्रोलियम-उद्योग), १७.२% लॅटिन अमेरिकेतील देशांत (पेट्रोलियम-उद्योग) व ३०.१% पश्चिम यूरोपातील देशांत गुंतविण्यात आली. दक्षिण अमेरिकेतील पेट्रोल-उद्योग, कॅनडामधील कारखाने, यूरोपातील तेलखाणी व कारखाने, आफ्रिकेतील खनिज पदार्थ ह्या उद्योगांत गुंतवणूक करणाऱ्‍यांना जास्त आकर्षण आहे. अमेरिकनांस परदेशी गुंतवणुकीने १९६९ मध्ये सु. ४३० कोटी डॉ. मिळाले. हाच आकडा १९६० मध्ये २४० कोटी डॉ. होता. १९७१ मधील अमेरिकेची परदेशांतील गुंतवणूक १८,०६२ कोटी डॉ. झाली.

इतर देशांचे अमेरिकेतील गुंतवणुकीचे प्रमाणही १९४७ नंतर वेगाने वाढत आहे. १९५८ पर्यंत सु. ३,४८० कोटी डॉलरची एकूण परदेशी गुंतवणूक अमेरिकेतील उद्योग-व्यवसायांत झाली. केवळ १९६८ साली हा आकडा १,०८० कोटी डॉ. म्हणजे सर्वोच्च होता. विशेषतः स्विस, ब्रिटिश, कॅनेडियन, जर्मन, डच व फ्रेंच ह्यांचा अमेरिकेतील एकूण परकीय गुंतवणुकीतील भाग सु. ६० टक्के आहे. १९५७ पासून परदेशी गुंतवणूक प्रतिवर्षी सु. ३०० कोटी डॉ. इतकी आहे. १९६८ च्या अखेरीस अमेरिकेतील परदेशी गुंतवणूक ८,११० कोटी डॉ. झाली.

परदेशांस मदत : अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून १९६९ अखेर ९,२८० कोटी डॉ. रक्कम अनुदानांच्या स्वरूपात, तर २,३८० कोटी डॉ. कर्ज म्हणून एकूण १२,१२० कोटी डॉलरची परदेशांस मदत दिली आहे. मार्शल योजना (१९४८-५२) यशस्वी करण्यात अमेरिकेने सिंहाचा वाटा उचलला. अमेरिकेकडून १९६० च्या पुढील काळात आर्थिक व लष्करी साहाय्य मिळणारी बहुतेक राष्ट्रे विकसनशील म्हणून गणली जातात. १९६९ मध्ये पूर्व आशियाई देश व ऑस्ट्रेलिया यांना अमेरिकेच्या एकूण साहाय्यापैकी २५.२%, दक्षिण आशिया व मध्यपूर्व यांमधील देशांना २२.६%, लॅटिन अमेरिकेतील देशांना १३.२% आणि आफ्रिकी देशांना ६% साहाय्य मिळाले. ‘एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ (एआयडी) या १९६१ मध्ये स्थापन केलेल्या संस्थेद्वारा अमेरिका विकासनशील देशांना केवळ द्रव्य, विविध वस्तू व साधनसामग्रीच पुरवते असे नाही, तर शेती, औद्योगिक विकास, आरोग्य व गृहनिवसन अशा विविध क्षेत्रांतील तज्ञांचे साहाय्य उपलब्ध करते. १९६१ सालीच स्थापन करण्यात आलेली ‘शांतिपथक संघटना’ (पीस कोअर) विकसनशील देशांमधील आरोग्य, शिक्षण, शेती व समूहविकास ह्या कार्यक्रमांच्या यशस्वितेकरिता सातत्याने कार्य करीत आहे. तक्ता क्र. ९ वरून अमेरिकेने १९६९ मध्ये परदेशांस केलेल्या मदतीचे स्वरूप स्पष्ट होईल.

अमेरिकेचे अर्थकारणाचे प्रमाण असे फार प्रचंड आहे. उत्पन्नखर्चाचे, सार्वजनिक कर्जाचे आणि परदेशी मदतीचे आकडे अफाट आहेत. अमेरिकेच्या अंतराळ-संशोधनासारख्या एखाद्या बाबीवर होणाऱ्‍या खर्चात एखाद्या लहान राष्ट्राचा आर्थिक प्रपंच चालू शकेल. पण त्या प्रकल्पावर अमेरिकेकडून होणारा खर्च देशाच्या एकूण अर्थकारणाशी तुलना करता क्षुल्लक आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवर अमेरिकन अर्थकारणाचा आज फार मोठा प्रभाव असल्याने अमेरिकेच्या आर्थिक धोरणाकडे अनेक विकसित देशांचे डोळे लागलेले आहेत.

वाहतूक व संदेशवहन: अमेरिकन राज्यक्रांतीनंतर जलवाहतूक, लोहमार्ग व रस्तेबांधणी या तिन्ही वाहतूक-साधनांचा सारख्या वेगाने विकास झाला. तंत्रविद्येमध्ये जसजशी प्रगती होत गेली,

तसतसे वाहतूकसाधनांच्या विकासामध्ये महत्त्वाचे बदल होऊ लागले. तथापि वाहतुकीचे कोणतेही साधन पूर्णार्थाने निरुपयोगी ठरले नाही. किनारी जलवाहतूक, रस्ते, कालवे, लोहमार्ग, नळमार्ग, हवाईमार्ग आदी वाहतूक-माध्यमे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उपयुक्त ठरत असतात. एखाद्या वाहतूक-माध्यमाला कमीअधिक महत्त्व प्राप्त होते, एवढेच. पहिल्या महायुद्धानंतर लोहमार्ग मागे पडून हमरस्त्यांवरील वाहतुकीस महत्त्व प्राप्त झाले. उतारू-वाहतुकीच्या बाबतीत १९३० पासून बस-मोटारींशी विमाने स्पर्धा करू लागली. रेल्वेच्या वरच्या वर्गात प्रवास करणारे तर लगोलग विमानाकडे वळले. दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी पेट्रोल व रबर यांच्या कमतरतेमुळे रस्तेवाहतुकीची पीछेहाट होऊन रेल्वेला पुन्हा पूर्वीचे स्थान मिळाले. व्यापारी जलवाहतूकही या काळात स्थिरावली. युद्धानंतर परिस्थिती बदलून मोटारी व विमान-वाहतूक ही दोन्ही पूर्ववत आघाडीवर आहेत. अमेरिकेतील रस्ते, जल आणि हवाई या सर्व तर्ऱ्हेची वाहतूक-साधने खाजगी मालकीची व खाजगी व्यवस्थेखाली असून केवळ एक टक्का साधने सरकारी आहेत. तथापि अनेक विमानतळ आणि अन्य काही वाहतुकीची व्यवस्था संघराज्यांच्या व स्थानिक सरकारच्या मालकीची आहे. खाजगी वाहतुकीचे दर, मार्ग व सेवा यांत वाढ, सुरक्षाव्यवस्था आणि अर्थप्रबंध यांवर सरकारचे नियंत्रण असते. १९६३ च्या आकडेवारीनुसार वाहतूक-साधनांचा उपयोग करणाऱ्यांपैकी एक-तृतीयांश लोकांनी हवाई मार्गाचा उपयोग केला, एक-चतुर्थांश लोकांनी बसचा व एक-पंचमांश उतारूंनी रेल्वेचा उपयोग केला. १९६८ मधील उतारू व मालवाहतूक खालील विविध साधनांद्वारे झालेली दिसते : एकोणिसावे शतक म्हणजे अमेरिकेतील वाहतूक-क्षेत्रात रेल्वेचे युग म्हणता येईल. यादवी युद्धाच्या वेळी लष्करी सामग्रीच्या दळणवळणास रेल्वेमुळे गती मिळाली. यादवी युद्धानंतर पंचवीस-तीस वर्षांत रेल्वेचे जाळे देशभर पसरविण्यात आले. त्या काळात सर्वांत स्वस्त असलेल्या या वाहतूक-साधनाने औद्योगिक प्रगतीस तर हातभार लावलाच, पण वेगवेगळ्या भागांतील लोकांना जवळ आणून त्यांच्यात सांस्कृतिक संबंध निर्माण करण्याच्या कामी महत्त्वाची कामगिरी बजावली. राज्यसरकारांनी रेल्वेच्या वाढीसाठी हर प्रकारे मदत केली. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून नवे रेल्वेमार्ग बांधण्यापेक्षा सेवेचा दर्जा सुधारण्यावर अधिक भर देण्यात आला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी रेल्वेवर सरकारी नियंत्रण होते. महामंदीच्या आघातामुळे अनेक रेल्वे-कंपन्या नुकसानीत आल्या. त्यातून त्या सावरल्या पुढे दुसऱ्‍या महायुद्धाचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागले. या महायुद्धात रेल्वेने ९८ टक्के लष्कराची ने-आण केली व अंतर्गत वाहतूक-साधनांनी हाताळलेल्या एकूण मालवाहतुकीच्या ९० टक्के वाहतूक रेल्वेने निभावून नेली. १९६२ मध्ये अमेरिकेतील लोहमार्गांची लांबी ३,४५,९३५ किमी. असून जगातील एकूण लोहमार्गांच्या एक-षष्ठांश होती. १९७० मध्ये लोहमार्गांची लांबी ३,३१,१६५ किमी. होती.

अमेरिकेतील रस्त्यांचे वर्गीकरण ग्रामीण, शहरांतर्गत व राज्यांतर्गत हमरस्ते आणि शहरांतील रस्ते असे करण्यात येते. १९६० ते १९७० च्या दरम्यान शेते-बाजार यांना जोडणारे रस्ते ४८,२७,००० किमी., हमरस्ते १२,८७,२०० किमी. व शहरी रस्ते ८,०४,५०० किमी. लांबीचे होते. प्रवासी व मालवाहतूक करण्यासाठी बस व ट्रक यांची संख्या सतत वाढत आहे. १९७१ मध्ये मोटारी व टॅक्सी आणि ट्रक व बस यांची संख्या अनुक्रमे ९,२२,५५,००० व १,८९,७७,००० होती. सार्वजनिक गाड्यांची संख्या २१ लक्षांहून अधिक होती तर मोटरसायकली २१,८४,७०० होत्या. ट्रकचा उपयोग नाशवंत जिन्नस एक हजार मैलांपर्यंत नेण्यासाठी करतात. ५० टक्के भाजी व फळफळावळ, ७५ टक्के लोणी आणि १०० टक्के अंडी अशा ट्रकमधून बाजारात पोचविली जातात. हवाई वाहतुकीची प्रगती दोन महायुद्धांच्या काळात झपाट्याने झाली. विसावे शतक हे हवाईवाहतुकीचे युग म्हणता येईल. उतारू व मालवाहतूक करण्यात विमानांनी जलवाहतुकीस यशस्वीपणे टक्कर दिली आहे. १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय व अंतर्गत हवाई वाहतूक अनुक्रमे ३,९४४.४० कोटी व १७,९१०.० कोटी प्रवासी-किमी. झाली त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय व अंतर्गत हवाई मालवाहतूक अनुक्रमे २६२.४९ कोटी व ४५५.५० कोटी टन-किमी. झाली. चाळीसहून अधिक प्रकारची विमाने वापरात असून जेट विमानांनी दर ताशी वेगाच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे आणि एका वेळी दीडशे उतारू नेणाऱ्‍या जेटसाठी मोठमोठे विमानतळ शहराबाहेर कसे बांधावेत, ही एक नवीनच समस्या अमेरिकेत निर्माण झाली आहे. १ जाने. १९७० रोजी विमानतळांची संख्या ११,०१६ होती व त्यांपैकी ६,८८५ खाजगी विमानतळ होते. अमेरिकन एअरलाइन्स, पॅन अमेरिकन एअरवेज (पॅन ॲम), ट्रान्स वर्ल्ड एअरवेज (ट्‌वा), ब्रॅनिफ इंटरनॅशनल, ईस्टर्न एअरलाइन्स ह्या अमेरिकेतील प्रसिद्ध विमानकंपन्या होत.

वाहतुकीच्या सर्व प्रकारांवर संघराज्याचे नियमन असते लोहमार्ग, तेलनळ आणि मोटरवाहतूक यांचे नियमन ‘आंतरराज्य वाणिज्य आयोगा’द्वारा (इंटरस्टेट कॉमर्स कमिशन), तर हवाई वाहतुकीचे नियमन‘संघराज्यीय विमानवाहतूक प्रशासन’ (फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन) आणि ‘सिव्हिल एरॉनॉटिक्स बोर्ड’ यांद्वारा केले जाते. जलमार्गाने चालू असलेल्या व्यापाराच्या संदर्भात केंद्र सरकार ‘सागरी आयोगा’द्वारा (यू. एस. मरीन कमिशन) जहाज-उद्योगास आर्थिक साहाय्य करते.

अमेरिकेतील संदेशवहन-उद्योगाचा पसारा मोठा आहे. डाकघर हेच काय ते देशातील सरकारी मालकीचे व सरकार चालवीत असलेले संदेशवहन-साधन असून त्यास प्रतिवर्षी अंदाजे ७० अब्ज टपालवस्तूंचा बटवडा करावा लागतो. १९६९ मध्ये ३२,०६४ डाकघरांतून ७,३९,००२ कर्मचाऱ्यांनी ८८ अब्ज टपालवस्तूंचा बटवडा केला. अमेरिकेतील एकूण दूरध्वनियंत्रांची संख्या दि. १ जाने. १९७२ रोजी १२,४५,३६,९०० असून ती जगातील एकूण दूरध्वनियंत्रांच्या संख्येच्या निम्म्याहून थोडीशी कमी आहे. १९६८ च्या अखेरीस दर हजारी लोकसंख्येमागे ५०० दूरध्वनियंत्रे होती. १९७१ मध्ये नभोवाणीची व दूरचित्रवाणीची अनुक्रमे ६,३७२ व ८६८ केंद्रे होती. १९६९ साली अमेरिकेतील ९६ टक्के घरांत रेडिओ व ९५ टक्के घरांत दूरचित्रवाणी-संच  होतेत्यांपैकी ३२% दूरचित्रवाणी-संच रंगीत होते. दि. १ फेब्रु. १९७२ रोजी अमेरिकेत १,७४९ इंग्रजी दैनिके होती व त्यांचा ६,२२,३१,२५८ प्रती इतका खप होता. दर एक हजार लोकसंख्येमागे ३०९ प्रती, असे हे प्रमाण पडते.हर्स्ट, स्क्रिप्स-हॉवर्ड, गॅन्नेट, न्यूहाउस वगैरे महत्त्वाची साखळी वृत्तपत्रे आहेत.

सहस्रबुद्धे, व. गो.

लोक व समाजजीवनवंश, जाती, जमाती : अमेरिकेतील आजचा समाज हा अनेक जाती, जमाती व वंश (मुख्यत्वे यूरोपीय) यांच्या मिश्रणाने तयार झालेला आहे. ही सरमिसळ अद्याप पूर्ण झालेली नाही. यूरोपातील निरनिराळ्या देशांतून आलेले लोक, जेथे शक्य असेल तेथे आपापले गट करून राहिलेले दिसतात. याचे उत्कृष्ट उदाहरण न्यूयॉर्क शहर होय. यात अजूनही आयारिश, ज्यू, जर्मन, इटालियन इ. लोक निरनिराळ्या भागांत आपापल्या गटांत राहतात. अर्थांत आधुनिक काळातील दळणवळणाची सुलभता, एक भाषा, आर्थिक परिस्थिती, शिक्षण इत्यादींमुळे हे गट आपोआप मिसळून एकसंध समाज निर्माण होण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू आहे, हे दृष्टिआड करून चालणार नाही. आजच्या अमेरिकेत प्रथम पाऊल टाकणारे यूरोपीय स्पॅनिश होते. सेंट ऑगस्टीन (फ्लॉरिडा) येथे त्यांनी १५६५ मधे पहिली वसाहत केली. त्यानंतर १५८३ ते १६०० च्या दरम्यान रीओ ग्रां दे व हीला या नद्यांच्या काठांवर त्यांच्या धर्मोपदेशकांनी बरेच धर्माश्रम स्थापन केले. ब्रिटिश, डच, स्वीडिश व फ्रेंच लोकांनी त्यामागून सतराव्या शतकाच्या प्रारंभास अटलांटिकच्या किनाऱ्यावर आणि ओहायओ व मिसिसिपीच्या खोऱ्‍यांमध्ये वसाहती केल्या. याच सुमारास स्पॅनिश लोकांनी पॅसिफिक किनाऱ्‍यावर व नैऋत्येस आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. या सर्व वसाहतींत यूरोपीय लोकांची भर पडत राहिली परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ती तुरळक होती. यामध्ये ब्रिटिश बहुसंख्य होते. १८४० च्या सुमारास या प्रदेशात येणाऱ्‍या लोकांमध्ये यूरोपातील प्रत्येक देशाचे लोक दिसू लागले इतकेच नव्हे, तर आशिया-आफ्रिकेतील लोकांचीही त्यांत भर पडली. याशिवाय सु. तीन लाख आदिवासी (रेड इंडियन) होतेच. निग्रो गुलामांची आयात व्हर्जिनियात प्रथम १६१९ मध्ये सुरू झाली व पुढील सु. दोनशे वर्षांत अमेरिकेत त्यांची संख्या हजारोंनी वाढली. यातच मधूनमधून चिनी, जपानी, फिलिपिनो व इतर आशियाई, तसेच मेक्सिकन व वेस्ट इंडियन यांचीही थोडीबहुत भर पडत होतीच.

अमेरिकेत स्थायिक झालेले पण परदेशात जन्मलेले अशा लोकांची १८५० मध्ये पहिली शिरगणती केली, तेव्हा ते २२,४४,६०२ भरले. यांत सर्वांत मोठी संख्या (९,६१,७१९) आयरिश लोकांची होती. त्याखालोखाल जर्मन ५,८३,७७४ आणि ब्रिटिश ३,७९,०९३ भरले. १९३० पर्यंत दर शिरगणतीत अशा रहिवाशांची संख्या वाढतीच राहिल्याचे दिसून आले. १९३० ती १,४२,०४,१३८ भरली. परदेशी जन्म झालेल्या नागरिकांची संख्या १८५० मध्ये शेकडा ९.७ होती, ती १८९० ते १९१० पर्यंत १४.७ झाली. यांनतर मात्र हे प्रमाण कमी होत राहिले व १९५० मध्ये ६.७ झाले. १९२४ ला परकीय आप्रवाशांवर घातलेले नियंत्रण, जागतिक मंदी, मृत्यू व दुसरे महायुद्ध ही या रोडावलेल्या संख्येची कारणे होत.

३० जून १९५६ रोजी १८२० पासून अमेरिकेत किती आप्रवासी आले याची गणती केली, तेव्हा ती ४,०७,३४,७०० भरली. यांपैकी ३,४०,३१,४०० यूरोपातून आले होते ५२,९३,३०० अमेरिका खंडातील इतर प्रदेशांतून आणि १०,१०,००० आशियातून आले होते. हे आकडे उद्बोधक असून अमेरिकेच्या नागरिकांची मूस कशी तयार झाली आहे यावर प्रकाश टाकतात. उदा., यूरोपीय आप्रवाशांत सर्वांत मोठा आकडा जर्मनांचा ६५,७५,००० आहे. त्याखालोखाल इटालियन ४८,८९,५०० त्यानंतर आयरिश ४६,४५,५०० व जुन्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यातून ४२,२२,४०० लोक आले. ब्रिटिश ३६,९८,१०० भरले. कॅनडामधून ३३,८२,६०० आणि मेक्सिकोतून १०,०७,००० लोक आले.

या लोंढ्यास स्वदेशातील दुष्काळ व राजकीय-धार्मिक छळ ही दोन मुख्य कारणे होती. दुष्काळाने गांजून आलेले लोक मुख्यतः आयरिश होते. जर्मनी, रशिया, ऑस्ट्रो-हंगेरीतून आलेले लोक, विशेषतः ज्यू, राजकीय परिस्थितीने काचून आले होते. अमेरिकेमधील धार्मिक स्वातंत्र्य व नशीब काढण्यास विस्तीर्ण खुला प्रदेश ही मोठीच आकर्षणे होती. १९०० ते १९१४ मध्ये आलेल्या लोकांत जपानी व वेस्ट इंडीज उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश आधिपत्याखाली राहण्यास नाखूष असलेले फ्रेंच कॅनडातून आले आणि अशा रीतीने धर्मस्वातंत्र्य, कर्तबगारीस वाव, राजकीय औदार्य इत्यादींनी आकर्षित होऊन आलेल्या लोकांचा समाज अमेरिकेमध्ये वाढीस लागला. या पूर्वेतिहासाचा परिणाम त्यांचे आचार, विचार, धडाडी, प्रयोगशीलता, साहस व औदार्य यांमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. अलीकडील काळात अमेरिकेच्या आधिपत्याखालील प्वेर्त रीकोमधून हजारो काळेही आले असून त्यांची वस्ती मुख्यतः न्यूयॉर्क व आजुबाजूच्या शहरांत आहे.

पहिल्या महायुद्धात देशातील जर्मन व इटालियन लोकांनी आपापल्या मायदेशावरील भक्तीचे जे प्रदर्शन केले, त्यामुळे परकीय आप्रवाशांबद्दल राज्यकर्त्यांमध्ये चिंता उत्पन्न झाली आणि आपल्या जीवनाशी एकरूप न होऊ शकणाऱ्‍या लोकांना प्रवेश-बंदी करावी, असे वारे वाहू लागले. त्यामुळे १९२१ मध्ये, निरनिराळ्या देशांतून दर वर्षी आपल्या देशात किती आप्रवासी घ्यायचे याचे वाटप अमेरिकेच्या काँग्रेसने ठरवून टाकले. यात १९२४ मध्ये दुरुस्ती करून ‘सिलेक्टिव्ह इमिग्रेशन ॲक्ट’ संमत झाला व वाटपसंख्या अधिक मर्यादित करण्यात आली. या वाटपात

आशियाई लोकांस स्थानच नव्हते परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर नवस्वतंत्र आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांनी अशी बंदी आपणास अपमानास्पद वाटते असे दर्शविल्याने, त्यांच्याकरिताही प्रवेशवाटप निश्चित करण्यात आले आहे. तथापि आपल्या समाजाशी स्वाभाविकतः एकरूप होऊ शकणाऱ्‍या यूरोपीय देशांना ही सवलत अधिक सुलभ आहे.

दुसऱ्या‍ महायुद्धानंतर युद्धजन्य व राजकीय निर्वासितांकरिता उदार धोरण ठेवल्याने यूरोपीय आप्रवाशांचा अमेरिकेकडे पुन्हा लोंढा सुरू झाला. १९४१-४५ पर्यंत अमेरिकेमध्ये फक्त १,७०,९४२ लोक आले, तर पुढील पाच वर्षांत त्यांची संख्या ८,६४,०८७ वर गेली आणि ३० जून १९५१ ते ३१ डिसेंबर १९५७ मध्ये ती २२,५०,००० झाली. यांत हजारो हंगेरियन होते. याशिवाय १९४८-५२ मध्ये पोलादी पडद्यामागील चार लाख निर्वासितांस अमेरिकेने आसरा दिला.

अमेरिकेमधील आदिवासींना ‘रेड इंडियन’ किंवा ‘इंडियन’ म्हणून ओळखतात. सोळाव्या शतकाच्या आरंभास त्यांची संख्या नऊ लक्षांच्या जवळपास होती, असा अंदाज आहे. परंतु त्यांच्या ताब्यातील प्रदेशाच्या लोभाने त्यांचे अन्नपाणी तोडणे, रानटी जनावराप्रमाणे त्यांची शिकार करणे व त्यांच्यात रोगराई फैलावणे इ. क्रूर उपायांनी अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांची संख्या कमी करण्यात आली. १८९० च्या शिरगणतीत ते फक्त अडीच लाख भरले. यानंतर मात्र राजकर्त्यांचे त्यांच्याविषयीचे धोरण मानवतेस उचित राहिल्याने त्यांची संख्या वाढू लागली व पुन्हा ४ लाखांच्या जवळपास आली. या लोकांकरिता राखीव प्रदेश असून ओक्लाहोमा, ॲरिझोना, न्यू मेक्सिको, उत्तर व दक्षिण डकोटा, माँटॅना, कॅलिफोर्निया, विस्‌कॉन्सिन, मिनेसोटा व अलास्का या राज्यांत त्यांची वस्ती आहे. या प्रदेशांत खनिज संपत्ती सापडल्याने काही जमाती श्रीमंत झाल्या आहेत व हळूहळू भोवतालच्या समाजात मिसळत आहेत.

अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी, १९६० च्या जनगणनेप्रमाणे, निग्रो लोकांची संख्या १,८८,७१,८३१ म्हणजे एकूण लोकसंख्येच्या १०.५ टक्के होती. १९२४-२५ पर्यंत बहुतांश निग्रो अमेरिकेच्या दक्षिण राज्यांतच असत, परंतु झपाट्याने औद्यागिकीकरण झाल्याने उत्तरेस मजुरांची मागणी वाढली व तेथे वर्णद्वेषही तितका तीव्र नसल्याने त्यांचा प्रवाह उत्तरेकडे वाहू लागला. दुसऱ्‍या महायुद्धानंतर याचीच पुनरावृत्ती पॅसिफिक महासागरावरील औद्योगिक राज्यांत झाली. १९०० साली दक्षिण राज्यांबाहेर राहणाऱ्‍या निग्रोंची संख्या दहा लाखांवर नव्हती ती १९५० मध्ये पन्नास लाख किंवा त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ३१.९ टक्के झाली. कोणत्याही राज्यात निग्रोंना बहुमत नाही पण दक्षिण राज्यांतील काही जिल्ह्यांत आहे. या शतकाच्या आरंभापर्यंत केवळ ग्रामीण शेतमजूर म्हणून राहणारा निग्रो, नागरी मोलमजुरी, नोकरी, उद्योग, वाणिज्य, वकिली, वृत्तव्यवसाय, साहित्य, कला इ. क्षेत्रांत पुढे आला आहे. अमेरिकेमधील खास संगीत, ‘जाझ’, हे सर्वस्वी निग्रोनिर्मित आहे. १९०० मध्ये नागरी म्हणता येतील असे निग्रो २२.७ टक्के होते, ते १९४० मध्ये ४८.६ टक्के आणि १९५० मध्ये ६१.२ टक्के झाले. आयझनहौअर, केनेडी व जॉन्सन या राष्ट्राध्यक्षांच्या वर्णभेदविरोधी कार्याने या नागरीकरणास विशेषच चालना मिळून हे प्रमाण आता ७५ टक्क्यांवर आले असावे, असा अंदाज आहे (१९६९).

यूरोपमध्ये ज्यूंच्या छळाची परंपरा प्राचीन आहे. त्या छळास कंटाळून हळूहळू ज्यू निर्वासितही अमेरिकेत येऊ लागले. रशिया, रूमानिया, पोलंड, ऑस्ट्रिया, हंगेरी इ. देशांत हा छळ विशेष होता व १८९० नंतर या देशांतून ज्यूंचा प्रवाह अमेरिकेकडे सुरू झाला. आजही अमेरिकेतील ज्यू लोकांमध्ये वरील देशांतील ज्यू व त्यांचे वंशज बहुसंख्य आहेत. १९५८ मध्ये अमेरिकेत ज्यू लोक ५८ लाख होते, असा अंदाज आहे.

कॅलिफोर्नियात प्रचंड विकासकार्ये सुरू झाल्याने स्वस्त मजुरांची मागणी वाढली व त्याकरिता चिनी मजुरांची आयात १८५१ मध्ये सुरू झाली. याप्रमाणे १९५० पर्यंत चार लाखांपर्यंत चिनी लोकांनी अमेरिकेत प्रवेश केला. यांपैकी बहुतेक कॅलिफोर्नियात, विशेषतः सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये, आले व अमेरिकेत स्थायिक झाले. उद्योग व वाणिज्य-कौशल्य यांमुळे कॅलिफोर्नियातील शेती व व्यापार यांवर त्यांची पकड बसली. गोरे शेतकरी, व्यापारी व कामगार यांनी त्यांच्याविरुद्ध हाकाटी सुरू केली. अखेर या दडपणास बळी पडून चिनी लोकांवर प्रवेशबंदी घालण्यात आली. राहिलेला चिनी समाज आपले गट करून शहरांमध्ये ‘चायना टाउन’ म्हणून उपनगर निर्माण करून राहतो. यातील पन्नास टक्के एकट्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्येच आहेत व त्यांच्या उपनगरात गेल्यास चीनमधील एखाद्या गावातच आलो आहेत असा भास व्हावा, इतके त्याचे स्वरूप चिनी आहे.

चिनी कामकऱ्‍यांना बंदी झाली, परंतु स्वस्त मजुरांची निकड संपली नाही. तेव्हा त्यांच्या जागी जपानी मजुरांची आयात सुरू झाली. अशा जपानी आप्रवाशांची संख्या १९५० पर्यंत दोन लाखांवर झाली होती. यांपैकी पुष्कळांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले असून हेही चिनी लोकांप्रमाणे कॅलिफोर्नियातच स्थायिक झाले आहेत. यांच्यामध्ये आणि चिनी लोकांमध्ये फरक हा, की चिनी समाज हा आपापले रीतिरिवाज राखून अमेरिकन समाजातील अलग घटक म्हणून वाढतो आहे आणि जपानी शक्य तितका अमेरिकन समाजात मिसळून जात आहे. या लोकांच्या वंशजांस अमेरिकेमध्ये ‘निसेई’ असे नावही मिळाले आहे.

ब्रिटिशांच्या तेरा अमेरिकन वसाहतींची लोकसंख्या १६८८ मध्ये दोन लाखांवर नव्हती ती पन्नास वर्षांत साडेअकरा लाखांवर गेली (१७५०). यांनतर अमेरिकेचा प्रदेश व लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. १७९० मध्ये जेमतेम सु. २३,००,००० चौ किमी. असलेला हा प्रदेश सु. ७८,२७,००० चौ. किमी. पर्यंत वाढला आहे. लोकसंख्येची वाढही अशीच ठळक आहे. १७९० ते १८९० या शतकात ती सोळा पटींनी वाढली. असंख्य यूरोपीय निर्वासितांना घेतल्याने नैसर्गिक वाढीत भर पडून ती आता वीस कोटींवर गेली आहे (१९६९).

अमेरिकन समाजात दोन मुख्य प्रवाह आहेत : यूरोपीय व निग्रो. यूरोपीय लोकांचा समाज अद्याप एकजिनसी झालेला नाही तथापि त्यामध्ये बरेचसे मिश्रण झाले आहे. तरीही ज्या ज्या ठिकाणी ते बहुसंख्य असतील त्या त्या ठिकाणी आयरिश, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश इ. लॅटिन, ब्रिटिश, डच, जर्मन इ. ट्यूटॉनिक व पोलिश, चेक, स्लाव्ह इ. लोक आपापले अलग अलग गट करून राहतात. त्यांच्यात्यांच्या भाषेतील अनेक छोटी-छोटी वृत्तपत्रेही प्रसिद्ध होतात. तथापि गोरा समाज हा एकात्म होऊन एकजिनसीही होईल, असा विश्वास बाळगण्यास हरकत नाही.

निग्रो समाज मात्र यापासून वेगळा वाढतो आहे आणि एकात्मतेच्या विरुद्ध अशा नव्या विचारधारेने प्रेरित होऊन अमेरिकेमध्ये नव्या समस्या निर्माण करतो आहे. गुलामगिरी अवैध ठरविल्यानंतरही पाऊणशे वर्षे हा समाज दलितच राहिला. केंद्र-शासनाचे कायदे धाब्यावर बसवून आपल्या अधिकारातील कायद्यांचा दुरुपयोग करून दक्षिण राज्यांतील गोऱ्यांनी निग्रोंच्या स्वातंत्र्यातील अर्थच काढून टाकला. शिक्षण, संपत्ती व दर्जा या दृष्टींनी हा समाज दलितच राहिला. गेल्या दहा वर्षांत अमेरिकन काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांनी वर्णभेदावर कडक उपाय योजले, पण अद्याप तेथील गोऱ्‍यांनी त्यांस प्रतिसाद दिलेला नाही. अमेरिकेच्या संविधानानुसार घटक राज्यांकडे उर्वरित अधिकार ठेवले आहेत, त्याचा फायदा घेऊन निग्रोंना समान हक्क नाकारण्याचा आटोकाट प्रयत्‍न ही राज्ये करीत आहेत आणि यामुळे हवालदिल होऊन निग्रो तरुण आततायी मार्गांचा अवलंब अधिकाधिक करू लागले आहेत. मार्टिन ल्यूथर किंगसारखे शांततावादी निग्रो पुढारीही गोऱ्‍यांच्या द्वेषास बळी पडल्याने ही समस्या तीव्रतर होत आहे. कोणत्याही सामाजिक समस्येप्रमाणे तिची सोडवणूक कष्टप्रद, मंदगती आणि कठीण आहे. दक्षिण राज्यांतील निग्रो अद्याप दयनीय अवस्थेतच आहेत आणि आर्थिक धकाधकीमुळे उत्तर राज्यांतही निग्रो कामगार, कलावंत, व्यापारी वा बुद्धीवादी कमीअधिक वर्णभेदाचे बळी झाले आहेत. यामुळे निग्रोंची नवी पिढी कायदेशीर मार्गांचा त्याग करून अत्याचारी उपायांचा अवलंब करीत आहे. ‘ब्‍लॅक मुस्लिम’, ‘क्रूसेडर्स’ सारखे आत्यंतिक विचारांचे पक्ष उदयास येत आहेत. ख्रिस्ती  धर्ममंदिरांतही हा भेदभाव आढळल्याने निग्रोंमध्ये इस्लाम धर्म पसरत आहे. स्वतंत्र निग्रो राज्य मागण्यापर्यंत या विफलतेचा परिणाम झाला आहे. निग्रो जमातीत बहुसंख्य गोऱ्‍या अमेरिकनांबद्दल विश्वास उत्पन्न करणे व राष्ट्रजीवनाशी त्यांची एकात्मता साधणे ही अमेरिकेची प्रमुख समस्या आहे. ही सुटली नाही, तर अमेरिकेची बलाढ्यता, संपन्नता व जागतिक नेतृत्व यांस तडे जाण्याचा संभव आहे. निग्रो समाजात शिक्षण, संस्कृती व बुद्धिमत्ता या दृष्टीने जगातील कोणत्याही समाजाशी सामना देतील असे नेते निर्माण होत आहेत पण वर्णभेदाच्या विषाने हताश होऊन तेही जहालमार्गी बनत आहेत.

अमेरिकेच्या समाजातील दुसरी समस्या कौटुंबिक जीवनाच्या अस्थिरतेची होय. वाढते घटस्फोट, विवाहपूर्व व विवाहोत्तर लैंगिक स्वातंत्र्याचे वाढते प्रमाण, बालगुन्हेगारीची वाढ, युवकांचा असंतोष ही तिची काही लक्षणे आहेत, असे काही समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. अमेरिकन संमाजाची बांधणी अनियत व प्रवाही आहे. जात, वारसा किंवा घराणे यांवर ती उभारलेली नाही. तेथे व्यक्तिस्वातंत्र्य पराकोटीस गेलेले आहे. ऐहिक वैभव व यांत्रिक सुखसोयी इतर राष्ट्रांपेक्षा फार आहेत. सर्व लोकांना एकत्र बांधून, त्यांची निष्ठा एका साध्यावर केंद्रित करून, त्यांच्या जीवनात काही मूल्यांबद्दल श्रद्धा उत्पन्न करणे व त्यांद्वारा स्थिर समाज निर्माण करणे, याविषयी तेथील विचारवंत व्यग्र आहेत. त्या दृष्टीने निग्रोंचे सामाजिक पुनर्वसन व युवकांचे विचारस्थैर्य या अमेरिकेच्या प्रमुख समस्या समजल्या जातात.

अमेरिकेमध्ये ख्रिस्ती धर्म प्रमुख आहे. इतर धर्मांचे अनुयायी अद्याप तरी अनुल्लेखनीय आहेत. संख्येच्या दृष्टीने ख्रिस्ती लोकांखालोखाल ज्यू भरतील. शासन धर्मनिरपेक्ष आहे तथापि राष्ट्रजीवनावर ख्रिस्ती शिकणुकीचा खोल ठसा आहे. ख्रिस्ती लोकांमध्ये कॅथलिक पंथीयांचा समाज एकसंध आहे. प्रॉटेस्टंट लोकांत अनेक पंथ असून ‘कौन्सिल ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट’ या संस्थेच्या पाहणीप्रमाणे १९५७ मध्ये सर्व देशात २५८ पंथ होते.

उल्लेखनीय असे वरील पंथ सोडून अनेक लहानलहान धर्मपंथ व उपासनामार्ग अमेरिकेमध्ये लोकप्रिय आहेत. रामकृष्ण मिशन, थिऑसॉफिकल सोसायटी यांसारख्या भारतीय तत्त्वज्ञानावर अधिष्ठित संस्था येथे कार्य करीत आहेत. इस्लामच्या मशिदी, बहाई पंथाची प्रार्थनामंदिरे, साधूफकिरांनी उभारलेली उपासनागृहे इ. देशभर विखुरलेली आहेत.

ख्रिस्ती धर्माचे सर्व सण व उत्सव अमेरिकेमध्ये मोठ्या उत्साहाने पाळले जातात. ज्या ४ जुलैला स्वातंत्र्यघोषणा झाली, तो दिवस राष्ट्रीय उत्सवाचा म्हणून आपल्याकडील गुढीपाडवा व दिवाळीप्रमाणे शहरा-शहरांतून रोषणाई, ध्वजारोहण, आतषबाजी व कौटुंबिक भोजनसमारंभ करून पाळला जातो. त्याचप्रमाणे नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी ‘आभारदिन’ पाळला जातो. या खंडात आलेल्या इंग्रजांनी १६२१ साली पहिल्या पिकानंतर देवाचे आभार मानण्याकरिता उत्सव केला. तीच प्रथा पुढे चालू राहिली व आता त्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालेले आहे. या दिवशी पगारी सुटी असते. या उत्सवाचे स्वरूप राष्ट्रव्यापी पण केवळ कौटुंबिक आहे.

अमेरिकन संविधानाच्या १९ व्या दुरुस्तीनंतर १९२० साली अमेरिकन स्त्रीला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आणि एका दीर्घ चळवळीची समाप्ती झाली, यामुळेच नव्हे, तर इतर सामाजिक स्थित्यंतरांमुळेही तिला सर्व क्षेत्रांत पुरुषाच्या बरोबरीचे स्वातंत्र्य लाभले. कौटुंबिक क्षेत्रात नेहमी तिच्या वाट्याला येणारी कामे पुरुषही करू लागला. श्रमविभागणीत स्त्री-पुरुष हा भेद नाहीसा झाला. उद्योगधंद्याची सर्व दालने तिला खुली झाली. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात स्त्रियांच्या मताला अधिकाधिक महत्त्व प्राप्त झाले. स्त्रिया पूर्वीपेक्षा अधिकाधिक घराबाहेर पडून पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत कामे करू लागल्या. हे जरी खरे असले, तरी स्त्रियांच्या वाट्याला आजवर शिक्षण, पगार आणि प्रतिष्ठा यांच्या दृष्टीने दुय्यम कामेच आली आहेत. विवाहित स्त्रीला कौटुंबिक मालमत्तेवर कायद्याने हक्क लाभला असल्यामुळे आणि अमेरिकन समाजात वृद्ध विधुरांपेक्षा वृद्ध विधवाच अधिक असल्यामुळे देशाच्या एकूण संपत्तीच्या दोन-तृतीयांश हिस्सा स्त्रियांच्या मालकीचा आहे. परंतु संपत्ती निर्माण करणाऱ्या संस्थांचे नियंत्रण अगर व्यवस्थापन त्यांच्या हातात. नाही. तात्त्विक दृष्ट्या समान हक्क, संधी आणि स्वातंत्र्य लाभूनही आजवर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपद किंवा राजकीय अन्य उच्च स्थाने स्त्रियांना लाभली नाहीत. व्यवसायाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या हाताखालच्या दुय्यम किंवा कनिष्ठ स्तरांवरच आहेत. आणि व्यवहारतः घरकामातच त्या जखडल्या गेलेल्या आहेत.

साहित्य, संगीत, कला, शास्त्र व राजकारण यांत मात्र अमेरिकेतील स्त्रिया विशेष चमकताना दिसत नाहीत. तरी एमिली डिकिन्सन (१८३०-१८८६) व एडना सेंट व्हिन्सेंट मिले (१८९२-१९५०) या कवयित्री, नोबेल पारितोषिक मिळविणारी पर्ल बक (१८९२-१९७३) ही लेखिका, मॅरियन अँडरसन ही निग्रो गायिका, रोझेटा मार्टिन ल्यूथर किंग ही राजकीय व सामाजिक पुढारी, अशी नावे घेता येतात. काँग्रेसच्या दोन्ही गृहांत स्त्रीसदस्य आहेत आणि राज्यांतही त्या नगरपालिका, शिक्षण-मंडळे, संस्कृती-मंडळे, विधिमंडळे यांवर पुरुषांच्या बरोबरीने कामे करताना आढळतात. नोकरी, व्यापार वगैरेमध्ये लघुलेखन, जनतासंपर्क इत्यादींसाठी व तसेच स्वागतिका म्हणून त्या प्रामुख्याने वावरताना आढळतात.

समाजकल्याण व आरोग्य : सामान्य नागरिकांच्या सुखसोयींकरिता अमेरिकेइतके प्रयत्‍न व खर्च इतरत्र क्वचितच होत असतील. समाजकल्याणाची ही प्रचंड जबाबदारी १९३२ ला रूझवेल्टच्या ‘न्यू डील’ अमदानीपासून सुरू झाली व त्यात सारखी भरच पडत आली आहे. आता प्राप्तिकारी कामांत गुंतलेल्यांपैकी ९० टक्के लोक समाजसुरक्षायोजनेचा फायदा घेत आहेत. खाजगी धंद्यातले डॉक्टर व संघीय कर्मचारी यांच्याकरिता निराळ्या योजना आहेत. वृद्धापकाळ, विकलांगता किंवा उत्तरजीवी वेतन यांकरिता मालक व कर्मचारी यांच्याकडून नियमित वर्गणी घेतली जाते. हा एक प्रकारचा विमाच होय. याशिवाय बेकारी, रुग्णता, अपघात यांकरिता विमायोजना, निवृत्ति-वेतनाची तरतूद, शिक्षणास मदत, रुग्णपरिचर्या इ. नागरिक-जीवनाच्या विविध अडीअडचणींना उपयोगी पडतील अशा अनेक योजना केंद्राने व घटक-राज्यांनी कार्यान्वित केल्या आहेत. वैद्यकीय जपणूक (मेडिकेअर) कायद्याने ६५ वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्‍यांस रुग्णालय व काही विशिष्ट परिचर्या मोफत मिळते याशिवाय बालसंगोपन, शाळकऱ्‍यांस दुपारचे जेवण, गरजूंस शिधावाटप, अपंगांचे पुनर्वसन व शिक्षण, स्वस्त घरे इत्यादींवर करोडो डॉलर खर्च होतात. या सर्व बाबतींत संशोधनाकरिता केंद्रीय शासन दरसाल एक अब्जांवर डॉलर खर्च करते.

दुस‍ऱ्या महायुद्धानंतरच्या काळाच अमेरिकेत ‘लोहितांग’-ज्वर, घटसर्प, गोवर इत्यादींसारख्या बालरोगांनी मरण पावलेल्या बालकांच्या संख्येत विलक्षण घट झाल्याचे आढळते. १९२० साली बालमृत्युमान दर हजारी ८६ होते १९६० नंतर ते दर हजारी २५ झाले. ह्याच कालखंडात पुरुष व स्त्रिया ह्यांचे सरासरी आयुर्मान अनुक्रमे ५३.६ वर्षांवरून ६५ वर्षांवर आणि ५४.६ वर्षांवरून ७० वर्षांवर गेले. १९६७ साली जननमान, विवाहमान आणि मृत्युमान अनुक्रमे दर हजारी १७.८, ९.७, व ९.४ होते. क्षय, उपदंश वगैरेंसारखे भयंकर रोग नवनवीन औषधांच्या योगे यशस्वी रीत्या काबूत आणण्यात आले आहेत. तथापि दीर्घकालिक रोगांच्या बाबतीत मात्र अजुनही म्हणावे तसे यश मिळाल्याचे दिसत नाही. यांबाबत वैद्यकीय संशोधन वेगाने चालू आहे.

बाल-मृत्युमान (१९६७ मध्ये दर हजारी २२.४) आणि सर्वसाधारण मृत्युमान ह्यांमध्ये होत गेलेल्या घटीचे कारण सुधारित आहार आणि सम्यक वैद्यकीय शुश्रूषा व सेवा ह्यांत आढळते. दुसऱ्‍या महायुद्धानंतर लोकांना ऐच्छिक आरोग्य-विम्याचे महत्त्व पटून त्याची जलद वाढ झाली. १९६३ च्या सुमारास, एकूण लोकसंख्येच्या सु. ७७ टक्के लोकांचा रुग्णालय-विमा, ७२ टक्के लोकांचा शल्यचिकित्साविषयक विमा आणि ५४ टक्के लोकांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात आला होता. १९६५ मध्ये ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या लोकांकरिता सक्तीचा आरोग्य-विमा-कार्यक्रम (मेडिकेअर प्रोग्रॅम) कार्यवाहीत आणण्यात आला.

अमेरिकेत १९६८ मध्ये १६,६३,००० खाटा असलेली ७,१३७ रुग्णालये होती, त्या रुग्णालयांपैकी केंद्र-सरकार ४१६, राज्य-सरकारे व स्थानिक स्वराज्य-संस्था २,१९०. चर्चसारख्या संघटना ३,६६० आणि खाजगी मालकीच्या संघटना ८७१ रुग्णालये चालवीत होत्या. कित्येक रुग्णालये कमी पैशात किंवा काही वेळा मोफतही गरिबांकरिता औषधयोजना उपलब्ध करतात.

गृहनिवसन : दुसऱ्‍या महायुद्धानंतरच्या काळात गृहनिवसन-कार्याला मोठा वेग आला. प्रतिवर्षी अंदाजे दहा लाखांवर नवी घरे अमेरिकेत बांधण्यात येतात. हे प्रमाण लोकसंख्यावाढीच्या प्रमाणाहून अधिक आहे. १९६८ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत एकूण घरांची संख्या सहा कोटींवर असून त्यांपैकी दोन-तृतीयांश घरे एक-कुटुंबासाठी असल्याचे दिसते. सध्या ‘अपार्टमेंट हाउस’ हा प्रकार अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. घरांचे सरासरी क्षेत्रफळ १११.४८ चौ.मी. असून ८५ टक्के घरांत प्रत्येकाच्या वाट्याला २७.८७ चौ. मीटरची एकेक खोली येते. १९६० च्या अखेरीस, अमेरिकेतील ६२ टक्के घरे राहणाऱ्‍यांच्या मालकीची असल्याचे आढळून आले. एका कुटुंबाला ऐसपैस राहता येईल, अशा घराची १९६४ मधील किंमत १८,८०० डॉ. होती. एका अमेरिकन कुटुंबाच्या अडीच वर्षांच्या मिळकतीइतकी ही रक्कम आहे. अमेरिकेतील गृहनिवसनात कार्यक्षमता व आरामप्रदता ह्यांच्या दृष्टीने सुधारणा झालेली असली, तरी टिकाऊपणाच्या बाबतीत तेवढी सुधारणा झालेली नाही. सर्वसाधारण अमेरिकन घरात सर्व तऱ्हेच्या सुखसोयी असतात. बहुतेक घरांत मध्यवर्ती उबाऱ्याची व्यवस्था असते. देशाच्या ऊबदार भागांत गृहांचे वातानुकूलन करण्याची पद्धत झपाट्याने अंगीकारली जात आहे. नागरिकांना घरे खरेदी करण्यासाठी तसेच जुन्या घरांचे नूतनीकरण करण्यासाठी सरकार आर्थिक साहाय्य करते त्याचप्रमाणे खाजगी संस्थांकडून अल्पव्याजी व दीर्घमुदती कर्जे मिळवून देण्याबाबत हमी घेते.

केंद्र सरकार व राज्य सरकारे विविध योजनांद्वारा गृहनिवसन आणि गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन करण्याच्या कार्यात भाग घेत असतात. या कार्यास अधिक चालना आणण्याकरिता केंद्रशासनाने १९६५ मध्ये ‘डिपार्टमेंट ऑफ हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट’ ह्या खात्याची स्थापना केली. गृहनिवसनाकरिता १९६८ च्या अर्थसंकल्पात १०२ कोटी डॉलरची तरतूद करण्यात आली होती.

समाजकल्याणाच्या कल्पना व कक्षा यांचा विस्तार झाल्याने त्यावर होणारा खर्च अकटोविकट वाढला आहे. १९६७ च्या आकड्यांनुसार आता तो दरसाल सु. ७८ अब्ज डॉ. आहे. यातील सु. २८ अब्ज शिक्षण, २८ अब्ज सामाजिक विमा, सु. ७ अब्ज आरोग्य व शुश्रूषा आणि ६ अब्जांवर निम्न-मिळकती लोकांस मदत यांत जातांत. उरलेली रक्कम निवृत्त सैनिक, गृहनिर्माण इ. कार्यक्रमांकरिता खर्च केली जाते.

शासकीय कार्यक्रम व योजना यांखेरीज समाजकल्याण-कार्यात श्रम व पैसा देणाऱ्‍या शेकडो खाजगी संस्था या देशात आहेत. अशा मदतीकरिता ३.५० अब्ज डॉलर दरसाल खर्च होतात, असा अंदाज आहे. याशिवाय अमेरिकेत नागरिकांमध्ये वैयक्तिक दानधर्माची मोठी परंपरा आहे. धार्मिक व सामाजिक संस्थांकडे वर्गणीद्वारे २ अब्ज डॉलर जमा होतात. अशा स्वयंस्फूर्त सेवा करणाऱ्‍या संस्था चार लाखांवर आहेत. शिवाय कर्करोग, हृदयविकार, मादक द्रव्यासक्ती इत्यादींचे निवारण व संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. नागरिकांच्या उदार व सेवातत्पर स्वभावाचे प्रतिबिंब या संस्थांमधून दिसते. जन्मापासून, मृत्यूपर्यंत नागरिकांस कोणत्या ना कोणत्या मार्गाने संरक्षण व मदत मिळत असतेच. इतके प्रचंड प्रयत्‍न चालले, तरी अमेरिकेमधून अद्याप दारिद्र्य, बेकारी, व गलिच्छ वस्त्या यांचे समूळ उच्चाटन झालेले नाही.

जीवनमान : जगामध्ये अमेरिकेचे जीवनमान सर्वोच्च असल्याचे आढळते. दुसऱ्‍या महायुद्धपूर्व काळाशी तुलना केल्यास गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, साधने व फर्निचर, मोटार, वैद्यकीय उपचार आणि मनोरंजन या बाबींवर अमेरिकन ग्राहक पूर्वीच्याहीपेक्षा आता अधिक खर्च करतो तर अन्न, वस्त्र, निवारा, इंधन, प्रकाश इत्यादींवर कमी खर्च करतो. १९३५-३९ ह्या काळात, मांस-सेवनाचे दरडोई दरसाल प्रमाण सरासरी ५७.६ किलो होते, तेच १९६५ च्या सुमारास ७२.६ कि. झाले. प्रतिदिनी दरडोई सु. ३,१०० कॅलरीइतके अन्नसेवन करण्यात येते हे प्रमाण आवश्यक कॅलरीपेक्षा एक-पंचमांशाने अधिक आहे. अमेरिकन लोकांमध्ये वजनाधिक्य कमी करण्याच्या दृष्टीने निम्न-कॅलरीयुक्त आहार प्रिय होऊ लागल्याचे आढळते. दुसऱ्‍या महायुद्धानंतर बटाटे व धान्यपदार्थ ह्यांच्या सेवनात घट झाली, तर डबाबंद पदार्थ व फळे तसेच प्रशीतित फळे व भाजीपाला ह्यांच्या सेवनात विशेषेकरून वाढ झाली. शहरात राहणारा कामगार आठवड्यास दोन किलो मांस, सात अंडी, साडेचार किलो भाजी व फळे, चार लिटर दूध, अर्धा किलो साखर आणि १.२ किलो अन्य प्रकारचे अन्न सेवन करीत असतो. मिळकतीचा एक-चतुर्थांश भाग तो खाद्यपदार्थांवर खर्च करतो (३३ टक्के मांस व मासे, २० टक्के भाज्या व फळे, १७ टक्के दूध व दुधपदार्थ आणि ३० टक्के इतर पदार्थ).

वाढत्या नागरीकरणामुळे अमेरिकन जीवनमानावर फार मोठा परिणाम झालेला दिसतो. देशातील एकूण कुटुंबांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक कुटुंबे किमान एक मोटार बाळगतात. महानगरांमधील मोठ्या दुकानांच्या स्पर्धेला तोंड देता यावे म्हणून दूरदूरच्या उपनगरांतही तशीच मोठी दुकाने उघडण्यात आलेली आहेत. गृहकार्य जसजसे यांत्रिकसाधनावलंबी होऊ लागले तसतसे घरगड्यांचे महत्त्वही ओसरू लागले. डबाबंद अन्नाच्या विपुल उपलब्धतेमुळे स्वयंपाकासाठी अमेरिकन स्त्रियांचा फार वेळ खर्च होत नाही. जवळजवळ सर्व कुटुंबांत यांत्रिक प्रशीतक असतो सु. ७५ टक्के कुटुंबांत निर्वात स्वच्छक आणि स्वयंचलित किंवा अर्ध-स्वयंचलित धुलाई-यंत्रे आहेत. सु. २० टक्के कुटुंबांत गोठण-यंत्र प्रत्येक दहा घरांपैकी एका घरात यांत्रिक बशा धुण्याचे उपकरण आणि प्रत्येक दहांपैकी नऊ घरांमध्ये दूरचित्रवाणी असते. कामाचे तास कमी झाल्यामुळे प्रत्येकास फुरसतीचा वेळ पुष्कळ मिळतो हा वेळ अमेरिकन माणूस क्रीडा, वाचन, नृत्य, गायन आणि चित्रपट ह्या मनोरंजनात्मक गोष्टींसाठी व्यतीत करतो.

भाषा– साहित्य : अमेरिकेतील बहुतांश लोक इंग्रजी भाषा बोलतात. इंग्‍लंडमध्ये बोलली  जाणारी इंग्रजी आणि अमेरिकेत बोलली जाणारी इंग्रजी यांत भाषिक दृष्ट्या थोडेफार फरक असल्याकारणाने ‘अमेरिकन इंग्‍लिश’ ही वेगळी भाषा मानली जावी असा विचार तेथे अलीकडे मूळ धरू लागला आहे. हा वेगळेपणा ‘अमेरिकॅनिझम’ ह्या संज्ञेने ओळखला जातो. प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार अमेरिकन इंग्रजी भाषेचे सर्वसाधारणपणे तीन विभाग केले जातात : उत्तरेकडील, दक्षिणेकडील आणि मध्यभागातील इंग्रजी भाषा हे ते तीन विभाग होत [→ इंग्रजी भाषा]. अमेरिकन इंग्रजी भाषा समृद्ध असून तिला सु. साडेतीनशे वर्षांची साहित्यिक परंपरा आहे. ‘अमेरिकन साहित्य’ म्हणून ओळखले जाणारे साहित्य अमेरिकन इंग्रजी भाषेत लिहिलेले असून ते विविध प्रकारचे, विपुल व दर्जेदार आहे. जागतिक कीर्तीचे अनेक साहित्यक अमेरिकन साहित्यात झालेले आहेत [→ अमेरिकन साहित्य].

अमेरिकन इंडियन हे अमेरिकेतील आदिवासी आपापल्या मूळ बोली बोलतात. अर्थांत ह्या आदिवासींच्या बोलींना थोडे अपवाद सोडल्यास लिपिपरंपरा नाही व त्यांत लेखनबद्ध केलेले साहित्यही नाही. तथापि परंपरेने चालत आलेले लोकसाहित्य मात्र त्यांत आहे. त्यांच्या बोलीभाषा ‘अमेरिकन इंडियन भाषा’ म्हणून ओळखल्या जातात. ह्या बोलीभाषांची अनेक भाषाकुले असून त्यांचा अलीकडे भाषाशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास व वर्गीकरण होत आहे [→ अमेरिकन इंडियन भाषासमूह].

शहाणे, मो. ज्ञा.

शिक्षण-पद्धती : यूरोपातील लोकांनी अमेरिकेत केलेल्या वसाहतीत शिक्षणकार्यास सु. ३०० वर्षांपूर्वी खाजगी संस्थांनी सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत तेथील शिक्षणपद्धतीची उत्क्रांती होत आली आहे. शिक्षणाची जबाबदारी हळूहळू तेथील ५१ स्वायत्त राज्यांनी उचलली. केंद्रीय सरकारनेही काही वाटा उचलला. खाजगी संस्थांचे कार्य चालूच राहिले. शिक्षणाच्या प्रशासनात घटक राज्यांना पूर्ण स्वायत्तता असली, तरी आजची शिक्षणपद्धती ही घटक राज्ये, केंद्रीय सरकार व खाजगी संस्था यांच्या सहकार्यावर आधारलेली आहे. १९६७ साली प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांपैकी ११ टक्के विद्यार्थी खाजगी संस्थांतून शिक्षण घेत होते.

अमेरिकन लोकांनी आपल्या समाजरचनेस व तत्त्वज्ञानास अनुसरून जुन्या यूरोपातील शिक्षणपद्धतीत क्रांतिकारक फरक केले. आजच्या अमेरिकन पद्धतीचे विशेष असे आहेत : श्रीमंत व गरीब यांना एकच प्रकारचे शिक्षण मिळते. शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी व्यक्तिशः पालकावर पडत नाही, ती सरकारवर पडते म्हणून शिक्षणाची संधी सर्वांना मिळते. शिक्षणात सांस्कृतिक शिक्षणावर एकांगी भर दिला जात नाही राष्ट्रसंवर्धनास उपयोगी पडणाऱ्‍या सर्व विद्यांच्या व उद्योगांच्या शिक्षणाची तरतूद होते. शिक्षणात धर्माला प्राधान्य नसते शिक्षण धर्मनिरपेक्ष असते.

अमेरिकन बालकांच्या संस्थांतर्गत शिक्षणाला सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होते. त्या वेळी तो शिशुविद्यालयात प्रवेश करतो. काही मुले चौथ्या वर्षी  बालोद्यान-शाळेत जाऊ लागतात. अशा बालोद्यान-शाळा सर्व प्राथमिक शाळांना जोडलेल्या असतात. पूर्वप्राथमिक शिक्षण सक्तीचे नसले, तरी ते अधिकाधिक मुलांना उपलब्ध व्हावे असे प्रयत्‍न खाजगी संस्था करीत आहेत. १९६७ या साली पूर्वप्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या २,६४,४६१ होती.

प्राथमिक शिक्षणाला सुरुवात सहाव्या वर्षी होते. तेव्हापासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा एकूण कालावधी बारा वर्षांचा असतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची कालमर्यादा मात्र सर्वत्र सारखी नाही. काही राज्यांत ८ वर्षे प्राथमिक शिक्षण व ४ वर्षे माध्यमिक शिक्षण अशी व्यवस्था आहे काही राज्यांत ६ वर्षे प्राथमिक शिक्षण व ६ वर्ष माध्यमिक शिक्षण अशी आहे आणखी काही राज्यांत ६ वर्षे प्राथमिक शिक्षण, ३ वर्षे कनिष्ठ माध्यमिक शिक्षण व ३ वर्षे वरिष्ठ माध्यमिक शिक्षण अशी आहे.

प्राथमिक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट जबाबदार नागरिक तयार करणे हे आहे. वाचन, लेखन, भाषण, श्रवण व गणन ही कौशल्ये शिकवितात. तसेच प्रत्येक नागरिकास आवश्यक असणाऱ्या सवयी, मूल्ये, वृत्ती निर्माण करण्यावर व त्यास लागणारे ज्ञान देण्यावर भर देतात. माध्यमिक शिक्षण सर्वंकष असते. त्यात बौद्धिक शिक्षण, धंदेशिक्षण व तांत्रिक शिक्षण यांचा समावेश होतो. ग्रामीण भागात तिन्ही प्रकारचे शिक्षण एकाच प्रशाळेत देतात. शहरात प्रत्येक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी भिन्न प्रशाळा असतात. तथापि धंदेशिक्षण वा तांत्रिक शिक्षण देणाऱ्‍या प्रशाळांतही सामान्य बौद्धिक विषय शिकवितात. अमेरिकेतील माध्यमिक शाळांत कुमारवयातील बालकांना त्यांच्या विविध शक्तींना व कलांना वाव देऊन जीवनोपयोगी शिक्षण देण्यात येते. १९७०-७१ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांतून शिक्षण घेणाऱ्‍या विद्यार्थ्यांची संख्या ५,१२,८१,००० होती.

सु. बारा वर्षे शालेय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे व आवडीप्रमाणे उच्च शिक्षण देणाऱ्‍या अनेक प्रकारच्या संस्था अमेरिकेत आहेत. ज्युनिअर कॉलेजांत दोन वर्षांचा उदार शिक्षणाचा (लिबरल एज्युकेशन) अभ्यासक्रम असून जोडीला अनेक व्यवसायांच्या शिक्षणाची तरतूद असते. ज्या धंद्यांत कलांचे अगर विज्ञानाचे थोडेबहुत शिक्षण लागते, अशा धंद्यांचे शिक्षण देण्याचे काम तांत्रिक शिक्षणसंस्था करतात. यांचे अभ्यासक्रम १ ते ३ वर्षांचे असतात. यांत विशेषतः अभियांत्रिकी विद्येशी निगडित असणाऱ्‍या व्यवसायांचे शिक्षण मिळते. पण काही संस्थांत व्यापार, गृहशास्त्र, आरोग्यविषयक कामे, शेतकी, वनशास्त्र, व्यवहारोपयोगी कला व चित्रकला यांचेही शिक्षण मिळते. ज्युनिअर कॉलेज व तांत्रिक शिक्षणसंस्था यांतून उत्तीर्ण होणाऱ्‍या विद्यार्थ्यांना पूर्ण पदवी मिळत नाही फक्त ‘असोशिएट डिग्री’ मिळते.

पदवी दर्जाचे शिक्षण देणाऱ्‍या संस्थाही अनेक आहेत. केंद्रीय सरकारने जमिनीची अनुदाने दिल्यामुळे काढलेल्या संस्थांना ‘लँड ग्रँट कॉलेजेस’ अशी संज्ञा देतात. या संस्थांत शेतकी, यांत्रिक कला व युद्धतंत्र या विषयांच्या शिक्षणाची सोय असते. विज्ञान व अभियांत्रिकी या विषयांच्या अध्यापनाचे काम औद्योगिक कला-विज्ञान संस्था करतात. पदवीपर्यंतचा चार वर्षांचा उदार अभ्यासक्रम शिकविण्याचे काम अनेक महाविद्यालये करतात. हाच अभ्यासक्रम शिकविण्याचे काम विद्यापीठांतही चालते. पण विद्यापीठांत उदार शिक्षणाशिवाय शास्त्र, वैद्यक, अभियांत्रिकी वगैरे अनेक शाखांतील पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षणाची सोय असते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्या प्रशिक्षणासाठी अनेक अध्यापक-महाविद्यालये असून त्यांचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारांना पदवी मिळते.

उच्च शिक्षणाच्या संस्थांत साधारणपणे तरुणतरुणींना एकत्र शिक्षण देतात. पण २३० संस्थांमध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश मिळतो. २५० संस्थांमध्ये फक्त स्त्रियांनाच प्रवेश मिळतो. १९७०-७१ साली अमेरिकेत उच्च शिक्षण देणाऱ्‍या संस्थाची संख्या २,६०५ असून त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या ८१,०८,००० होती.

शिक्षण ही आजन्म चालू राहणारी गोष्ट आहे. ही कल्पना अमेरिकेतील शिक्षणविषयक तत्त्वप्रणालीचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून प्रौढांच्या शिक्षणाची तरतूद फार मोठ्या प्रमाणावर केलेली आढळते. या कार्यात माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अनेक खाजगी संघटना आणि व्यापारी व औद्योगिक संस्था भाग घेतात. कृषिविषयक ज्ञान देणे, तांत्रिक कसब वाढवून व्यावसायिक प्रगती करविणे, करमणूक व कला यांतील कौशल्य वाढविणे, बौद्धिक विकास घडविणे, गृहजीवन व नागरिक जीवन यांना उपयोगी पडणारे शिक्षण देणे इ. अनेक प्रकारचे अभ्यासक्रम प्रौढ शिक्षणात चालतात. ३० ते ४५ वयोमर्यादेत येणारे जवळजवळ एक कोटी लोक (१९५९-६० साली) हे शिक्षण हौसेने घेत होते व ते मिळविण्यासाठी यत्‍नशील होते. अमेरिकेतील प्रौढ शिक्षणाचा फैलाव म्हणजे तेथील जनतेच्या मनात दृढमूल झालेल्या ज्ञानलालसेचा पुरावाच होय.

अमेरिकेच्या शिक्षणयोजनेत संशोधनाला विशेष महत्त्व दिले जाते. शैक्षणिक कारभाराची माहिती मिळविणे, निरनिराळ्या ठिकाणाच्या शैक्षणिक परिस्थितीचे निरीक्षण करणे, मौलिक स्वरूपाचे व व्यवहारोपयोगी प्रयोग योजणे व पार पाडणे, जनतेला शिक्षणकार्याचे स्वरूप व महत्त्व पटविणे इ. कार्यक्रमांचा संशोधनात समावेश होतो. हे कार्य केंद्रीय सरकारच्या शिक्षणकचेरीमार्फत व राज्यसरकारांच्या शिक्षणखात्यांमार्फत चालते. अनेक महाविद्यालये व विद्यापीठे या कार्यात सहभागी होतात. ‘दि नॅशनल एज्युकेशन असोशिएशन’ व ‘द अमेरिकन एज्युकेशनल रिसर्च असोशिएशन’ यांसारखी व्यावसायिक मंडळेही संशोधनक्षेत्रांत भरीव काम करतात. संशोधनाबाबत विशेष उल्लेखनीय कामगिरी ‘रॉकफेलर फाउंडेशन’, ‘कार्नेगी फाउंडेशन’, ‘रसेल सेज फाउंडेशन’ यांसारख्या खाजगी विश्वस्तनिधींनी पार पाडलेली आहे. विसाव्या शतकात शैक्षणिक संशोधनकार्यावर कित्येक कोटी डॉलर या विश्वस्तनिधींकडून खर्ची पडले आहेत. सधन उद्योगतींचे साहाय्य हे अमेरिकन शिक्षणयोजनेच्या प्रयोगशील प्रगतीचे एक प्रमुख कारण होय.

प्रयोगशीलता आणि वैपुल्य या दोन शब्दांत आजच्या अमेरिकन शिक्षणाचे वर्णन करता येईल. कोणत्याही एका पिढीत ते साचेबंद राहिले नसून त्यात सतत नवीन उपक्रम होत आहेत. समाजातील अधिकाधिक लोकांना अधिकाधिक उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण शक्य तितक्या अधिक वर्षे द्यावे ही समाजनेत्यांची महत्त्वाकांक्षा आहे. १९५९ साली ६ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांपैकी शेकडा ९६ टक्के मुले शालेय शिक्षण घेत होती. शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी शेकडा ८० हून जास्त विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते आणि प्रौढ शिक्षण घेणाऱ्‍या २० वर्षे वयावरील प्रौढांची संख्या जवळजवळ तीस कोटी होती. अमेरिकन शिक्षणाचा उच्च दर्जा व त्याचा अवाढव्य विस्तार याचे प्रमुख कारण आर्थिक सामर्थ्य हे आहे. शिक्षण प्रगमनशील व कसदार राहावे म्हणून लागेल तितका पैसा खर्च करण्याची या देशाची तयारी आहे. १९५८-५९ साली शिक्षणावर एकूण झालेला खर्च २२ महापद्म डॉलर इतका होता.

खैर, ग. श्री.

कला व क्रीडा :चित्रकला : अमेरिकन चित्रकलेची सुरुवात प्रतिमाचित्रणाने झाली. सतराव्या शतकातील प्रतिमाचित्रण अनुकरणात्मक होते व ते अनुकरण चित्रकाराची यूरोपीय पार्श्वभूमी व आश्रयदात्याची अभिरूची यांवर अवलंबून होते. अठराव्या शतकाच्या पूर्वाधात काही बाहेरचे चित्रकार अमेरिकेत आले. त्यांत इंग्‍लंडमधील जॉन स्मायबर्ट (१६८८-१७५१), पीटर पेलम व जोझेफ ब्‍लॅकबर्न, स्वीडनमधील गस्टाव्हस हेसीलिअस (१६८२-१७५५), हॉलंडमधील जॉन व्हँडर्लिन (१७७६-१८५२) यांचा समावेश होतो. यूरोपीय शैलीतील सांकेतिक प्रतिमाचित्रण जोझेफ बॅजर, रॉबर्ट फीक (१७०५ ? – ५० ?), राल्फ अर्ल (१७५१-१८०१) व जॉन ट्रंबल (१७५६-१८४३) यांच्या चित्रांत दिसते. भडक, राकट पण अधिक जोमदार चित्रण चार्ल्स पील (१७४१-१८२७) याच्या प्रतिमाचित्रांत आढळते. जॉन कॉपली (१७३७-१८१५) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ चित्रकार होय. बेंजामिन वेस्ट (१७३८-१८२०) या चित्रकाराचा लंडनमधील स्टुडिओ म्हणजे अमेरिकन चित्रकारांची एक प्रमुख शिक्षणसंस्थाच होती. प्रतिमाचित्रणातील एक नवा दर्जा व टप्पा गिल्बर्ट स्ट्यूअर्टच्या (१७५५-१८२८) चित्रांत दिसतो. ऐतिहासिक चित्रणाला अमेरिकेत फारशी मागणी नव्हती. त्यामुळे केवळ प्रतिमाचित्रण करणाऱ्‍या चित्रकारांची एक मोठी परंपरा निर्माण झाली. मॅथर ब्राउन, हेन्‍री बेनब्रिज (१७४४-१८१२), एडवर्ड सॅव्हिज (१७६१-१८१७), टॉमस सली (१७८३-१८७२), चेस्टर हार्डिंग (१७९२-१८६६) व जॉन नीगल (१७९६-१८६५) हे चित्रकार वरील परंपरेतील होत. कॉपली किंवा गिल्बर्ट स्ट्यूअर्ट यांची गुणवत्ता या चित्रकारांच्या चित्राकृतींत नसली, तरी त्या चित्राकृती लक्षवेधक होत्या.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन चित्रकार भूभागचित्रणाकडे वळले. हेन्‍री इनमन, विल्यम माउंट (१८०७-६८), ईस्टमन जॉन्सन (१८२४-१९०६) व जॉर्ज बिंगॅम (१८११-७९) हे आरंभीचे भूभाग-चित्रकार होत. जॉन ऑडुबॉन (सु. १७८५-१८५१) हा अमेरिकेतील पक्ष्यांचे चित्रण करणारा प्रसिद्ध चित्रकार होय, एकोणिसाव्या शतकात ‘हडसन रिव्हर स्कूल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या संप्रदायातील चित्रकारांनी स्वच्छंदतावादी भूभागचित्रणाचा विकास घडवून आणला. टॉमस डाउटी (१७९३-१८५६), टॉमस कोल (१८०१-४८) हे चित्रकार या संप्रदायाचे प्रवर्तक होते. त्यांखेरीज ॲशर ड्यूरँड (१७९६-१८८६), जॉन केन्सेट (१८१६-७२) व फ्रेडरिक चर्च या इतर चित्रकारांनी विशाल भूभागदृश्यांना खऱ्‍याखुऱ्‍या नैसर्गिक स्फूर्तीने चित्रांकित केले.

अमेरिकेतील यादवी युद्धानंतरच्या काळात चित्रकलेला अधिक अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली. तोपर्यंत उपेक्षित राहिलेला ऐतिहासिक चित्रणाचा व भित्तिचित्राचा विभाग लॉयत्से (१८१६-६८) या चित्रकाराने समृद्ध केला. त्याच्या चित्रांत व ॲल्बर्ट बीअरस्टॅट (१८३०-१९०२) याच्या विशाल दृश्यचित्रणात तत्कालीन लोकाभिरुचीचे दर्शन घडते. सूचक चित्रणाची नाजूक कला या काळातील व्हिसलरच्या (१८३४-१९०३) तैलचित्रांत आढळते. सखोल अर्थपूर्णतेची साक्षात्कारी कलादृष्टी रायडरच्या (१८४७-१९१७) चित्रांत दिसते. टॉमस एकिन्झ (१८४४-१९१६) याने दैनंदिन जीवन विलक्षण प्रामाणिकपणे चित्रित केले. विन्स्लो होमरच्या (१८३६-१९१०) भूभागचित्रणात चैतन्याचा व वास्तवतेचा प्रत्यय येतो. अमेरिकन चित्रकलेस व्यक्तिविशिष्ट विविधता व संपन्नता यांचा लाभ वरील सर्व चित्रकारांनी करून दिला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच जॉर्ज इनिस (१८२५-९४) व विल्यम हंट (१८२४-७९) यांनी अमेरिकन स्वच्छंदतावादी भूभागचित्रणात फ्रान्समधील ‘बार्बिझाँ’ संप्रदायाचा प्रवाह आणून सोडला आणि ग्रामजीवन व कृषिजीवन यांच्या रूक्ष पण तपाशीलपूर्वक चित्रणास व त्यातून साधलेल्या भावस्थितिदर्शनास महत्त्व दिले. या सुमारास अमेरिकन चित्रकलेवरील फ्रेंच प्रभाव वाढू लागल्याचे दिसून येते. पॅरिसला कलाध्ययन केलेल्या जॉन ला फार्ज (१८३५-१९१०) याच्या धार्मिक स्वरूपाच्या भित्तिचित्रांनी व काचचित्रणाने (‘स्टेन्ड ग्लास’) अमेरिकन चित्रकलेचे क्षेत्र विस्तारण्यास मदत झाली. मेरी कसॅट (१८४५-१९२६), जॉन ट्‌वाक्टमन (१८५३-१९०२), चाइल्ड हॅसम (१८५९-१९३५) व अर्न्स्ट लॉसन (१८७३-१९३९) हे चित्रकार फ्रेंच द्दक्प्रत्ययवादाच्या प्रभावाखाली होते. जॉन सार्जेंट (१८५६-१९२५ ) हा उच्चवर्गीयांचा प्रतिमाचित्रकार होता. मॉरिस प्रेंडरगास्ट (१८५९-१९२४) याने रेखाटलेल्या पालटत्या भूभागद्दश्यांच्या प्रतिमा अपूर्व व ठळक रंगवैचित्र्याने नटलेल्या आढळतात.

विसाव्या शतकात अमेरिकन चित्रकलेचा विकास वेगाने झाला. वस्तुसंग्रहालये, कलावीथी, कलाप्रदर्शने, खाजगी कलावस्तुसंग्रह यांची वाढ चित्रकलेच्या शीघ्र विकासास उपकारक ठरली. सुनिदर्शनाचे नवे क्षेत्र चित्रकलेस प्राप्त झाले. यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमुळे येणारा काटेकोर द्दष्टिकोन व छायाचित्रणाची हुबेहूब प्रतिबिंबात्मकता यांचा चित्रकलेवर मोठाच परिणाम झाला. पृथगात्मतेच्या शोधात असलेल्या अमेरिकन चित्रकलेवर नव्या यूरोपीय कलासंप्रदायांचा ठसा उमटणे स्वाभाविक होते. अशा वातावरणातच ‘द एट’ (१९०७) नावाच्या संघाचा उदय झाला. त्यात मॉरिस प्रेंडरगास्ट, आर्थर डेव्हिस (१८६२-१९२८), रॉबर्ट हेन्‍री (१८६५-१९२६), जॉर्ज लक्स (१८६७-१९३३) विल्यम ग्लॅकेन्झ (१८७०-१९३८), जॉन स्लोन (१८७१-१९५१), अर्न्स्ट लॉसन व एव्हरेट शिन (१८७६-१९५३) हे आठ अमेरिकन चित्रकार सहभागी होते. या संघाने पुरस्कृत केलेले व ‘ॲसोसिएशन ऑफ अमेरिकन पेंटर्स अँड स्कल्प्टर्स’ या संस्थेने नियोजित केलेले ‘आर्मरी शो’ (फेब्रु. १९१३) हे न्यूयॉर्कचे चित्रकला-प्रदर्शन अमेरिकन चित्रकलेच्या इतिहासात क्रांतिकारक मानले जाते. यूरोपातील नव-अभिजाततावादी, स्वच्छंदतावादी, घनवादी, अप्रतिरूपवादी व अभिव्यक्तिवादी कलाविशेष असलेली हजाराहून अधिक चित्रे या प्रदर्शनात मांडलेली होती.

‘आर्मरी शो’च्या प्रभावाने अमेरिकन चित्रकलेत अप्रतिरूपतावादी चित्रणास सुरुवात झाली. जोझेफ स्टेला (१८८०-१९४६), चार्ल्स डेमूथ (१८८३-१९३५), स्ट्यूअर्ट डेव्हिस (१८९४-१९६४) यांच्या चित्रांत अप्रतिरूप चित्रण आढळते. तत्कालीन लोकप्रिय असे वास्तवचित्रण जॉर्ज बेलोझ (१८८२-१९२५) व रॉकवेल केंट (१८८२- ) या चित्रकारांच्या चित्रांत दिसते. एडवर्ड हॉपर (१८८२-१९६७) व चार्ल्स बर्चफील्ड (१८९३-१९६७) यांनी व्यक्तिगत जाणिवेच्या तीव्रतेची व भेदकतेची जोड वास्तवचित्रणास दिली. जॉन मारिन (१८७०-१९५३) याच्या जलरंगांतील चित्रणात निसर्गाचा विस्तृत परिसर ठळकपणे व्यापलेला दिसतो. वास्तवता आणि काटेकोर संयोजन हे विशेष चार्ल्स शीलर (१८८३-१९६५), जॉर्जिया ओकीफ (१८८७- ) व पीटर ब्‍लूम (१९०६- ) यांच्या चित्राकृतींत आढळतात. अमेरिकन चित्रकलेत सामाजिक जाणिवांची अभिव्यक्ती करणारा प्रवाह बेन शाहन, फिलिप एव्हरगुड (१९०१- ), जेकब लॉरेन्स (१९१७- ), मोझेस सॉयर (१९१८- ) व रॅफेएल सॉयर (१८९९- ) या चित्रकारांनी निर्माण केला. ग्रँडमा मोझेसची (१८६०-१९६१) बालपणातील ग्रामजीवनाच्या अनुभवांवर आधारलेली प्राकृतिक चित्रे प्रसिद्ध आहेत.

१९३० नंतरच्या आर्थिक मंदीच्या कालखंडात सरकारी योजनांद्वारा अमेरिकन कला व कलावंत यांस साहाय्य करणाऱ्‍या दोन प्रमुख सरकारी खात्यांत ‘डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरीज सेक्शन ऑफ फाइन आर्ट्‌स’ व ‘फेडरल आर्ट प्रोजेक्ट ऑफ द वर्क्स प्रोग्रेस ॲडमिनिस्ट्रेशन’ यांचा समावेश होतो.

१९४० नंतरच्या दशकात अमेरिकेत अप्रतिरूप-अभिव्यक्तिवादाचा [→ अभिव्यक्तिवाद (अप्रतिरूप-अभिव्यक्तिवाद)] संप्रदाय प्रभावी ठरला. जागतिक चित्रकलाविश्वात खास अमेरिकन चित्रकलासंप्रदाय म्हणून तो विशेष प्रसिद्ध आहे. ‘न्यूयॉर्क स्कूल’ किंवा ‘ॲक्शन पेंटिंग’ अशाही नावांनी तो संप्रदाय ओळखला जातो. अर्शील गॉर्की (१९०४—४८), ]जॅक्सन पॉलक (१९१२—५६), व्हिलेम दे कूनिंग (१९०४— ), हान्स होफमान, रॉबर्ट मदरवेल, फिलिप गुस्ताँ, फ्रॅन्झ क्लाइन १९१०—६२) इ. चित्रकार अप्रतिरूप अभिव्यक्तिवादी संप्रदायातील आहेत. निसर्गरूपांचा अव्हेर, अंतःप्रेरित संयोजन, आंतरघटकांतील अनपेक्षित बदल व पृष्ठघटकाला दिलेले महत्त्व यांसारखे विशेष उपर्युक्त चित्रकारांच्या चित्रांत आढळतात.

विद्यमान अमेरिकन चित्रकलेतील काही प्रवृत्ती उल्लेखनीय आहेत. त्यांत घनवादी संयोजनाची प्रवृत्ती जशी ठळकपणे जाणवते, तशीच सर्वांगीण सामाजिक आशयचित्रणाकडे कललेली प्रवृत्तीही अंतर्भूत होते. ही प्रवृत्ती पुष्कळदा सामाजिक प्रचारावर भर देतानाही आढळते. वस्तुस्थितीवर भर देणारा खास अमेरिकन असा दृष्टिकोन, तंत्रविषयक समतोलपणा, आकृतिबंधाची तीव्र जाणीव, कधीकधी उपरोधिक होणारी विनोददृष्टी, आणि व्यक्तिगत पृथगात्मतेची जपणूक इ. प्रवृत्तिविशेष कमीअधिक प्रमाणात सर्वच विद्यमान अमेरिकन चित्रकारांच्या चित्रांत प्रकट झालेले दिसतात.

अमेरिकेत जवळजवळ प्रत्येक शहरात कलावीथी वा कलासंग्रहालये आहेत. देशात सु. २,५०० कलावीथी आहेत. प्रख्यात संग्रहालयात‘नॅशनल गॅलरी’(वॉशिंग्टन डी. सी.), देशातील सर्वांत मोठे ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम’, ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’,व ‘गुगेनहाइम म्युझियम’ (न्यूयॉर्क), आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ व म्युझियम ऑफ फाइन आर्ट्‌स’ (बॉस्टन) यांचा उल्लेख करता येईल. कलेच्या विकासासाठी साहाय्य करणाऱ्या संघटनांमध्ये ‘नॅशनल फाऊंडेशन ऑन द आर्ट्‌स अँड द ह्यूमॅनिटीज्’ (वॉशिंग्टन डी. सी.), ‘नॅशनल एन्डाउमेंट फॉर द आर्ट्‌स’, ‘नॅशनल कौन्सिल ऑन द आर्ट्‌स’, ‘फेडरल  कौन्सिल ऑन द आर्ट्‌स अँड द ह्यूमॅनिटीज्’ या संस्था प्रख्यात आहेत. निरनिराळ्या कलांचे शिक्षण देणारी सु. ५०० कलाविद्यालये आहेत.

मूर्तिकला : अमेरिकन मूर्तिकलेतील मूळची देशी परंपरा कोरीव काष्ठकाम व थडग्यावरील शिल्पकाम यांपुरतीच मर्यादित होती. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत अमेरिकन मूर्तिकला संक्रमणावस्थेतून जात असल्याचे दिसते. या कलेसंबंधीच्या शिक्षणसंस्था व वितरणसंस्था उपलब्ध नव्हत्या. फ्रान्समधून ग्रीक व रोमन शिल्पाकृतींच्या ओतीव प्रतिकृती आयात केल्या जात. जॉर्ज वॉशिंग्टनसारख्या नेत्यांचे अर्धपुतळे बनविण्यासाठी व वास्तुशिल्पासाठी इटालियन व फ्रेंच शिल्पकार अमेरिकेत बोलावण्यात येत. एकोणिसाव्या शतकात अनेक अमेरिकन शिल्पकार अभ्यासार्थ फ्रान्स व इटली या देशांत जाऊ लागले. त्यामुळे तत्कालीन अमेरिकन मूर्तिकलेवर फ्रेंच व इटालियन कलाविशेषांचा ठसा उमटला. १८२४ नंतर होरेशिओ ग्रीनो (१८०५-१८५२), हाइरम पॉवर्स (१८०५-७३), टॉमस क्रॉफर्ड (१८१३-५७) व विल्यम स्टोरी (१८१९-९५) यांसारख्या शिल्पकारांचा उदय झाला. त्यांच्या शिल्पाकृतींत नवअभिजाततावादी अनुकरणाबरोबरच भावनाप्रधान वास्तववादी प्रवृत्तीही दिसून येते. आश्रयदात्यांच्या अभिरुचीप्रमाणे अमेरिकन शिल्पकलेत प्रतिमाशिल्पाला महत्त्व होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात संगमरवराबरोबरच ब्राँझ व प्लॅस्टर ऑफ पॅरिस यांचाही उपयोग करण्यात येऊ लागला. अमेरिकन वास्तुकारांचे फार मोठे नियंत्रण अमेरिकन शिल्पकारांवर होते. जुन्यानव्याचा वादही शिल्पकलेत निर्माण झाला होता. ऑगस्टस सेंट गॉडेन्झ (१८४८-१९०७), डॅन्येल फ्रेंच (१८५०-१९३१), फ्रेडरिक मॅक्मॉनिझ (१८६३-१९३७) व पॉल बार्टलेट (१८६५-१९२५) हे जुन्याचे पुरस्कर्ते असून जेम्स फ्रेझर (१८७६-१९५३) व पॉल मॅन्‌शिप (१८८५-१९६६) हे फ्रेंच प्रभावाखालील नव्याचे पुरस्कर्ते होते.

‘नॅशनल ॲसोसिएशन ऑफ विमेन पेंटर्स अँड स्कल्प्टर्स’ (१८९०), ‘नॅशनल स्कल्प्चर सोसायटी’ (१८९३), रोम येथील ‘अमेरिकन ॲकॅडमी’ (१८९४) या संस्थांनी प्रदर्शनादी योजनांच्या आधारे अमेरिकन शिल्पकलेच्या प्रगतीस हातभार लावला. न्यूयॉर्क येथील ‘पिकिरिली स्टुडिओ’ हा शिल्पाकृतींच्या निर्मितीचे मोठे केंद्र होय.

विसाव्या शतकात अमेरिकन मूर्तिकला फ्रेंच व इटालियन प्रभावातून हळूहळू मुक्त होऊ लागली. मूर्तिकलेची साधने वाढलेली होती व त्यांत विविधताही निर्माण होत होती. सामाजिक व कलाविषयक विचारसरणीत परिवर्तन होऊ लागले होते. १९१३ मधील न्यूयॉर्कचे ‘आर्मरी शो’ हे जागतिक कलाप्रदर्शन व पहिले महायुद्ध यांचा परिणाम सर्वच अमेरिकन ललितकलांवर झाला. आश्रयदाते व ग्राहक यांच्या मर्जीची व मागणीची बंधने दूर झाल्याने कलावंत स्वतःच्या कलावृत्तीशी प्रामाणिक राहू लागले. ऐतिहासिक वीरपुरूष, समाजातील नेते., पौराणिक व्यक्ती आणि अन्य प्राणी यांच्या मूर्तिशिल्पांत गुंतून पडलेली शिल्पकलाही स्वतंत्र झाली.

नवीन शिल्पकारांत जॉन फ्लॅनागन (१८६३-१९५२), ]जेकब एप्‌स्टाइन (१८८०-१९५९), गास्ताँ लाशेअझ (१८८२-१९३५), ईली नाडलमन (१८८५-१९४६) व विल्यम झोराख (१८८७-१९६६) हे प्रमुख होत. नग्न व परिपुष्ठ स्त्रीमूर्तीवर लाशेअझचा भर होता. नाडलमनच्या शिल्पाकृतींत अप्रतिरूपतावादी भौमितिक आकृतीबंध आढळतो. एप्‌स्टाइनची प्रतिमाशिल्पे अभिव्यक्तीवादी आहेत. झोराखच्या शिल्पाकृतींत भव्यता व रचनेतील घटना हे विशेष दिसतात. फ्लॅनागनच्या प्राणिविशेषांच्या शिल्पाकृतींत प्राचीनांची महत्ता व अर्थपूर्णता आढळून येतात.

१९३० नंतर आर्थिक मंदीच्या वातावरणात अमेरिकन शिल्पकलेत सामाजिक असंतोष व्यक्त होऊ लागला. मिन्ना हार्कव्हीच्या ‘अमेरिकन मायनर्स फॅमिली’ (१९३१) या शिल्पाकृतीत आणि डेव्हिड स्मिथच्या ‘मेडल्स ऑफ डिस्‌ऑनर’ सारख्या शिल्पाकृतींत त्या प्रकारचा सामाजिक आशय दिसतो. आर्थिक मंदीचा कालखंड अप्रतिरूपतावादी व अभिव्यक्तिवादी कलानिर्मितीला विशेष अनुकूल ठरल्याने या दोन्ही प्रकारची शिल्पकला या कालखंडात निर्माण झाली. नाथॅनेल कॅझ, मिल्टन हेबाल्ड, हॅरी विकी, मॅक्स कॅलिश, नॅट वर्नर व बर्टा मार्ग्यूलीझ यांसारखे शिल्पकार अप्रतिरूपतावादी व अभिव्यक्तिवादी संप्रदायात मोडतात.

हिटलरच्या जुलमामुळे अनेक जर्मन शिल्पकारांनी अमेरिकेत आसरा घेतला. त्यांपैकी झाक लीपशीट्स (१८९१- ) याच्या घनवादी व अभिव्यक्तिवादी कलाप्रणालीचा खोल ठसा अमेरिकन मूर्तिकलेवर उमटला आहे.

दुस‍ऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन मूर्तिकलेत धातुशिल्पाचे युग सुरू झाले, असे म्हणता येईल. ⇨अलेक्झांडर कॉल्डर (१८९८- ) व नायूम गाब (१८९०- ) हे या युगाचे अग्रदूत असून त्यांच्या चलत् शिल्पाकृतींत तारा, नळ्या, पट्ट्या, पत्रे यांचा उपयोग केलेला आहे. धातुशिल्पाला फारसा इतिहास नाही व म्हणून ते खऱ्‍या अर्थाने विसाव्या शतकाचे निदर्शक ठरते, अशी विचारसरणी प्रतिपादन करण्यात आली. धातुशिल्पामुळे शिल्पकारांना जणू चिरवांछित असे स्वत्व व स्वातंत्र्य यांचा लाभ झाला. पत्रे, नळ्या, पट्ट्या, भट्टी, ऐरण, हातोडा, झाळकामाचे साहित्य अशा नव्या साधनांनी सकृद्दर्शनी अगम्य व अनाकलनीय वाटणाऱ्‍या शिल्पाकृती घडविण्यात येऊ लागल्या. सीमोर लिप्टन (१९०३- ), हर्बर्ट फर्बर (१९०६- ), डेव्हिड स्मिथ (१९०६- ) व थीओडोर रोझॅक (१९०७- ) हे धातुशिल्प-युगातील प्रमुख शिल्पकार होत.

१९५० नंतरच्या अमेरिकन शिल्पकलेवर अमेरिकन इंडियनांच्या कलेचा प्रभाव उमटू लागला. तिच्यातील उत्कट मनोवस्थांचा सहजाविष्कार व प्रतीकात्मकता शिल्पकारांना अनुकरणीय वाटली. प्रयोगशील शिल्पकारांना त्यातून नवी प्रेरणा लाभली. अशा शिल्पकारांत हॅरी बेर्टोया, नोगुची, होसे रिवेरा व कॉन्स्टंटाइन निव्होला हे उल्लेखनीय आहेत. लोककलांतर्गत लोकशिल्पकलेचाही अभ्यास वाढू लागल्याने अमेरिकन शिल्पकार तिच्याकडे वळत आहेत. नाडलमन व रॉबर्ट लॉरेंट या शिल्पकारांनी अमेरिकन लोकशिल्पात रस घेऊन त्यातील कलाकृतींचा संग्रहही केला होता. अमेरिकन जीवनातील गतिशीलता व प्रयोगशीलता यांचा यथार्थ आविष्कार विसाव्या शतकातील अमेरिकन मूर्तिकलेत झाला. त्यामुळे जागतिक मूर्तिकलेत अमेरिकन मूर्तिकलेला वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले.

संगीत : वसाहतकाळाच्या सुरुवातीच्या सतराव्या व अठराव्या शतकांत प्रतिकूल परिस्थिती व प्युरिटनांचा विरोध यांमुळे अमेरिकन संगीत फारसे विकसित होऊ शकले नाही. धार्मिक स्तोत्रे, भक्तिगीते, सांघिक प्रार्थना एवढ्यांपुरते व चर्चच्या परिसराशी निगडित असलेले संगीत त्या वेळी रूढ होते. योहान कोनराट बाइसेल (१६९०-१७६८) हा जर्मन वसाहतकार पहिला उल्लेखनीय संगीतरचनाकार होय. पेनसिल्व्हेनियातील मोराव्हिअन वसाहतीत हायडन, मोट्सार्ट यांसारख्या यूरोपीय संगीतकारांचे संगीत प्रसृत झाले होते. इंग्रजी वळणाचे संगीतकार्यक्रम अठराव्या शतकात अमेरिकेत होऊ लागले. अमेरिकेत जन्मलेला पहिला संगीतकार फ्रॅन्सिस हॉपकिन्सन (१७३७-९१) हा असून, त्याच्या संगीतरचनेवर इंग्रजी संगीताचा प्रभाव होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर फ्रेंच व इंग्रजी संगीतकार अमेरिकेत आले. त्यांनी संगीताच्या अध्यापनास सुरुवात केली.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी लोएल मेसन (१७९२-१८७२) या संगीतकाराच्या प्रयत्‍नाने संगीताचा शालेय अभ्यासक्रमात प्रवेश झाला. मेसनने संगीताच्या शिक्षणसंस्थाही स्थापन केल्या. ऑलिव्हर शॉ (१७७९-१८४८) हा मेसनचा सहकारी चांगला वाद्यसंगीतकार होता. या शतकाच्या मध्यास ओल बूल (१८१०-८०), जेनी लिंड (१८२०-८७) व लूइस गॉट्सचॉक (१८२९-६९) या प्रसिद्ध गायकांच्या दौऱ्‍यांनी अमेरिकन संगीतविश्वात चैतन्य निर्माण झाले. संगीतसंस्था व संगीताच्या कार्यक्रमाची सभागृहे यांची वाढही या शतकाच्या प्रथमार्धात होत राहिली. वाद्यवृंदसंघ व त्यांचे थीओडोर टॉमस व लीओपोल्ड डॅमरोश यांसारखे प्रभावी निर्देशक यांचा अमेरिकन संगीतविषयक अभिरुचीवर फार मोठा परिणाम झाला.

१८४८ नंतर राजकीय कारणांनी अनेक जर्मन गायक, वादक, संगीतकार व संगीतशिक्षक अमेरिकेच्या सर्व भागांत स्थायिक झाले. या जर्मन कलावंतांनी अमेरिकन संगीतावर सर्वंकष वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे खास अमेरिकन संगीताची गळचेपी होऊ लागली. अमेरिकन संगीत व संगीतकार यांची उपेक्षा थांबविण्यासाठी आणि जर्मन वर्चस्व नष्ट करण्यासाठी अँथोनी हाइन्‍रिख (१७८१-१८६१), विल्यम फ्राय (१८१३-६४) व जॉर्ज ब्रिस्टो (१८२५-९८) या कलावंतांनी प्रयत्‍न केले.

निग्रो लोकसंगीताच्या धर्तीवर स्टीव्हेन फॉस्टरने (१८२६-६४) केलेली सुगम संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी रसिकांचा फारसा प्रतिसाद तिला लाभला नाही. संगीतिका हा एकोणिसाव्या शतकातील लोकप्रिय प्रकार असून, त्यातून अमेरिकन संगीत चैतन्यमय व प्रयोगशील बनले. जॉन पेनची (१८३९-१९०६) ‘सिंफनी’ प्रकारातील संगीतरचना या शतकाच्या उत्तरार्धात लोकप्रिय ठरली. १७७३ पासून जॉन पेन हार्व्हर्डला संगीताचा प्राध्यापक होता. ‘बास्टन ग्रूप’ किंवा ‘न्यू इंग्‍लंड ग्रूप’ या नावाचा त्याच्या नेतृत्वाखालील संघ अमेरिकन संगीताच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. या संघात जॉर्ज चॅडविक (१८५४-१९३१) व होरेशिओ पार्कर (१८६३-१९१९) हे प्रसिद्ध संगीतकार होते. एडवर्ड मॅक्डोएल (१८६१-१९०८) हा जागतिक कीर्ती लाभलेला अमेरिकन संगीतकार होय. सुसंवादी संगीतरचना (‘मेलडी’) व स्वरमेल ही त्याच्या संगीताची वैशिष्ट्ये होती. अँटन ड्‌वॉर्झाक या चेक संगीतकाराने न्यूयॉर्कमध्ये असताना अमेरिकन लोकसंगीताकडे संगीतकारांचे लक्ष वेधले व स्वतःची काही संगीतरचनाही लोकसंगीतातील विशेषांवर भर देऊन केली.

विसाव्या शतकातील अमेरिकन संगीताचा विकास वेगाने होत आहे. त्यात विविधता व सांस्कृतिक पृथगात्मता यांचे दर्शन घडते. कॉन्व्हर्स (१८७१-१९४०), एडवर्ड हिल (१८७२-१९६०), डी. जी. मेसन (१८७३-१९५३), कारपेंटर (१८७६-१९५१), डेव्हिड स्मिथ (१८७७-१९४९), डग्‍लस मुर (१८९३-१९६९) व रँडल टॉमसन (१८९९- ) यांच्या संगीतात पारंपरिक वळण दिसते. अमेरिकन संगीतात नावीन्य निर्माण करत वॉल्टर डॅमरोश (१८६२-१९५०), हेन्‍री हॅडली (१८७१-१९३७), रूबिन गोल्डमार्क (१८७२-१९३६), चार्ल्स कॅडमन (१८८१-१९४६) व डीम्झ टेलर (१८८५-१९६६) यांचा समावेश होतो. चार्ल्स लेफ्लर (१८६१-१९३५) यांच्या ‘पॅगन पोएम’ सारख्या संगीतरचनेने प्रचलित संगीताभिरुचीला धक्का दिला. प्रयोगशील संगीतकारांत चार्ल्स ईव्ह्‌ज या उपेक्षित कलावंताची गणना होते. स्वरसंमिश्रण व गुंतागुंतीची लय हे त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य होते. हेन्‍री कॉवेल यांच्या संगीतविषयक प्रयोगांत अधिस्वरकांस महत्त्व होते. कार्ल रगल्झ याची रचना धबधब्यासारखी तीव्रकठोर व अस्वस्थ करणारी आहे. नव्या पिढीतील संगीतकारांत सॅम्युएल बार्बर (१९१०- ), लेनर्ड बर्नश्टाइन (१९१८- ), पॉल बोल्झ, पॉल क्रीस्टन, डेव्हिड डायमंड, बर्नार्ड हेर्मान, क्यूबिक, मेनॉत्ती, पॉल नॉर्डोफ, गार्डनर रीड व विल्यम शूमन इ. उल्लेखनीय आहेत.

अमेरिकन संगीतातील निग्रो संगीताचा अंतःप्रवाह एकोणिसाव्या शतकापासूनच विकसित होत आहे. चार्ल्स स्किल्टन (१८६८-१९४१) याने आपल्या नृत्यसंगीतात अमेरिकन लोकसंगीताचा उपयोग केला. जॉन पॉवेल (१८८२- ) व लामार स्ट्रिंगफिल्ड (१८९७- ) यांनीही निग्रो संगीताचा उपयोग करून घेतला होता. निग्रोंच्या ‘जाझ’ संगीतामुळे अमेरिकन संगीतास एक अभिनव प्रयोगक्षेत्र खुले झाले आणि नृत्यसंगीत, नाट्यसंगीत व संगीतकला यांचे ऐक्य घडून येण्यास मदत झाली. त्यामुळे लोकप्रिय सुगम संगीताचा दर्जा वाढला व शास्त्रीय संगीताचे संकुचित क्षेत्र विस्तारले. शिवाय अमेरिकन संगीतास एक प्रकारची पृथगात्मताही प्राप्त झाली. आफ्रिकी जंगलातील पडघमांचा ठेका, निग्रो गुलामांची करुण भक्तिगीते, इंग्रजी भजने, जर्मन समूहगीते व फ्रेंच, चेक, स्लाव्ह इत्यादींची लोकगीते अशा वैचित्र्याने अमेरिकन संगीत नटलेले आहे. विसाव्या शतकात स्ट्राव्हिन्स्की, बारटोक, शनबेर्ख यांसारख्या परदेशीय श्रेष्ठ संगीतकारांनी अमेरिकेत स्थायिक होऊन अमेरिकेतील उच्च दर्जाचे संगीत निर्मिण्यास हातभार लावला. तसेच नभोवाणी, दूरचित्रवाणी व शेकडो वाद्यवृंदसंस्था यांनीही संगीताच्या प्रसारास गती दिली. बहुतेक शाळांतून वृंदवादनाचे ताफे आहेत. ‘हाय-फाय’ (हाय फायडेलिटी) म्हणजे ‘हुबेहूब स्वर उमटविण्याचा गुण’ या प्रकारास वाद्यसंगीतात व ध्वनिमुद्रित संगीतात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उन्हाळी संगीतमहोत्सवांच्या कार्यक्रमांत वाद्यवृंद, संगीतिका यांवरच भर असतो. अमेरिकेतील संगीतिका-मंडळे सु. ७५४, सिंफनी-वाद्यवृंद सु. १४०० व संगीत-शिक्षणसंस्था सु. २३४ आहेत. विद्यमान संगीतकारांत राय हरिस, हौअर्ड हन्सन, राजर सेशन्स, व्हर्जिल टॉमसन, रडल टामसन हे, आणि गायकांमध्ये राईज स्टीव्हेन्झ, एलेन फरेल, मरियन अँडरसन, पाट्रीस मन्सेल, रिचर्ड टसर, राबर्ट मेरिल वगैरे उल्लेखनीय आहेत. व्हान क्लीबन, यूजीन इस्तोमिन, ग्रांट योहान्सेन व येहूदी मेन्युइन यांसारखे अमेरिकन कलावंत आंतरराष्ट्रीय संगीतविश्वात मान्यता पावले आहेत.

जाधव, रा. ग.

नृत्य : नृत्य व संगीत यांच्या घनिष्ठ संबंधांमुळे अमेरिकेच्या संगीताप्रमाणे नृत्यही बदलत व विकसत गेले. तेथील कलावंतांनी नव्या शैली निर्माण केल्या. अर्थात कलेबाबतही यूरोपीय-विशेषतः फ्रेंच व रशियन-ऋण मान्य केलेच पाहिजे. आधुनिक अमेरिकन नृत्याच्या आविष्कारास ⇨ इझाडोरा डंकनच्या (१८७८-१९२७) मुक्त नृत्यापासून सुरुवात झाली, असे मानतात. डंकन व रूथ सेंट डेनिस (१८७७-१९६८) यांनी नवनवे प्रयोग करून पारंपरिक नृत्याचे व बॅले या नृत्यनाट्य-प्रकाराचे स्वरूप पालटून टाकले. इझाडोराने अल्प विरविरीत वस्त्रांचा वापर व भावनोत्कट अनिर्बंध हालचाली यांच्या साहाय्याने मुक्त नृत्याचा नवा संप्रदाय निर्माण केला. त्या परंपरेतून रूथ सेंट डेनिस, तिचे अनुयायी व आधुनिक नृत्यशिक्षक यांनी नवे नृत्य व नृत्यनाट्य निर्माण केले. त्याचा अत्युच्च आविष्कार ⇨मार्था ग्रेअम (१८९३- ) व डोरीस हंफ्री (१८९५-१९५८) या जगद्विख्यात नर्तिकांच्या कलेत झाला आहे. यात आता कार्मेन द लाव्हालेदसारख्या निग्रो नर्तकांनी आघाडी गाठली आहे. अभिजात फ्रेंच व रशियन नृत्याची परंपरा कायम ठेवून नव्या मुक्तनाट्याच्या साहाय्याने नवनवे प्रयोग होत आहेत. अशा प्रयोगशील नर्तकांत जॉर्ज बालंचीन (१९०४- ), ॲग्नेस देमिल (१९०९- ) व जेरोम रॉबिन्स (१९१८- ) यांची नावे घेतली जातात. आधुनिक नृत्यसंगीतकारांत जॉर्ज गर्‌श्विन (१८९८-१९३७) याचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्याने निग्रो बोलीभाषा व नृत्यशैली यांचा उपयोग करून नवे क्षेत्र खुले केले.

युग्मनृत्य हा नृत्याचा सार्वत्रिक प्रकार घरोघरी आढळतो. यातही अमेरिकेची उसळती प्रयोगशीतला दिसून येते. नव्या प्रयोगात स्पॅनिश व निग्रो नाचांचा प्रभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे ‘ट्‍विस्ट’ सारखे सर्व परंपरा झुगारून देणारे नृत्यप्रकारही आढळतात. आता अमेरिकन इंडियनांच्या नृत्यप्रकारांचा अभ्यास व संस्कारित अनुकरण होऊ लागले आहे. दूरचित्रवाणीवर नृत्य व नृत्यनाट्य यांचे चित्रण भरपूर होत असल्यानेही त्याच्या लोकप्रियतेस व प्रसारास मदत झाली आहे. बहुतेक शहरांत नृत्यनाट्यसंस्था असून ‘न्यूयॉर्क सिटी बॅले’, ‘सॅनफ्रॅन्सिस्को बॅले’, ‘नॅशनल बॅले’ तसेच ‘अमेरिकन बॅले थिएटर’ या नृत्यसंस्था जगप्रसिद्ध आहेत. मार्था ग्रेअमच्या आधुनिक नृत्य संघासही जागतिक लोकप्रियता मिळाली आहे. अलीकडच्या काळातील लोकप्रिय नर्तकांत ल्यूशिया चेस, नोरा के, जॉन क्रीझा इ. नर्तकांचा उल्लेख करता येईल.

शहाणे, मो. शा.

रंगभूमी : अमेरिकन रंगभूमीचा इतिहास सु. अडीचशे वर्षांचा असला, तरी टॉमस गॉडफ्री-लिखित द प्रिन्स ऑफ पार्थिया (१७६५) हा अमेरिकन रंगभूमीवरील पहिला स्वतंत्र नाट्यप्रयोग मानला जातो. तत्पूर्वीच १७१६ मध्ये विल्यम्सबर्ग (व्हर्जिनिया) येथे पहिले नाट्यगृह बांधण्यात आले. विल्यम डनलॅप (१७६६-१८३९) या व्यावसायिक नाटककाराने अमेरिकन नाट्यव्यवसायास जोराची चालना दिली. सामान्यपणे एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकन रंगभूमीवर नटवर्गाचे वर्चस्व होते. एडविन फॉरेस्ट या नटासाठी अनेक ऐतिहासिक व कल्पनारम्य नाटके लिहिण्यात आली. विविध नाट्यप्रकारांनी गेल्या शतकात अमेरिकन रंगभूमीचा विकास घडवून आणला. त्या शतकाच्या अखेरीस रंगभूमीवरील नटांचा प्रभाव कमी झाला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकन रंगभूमीवर आधुनिकता व वास्तवता आणण्याचे प्रयत्‍न डेव्हिड बेलास्कोसारख्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी केले. अमेरिकन नाट्य आणि रंगभूमी नवनव्या प्रयोगांनी विकसित करण्याचा प्रयत्‍न अनेक हौशी संघटनांनीही केला. रंगमंदिरांची संख्याही वाढली. महाविद्यालयांतून व विद्यापीठांतून नाट्यनिर्मितीचे शिक्षण देण्याची सोय करण्यात आली. ‘प्रॉव्हिन्स टाउन्स प्लेअर्स’, ‘वॉशिंग्टन स्क्वेअर प्लेअर्स’ व ‘थिएटर गिल्ड’ या नाट्यविषयक संघटना उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी दुसऱ्‍या व तिसऱ्‍या संघटनांमार्फतच यूजीन ओनील, एल्मर राइस, सिडनी हॉवर्ड यांची नाटके सादर करण्यात आली. यूजीन ओनील, टेनेसी विल्यम्स, आर्थर मिलर, एडवर्ड ॲल्बी, विल्यम इंग, जॅक रिचर्ड्‌सन, रॉबर्ट अँडरसन यांसारख्या प्रतिभावंत व प्रयोगशील नाटककारांमुळे अमेरिकन रंगभूमीचा सर्वांगीण विकास घडून आला. ‘द फेडरल थिएटर प्रोजेक्ट’ (१९३५-३९) या योजनेद्वारा अनेक नव्या कलावंतांना नाट्यक्षेत्रात संधी मिळाली. ‘लिव्हिंग न्यूजपेपर’ (प्रचलित माहितीचे नाट्यरूपांतर) हे या योजनेचे वैशिष्ट्य होते. पारंपरिक व आधुनिक नृत्ये, वैशिष्ट्यपूर्ण संगीत व नाट्यपूर्ण कथा यांचा संमिश्र कलाप्रकार म्हणजे ‘म्युझिकल्स’ अमेरिकेत विलक्षण लोकप्रिय आहे. पोर्गी अँड बेस, ओक्लाहोमा, साउथ पॅसिफिक, द किंग अँड आय व माय फेअर लेडी यांचा उल्लेख या संदर्भात करता येईल. बॅरीमूरकुटुंबीय, एडविन फॉरेस्ट, एडविन बूथ, हेलेन हेज, शर्ली बूथ, मेरी मार्टिन, हॅरिस, ऑर्सन वेल्स, जोस फेरर, पॉल म्यूनी इ. अमेरिकन अभिनेते व अभिनेत्री प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्क येथील ब्रॉडवे रंगमंदिर अमेरिकन रंगभूमीचा मानबिंदू होय. ब्रॉडवेनजीकच्या छोट्या रंगमंदिरात (‘ऑफ ब्रॉडवे-थिएटर’) उदयोन्मुख नाटककार व नट आपल्या कृती सादर करतात. त्यांपैकी काही नाटके पुढे ब्रॉडवे-रंगमंदिरातही प्रवेश करतात. वसंत ऋतूत अनेक फिरत्या नाटकमंडळ्या लहान गावे, उपनगरे, जत्रास्थले, पर्यटन-केंद्रे इ. ठिकाणी रिकाम्या गोशाळा, वखारी किंवा तंबू यांतून आपले नाट्यप्रयोग सादर करतात. अमेरिकेतील अशा हौशी नाट्यमंडळांची संख्या सु. अडीच लाख आहे. तसेच स्थायी स्वरूपाची व्यावसायिक नाट्यमंडळे पन्नासांहून अधिक आहेत. त्यांत ‘द ॲक्टर्स स्टुडिओ थिएटर’ (न्यूयॉर्क), ‘द ॲक्टर्स वर्कशॉप’ (सॅन फ्रॅन्सिस्को), ‘द अमेरिकन शेक्सपिअर फेस्टीव्हल थिएटर’ (लॉस अँजेल्‌स), ‘ॲरेना स्टेज’ (वॉशिंग्टन डी. सी.) इ. प्रख्यात आहेत. देशात सर्वत्र विखुरलेली रंगगृहे पाच हजारांपेक्षा अधिक आहेत. १९६७त प्रयोगीय कलांसाठी ‘लिंकन सेंटर’ची स्थापना करण्यात आली. आजची अमेरिकन रंगभूमी प्रभावी व प्रयोगशील नाटकांनी व तदानुषंगिक तांत्रिक प्रगतीने संपन्न आहे.

चित्रपट : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी-अखेरीस अमेरिकन चित्रपटाची तांत्रिक पूर्वतयारी सुरू झाली व या शतकात अनेक दिशांनी त्याचा विकास झाला. टॉमस एडिसन, डी. डब्ल्यू ग्रीफिथ, चार्ली चॅप्लीन, वॉल्ट डिझ्‌नी हे अमेरिकन चित्रपट-कलेतील नव्या तंत्रांचे जनक होत. द ग्रेट ट्रेन रॉबरी (१९०३) हा, कथानक असलेला, पहिला अमेरिकन चित्रपट होय. १९२७ मध्ये द जाझ सिंगर हा पहिला बोलपट वॉर्नर ब्रदर्स या संस्थेने तयार केला. वॉल्ट डिझ्‍नीचा स्‍नो व्हाइट अँड सेव्हन ड्‌वार्फ्स हा व्यंगपट क्रांतिकारक मानला जातो. ग्रीफिथनंतर चित्रपटतंत्रामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्‍या दिग्दर्शकांत आल्फ्रेड हिचकॉक व डेव्हिड लेन यांचा उल्लेख करता येईल. १९३९ नंतर दूरचित्रवाणीचे नवे क्षेत्र अमेरिकन चित्रपटास उपलब्ध झाले. त्रिमितिचित्रपटांचा नवा प्रयोग वॉर्नर ब्रदर्स या संस्थेने ब्वाना डेव्हिल (१९५२) चित्रपटात प्रथम केला. ‘वाईड स्क्रीन प्रोसेस’, ‘सिनेमा स्कोप’, ‘सरकॅरॅमा’, रंगीत चित्रपट यांसारख्या अभिनव तंत्रांचे यशस्वी प्रयोग अमेरिकन चित्रपटक्षेत्रात करण्यात आले. रेमन नोव्हॅरो, रूडॉल्फ व्हॅलेंटीनो, क्लार्क गेबल, डग्लस फेअरबँक्स, गॅरी कूपर, पॉल म्यूनी, ग्रेगरी पेक, रॉक हडसन, मार्लन ब्रँडो, तसेच नॉर्मा शिअरर, बेटी डेव्हीस, ऑड्री हेप्‌बर्न, सँड्रा डी, मेरीलिन मन्‍रो, एलिझाबेथ टेलर वगैरे नट व नटी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत. हॉलिवुड हे अमेरिकन चित्रपटाचे केंद्र असून, वॉल्ट डिझ्‍नीचे ‘डिझ्‍नीलँड’ हे अमेरिकेचे एक भूषण आहे. देशातील चित्रपटगृहांची संख्या सु. १३,२०० आहे. चित्रपटांप्रमाणेच वार्तापट, अनुबोधपट, माहितीपट यांची निर्मिती अनेक लहानमोठ्या संस्था व व्यक्ती करीत असतात.

क्रीडा व मनोरंजन : अमेरिकेत क्रीडांगणे, उद्याने व करमणूक-केंद्रे बहुतेक सर्व लहानमोठ्या शहरांत आढळतात. शिक्षणसंस्थांचीही स्वतंत्र क्रीडांगणे असतात. बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. बेसबॉलच्या मोसमाचे उद्घाटन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते समारंभपूर्वक केले जाते. काहींच्या मते या खेळाची सुरुवात १८३९ मध्ये झाली. बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल, व्हॉलीबॉल, बर्फावरील हॉकी यांसारखे सांघिक खेळ व मुष्टियुद्ध, टेनिस, गोल्फ इ. व्यक्तिगत स्पर्धात्मक खेळ अमेरिकेत लोकप्रिय आहेत. व्यक्तिगत व सांघिक स्पर्धात्मक खेळांचे प्रकार सु. साठ असावेत. क्रीडासाहित्य निर्माण करणाऱ्‍या संस्था आठशेहून अधिक आहेत. तसेच खेळांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्था शंभरापेक्षा अधिक आहेत. हौशी क्रीडापटू व महाविद्यालयीन क्रीडापटू यांना उत्तेजन देण्यासाठी काही संघटना आहेत. शालेय खेळांची व्यवस्था राज्यसंघटनांच्या हाती असते. व्यावसायिक खेळांचे सामने त्या त्या खेळांच्या संघटनांमार्फत योजिले जातात. अमेरिकन लीग व नॅशनल लीग यांमध्ये प्रतिवर्षी होणारे बेसबॉलचे सामने व ‘केंटकी डर्बी’ ही सुप्रसिद्ध घोड्यांची शर्यत यांस अमेरिकेच्या क्रीडाजीवनात मोठे स्थान आहे. अमेरिकेत विभागीय, प्रादेशिक व राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर खेळांकरिता चाचणी-स्पर्धा होतात व त्यांतूनच ऑलिंपिक सामन्यासाठी खेळाडूंची निवड होते. ऑलिंपिकमध्ये फक्त हौशी खेळाडूच भाग घेऊ शकतात. अद्ययावत क्रीडाशिक्षण, विपुल साधनसामग्री, विस्तृत क्रीडांगणे या सर्वांचा अमेरिकन खेळाडूंना फायदा मिळतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात अमेरिकेला विशेष यश प्राप्त झाले आहे. वॉल्टर कँप (१८५९-१९२५) हा खेळाडू अमेरिकन फुटबॉलचा जनक समजला जातो, तर बास्केटबॉलच्या जनकत्वाचा मान जेम्स नेस्मिथकडे (१८६१-१९३९) देण्यात येतो. अमेरिकन क्रीडासमीक्षकांनी विसाव्या शतकातील ज्या खेळाडूंना बहुमताने उत्कृष्ट ठरविले आहे, त्यांत प्रख्यात बेसबॉलपटू जॉर्ज हर्मन (‘बेब’) रूथ, हेन्‍री लूइस गेरिग, रेडग्रँज हा फुटबॉलपटू, बेन होगन हा गोल्फ खेळाडू, तसेच जॉनी वाइज्म्यूलर हा जलतरणपटू यांचा समावेश केला आहे. कॅशियस क्ले हा मुष्टियुद्धपटू जगप्रसिद्ध आहे. विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू मैदानी खेळाडू म्हणून जेम्स फ्रान्सिस (‘जीम’) थॉर्प (१८८८-१९५३) या पुरुष खेळाडूचा आणि ‘बेब’ (मिलड्रेड) डीड्रिक्सन झॅहरिअस (१९१३-५६) या स्त्रीखेळाडूचा उल्लेख केला जातो. अन्य स्त्रीखेळाडूंमध्ये गर्ट्‌रूड एडर्ली ही इंग्‍लिश खाडी पोहून जाणारी पहिली स्त्री, तसेच फिगर स्केटिंगमध्ये जागतिक प्रावीण्य संपादन करणारी सोंज हेनी, विल्मा रूडॉल्फ यांचाही उल्लेख करता येईल. जागतिक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांत अनेक अमेरिकन खेळाडूंनी पदके मिळविली आहेत व जागतिक उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

इनामदार, श्री. दे.

महत्त्वाची स्थळे : नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, उत्कृष्ट इमारती, संग्रहालये, सुंदर नगरे, रम्य उपवने, अमेरिकन इंडियन यांमुळे हा सर्व देशच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. अमेरिकेच्या पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशास प्रथम न्यूयॉर्क बंदरातील एका बेटावरील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन होते. फ्रेंच लोकांनी हा १८८४ मध्ये अमेरिकेच्या नागरिकांना आपल्या मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला. याची उंची ४६ मी. असून बैठकीसह मशालीच्या टोकापर्यंत त्याची एकूण उंची ९३ मी. आहे. याच वेळी एम्पायर स्टेट बिल्डिंग, संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय, क्रिस्टलर यांसारख्या जगातील गगनचुंबी इमारतींनी गजबजलेले न्यूयॉर्क दिसते. कॅनडा व अमेरिका यांच्या सरहद्दीवर नायगाराचा प्रसिद्ध धबधबा आहे तो पाहण्याकरिता दर वर्षी एक कोटीवर लोक येतात. देशामध्ये एकूण ३३ विस्तीर्ण राष्ट्रीय उपवने राखून ठेवलेली आहेत त्यांत यलोस्टोन, योसेमिटी, सीक्वाया, ऑलिंपिक, रॉकी मौंटन इ. उल्लेखनीय आहेत. कार्ल्झबॅन व ल्यूरे येथील पाणी झिरपून तयार झालेल्या चुनखडकातील गुंफा व लवणस्तंभ, शेकडो वर्षांचे वय असलेले कॅलिफोर्नियातील वृक्ष, कोलोरॅडो नदीप्रवाहाने खोदलेली ग्रँड कॅन्यन ही रम्याद्‌भुत दरी, ॲरिझोनामधील विविधरंगी पेंटेड डेझर्ट व अश्मीभूत वृक्षांचे पेट्रिफाइड फॉरेस्ट, अलास्कातील व रॉकीज्‌मधील बर्फाच्छादित सहलस्थळे, फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया, हवाई येथील विस्तीर्ण पुलिने, उत्तरेकडील मनोहर सरोवर, नैऋत्येकडील रणात झंझावाती वाऱ्याने कोरलेल्या नाना आकाराच्या टेकड्या व निवडुंगाचे अनेक प्रकार, समुद्रसपाटीपेक्षा कमी उंचीची डेथ व्हॅली, अशी अनेक भव्योदात्त स्थळे या देशामध्ये आढळतात.

अमेरिकेच्या नागरिकांनी निसर्गास जोड देऊन असंख्य रम्य स्थळे निर्माण केली आहेत. राजधानी वॉशिंग्टन हे जगातील अत्यंत रेखीव व सुंदर शहरांपैकी एक आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात विविध उद्योगधंद्यांमुळे निर्माण झालेली बॉस्टन, शिकागो, बफालो, डिट्रॉइट, क्लीव्हलंड, पिट्‌सबर्ग, फिलाडेल्फिया, बॉल्टिमोर, न्यू ऑर्लीअन्झ, रिचमंड, मिआमी इ. अनेक शहरे महत्त्वाची आहेत. अमेरिकेच्या पश्चिम भागातील सॅन फ्रॅन्सिस्को, लॉस अँजेल्‌स व सीॲटल ही मोठी शहरे आहेत. या भागातच हॉलिवुड हे चित्रपटनिर्मितिकेंद्र आहे. देशातील नद्यांवर बांधलेली हूव्हर, शास्ता, ग्रँड कूली आदी धरणे, टेनेसी खोरे-प्रकल्प, ईअरी कालवा, सेंट लॉरेन्स सीवे व अमेरिकेच्या मालकीचा पनामा कालवा ही जगातील महत्त्वाची बांधकामे गणली जातात.

पूर्वेस स्वातंत्र्ययुद्ध व यादवीयुद्ध यांची स्मृती देणारी व्हॅलिफोर्ज-गेटिसबर्गसारखी स्थळे, वॉशिंग्टनचे मौंट व्हर्नन व जेफरसनचे माँटिचेलो येथील घरे, स्वातंत्र्यघोषणा जेथे झाली ते फिलाडेल्फियाचे नगरभवन, कॉर्नवॉलिस जेथे वॉशिंग्टनला व ली ग्रँटला शरण आला ती घरे राष्ट्रीय स्मारके आहेत. दक्षिण डकोटा राज्यात रशमोर पर्वतावर वॉशिंग्टन, जेफरसन, थीओडोर रूझवेल्ट व लिंकन यांचे भव्य अर्धपुतळे कोरलेले आहेत. हे भव्य शिल्प ईजिप्तच्या पुरातन प्रचंड़ शिल्पाशी तुलना करण्याजोगे आहे.

याशिवाय अलास्कातील ‘एस्किमो’ व टोटेम पोल्स ॲरिझोना, न्यू मेक्सिकोमधील अतिप्राचीन मानववस्तीचे अवशेष नवाजो, प्वेब्लो, होपी इ. आदिवासी जमातींच्या वस्त्या यांना सांस्कृतिक महत्त्व आले आहे.

शहाणे, मो. ज्ञा.

संदर्भ : 1. Bragdon, Henry W. McCutchen, Samual P. History of Free People, London, 1967.

           2. Cramer, J. F. Browne, G. S. Contemporary Education, New York, 1960.

           3. Eliot, Alexander,Three Hundred Years of American Painting, New York, 1957.

           4. Faulkner, H. U. American Economic History, New York, 1960.

           5. Friedman, Milton Schwartz, Anna J. A Monetary History of the United States 1867-1960, Princeton 1963.

           6. Greenleaf, William, Ed. American Economic Development since 1860, New York, 1968.

           7. Hamm, W. A. From Colony to World Power-A History of the United States, Boston, 1953.

           8. Harlow, R. V. The United States, New York, 1959.

           9. Harlow, R. V. The United States from Wilderness to World Power, New York, 1959.

         10. Johnson, E. R. and others, History of Domestic and Foreign Commerce of the United States, Vols I and II, Pittsburgh, 1964.

         11. Larkin, Oliver, Art and Life in America, New York, 1958.

         12. Mitchell, J. R. World Affairs since 1939, Oxford, 1968.

         13. Pritchett, C. H. The American Constitutional System, New York, 1963.

         14. Robertson, Ross M. History of the American Economy, New York, 1964.

         15. Ronald, Segal, America’s Receding Future The Collision of Creed and Reality, London, 1968.

         16. Sinclair, Andrew, The Better Half, London, 1966.

         17. Taft, Lorado, The History of American Sculpture, New York, 1930.

         18. U. S. Department of Commerce, Bureau of Census, Statistical Abstract of the United States (Annual), Washington, D.C. 1969.

         १९. करंदीकर, शि. ल. अमेरिकेचे स्वराज्य व सुराज्य, पुणे, १९६६.

         २०. कुलकर्णी, गो. मा. निवडक संविधाने, नागपूर, १९६०.

         २१. फ्लेक्सनर, जेम्स थॉमस अनु. आचवल, माधव, अमेरिकन चित्रकला, मुंबई, १९६४.

         २२. बेकलेस, कॅथरिन लिट्ल अनु. पाडगांवकर, मंगेश, अमेरिकन संगीतकार, मुंबई, १९६४.

         २३. मीडोक्राफ्ट, एनिड ला माँटे अनु. रेगे, पंढरीनाथ, स्वतंत्र लोकांची भूमी, मुंबई, १९६६.

         २४. श्रीखंडे, मो. स.अमेरिकेतील शिक्षण, मुंबई. १९६४.