मानाऊस: ब्राझीलमधील ॲमेझॉनस राज्याची राजधानी व नदीबंदर. लोकसंख्या ६,१३,०६८ (१९८०). निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमापासून सु.११ किमी. अंतरावर उष्ण कटिबंधीय अरण्य प्रदेशात निग्रो नदीकाठी हे वसलेले आहे. हे राज्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र असून येथे सर्व प्रकारच्या दळणवळण-सुविधा उपलब्ध आहेत.

पूर्वी मानाओ या इंडियन जमातीचे वास्तव्य येथे होते १६६९ मध्ये येथे किल्ला बांधून पहिली यूरोपीय वसाहतउभारण्यात आली. किल्ल्याभोवती विस्तारणारे हे गाव ‘बॅरा दो रिओ निग्रो’ या नावाने ओळखले जाऊ लागले. उत्तरोत्तर याची प्रगती होऊन १८५० मध्ये प्रथम ॲमेझॉनस प्रांताचीआणि नंतर राज्याची राजधानीयेथेचकरण्यात आली १९३९ पासून ते सांप्रतच्या नावाने ओळखले जाऊ लागले.

मानाऊसची १८९० पासून रबर व्यवसायामुळे झपाट्याने प्रगती झाली तसेच खनिज तेलाच्या शोधामुळेही यास महत्त्व प्राप्त झाले. येथे रबर, खनिज तेल शुद्धीकरण, साबण, मद्यनिर्मिती, जहाजबांधणी इ. उद्योगांची भरभराट झाली आहे. हे एक उत्कृष्ट अंतर्देशीय नदीबंदर असून अटलांटिक महासागरापासून १,६०० किमी. अंतरावर असले, तरी सागरगामी बोटींमार्फत येथपर्यंत वाहतूक चालते. १९६७ पासून ते खुले बंदर केल्याने येथील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. येथून रबर, ब्राझील नट, ताग, रोझवुड तेल, जंगली प्राण्यांची कातडी व शिंगे इत्यादींची निर्यात होते.

राज्यातील प्रमुख शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही यास महत्त्व आहे. येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲमेझॉन रिसर्च (१९५४), ॲमेझॉनस विद्यापीठ (१९६५) इ. संस्था असून तांत्रिक शिक्षणाच्या सुविधाही उपलब्ध आहेत. येथे कुष्ठरोग्यांसाठी रुग्णालय तसेच अनाथ मुलांकरिता शाळा असून येथील ऑपेरा हाउस आणि वनस्पतिविषयक व प्राणिशास्त्रविषयक उद्याने विशेष उल्लेखनीय आहेत.

गाडे, ना. स.