मार्को पोलो

पोलो, मार्को : (१२५४–१३२४). आशियातील देशांत, विशेषत: चीनमध्ये, प्रवास करणारा इटालियन प्रवासी. जन्म व्हेनिसमध्ये. त्याचे वडील नीकोलॉ व चुलते माफफेओ हे दोघेही व्हेनिसमधील नामांकित व्यापारी होते. व्यापारानिमित्त ते व्होल्गा नदीखोऱ्यापासून कॉन्स्टँटिनोपलच्या (इस्तंबूल) प्रदेशापर्यंत प्रवास करीत असत. रोमन काळापासून चीन, भारतादी अतिपूर्वेकडील आशियाई देशांशी ज्या खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, तो मार्ग अब्बासी खिलाफतीच्या कालखंडात यूरोपियनांसाठी बंद झाला होता. चंगीझखानाचा नातू हूलागूखान याने बगदादची अब्बासी खिलाफत नष्ट करून आशियात मंगोल सत्ता स्थापन केल्यावर (१२५८ नंतर) हा मार्ग पुन्हा यूरोपियन व्यापाऱ्यांसाठी खुला झाला. या संधीचा फायदा घेऊन १२६० मध्ये नीकोलॉ व माफफेओ यांनी साहस पतकरून काळा समुद्र पार केला व ते क्रिमियातील सूडाक या शहरी आले. तेथून व सराईमार्गे बूखाऱ्यास गेले. बूखारा हे त्यावेळेसही मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते. तेथे खानाच्या राजदूताशी त्यांची भेट झाली व त्याच्याबरोबरच ते चीनला गेले. मध्ययुगीन काळात चीनमध्ये जाणारे ते पहिले यूरोपीय व्यापारी होते. पीकिंगमध्ये त्यांनी कूब्लाईखानाची भेट घेतली. त्याचे नीकोलॉ व माफफेओ यांचे स्वागत केले आणि काही काळ त्यांना ठेवूनही घेतले. १२६९ मध्ये पोलो बंधू इटलीला परतले. ‘चीनमध्ये १०० ख्रिस्ती अभ्यासक (मिशनरी) पाठवावेत या अर्थाचे कूब्लाईखानाने पोपला लिहिलेले पत्र पोप चौथा क्लेमेंट याच्या मृत्यूमुळे आणि नवीन पोपच्या निवडणुकीच्या विलंबामुळे ते पोहोचते करू शकले नाहीत. दोन वर्षांत म्हणजे १२७१ साली पोलो बंधू सतरा वर्षांच्या मार्कोसह पुन्हा चीनकडे व्यापारासाठी निघाले आणि एकर येथून जेरूसलेमला आहे. तेथून ते उत्तरेकडे प्रवास करीत सिरियाच्या किनारी आले. त्याच ठिकाणी त्यांना आपला मित्र दहावा ग्रेगरी हा पोप म्हणून निवडला गेल्याची बातमी समजली. त्यामुळे ते परत रोमला आले. १२७१ मध्ये पोपचा निरोप घेऊन ते निघाले. त्यांच्याबरोबर दोनच मिशनरी आर्मेनियाच्या सरहद्दीपर्यंत आले. आयाश येथून इराणच्या आखातावरील हॉर्मझ या बंदरात आले. तेथून जलमार्गाने चीनला जाण्याचा त्यांचा विचार होता परंतु जहाज मिळू न शकल्याने त्यांनी खुष्कीच्या मार्गाने जावयाचे ठरविले. इराणचे वाळवंट ओलांडून ते अफगाणिस्तानातील बाल्ख शहरी आले. येथून ते ऑक्ससमार्गे वाखान येथे आले. नंतर पामीर पठार ओलांडून ते कॅश्गार, यार्कंद, खोतानमार्गे लॉप नॉर सरोवराच्या किनाऱ्याशी आले. नंतर ते गोबी वाळवंट पार करून १२७५ मध्ये चीनमधील शांगडू शहरी दाखल झाले.

चीनमध्ये मार्कोने मंगोल भाषेचा अभ्यास केला. मार्कोची हुषारी, विशेषत: त्याचे भाषाप्रभुत्व व बहुश्रुतता, या गुणांनी कूब्लाईखान खूष झाला. खानाने १२७७ मध्ये मार्कोची नागरी सेवेत नेमणूक केली. थोड्याच अवधीत कूब्लाईखानाच्या तो खास मर्जीतील समजला जाऊ लागला. मार्कोने तिबेट, ब्रह्मदेश, कोचीन, चायना, श्रीलंका, ईस्ट इंडीज बेटे, भारत इ. भागांना भेटी दिल्या. उत्तर भारत वगळता त्याने कन्याकुमारी, भारताचा प. किनारा, रामेश्वर ते अंदमान-निकोबारपर्यंतच्या प्रदेशाचे प्रवासवर्णन केले आहे. सतरा वर्षे चीनमध्ये काढल्यानंतर पोलोंना मायदेशाची ओढ लागली परंतु कूब्लाईखान त्यांना सोडण्यास राजी नव्हता पण त्याच सुमारास तशी एक संधी चालून आली. इराणचा प्रदेश कूब्लाईखानाच्या भावाचा नातू ऑर्गून याच्याकडे होता. त्याची मंगोल वंशातील पत्नी मरण पावली. त्यामुळे दुसरी पत्नीही त्याच वंशातील करण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने आपल्या दूतास खानाकडे पाठविले. तेव्हा कूब्लाईखानाने ‘कोकचीन’ या राजकन्येस इराणला पाठविण्याचे ठरविले. या कामगिरीवर जाण्यास पोलोंखेरीज इतर कोणीही माहितगार व्यक्ती नसल्याने कूब्लाईखानाने त्यांना तशी परवानगी दिली. पोलोंबरोबर त्याने फ्रान्स, स्पेन येथील राजांना आणि पोपला मैत्रीपूर्ण संदेश पाठविले. मार्को पोलो आपला पिता, चुलता, राजकन्या आणि प्रशियाचे दूत यांच्यासह १२९२ मध्ये चिंगज्यांग (झैतून) बंदरातून निघाला. वाईट हवामानास तोंड देत मलॅका सामुद्रधुनीतून निकोबार बेटे, श्रीलंका, भारत या मार्गाने अडीच वर्षांनी ते इराणला पोहोचले. प्रवासकाळात त्यांच्याबरोबर असलेले प्रशियाचे दोन दूत मरण पावले. तद्वत त्या काळात त्यांना कूब्लाईखानाच्या मृत्यूची वार्ता समजली त्याच सुमारास ऑर्गूनही मरण पावला. त्यामुळे त्याच्या मुलाशी कोकचीनचे लग्न लावून पोलो प्रशियाच्या दरबारातील नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर ट्रॅबझान येथून जहाजाने काळा समुद्र पार करून १२९५ मध्ये व्हेनिसला पोहोचले.

व्हेनिस आणि जेनोआ यांमध्ये १२९८ साली झालेल्या युद्धात मार्कोस युद्धकैदी म्हणून पकडण्यात येऊन जेनोआतील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याच्याबरोबर पीसा येथील रुस्टीचेल्लो हा लेखक होता. मार्कोने त्याला आपल्या प्रवासाचा वृत्तांत सांगितला. या वृत्तांतावरून त्यांनी द बुक ऑफ मार्को पोलो हे पुस्तक तुरुंगातून सुटल्यानंतर तयार केले. थोड्या कालावधीतच सर्व यूरोपभर या पुस्तकाची प्रसिद्धी झाली. त्याच्या ८५ हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. या पुस्तकात मार्कोने पाहिलेले देश, तेथील लोक व समाजजीवन, पशुपक्षी इत्यादींची वर्णने आहेत. मात्र त्यात स्वत:संबंधी फारच अल्प माहिती आहे. हे पुस्तक मूळ लॅटिन, फ्रेंच की इटालियन भाषेतील आहे, याविषयी वाद आहे. मार्कोच्या माहितीपेक्षा त्याने लिहिलेली आशियाई देशांची वर्णने यूरोपात विशेष लोकप्रिय ठरली. क्रिस्तोफर कोलंबस याच्याकडे मार्को पोलोच्या पुस्तकाची एक लॅटिन आवृत्ती होती. त्या पुस्तकाची एक प्रारंभीची इटालियन भाषेतील मुद्रित प्रत १५५९ सालची आहे. १८२४ मधील फ्रेंच प्रत प्रमाणभूत समजली जाते. व्हेनिस येथे मार्को पोलोचे निधन झाले.

शाह, र. रू.