डोरू : (प्राचीन डुरीअस, स्पॅ. द्वेरो). आयबेरियन द्विपकल्पातील एक मोठी नदी. लांबी ८९५ किमी. जलवाहनक्षेत्र ७९,०९६ चौ. किमी. स्पेनच्या मेसेटा मध्यपठारावरील स्येरा दे ऊव्ह्‌र्योन पर्वतात २,२२५ मी. उंचीवर उगम पावून, दक्षिणेकडे वळण घेऊन ती दऱ्यांनिदऱ्यांतून अरुंद पात्राने आल्माथानजवळ येऊन पश्चिमेकडे वळते व आरांदा दे द्वेरोला येते. नंतर कॅस्टीलच्या मैदानी प्रदेशातून रुंद होऊन काहीशी संथ वाहते. मग थामोरावरून गेल्यावर पुन्हा अरुंद होऊन ती स्पेन-पोर्तुगाल सरहद्दीवरून नैर्ऋत्येकडे सु. ११२ किमी. जाते व पुन्हा पश्चिमेस वळून पोर्तुगाल ओलांडून पोर्तू (ओपोर्तो) बंदराजवळ फॉझ दे डोरू येथे अटलांटिक महासागराला मिळते. 

डोरूच्या वरच्या निमओसाड भागात ३२ सेमी.पर्यंत व खालच्या हिरव्यागार प्रदेशात ५६ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. तिच्या खोऱ्यात गहू, राय, मका इत्यादींचे उत्पादन होते व गुरे, मेंढ्या यांची पैदास केली जाते. विशेष म्हणचे तिच्या काठी सर्वदूर द्राक्षमळे पसरलेले दिसतात. मुखाजवळ ऑलिव्ह आणि लिंबूजातीची फळे होतात. सीगा, बालदेआराद्वेमध्ये आगेदा, आदाहा, टॉर्मेस, पीस्वेर्गा, एस्ला, एरेझ्मा या स्पेनमधील आणि कोआ, सबोर, तूआ, टामिगा या पोर्तुगालमधील तिच्या प्रमुख उपनद्या होत. डोरूसंहतीचा सिंचाईसाठी व जलविद्युत् उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

 खालच्या भागातही डोरूच्या मार्गात अनेक निदऱ्या व द्रुतवाह असल्यामुळे तिच्यावरील नौवहन कठीण व त्रुटित झाले आहे. पेझू द रेग्वा व पोर्तू यांदरम्यान पडावांतून पुष्कळ वाहतूक होते. व्हीला नॉव्हा दि गाया या पोर्तूच्या उपनगरात द्राक्षमळे भागातून आलेल्या ‘पोर्टवाइन’चा साठा करतात. पेडोरिडो ते पोर्तू कोळशाची वाहतूक होते. नदीमुखाशी वालुकाभित्ती निर्माण झाल्यामुळे जवळच लेशॉइश हे कृत्रिम बंदर विकसित करण्यात आले आहे. स्पेनमधील सोर्या, आल्माथान, बाल्यादोलीद, थामोरा व पोर्तुगालमधील ओपोर्तो ही डोरूवरील किंवा तिला जवळची मोठी नगरे होत.

कुमठेकर, ज. ब.