कुरासाऊँ: नेदरलॅंड्स अँटिलीसमधील सर्वांत मोठे बेट, क्षेत्रफळ ४४४ चौ. किमी. लोकसंख्या १,५०,००८ (१९७२). व्हेनेझुएलापासून ९६ किमी. वरील या छोट्या बेटांवर अन्नधान्ये, फळबागा, फॉस्फेट, पशुपालन यांपेक्षा व्हेनेझुएला व कोलंबिया येथील खनिज तेलाचे शुद्धीकरण हे महत्त्वाचे अर्थसाधन आहे. नारिंगांपासून ‘कुरासाऊँ’ मद्य करतात. व्हिलेमस्टाट हे बंदर राजधानी असून ४०% लोक तेथे राहतात. अंतर्गत व बाह्य वाहतुकीच्या सोयी चांगल्या आहेत. हे १४९९ मध्ये ओजेडाने शोधिले. स्पॅनिश, डच, अल्पकाळ ब्रिटिश व १८१५ पासून पुन्हा डच, अशी येथे सत्तांतरे झाली.

कुमठेकर, ज. ब.