लक्सॉर : मध्य ईजिप्तमधील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ व हिवाळी आरोग्यधाम. लोकसंख्या ८४,६०० (१९७० अंदाजे). कैरोच्या आग्नेयीस आणि कारनॅकच्या पश्चिमेस ते अनुक्रमे पाचशे सत्तर किमी. व १.६ किमी. वर नाईल नदीकाठी वसले आहे. ह्या नगराने थीब्झ शहराचा काही भाग व्यापला आहे. त्याचे अरबी मूळ नाव ‘अल्-उकसूर’ किंवा ‘अल्-कूसूर’ (राजवाडा वा किल्ला). या ठिकाणी तिसऱ्या आमेनहोतेप (इ.स. पू. १४११-१३७२) याने ॲमन या देवतेचे एक भव्य मंदिर बांधले आणि ते ॲमन-रे या देवांच्या राजास अर्पण केले. हे मंदिर ईजिप्तमधील प्राचीन अवशेषांत वास्तुशिल्पशैली दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची लांबी १९० मी. असून नक्षीयुक्त मंदिरात स्तंभांनी सुशोभित केलेले भव्य सभागृह आहे. मंदिरावरील नक्षीकाम ⇨तूतांखामेन (इ.स. पू.१३६६ ?-१३५० ?) या राजाने पूर्ण केले. यातील वास्तुविशेष एककालीन नसून, भिन्न काळात अनेक राजांनी त्याच्या बांधकामात भर घातली आहे. त्यात ⇨ दुसरा रॅमसीझ (इ. स. पू. सु. १३१५-१२२५) याचा मोठा वाटा आहे. त्याने आपले स्वतःचे प्रचंड पुतळे खोदले आणि स्तंभयुक्त वास्तू बांधल्या. यांशिवाय येथे देवतांच्या मिरवणुकीची व युद्धातील प्रसंगांची अनेक शिल्पे आहेत. हे लक्सॉरच्या एकूण अवशेषांचे वैशिष्ट्य मानले जाते. येथे निमुळत्या टोकाचे ऑबेलिस्कही आहेत.
ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात या मंदिरात चर्चची स्थापना करण्यात आली. नंतर तेथील भव्य सभागृहात एक मुस्लिम साधूची कबर बांधण्यात आली परंतु १८८३ नंतर पुरातत्त्व खात्याने त्याची देखभाल हाती घेतली असून ती वास्तू पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याच्या जवळच कारनॅमचे अवशेष असून प्राचीन राजांच्या थडग्यांची प्रसिद्ध दरी (व्हॅली ऑफ द किंग्ज) आहे. गावात व्यापारदृष्ट्या फारसे महत्त्वाचे उद्योग नसले, तरी वास्तू आणि आल्हाददायक हवामान यांमुळे ते पर्यटकांचे प्रेक्षणीय केंद्र बनले आहे.
पहा : ऑबेलिस्क कारनॅक थीब्झ.
संदर्भ : 1. Cottrell, Leonard, Life Under the Pharaohs, London, 1953.
2. Gardiner, Alan, Egypt of the Pharaohs, Oxford, 1961.
3. Shinnie, P. L. Meroe, Ancient People and Places, New York, 1967.
देव, शां. भा. देशपांडे, सु. र.
“