व्हिटन्बेर्क : जर्मनीतील हाल जिल्ह्याची राजधानी. थोर धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर याची ही कर्मभूमी. लोकसंख्या ५४,१००(१९८५). बर्लिनच्या नैऋत्येस ८८ किमी. तसेच लाइपसिकच्या ईशान्येस ६८ किमी.वर एल्ब नदीच्या उजव्या काठावर हे वसले आहे. दोन्ही जर्मनींच्या एकीकरणापूर्वी व्हिटन्बेर्कचा समावेश पूर्व जर्मनीमध्ये होत असे. या शहराचा पहिला उल्लेख इ. स. ११८० मध्ये आढळतो. १२९३ मध्ये त्यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. १२७३ ते १४२२ या कालावधीत सॅक्सनी-व्हिटन्बेर्क डचीचे (ड्युकच्या ताब्यातील मुलूख) हे राजधानीचे ठिकाण होते. येथे सॅक्सन राजाने काही सरदारांचे व्हेटनी नावचे प्रतिनिधिगृह निर्माण केले (१४२३) आणि पुढे तेथून निवडून आलेल्या प्रतिनिधींना एक विशिष्ट दर्जा देण्यात आला (१४२५). म्यूलबेर्ग युद्धानंतर १५४७मध्ये सम्राट पाचवा चार्लस् याच्या आधिपत्याखाली हे शहर आले व ड्यूकचे वास्तव्य ड्रेझ्डेनहून येथे हलविण्यात आले. त्याच वर्षी व्हिटन्बेर्क करारान्वये येथील प्रतिनिधिगृह सॅक्सनच्या अर्नेस्टीन गटाकडून अल्बर्टाईन गटाकडे हस्तांतरीत करण्यात आले. तीस वर्षीय युद्धात (१६१८ –४८) तसेच सप्तवर्षीय युद्धात (१७५६ – ६३) या शहराची पुष्कळ नासधूस झाली. इ. स. १८०६ मध्ये फ्रेंचांनी शहराचा ताबा घेतला व पुढे शहराच्या तटबंदीचे मजबुतीकरण केले (१८१३). प्रशियनांनी हे शहर बळकावले. १९४५ मध्ये हे सोव्हिएट अमलाखाली आले. त्यानंतर १९४९ मध्ये याचा जर्मन लोकशाही प्रजासत्ताकामध्ये (पूर्व जर्मनीत) समावेश झाला.

येथील जुन्या व्हिटन्बेर्क विद्यापीठाचेच (स्था.१५०२) पुढे हाल विद्यापीठात रूपांतर करण्यात आले (१८१७). १५१७ मध्ये जुन्या विद्यापीठाचा चर्चकडून जो दुरुपयोग करण्यात आला त्याच्या विरोधातील चळवळीचे नेतृत्व मार्टिन ल्यूथर व फिलिप मेलांख्तॉन यांनी केले. हे दोघेही या विद्यापीठात प्राध्यापक होते. ३१ ऑक्टोबर १५१७पासून धर्मसुधारणेच्या चळवळीस प्रारंभ झाला. याच काळात ल्यूथरने येथील ऑल सेंट्स चर्चच्या लाकडी दरवाजांवर आपले सुप्रसिद्ध ९५ सिद्धान्त (थीसिस) लावले, परंतु १७६० मध्ये हे दरवाजे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यानंतर ल्यूथरच्या वरील ९५ सिद्धान्तांचे लॅटिन भाषेतील लिखाण ब्राँझ धातूतील दरवाजावर कोरून ते दरवाजे येथे पुन्हा बसविण्यात आले (१८५८). पोपने आज्ञापत्र काढून ल्यूथरला बहिष्कृत केले. ल्यूथरने या आज्ञापत्राची येथील ल्यूथर ओकजवळ सार्वजनिकरीत्या होळी केली (१५२०). ल्यूथरने रचलेले पहिले बायबलही येथेच प्रसिद्ध झाले (१५३४).     

सोळाव्या शतकात जर्मन कलेचे एक केंद्र म्हणून व्हिटन्बेर्क विख्यात होते. प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार ल्यूकस क्रॅनच द एल्डर हा सोळाव्या शतकात एकदा या शहराचा महापौर होता. ल्यूथर व मेलांख्तॉन या दोन थोर धर्मसुधारकांची काही स्मृतिस्थळे येथे आढळतात. उदा. त्यांची निवासस्थाने, त्यांचे दफन करण्यात आलेले चर्च, ल्यूथरचे प्रार्थनास्थळ, ल्यूथर ओक, या दोघांचे पुतळे, इ. त्याखेरीज विद्यापीठ–इमारती, टाउनहॉल (सोळावे शतक), एल्डर याचे काऱ्यालय, एक चित्रकला-शाळा या येथील ऎतिहासिक व प्रेक्षणीय वास्तू आहेत. ल्यूथरच्या निवासस्थानाची दुरुस्ती करून तेथे धर्मसुधारणांविषयक हस्तलिखिते जतन करून ठेवलेली आहेत.       

व्हिटन्बेर्क हे एक नदीबंदर व लोहमार्ग प्रस्थानक असल्यामुळे येथील उद्योगधंद्यांना चालना मिळाली. शहरात प्रामुख्याने यंत्रे, लोखंडकाम, कागद उत्पादने, स्पिरिट, साबण, मृत्तिका – उद्योग, चॉकलेट, जॅम उत्पादन इ. उद्योगधंदे विकसित झाले आहेत.                        

चौधरी, वसंत