बार्सेलोना येथील ऐतिहासिक चर्चवास्तूबार्सेलोना : स्पेनमधील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १८,०९,७२२ (१९७४ अंदाज). हे देशाच्या ईशान्य कोपऱ्यात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. या प्राचीन शहराची स्थापना कार्थेजियन लोकांनी केली असून त्यांपैकी ‘बार्सा’या नावाच्या एका कुटुंबावरूनच त्याचे प्रथम बार्सिनो व नंतर बार्सेलोना असे नाव पडले असावे. रोमन अंमलाखाली या नगराची खूप भरभराट झाली. आठव्या शतकात त्यावर मूर टोळ्यांचा ताबा होता. नवव्या व दहाव्या शतकांत ‘स्पॅनिश मार्च’ मध्ये त्याचा समावेश होता. बाराव्या शतकात आरागोन राज्याच्या राजधानीचे केंद्र, तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशातील अराज्यवादी व समाजवादी चळवळींचे केंद्र म्हणून ते प्रसिद्ध होते. औद्योगिक व  व्यापारी दृष्ट्या हे महत्वाचे असून येथे धातू, काच, सिमेंट, कापड, कागद, यंत्रे, रसायने, साखर, प्लॅस्टिक, कातडी वस्तू, जहाजे, मोटारी इत्यादींचे कारखाने आहेत. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्गाने देशातील महत्वाच्या शहरांशी ते जोडलेले आहे. देशातील हे एक प्रमुख बंदर असून येथून मद्य, ऑलिव्ह, नारिंगे, द्राक्षे, लिंबे इ. वस्तूंची निर्यात केली जाते. खाद्यपदार्थ, यंत्रे, कच्चा माल यांची आयात केली जाते. सांस्कृतिक दृष्ट्याही बार्सेलोना प्रसिद्ध आहे. येथे बार्सेलोना विद्यापीठ, तसेच अनेकविध शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये असून ऐतिहासिक व आधुनिक चर्चवास्तू उल्लेखनीय आहेत.

खांडवे, म. अ. चौधरी, वसंत