बंगलोर : भारतातील कर्नाटक राज्याची राजधानी आणि याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. दहा लाखांवर लोकसंख्या असणाऱ्या भारतातील बारा महानगरांपैकी पाचव्या क्रमांकाचे महानगर. लोकसंख्या २९,१३,५३७ (१९८१ अंदाज) पैकी पुरुष १५,३८,७९६ असून स्त्रिया १३,७४,७४१ आहेत. राज्याच्या आग्नेय कोपऱ्यात वसलेले हे शहर पठारी प्रदेशात असून समुद्रसपाटीपासून सु. ९०० मी. उंचीवर १२° ५६’ उ. अक्षांश तसेच ७७° ४०’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. कन्नड, तेलुगू व तमिळ भाषिक लोकांचे सांस्कृतिक केंद्र तसेच सुखद हवामान यांमुळे बंगलोर हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. हे शहर वाराणसी- कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ७) असून महत्त्वाच्या रस्त्यांनी ते मुंबई-मद्रासशी जोडलेले आहे. रुंदमापी लोहमार्गावरील हे अतिशय महत्त्वाचे प्रस्थानक असून शहरापासून ८ किमी. वर ‘हिंदुस्थान विमानतळ’ आहे. येथून रोज मुंबई, मद्रास, मंगलोर, कोलंबो (श्रीलंका) या शहराशी विमानवाहतूक चालते.

बंगलोरची स्थापना सोळाव्या शतकात झाली. कन्नड ‘बेंगलुरु’(उकडलेल्या शेंगांचे गाव) या अर्थी यास ‘बंगलोर’ हे नाव पडले असावे. १५३७ मध्ये केंपे गोडा नावाच्या पाळेगाराने बांधलेल्या मातीच्या किल्ल्याभोवती या शहराची पहिली वस्ती होती. सतराव्या शतकात किल्ला आणि शहर यांचा ताबा मराठ्यांकडे होता. पुढे १६८७ च्या सुमारास हे शहर म्हैसूरच्या महाराजांना विकण्यात आले. त्यांच्याकडून १७५८ मध्ये हैदरअलीने ते घेतले. १७९१ मध्ये लार्ड कॉर्नवॉलिसने शहरावर आपला ताबा मिळविला. १८३१ -८१ या काळात ते इंग्रजांचे या भागातील प्रशासकीय ठाणे होते. येथील उत्कृष्ट हवामानामुळे इंग्रजांनी येथे कँटोनमेंट स्थापन केले. आजही हा महत्त्वाचा लष्करी तळ असून तेथे ‘एअर फोर्स ट्रेनिंग स्कूल’ व जवळ असलेल्या जळहळ्ळी येथे ‘एअर टेक्निकल ट्रेनिंग सेंटर’ आहे.

बंगलोर : काही दृश्ये.

१. विधानसौध : आधुनिक वास्तुकलेचा नमुना. २. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ३. बंगलोरचा विंडसर राजवाडा, ४. निसर्गरम्य लालबाग.

दक्षिण भारतात मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या शहरास व्यापारी व औद्योगिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्योगधंद्यासाठी लागणारी वीज शहराच्या दक्षिणेस असलेल्या शिवसमुद्रम येथील ⇨ कावेरी नदीवरील धबधब्यापासून निर्माण होते, तर आसपासच्या भागातून मजूरवर्ग उपलब्ध होतो. हे शहर पूर्वीपासूनच रेशमी वस्त्रे आणि चंदनी वस्तू यांसाठी विशेष प्रसिध्द आहे. आज मात्र या परंपरागत उद्योगांखेरीज अनेकविध उद्योगधंदे येथे आढळतात. विमानाचे सुटे भाग व विमाने बांधण्याचा कारखाना, रेल्वेचे डबे, यंत्रनिर्मिती उद्योग, विद्युत उपकरणे, कृषि अवजारे, इलेक्ट्रॉनीय उपकरणे, प्रसाधने, घड्याळे, कापडगिरण्या, काचसामान, रेडिओचे सुटे भाग इ. विविध उद्योंगाचा समावेश यांत होतो. भारत सरकारच्या अखत्यारीतील इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज, हिंदुस्थान मशीन टूल्स, हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स यांसारख्या महत्त्वाच्या उद्योगसंस्था येथे आहेत. बंगलोर ही दक्षिण भारतातील महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते.


शहराच्या उत्तर व दक्षिण भागात योजनाबद्ध उपनगरे विकसित झालेली असून पूर्व भागात कँटोनमेंट आहे. पद्धतशीर आखणी केलेल्या या शहरात रुंद व प्रशस्त रस्ते, सडकांच्या दोन्ही बाजूस वृक्ष, सुंदर इमारती, विस्तीर्ण चौक, भरपूर मोकळी जागा असे दृश्य दृष्टीस पडते. शहराच्या सान्निध्यात मोठी नदी नसल्यामुळे पाण्याची टंचाई भासते. अरकावती व पिनाकिनी नद्यांपासून मिळणारे पाणी, तसेच भूमिगत पाणी पूर्णपणे उपयोगात आणूनही पाण्याचा तुटवडा भासतोच. यासाठीच सु. १३२ किमी. अंतरावरील कावेरी नदीतूनच पाणी आणण्याची खटपट चालू आहे. शहराच्या बृहत् योजनेमध्ये अनेक नव्या योजनांचा समावेश असल्याने पुढील काळात याचे महत्त्व निश्चितच वाढेल.

पर्यटनदृष्ट्या देशात हे शहर प्रसिद्ध असून अनेक हौशी प्रवासी या शहराला मुद्दाम भेट देतात. येथील रात्री थंड असून हवा निरोगी व आल्हाददायक आहे. उन्हाळ्यातील सरासरी तापमान ३०° से. (मे) आणि हिवाळ्यात २१° से. (डिसेंबर) असते. आल्हाददायक हवामानाखेरीज अनेक उत्तम बगीचे प्रवाशांचे खास आकर्षण आहे. यामुळेच याला ‘बगिच्यांचे शहर ’ असेही म्हणतात. त्यांपैकी अठराव्या शतकातील वनस्पतिउद्यान-लालबाग आणि कब्बन पार्क उल्लेखनीय आहेत. प्रेक्षणीय इमारतीमध्ये विधानसौध, म्हैसूरच्या महाराजांचा राजप्रासाद, टिपूचा राजवाडा आणि कर्नाटक राज्य सरकारचे म्यूझीयम (स्था. १८६६) यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

शैक्षणिक दृष्ट्याही बंगलोर महत्त्वाचे शहर ठरते. येथे बंगलोर विद्यापीठ (स्था. १९६४), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (१९०९), रामन रिसर्च इन्स्टिट्यूट (१९४३), नॅशनल एअरॉनॉटिकल रिसर्च लॅबोरेटरी (१९६०) आणि नॅशनल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटची शाखा (१९६०) आहेत. अनेक सायंकालीन महाविद्यालये, वाचनालये इ. सोयी आहेत. येथूनच डेक्कन हेरल्ड, हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यांसारखी इंग्रजी वृत्तपत्रे व प्रजावाणी, कन्नड प्रभा आणि संयुक्त कर्नाटक यांसारखी कानडी वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. विभागीय रेडिओ प्रक्षेपण केंद्राचे मुख्यालय येथे असून लवकरच दूरचित्रवाणी केंद्रही येथे उघडण्यात येणार आहे.

फडके, वि. शं. कापडी, सुलभा