सार्वजनिकमडगाव : गोव्यातील एक महत्त्वाचे व्यापारी व पर्यटन केंद्र, लोकसंख्या ५३,०४७ उपनगरांसह ६४,८२० (१९८१). सासष्टी (सालसेट, साष्टी) तालुक्यातील हे शहर पणजीच्या आग्नेोयीस सु. ३० किमी. वर असून ते वास्को द गामा – कॅसलरॉक या द. मध्य रेल्वेच्या मध्यमापी लोहमार्गावरील प्रमुख स्थानक आहे. हे रस्त्याने तसेच शहराजवळील (सु.२ किमी.) साळ नदीद्वारे जलमार्गानेही इतर शहरांशी जोडले आहे.

गोव्यातील आपल्या वसाहतकाळात आर्यांनी आपला मठ प्रथम जेथे स्थापन केला, त्याला ‘मठग्राम’ असे नाव दिले असावे व याचेच पुढे ‘मडगाव’ झाले असावे, असे अनेक आख्यायिका व पारंपरिक पुराणकथांवरून दिसून येते. परशुरामासंबंधीच्या अनेक कथांमध्येही मठग्रामचा उल्लेख आढळतो.

इतिहासकाळापासून हे शहर मंदिरांसाठी व व्यापारासाठी प्रसिद्ध असल्याचे उल्लेख आढळतात. पोर्तुगीजांनी मात्र येथील अनेक मंदिरे नष्ट केली. शहरात ख्रिस्ती धर्मप्रसाराला प्रथम १५६७ मध्ये सुरुवात झाली, शहरातील प्रमुख पॅगोड्यांच्या जागी बांधण्यात आली. अठराव्या शतकात पणजी हे जरी गोव्याच्या राजधानीचे ठिकाण होते, तरी गोव्याचे वैचारिक केंद्र मडगावच राहिले. गोव्यातील हिंदूंच्या अनेक चळवळींचा उगम येथेच झाला. गोवा मुक्ती आंदोलनातील पहिला सत्याग्रह १८ जून १९४६ रोजी मडगावला झाला. पोर्तुगीज सत्तेचे व ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य असूनही मडगावकरांनी १९१४ साली ‘महाराष्ट्रीय दिंडी’ चा उत्सव सुरू केला. यावरून महाराष्ट्रीय व मडगावकर हे पूर्वीपासून एकमेकांना जवळचे असल्याचे दिसून येते.

दक्षिण गोव्याच्या पृष्ठप्रदेशात वसलेल्या या निसर्गसुंदर शहराच्या परिसरात नारळाच्या बागा, भाताची शेते व जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या आहेत. शहरात जुनी व नवी अशा दोन प्रमुख बाजारपेठा असून येथून काजूबिया, सुपारी व डबाबंद केलेली फळे यांची निर्यात केली जाते. साबण, देशी दारूनिर्मिती, मासे डबाबंद करणे इ. उद्योगांचे मडगाव हे महत्त्वाचे केंद्र आहे. शहरात प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी आहेत. याशिवाय येथे ग्रंथालये, रूग्णालये व चित्रपटगृहे आहेत. राष्ट्रमत हे मराठी दैनिक मडगावातून निघते.

चर्च ऑफ द होली स्पिरिट, हरी मंदिर, दामोदर मंदिर, विठ्ठल मंदिर ही शहरातील प्रसिद्ध धार्मिक ठिकाणे आहेत. कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशीपर्यंत येथे मो1ठा उत्सव होतो. ‘दिंडी’ हे या उत्सवातील प्रमुख आकर्षण असते. दिंडीत लहानमोठे अनेक गायक आवडीने भाग घेतात. याशिवाय शहरातील नगरपालिका उद्यान, दामोदर तलाव तसेच मोती टेकडीवरून दिसणारे शहराचे दृश्य, जवळच असलेल्या बाणावली व कोळवा या प्रसिद्ध पुळणी, ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

मडगाव येथे १९३० साली कै, वामन मल्हार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते.‘बहु असोत सुंदर संपन्न……’हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे महाराष्ट्र गीत याच संमेलनात प्रथम गायले गेले.

चौंडे, मा. ल.