इन्सब्रुक : पश्चिम ऑस्ट्रियातील टिरोल प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,१५,१९७ (१९७१). हे पूर्व आल्प्समधील इन नदीकाठी, म्यूनिकच्या दक्षिणेस ९६·५ किमी. आहे. आल्प्समधील दळणवळणाच्या मोक्याच्या जागी असल्याने शहराची वाढ बाराव्या शतकापासूनच झाली आहे. हवामान आरोग्यप्रद असल्याने हिवाळी व उन्हाळी विहारस्थळ म्हणूनही इन्सब्रुकची ख्याती आहे. नवे व जुने असे याचे दोन भाग असून वाहतूककेंद्र व टिरोल प्रांताची प्रमुख बाजारपेठ म्हणून इन्सब्रुक आजही महत्त्वाचे आहे. परिसरात अनेक लहान लहान कारखाने असून काचेवरील रंगकाम व मोझेक चित्रकाम हे येथील पारंपरिक व्यवसाय विख्यात आहेत. सोळाव्या शतकातील हॉपकर्चे-फ्रॅन्सिस्कन चर्च वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना समजला जातो. पंधराव्या शतकातील फ्यूर्स्टेनबर्ग कॅथीड्रल व त्यातील सोन्याचे पाणी दिलेले तांब्याचे छत, शहराच्या प्रमुख रस्त्यावरील सेंट ॲनीचा स्तंभ, निरनिराळी संग्रहालये व आल्प्सवरील वनस्पतींचे नमुने असलेले वनस्पतिउद्यान ही इन्सब्रुकची प्रसिद्ध आकर्षणे होत.

ओक, द. ह.