नाईल: आफ्रिकेतील व जगातील सर्वांत लांब (६,६५० किमी.) नदी. जलवाहनक्षेत्र ३३,४९,००० चौ. किमी. ती उत्तरवाहिनी असून भूमध्य समुद्रास मिळते. टांझानिया, बुरूंडी, रूआंडा, झाईरे, केन्या, युगांडा, सूदान, इथिओपिया व ईजिप्त यांचे काही प्रदेश नाईलच्या खोऱ्यात येतात. इ. स. पू. ५००० ते इ. स. ६४० या काळात नाईलच्याच खोऱ्यात प्राचीन ईजिप्त संस्कृती उदयास आली, विकास पावली आणि नष्ट झाली. या संस्कृतीतील अनेक गूढ गोष्टींविषयीचे कुतूहल आणि नाईलच्या निश्चित उगमाबद्दलचे अगदी अलीकडच्या काळापर्यंतचे अज्ञान, यांमुळे नाईलच्या भोवती एक गूढरम्य वातावरण तयार झालेले होते. नाईलच्या सर्वंकष प्रभावामुळेच ईजिप्तला ‘नाईलची देणगी’ हे बिरुद मिळाले आहे. ईजिप्तचे लोक नाईलला पितृतुल्य मानतात. नाईलच्या काळ्या गाळावरून प्राचीन ईजिप्तचे लोक तिला ‘आर’ किंवा ‘और’ म्हणत. होमरने आपल्या ओडिसी काव्यात तिला अइजिप्टॉस म्हटले होते. नदीचे खोरे किंवा नदी या अर्थाच्या ग्रीक नेइलॉस किंवा लॅटिन नायलस यांवरून नाईल हे नाव पडले असावे.
श्वेत नाईल व नील नाईल या दोन नद्या मिळून नाईल बनलेली आहे. पूर्व आफ्रिकेच्या पठारावरील बुरूंडी देशात उगम पावलेली ६८८ किमी. लांबीची कागेरा नदी व्हिक्टोरिया सरोवराला मिळते व सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील युगांडा देशातील जींजा येथून श्वेत नाईल सुरू होते. ती उत्तरेकडे रिपन व ओएन फॉल्स या धबधब्यांवरून सु. ५ मी. खाली येते. लव्हाळे, निळी लिली व तद्देशीयांच्या झोपड्यांचा भार सोसणाऱ्या तरंगत्या वनस्पतींनी युक्त क्योगा सरोवरातून जाते व मग केवळ साडेपाच मी. रुंदीच्या फटीतून मर्चिसन धबधब्यावरून सु. ३६·६ मी. खाली आफ्रिकेच्या खचदरीत कोसळते आणि ३२ किमी. वर ॲल्बर्ट सरोवरास मिळते. सूदान सीमेवरील नीमूलेपर्यंत ती नौसुलभ दलदलीतून संथ वाहते आणि मग बाहर एल् जेबेल (पर्वतसरिता) नावाने द्रुतवाहांवरून व घळ्यांतून सूदानमध्ये उतरते. फोला रॅपिड्स या ६·५ किमी.वरील द्रुतवाहावरून उतरून ती १६० किमी. वरील रेजॅफ येथे ३५० ते ४५० मी. उंचीवरील विस्तृत व सपाट मैदानात येते. पावसाळ्यात हा प्रदेश जलमय होऊन तेथे दलदली वनस्पती, उंच गवत आणि विशेषतः सूद नावाचे उंच लव्हाळ्यांसारखे पपायरस यांची भरमसाट वाढ होते. सूदाची मोठमोठी चकंदळे सुटून वाहू लागतात. त्यांवरून हत्तीसुद्धा नदीपार होऊ शकतात. सूदामुळे प्रवाह अडून नौवहनासही प्रतिबंध होतो. या प्रदेशाचे नावही सूद्द असे पडले आहे. १९५७ पासून दक्षिण अमेरिकन हायासिंथ वनस्पतीच्या फैलावामुळेही प्रवाह तुंबतो. सूदानमधून आलेली बाहर एल् गॅझॅल व इथिओपियातून आलेली सोबात नदी मिळाल्यावर नाईल मॅलॅकॅल येथे येते. येथूनच खरोखर पुढे तिला श्वेत नाईल किंवा अल् बाहर अल् अबयाद म्हणतात. ती नाईलला ०·२९% पाणी पुरवते. रुंद, उथळ, दलदलयुक्त प्रदेशातून ८०० किमी. जाऊन खार्टूम येथे ती नील नाईलला मिळते. या प्रदेशात तिचे पुष्कळसे पाणी बाष्पीभवनामुळे नाहीसे होते.
इथिओपियातील सु. १,८२९ मी. उंचीवरील ताना सरोवराला मिळणाऱ्या अब्बाल नदीने सुरू झालेली नील नाईल किंवा अल् बाहर अल् अझराक आग्नेय, पश्चिम व वायव्य दिशांस अनेक द्रुतवाहांवरून व सु. १,२२० मी. खोल निदरीतून वाहत जाऊन १,३६० किमी. वरील खार्टूम येथे श्वेत नाईलला मिळते. नील नाईल आणि तिच्या उपनद्या यांच्या वेगवान प्रवाहांनी पावसाळ्यात आणलेल्या पाण्यानेच नाईलला तिचे सुप्रसिद्ध पूर येतात.
खार्टूमच्या उत्तरेस सु. ३२० किमी. वर इथिओपियातून सु. १,८०० ते ३,००० मी. उंचीवरून आलेली आतबारा नदी नाईलला मिळते. ती खूप गाळ घेऊन येते. खार्टूमपासून ८० किमी.वर नाईलच्या सुप्रसिद्ध सहा प्रपातांपैकी शेवटचा सहावा प्रपात आहे. त्यानंतरच्या इंग्रजी एस् अक्षराच्या आकाराच्या मोठ्या वळणावर पाचवा, चौथा व तिसरा प्रपात आहे. ईजिप्तच्या सीमेवरील वाडी हॅल्फानंतरचा दुसरा प्रपात आता आस्वानच्या मोठ्या धरणामुळे निर्माण झालेल्या नासर जलाशयात गेला आहे आणि पहिला प्रपात आस्वान धरणाजवळच आहे. या प्रपातांमुळे त्यांच्या दरम्यानच्या प्रदेशात नाईलमधून सलग नौवहन होऊ शकत नाही दोन प्रपातांदरम्यानच्या भागात मात्र नावा चालतात. आस्वानपासून पुढे सर्वत्र नाईल नौसुलभ आहे.
खार्टूम ते वाडी हॅल्फा यांदरम्यान नाईल सु. १,४८८ किमी. वैराण वाळवंटी प्रदेशातून व नंतरच्या ४०० किमी.मध्ये ३·२ किमी. (क्वचित केवळ २०० मी.) रुंदीच्या प्रदेशातील वालुकाश्मावरून आणि नंतर ७२० किमी. वालुकाश्म व चुनखडक यांवरून वाहते. आस्वानजवळ मात्र अग्निजन्य आणि रूपांतरित खडक आहेत. नंतर ती चुनखडकावरून ८०० किमी. कैरोपर्यंत येते. या भागात तिच्या दरीची रुंदी १६ ते २२ किमी. असून दोहो बाजूंचे भृगू ४५० मी. पेक्षाही काही ठिकाणी उंच आहेत.
नाईलच्या १६० किमी. लांबीच्या आणि सु. २,३०० चौ. किमी. क्षेत्राच्या त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागी कैरो व भूमध्य समुद्रावरील दोन टोकांस ॲलेक्झांड्रिया व पोर्ट सैद ही एकमेकांपासून २४८ किमी. वरील बंदरे आहेत. नाईलच्या सात प्रमुख फाट्यांपैकी आता रोझेटा आणि दॅमिएट्टा हे दोन फाटे चालू असून समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक उथळ खारकच्छ आहेत. त्रिभुज प्रदेशातील गाळाच्या थरांची जाडी १५ ते २३ मी. असून हा आफ्रिकेतील सर्वांत सुपीक मृदेचा प्रदेश आहे.
नाईलच्या चिंचोळ्या खोऱ्यात आणि त्रिभुज प्रदेशात लक्षावधी ईजिप्शियन राहतात व उत्तम लांब धाग्याचा कापूस, तांदूळ, ऊस, मूग, तीळ, गहू, सातू, घेवडे, कांदे, जवस, खजूर, द्राक्षे इत्यादींची भरघोस पिके काढतात. येथे कापड, सिमेंट, खते, चर्मोद्योग इत्यादींचे कारखानेही निघाले आहेत. आस्वान धरणाचा फायदा सूदानलाही होतो.
नाईलच्या खोऱ्याचे हवामान व्यापारी वाऱ्यांमुळे उष्ण व रुक्ष आहे. दक्षिणेकडे व इथिओपियात १५० सेंमी. पाऊस पडतो. उत्तरेकडे तो कमीकमी होत जातो खार्टूमच्या उत्तरेस जेमतेम १२–१३ सेंमी. आणि कैरोला ३ सेंमी. पर्यंत पडतो. समुद्रकिनाऱ्याजवळ तो सु. २० सेंमी. असतो. यामुळे नाईलच्या पुरांमुळे मिळणाऱ्या पाण्यावरच शेती मुख्यतः अवलंबून असते. सूदानमध्ये पुराचे पहिले पाणी मेमध्ये येते व ऑगस्टमध्ये ते सर्वांत जास्त चढते. खार्टूम येथे ते ६ मी. चढते. श्वेत नाईलचा प्रवाहही पुरामुळे अडतो. वाडी हॅल्फा येथे जूनच्या मध्यास, तर आस्वानला सप्टेंबरमध्ये पूर येतो. त्यातील ६८% पाणी नील नाईलचे, २२% आतबाराचे आणि फक्त १०% श्वेत नाईलचे असते.
प्राचीन काळापासून नाईलचे पाणी महत्त्वाच्या जागी केव्हा आणि किती चढते, याचे निरीक्षण व नोंद करण्याची व्यवस्था केलेली आढळते. पुराचे पाणी बांधबंदिस्त विभागांतून जाऊ देऊन तेथे गाळ साचून राहील, अशी पूर्वीची पद्धत आजही ईजिप्तच्या वरच्या काही भागांत अनुसरली जाते. मात्र यामुळे वर्षातून एकच पीक मिळते. थोड्या उंचावरील विभागांस उल्टी, रहाटगाडगे किंवा आर्किमिडीजचा स्क्रू यांनी पाणी पुरविले जाई आता पंपांचा पुष्कळ उपयोग होतो. मात्र यामुळे गाळाचा फायदा त्या विभागास फारसा होत नाही.
शेतीला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारे आणि धरणे बांधण्याची कल्पना एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील आहे. १८४३–६१ पर्यंत अनेक कालव्यांनी शेतीस पाणी पुरविले जाऊ लागले. त्यानंतर दॅमिएट्टा शाखेवरील झिफ्टॅ बंधारा (१९०१), कैरोपासून ३२० किमी. वर अस्यूत बंधारा (१९०२), त्यावर २५४ किमी. वर इस्ना बंधारा (१९०९) व नॅज हामॅदी बंधारा (१९३०) झाले. १८९९ ते १९०२ मध्ये आस्वानचे पहिले धरण झाले व ते पुढे दोनदा वाढविण्यात आले. वीज-उत्पादनाचीही सोय झाली. याच्या वरच्या बाजूस ६·५ किमी. वर १९५९–७१ पर्यंत आस्वान हायडॅम हे प्रचंड धरण तयार झाले. तेथे नदी फक्त ५४९ मी. रुंद असून, बाजूच्या उंच दरडी ग्रॅनाइटच्या आहेत. नील नाईलवरील सेन्नार धरणाचे (१९२५) पाणी जझिरा मैदानी प्रदेशास मिळते. श्वेत नाईलवरील जेबेल अल् अवलिया (१९३७) व आतबारावरील खाशम एल्गिर्ब (१९६४) तसेच नील नाईलवरील अर-रोसेरेस (१९६६) ही धरणे झाली. सूदानमध्ये बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी जाँगले कालव्याची योजना ईजिप्त व सूदान यांच्या सहकार्याने होत आहे. नाईलचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी तिच्याशी संबद्ध असलेल्या देशांच्या सहकार्याने अनेक योजना आखल्या जात आहेत.
नाईलचे समन्वेषण: प्राचीन ईजिप्तच्या लोकांना खार्टूम व ताना सरोवरापर्यंतची माहिती होती परंतु श्वेत नाईलची त्यांना कल्पना नव्हती. हीरॉडोटस व स्ट्रेबो यांना पहिल्या प्रपातापर्यंतची माहिती होती व एराटॉस्थीनीझला नाईलच्या सरोवरजन्य उगमाची कल्पना होती. क्लॉडियस टॉलेमीने इ. स. १५० मध्ये लिहून ठेवले आहे, की श्वेत नाईलचा उगम हिमाच्छादित ‘चंद्र’ पर्वतात म्हणजे हल्लीच्या रूवेनझोरी पर्वतात आहे. अलीकडील काळात स्पॅनिश धर्मोपदेशक पेद्रो फएझने १६१३ मध्ये व स्कॉटिश समन्वेषक जेम्स ब्रूसने १७८६ मध्ये नील नाईलच्या उगमाचा शोध लावला. १८५८ मध्ये रिचर्ड बर्टन व स्पीक यांनी आणि १८५९ मध्ये स्पीक व जेम्स ग्रांट यांनी रिपन फॉल्स, व्हिक्टोरिया सरोवर व कागेरा नदीपर्यंत मजल मारली. १८६४ मध्ये सर सॅम्युएल व्हाइट बेकरने ॲल्बर्ट सरोवर शोधले व जनरल चार्ल्स जॉर्ज गॉर्डन याने ते नकाशिले. सर्व परिसराचे समन्वेषण चालूच राहिले व १९६० मध्ये नील नाईलच्या वरच्या भागातील निदऱ्यांचा तपशीलवार अभ्यास झाला.
यार्दी, ह. व्यं. कुमठेकर, ज. ब.
“