लेसोथो : किंग्डम ऑफ लेसोथो. पूर्वीचे बासूटोलँड. आफ्रिकेच्या आग्नेय भागातील एक लहान स्वतंत्र देश. लोकसंख्या १६,७०,००० (१९८८ अंदाज). क्षेत्रफळ १०,३४४ चौ.किमी. २८ ३५‘द. ते ३०४०‘द. अक्षांश व २७ पू. ते २९ ३०‘पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची दक्षिणोत्तर लांबी २४८ किमी. व पूर्व−पश्चिम रुंदी १८१ किमी. असून देशाला ९०९ किमी. लांबीची सरहद्द लाभली आहे. हा देश दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचा परवृत्त प्रदेश (एकाच देशाने चोहोबाजूंनी वेढलेला) असून आकाराने स्वित्झर्लंडच्या / आहे. येथील आल्हाददायक हवामान, सस.पासूनची उंची यांमुळे ‘आफ्रिकेचे स्वित्झर्लंड’ म्हणून तो ओळखला जातो. लेसोयोच्या दक्षिणेस केप प्रांत, पश्चिममेस व उत्तरेस ऑरेंज फ्री स्टेट आणि पूर्वेस नाताळ हे द. आफ्रिका प्रजासत्ताकाचे प्रांत असून मॅझरू (लोक. १,०९,३८२ १९८६) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : लेसोथो हा सर्वसाधारणपणे सस.पासून सरासरी १,८५० मी. उंचीचा डोंगराळ भाग आहे. भूरचनेच्या दृष्टीने पश्चिमेकडील कमी उंचीचा सपाट पठारी प्रदेश व पूर्वेकडील उंच पर्वतीय प्रदेश असे याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागाने देशाचा सु. २५% प्रदेश व्यापलेला असून याची सस.पासून सरासरी उंची १,२०० मी. आहे. हा देशातील सर्वांत महत्त्वाचा शेतीयोग्य प्रदेश म्हणून ओळखला जातो. देशाचा उरलेला संपूर्ण प्रदेश ड्रेकन्सबर्ग व मालूती डोंगररांगांनी व्यापलेला असून या रांगा सामान्यपणे नैऋत्य−ईशान्य दिशेने पसरलेल्या आहेत. या दोन भागांदरम्यान १,८०० ते २,१०० मी. उंचीच्या टेकड्या आहेत. ड्रेकन्सबर्ग पर्वतरांगेने देशाची आग्नेय व पूर्व सरहद्द बनलेली असून तवाना एंतलेनयाना (३,४८२ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याच रांगेत पूर्व सरहद्दीवर आहे. मालूती (ड्रेकन्सबर्गचा विस्तारित भाग) व तिच्या उपशाखा देशाच्या मध्यभागी पसरल्या आहेत. सेंट्रल रेंज व ताबा पूत्सूआ या तिच्या प्रमुख उपशाखा आहेत. देशाच्या उत्तर भागात मालूती व मुख्य ड्रेकन्सबर्ग या पर्वतरांगा जेथे एकत्र येतात, तेथे २,७०० ते ३,२०० मी. उंचीचे विस्तीर्ण पठार आहे. पश्चिमेकडील सपाट, कमी उंचीच्या पठारी प्रदेशातील मृदा प्रामुख्याने वालुकाश्माची असून अनेकदा लागवड केल्याने ती बव्हंशी निकृष्ट बनली आहे. पर्वतरांगा व त्यांच्या पायथ्याच्या टेकड्यांतील मृदा लाव्हा रसापासून बनलेली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत हिरे ही देशातील प्रमुख संपत्ती असून त्याच्या खनिजाचे साठे प्रामुख्याने ईशान्य भागात आहेत. यांशिवाय लोहधातुक, जिप्सम, क्वॉर्ट्‌झ यांचे साठे थोड्याफार प्रमाणात आढळतात. डोंगराळ प्रदेशातून वाहणाऱ्या जोरदार नदीप्रवाहांचा उपयोग करून घेतल्यास, तसेच ऑक्स्‌बो प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशाची विजेची गरज मोठ्या प्रमाणावर भागविली जाईल.

कॅलडन, ऑरेंज व तूगेला या दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख नद्या लेसोयोमध्ये उगम पावतात. कॅलडन ही नैर्ऋत्य दिशेने वाहणारी नदी देशाच्या उत्तर सरहद्दीवर ड्रेकन्सबर्ग पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिम सरहद्दीवरून वाहत जाऊन व्हेपनर शहराजवळ ऑरेंज फ्री स्टेटमध्ये प्रवेश करते. मॅझरू ही राजधानी याच नदीवर आहे. ऑरेंज व तूगेला नद्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर माँटोसूर्स (३,२९९ मी.) शिखराजवळ उगम पावतात आणि अनुक्रमे दक्षिणेस व पूर्वेस द. आफ्रिका प्रजासत्ताकात वाहत जातात. ऑरेंज व तिच्या उपनद्यांनी देशाचा पूर्व भाग व्यापला आहे. या सर्व नद्यांनी मिळून देशातील एकूण ९०% जलवाहन केले जाते.

हवामान : लेसोथोचे हवामान आल्हाददायक व समशीतोष्ण असले, तरी उंचीनुसार त्यात थोडाफार फरक पडतो. देशात उन्हाळा व हिवाळा हे दोन ऋतू असून बहुतेक पाऊस उन्हाळ्यात (ऑक्टोबर ते एप्रिल) पडतो. देशाचे उन्हाळ्यातील सरासरी तापमान २५ से., तरहिवाळ्यातील १५ से. असते. कमी उंचीच्या प्रदेशात उन्हाळ्यात ते ३२ से. किंवा त्यापेक्षाही जास्त असते, तर हिवाळ्यात क्वचित कमीतकमी− ७ सें.पर्यंत येते. उंच डोंगराळ बऱ्याच वेळा तापमान−१८ से. पर्यंत खाली येते. जुलै, ऑगस्ट महिन्यांत मोठ्या प्रमाणात हिम पडते. हिवाळ्यात पर्वतीय भाग हिमाच्छादित असतात. मालूती पर्वतशिखरे काही वेळा उन्हाळ्यातही बर्फाच्छादित दिसतात. तापमानाप्रमाणेच पर्जन्यमानातही स्थलपरत्वे फरक आढळतो मात्र प्रत्येक महिन्यात कमीतकमी १·२७ सेंमी. तरी पाऊस पडतोच. देशाची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१ सेंमी. आहे. मॅझरू येथे वार्षिक सरासरी ७४ सेंमी. तर उत्तरेस मालूती डोंगररांगांत १९० सेंमी. पाऊस पडतो. परंतु एकदम जोरदार व थोडावेळ पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते व बरेचसे पाणी वाहून वाया जाते. भीज पावसाच्या अभावामुळे काही वेळा कोरडा दुष्काळ पडतो. 

वनस्पती व प्राणी : या देशात मुख्यतः गवत हीच वनसंपदा आहे. नैसर्गिक मोठे वृक्षप्रकार आढळत नाहीत. उंच पठारी भाग व डोंगरउतार उपोष्णकटिबंधीय, उपअल्पाइन कुरणांनी व्यापलेले आहेत. ड्रेकन्सबर्ग पर्वतरांगेच्या पायथ्याकडील टेकड्यांवर रेड ओटप्रकारचे गवत उगवते. याशिवाय ऑलिव्ह, वाळुंज (विलो), लसूण, ब्रशवुड, कोरफड इ. छोट्या वनस्पती या देशात जास्त प्रमाणात दिसून येतात. येथील कुरणांवर गुरे व मेंढीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. देशाचा लहान आकार व दाट जंगलांचा अभाव, यांमुळे या भागात हिंस्त्र श्वापदे आढळत नाहीत. फक्त हरणे, ससे व काही सरीसृप तुरळक प्रमाणात दिसून येतात. 

चौडे, मा.ल. 


 इतिहास व राजव्यवस्था : अठराव्या शतकापर्यंतचा या प्रदेशाचा सुसंगत इतिहास ज्ञात नाही. बुशमन (सॅन) हे ह्या देशातील मूळ रहिवासी. ते डोंगर-कपारीच्या आडोशाने, गुहांत वा घुमटाकार झोपड्यांत राहत असत. त्यांच्या चित्रकलेमुळे दक्षिण आफ्रिकींचा संबंध अश्मयुगीन यूरोपीय लोकांशी असावा, असे सूचित होते. त्यानंतर बांतूभाषिक काही जमाती ड्रेकन्सबर्ग पर्वत ओलांडून या प्रदेशात आल्या आणि कॅलडन नदीकाठी वस्ती करून राहिल्या. त्यांना से-सोथो (सोथो) भाषिक जमाती मिळाल्या आणि संकर होऊन त्या शांततेने राहिल्या. अठराव्या शतकात यूरोपियनांनी वसाहतीच्या निमित्ताने आफ्रिका खंडाचे सर्वेक्षण करून तेथील भूप्रदेशाचा शोध घेतला. त्यात दक्षिण आफ्रिकेत डच आघाडीवर होते. त्यामुळे डच आणि झूलूलँडमधील आदिवासींमध्ये संघर्ष सुरू झाला. झूलू, मॅतबीली आणि बोअर (डच) यांची बासूटोलँडवर वारंवार आक्रमणे होत. तेव्हा बासोथे जमातीतील पहिला मोशॉयीशॉई-मोशेश (१७९०−१८७०) याने विविध जमातींतील उरलेल्या लोकांना १८२० मध्ये संघटित करून बासूटोलँड प्रदेशात बासोथो नावाचे एक राज्य स्थापन केले. तेव्हा बोअरांशी त्यांना वारंवार तोंड द्यावे लागले. त्यांपैकी १८५६ व १८६८ ची युद्धे अधिक हानिककारक ठरली आणि बासोथोंना काही प्रदेशही गमवावा लागला. मोशॅयीशॉई हा धूर्त राजा होता. त्याने मिशनरी लोक व व्यापारी यांना आश्रय देऊन काही सुधारणा केल्या. बोअरांना तोंड देण्यासाठी त्याने ब्रिटिशांशी सर जॉर्ज नेपिअर याच्या मध्यस्थीने करार केला आणि १८४३ मध्ये संरक्षण मिळविले. पुढे मोशॉयीशॉईच्या विनंतीवरून हा प्रदेश ब्रिटिशरक्षित राज्य म्हणून जाहीर करण्यात आला (१८६८). त्यानंतर १८७१ मध्ये बासोथोंच्या संमतीशिवाय तो केप वसाहतीत अंतर्भूत करण्यात आला आणि तेथे स्वतंत्र प्रशासकीय कर्मचारीवर्ग नेमण्यात आला. यातून असंतोष निर्माण झाला आणि १८८० मध्ये ‘गन वॉर’ बंड झाले. परिणामतः बासूटो जमातप्रमुखांच्या विनंतीनुसार तो प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला. 

ब्रिटिशांना विविध जमातींतील अंतर्गत संघर्ष मिटविताना अडचणी येत तरीसुद्धा त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख मोशॉयीशॉई यांच्या मदतीने राज्यकारभार केला. यात प्रामुख्याने मार्शल क्लार्क (१८८४), गॉडफ्री लॅगडन (१८९३), हर्बर्ट स्लोली (१९०२) या निवासी आयुक्तांचा आणि मोशॅयीशॉईच्या लेरोथोली या ज्येष्ठ मुलाचा वाटा मोठा आहे. जमातप्रमुखांचे मंडळ पारंपरिक कायदा व रूढी यांद्वारे सर्व अंतर्गत व्यवहार पाहत असे. जेव्हा १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचे संयुक्त राज्य अस्तित्वात आले, त्यावेळी बासूटोलँड हा उच्च आयुक्ताचे क्षेत्र ठरविण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेच्या उच्च आयुक्ताच्या अखत्यारीत त्याची प्रशासनव्यवस्था अंतर्भूत करण्यात आली. त्याचवेळी १९०३ पासून अनौपचारिक रित्या अस्तित्वात असलेल्या बासूटोलँड−मंडळास एक सल्लागार मंडळ म्हणून मान्यता देण्यात आली. या मंडळाद्वारे व उच्च आयुक्तामार्फत बासूटोलँड−लेसोथे याची प्रशासनव्यवस्था पुढे सु. ४० वर्षे अस्तित्वात होती. पहिल्या महायुद्धानंतर देशात राष्ट्रीय भावना जागृत होऊन स्वातंत्र्य चळवळीचा जोर वाढला. यामागे आपला देश दक्षिण आफ्रिकेच्या नियंत्रणाखाली ग्रेट बिटन घालेल, अशी भीती होती. राष्ट्रीय चळवळीचा जोर पाहून ग्रेट ब्रिटनने बासूटोलँडला स्वतंत्र संविधान देऊ केले (१९५९). दक्षिण आफ्रिकेशी मर्यादित स्वरूपत सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून स्वयंशासित शासनाची स्थापना करण्यात आली. जून १९६६ मध्ये घटना समितीचे संविधान केले आणि बासूटोलँडचे लेसोथो हे नामकरण करण्यात येऊन दिनांक ४ ऑक्टोबर १९६६ रोजी या स्वतंत्र देशाची स्थापना झाली. लेसोथोने संसदीय राजेशाही संविधान स्वीकारले असून राजपद नामधारी आनुवंशिक असते. स्वातंत्र्यानंतर लेसोथो संयुक्त राष्ट्रांचा (यू.एन्.) आणि आफ्रिकी ऐक्य संघटनेचा सभासद झाला. तत्पूर्वी देशाने द्विसदनी राष्ट्रीय सभा−संसद−(सीनेट व कनिष्ठ गृह) स्वीकारली. सीनेटमध्ये ३३ सभासद असून त्यांपैकी २२ सभासद जमातप्रमुखांतून आणि ११ सभासद राजाने नियुक्त केलेले होते. कनिष्ठ गृहातील निर्वाचित ६० सभासदांची प्रौढ मताधिकाराने निवड होते. सुरुवातीस कनिष्ठ गृहात बासूटोलँड नॅशनल पक्षाने (बी.एन्.पी) ३१ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आणि देशाचा जोसेफ लीब्वा जोनाथन पहिला पंतप्रधान झाला. एक खाणकामकार म्हणून राजकारणात आलेल्या जोनाथनने (१९५२) बासूटोलँडमध्ये राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली (१९५९) आणि लेसोथोची स्वातंत्र्यचळवळ पुढे नेली होती. त्यामुळे दिनांक ४ ऑक्टोबर १९६६ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर राजेशाही संविधान पद्धतीवर जेव्हा शिक्कामोर्तब झाले, तेव्हा पंतप्रधानपद त्याच्याकडेच आले. राजाने आपणास अधिक अधिकार मिळावेत म्हणून प्रयत्न केला तेव्हा राजा व निर्वाचित मंत्रिमंडळ यांत करार होऊन पंतप्रधानाचे वर्चस्व वाढले. त्याचा गैरफायदा घेऊन १९७० मध्ये जोनाथनने आपणास निवडणुकीत बहुमत मिळत नाही, असे दिसताच आणीबाणी जाहीर करून संविधान निलंबित केले व संसद बरखास्त केली आणि राजाला नजरकैदेत ठेवले पण नंतर १९७३ मध्ये त्याने काही प्रमाणात राजकीय पक्षांना स्वातंत्र्य देऊन संसदेच्या सदस्यांची नियुक्ती केली राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेऊन एकाधिकारशाही आणली. संसद सदस्यांची केवळ एक सल्लागार समिती अशी अवस्था होती. १९७४ मध्ये लष्कारातील काही लोकांनी मोखेल्ले यांच्या तथाकथित प्रोत्साहनाने व मदतीने केलेली बंडाळी जोनाथनने मोडून काढली. विरोधी नेता मोखेल्ले देश सोडून पळून गेला परंतु उठाव मात्र थांबले नाहीत. लेसोथो मुक्ती सैन्याने (बासोथो नॅशनल पार्टी या पक्षाची लष्करी शाखा) पुन्हा सशस्त्र उठाव केले. ते दडपण्याचे जोनाथनने अथक प्रयत्न केले. १९७०−८० च्या दरम्यान जोनाथनने स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण राबवून दक्षिण आफ्रिकेवर, विशेषतः त्याच्या वर्णविद्वेष धोरणावर, टीका केली. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या शासनाविरुद्ध असलेल्या निर्वासितांना राजकीय आश्रय दिला. १९८० नंतर लेसोथो मुक्ती सैन्याच्या कारवायांना जोर आला. दक्षिण आफ्रिकेच्या एका सैन्य पथकाच्या मदतीने त्यांनी १९८२ मध्ये मॅझरू शहरावर धाडी घातल्या. जोनाथनने १९८३ मध्ये संसदीय कायदा करून सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषण केली आणि १९७० चा आणीबाणी कायदा रद्द केला. त्यानुसार १९८५ मध्ये निवडणूक घेण्याचे ठरले, पण प्रत्यक्षात निवडणुका झाल्याच नाहीत, त्या रद्द करण्यात आल्या. आफ्रिकेने सतत लेसोथोवर दडपण आणले आणि आपल्या ३,००० आफ्रिकी कैद्यांची मुक्तता करावी, अन्यथा तुमची आर्थिक नाकेबंदी करू, असा निर्वाणीचा इशारा दिला तथापि जोनाथनने त्यास भीक घातली नाही. एवढेच नव्हे, तर मध्यंतरी लेसोथोने रशिया आणि चीन या देशांबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करून आफ्रिकेवर दडपण आणले. परिणामतः १९८६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने लेसोथोची सर्व बाजूंनी सागरी नाकेबंदी केली. १९ जानेवारी १९८६ रोजी लष्कराने मेजर जनरल जस्टिन लेखॅन्याच्या नेतृत्वाखाली अवचित सत्तांतराद्वारे जोसेफ लीआब्वा जोनाथनला पदच्युत करून सर्व सत्ता हाती घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या हातातील तो बाहुलेच बनला. मेजर जनरल जस्टिन लेखॅन्या सहा सभासदांच्या लष्करी मंडळाचा अध्यक्ष झाला. दुसरा मोशॉयीशॉई याचे स्थान एक नामधारी राजा असेच सकृतदर्शनी राहिले. दक्षिण आफ्रिकेने तात्काळ सागरी नाकेबंदी उठवून लेसोथोला पूर्ववत मदत कार्य सुरू केले. मोशॉयीशॉईला ६ नोव्हेंबर १९९० रोजी मेजर जनरल लेखॅन्याने पदच्युत केले. मोशॉयीशॉई मार्च १९९० पासून लंडन येथे विश्रांती घेत होता. लेखॅन्याने जून १९९२ मध्ये देशात लोकशाही शासनव्यवस्था निर्माण करण्याची अभिवचन देऊन पूर्ववत राष्ट्रीय संविधान समिती स्थापन करण्याचे दिनांक ३० एप्रिल १९९० रोजी जाहीर केले आणि उद्योगधंद्यांच्या खाजगीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यानुसार लेसोथो एअरवेज आणि लेसोथो फ्रेट एअर ट्रान्स्पोर्ट यांना प्राधान्य दिले. दिनांक १२ नोव्हेंबर १९९० रोजी दुसरा मोशॉयीशॉईचा ज्येष्ठ मुलगा मोहातो बेरेंग सिआयसा यास राजेपदाची शपथ देण्यात आली आणि दुसरा मोशॉयीशॉई यास पदच्युत करण्यात आले. रक्तहीन क्रांती होऊन दिनांक ३० एप्रिल १९९१ रोजी मेजर जनरल लेखॅन्याला राजीनामा देणे क्रमप्राप्त ठरले. तत्पूर्वी लेखॅन्याने औद्योगिक क्षेत्रात काही छोटे-मोठे उद्योग सुरू करून लघुउद्योगांना, विशेषतः कृषिउद्योगास, उत्तेजन देण्याच्या योजना कार्यान्वित केल्या होत्या.  


देशात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात असून त्यांपैकी बासूटोलँड (बासोथो) नॅशनल पार्टी (स्था.१९५८), बासूटोलँड नॅशनल काँग्रेस पार्टी (स्था.१९५२) आणि मारेमात्‌लू फ्रीडम पार्टी (स्था.१९५७) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे १० प्रशासकीय जिल्ह्यांत विभाजन केले असून प्रत्येक जिल्ह्यावर एक जिल्हा सहनिदेशक नेमलेला असतो. 

संरक्षण व न्यायव्यवस्था : देशाच्या संरक्षण व्यवस्थेस प्रथम १९६६ मध्ये संसदीय लष्कर व्यवस्था हे नाव होते पुढे १९८६ मध्ये लष्कराची पुनर्रचना करण्यात येऊन त्यास रॉयल लेसोथो डिफेन्स फोर्स असे नाव देण्यात आले. त्यात एकूण १,५०० सेनिक (सर्व दलांचे अधिकारी, उपाधिकारी व शिपाई) असून १९८५-८६ च्या अर्थसंकल्पानुसार लष्करावर ६०० लक्ष डॉलर खर्च करण्यात आले. लेसोथोचे हवाई दल किंग एअर ट्विन-टर्बोप्रॉप वाहतूक विमान आणि सहा हेलिकॉप्टर होती (१९८५). स्कायव्हॅन विमानांचा रुग्णवाहिका विमाने म्हणूनही प्रसंगोपात्त उपयोग करतात. 

पोलीसदलात अधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक वगैरे भिन्न प्रकारचे एकूण ३४८ अधिकारी आणि १,५३० कॉन्स्टेबल श्रेणीचे शिपाई होते (१९८६). १९७८ मध्ये दुर्जन भागात मदत करण्यासाठी फिरते पोलीसपथक निर्माण करण्यात आले. 

देशातील न्यायव्यवस्था प्रामुख्याने रोमन व डच विधींवर आधारित असून जमातीतील परंपरागत रूढी आणि चालीरीती ह्यांचाही विचार न्यायदानाच्या वेळी विशेषत्वाने केला जातो. देशात १९६६ मध्ये मॅझरू येथे एक उच्च न्यायालय व एक अपील न्यायालय यांची स्थापना करण्यात आली. यांशिवाय नऊ स्वतंत्र जिल्हा न्यायालये असून ५८ स्थानिक न्यायालेय आणि १३ मध्यवर्ती न्यायालये आहेत. जिल्हा न्यायालये व मध्यवर्ती न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची तरतूद आहे. उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र विस्तृत असून त्यातही अपील न्यायालयाविरुद्ध दावा दाखल करता येतो आणि दिवाणी व फौजदारी गुन्हे तसेच संविधानात्मक दावे तेथे चालतात. स्थानिक न्यायालये आणि मध्यवर्ती न्यायालये यांच्या  निर्णयाविरुद्ध न्यायिक आयुक्तांच्या न्यायालयात आव्हान देता येते. 

देशपांडे, सु.र 

आर्थिक स्थिती : नैसर्गिक साधनसंपत्ती व औद्योगिक प्रगती अत्यल्प असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पशुपालन, शेती व पर्यटन या व्यवसायांवर अवलंबून आहे परंतु स्थानिक गरजा भागविण्यापुरतेही शेतीमधून उत्पन्न निघणे अवघड जाते. देशातील एकूण जमिनीच्या फक्त १२% जमीन लागवडयोग्य आहे. तसेच एकूण कामकऱ्यांपैकी ८२% (१९८६) कामगार या उद्योगात गुंतलेले आहेत. वारंवार पडणाऱ्या दुष्काळांमुळे शेतीचे फार नुकसान होते. १९८२ व १९८५ मधील दुष्काळांत देशाला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली. येथील संपूर्ण जमीन राजाने देशासाठी नाममात्र घेतलेली असते व त्याने नेमलेले अधिकारी ती वैयक्तिक रीत्या अथवा कुटुंबांना कसण्यासाठी कराराने वाटून देतात. १९७९ च्या भूधारणपद्धती कायद्यानुसार राजाकडून या जमिनी ९९ वर्षांच्या कराराने शेतकऱ्यांना कसण्यसाठी देण्यात येतात. जमिनी घेण्याचे अधिकार फक्त बासोथोंनाच आहे. शेतीमधून उन्हाळ्यात मुख्यत्वे मका, ज्वारी, द्विदल धान्ये तर हिवाळ्यात गहू, वाटाणे, बार्ली, ओट इ. पिके घेतली जातात. १९८६ मध्ये देशात पुढीलप्रमाणे शेती उत्पादन झाले (आकडे हजार मे. टनात) : गहू ११, मका ८६, ज्वारी ३३, कंदमुळे ६, कडधान्ये ६, भाजीपाला व कलिंगडे २५, फळे १५. देशात शेती उत्पादनवाढीच्या दृष्टीने पायऱ्यांची शेती, कुरणांचा विकास, धरणे व कालवे यांसारख्या अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मॅझरू कृषि-प्रशिक्षण विद्यालयाद्वारा शेतीविषयक संशोधन केले जाते. मका, ज्वारी, गहू या प्रमुख पिकांची गरज भागविण्यासाठी त्यांची द. आफ्रिकेतून आयात करावी लागते.

देशाच्या आर्थिक उत्पन्नात व निर्यातीत पशु उत्पादनांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लागवडयोग्य जमिनीव्यवतिरिक्त कोणत्याही भागात पशुपैदास उद्योगाचा विकास करण्याविषयीचे हक्क स्थानिकांना देण्यात आलेले असून पशूंच्या संख्येवरही निर्बंध नाहीत. लोकर व मोहेर तसेच जनावरांची कातडी ही देशाची प्रमुख निर्यात उत्पादने आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय कातडी ही देशाची प्रमुख निर्यात उत्पादने आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय दृष्ट्या येथील पशू प पशुउत्पादने कमी प्रतीची असल्याने त्यांपासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकत नाही. १९८६ अखेर देशात पशुधन व पशुउत्पादन पुढीलप्रमाणे होते. पशुधन (हजार) : गुरे ५२० मेंढ्या १,४२० बकऱ्या १,०१० डुकरे ६५ घोडे १०८ गाढवे १०८. पशुउत्पादन (हाजर मे. टन): गाईचे दूध २३, बीफ व व्हील १२, मटण व लँब ४, बकऱ्यांचे मांस ३, डुकरांचे मांस ३, लोकर-तेलकट ३ व स्वच्छ केलेली १·५. या उद्योगांच्या प्रगतीसाठी देशात अनेक योजना आखण्यात आल्या असून लोकर उत्पादनवाढीच्या दृष्टीने चांगल्या जातीच्या बकऱ्यांची पैदास करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून मेरिनो व अंगोरा जातींच्या मेढ्यांची आयात करण्यात आली आहे. 

देशात उद्योगधंद्यांची अद्याप फारशी प्रगती झालेली नाही. भूधारणपद्धती कायद्यानुसार जमीनमालकांना भविष्यकाळात मालमत्तेच्या हक्कांची शाश्वती नसणे, कुशल कामगारांचा तसेच स्थानिक कच्च्या मालाचा तुटवडा व बाजारपेठेच्या मर्यादा यांमुळे उद्योगधंद्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण झाले आहेत. १९६१ पासून माद्ध लेसोथो राष्ट्रीय विकास निगमाने कापडगिरणी, मोहेरवरील प्रक्रिया, बीर व सौमये पेये यांचे कारखाने, मोटारबांधणी व रेडिओजुळणी, अनेक हस्तोद्योग तसेच खाणकाम व पर्यटन उद्योग सुरू केले आहेत. खाणकाम उद्योगाला देशात मर्यादित वाव आहे. ईशान्य भागातील मोखोत्लाँगच्या परिसरात हिऱ्यांच्या खाणी असून त्यांचा १९६० ते १९८० या काळात विकास करण्यात आला. १९६८ पासून द. आफ्रिकेच्या दे बीर्स कन्सॉलिडेटेड माइन्स कंपनीला लेसोथो सरकारने देशाच्या वायव्य भागातील लेरीबे जिल्ह्यात खाणी खोदण्यास परवानगी दिली. येथील हिऱ्यांच्या उत्पादनावर या कंपनीचे वर्चस्व असून तिच्याकडून लेसोथो सरकारला निर्यात मालाच्या १०% कर मिळतो. काही खाणींमध्ये लेसोथो सरकारचेही भागभांडवल आहे. १९८१ मध्ये हिऱ्यांचे ५२,२९१ कॅरट उत्पादन झाले. हिऱ्यांच्या खाणींवर आपला मालकी हक्क असण्यात लेसोथो सरकारला रस आहे. हिऱ्यांशिवाय खनिज तेल. लोहधातू. युरेनियम इ. खनिजांच्या संशोधनाचे कार्य अद्याप सुरू आहे. 

देशाला परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा अलीकडेच वाढीस लागलेला एक उद्योग आहे. सृष्टिसौंदर्य, सेहलाबातेबे येथील राष्ट्रीय उद्यान यांमुळे पर्यटक आकृष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या सहकार्याने हॉटेलांचा व उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. मालूती पर्वतावर स्कीईंगच्या सुविधा तसेच क्वेमे पठारावर दुसरे राष्ट्रीय उद्यान निर्माण करण्याच्या योजना आहेत. १९८३ मध्ये अंदाजे ३५,००० पर्यटकांनी या देशाला भेट दिली. पर्यटकांत मुख्यत्वे द. आफ्रिकेतील लोकांची संख्या जास्त असते. 


देशातील बहुतेक वासोथो शेती व पशुपाल व्यावसायांत गुंतलेले आहेत. पुरेसे काम उपलब्ध नसल्याने एकूण पगारी कामगारांपैकी सु. एक लाखापेक्षा जास्त कामगार द. आफ्रिका प्रजासत्ताकातील खाणींत. कारखान्यांत किंवा कृषिक्षेत्रात काम करतात. १९८१ मध्ये एकूण कामगारांपैकी २३% कामगार द. आफ्रिका प्रजासत्ताकात काम करत होते. 

लोती (बहुवचन−मालोती) हे दशाचे अधिकृत चलन असून एका लोतीचे १०० लिसेंते (एकवचन−सेंते) असतात. दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या रँड या चलनाशी ते सममूल्य आहे. मार्च १९९० मध्ये त्याचा विनिमय दर पुढीलप्रमाणे होता : १ स्टर्लिंग = ४·२४ मालोती व १ अमेरिकी डॉलर = २·५९ मालोती. १ लोती व १,२,५,१०,२०,५० लिसेंतेची नाणी तसेच २,५,१०,२० मालोतींच्या नोटा देशात प्रचलित आहेत. येथे दशमान पद्धती रूढ आहे. 

स्थानिक गरजा भागविण्यसाठी १९७९ साली देशाला अन्नधान्ये, कपडे, यंत्रसामग्री व वाहतूकसाधने, खनिज तेल उत्पादने, रसायने, पादत्राणे इत्यादींची ३,०३६·१२ लक्ष मालातींची आयात करावी लागली व त्याच वर्षी देशाने गुरे, लोकर, मोहेर, हिरे यांची ३७९·१६ लक्ष मालोतींची निर्यात केली. १९८५ मध्ये एकूण आयात ८,२५० लक्ष मालोती, तर निर्यात ४५० लक्ष मालोती एवढी झाली. आयात−निर्यातींत मुख्यतः द. आफ्रिका प्रजासत्ताक, ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश असतो. हा देश द. आफ्रिकन सीमाशुल्क संघाचा व यूरोपीय आर्थिक संघाचा सभासद आहे.  

लेसोथो मॉनेटरी ऑथॉरिटीने (सांप्रत सेंट्रल बँक ऑफ लेसोथो) १९८० पासून ‘मालोती’ हे देशाचे चलन वापरात आणले परंतु अद्याप द. आफ्रिका प्रजासत्ताकाचे ‘रँड’ हे वैध चलन मानले जात असून लोती व रँडचे मूल्य समान ठेवण्यात आहे. याशिवाय द स्टँडर्ड बँक ऑफ साउथ आफ्रिका आणि बार्कलेज बँक इंटरनॅशनल यांच्या शाखा मॅझरू, मोहालेस हूक व लेरीबे या शहरांत आहेत. विकास बँकांपैकी लेसोथो बँकेच्या अनेक शाखा देशात आहेत.

वाहतूक व संदेशवहन : देशात १९८६ मध्ये एकूण ३,०८५ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यांपैकी ४७५ डांबरी,९३० किमी. खडीचे, तर ६८० किमी. लांबीचे कच्चे रस्ते होते. यांशिवाय घोडेस्वारांच्या वाटा व इतर मार्ग ३,५०० किमी.चे होते. यूरोपीय समूह, अरब बँक, द. आफ्रिका प्रजासत्ताक यांच्या आर्थिक सहकार्याने देशातील रस्त्यांच्या विकासाच्या अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यांत देशाच्या पश्चिम भागातील तसेच ऑक्सबो व मोखोत्लाँग यांना जोडणारे रस्ते, हायलँड्स जल प्रकल्पासंबंधीचे रस्ते यांचा समावेश आहे. साउथ आफ्रिकन रल्वेमार्ग देशाच्या सरहद्दीजवळून जात असून २ किमी. लांबीच्या लोहमार्गाने मॅझरू शहर त्या मार्गाशी जोडलेले आहे. हवाई वाहतुकीसाठी देशात एकूण ३२ धावपट्ट्या आहेत. परंतु त्यांपैकी बहुतेक लहान विमानांसाठीच उपयुक्त ठरतात. येथील विमानसेवा लेसोथो एअरवेज कॉर्पोरेशनतर्फे नियंत्रित केली जात असून द. आफ्रिका प्रजासत्ताक, सेशेल्स, मोझँबीक, स्वाझीलँड, झिंबाब्वे या देशांशी विमान वाहतूक नियमितपणे चालते. मॅझरूपासून २० मिली. वरील थोटा-मोली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ १९८६ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. येथून जेट विमानांची वाहतूक सुरू केल्याने देशाचे द. आफ्रिकेशी असलेले हवाई वाहतुकीतील परावलंबित्व कमी झाले आहे. 

देशात १९८३ साली एकूण ५,४०९ दूरध्वनी व १९८७ साली ४,००,००० रेडिओ संच होते. मॅझरू येथे रेडिओ प्रक्षेपण केंद्र असून दररोज इंग्रजी व से-सोथे भाषांतून कार्यक्रम सादर केले जातात. १९८५ मध्ये देशात एकूण ३ दैनिके प्रसिद्ध होत होती व त्यांचा एकूण खप ४४,००० प्रती होता. इटलीच्या इंटर प्रेस सर्व्हिसचे कार्यालय येथे असून इतरही काही प्रकाशसंस्था देशात आहेत. 

लोक व समाजजीवन : लेसोथोमध्ये वंशदृष्ट्या एकजिनसीपणा आहे. बासूटो अथवा सोथो लोकांची संख्या देशात जास्त (सु.९३%) असून यूरोपीय, आशियाई व मिश्रवंशीय अत्यल्प आहेत. सोथो लोकांमध्ये एन्गूनी तसेच क्वेना हा मोठा गट असून क्वेनांमध्ये मोलिबेले, मोनाहेंग, हलाक्वाना, झावाक्झावा व फोकेंग या उपगटांचा समावेश होतो. देशातील बहुतेक लोकसंख्या नैर्ऋत्य भागात (कमी उंचीच्या प्रदेशात) एकवटलेली असून १९८० मध्ये लोकसंख्येची घनता दर चौ.किमी.ला ४४ होती, तर  १९७५ ते १९८० या काळात येथील जननमान दर हजार ४१·९ व मृत्युमान १७·८ लोक इतके होते. एकूण तरुण कर्मचाऱ्यांपैकी सु. ५०% कामगार नोकरी निमित्त बाहेरील देशांत (द. आफ्रिका प्रजासत्ताकात) जात असल्याने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली आहे. देशात ख्रिश्चन मिशनचे कार्य अनेक वर्षांपासून चालू असून १९८० मध्ये एकूण लोकसंख्येपैकी ८०% लोक ख्रिश्चन धर्मीय होते. त्यांपैकी ४३% रोमन कॅथलिक, २२% लेसोथो इव्हँजेलिकल चर्चचे अनुयायी, तर ८% अँग्लिकन व ७% इतर पंथीय होते. उरलेले २०% लोक परंपरागत आफ्रिकन जाति-जमातींच्या धर्मांचे होते. इंग्लिश व से-सोथो (बांतू भाषासमूह) या देशाच्या अधिकृत भाषा असल्या, तरी देशात से-सोथो (दक्षिण सोथो) भाषिकांची संख्या जास्त आहे. यांशिवाय आफ्रिकान्स, झुलू, कोसो व फ्रेंच या भाषाही बोलल्या जातात. 

अपुरा व निकस आहार, पिण्याचे दूषित पाणी इ. कारणांमुळे येथील लोकांचे आरोग्य कमी प्रतीचे आहे. देशातील पुरुषांचे सरासरी आयुर्मान ४६·३, तर स्त्रियांचे ५२·३ वर्षे (१९८०−८५) होते. बालमृत्युमान हजारी १०० पेक्षा जास्त आहे. क्षय, गरमी, संधिवात तसेच श्वसनाचे व जठरांत्रीय विकार यांचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. इतर आफ्रिकी देशांत आढळणारे मलेरिया व खंडितकायी कृमिरोग (बिल्हार्झिया) यांचे मात्र येथून उच्चाटन झाले आहे. डोंगराळ प्रदेशामुळे वैद्यकीय सुविधा फक्त शहरी भागांतच केंद्रित झाल्या असून या सेवा पुरविणारा कर्मचारीवर्गही कमी आहे. सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न चालू आहेत. १९८० मध्ये देशात ७० डॉक्टर, २९० परिचारिका व २,२२४ रुग्णालय खाटा होत्या. ११ रुग्णालये (मनोरुग्णालय व कुष्ठरोग वसाहतीसह) व ग्रामीण भागातील ३० दवाखाने शासनातर्फे चालविले जात होते. यांशिवाय देशात इतर दवाखाने व मिशनतर्फे चालविली जाणारी ८ रुग्णालये होती. १९८४ व  १९८५ मध्ये आफ्रिकी विकास निधी आणि आंतरराष्ट्रीय विकास संस्था यांनी ग्रामीण रुग्णालयांसाठी व कुटुंबनियोजन प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. 

बासूटोंच्या लोककला दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी लेसोथो सरकार व खाजगी संस्था सतत प्रयत्नशील आहेत. गवतापासून बनविलेली वैशिष्ट्यपूर्ण शंक्वाकार हॅट वगळता बासूटोंची पारंपरिक वेशभूषा फारशी अस्तित्वात नाही.  

चौंडे, मा.ल. 


 शिक्षण : देशात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असून ते प्रामुख्याने लेसोथो इव्हँजेलिकल, रोमन कॅथलिक आणि अँग्लिकन या तीन ख्रिस्ती मिशनसंस्थांतर्फे, शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलामुलींना देण्यात येते. तेराव्या वर्षापासून माध्यमिक शिक्षणास सुरुवात होते. त्याचा कालखंड पाच वर्षांचा असून ३+२ (पहिली तीन वर्षे व नंतरची दोन) या क्रमाने ते दिले जाते. १९८४-८५ मध्ये १,१४१ प्राथमिक व १४३ माध्यमिक शाळांतून अनुक्रमे ३,१४,००३ व ३५,४२३ विद्यार्थी तर राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय व ८ तांत्रिक विद्यालये यांतू २,२२१ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मॅझयजवळील रोम येथे (लेसोथो राष्ट्रीय विद्यापीठ−१९७५) हे देशातील एकमेव विद्यापीठ असून त्यात एकूण १,१७० विद्यार्थी व १४६ अध्यापक होते (१९८४-८५).

देशात सु. १·३ कोटी डॉर खर्चाच्या पंचवार्षिक शिक्षणविकास योजनेचा १९८४ साली प्रारंभ झाला. सुमारे ६०० प्राथमिक व ८५ व्यवसाय शिक्षण शाळांतील शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांचा अध्यापन दर्जा सुधारणे, हा तिचा हेतू होता. आफ्रिका खंडातील देशांत लेसोथोन प्रौढशिक्षणाच्या संदर्भात मोठी झेप घेतल्याचे आढळते. यूनेस्कोच्या अंदाजानुसार (१९८५) प्रौढशिक्षणचे सरासरी प्रमाण ५९%, तर प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे एकूण शालेय लोकसंख्येशी प्रमाण ७६% होते. १९८५-८६ च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी सु. ६ कोटी डॉलरची (२·९७ कोटी मालोंतीची) तरतूद करण्यात आली होती. 

मिसार, म. व्यं. 

महत्त्वाची स्थळे : लेसोथोमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने फार मोठी शहरे नाहीत व बहुतेक गावांतील तरुण पुरुषवर्ग दक्षिण आफ्रिकेतील खाणींत व इतर उद्योगधंद्यांत गुंतलेला आहे. त्यामुळे स्थायी लोकसंख्या फार कमी दिसून येते. मॅझरू हे देशाच्या राजधानीचे शहर सस.पासून १,५०० मी. उंचीवर कॅलडन नदीकाठी वसलेले आहे. शेतमालाचा व्यापार, शासकीय कार्यालये, कृषिमहाविद्यालय, बँकिंग सुविधा, हस्तकारागिरी यांचे ते केंद्र असून येथे रोमन कॅथलिक व अँग्लिकन कॅथीड्रल आहेत. यांशिवाय देशात तेयातेयानेंग, लेरीबे, मॅफटेंग, मोहालेस हूक ही अन्य गावे देशातील उत्तर−दक्षिण प्रमुख महामार्गावर वसली आहेत. तेयातेयानेंग (लोक. ७,५२५−१९७६) हे याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय असून मॅझरूच्या ईशान्येस ३१ किमी., एका टेकडीवर १८८६ मध्ये वसले आहे. शहराच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या तेयातेयाने (क्विकसँड्स−रेवण) या नदीच्या नावावरून शहराला हे नाव पडले. येथून दिसणारे मालूती पर्वतरांगांचे मनोहारी दृश्य पर्यटकांचे आकर्षण ठरते. हे मोठे व्यापारकेंद्र असून अश्मपात्रे, मोहेरचे रग यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याच्या परिसरातील युद्धांत, कत्तलींमुळे कुप्रसिद्ध झालेली कॅनिबल केव्ह असून इतर गुहांतून द. आफ्रिककेतील खोईसान जमातीच्या कलाकृती पहावयास मिळतात. शहराच्या नैर्ऋत्येस असलेली ‘बेरेआ मिशन’ ही ऐतिहासिक स्मारकवास्तू प्रसिद्ध आहे. लेरीबे (जुने नाव ह्लोत्से, लोक. ५,१९७−१९७९ अंदाज) हे याच नावाच्या जिल्ह्यातील गाव मॅझरूच्या ईशान्येस ७५ किमी.वर कॅलडन व ह्लात्से नद्यांच्या संगमाच्या वरच्या भागात वसलेले आहे. शेतमालाची बाजारपेठ व पशुपैदास उद्योगासाठी ते प्रसिद्ध आहे. केप कॉलनीच्या पहिल्या दंडाधिकाऱ्याने १८७८-७९ मध्ये येथे बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष अद्याप पहावयास मिळतात. मॅफटेंग (४,६००−१९८०) हे मॅझरूच्या नैर्ऋत्येस ६० किमी.वर असून सस.पासून १,९६६ मी. उंचीवर वसलेले आहे. पशुपालन व धान्यबाजारपेठ यांसाठी ते महत्त्वाचे आहे. मोहालेस हूक (३,६००−१९८०) हे मॅझरूच्या दक्षिणेस १०० किमी.वरील गाव शेतमाल, पशुपालन, लोकर व मोहेर यांच्या उत्पादनासाठी व निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. 

राजधानी मॅझरू, एक दृश्यधान्य साठवणीच्या प्रशस्त कणग्याबासोथोंची वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक हॅट

चौंडे, मा.ल.