झारखंड : छोटा (छुटिया) नागपूर पठारावरील एक प्राचीन प्रदेश. मुस्लिम इतिहासकार याला कोक्रा म्हणत. अकबरनाम्यात छोटा नागपूर व ओरिसातील मांडलिक संस्थाने धरून असलेल्या प्रदेशास झारखंड म्हटले आहे. डॉ. बुकननच्या मते बीरभूम (प्राचीन वीर देश) व बनारस यांच्यामधील डोंगराळ प्रदेशाला झारखंड म्हणत. त्यात संथाळ परगण्याचाही समावेश होता. ह्या प्रदेशात वेगवेगळ्या जमातींची सत्ता होती. पालामाऊमध्ये चिरू मुख्य होते रांचीमध्ये मुंडा आणि ओरिसातील संस्थानात भुईया व गोंड मुख्य होते. १५८५ मध्ये अकबराने येथील मधुसिंग राजाचा पराभव करून हा प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला. रांचीच्या पूर्वेस सु. ३·५ किमी.वर असलेले छुटिया हे गाव ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून हे छोटा नागपूरच्या नागवंशी राजांची पारंपारिक राजधानी होते.

कांबळे, य. रा.