रशिया : एक सामर्थशाली साम्यवादी राष्ट्र व क्षेत्रफळानुसार जगातील सर्वांत मोठा देश. देशाचे अधिकृत नाव ‘युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक्स’ (यू. एस.एस्. आर.) सामान्यतः ‘रशिया’ किंवा क्रांतीनंतर ‘सोव्हिएट युनियन’ असा त्याचा नामोल्लेख केला जातो. देशाचे क्षेत्रफळ २,२४,०२,२०० चौ. किमी. आहे. जगाच्या एकूण भूभागाच्या क्षेत्रफळापैकी सु. एक-सप्तमांश (सु. १५%) क्षेत्र रशियाने व्यापलेले आहे. रशियाचा विस्तार यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत असून यूरोप खंडाचा पूर्वेकडील जवळजवळ निम्मा भाग (५५,७१,२०० चौ. किमी.) तर आशिया खंडाचा उत्तरेकडील सु. दोन-पंचमांश भाग (१,६८,३१,०० चौ. किमी.) या देशाने व्यापलेला आहे. दक्षिण अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका या खंडांपेक्षाही या देशाचा आकार मोठा असून तो जवळजवळ उत्तर अमेरिका खंडाएवढा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा चीनच्या दुपटीपेक्षा मोठा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपेक्षा अडीचपटीने, तर भारताच्या सातपट मोठा आहे. तथापि रशियाची जवळजवळ ७०% भूमी शेतीच्या दृष्टीने निरूपयोगी असून बऱ्याच भागांत मानवी वस्तीही आढळत नाही. रशियाची लोकसंख्या २७,६२,९०,००० (१९८५ अंदाज) असून लोकसंख्येच्या बाबतीत चीन व भारत यांच्यानंतर रशियाचा तिसरा क्रमांक लागतो. देशाचा अक्षवृत्तीय विस्तार ३५०८’ ते ८१०५०’ उ. व रेखावृत्तीय विस्तार १९०३८ पू. ते १६९०४’ प. यांदरम्यान आहे. पूर्व-पश्चिम विस्तार १०,९०० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ४,५०० किमी. आहे. पूर्व-पश्चिम विस्तार जास्त असल्यामुळे जगातील एकूण २४ कालपट्टांपैकी ११ कालपट्ट रशियात आहेत. देशात १५ प्रजासत्ताकांचा समावेश असून त्यांशिवाय आर्क्टिक महासागरातील फ्रान्स जोझेफ लँड, नॉव्हायाझीमल्या, सेव्हर्नायाझीमल्या, न्यू सायबीरियन बेटे, रँगल बेटे व पॅसिफिकमधील कमांडर बेटे, कूरील बेटे, सॅकालीन बेट यांचा समावेश होतो. या बेटांचे एकूण क्षेत्रफळ सु. ३,१०,८०० चौ. किमी. आहे. रशियाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर त्यातील बॅरेंट्स, कारा,लॅपटेव्ह, पूर्व सायबीरियन व चुकची हे समुद्र, पूर्वेस बेरिंग, ओखोट्स्क व जपानचा समुद्र, दक्षिणेस उत्तर कोरिया, चीन, मंगोलिया, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, कॅस्पियन समुद्र, व काळा समुद्र, तर पश्चिमेस रूमानिया, हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, फिनलंड, नॉर्वे हे देश व बाल्टिक समुद्र आहे. देशाची एकूण सरहद ८०,३०२ किमी. असून ती जगात सर्वांत लांब आहे. उत्तर व पूर्व सीमा सागरी स्वरूपाच्या आहेत. रशियाला एकूण बारा देशांच्या तसेच आर्क्टिक, अटलांटिक, पॅसिफिक महासागरांच्या व त्यांतील बारा समुद्रांच्या सीमा लाभलेल्या आहेत. मॉस्को (लोकसंख्या ८६,४२,०००–१९८५ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे, सर्वांत मोठे व जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.
लेखक : चौधरी, वसंत
भूवैज्ञानिक इतिहास : रशियाचा व्याप प्रचंड असल्याने तेथे जवळजवळ सर्व भूवैज्ञानिक कालखंडांमधील व बहुतेक सर्व प्रकारचे खडक असलेली पुरेशी मोठी क्षेत्रे आहेत. रशिया मुळात दोन मोठ्या खंडीय मंचांचा बनलेला आहे. यांपैकी उरल पर्वताच्या पश्चिमेकडील मंचाला रशियन (पूर्व यूरोपीय) आणि पूर्वेकडील मंचाला सायबीरियन (मध्य-सायबीरियन) मंच म्हणतात. सायबीरियन मंच येनिसे नदीपासून ते लीना खोरे व पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यानच्या घडीच्या पर्वतरांगांपर्यंत पसरलेला आहे. या दोन मंचांच्या मधल्या भागात उरल पर्वत, तसेच पश्चिम सायबीरिया व मध्य आशिया येथील सखल प्रदेश येतात.
हे मंच म्हणजे कँब्रियन-पूर्व काळातील (सु. ६० कोटी वर्षाहून जुन्या)ग्रॅनाइट, पट्टिताश्म, अभ्रकी सुभाजा, फायलाइट, संगमरवर आणि क्वॉर्ट्झाइट या स्फटिकी खडकांचे बनलेले दृढ ठोकळे आहेत. या मंचांवर नंतरच्या विविध काळांतील गाळाचे खडक साचले असून ते दक्षिणेकडे व पूर्वेस जाताना अधिकाअधिक कमी वयाचे होत गेलेले दिसतात. यांशिवाय रशियात अंतर्वेशी (आत घूसलेले) खडकही पुष्कळ आहेत.
मंचांचे स्फटिकी खडक ढाल क्षेत्रांच्या किंवा अत्यंत झीज झालेल्या पर्वतरांगांच्या गाभ्याच्या रूपात जमिनीवर उघडे पडलेले आढळतात. वायव्येकडचे फेनोस्कँडीअन किंवा बाल्टिक, युक्रेनमधील ॲझॉव्हपोडोल्यन आणि पूर्व सायबीरियामधील आल्डान व ॲनबार ही अशा प्रकारची ढालक्षेत्रे आहेत. तसेच कॉकेशस, उरल व रशियाच्या आशियाई भागातील पर्वतांच्या गाभ्यांमधील कँब्रियन-पूर्वकालीन खडक उघडे पडलेले आढळतात. सर्व सखल भागांत स्फटिकी खडकांवर निरनिराळ्या जाडीचे गाळाचे खडक साचलेले आहेत. मॉस्को भागात या गाळाच्या खडकांचा थर एवढा जाड आहे की, तेथील सर्वात खोल खणलेल्या छिद्रांतही स्फटिकी खडकांचा ठाव लागला नाही. उलट कूर्स्क क्षेत्रात स्फटिकी खडक १०० मी. इतक्या कमी खोलीवर आढळले आहेत. कच्चे लोखंड (क्रिव्हाइरोग व कूर्स्क, फेनोस्कँडीअन ढालक्षेत्र व खिबीनी) अँपेटाइन, सोने (सायबीरिया व अतिपूर्वेचा भाग), तसेच सायबीरियातील मँगॅनीज, बिस्मथ, तांबे, अभ्रक व ग्रॅफाइट यांचे साठे आणि बांधकामाचे दगड ही खनिज संपत्ती कँब्रियन-पूर्व खडकांत आढळते.
कँब्रियन कल्पात (सु. ६० ते ५१ कोटी वर्षापूर्वीच्या काळात)रशियन मंचाच्या पश्चिम कडेला जवळजवळ समांतर अशी कॅलेडोनियन ⇨मूद्रोणी निर्माण झाली. रशियाच्या आशियाई भागात उरलतिएनशान द्रोणी (खोलगट भाग) सायबीरियन मंचाच्या दक्षिणेस सरकून पूर्व सायबीरियन भूद्रोणीला मिळाली. दोन्ही मंचांच्या दक्षिणेस टेथिस समुद्र होता व त्याच्या दक्षिणेस ⇨गोंडवनभूमी होती. कँब्रियन काळातील खडक लेनिनग्राडनजिक (निळ्या मृत्तिका) व थोड्या प्रमाणात यूरोपीय रशिया, मध्य आशिया व पूर्व सायबीरिया येथील पर्वतांमध्ये आढळतात.
सिल्युरियन कल्पात (सु. ४४ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ⇨गिरिजननाची प्रचंड प्रमाणावरील (पर्वतनिर्मितीची) क्रिया होऊन कॅलेडोनियन भूद्रोणीत खूप फेरबदल झाले. या बदलांमुळे मंचांवर समुद्राच्या पाण्याचे आक्रमण झाले होते. सिल्युरियन निक्षेप रशियाच्या विस्तृत भागात आढळत असून ते लेनिनग्राड, प. युक्रेन, उरल,मध्य आशिया तसेच येनिसे व लीना नद्यांमधील प्रदेशांत जमिनीवर उघडे पडले आहेत. तेलयुक्त शेल (बाल्टितचा समुद्रतटीय प्रदेश), फॉस्फोराइट (प. युक्रेन), शिसे, जस्त व तांब्याची धातुके (कच्च्या रूपातील धातू उरल पैखोय, वायगाश बेट व नॉव्हायाझीमल्या), सैंधव व जिप्सम (सायबीरियन मंच), पाटीचा दगड, बांधकामाचा चुनखडक, वालुकाश्म ही या काळातील खनिज संपत्ती आहे.
डेव्होनियन कल्पाच्या (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) प्रारंभी कॅलेडोनियन भूद्रोणी दाबली जाऊन वर उचलली जाण्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड अटलांटिक खंड बनले, तर दक्षिणेस टेथिसमधील हर्सीनियन भूद्रोणीत हळूहळू गाळ साचत होता.रशियन मंचाच्या पूर्वेस ओल्ड रेड सँडस्टोन हा जमिनीवर साचलेला वालुकाश्म विस्तृत भागात असून त्याच्यावर उत्तर डेव्होनियन काळात उथळ समुद्रातील गाळ साचलेला आढळतो. उरल-तिएनशान भूद्रोणीत तीव्र ज्वालामुखी क्रिया घडून आली. उरलच्या पश्चिम उतारावर या काळातील चुनखडकांचे जाड थर, तर पूर्व बाजूंवर ज्वालामुखी खडक व टफ (ज्वालामुखीजन्य मऊ व सच्छिद्र खडक) आढळतात. या काळात टेथिस समुद्र पश्चिम सायबीरिया व मध्य आशिया भागात पसरलेला असून पूर्वेस तो सायबीरियन व चिनी मंचांपर्यंत गेलेला होता. पेचोरा (उख्ता) द्रोणीतील खनिज तेल, उरलमधील लोखंड व मँगॅनीज तसेच ज्वालामुखी क्रिया झालेल्या प्रदेशांमधील लोखंड व तांबे यांच्या धातुकांचे साठे, ही या काळातील खडकांत आढळणारी खनिज संपत्ती आहे.
हर्सीनियन गिरिजननाचा काळ मध्य कार्बॉनिफेरस (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षापूर्वीचा) असून यामुळे उरल-तिएनशान भूद्रोणी वर उचलली जाऊन उरल पर्वतरांगा निर्माण झाली. परिणामी समुद्रांच्या सीमा मोठ्या प्रमाणात बदलल्या आणि रशियाच्या यूरोपीय भागात सरोवरे असलेले सखल प्रदेश, दलदली किंवा उथळ आखाते निर्माण झाली. या काळातील उष्ण कटिबंधीय दमट जलवायुमान व दलदलींमधील विपुल वनश्री यांमुळे रशियातील दगडी कोळशाच्या प्रमुख साठ्यांची (उदा., मॉस्को, डोनेट्स, कारागांदा व कुझ्नेट्स्क येथील) निर्मिती झाली. शिवाय कार्बॉनिफेरस काळातील खडकांमध्ये बॉक्साइट, उच्च तापसह पदार्थ, मृत्तिका तसेच लोखंड व मँगॅनीजाची धातुकेही आढळतात.
वरील गिरिजनन पर्मियन कल्पातही (सु. २७·५ रे २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातही) चालू होते. शेवटी संपूर्ण हर्सीनियन भूद्रोणी गाळाने भरली जाऊन तिला अनुसरून कित्येक पर्वतक्षेणी निर्माण झाल्या. या पर्वतरांगांच्या पायथ्यालगत नवीन अल्पाइन-हिमालयन भूद्रोणी आकारास येऊ लागली. रशियन मंचावर समुद्राचा अरूंद पट्टा होता व या काळाच्या शेवटी तो चांगलाच उथळ झाला. यामुळे जिप्सम, लवण (मिठ) व पोटॅश यांचे प्रचंड थर साचले. उरलच्या पश्चिमेस शुष्क, वाळवंटी जलवायुमानामुळे तांबेयुक्त वालुकाश्म साचला.उरलच्या पूर्वेचे उष्ण कटिबंधीय जलवायुमान दगडी कोळसा बनण्यास अनुकूल होते. तंगुस्का द्रोणीतील लाव्हा-प्रवाहांमुळे काही दगडी कोळशाचे ग्रॅफाइटात रूपांतर झाले.
मध्यजीव महाकल्प (सु.२३ ते ९ कोटी वर्षापूर्वीचा काळ) हा वरील कल्पांच्या मानाने रशियात काहीसा शांततेचा काळ होता. समुद्र व खंडे यांच्यामध्ये या काळात झालेले मुख्यत्वे ⇨ महादेशजनक हालचालींमुळे घडून आले.या महाकल्पाच्या शेवटी मोठ्या प्रमाणावरील गिरिजनक हालचालींना पुन्हा सुरुवात झाली. याच्या आरंभीच्या ट्रायासिक कल्पात (सु. २३ ते २० कोटी वर्षापूर्वीच्या काळात) सागरी आक्रमण मागे हटण्याची क्रिया चालू राहिली व सायबीरियाचा काही सीमावर्ती भाग वगळता संपूर्ण रशिया पाण्याबाहेर राहिला होता. या काळात दक्षिणेकडे क्रिमिया, कॉकेशस व मंगिश्लाक द्वीपकल्प येथे घुसलेल्या टेथिसच्या आखातांमध्ये सागरी निक्षेप (मार्ल, मृत्तिका, वालुकाश्म व चुनखडक) साचलेले आढळतात तर उत्तर भागात जमिनीवर तांबडी वाळू व वाळवंटी मृत्तिका साचल्या. सोडियम क्लोराइड (मीठ वा सैंधव) व जिप्सम ही या काळातील महत्त्वाची खनिजे होत.
जुरासिक कल्पात (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) रशियन मंचाच्या उरल व कँब्रियन-पूर्व ढालक्षेत्र यांच्या दरम्यानच्या भागावर सागरी आक्रमण झाले होते. या उथळ समुद्रात साचलेले मार्ल, मृत्तिका यांचे दगड तांबडे निक्षेप रशियाचा उत्तर व मध्य भाग, कॉकेशस, क्रिमिया व कॅस्पियन समुद्राचा वायव्य भाग येथे आढळतात. जमिनीवरचे निक्षेप सायबीरियात व मध्य आशियात आहेत. चिल्याविन्स्क, अतिपूर्व भाग, कॉकेशस व मध्य आशिया येथे या काळातील दगडी कोळसा आढळतो. शिवाय या काळातील तेल शेल (व्होल्गा प्रदेश), फॉस्फोराइट, शिलामुद्रणाचा दगड, उच्चतापसह मृत्तिका व बांधकामाचे दगड ही खनिज संपत्तीही आढळते.
क्रिटेशस कल्पाच्या (सु. १४ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या काळाच्या)उत्तरार्धात जमीन व पाणी यांची आमूलाग्र स्वरूपात फेरमांडणी झाली. परिणामी रशियन मंचावर मोठे सागरी आक्रमण झाले. यामुळे चॉकचे जाड थर साचले ते बेलगराट व व्होल्गा नदीच्या मधल्या किनारी भागात आढळतात. क्रिटेशस कल्पाच्या शेवटी समुद्र मागे हटू लागला. त्याच सुमारास अल्पाइन-हिमालयन द्रोणीतील गिरिजनक हालचालींना गती आली. लिग्नाइट (सायबीरिया, अतिपूर्व भाग), खनिज तेल (एंबा), फॉस्फोराइट, चॉक, लिमोनाइट व बांधकामाचे दगड ही या काळातील खनिज संपत्ती आहे.
नवजीवन महाकल्पात (गेल्या सु. ६·५ कोटी वर्षाच्या काळात) खंडे व महासागर यांना हळूहळू आज असलेले स्वरूप प्राप्त झाले आणि या काळात अल्पाइन-हिमालयन गिरिजननाची क्रिया परमोच्य कोटीला पोचली.
तृतीय कल्पातील (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षापूर्वीच्या काळातील)निक्षेप मुख्यत्वे रशियाच्या दक्षिण भागात आढळतात. अल्पाइन-हिमालयन गिरिजननाचा पहिला रेटा जरी इओसीन (सु. ५·५ ते ३·५कोटी वर्षापूर्वीच्या) काळात बसला, तरी कार्पेथियन, क्रिमियन व पामीर-आलाय पर्वतरांगा ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातच अस्तित्वात आल्या व दक्षिणेकडून रेटल्या गेल्याने नंतरच्या काळात त्यांना आताची उंची प्राप्त झाली. अल्पाइन-हिमालयन भूद्रोणी नाहीशी झाली आणि भूमध्य, काळा व कॅस्पियन या समुद्रांच्या रूपात टेथिसचे अवशेष मागे राहिले.
तृतीय कल्पातील समुद्राचे काही भाग मुख्य समुद्रापासून अलग झाले आणि या तुंबलेल्या पाण्यापासून हायड्रोजन सल्फाइड वायू बाहेर पडू लागला. हा आविष्कार तृतीय कल्पाच्या सुरूवातीस फरगाना द्रोणीत, तर या कल्पाअखेरीस कॉकेशसच्या उत्तर व आग्नेय भागांत घडला. त्यातून खनिज तेलयुक्त थर तयार झाले. याच कल्पात काळा व कॅस्पियन समुद्र एकमेकांपासून अलग झाले. एल्ब्रुस व काझब्रेक हे कॉकेशसमधील ज्वालामुखी तसेच आर्मेनियातील लाव्हा-प्रवाहांचे अवशेष यांच्यावरून तृतीय कल्पात ज्वालामुखी क्रिया झाल्याचे दिसून येते. रशियातील खनिज तेलाचे सर्वांत समृद्ध साठे या कल्पातील खडकांत आढळतात. कॉकेशस व युक्रेनमधील लोखंड व मँगॅनीज यांचे समृद्ध साठे या कल्पातील समुद्रतटीय प्रदेशात आढळतात तर सरोवरी गाळात लिग्नाइट व सैंधव सापडतात. या काळातील अंबर हे मूल्यवान द्रव्य बाल्टिकच्या कालीनिनग्राड ओब्लास्ट या समुद्रतटीय भागात सापडते.
प्लाइस्टोसीन (सु.६ लाख ते ११ हजार वर्षापूर्वीच्या ) काळात रशियामध्ये तीन हिमकाल होऊन गेल्याचे पुरावे तेथील खडकांत आढळतात. हिमानी क्रियेचा परिणाम झालेले येथील प्रदेश ग्रीनलंडमधील प्रदेशांप्रमाणे दिसतात. हिमकाळात येथील हिमाच्या थरांची जाडी सु. २·५ किमी. पेक्षा जास्त होती. हिमनद्यांनी दोनदा येथून माघार घेतल्याचे पुरावेही आढळतात. अंतिम हिमोढाचे लोंबते भाग, एकाआड एक आढळणारे हिमोढ व हिमनदीय थर इ. हिमानी क्रियेचे ठळक पुरावे येथे आढळतात. स्कँडिनोव्हियन द्वीपकल्प, नॉव्हायाझीमल्या आणि तैमीर द्वीपकल्प या मध्यवर्ती ठिकाणांपासून चाकाच्या आऱ्यांप्रमाणे हिम पसरले होते. वाढते वर्षण व घटलेले बाष्पीभवन यांच्यामुळे कॅस्पियन समुद्राचा व्याप वाढला व तो व्होल्गा खोऱ्याच्या खालील भागात पसरला होता. याचप्रमाणे श्वेत समुद्राने यूरोपातील रशियाचा सर्वात उत्तरेकडील भाग व्यापला होता. वायव्य सायबीरियातील हिमाच्या अडथळ्याने ओब व येनिसे नद्यांची पात्रे तुंबली होती. त्यामुळे पश्चिम सायबीरियाच्या पुष्कळ भागावर पाणी पसरले होते. अशा प्रकारे बनलेल्या या गोड्या पाण्याच्या बहुधा सर्वांत मोठ्या सरोवरामध्ये गाळवट साचल्याने सायबीरिया अतिशय सपाट प्रदेश बनला. विटांची व मातीच्या भांड्यांची मृत्तिका, क्वॉर्ट्झयुक्त वाळू, रेती, चुनखडक, टफ, पीट तसेच सरोवरांत व दलदलींत साचलेली धातुके हे प्लाइस्टोसीन काळातील उपयुक्त खनिज पदार्थ होत.
लेखक : ठाकूर, अ. ना.
भूवर्णन :रशियात समशीतोष्ण गवताळ प्रदेश, दाट अरण्ये, या नैसर्गिक घटकांबरोबरच उंच पर्वतरांगा, पठारे, मैदाने असे विविध भौगोलिक घटकही आढळतात. रशियाची बहुतांश भूमी सखल असून निम्मी भूमी २०० मी. पेक्षा कमी उंचीची, तर एक-दशांश भूमी सस. पासून १,००० मी. पेक्षा अधिक उंचीची आहे. ढोबळमानाने येनिसे नदीच्या पश्चिमेकडील सखल प्रदेश व पूर्वेकडील उच्चभूमीचा प्रदेश असे रशियाचे दोन मुख्य व साधारण समान भाग केले जातात.पश्चिमेकडील सखल प्रदेश हा विस्तृत असून तो उरल पर्वतामुळे रशियन महामैदान किंवा पूर्व यूरोपीय मैदान व पश्चिम सायबीरियन मैदान अशा दोन भागांत विभागला गेला आहे. तसेच पूर्वेकडे येनिसे व लीना नद्यांदरम्यान मध्य सायबीरियन पठारी प्रदेश व बैकल सरोवराच्या पूर्वेकडील उच्चभूमीचा प्रदेश आहे. याशिवाय कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेस वैशिष्ट्यपूर्ण वाळवंटी व गवताळ प्रदेश आहेत. देशाच्या दक्षिण सरहद्दीवरून पूर्व-पश्चिम दिशेने उंच पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. प्राकृतिक दृष्ट्या रशियाचे एकूण सहा मुख्य विभाग पाडले जातात : (१) यूरोपीय मैदान, (२) उरल पर्वत, (३) अरल-कॅस्पियन सखल प्रदेश, (४) पश्चिम सायबीरियन मैदानी प्रदेश, (५) मध्य सायबीरियन पठारी प्रदेश व (६) पूर्व सायबीरियन उच्चभूमीचा प्रदेश.
(१) यूरोपीय मैदान : हा विभाग अत्यंत सुपीक, सपाट व साधारण उताराचा आहे. देशाच्या पश्चिम सरहद्दीपासून पूर्वेस उर पर्वतापर्यंत, तसेच उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेस कॉकेशस पर्वतापर्यंत पसरलेल्या या मैदानी प्रदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार सु. २,००० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार सु. ३,००० किमी. असून प्रदेशाची सस. पासूनची उंची सरासरी १८० मी. आहे. सर्वच दृष्टींनी हा देशातील प्रगत भाग आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तीनचतुर्थांश लोकसंख्या याच प्रदेशात आहे. या प्रदेशाचा उत्तर भाग पूर्वी हिमनद्यांनी वेढलेला होता. तेथे सरोवरे व दलदलीचे प्रदेश आढळतात, तर दक्षिण सरहद्दीवर कार्पेथियन, क्रिमियन व कॉकेशस पर्वतश्रेण्या आहेत. कॉकेशसमधील एल्ब्रुस (उंची ५,६३३ मी.) हे यूरोपमधील सर्वोच्च शिखर आहे. या विभागातील युक्रेन प्रदेशात व डॉन नदीच्या खोऱ्यात प्राचीन लोएस मैदाने आढळतात.
(२) उरल पर्वत : यूरोप व आशिया खंडांच्या परंपरागत सीमेवर साधारणपणे दक्षिणोत्तर दिशेत ही पर्वतश्रेणी पसरलेली आहे. उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेस जवळजवळ अरल समुद्रापर्यंत पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळेच रशियाचे यूरोपीय आणि आशियाई प्रदेश अलग झालेले दिसतात. वेगवेगळ्या नद्यांच्या खननकार्यामुळे या प्राचीन पर्वतीय प्रदेशाची उंची खूपच कमी झालेली दिसते. पर्वताची सरासरी उंची ६१० मी. आहे. उत्तर आणि दक्षिण भागांत मात्र १,५०० मी. पेक्षा अधिक उंचीची शिखरे आढळतात. उत्तरेकडील पर्वतश्रेणीची रूंदी १०० किमी. आहे. तेथील कटक जवळजवळ आहेत. दक्षिण भागात कटकांची रूंदी २०० मी. पर्यंत वाढलेली आहे. तेथील सर्वोच्च उंची १,६४० मी. आहे. मध्य उरल भागात कमी उंचीच्या व झीज झालेल्या कटकांच्या मालिका निर्माण झालेल्या असून या प्राकृतिक विभागातील हा अगदी दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. उरल पर्वतश्रेणी पार करणारे अनेक मार्ग या भागातूनच गेलेले आहेत. उरलमध्ये खनिजसंपदा भरपूर असून तेथे उद्योगधंदेही मोठ्या प्रमाणावर आढळतात.
(३) अरल-कॅस्पियन सखल प्रदेश किंवा सोव्हिएट मध्य आशियाई प्रदेश : कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेकडील हा प्रदेश कमी उंचीचा, वालुकामय व गवताळ पठारी स्वरूपाचा आहे. काराकुम (काळसर वाळू) व किझिलकुम (लालसर वाळू) हे दोन वाळवंटी प्रदेश या विभागात येतात. कॅस्पियन समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील मंगिश्लाक द्वीपकल्पावरील कारागाई गर्तिका समुद्रसपाटीपेक्षाही १३२ मी. खाली असून हा देशातील सर्वांत कमी उंचीचा भाग आहे. सोव्हिएट मध्य आशियाई भागात चीन-रशिया सरहद्दीदरम्यान पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या कोपेत-दा, तिएनशान, पामीर इ. अनेक पर्वतश्रेण्या व कटक आहेत. यांची शिखररेखा ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीची आहे. यामध्ये अगदी दक्षिण भागात पामीर श्रेणी असून तीत कम्युनिझम (७,४९५ मी.) व लेनिन (७,१३४ मी.) ही रशियातील शिखरे हेत. पामीर पर्वतश्रेणीत मोठमोठ्या हिमनद्या आहेत. तिच्या पूर्वेस अल्ताई, सायान पर्वतश्रेण्या तसेच बैकल सरोवराच्या सभोवताली पर्वतीय प्रदेश आढळतात.
(४) पश्चिम सायबीरियन मैदान : अल्ताई पर्वताच्या उत्तरेस व उरल पर्वताच्या पूर्वेस हा विभाग असून तो जगातील सर्वांत विस्तृत (२६ लक्ष. चौ. किमी.) असा सपाट मैदानी प्रदेश आहे. याची सस. पासूनची उंची २०० मी. पेक्षा अधिक कोठेही आढळत नाही. यातील निम्मा प्रदेश तर १०० मी. पेक्षाही कमी उंचीचा आहे. उत्तरेस आर्क्टिक महासागराला मिळणारी ओब नदीप्रणाली या भागाचे जलवाहन करते. तेथे विस्तृत पूरमैदानेही निर्माण झालेली आढळतात. प्रदेश अनेक ठिकाणी चिबडयुक्त आहे. तुलनेने या प्रदेशात नद्यांची संख्या कमी आहे.
(५) मध्य सायबीरियन पठारी प्रदेश : पश्चिम सायबीरियन मैदानी प्रदेशाच्या पूर्वेस येनिसे-लीना नद्यांदरम्यानच्या या पठारी प्रदेशाची सरासरी उंची ६१० मी. आहे. वेगवेगळ्या कालखंडातील खडकांपासून बनलेल्या परंतु झीज झाल्यामुळे विच्छेदित स्वरूपातील पठारांच्या मालिका येथे आढळतात. या पठारी प्रदेशाच्या वायव्य भागात पूतरान पर्वताचे १,७०० मी. उंचीचे अवशिष्ट गिरीपिंड, दक्षिण भागातील ३,३५० मी. पेक्षा अधिक उंचीच्या सायान व बैकल पर्वतश्रेण्या, उत्तरेस कातँगा मैदानाच्या पलीकडे तैमूर द्वीपकल्प (उंची १,१४६ मी.) हा उच्चभूमीचा प्रदेश, तर पूर्वेकडे लीना नदीच्या मधल्या खोऱ्यात ‘मध्य याकूत मैदान’ हा सखल प्रदेश आहे. पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी खोल दऱ्यांची व काही ठिकाणी कॅन्यनची निर्मिती केलेली आढळते.विविध प्रकारच्या खनिजांनी हा विभाग समृद्ध आहे.
(६) पूर्व सायबीरियन उच्चभूमीचा प्रदेश : रशियाचा हा पूर्वेकडील भाग प्रामुख्याने पठारी व जटिल पर्वतीय स्वरूपाचा आहे. याब्लोनाय, स्टॅनोव्हाय, जुग्जूर, व्हर्कोयान्स्क, चेर्स्की व कोलीमा ह्या या विभागातील प्रमुख पर्वतरांगा आहेत. पर्वतांची उंची ३,००० मी. पर्यंत आढळते. पूर्व किनाऱ्यावर अनेक पर्वतश्रेण्या असून त्यांतील काही सागरी बेटांच्या स्वरूपात दिसतात. या भागातील कॅमचॅटका द्वीपकल्पावर सु. २५ जागृत ज्वालामुखी आहेत. क्लीऊचिफ्स्काय हे या विभागातील सर्वोच्च ज्वालामुखी शिखर (उंची ४,७५० मी.) असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. ओखोट्स्क समुद्र व सॅकालीन बेटाच्या पूर्वेस कूरील ही उत्तर-दक्षिण दिशेत गेलेली पर्वतीय द्वीपमालिका असून तिच्यावर सु. शंभरांवर ज्वालामुखी आहेत त्यांपैकी जवळजवळ ३० जागृत ज्वालामुखी आहेत.
याशिवाय यूरोपीय रशियाच्या दक्षिण सरहद्दीवर अनेक अर्वाचीन वलीपर्वत आहेत. त्यांपैकी अतिपश्चिम भागात कार्पेथियन व काळ्या समुद्राच्या उत्तर भागात क्रिमियन पर्वतश्रेणी आहे. या दोन्ही पर्वतांच्या मुख्य श्रेणींची उंची १,२०० ते १,६०० मी. यांदरम्यान आढळते. काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांदरम्यानची कॉकेशस ही जटिल स्वरूपाची पर्वतश्रेणी आहे.
मृदा : नैसर्गिक साधनसंपदेच्या बाबतीत रशिया समृद्ध आहे. टंड्रा प्रकारची मृदा, पॉडझॉल, तांबूस-करडी मृदा, चेर्नोंसेम, चेस्टनट, वाळवंटी मृदा, तांबडी व पिवळी मृदा, पर्वतीय मृदा हे रशियातील प्रमुख मृदाप्रकार आहेत. देशाच्या अगदी उत्तर भागात कोला द्वीपकल्पापासून बेरिंग सामुद्रधुनीपर्यतच्या प्रदेशातील १०० ते ५०० किमी. रुंदीच्या पट्ट्यात टंड्रा प्रकारच्या मृदा आढळतात. पर्जन्यमान कमी असले, तरी बाष्पीभवनाचे प्रमाण सतत कमी असल्यामुळे मृदेत ओलसरपणा अधिक राहतो निचरा कमी होतो. जैव पदार्थाचे विघटन सावकाश होते. त्यामुळे टंड्रा प्रदेशातील मृदा प्रामुख्याने अधिक अम्लीय आहेत. वर्षातील बहुतेक काळ त्या बर्फाच्छादित असतात. केवळ उन्हाळ्यातच बर्फाचे वरचे काही मीटर जाडीचे थर विरघळतात. शेतीच्या दृष्टीने येथील मृदा निरुपयोगी आहेत. रशियाचे उत्तरेकडील जवळजवळ एक-तृतीयांश क्षेत्र पॉडझॉल प्रकारच्या मृदेने व्यापलेले आहे. साधारणपणे रशियातील अरण्यमय प्रदेशात ही मृदा आढळते. बाष्पीभवनापेक्षा वृष्टिमान अधिक असल्याने जमिनीतील पाणी खालच्या दिशेने झिरपत जाते. त्यामुळे निक्षालित मृदेची निर्मिती झालेली आढळते. सूचिपर्णी अरण्यमय प्रदेशात या मृदेचा वरचा थर अम्लीय, अर्धवट कुजकट पदार्थयुक्त असतो. येथे कुजण्याची क्रिया अत्यंत मंदगतीने होत असल्यामुळे विद्राव्य ह्यूमिक अम्लाची निर्मिती होऊन ते जमिनीत खालच्या दिशेने झिरपू लागते. वरच्या थरातील लोह व कॅल्शियमचे निक्षालन होते. विद्राव्य पदार्थांचे संचयन पुन्हा खालच्या थरात होते व तेथे लोहमिश्रित थर तयार होतो. त्या थरापासून खाली झिरपण्याची क्रिया घडत नाही. अक्षांश, भूरचना व मूलपदार्थ यांनुसार निक्षालनप्रक्रियेचे प्रमाण बदलत असते. दक्षिणेकडे या मृदेतील सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण वाढत गेल्याचे आढळते. त्यामुळे पॉडझॉल मृदापट्ट्यात जसजसे उत्तरेकडून दक्षिणेकडे जावे, तसतसे मृदेतील अम्लतेचे प्रमाण कमी होत जाते. मात्र कुजलेल्या पदार्थाचे प्रमाण वाढत जाऊन जमीन अधिक सुपीक बनत गेल्याचे दिसते. मूलतः पॉडझॉल मृदा कमी सुपीक असली, तरी आधुनिक कृषि-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या मृदेचा चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेतला जात आहे.
पॉडझॉल मृदेच्या दक्षिणेस तांबूस-करडी मृदा आढळते. पॉडझॉल मृदेपेक्षा या मृदेत निक्षालनप्रक्रिया कमी प्रमाणात होते. प्रामुख्याने पानझडी अरण्यांच्या प्रदेशात ह्या मृदेचा विकास झालेला असून तीत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक असते. शेतीच्या दृष्टीने ही मृदा महत्त्वाची आहे. रशियातील स्टेप प्रदेशात काळ्या रंगाची, एक ते दीड मीटर खोलीची व अत्यंत सुपीक अशी चेर्नोसेम मृदा आहे. रशियातील कृषिक्षेत्रापैकी दोन-पंचमांशापेक्षा अधिक क्षेत्र या मृदेने व्यापलेले आहे. पश्चिम युक्रेन ते नैऋत्य सायबीरिया यांदरम्यानच्या प्रदेशात ही मृदा आढळते. या काळ्या कसदार चेर्नोसेम मृदापट्ट्याच्या दक्षिणेकडील उष्ण व कोरड्या प्रदेशात चेस्टनट मृदा आढळतात. वनस्पतींचे प्रमाण कमी असल्याने सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमीच असते. येथे वृष्टिमान कमी व बाष्पीभवन जास्त होते असते. ही मृदा मुख्यतः क्षारीय स्वरुपाची बनलेली आहे. चेस्टनट मृदापट्ट्याच्या दक्षिणेकडील सोव्हिएट मध्य आशियाई विभागातील वाळवंटी प्रदेशात वालुकामय मृदा असून जेथे जलसिंचनाच्या सोयी आहेत, तेथे तिच्यातून चांगल्याप्रकारे कृषि-उत्पादन घेता येते. ट्रान्सकॉकेशसच्या पश्चिमेकडील आर्द्र विभागात सुपीक अशी तांबडी व पिवळी मृदा असून तीत चिकणमातीचे तसेच लोहाचे आणि कुजलेल्या पदार्थाचे प्रमाण अधिक असते. अग्निजन्य खडकांचे विदारण होऊन ही मृदा तयार झालेली आहे. तिची खोली जास्त असते.
खनिजे : औद्योगिक विकासास आवश्यक असणारी बहुतेक सर्व खनिजे रशियात सापडतात. महत्त्वाच्या खनिजांबाबत रशिया स्वयंपूर्ण आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, लोहधातुक, मँगॅनीज तांबे, शिसे, जस्त, निकेल, बॉक्साइट, टंगस्टन, पारा, अभ्रक पोटॅश या खनिजसाठ्यांबाबत रशिया जगात अग्रेसर आहे. यांशिवाय फॉस्फेट, टिटॅनियम, युरेनियम, गंधक, मॉलिब्डेनम इत्यादींचेही साठे भरपूर आहेत. जगाच्या सु. २०% कोळसा साठे रशियात आहेत. एकूण कोळसा साठ्यांपैकी जवळजवळ निम्म्यांपेक्षा अधिक साठे सायबीरियात असले, तरी जास्तीतजास्त उत्पादन यूरोपीय रशियातून (डोनेट्स, मॉस्को व पेचोरा खोऱ्यांतून) घेतले जाते. याशिवाय प. सायबीरियातील कुझनेट्स्क (कुझबास) व कझाकस्तानमधील कारागांदा खोरे ही इतर महत्त्वाची कोळसाक्षेत्रे आहेत. दक्षिण युक्रेनमधील डॉनबॅस-नीपर औद्योगिक पट्टा प्रामुख्याने डॉनबॅस (डोनेट्स) कोळसा क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोळसा उत्पादनाच्या एक-तृतीयांश उत्पादन या क्षेत्रातून घेतले जाते. युक्रेन, उरल, पर्वत आणि कझाकस्तान प्रजासत्ताकात लोहधातुकाचे विस्तृत साठे आहेत. क्रिव्हाइ रोग येथे देशातील सर्वात मोठी लोहखाण आहे. डॉनबॅस व क्रिव्हाइ रोग ही लोहमार्गानी एकमेकांशी जोडलेली आहेत. मॉस्कोच्या दक्षिणेकडील कूर्स्क हेसुद्धा लोहधातुकासाठी प्रसिद्ध आहे. मँगॅनीजचे जगात सर्वाधिक साठे रशियात असून जॉर्जिया व युक्रेन प्रजासत्ताके त्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. क्रिव्हाइ रोगजवळील निकॉपॉल हे मँगॅनीज खाणीसाठी प्रसिद्ध आहे. उरलमध्ये क्रोमियम, निकेल, तांबे, मँगॅनीज, लोह, बॉक्साइट अशी विविध प्रकारची खनिजे मिळतात. कॉकेशस व मध्य आशियातून तांबे व ॲल्युमिनियम, मध्य व पूर्व सायबीरियातून सोने व कथिल यांचे उत्पादन घेतले जाते. कझाकस्तानमधून तांबे, जस्त व शिसे मोठ्या प्रमाणावर मिळते. देशात खनिज तेलाचे सु. ४,००० कोटी पिंपे व नैसर्गिक वायूचे सु. २,८०,००० कोटी घ. मी. इतके प्रचंड साठे आहेत. रशियाचा नैसर्गिक वायू उत्पादनाचा सध्याचा वेग विचारात घेतला, तर हे उपलब्ध साठे रशियाला ८० वर्षांपर्यंत पुरतील असा अंदाज आहे. १९३७ मध्ये उत्तर कॉकेशस विभागातील बाकू हे खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनात अग्रेसर होते. त्यानंतर १९५० मध्ये प्रसिद्ध तेल-क्षेत्र म्हणून व्होल्गा-उरल (दुसरे बाकू) याला महत्त्व प्राप्त झाले. त्यावेळी सु. ३०% उत्पादन या क्षेत्रातून होत होते. १९५९ मध्ये प. सायबीरियातील ओब-इर्तिश खोरे (तिसरे बाकू) हे तेल-उत्पादनात देशातील प्रमुख केंद्र बनले. १९८० नंतर प. सायबीरियातील ट्यूमेन्स या तेल-क्षेत्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी देशात एक लक्ष किमी. पेक्षा अधिक लांबीचे नळ टाकले असून ते मुख्यतः मॉस्कोपासून बाहेरच्या प्रदेशांकडे गेलेले आहेत. केवळ कथिल हे महत्त्वाचे खनिज देशात पुरेशा प्रमाणात मिळत नाही.
भौगोलिक प्रदेश : भूपृष्ठरचना, नदीप्रणाली, मृदा, वनस्पती व हवामान या घटकांना अनुसरुन रशियाचे पुढीलप्रमाणे भौगोलिक किंवा नैसर्गिक विभाग पाडले जातात.
(१) टंड्रा प्रदेश : रशियाच्या अतिउत्तरेकडील आर्क्टिक महासागर किनाऱ्यालगत टंड्रा प्रकारचा प्रदेश असून त्याने देशाचे एकदशांश क्षेत्र व्यापलेले आहे. या प्रदेशाचा विस्तार पश्चिमेस नॉर्वेच्या सरहद्दीपासून पूर्वेस बेरिंगच्या सामुद्रधुनीपर्यत आहे. नॉव्हायाझीमल्या, फ्रान्झ जोझेफ लँड, सेव्हर्नायाझीमल्या, नोव्होसिबिर्स्क, रँगल या बेटांचा तसेच मुख्य भूमीच्या उत्तर भागापैकी कोला, यामल, गिडा व तैमूर द्वीपकल्पांचा आणि पेचोरा, ओब, येनिसे, कातँगा, लीना, इंडिगिर्का व कोलीमा या उत्तरवाहिनी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांचा टंड्रा विभागात समावेश होतो. टंड्रा प्रदेशातील हिवाळे दीर्घकालीन, तीव्र व अंधुक प्रकाशाचे आढळतात. उन्हाळ्याच्या मध्यातही येथील तापमान १०० से. पेक्षा कमी असते. सूर्याची उष्णता व बाष्पीभवन दोन्हीही कमी असल्यामुळे हा प्रदेश सतत हिमाच्छादित असतो. येथे वृष्टीही बेताचीच असते. २३ सप्टेंबर ते २१ मार्च या काळात टंड्रा प्रदेशात सूर्य क्षितिजाच्या वर अजिबात येत नाही. तसेच २२ मार्च ते २२ सप्टेंबर या काळात सूर्य सतत क्षितिजाच्या वर असतो. उन्हाळ्यात दलदल अधिक असते. त्यावेळी तेथे शेवाळ व टंड्रा प्रकारच्या इतर अल्पजीवी खुरट्या वनस्पती वाढलेल्या दिसतात. दलदलीमुळे उन्हाळ्यात डास व कीटक मोठ्या संख्येने दिसतात. याचवेळी दक्षिणेकडून अनेक पक्षी स्थलांतर करुन येथे आलेले असतात. ही नैसर्गिक परिस्थिती रेनडिअर प्राण्याला अनुकूल असल्याने तेथे त्याची संख्या अधिक दिसते. स्थानिक लोकांना हा प्राणी अत्यंत उपयुक्त ठरतो. टंड्रा प्रदेशातील कोला द्वीपकल्प खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. या द्वीपकल्पावर ॲपेटाइट (फॉस्फेटी खडक), लोह, निकेल ही खनिजे सापडतात. कोलाच्या दक्षिणेकडील कारेलिया द्वीपकल्पावर आढळणारी सरोवरे आणि प्राचीन कठिण खडकांवरुन वाहणाऱ्या द्रुतवाहयुक्त नद्या यांमुळे जलविद्युत्शक्ती निर्मितीच्या दृष्टीने हे द्वीपकल्प महत्त्वाचे आहे.
(२) तैगा प्रदेश : टंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेस असलेल्या सूचिपर्णी अरण्यांच्या किंवा तैगा प्रदेशाने रशियाचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापलेले आहे. पश्चिमेस फिनलंड सरहद्दीपासून पूर्वेस पॅसिफिक किनाऱ्यापर्यंत या प्रदेशाचा विस्तार आहे. प्रदेशाची रुंदी पश्चिमेस कमी, तर पूर्वेस अधिक आहे. तैगा प्रदेशाचा पूर्वेकडील निम्मा भाग, विशेषतः येनिसे नदीच्या पूर्वेकडील प्रदेश, सतत गोठलेला असतो. तैगाचे हवामान खंडीय प्रकारचे असून हिवाळे अतिशय कडक असतात. व्हर्कौयान्स्क हे ठिकाण तैगा प्रदेशातच आहे. वृष्टिमान साधारण (२० ते ५० सेंमी.) असते. पूर्व भाग अधिक कोरडा असतो. येथील मृदा राखी रंगाची, निक्षलित, अम्लीय पॉडझॉल प्रकारची आढळते. अंगावर फर असलेले सेबल, कोल्हा, लिंक्स, अस्वल यांसारखे प्राणी भरपूर प्रमाणात पहावयास मिळतात. स्प्रूस, पाइन, फर, लार्च, सीडार इ. वनस्पती येथील अरण्यांत आढळतात. तैगा विभागाच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशातून उत्तर द्वीना, ओब व इर्तिश नद्यांची सखल खोरी फारच दलदलयुक्त असून त्याच भागात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. तैगा प्रदेशातील प्राकृतिक रचना भिन्नभिन्न स्वरुपाची आढळते. प्लॅटिनम, निकेल, क्रोम, ॲस्बेस्टस, बॉक्साइट, लोहखनिज, खनिज तेल, कोळसा इ. खनिज साठ्यांनी समृद्ध असलेल्या उरल पर्वताचा बहुतांश भाग. येनिसे-लीना नद्यांदरम्यानचा विच्छेदित मध्य सायबीरियन पठारी प्रदेश, लीना नदीच्या पूर्वेकडील व दक्षिणेकडील चेर्स्की, सायान व अल्ताई ह्या २,००० ते ५,००० मी. उंचीच्या पर्वत रांगा, जगातील सर्वात खोल सरोवर बैकल, कॅमचॅटका द्वीपकल्प इत्यादींचा तैगा प्रदेशातच समावेश होतो. यातील कॅमचॅटका द्वीपकल्प सोने व हिऱ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
(३) मिश्र अरण्यांचा प्रदेश : यूरोपीय रशियात तैगा प्रदेशाच्या दक्षिणेस, मॉस्कोच्या सभोवती मिश्र अरण्यांचा त्रिकोणाकृती प्रदेश आहे. या प्रदेशात रुंदपर्णी व सूचिपर्णी अशी दोन्ही प्रकारची अरण्ये आढळतात. दक्षिणेकडे रुंदपर्णी वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. तैगा प्रदेशापेक्षा येथील हिवाळे सौम्य व उन्हाळे दीर्घकालीन असतात. वनस्पती व हवामानाला अनुसरून येथे तपकिरी मृदा निर्माण झालेली आढळते. ही मृदा साधारण पॉडझॉल प्रकारचीच परंतु अधिक सुपीक असते. तीन सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अधिक असते. प्रदेश साधारण उताराचा आहे. काही प्रदेश हिमाच्छादित असतो. येथील नदीप्रणाली अरीय प्रकारची असून काही ठिकाणी दलदल निर्माण झालेली असते.
खडकरचना मृदू प्रकारची असून पीट व लिग्नाइट कोळशाचे भरपूर साठे या भागात आहेत. बहुतांश प्रदेश १८० मी. पेक्षा कमीउंचीचा आहे. या यूरोपीय मिश्र अरण्यांच्या प्रदेशापासून पूर्वेस हजारो किमी. वर अमूर खोऱ्यातही मिश्र अरण्ये आहेत. येथील रुंदपर्णी वृक्ष मँचुरियन व जपानी प्रकारचे आहेत. या भागात अजूनही सायबीरियन वाघ आढळतात.
(४) स्टेप, वृक्षयुक्त स्टेप व अर्धवाळवंटी प्रदेश : उत्तरेकडील अरण्यमय प्रदेश व दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेश यांदरम्यान वनस्पतिरहित असा हा प्रदेश आहे. हा चेर्नोसेम मृदेचा पट्टा आहे. या प्रदेशाच्या उत्तरेस वृक्षयुक्त स्टेप प्रदेश व दक्षिणेस अर्धवाळवंटी प्रदेश असून त्या दोन्हींच्या दरम्यान स्टेपचा गवताळ प्रदेश आहे. मिश्र अरण्यांच्या प्रदेशापेक्षा येथील उन्हाळे अधिक उबदार व दीर्घकाळ असतात. निक्षालनप्रक्रिया कमी प्रमाणात होते. जमिनीचा रंग काळा असतो. कोरड्या प्रदेशात धूप अधिक होत असते. तेथील मऊ लोएस मृदा प्रदेशात घळ्या पडलेल्या दिसतात. मुख्य स्टेप प्रदेशापेक्षा वृक्षयुक्त स्टेप प्रदेशात पर्जन्यमान अधिक असते. स्टेप प्रदेशाच्या दक्षिणेकडे कॅस्पियन व अरल समुद्राकडील अर्धवाळवंटी प्रदेशात हवामान अधिक उष्ण व कोरडे बनत जाते. तसेच जमिनीची सुपीकता आणि वनस्पतींचे प्रमाणही कमी होत जाते. युक्रेनमधील स्टेप प्रदेशात लोहधातुक, मँगॅनीज, कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे अधिक आहेत. या भौगिलिक प्रदेशाइतकी सुपीक जमीन, शक्तिसाधने व खनिज संपत्ती इतर कोणत्याही भौगिलिक प्रदेशात आढळत नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा अत्यंत महत्त्वाचा भौगिलिक प्रदेश आहे.
(५) वाळवंटी प्रदेश : अर्ध-वाळवंटी प्रदेशाच्या दक्षिणेस मध्य आशियाई विभागात वाळवंटी स्वरुपाचा प्रदेश आहे. तेथील वार्षिक पर्जन्यमान २० सेंमी. असून तेही अनियमित स्वरुपाचे असते. वेगाने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे ह्या पर्जन्याचा विशेष उपयोग होत नाही. जलसिंचनाच्या सोयी असलेल्या प्रदेशात कापूस, फळे, पालेभाज्या यांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. मृदा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. भूपृष्ठावर अधूनमधून उघडेबोडके खडक व वालुकागिरी दिसतात. नद्या हंगामी स्वरुपाच्या आहेत. अमुदर्या व सिरदर्या या येथील कायमस्वरुपी नद्या असून त्यांच्या खोऱ्यांत गाळाची सुपीक मृदा तयार झालेली आहे. येथे लोएस मैदानेही आढळतात. कॅस्पियन समुद्राभोवतालचा बराचसा प्रदेश समुद्रसपाटीपेक्षा खाली असून तेथून खनिज तेल व खनिज मीठ मिळते. उत्तरेस असलेला कझाक उच्चभूमी हा प्राचीन व कठिण खडकयुक्त असा पठारी प्रदेश ओब व इर्तिश नद्यांमधील प्रमुख जलविभाजक आहे. त्याच्या दक्षिणेस अंतर्गत नदीप्रणाली आढळते. या पठारी प्रदेशात तांब्याचे व कोळशाचे भरपूर साठे आहेत.
(६) भूमध्यसागरी व उपोष्ण कटिबंधीय आर्द्र प्रदेश : या भौगोलिक प्रदेशाचा विस्तार फारच कमी आहे. काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांच्या किनाऱ्यांवरील अगदी थोडे क्षेत्र या विभागाने व्यापलेले आहे. या विभागात हिवाळ्यातील तापमान गोठणबिंदूच्या वर असते. क्रिमियन पर्वताच्या दक्षिण उतारावरील अरुंद किनारपट्टीवर भूमध्य सागरी प्रकारचे हवामान असून येथील उन्हाळे कोरडे व हिवाळे सौम्य व आर्द्र असतात. जमीन काळसर तपकिरी व वनस्पती भूमध्य सागरी प्रकारच्या आढळतात. पश्चिम ट्रान्सकॉकेशसचा काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील कोलखिडा सखल प्रदेश तसेच कॅस्पियन किनाऱ्यावरील काही प्रदेश उपोष्ण कटिबंधीय आर्द्र प्रकारचा आहे. थंड वायुराशीपासून हा प्रदेश संरक्षित राहिलेला आहे. देशातील सर्वात उबदार हिवाळे असलेला आणि वर्षभर आर्द्रता असलेला हा विभाग आहे. येथे दलदल तसेच मोसमी अरण्यांचे प्रमाण अधिक आहे. या भागात बांबू, चहा व भात यांची चांगली वाढ होते.
(७) दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेश : देशाच्या दक्षिण भागात असलेल्या वेगवेगळ्या पर्वतश्रेण्यांमधील नैसर्गिक घटकांमध्ये मात्र भिन्नता आढळते. मध्य आशिया किंवा पश्चिम कॉकेशसच्या पठारी भागात गवताळ प्रदेश आढळतात. तेथील जास्त पर्जन्यमान असलेल्या, विशेषतः तिएनशानच्या उत्तर उतारांवर, अरण्ये आढळतात. कॉकेशस पर्वतश्रेणीचा मुख्यतः पश्चिम भाग अधिक आर्द्र आहे. तेथे हिमाच्छादनही आढळते. हा भूकंपग्रस्त प्रदेश असून तेथे उष्ण पाण्याचे झरेही आढळतात. कॉकेशस तसेच मध्य आशियाई पर्वतीय प्रदेशात खनिज तेल, नैसर्गिक वायू, मँगॅनीज, टंगस्टन व मॉलिब्डेनमचे साठे आहेत. तिएनशान, अल्ताई पर्वत आणि पामीर पठार हे देशातील सर्वोच्च प्रदेश आहेत. जास्त उंचीमुळे हा प्रदेश बर्फाच्छादित असतो. वाळवंटी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांना या हिमक्षेत्रातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्यांचा जलसिंचनासाठी उपयोग करता येतो.
नद्या व सरोवरे : रशियात १० किमी. पेक्षा अधिक लांबीच्या सु. दीड लाखांहून अधिक नद्या असून त्यांची एकूण लांबी सु. ३२ लक्ष किमी आहे. जलविद्युत्शक्तीची जगातील सर्वाधिक निर्मितिक्षमता रशियात आहे. जगातील मोठ्या नद्यांमध्ये गणना होणाऱ्या अनेक नद्या रशियात असल्या, तरी त्या उत्तरेस किंवा दक्षिणेस वाहत असल्याने आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी किंवा व्यापारवृद्धीसाठी निरुपयोगी ठरल्या आहेत. आर्क्टिक महासागराला मिळणाऱ्या नद्या थंड हवामानामुळे वर्षातील बहुतेक काळ गोठलेल्याच असतात तर दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या आंतरराष्ट्रीय वाहुतकीच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या समुद्र किंवा महासागराला मिळत नसल्यामुळे त्यांचाही त्यासाठी उपयोग होत नाही. व्होल्गा, नीपर, नीस्तर, डॉन, नेमन, उत्तर द्वीना व पश्चिम द्वीना ह्या यूरोपीय रशियातील तर ओब, इर्तिश, येनिसे, अंगारा, लीना, अमूर ह्या आशियाई भागातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. पॅसिफिक व आर्क्टिक महासागर तसेच बाल्टिक व काळा समुद्र यांना मिळणाऱ्या नद्या आणि अंतर्गत अशा देशातील पाच प्रमुख नदीप्रणाल्या आहेत. बहुसंख्य नद्या उत्तरेस आर्क्टिक महासागराकडे वाहत असून त्या ५८% भूमीचे जलवाहन करतात. त्यांपैकी दोन-तृतीयांश प्रदेशाचे जलवाहन ओब-इर्तिश (लांबी ५,४१० किमी.), येनिसे (४,०९२ किमी.) व लीना (४,२६५ किमी.) या तीन नद्यांनी केलेले आहे. यांचे पाणलोट क्षेत्र अनुक्रमे ३२ ल. चौ. किमी., २४ ल. चौ. किमी. आणि २४ ल. चौ किमी. आहे. या तिन्ही नद्या रशियाच्या सायबीरियन विभागातून वाहत असून त्या हिवाळ्यात गोठलेल्या असतात. ओब नदीचे पाणलोट क्षेत्र सर्वाधिक असून तिने १४% प्रदेशाचे जलवाहन केलेले आहे. इर्तिश (४,२५० किमी.) व तोबोल या ओबच्या मुख्य उपनद्या आहेत. गिडा द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडून ओब नदी, तर पूर्वेकडून येनिसे नदी आर्क्टिक महासागराला मिळते. पश्चिम सायबीरियन मैदानाच्या पूर्व सीमेवरील एका द्रोणीमधून येनिसे वाहत असल्यामुळे पश्चिमेकडून फारच कमी उपनद्या तिला येऊन मिळतात. पूर्वेकडून मिळणाऱ्या नद्यांची संख्या अधिक आहे. निझ्नी, पत्काम्यिनाय, तंगुस्का व अंगारा ह्या येनिसेच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यांपैकी बैकल सरोवरातून उगम पावणारी अंगारा (१,७७० किमी). ही अधिक महत्त्वाची आहे. येनिसे व तिच्या उपनद्या मिळून मध्य सायबीरियन पठाराच्या पश्चिमेकडील अर्ध्या भागाचे जलवाहन करतात. लीना नदीचे पाणलोट क्षेत्र विविधतापूर्ण आहे. दक्षिणेकडील पहिला टप्पा ट्रान्स-बायकाल्य ह्या खंडविभंग पट्ट्यातून असून तेथेच लीन व तिच्या व्हीट्यीम, अल्येक्मा व अल्डान या उपनद्या उगम पावतात. नदीचा मधला टप्पा विस्तृत व खुल्या मैदानी प्रदेशातून वाहत असून या प्रदेशात तिला व्हील्यूई ही उपनदी येऊन मिळते. नदीचे खालचे खोरे पश्चिमेकडील मध्य सायबीरियन पठाराचे व पूर्वेकडील वली-पर्वताचे जलवाहन करते. याशिवाय उत्तर द्वीना, पेचोरा (यूरोपीय रशिया), इंडिगिर्का, कोलीमा (ईशान्य सायबीरिया) इ. आर्क्टिक महासागराला मिळणाऱ्या इतर अनेक लहानमोठ्या नद्या असून त्यांनी विस्तृत अशी सखल खोरी तयार केलेली आहेत. उत्तरेकडे श्वेत समुद्राला मिळणारी उत्तर द्वीना नदी (२,१७० किमी.) वर्षातील १९० दिवस गोठलेली असते.
रशियातील पाच नदीप्रणाल्यांपैकी बाल्टिक समुद्राला मिळणारी नदीप्रणाली फारच लहान आहे. या नदीप्रणालीने सु. ६ लक्ष चौ. किमी. क्षेत्र व्यापलेले आहे. नेमन, पश्चिम द्वीना, नार्वा व व्हॉल्काफ या बाल्टिक समुद्राला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. पूर्व यूरोपीय मैदानी प्रदेशातील व्हल्दाई टेकड्या (३४३ मी.) व इतर कमी उंचीच्या टेकड्यांमुळे बाल्टिक समुद्राला आणि काळा व कॅस्पियन समुद्र यांना मिळणाऱ्या नद्यांची खोरी अलग केलेली आहेत. काळ्या समुद्राला मिळणाऱ्या नदीप्रणालीचे पाणलोट क्षेत्र १४ लक्ष चौ. किमी. आहे. ह्या नदीप्रणालीने बेलोरशिया, मॉल्डेव्हिया, युक्रेन व पश्चिम कॉकेशसचे जलवाहन केलेले आहे. नीपर (२,२०० किमी.), डॉन (१,८७० किमी.), दक्षिण बग, नीस्तर ह्या यातील मुख्य नद्या आहेत. डॉन नदी ॲझॉव्ह समुद्रमार्गे काळ्या समुदाला मिळते. डॉन नदी दक्षिणेस वाहत असूनही मुखाजवळ वर्षातील सु. १२५ दिवस गोठलेली असते. नीपर नदीचा १,९९१ किमी. लांबीचा प्रवाह जलवाहतुकीस उपयुक्त ठरतो. याशिवाय कॉकेशसमधून अनेक लहानलहान वेगवान प्रवाह वाहतात.
देशाला विस्तृत असा पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला असला, तरी किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर जलविभाजक असल्यामुळे तेथील नदीप्रणालीने फारच कमी क्षेत्र व्यापलेले आहे. पाणलोट क्षेत्र सु. २२ चौ. किमी. असून ते देशाच्या सु. १०% आहे. येथील बहुतेक नद्या कमी लांबीच्या व शीघ्रप्रवाही आहेत. दक्षिणेकडील अमूर ही येथील मुख्य नदीप्रणाली आहे. शीर्षप्रवाहांसह चीनमध्ये उगम पावणारी अमूर नदी (४,६४० किमी.) ही ४,३२० किमी. अंतर चीन-रशिया सरहद्दीवरुन वाहते. उसूरी नदी मिळाल्यानंतर ती ईशान्य दिशेस २० किमी. अंतर वाहत जाऊन तार्तर या उथळ खाडीला मिळते. ही नदीसुद्धा बहुतेक गोठलेलीच असते. अमूर-उसूरी खोरे म्हणजे रशियाच्या अतिपूर्वेतील सर्वात जास्त वस्ती असलेला भाग आहे.
आर्क्टिकखालोखाल खंडांतर्गत नदीप्रणाली विस्तृत आहे. तिचे पाणलोट क्षेत्र ५३ लक्ष चौ. किमी. आहे. ढोबळ मानाने हिच्या कॅस्पियन व मध्य आशियाई अशा दोन नदीसंहती मानल्या जातात. कॅस्पियन नदीसंहतीत व्होल्गा (३,५३१ किमी.) ही मुख्य नदी असून तिने १५ लक्ष चौ. किमी. क्षेत्र व्यापलेले आहे. सायबीरियातील तीन मुख्य नद्यांखालोखाल या नदीचा क्रमांक असून यूरोपीय रशियातील तसेच यूरोपमधील ती सर्वात लांब व मोठी नदी आहे. मॉस्कोच्या वायव्येकडील व्हल्दाई टेकडयांत उगम पावून व्होल्गा नदी खंडांतर्गत कॅस्पियन समुद्राला येऊन मिळते. तिचा बराचसा प्रवाह वर्षातील तीन महिने गोठलेला असतो. कामा या मुख्य उपनदीसह व्होल्गा नदी यूरोपीय मैदानाचे तसेच उरल नदी पश्चिम बाजूचे जलवाहन करते. उरल, टेरेक, अराक्स ह्या कॅस्पियन नदीप्रणालीतील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. मध्य आशियाई विभागात खंडांतर्गत नदीप्रणाली असून अमुदर्या (२,४०० किमी.) व सिरदर्या (२,९८० किमी.) ह्या यातील मुख्य नद्या आहेत. ह्या दोन्ही नद्या दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेशात उगम पावून उत्तरेकडे अरल समुद्राला जाऊन मिळतात.
देशात सु. २,७०,००० सरोवरे असून त्यांत कॅस्पियन, अरल, बैकल, बालकाश व लॅडोगा ही जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी आहेत. त्या प्रत्येकाचे क्षेत्रफळ १०,००० चौ. किमी. पेक्षा अधिक आहे. कॅस्पियन समुद्र (३,९८,८२१ चौ. किमी.) हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून तो जगातील सर्वात मोठा खंडांतर्गत जलसाठा आहे. हा समुद्र यूरोप-आशिया सरहद्दीवर असून सस. पासून २८ मी. खोलीवर आहे. अरल (६८,६८० चौ. किमी.) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे खंडांतर्गत सरोवर आहे. ही दोन्हीही सरोवरे असली, तरी त्यांना समुद्र म्हणूनच ओळखले जाते. लॅडोगा (१७,७०३) चौ. किमी.) हे यूरोपमधील सर्वांत मोठे सरोवर आहे. सायबीरियातील बैकल हे जगातील सर्वांत खोल (१,७४२ मी.) सरोवर म्हणून ओळखले जाते. सोव्हिएट मध्य आशियाई भागात बालकाश हे सरोवर आहे. यांशिवाय १,००० चौ.किमी. पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली १४ सरोवरे देशात आहेत. त्यांत ओनेगा व इसिककूल ही प्रमुख आहेत. उत्तरेकडील अनेक नद्या सरोवरांद्वारे समुद्राला मिळतात. विशेषतः कारेलिया व कोला द्वीपकल्पांवरील अनेक नद्या सरोवरातून उगम पावतात, सरोवरांतूनच वाहत जातात व सरोवरांमध्येच विलीन होतात.
हवामान : अक्षवृत्तानुसार रशियातील हवामानाचे वेगवेगळे पट्टे आढळतात. अतिउत्तरेकडील, विशेषतः आर्क्टिक महासागरातील, बेटांवर आर्क्टिक प्रकारचे हवामान आढळते. यूरोपीय रशियाचा आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेकडील भाग, पश्चिम सायबीरिया आणि ६०० ते ७०० उ. अक्षवृत्तांदरम्यानचा मध्य व पूर्व सायबीरिया या भागांत उप-ध्रुवीय प्रकारचे हवामान आणि उर्वरित यूरोपीय रशिया, सायबीरिया, दक्षिणेस ४०० उ. अक्षवृत्तापर्यंतचा मध्य आशिया यांत समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आहे. ट्रान्स-कॉकेशिया व दक्षिण मध्य आशियाच्या काही भागांत उपोष्ण प्रदेशीय हवामान आढळते. दीर्घकालीन व तीव्र हिवाळ्यांसाठी रशिया प्रसिद्धच आहे. बराचसा भूप्रदेश उत्तर ध्रुववृत्ताच्या उत्तरेस असल्याने देशाचा जवळजवळ निम्मा भाग सतत गोठलेला असतो. हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागांवरुन थंड खंडीय वारे वाहतात. नेपोलियन व हिटलर यांना रशिया पूर्णपणे जिंकता आला नाही, याचे एक कारण म्हणजे येथील थंड हवामान हे सांगितले जाते. रशियन भूमी महासागरापासून दूरवर पसरलेली असल्याने रशियाच्या बहुतांश भागातील हवामान खंडीय स्वरुपाचे असून उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतू तेथे स्पष्टपणे जाणवतात. उन्हाळे उबदार व अल्पकालीन, तर हिवाळे थंड आणि दीर्घकालीन असतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे, विशेषतः मध्य आशिया व पूर्व सायबीरिया यांत हवामान अधिक खंडीय आहे. क्रिमियाच्या दक्षिण किनाऱ्यावर भूमध्य सागरी प्रकारचे, तर रशियाच्या अगदी पूर्वेकडील किनाऱ्यावर मोसमी हवामान आढळते. नैऋत्य सायबीरिया हा रशियातील सर्वांत थंड हवामानाचा प्रदेश आहे. तेथील जानेवारीचे सरासरी तपमान –४६० से, असून ते –६८० से. पर्यंतही खाली जाते. ईशान्य सायबीरियातील व्हर्कोयान्स्क येथील जानेवारीचे तपमान –५०० इतके कमी असते. येथे –७०० से. इतक्या न्यूनतम तपमानाची नोंद झालेली आहे. जुलैचे कमाल तपमान १५० से. असते. काही वेळा ते ३८० से. पर्यंतही वाढते. वस्ती असलेल्या ठिकाणांमध्ये येथील वार्षिक तपमानकक्षा ही जगात सर्वांत जास्त आहे. मे ते सप्टेंबर असे पाच महिने व्हर्कोयान्स्कचे तपमान शून्य अंश से. पेक्षा अधिक असते. येथील वार्षिक सरासरी वृष्टिमान १०·२ सेंमी. असून त्यातील दोन-तृतीयांश वृष्टी जून ते ऑगस्टदरम्यान होते. सायबीरियातील ऑइम्याकन येथे १९६४ मध्ये –७१० से. इतक्या नीचतम तपमानाची नोंद झाली. जगातील वस्ती असलेल्या ठिकाणांपैकी या ठिकाणाचे हे सर्वात नीचतम तपमान आहे. हिवाळ्यातील सर्वाधिक तपमान दक्षिण मध्य आशियात असते. तेही गोठणबिंदूपेक्षा काही अंशच वर असते.
हिवाळ्यात यूरेशियन भूखंड थंड झाल्यामुळे मध्य आशियावर जास्त भाराचा विस्तृत प्रदेश निर्माण झालेला असतो. त्यामुळे मध्य सायबीरियाच्या दक्षिण सरहद्दीवरील प्रदेशात जानेवारीमध्ये हवेचा कमाल भार १,०४० मिलीबार आढळतो. या जास्त भाराच्या एका दाब कटकाचा (रिजचा) विस्तार अरल, कॅस्पियन आणि काळ्या समुद्राच्या उत्तरेतून पश्चिमेस यूरोपपर्यंत आढळतो तर दुसऱ्या दाब कटकाचा विस्तार बैकल सरोवर, ईशान्य सायबीरिया व तेथून आर्क्टिक महासागराकडे आढळतो. देशाच्या अति-वायव्येस व ईशान्येस कमी भाराचे प्रदेश असतात. मात्र तेथील हवेचा भार १,००० मिलीवारपेक्षा अधिक असतो. जास्त भाराच्या पश्चिम दाबकमानीच्या उत्तरेकडील प्रदेशात वारे नैऋत्येकडून किंवा दक्षिणेकडून वाहतात. कटकाच्या दक्षिणेस ते वारे उत्तरेकडून किंवा ईशान्येकडून वाहतात. अगदी पूर्व भागात सायबीरियातील जास्त भाराच्या प्रदेशापासून थंड वारे बाहेरच्या बाजूस वाहत जातात. त्यामुळे पॅसिफिक किनाऱ्याचे तपमान कमी होते. उन्हाळ्यात याच्या उलट स्थिती आढळते. उन्हाळ्यात खंडाच्या मध्य भागात कमी भाराचा प्रदेश निर्माण होऊन बाहेरच्या प्रदेशाकडून तेथे वारे वहात येतात. पश्चिम भागात त्यांची दिशा वायव्येकडून किंवा उत्तरेकडून, तर पूर्वेकडे पॅसिफिक किनाऱ्यावर ती दिशा पूर्वेकडून किंवा आग्नेयीकडून असते. उन्हाळ्यातील दाबप्रवणता कमी असते.
मध्य आशियाचा अगदी दक्षिण भाग, क्रिमियाचा काळा समुद्रकिनारा व पश्चिम ट्रान्सकॉकेशिया हे प्रदेश वगळता बहुतेक रशियन भूमीवर हिवाळ्यातील जानेवारीचे तपमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. पर्वतीय प्रदेशामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांपासून काळ्या समुद्राच्या किनारी प्रदेशाचे संरक्षण झालेले आहे. हिवाळ्यात मैदानी प्रदेशातील समतापरेषांची दिशा वायव्य-आग्नेय अशी असते. अक्षवृत्तांनुसार हिवाळ्यातील तपमानात विशेष बदल जाणवत नाही, तर हवेचा दाब व प्रचलित वाऱ्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. लेनिनग्राड येथील जानेवारीचे सरासरी तपमान –८० से. असते. हिवाळ्याची तीव्रता खंडांतर्गत तसेच ईशान्य सायबीरियात अधिक जाणवते. तेथे जानेवारीचे सरासरी तपमान -४०० से. असते. उन्हाळ्यात आर्क्टिक किनाऱ्यावर जुलै महिन्याचे सरासरी तपमान ४० ते ८० से. असते. दक्षिणेकडे तपमानात वाढ झालेली दिसते. मध्य आशियाई वाळवंटी प्रदेशात फक्त उन्हाळे दीर्घकालीन असून येथील जुलैचे सरासरी तपमान ३२० से. असते. काळ्या समुद्राच्या आग्नेय किनाऱ्यावरील बाटूमी येथील जानेवारीचे तपमान शून्य अंश सेल्सिअस असते. स्टेप प्रदेशात हिवाळे फारच थंड, तर उन्हाळे उष्ण व कोरडे असतात. लीना नदीच्या मुखाशी असलेले सॅगॅस्टीर येथे जून, जुलै व ऑगस्ट असे तीनच महिने शून्य अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमान असते. ऑगस्टमधील कमाल तपमान केवळ ५० से. असते. हिवाळ्यात डिसेंबर ते मार्च या काळात तेथे-३०० से. पेक्षाही कमी तपमान असते.
वायुराशींचे स्वरूप व हालचाल, समुद्रापासूनचे अंतर व प्रदेशाची उंची यांनुसार रशियातील वृष्टिमानात भिन्नता आढळते. देशाच्या पश्चिम सरहद्दीपासून व पॅसिफिक किनाऱ्यापासून अंतर्गत भागाकडे वृष्टिमान कमीकमी झालेले दिसते. रशियाच्या पश्चिमेकडील अर्ध्या भागात वृष्टिमान वायव्येकडून आग्नेयीकडे कमीकमी होत जाते. बाल्टिक प्रजासत्ताके, बेलोरशिया व रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या पश्चिमेकडील काही प्रांतांमध्ये ६० सेंमी. पेक्षा अधिक वृष्टी होते. यूरोपीय मैदानाच्या बहुतांश भागात ४५ ते ५५ सेंमी., तर पश्चिम सायबीरियातील सखल प्रदेशातून ४० ते ४५ सेंमी. वृष्टी होते. मॉस्को येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५३ सेंमी. आहे. मध्य आशियाई प्रदेशाच्या अंतर्गत भागात वार्षिक वृष्टिमान एकदम कमी झाले असून अरल समुद्राच्या दक्षिणेस ते केवळ ५ ते ६ सेंमी. इतके कमी झालेले दिसते. पूर्व सायबीरियन पठारी प्रदेशातील वृष्टिमान ३० ते ४० सेंमी. असून लीना खोऱ्यात ते २५ सेंमी. पर्यत कमी झालेले आहे. आर्क्टिक किनाऱ्यावर त्याहीपेक्षा वृष्टिमान कमी आढळते. टंड्रा प्रदेशात केवळ एक ते दोन महिनेच उन्हाळा असतो तसेच तेथे वर्षातील आठ ते बारा महिने पर्जन्य किंवा हिमवृष्टी होत असते. पॅसिफिक किनाऱ्यावर मात्र वृष्टिमान वाढलेले आढळते.
रशियातील वेगवेगळ्या पर्वतीय प्रदेशांत सभोवतालच्या प्रदेशांपेक्षा वृष्टिमान अधिक आहे. यापैकी पश्चिम कॉकेशसचा काळ्या समुद्र किनाऱ्यावरील काही प्रदेश सर्वाधिक वृष्टिमानाचा असून तेथील सस. वरील वार्षिक वृष्टिमान २०० सेंमी. पेक्षा अधिक आहे. त्यापेक्षाही तेथील सागरसन्मुख उतारावर जास्त वृष्टी होते. अतिपूर्वेकडील किनारी प्रदेशात उन्हाळ्यात समुद्रावरुन वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे भरपूर वृष्टी होते. या प्रदेशातील स. स. वरील वृष्टिमान ६० ते ७० सेंमी. असून पर्वतीय प्रदेशात १२० सेंमी. पेक्षा अधिक वृष्टी होते. रशियाच्या बहुतांश भागात उन्हाळ्यातील वृष्टिमान अधिक असते. बहुतेक पर्जन्य आरोह प्रकारचा असतो. काळा समुद्रकिनारा व मध्य आशियाई प्रदेशात वृष्टी अधिक होत असली, तरी ती हिवाळ्यातही पुरेशी असते. बऱ्याचशा प्रदेशांत ती हिमस्वरुपात होते. काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील केवळ काही प्रदेशच हिमवृष्टीपासून पूर्णतः मुक्त आहे. मध्य आशियाई वाळवंटी प्रदेशातही तीन ते दहा आठवड्यांपर्यंत हिमाच्छादन आढळते. उत्तरेकडे हिमाच्छादनाचा कालावधी वाढत जातो. यूरोपीय मैदानात अडीच ते चार महिने, पश्चिम सायबीरियाच्या सखल प्रदेशात तीन ते सहा महिने, तर आर्क्टिक किनाऱ्यावर आठ ते नऊ महिने हिमाच्छादन असते.
देशाच्या अगदी दक्षिण भागातील दक्षिण युक्रेन, उत्तर कॉकेशस, ट्रान्स-कॉकेशियन सखल भूमी व मध्य आशियाच्या दक्षिण भागात सहा महिन्यांपेक्षा अधिक हिमतुषारहीन काळ असतो तर सायबीरियाच्या अंतर्गत भागात व आर्क्टिक किनाऱ्यावर तो दोन महिन्यांपेक्षा कमी असतो. सॅगॅस्टीर येथील वार्षिक सरासरी वृष्टिमान ८·४ सेंमी. असून त्यातील तीन- चतुर्थांश वृष्टी जून ते सप्टेंबर या महिन्यांत होते.
वनस्पती व प्राणी : रशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ एक-तृतीयांश क्षेत्र अरण्यांखाली असून जगाच्या सु. एक-पंचमांश लाकूड उत्पादन रशियातून होते. देशात सु. १७,००० जातींचे मोठे वृक्ष आहेत. ज्ञात वनस्पतिप्रकारांपैकी जवळजवळ निम्मे वनस्पतिप्रकार रशियात आढळतात. अक्षवृत्तीय विस्ताराला अनुसरुन देशातील अरण्यमय प्रदेशाचे वेगवेगळे पट्टे पाडले जातात. उत्तरेकडील आर्क्टिक किनारपट्टी व सायबीरियातील उंच पर्वतीय प्रदेशात टंड्रा प्रकारच्या तुरळक वनस्पती आढळतात. टंड्रा प्रदेशाचे सामान्यपणे तीन विभाग केले जातात. त्यांपैकी सर्वांत उत्तरेकडील आर्क्टिक टंड्रा प्रदेश अधिक ओसाड व वृक्षरहित आहे. यापट्ट्यात येणाऱ्या आर्क्टिक बेटावर तसेच तैमीर द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील निम्म्या प्रदेशात शेवाळे, दगडफूल वनस्पती व विविध प्रकारचे गवत आढळते. याच्या दक्षिणेकडील झुडुपमय टंड्रा प्रदेशात शेवाळे, दगडफूल, फुलझाडे, भूर्ज, वाळुंज, दलदलीच्या भागात वाढणारी स्फॅग्नम वनस्पती व इतर खुरट्या वनस्पती आढळतात. यात काही आर्क्टिक बेटे, यूरेशियाची उत्तर सरहद्द व पॅसिफिकमधील कमांडर बेटांचा समावेश होतो. त्याच्या दक्षिणेस अरण्यमय टंड्रा हा उपपट्टा असून त्यामध्ये ओसाड भूमी, अधूनमधून दलदल व वाळुंज, भूर्ज, स्प्रूस, फर, लार्च इ. वृक्षांची विरळ अरण्ये आढळतात. येथील वृक्षांची उंची कमी असते. भूर्ज आणि फर वृक्षांचे पश्चिमेस, तर लार्च वृक्षांचे पूर्वेकडील भागात आधिक्य आहे.
टंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेस तैगा किंवा सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा रुंद पट्टा असून त्याचा विस्तार रशियाच्या पश्चिम सरहद्दीपासून पूर्वेकडे पॅसिफिक किनाऱ्यापर्यंत आहे. येनिसे नदीच्या पश्चिमेकडील पश्चिम तैगा व पूर्वेकडील पूर्व तैगा, असे त्याचे भाग आहेत. येनिसेच्या पश्चिमेकडील पूर्व यूरोपीय मैदान व पश्चिम सायबीरियन मैदानी प्रदेशात फर, स्प्रूस, पाइन, सिल्व्हर फर, सीडार, सायबीरियन लार्च हे सूचिपर्णी प्रकारचे वृक्ष तर पूर्वेकडील मध्य व पूर्व सायबीरियात लार्च वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. पश्चिम सायबीरियातील तैगा प्रदेशात दलदल अधिक असून तेथे वेगवेगळ्या प्रकारची कुरणेही आढळतात. रशियन मैदान व प. सायबीरियन मैदानी प्रदेशातील दक्षिण तैगा विभागात असलेल्या बर्च व ॲस्पेन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात आलेली आहे. आर्थिक द्दष्ट्या सूचिपर्णी अरण्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
उत्तरेकडील सूचिपर्णी अरण्यांचा प्रदेश व दक्षिणेकडील वनस्पतिरहित स्टेपचा गवताळ प्रदेश यांच्या दरम्यान सूचिपर्णी व रुंदपर्णी पानझडी अशा दोन्ही प्रकारच्या वृक्षांची मिश्र अरण्ये आहेत. कमी उंचीच्या प्रदेशाकडे रुंदपर्णी पानझडी वृक्षांचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसते. मिश्र अरण्यांत वेगवेगळे टप्पे दिसतात. सर्वांत उंच टप्पा ओक, स्प्रूस, कागदी लिंबू, ॲश, ॲस्पेन, भूर्ज, एल्म, हॉर्नबीम, पाइन, मॅपल या वृक्षांचा असतो. त्यालालोखाल वर्ड चेरी व पर्वतीय ॲश वृक्षांचा टप्पा असतो तर तळाशी वेगवेगळी झुडुपे व गवत आढळते. या पट्ट्याच्या नैऋत्य भागातील रुंदपर्णी अरण्यात बीच व होर्नबीम अधिक सापडतात. अगदी पूर्वेकडे या पट्ट्याच्या दक्षिण भागातील अमूर-उसूरी सखल प्रदेशात पाइन किंवा सिल्व्हर फर हे सूचिपर्णी वृक्ष अधिक आहेत. खोलगट भागात व कमी उंचीच्या पर्वत उतारावर रुंदपर्णी ओक वृक्षांची अरण्ये व त्यांत काळे भूर्ज वृक्ष मिसळलेले दिसतात. मिश्र अरण्यांच्या प्रदेशात काही ठिकाणी केवळ गवताळ प्रदेशाचे पट्टे आढळतात. मिश्र व पानझडी अरण्यांचा-विशेषतः पश्चिमेकडील-बराचसा प्रदेश शेतीखाली आणलेला आहे.
रशियन मैदान व पश्चिम सायबीरियन मैदानी प्रदेशातील सूचिपर्णी व मिश्र अरण्यांच्या दक्षिणेस अरुंद अरण्यमय स्टेप प्रदेश व त्याचा दक्षिणेस गवताळ स्टेप प्रदेशाचा पट्टा आहे. येथे उबदार उन्हाळे व कोरडे हवामान असते. अरण्यमय स्टेप प्रदेशाच्या यूरोपीय विभागात गवताबरोबरच ओक व इतर पानझडी वृक्ष तर पश्चिम सायबीरियन सखल प्रदेशात भूर्ज व ॲस्पेन वृक्ष आढळतात. देशाच्या पश्चिमेकडील अर्ध्या भागात मॉल्डेव्हिया व युक्रेनपासून नैऋत्य सायबीरिया व उत्तर कझाकस्तानपर्यंत तसेच काळा-कॅस्पियन समुद्रकिनारा आणि कॉकेशस पर्वताच्या पायथ्यापर्यंत सलग असा स्टेपच्या गवताळ प्रदेशाचा विस्तार आढळतो. त्यात वनस्पतींचे प्रमाण फारच कमी आहे. तेथील केवळ नद्यांच्या खोऱ्यांतच अरण्ये आढळतात. अलीकडे स्टेपच्या गवताळ प्रदेशाचा बराचसा भाग शेतीखाली आणला असून तो रशियातील प्रमुख कृषिविभाग बनलेला आहे.
रशियन मैदानाच्या आग्नेय भागातील येरगिन्यी टेकड्यांपासून अल्ताई व तिएनशान पर्वत संहतीपर्यंतचा भाग निमओसाद स्वरुपाचा आहे. त्यात ठिकठिकाणी गवत व झुडुपे आढळतात. अगदी दक्षिणेकडील कॅस्पियन खोलगट प्रदेश आणि मध्य आशियाई मैदानी प्रदेश वाळवंटी स्वरुपाचा आहे. तेथे अत्यंत तुरळक वनस्पती व गवत आढळते. काळ्या समुद्राच्या किनारी प्रदेशात सामान्यपणे ओक, जूनियर व पाइन ह्या भूमध्य सागरी प्रकारच्या वनस्पती आढळतात. रशियातील पर्वतीय प्रदेशात उंचीनुसार वनस्पतिप्रकारांमध्ये भिन्नता दिसते. सायबीरिया व अतिपूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात सूचिपर्णी अरण्ये तर तेथील जास्त उंचीच्या प्रदेशात टंड्रा प्रकारच्या वनस्पती आढळतात. मध्य आशियाई कोरड्या हवामान विभागातील पर्वतात कमी उंचीकर रुंदपर्णी वनस्पती तर जास्त उंचीच्या भागात सूचिपर्णी अरण्ये व अल्पाइन गवताळ प्रदेश आढळतात.
उत्तरेकडील आर्क्टिक विभागात प्राणिजीवन फारच मर्यादित आहे. तेथे मुख्यतः ध्रुवीय अस्वल, हिमससा, सील, वॉलरस, आयडर, लग, लून इ. प्राणी व पक्षी आढळतात. उन्हाळ्यात आर्क्टिक किनाऱ्यावर पाणकोंबड्यांचे थवे पहावयास मिळतात. आर्क्टिक विभागाच्या दक्षिणेकडील टंड्रा प्रदेशात रेनडिअर, हिमकोल्हा, आर्मिन, हिमससा, लेमिंग हे प्राणी आढळतात. उन्हाळ्यात हंसपक्षी, बदक इ. स्थलांतरित पक्षी टंड्रा प्रदेशात पहावयास मिळतात. रशियाच्या तैगा अरण्यमय प्रदेशात उदी रंगाची अस्वले, सेवल, हरिण, सांवर, लिंक्स, हिमससा व रेनडिअर हे प्राणी क्रॉसबिल, नट क्रॅकर, कोकिळ, घुबड, सुतारपक्षी इ. पक्षी व काही सरपटणारे प्राणी आढळतात. विरळ अरण्यात वीव्हर, ससे व खारी दिसतात. मिश्र अरण्यांत रानडुक्कर, हरिण, मिंक इ. प्राणी हॉफिंच, ऑरिओल, घुबड, बुलबुल इ. पक्षी विविध प्रकारचे साप, सरडे, कासव इ. सरपटणारे प्राणी सापडतात. पूर्वेकडील स्टेप प्रदेशात हरिण तसेच मारमॉट, जर्बोआ, हॅमस्टर इ. कुरतडणारे प्राणी वहिरी ससाणा, क्रेन, गरूड, भारद्वाज इ. पक्षी खूप आहेत. मध्य आशियाई विभागातील वाळवंटी पर्वतीय प्रदेशात हरिण, अस्वल, तरस, चित्ता वाघ हे प्राणी आढळतात. रशियाच्या समुद्र किनाऱ्यावर सरोवरांमध्ये व नद्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडतात.
लेखक : चौधरी, वसंत
इतिहास : प्रागैतिहासिक काळातील मानवी वसतीचे बरेचसे अवशेष रशिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात आढळले आहेत. इ. स. पू. सु. आठव्या-सातव्या शतकांत काळ्या समुद्राचा उत्तर किनारा व क्रिमिया येथे सिथियन लोकांचा अंमल होता, असे दिसून येते. इ. स. पू. तिसऱ्या शतकात सार्मेशियन लोकांनी या भागात प्रवेश केला. इसवी सनाच्या प्रारंभापासून ते दहाव्या शतकापर्यंत रशियात एकही प्रभावी सत्ता अस्तित्वात नव्हती. अनेक रानटी टोळ्यांच्या धाडी येत. त्यांपैकी काही नदीकाठी स्थिरावत व स्थलांतर करीत. इ. स. तिसऱ्या शतकानंतर रशियातील स्टेप या गवताळ प्रदेशावर अनेक परकीय टोळ्यांची आक्रमणे झाली. त्यात गॉथ, हूण, तुर्की आणि आवार ह्या प्रमुख टोळ्या होत्या. तुर्की कझारांनी सातव्या शतकात दक्षिण रशियात आपली सत्ता स्थापन केली आणि आठव्या शतकात वल्गरांनी व्होल्गा नदीकाठी राज्य स्थापन केले. यानंतर स्लाव्ह लोकांनी उत्तर युक्रेन व बेलोरशियात सत्ता स्थापन करून नॉव्हगोरॉड व स्मोलेन्स्क ही दोन नगरे वसविली. त्यांच्या वसाहती व्होल्गा नदीच्या उत्तरेला आणि अका नदीच्या पूर्वेस पसरल्या होत्या. त्यांच्यावर कझारांचे वर्चस्व होते. पुढे व्हॅरन्जिअन या स्कँडिनेव्हियन लोकांच्या आगमनाने नवव्या शतकात रशियातील राजकीय घडामोडींत आमूलाग्र बदल घडले. लॅडोगा या सरोवराच्या परिसरात वस्ती केलेल्या स्लाव्ह व इतर टोळ्यांतील तंटे मिटविण्यासाठी उत्तरेच्या व्हॅरन्जिअन (रूस) लोकांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यातील रूरिक, सिन्यूस व द्रुव्होर या तीन बंधूंनी पुढाकार घेऊन रशियात तीन स्वतंत्र घराणी स्थापन केली. रूरिकने नॉव्हगोरॉड येथे ८६२ मध्ये राज्य स्थापन केले. व्हॅरन्जिअनांमधूनच पुढे रूस किंवा ऱ्होस ही संज्ञा रूढ झाली असावी, असे परंपरा सांगते. रूरिकनंतर ओलेक (कार. ८७९–९१२) गादीवर आला. त्याने आपली राजधानी कीव्ह येथे हलविली (८८२). ११६९ पर्यंत कीव्ह ही या घराण्याची राजधानी होती. ओलेगने पूर्वेकडील स्लाव्ह लोकांची कझारांच्या वर्चस्वातून मुक्तता करून बायझंटिन साम्राज्याबरोबर व्यापारी करार केला (९११).
कीव्हच्या राज्याचा प्रभाव वाढतच गेला. कीव्हला रशियन नगरींची जननी ही पदवी मिळाली. कीव्हच्या राजांनी कॉन्स्टँटिनोपलपर्यंत पसरलेल्या व्यापारी जलमार्गांचे बल्गार, कझार आणि पेचेनेग या टोळ्यांच्या आक्रमणांपासून रक्षण करण्याचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले. पहिल्या व्ह्लॅदिमिर (कार. ९८०–१०१५) राजाच्या वेळी हा जलमार्ग निर्वेध होऊन राज्य स्थिरावले. ग्रिक ऑर्थोडाक्स चर्चचा स्वीकार व प्रसार झाला तसेच बायझंटिन संस्था व संस्कृती यांचे बीजारोपण झाले व प्रभाव वाढला. व्ह्लॅदिमिरच्या मृत्यूनंतर यरस्लाव्ह (कार. १०१९–१०५४) गादीवर आला. त्याने पेचेनेग टोळ्यांचा बीमोड केला पण कॉन्स्टँटिनोपलच्या तुर्की धाडींपासून कीव्ह राज्यास अभय मिळवून देण्यात मात्र त्यास अपयश आले. यरस्लाव्ह राजाची कारकीर्द कीव्हच्या इतिहासात खूप महत्त्वपूर्ण ठरली. रूस्काया प्रावदा या नावाच्या विधिसंहितेचा उदय स्वीडन, फ्रान्स, हंगेरी, पोलंड या देशांबरोबर विकसित झालेले व्यापारी तसेच राजघराण्यातील विवाहसंबंध आणि राजांना सल्ला देण्यासाठी उदयाला आलेली प्रतिनिधिमंडळे ही या कारकीर्दींची काही वैशिष्ट्ये होत. यरस्लाव्हनंतर राज्याचे त्याच्या वारसांत विभाजन झाले आणि राजसत्ता कीव्हमधून पश्चिमेकडे सरकली गेली. पुढे आंद्रयव्ह वोगोलुबस्की (कार. ११६९–११७४) याने व्ह्लॅदिमिर ही राजधानी केली (११६९).
जर्मनी व इटली येथील राजघराण्यांच्या उदयानंतर व्यापारी मार्ग बदलले. इ. स. १२०४ मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला आणि कीव्हऐवजी नॉव्हगोरॉड, गाल्यिच, व्ह्लॅदिमिर-व्हालिन्स्की या शहरांना महत्त्व प्राप्त झाले. चंगीझखानाचा नातू बाटुखान याच्या नेतृत्वाखाली मंगोल टोळ्यांनी कॉकेशस पर्वत ओलांडून मुसंडी मारली (१२३७–४०) आणि रूस सैन्याचा पराभव केला. नॉव्हगोरॉड शहर वगळता उर्वरित नगरे त्याने उद्ध्वस्त केली दक्षिण आणि पूर्व रशियात मंगोल किंवा तार्तरांनी ‘गोल्डन होर्ड’ या नावाने प्रसिद्धीस आलेले राज्य स्थापिले. त्यांच्या आधिपत्याखाली रशियातील फार मोठा भूप्रदेश होता. त्यांनी पोलिश आणि हंगेरियन लोकांना नेस्तनाबूत केले.
रशियन इतिहासात कीव्हनंतर मॉस्कोची सत्ता सुरू झाली. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात मस्क्वा नदीच्या तीरावर उदयाला आलेल्या मॉस्को नगरीने खुष्कीच्या मार्गावर तसेच जलमार्गावर विसंबून यूरोपीय रशिया आणि सायबीरिया येथपर्यंत आपले व्यापारी संबंध वाढविले. हे संबंध व त्यातून उत्पन्न झालेले वर्चस्व प्रभावी ठरले आणि लिथ्युएनिया, त्वेर, नॉव्हगोरॉड इ. प्रतिस्पर्धी राज्यांचा पराभव करण्यात मॉस्को यशस्वी झाले. या यशात मॉस्कोच्या भौगोलिक स्थानाचा तसेच अलेक्झांडर नेव्हस्कीपासून सुरू झालेल्या राजघराण्याच्या कर्तुत्वाचाही वाटा आहे. या राजघराण्याने प्रारंभी तार्तर राजांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण १२३८ नंतर तार्तर राजांनाच आव्हान देण्यास त्याने प्रारंभ केला. अखेर १४८० मध्ये तिसऱ्या इव्हानच्या (कार. १४६२–१५०५) आधिपत्याखाली या घराण्याने तार्तर राज्य नष्ट केले.
नॉव्हगोरॉडनंतर पर्मचा पाडाव झाला (१४७२). नंतर १४८९ मध्ये इतरत्रही मॉस्कोची अधिसत्ता प्रस्थापित झाली. इव्हानचा १४७२ मध्ये विवाह झाला. या विवाहामुळे शेवटच्या बायझंटिन राजघराण्याशी इव्हानचा संबंध आला आणि मॉस्कोच्या राजाला सम्राटपद मिळाले. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर मॉस्कोलाच ‘तिसरे रोम’ हे बिरूद प्राप्त झाले. नवी विधिसंहिता, उमरावांना प्राधान्य देणारी नवी राजवट आणि प्रशासनाची पुनर्रचना या घटनांमधून मॉस्कोचे राज्य स्थिरावले. [⟶ मॉस्को].
चौथा इव्हान (इव्हान द टेरिबल : कार. १५३३-१५८४) याच्या कारकीर्दीपासून पीटर द ग्रेटच्या कारकीर्दीपर्यंत (१७२५) रशियासमोर दोन प्रश्न होते : (१) रशियावर उमरावांनी राज्य करावे की एकतंत्री झारनेच सारा कारभार चालवावा ? (२) मॉस्कोने केवळ भूभागांवरच राज्य करावे की समुद्रापर्यंत झेप घेऊन आपले साम्राज्यक्षेत्र वाढवावे? पीटरच्या कारकीर्दीत या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली. रशियात झारची एकतंत्री राजवट रूजली आणि रशियाने साम्राज्यविस्तारही केला.
चौथ्या इव्हानला सुरुवातीस सत्तेसाठी परस्परांमध्ये झगडणाऱ्या वोयार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सरंजामदारांशी (अमीरउमरावांशी) संघर्ष करावा लागला. त्यांची बलस्थाने त्याने नष्ट केली. घरादारांवर जप्ती आणली आणि त्यांनी लष्करी सेवा सक्तीची केली. जमीनदारांबरोबर त्याने शेतकऱ्यांवर भूदास होण्याची बळजबरी केली आणि बोयारच्या अंतर्गत व्यवस्थेसाठी या सुंदोपसुंदीतून रशियास मुक्त केले. परिणामतः त्याची एकतंत्री सत्ता दृढ झाली. त्याच्या कारकीर्दीत रशियन साम्राज्य वेगाने विस्तारले. कॅस्पियन समुद्राची सीमा गाठण्यात आणि सायबीरियावरील विजयामुळे पॅसिफिक समुद्रापर्यंत जाण्यात रशियास यश मिळाले पण १५८३ पर्यंत जर्मन, स्वीडिश आणि पोलिश सैन्यांना पराभूत करण्यात मात्र रशिया अपयशी ठरला व बाल्टिक समुद्रापासून दूरच राहिला. त्याच्या कारकीर्दीत (१५५०) झेम्स्की सोवर (राष्ट्रीय मंडळ) कार्यरत झाले आणि पुढे राजाची (झार) निवड या मंडळातर्फे होऊ लागली. तसेच फौजदारी विधिसंहिता तयार झाली आणि इंग्लंडशी करार होऊन त्यापासून युद्ध साहाय्य मिळण्यास सुरुवात झाली. सागरी सीमापर्यंत रशियन साम्राज्य पसरावे, या हेतूने त्याने शेजारील राष्ट्रांशी अनेक वेळा संघर्ष केला. चौथ्या इव्हानच्या मृत्युनंतर त्याचा अशक्त मुलगा पहिला थीओडर गादीवर आला. त्याच्या मृत्युनंतर सरंजामदार वर्गाने उठाव केला. याचवेळी चौथ्या इव्हानच्या दमीत्री नामक मुलाच्या तोतयाने काही काळ धुमाकूळ घातला. तेव्हा व्हासीली शूईस्कईला औटघटकेचा राजा करण्यात आले. पुढे ह्या राजालाही पदभ्रष्ट करण्यात आले. या अराजकाचा फायदा घेऊन पोलिश व स्वीडिश यांनी आक्रमणे सुरू केली. पोलंडचा राजा झीगिसमुंट याने बोयार यांच्या बरोबर करारकरून मॉस्कोपर्यंत धडक मारली. हा राजा मॉस्कोत सत्ताधीश होणार हे नक्की झाले, तेव्हा १६१२ मध्ये मात्र रशियन जनतेची राष्ट्रभावना जागी झाली. याच सुमारास राजपुत्र पझारस्की हा तोतया दमीत्री म्हणून पुढे आला. त्याने रशियन फौजांचे नेतृत्व केले आणि मॉस्कोवरील अधिसत्ता दृढ केली (१६१३). पुढे त्याचा खून झाला व काही काळ स्वीडनच्या राजाकडे रशियाची सूत्रे गेली. १६०५ ते १६१३ या आठ वर्षांच्या अस्थिरतेच्या कालखंडास दुर्दशेचा कालखंड (टाइम ऑफ ट्रबल्स) म्हणतात. या काळात रशियन समाजजीवनात महत्त्वपूर्ण स्थित्यंतरे झाली व परिणामतः रमानव्ह राजवटीला लोकमान्यता मिळाली. अशा परिस्थितीत देशात पुन्हा राष्ट्रभावना चेतविण्यात आली. या राजघराण्यातील म्यिखइल रमानव्ह (कार-१६१३–१६४५) या सतरा वर्षाच्या तरूणाला झेम्स्की सोबोरने एकमताने झार म्हणून निवडले. बोयार वर्गालाही हे धोरण स्वीकारार्ह वाटले. या घराण्याने रशियावर रशियन राज्यक्रांती होईपर्यंत सत्ता गाजविली. म्यिखइल रमानव्हने प्रथम पोलंडशी समझोता करून स्मोलेन्स्कवरचा रशियाचा हक्क सोडून दिला आणि स्वीडनशी करार करून फिनलंडच्या आखातातून काढता पाय घेतला.
या दुरवस्थेच्या कालखंडात कझाक टोळ्यांनी रशियन शेतकऱ्यांशी एकजूट साधली होती. पुढे म्यिखइल रमानव्हच्या वारसदाराला म्हणजे अलेक्सीस (कार. १६४५–१६७६) याला या टोळ्यांच्या घुसखोरीस तोंड द्यावे लागले. कझाक टोळ्यांनी पोलंडमध्ये पसरलेल्या पूर्व युक्रेनवर चाल केली, थेट काळ्या समुद्रापर्यंत झेप घेतली पण पोलिश जमीनदारांपुढे मात्र या टोळ्यांना हार खावी लागली. अखेर बगदान खम्येल्मन्यीत्स्की या टोळीप्रमुखाला पोलंडच्या विरोधात रमानव्ह घराण्याशी तडजोड पतकरावी लागली. त्याने रमानव्ह घराण्याचे साहाय्य मागितले व मोबदला म्हणून युक्रेनचा भूप्रदेश देण्याची तयारी दर्शविली.रशियाच्या राष्ट्रीय मंडळाने या देवघेवीस संमती दिली. तेव्हा पोलंडबरोबर रशियाची लढाई झाली (१६६७) आणि रशियाला स्मोलेन्स्क, कीव्ह व युक्रेनचा अर्धा हिस्सा यांची प्राप्ती झाली. अलेक्सीसच्या कारकीर्दीत रशियन समाजावर-विशेषतः अनेक शेतकऱ्यांवर-भूदास होण्याची पाळी आली. अलेक्सीसनंतर त्याचा अपंग मुलगा तिसरा थीओडोर राजपदी आरूढ झाला. त्याची कारकीर्द जेमतेम सहा वर्षाची झाली. त्याच्या मृत्युनंतर (१६८२) सॉफया नावाची त्याची सावत्र बहीण जेमतेम सात वर्षे कारभार चालवीत होती पण क्रिमियन तार्तर टोळ्यांशी तसेच मंगोल टोळ्यांबरोबर संबंध वाढविण्यात सॉफयाची राजवट अपयशी ठरली. लवकरच एका षड्यंत्रात या राजवटीची आहुती पडली. ⇨पीटर द ग्रेट (कार. १६८९–१७२५) या तिच्या सावत्र भावास राजसिंहासन मिळाले.
पीटरची प्रारंभीची काही वर्षे आईच्या जरबेखाली किंवा निदान तिच्या संमतीने राज्यकारभार पाहण्यात गेली तथापि याही काळात त्याने आरमार, सुतारकाम, लोहारकाम, छपाई इ. विषयांत रस घेऊन त्यांचा अभ्यास केला. त्याच्या या स्वच्छंद जीवनाला आळा घालण्यासाठी त्याच्या आईने यूदॉक्सिआ लपूख्यिन या युवतीशी त्याचे लग्न केले (१६८९). तरीही त्याच्या एकूण वृत्तीत फरक पडला नाही. पुढे तुर्कस्तानबरोबरच्या ॲझॉव्ह येथील युद्धात तो सहभागी झाला (१६९५). याच सुमारास त्याचा सावत्र भाऊ इव्हान मरण पावला. साहजिकच राज्याची सर्व जबाबदारी पीटरवर पडली आणि तो स्वतंत्र सत्ताधीश (झार) झाला (१६९५). १७२५ पर्यंत त्याने अनियंत्रितपणे राज्य केले. रशियात आमूलाग्र स्थित्यंतरे घडवून आणण्याच्या ईर्षेने तो तीस वर्षे प्रयत्नशील होता. रशियाची सर्वांगीण प्रगती घडवून आणून यूरोपात ते एक समर्थ, समृद्ध व सुसंस्कृत राष्ट्र म्हणून त्याला स्थान प्राप्त करून द्यावे, अशी त्याची इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून त्याने परराष्ट्रीय व अंतर्गत धोरणात लक्षणीय बदल केले. ॲझॉव्हच्या युद्धात रशियन सैन्यातील विशेषतः नौदलातील दोष त्याच्या लक्षात आले त्याने आरमाराचे आधुनिकीकरण करण्यासाठी आपल्या लोकांना अभ्यासासाठी यूरोपात धाडले. स्वतः १६९७-१६९८ दरम्यान हॉलंड, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया इ. देशांना त्याने भेटी दिल्या आणि आरमारासंबंधीची सर्व माहिती जमा केली. १६९८ मध्ये नाविक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नवी दृष्टी व नऊशे तंत्रज्ञ घेऊन तो मायदेशी परतला आणि अल्पकाळातच त्याने नौदल सुसज्ज केले. शिवाय अनेक लढाऊ नौका बांधल्या. भूवेष्टित रशियाला काही मोक्याची सागरी स्थळे मिळवून जलमार्गांनी बाह्य जगाशी जोडणे आवश्यक होते. त्याच्या पुढील सर्व लढायांमागे हे एक कायम सूत्र होते. या धोरणानुसार त्याने स्वीडनच्या बाराव्या चार्ल्सचा पराभव केला (१७०९) तुर्कस्तानशी युद्ध करून वाल्टिक प्रदेश जिंकला आणि यूरोपशी जलमार्गाने संपर्क साधता यावा म्हणून सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) ही नवी राजधानी त्याने स्थापन केली.
अंतर्गत सुधारणांसाठी विद्या, कला, व्यवसाय इत्यादींतील तज्ञांना त्याने पाचारण करून चर्चचाही आपल्या धोरणांना अनुकूल असा बंदोबस्त केला. ऑस्ट्रियासारखे सुसज्ज भूदल, हॉलंडसारखे समर्थ नौदल आणि स्वीडनसारखी कार्यक्षम प्रशासनयंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याने शासकीय यंत्रणेची पुनर्रचना केली. व्यापाराला प्रोत्साहन दिले आणि कोनाकोपऱ्यातून प्राथमिक शाळा व विद्यालये स्थापन केली. रशियन भाषेची वर्णमाला सुलभ करून अरबी अंकगणित स्वीकारले. पीटरच्या सांस्कृतिक व शैक्षणिक सुधारणा क्रांतीकारक होत्या. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी त्याने पहिली अकादमी स्थापन केली (१७०३). वेशभूषा, चालीरिती, खाणेपिणे इत्यादींचेही त्याने पश्चिमीकरण केले. दाढी वाढविण्यासाठी परवाना घ्यावा लागे. त्यावर कर लादण्यात आला. या सर्व सुधारणांमुळे सरकारी खजिन्यावर ताण पडला. साहजिकच त्याने नवे कर लादले. यातून सैन्याची आणि लोकांची अंतर्गत बंडे उद्भवली. ती त्याने निर्दयपणे मोडून काढली. अखेतच्या दिवसांत त्याला नव्या रशियाच्या या आदर्श कल्पना नष्ट होत असल्याचे दिसते. रशियाच्या राष्ट्रीय मंडळाने त्याचा सम्राट म्हणू गौरव केला.
पीटरच्या मृत्यूनंतर त्याची द्वितीय पत्नी कॅथरिन जेमतेम दोन वर्षासाठी (कार. १७२५–१७२७) सत्तारूढ झाली. तिच्या पाठोपाठ पीटरचा नातू दुसरा पीटर (कार. १७२७-१७३०) गादीवर आला. तो वयाच्या बाराव्या वर्षी राजा झाला. पण केवळ तीन वर्षांनंतर त्याचाही अकाली मृत्यू झाला व पीटरच्या ॲनानामक पुतणीला (कार. १७३०-१७४०) राज्य चालविण्याची संधी मिळाली. ॲनाला मूलबाळ नव्हते. तिने इव्हान अंतोनव्हिच (कार. १७४०-१७४१) या आपल्या भाच्यास आपला वारस म्हणून नेमले व तो अल्पवयीन असल्यामुळे एर्न्स्ट व्यिरॉन नावाच्या आपल्या जर्मन प्रियकराची पालक म्हणून नेमणूक केली. रशियन जनतेने मात्र या जर्मन हस्तक्षेपास यशस्वी विरोध केला व पीटरच्या मुलीस म्हणजे एलिझाबेथला (कार. १७४१–१७६२) गादीवर बसविले. या काळात रशियाच्या आर्थिक विकासाला अधिक वेग आला. मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली आणि प्रशियाबरोबर झालेल्या सप्तवर्षीय युद्धात रशियाने निर्णायक भूमिका बजावली पण तिच्या पाठोपाठ गादीवर आलेल्या तिसऱ्या पीटरने प्रशियाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीने-दुसऱ्या कॅथरिनने-राजाचे विरोधक संघटित करून तिसऱ्या पीटरला पदच्युत केले. त्याच्यावर हद्दपारीची पाळी आली अखेर विजनवासात तो मरण पावला.
दुसऱ्या कॅथरिनची (कार. १७६२–१७९६) राजवट महत्त्वाची ठरली. जन्माने जर्मन असलेल्या या राणीने स्वतःचे रशियनीकरण करून दाखविले. तिच्या कारकीर्दीत रशियाचे साम्राज्य काळ्या समुद्रापर्यंत पसरले व पश्चिमेकडे पोलंडचा बराच मोठा हिस्सा गिळंकृत केला. १७६८ ते १७७४ या काळात तुर्कस्तानबरोबर युद्ध झाले. त्यातून रशियाला काळ्या समुद्राचा फार मोठा किनारा मिळाला व ऑर्थोडॉक्स चर्चला कॉन्स्टँटिनोपल येथे कार्यालय सुरू करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे तुर्कस्तानातील ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांना एक आश्रयस्थान प्राप्त झाले. रशिया व तुर्कस्तान यांमधील युद्धात प्रशियाने बाजू घेतली. १७७२ मध्ये झालेली पोलंडची फाळणी ही त्याचीच परिणती होती. पुनश्च १७८७ ते १७९२ या पाच वर्षांत रशियाला तुर्कस्थानबरोबरच्या दुसऱ्या युद्धात उतरावे लागले. या युद्धामुळे काळ्या समुद्राचा उर्वरित उत्तर किनारा रशियाच्या आधिपत्याखाली आला. १७८३ मध्येच रशियाने क्रिमियन द्वीपकल्पावर वर्चस्व मिळविले होते. कॅथरिन राणीने संपूर्ण यूरोपातूनच तुर्की मंडळींची हकालपट्टी करण्याचा निर्धार केला, तो या पार्श्वभूमीवरच. १७९२ मध्ये रशियाने पोलंडमध्ये घुसखोरी केली. तिथल्या सेनेचा पराभव केला व १७९३ मध्ये प्रशियाच्या साहाय्याने तर १७९५ मध्ये ऑस्ट्रियाच्या साहाय्याने पोलंडची दुसरी व तिसरी फाळणी केली. कॅथरिनला पॅसिफिक ओलांडून अलास्कावर अधिकार मिळविण्याचीही आकांक्षा होती कारण फरचा व्यापार करणाऱ्या रशियन धनिकांना इतर देशांच्या व्यापाऱ्यांशी जीवघेणी स्पर्धा करावी लागत होती आणि रशियाचे अलास्कावरचे प्रभुत्व व्यापाऱ्यांना आधार देईल, अशी तिची अटकळ होती.
दुसऱ्या कॅथरिनने उमरावांना राज्याच्या अनिवार्य सेवेतून मुक्त केले व १७७५ मध्ये या उमरावांच्या प्रतिनिधिमंडळाकडे प्रांतिक सरकारे सुपूर्द केली. याच सुमारास देशात स्थानिक स्वराज्य संस्थाही स्थापन करण्यात आल्या. उमरावांना प्राप्त झालेल्या या अधिकारांमुळे भूदासांमध्येही आपल्या पारतंत्र्याबाबत असंतोष उफाळला. यिमिल्यान पुगचॉव्ह नामक एक टोळी-प्रमुखाने या असंतोषाचा फायदा उठवून तिसरा पीटर अशी स्वतःची द्वाही फिरविली व दुसऱ्या कॅथरिनच्या विरोधात बंड केले पण रशियन सेनेने ही बंडाळी मोडून काढली. पुगचॉव्हप्रणीत बंडाळी, तसेच तत्कालीन फ्रेंच क्रांती या घटनांच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या कॅथरिनची राजवट प्रतिगामी ठरली.
दुसऱ्या कॅथरिननंतर तिचा मुलगा पहिला पॉल हा सत्तास्थानी आला पण तो लहरी व एककल्ली होता. फ्रेंच राज्यक्रांतीचे वारे रशियात येऊ नयेत, या हेतूने पॉलने अनेक जाचक नियंत्रणे लोकांवर लादली. तेव्हा पॉलचा खून झाला (१८०१) आणि त्यानंतर पॉलचा मुलगा पहिला अलेक्झांडर (कार. १८०१–१८२५) गादीवर आला.
त्याने पहिल्या नेपोलियन विरूद्धच्या तिसऱ्या फळीत सहभाग घेतला. साहजिकच पहिल्या अलेक्झांडरला १८०५ मध्ये ऑस्टरलिट्झ येथे व १८०७ मध्ये फ्रीटलांट येथे नेपोलियनबरोबर लढावे लागले. त्यात रशियाचा पराभव झाला व नेपोलियनच्या फौजा पोलंड आणि पूर्व प्रशियापर्यंत येऊन धडकल्या. तिल्सितच्या तहाने (१८०७) फ्रान्स व रशिया एकमेकांचे काहीकाळ सहकारी बनले. म्हणूनच स्वीडन आणि तुर्कस्तान या दोन देशांना हरवून त्यांच्याकडून अनुक्रमे फिनलंड व बेसारेबिया हे भूभाग काबीज करण्यात रशियास यश मिळाले. या काळातच म्यिखइल स्पिरान्स्कीने देशाच्या संविधानाचा आराखडा तयार केला. सदर आराखड्याप्रमाणे जिल्ह्यानिहाय व प्रांतिक राष्ट्रीय मंडळाची निर्मिती निवडणुकांच्या द्वारा व्हावी व पुढे या मंडळांनी रशियन मध्यवर्ती मंडळात आपले प्रतिनिधी पाठवावेत, अशी योजना होती. प्रत्यक्षात या आराखड्यातील झारच्या नेतृत्वाखालील राज्यसभाच फक्त अंमलात आली. भूदासांना काही नागरी हक्क द्यावेत, हा विचारही कालांतराने मागे पडला. स्प्यिरान्स्कीने तयार केलेला संविधानाचा आराखडा अलेक्झांडरनंतर सत्तेवर आलेल्या पहिल्या निकोलसच्या कारकीर्दीत उपयोगी ठरला. रशियास संविधान द्यावे व यूरोपसाठी संघराज्य निर्माण करावे, ही अलेक्झांडरप्रणीत मूळ कल्पना बारगळली व एक प्रतिगामी राजा अशीच त्याची प्रतिमा उरली. रशिया व फ्रान्स या देशांमध्ये परस्परांच्या हेतूंबद्दल कमालीचा संशय होता. अखेर जून १८१२ मध्ये देशांमध्ये युद्ध सुरू झाले. म्यिखइल कुटूझॉव्ह या सरसेनापतीच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने प्रथम स्मोलेन्स्कला व नंतर बरूद्यिनोला या ठिकाणी नेपोलियनच्या सैन्याशी चांगली लढत दिली, तरी नेपोलियनने मॉस्कोवर चाल करून विजय मिळविला. पहिल्या अलेक्झांडरने नेपोलियनच्या सैन्याची दमछाक केली व नेपोलियनने रशियातून काढता पाय घेतला. नेपोलियनची ही पीछेहाट व नंतर अवघ्या यूरोपला मुक्त करावे या निश्चयापोटी अलेक्झांडरने मारलेली मुसंडी इंग्लंड, ऑस्ट्रिया आदी देशांना स्वाभाविकपणे चिंताजनक वाटली. १८१५ च्या व्हिएन्ना काँग्रेसमुळे रशियन झार पोलंडच्या संवैधानिक राज्याचा स्वामी बनला. प्रशिया व ऑस्ट्रिया या दोन देशांनाही पोलंडमध्ये काही प्रदेशावर कबजा मिळविता आला. १८२० नंतर पहिल्या अलेक्झांडरला आपल्याच प्रजाजनाकडून विद्रोहाची भीती वाटू लागली. साहजिकच नागरी स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात आले. १८२५ मध्ये पहिला अलेक्झांडर मरण पावला. त्याचा मोठा मुलगा कॉन्स्टंटिन त्यावेळी वॉर्सा शहरात होता. त्याने राजसिंहासनावरचा अधिकार सोडून दिला पण अलेक्झांडरचा मृत्यू व त्याच्या वडील मुलाने राजसिंहासनाचा केलेला त्याग, या दोन घटनांमधील संक्रमणकाळ कमालीचा अस्थिर होता. या काळात काही रशियन सेनाधिकाऱ्यांनी कॉन्स्टंटिन हाच खरा वारस आहे आणि त्याच्या ऐवजी सत्तेवर आलेला पहिला निकोलस (अलेक्झांडरचा दुसरा मुलगा) हा बेकायदेशीर राजा आहे, असे सांगण्यास सुरुवात केली. हे सेनाधिकारी नेपोलियनचा पाठलाग करीत यूरोपीय देशांमधून जाऊन परतले होते. त्यांना फ्रान्सच्या धर्तीवर रशियातही शासनपद्धती हवी होती. पहिल्या निकोलसच्या सत्ताग्रहणास सरळ आव्हान देणाऱ्या या बंडखोरांना ‘डिसेंबरिस्ट’ म्हणतात. नव्या झारने हे बंड कठोरपणे मोडून काढले व पाच प्रमुख सूत्रधारांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
पहिल्या निकोलसने (कार. १८२५–१८५५) आपल्या मंत्र्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली. या यंत्रणेमुळे सर्व मंत्री झारच्या वर्चस्वाखाली आले. प्रत्येक मंत्री थेट राजाला जबाबदार असावा, असा दंडक रूढ झाला. मंत्र्यांवर आणि सर्वच प्रजाजनांवर जरब ठेवण्यासाठी गुप्त पोलिसांची चौकट उभी करण्यात आली. १८४२ मध्ये जमीनदारांनी भूदासांना मुक्त करावे, असा आदेश देणारा कायदा मंजूर झाला. या कायद्याप्रमाणे भूदासांना कसण्यासाठी भूमीही मिळणार होती पण मुळात या कायद्याची अंमलबजावणी सक्तीची नव्हती. शिवाय १८४८ मध्ये यूरोपात झालेल्या राजकीय उठावांमुळे पहिल्या निकोलसने अधिकाधिक दडपशाहीचे धोरण स्वीकारले, तेव्हा जनसामान्यांना स्वातंत्र्य देण्याचे धोरण बाजूला पडले. पहिल्या निकोलसने रशियन राष्ट्रवाद, परंपरेचे जतन व एकतंत्री राजवट या त्रिसूत्रींवर विसंबून सर्व शिक्षणसंस्थांमध्ये राजेशाहीस पूरक असेच शिक्षण दिले जाईल असा हूकूम काढला. पश्चिम यूरोपातून येणारे स्वातंत्र्याचे वारे आपल्या देशातील लोकांना बाधू नये, हीच त्याची इच्छा होती. पण नेमके हेच वारे प्रभावी ठरले. ब्यिल्यिन्स्कई, हेर्टसन, म्यिखइल बकून्यिन इ. विचारवंतांनी पश्चिमी विचारांचा जोरदारपणे पुरस्कार केला व रशियातील बुद्धिजीवी मंडळींना नवी शिकवण दिली.
पश्चिमेचे वारे आपल्या देशात येऊ नये ही राजेच्छा तत्कालीन रशियन विदेशनीतीला घाट देणारी ठरली. रशिया आणि इंग्लंड या दोन देशांनी जर मध्यपूर्वेच्या प्रश्नाविषयी मतैक्य दाखविले, तर अवघ्या जगात शांती नांदेल, हा निकोलसप्रणीत निष्कर्षही तत्कालीन विदेशनीतीस वळण देणारा ठरला. निकोलसच्या या भूमिकेमुळेच क्रांतीतून उद्भवलेल्या नव्या राजवटींना विरोध आणि इंग्लंडबरोबर समझोता असे रशियन विदेशनीतीचे स्वरूप झाले.
इराणने १८२६ ते १८२८ या काळात रशियावर चढाई केली. त्यामुळे रशियाची कॅस्पियन समुद्रावरची पकड अधिक मजबूत झाली. काळ्या समुद्रावर तसेच दार्दानेल्स व वॉस्पोरस या तुर्की अंमलाखालील सामुद्रधुन्यांवर रशियाने आपला जम बसविला. रशियात पूर्वापार चालत आलेल्या बायझंटिन परंपरेच्या जपणुकीसाठी व कॉन्स्टँटिनोपलचे पावित्र्य राखण्यासाठी तुर्कस्तानवर आपले वर्चस्व असावे, हे रशियाचे धोरण होते. शिवाय अशा वर्चस्वामुळेच काळ्या समुद्रावरची वाहतूक आपल्या हाती राहील व धान्याची निर्यात निर्विघ्नपणे करता येईल, अशीही रशियाची अटकळ होती, म्हणून ऑटोमन साम्राज्य कायम रहावे व इंग्लंड आणि रशिया या दोन देशांनी परस्परांशी बोलणी करून यासंबंधात निर्णय घ्यावेत, अशी निकोलसची इच्छा होती. ऑटोमन साम्राज्याची फाळणी करावी अशी इंग्लंडची भूमिका असेल, तर रशियाबरोबर त्या देशाने चर्चा करावी हा निकोलसचा आग्रह होता. स्वतः निकोलसने १८४४ मध्ये या संदर्भात इंग्लंडला भेटही दिली पण हे सारे प्रयास विफल ठरले व ⇨क्रिमियाच्या युद्धाची ठिणगी पडली.
रशियाने १८५१ मध्ये ऑटोमन साम्राज्यातील ऑर्थोडॉक्स ग्रीकांना आपला पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे रोमन कॅथलिकांशी रशियाचा संघर्ष उद्भवला. फ्रान्स आणि इंग्लंड यांनी रोमन कॅथलिकांना पाठीशी घातले. या दोन्ही देशांच्या सल्ल्यावरून तुर्की सुलतानाने रशियाचा हस्तक्षेप अमान्य केला. एवढेच नव्हे, तर रशियाला शह देण्यासाठी त्याने डॅन्यूव नदी ओलांडून रशियन वर्चस्वाखालील मुलखावर हल्ला केला. रशियाने केलेल्या चढाईस रोखण्यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांनी आपली आरमारे काळ्या समुद्रात घुसविली. रशियाने डॅन्यूबच्या खोऱ्यातून माघार घेतली व म्हणून क्रिमियामध्येच युद्धास सुरुवात झाली. रशियाने अत्यंत चिवटपणे टक्कर दिली, पण अखेर सिव्हॅस्तपोलचा त्याग आणि काळ्या समुद्राची तटस्थता ही तहाची कलमे रशियास स्वीकारावी लागली. तुर्कस्तानच्या भूमीत निवास करणाऱ्या ऑर्थोडॉक्स ग्रीकांचे आपण तारणहार आहोत, हा दावाही रशियाला सोडून द्यावा लागला. १८५५ मध्ये वैफल्यग्रस्त मनःस्थितीत पहिला निकोलस मरण पावला.
त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा अलेक्झांडर (कार. १८५५–१८८१) सत्तेवर आला. देशात मूलभूत सुधारणांची निकड आहे, हे जाणून पहिल्या दशकात नव्या राजाने काही सुधारणा अंमलात आणल्या, पण त्यांना विरोध होताच पुन्हा प्रतिगामी धोरणांचीच री ओढली. १८६१ मध्ये भूदासांना मुक्त करण्यात आले आणि जमीनदारांना पाच टक्के व्याजाने सरकारी कर्जरोखे मिळाले. भूदासांनी एकूण ४९ वार्षिक हप्त्यांमध्ये जमिनींची किंमत चुकती करावी व गावकीने हे हप्ते वसूल करावेत असेही ठरले. या सुधारणेच्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्यसंस्था, शिक्षणसंस्था आणि न्यायसंस्था यांच्या बाबतीतही सुधारणा जाहीर झाल्या. लोकांनी रीतसर निवडणूकीच्या मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्थावर आपले प्रतिनिधी पाठवावेत ही सुधारणा नक्कीच आशादायी होती पण जमीनदारांना देण्यात आलेले अवाजवी प्रतिनिधित्व आणि संपूर्ण राज्याच्या स्तरावर निवडणूका घेण्यास विरोध, या कारणांमुळे स्थानिक संस्थाबाबत जाहीर झालेल्या सुधारणा निष्फळ ठरल्या. गृहमंत्रालयास प्राप्त झालेल्या विशेषाधिकारांमुळे न्यायालयीन सुधारणा अर्थशून्य ठरल्या, तर क्रांतीचे उठाव दडपून टाकले पाहिजेत, या भूमिकेपोटी शिक्षणसंस्थांमध्ये सुरू झालेल्या शासकीय हस्तक्षेपामुळे शैक्षणिक सुधारणा निष्फळ झाल्या. १८६३ मध्ये पोलंडमध्ये झालेली बंडाळी आणि १८६६ मध्ये दुसऱ्या अलेक्झांडरवर झालेला हल्ला या घटनांमुळे झारचा उत्साह पार मावळला. त्यापुढे दडपशाही अधिक वाढली आणि महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वेगाने क्रांतीचे वारे पसरू लागले. त्यांची गुप्तमंडळे जागोजागी निर्माण झाली. लोकाभिमुख चळवळीस विशेषतः दहशतवादास उधाण आले. १८७७-७८ मध्ये रशिया व तुर्कस्तान यांच्यात लढाई झाली. पुनश्च इंग्लंड व ऑस्ट्रिया-हंगेरी यांनी रशियन वर्चस्वाला विरोध केला व परिणामतः रशियाला अल्पविजयावरच समाधान मानावे लागले. राजाच्या नामुष्कीमुळे प्रजाजनांमधला असंतोष अधिक वाढीस लागला. तेव्हा सरकारी धोरणामध्ये नव्याने काही सुधारणा कराव्यात, या विचारापोटी एक सल्लागार समिती नेमावी असा निर्णय झाला. दुसऱ्या अलेक्झांडरने या निर्णयावर स्वाक्षरी केली, पण त्याच दिवशी (१३ मार्च १८८१) त्याचा खून झाला.
दुसऱ्या अलेक्झांडरचा मुलगा तिसरा अलेक्झांडर १८९४ पर्यंत सत्तास्थानी होता. त्याच्या कारकीर्दीत अनेक प्रतिगामी धोरणे अंमलात आली. वृत्तपत्रांवर तसेच विद्यापीठांवर प्रतिबंध लादण्यात आले. जिल्हामंडळांवर निवडणुकीच्या मार्गाने होणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या प्रतिनिधित्वावर मर्यादा लादण्यात आली. रशियनेतर विशेषतः ज्यू लोकांचा छळ सुरू झाला. या वातावरणात क्रांतीकारकही वाढले आणि त्यांच्या भूमिगत कारवायांमध्ये वाढ झाली.
तिसऱ्या अलेक्झांडरच्या कारकीर्दीत रशिया, जर्मनी व ऑस्ट्रिया या साम्राज्यांनी परस्परांशी मैत्रीचे संबंध वाढविले. १८८० ते १८९० या दशकात विशेषतः इंग्लंडच्या विरोधात हे मैत्रीसंबंध अधिक विकसित झाले. काळ्या समुद्रावर इंग्लंडला शह बसावा आणि अतिपूर्वेकडे आपली सरशी व्हावी, हे रशियन विदेशनीतीचे सूत्र होते पण बल्गेरियाच्या प्रश्नावर ऑस्ट्रियन मैत्रीला तडा गेला व बिस्मार्कच्या पदच्युतीनंतर जर्मन मैत्री संपुष्टात आली. १८९४ ते १९१७ या काळात रशिया आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये मैत्रीसंबंध वाढले कारण या दोन्ही देशांचे इंग्लंड व जर्मनी या देशांशी वैर होते. रशियाने फ्रान्सबरोबर दोस्ती वाढविली आणि यूरोपातून लक्ष काढून घेतले. यापुढे अतिपूर्वेकडे मुसंडी मारायची हेच रशियाचे धोरण राहिले.
तिसऱ्या अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर १८९४ मध्ये त्याचा मुलगा दुसरा निकोलस (कार. १८९४–१९१७) सत्ताधीश झाला. तिसऱ्या अलेक्झांडरच्या काळातच दमीत्री, कटकॉव्ह, कॉन्स्टंटिन, पव्यिडनॉस्टास्यिव्ह इ. सल्लागारांच्या प्रभुत्वामुळे दडपशाही सुरू झाली होती. लोक प्रतिनिधींच्या व्यवहार्य सूचनांची पायमल्लीही झाली होती. दुसऱ्या निकोलसने बदललेल्या स्थितीचा विचार न करता हीच धोरणे पुढे चालविली.
रशियन शेतकऱ्यांच्या दृष्टीने १८९० नंतरचा कालखंड अत्यंत हलाखीचा ठरला. वाढलेल्या लोकसंख्येमुळे दरडोई उपलब्ध जमिनीचे प्रमाण कमी झाले होते. अमेरिकन धान्य आयातीमुळे रशियन गव्हाच्या व बार्लीच्या किंमती कोसळल्या होत्या. जमिनीचा खंड मात्र वाढला होता. औद्योगिक वस्तूंच्या किंमती सरकारच्या संरक्षक धोरणामुळे वरच्या पातळीवर होत्या. तशात दुष्काळाचे संकट आले आणि शेतकऱ्यांची दुर्दशा झाली. सरकारने औद्योगिक विकासाला प्रौत्साहन देण्याचे ठरविले, पण कामगारांच्या कल्याणाकडे पाठ फिरविली. शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सोशल रेव्होल्यूशनरी पक्ष स्थापन झाला. कामगार कल्याणासाठी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचा उदय झाला. मध्यमवर्गीयांनी युनियन ऑफ लिबरेशन या पक्षाची स्थापना केली. वाढता असंतोष, दहशतवादी कृत्ये आणि एकूण हलाखीची परिस्थिती या समस्यांवर मात करता यावी म्हणून सरकारने अंतर्गत बाबींवरच सर्व लक्ष केंद्रीत करावे, कोणत्याही देशाशी युद्ध करू नये, अशी भूमिका तत्कालीन अर्थमंत्री सिर्ग्यई व्ह्यिट्ट्ये् याने घेतली, तर या परिस्थितीवर तोडगा म्हणून सरळ जपानशी युद्ध सुरू करावे, असा सल्ला व्ह्यिचिस्लाव्ह प्लेव्ह्यी या धर्मगुरूने दिला.
क्रिमियन युद्धानंतरच्या काळात रशियाने अतिपूर्वेकडे वेगाने साम्राज्यविस्तार केला. अमूर नदीवर तसेच पॅसिफिकवरच्या व्ह्लॅडिव्हस्टॉक बंदरावर कबजा मिळविण्यात रशिया यशस्वी झाला. मध्य आशियात तसेच पामीरच्या पठारापर्यंत आपले साम्राज्य वाढविण्यातही रशिया सफल झाला. १८८१ मध्ये रशियाने मंगोलियावर आणि चीनच्या सिक्यांग प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले. १८७५ मध्ये जपानला सॅकालीन बंदरे देऊन त्या मोबदल्यात स्वतःकडे कूरील बेटे घेण्यात रशियाला यश लाभले. दुसऱ्या बाजूने जपाननेदेखील चीनवर चढाई करून पॅसिफिक समुद्राकडे मुसंडी मारणाऱ्या रशियाला शह दिला. तेव्हा रशियाने चीनशी दोस्ती वाढविली व उत्तर मँचुरियात ट्रान्स-सायबीरियन रेल्वेचे जाळे पसरविता यावे, या हेतूने जपानविरोधी युद्धात मदत करू, असे आश्वासन चीनला दिले.
रशियाने १८९६ ते १९०४ या काळात कोरियात पाय रोवण्यासाठी केलेले प्रयास वर उल्लेखिलेल्या घटनांना पूरक ठरले. रशियाचा हा साम्राज्यविस्तार जपान, इंग्लंड आणि अमेरिका या देशांना धोकादायक वाटला. तेव्हा त्यांच्या पाठींब्याने रशियन फौजांनी मँचुरियातून माघार घ्यावी, असा इशारा जपानने दिला. नंतर मँचुरियावर रशियाचे वर्चस्व असले तरी चालेल पण कोरिया मात्र आपल्या प्रभुत्वाखाली यावा, अशी भूमिका जपानने घेतली. ५ फेब्रुवारी १९०४ रोजी जपानने पोर्ट आर्थरवर आणि चेमुल्पोवर हल्ला चढविला. हा हल्ला यशस्वी ठरला व पोर्ट्स्मथच्या करारानुसार (१९०५) रशियाला दक्षिण मँचुरियावरच तसेच सॅकालीन बंदराच्या दक्षिणेकडच्या प्रदेशावरचा आपला हक्क सोडून द्यावा लागला. ⇨ रशिया-जपान युद्धामुळे (१९०४-०५) रशियन इतिहासाला कलाटणी मिळाली व रशियन राज्यक्रांतीच्या चळवळीस जोराची चालना मिळाली.
प्रामुख्याने तीन घटना १९०५ मध्ये घडल्या, त्यांचे एकत्रित परिणाम क्रांतीकारक होते. २२ जानेवारी १९०५ या दिवशी जॉर्जी गेपन या धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी पीटर्झबर्गमधल्या विंटर पॅलेसवर मोर्चा नेला. तथापि त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट लष्कराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. शेकडो निरपराध शेतकऱ्यांची त्यात हत्या झाली. १९०५ च्याच ऑक्टोबरमध्ये कामगार प्रतिनिधींची मंडळे, म्हणजे सोव्हिएटे स्थापन झाली व त्यांच्या नेचृत्वाखाली देशव्यापी संप झाले. झारला या सार्वत्रिक असंतोषाची दखल घ्यावी लागली. संसदीय निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन त्याला द्यावे लागले. त्यानंतर एकूण चार वेळा निवडणुका झाल्या. पहिली संसद (ड्युमा) निरनिराळ्या मागण्यांमुळे गाजली. जमिनीची पुनर्वाटणी करा, राजबंद्यांना मुक्त करा, पोलंडला स्वायत्तता द्या ….. इ. मागण्या झारच्या दृष्टीने गैरसोयीच्या होत्या. सबब ही संसद रद्द करण्यात आली. दुसऱ्या संसदेत प्रस्थापितास आव्हान देणाऱ्यांची बहुसंख्या होती, म्हणून ती निकालात निघाली. तिसऱ्या व चौथ्या संसदेत रूढिप्रिय प्रतिनिधी बहुसंख्य होते कारण या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार केवळ उच्चवर्गीयांपुरताच मर्यादित होता पण तरी संसदेतली चर्चा झारला अस्वस्थ करणारी ठरली कारण लोकांतील असंतोष वेगाने वाढत गेला व लोकप्रतिनिधींना त्या असंतोषास वाचा फोडणे अपरिहार्य वाटले. पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेल्या स्टलिप्यिनने व्यक्तीगत शेतीस उत्तेजन देण्यासाठी भरपूर प्रयास केले, पण पुढे त्याचाच खून झाला व लाचार आणि धूर्त सल्लागारांमुळे झारकडून विवेकशून्य धोरणांची अंमलबजावणी झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात झारला दोन आघाड्यांवर लढावे लागले, रणांगणात परक्या सैन्याशी, तर अंतर्गत राजकारणात प्रजाजनांशी. शेवटी या दोन्ही आघाड्यांवर झारला पराभव पतकरावा लागला.
रशिया-जपान युद्धात रशियाच्या शाही सैन्याचा पराभव झाला. त्यानंतर कोणत्याही देशाशी युद्ध करायचे नाही हे धोरण रशियाने स्वीकारले पण बाल्कन प्रदेशांतील घडामोडी रशियाच्या दृष्टीने नेहमीच जिव्हाळ्याच्या होत्या. नेमक्या याच प्रदेशातल्या सर्बियावर हक्क सांगण्यास ऑस्ट्रियाने सुरुवात केली. तेव्हा मात्र रशियासमोर उभयापत्ती उत्पन्न झाली. एका बाजूने ऑस्ट्रियाचा हक्क मान्य करणे याचा अर्थ ऑस्ट्रियाची पाठराखण करणाऱ्या जर्मनीसमोर शरणागती पतकरणे. म्हणजेच फ्रान्सशी विकसित झालेल्या संबंधांना पूर्णविराम देणे व बाल्कन प्रदेशासंबंधी आपले दायित्व आहे, या ऐतिहासिक भूमिकेलाच तिलांजली देणे. दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रियाच्या सर्बियावरच्या हक्कास आव्हान देणे याचा अर्थ सरळ जर्मनीशी युद्ध पुकारणे, रशियाने हा दुसरा पर्याय स्वीकारला. फ्रान्स आणि इंग्लंड या देशांशी दोस्ती करून जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या विरूद्ध युद्ध करणे इष्ट ठरविले. जर्मनीने रशियाची सर्व बाजूंनी कोंडी केली, शेवटी रशियाचा पराभव केला. रशियाच्या अंतर्गत परिस्थितीत महागाई, भ्रष्टाचार आणि वाढते दारिद्र्य यांमुळे निकोलस झारची राजवट नष्ट करणे, हाच एककलमी कार्यक्रम लोकप्रिय झाला. लोकांच्या या असंतोषासमोर शेवटी झारला झुकावे लागले. १९१७ च्या मार्चमध्ये (नव्या दिनदर्शिकेप्रमाणे) संसद आणि सोव्हिएटे यांचे संयुक्त सरकार सत्तारूढ झाले पण हे सरकार अस्थायी होते. नोव्हेंबरमध्ये जी समाजवादी क्रांती झाली, तिने या सरकारलाही पदभ्रष्ट केले व तेव्हापासून बोल्शेव्हिक कम्युनिस्ट पक्षाची राजवट सुरू झाली [⟶ रशियन राज्यक्रांती].
बोल्शेव्हिक कम्युनिस्ट पक्षाने १९१८ च्या जानेवारी महिन्यात नवनिर्वाचित ड्युमा (संसद) रद्द करून राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. आपण देशाला शांतता मिळवून देऊ, हे या पक्षाचे आश्वासन होते. त्या आश्वासनानुसार बोल्शेव्हिक सरकारने जर्मनीबरोबर ब्रेस्ट ल्यिटॉव्हस्क येथे तह केला व बाल्टिक प्रदेश, पोलंड, युक्रेन, फिनलंड इ. भूभाग जर्मनी, ऑस्ट्रिया व तुर्कस्तान या देशांना देऊन टाकले.
नव्या सरकारला केवळ चार महिन्यांच्या आत यादवी युद्धाला सामोरे जावे लागले. श्वेत रशियन या यादवीचे नेतृत्व करीत होते व इंग्लंड, फ्रान्स, जपान आणि अमेरिका या देशांकडून त्यांना पाठिंबा मिळाल्याने नव्या सरकारचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अर्थात विदेशी शक्तींचा पाठिंबाच श्वेत रशियनांना अडचणीचा ठरला. त्यांनी शेतकऱ्यांची व ज्यूंची केलेली ससेहोलपटही त्यांच्या अंगाशी आली. उलट बोल्शेव्हिकांना स्वदेशी शासनयंत्रणा व राष्ट्रवादी जनतेचा पाठींबा या बळावर यादवी युद्धात विजय मिळविता आला. या युद्धातच ब्रेस्ट ल्यिटॉव्हस्क तहनाम्याने झालेले नुकसानही भरून काढता आले. युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया आणि आझरबैजान या प्रदेशांवर पुनश्च कबजा मिळवून नवी सोव्हिएट गणराज्ये स्थापन करण्यात कम्युनिस्ट यशस्वी झाले. या काळातच कम्युनिस्टांनी धीम्या गतीने आणि सर्वांना बरोबर घेऊन कारभार करण्याची पद्धत त्याज्य ठरविली आणि एक पक्षीय हुकूमशाही रूढ केली. यादवी युद्धाच्या काळात सु. एक लाख लोकांची हत्या झाली व अंदाजे वीस लाख नागरिकांनी अन्य देशांत स्थलांतर केले. या परिस्थितीत कृषी आणि औद्योगिक उत्पादने घटली आर्थिक घडी पार विसकटली. तेव्हा लेनिनने साम्यवादाला मुरड घालण्याचे ठरविले. मार्च १९२१ मध्ये दहाव्या पक्ष परिषदेत नवी अर्थनीती मंजूर झाली. कम्युनिस्टांनी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने धान्य वसुली घेतली होती. नव्या अर्थनीतीमुळे या धान्यखंडणीस आळा बसला. कायदा आणि सुव्यवस्था या तत्वांची अंमलबजावणी सुरू झाली. मोठ्या प्रमाणावरील मूलभूत उद्योग, वाहतूक, सार्वजनिक सेवा, बँका वगैरे क्षेत्रे सरकारच्या अखत्यारीत राहिली पण लघु-उद्योग व व्यापार खाजगी क्षेत्रात ठेवण्यात आला. विशेष जाणकारांकडे व्यवस्थापनाची सूत्रे देण्यात आली. वेतन देताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे हा पायंडा पडला. केन्द्रीय नियोजनावर मर्यादा लादण्यात आल्या. या सर्व उपायांमुळे १९२८ पर्यंत सोव्हिएट अर्थव्यवस्था सुधारली.
लेनिन १९२४ मध्ये मरण पावल्यानंतर ⇨जोझेफ स्टालिनने ⇨लीअन ट्रॉट्स्की, झ्याझिनॉव्हयी, ल्येव्ह कामिन्यिव्ह इ. नेत्यांना बाजूला सारून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. डिसेंबर १९२७ मध्ये पंधराव्या पक्षपरिषदेत या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
नव अर्थनीतीच्या काळात रशियाने अवघ्या जगात समाजवादी क्रांती घडवून आणण्याचे आपले स्वप्न बाजूला ठेवून ‘आपल्याच देशात’ समाजवाद रूजविण्याचा निश्चय केला. पोलंड, वाल्टिक राज्ये, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान इ. देशांबरोबर शांततेचे आणि अनाक्रमणाचे करार करण्यातही स्टालिनने पुढाकार घेतला. रशिया व जर्मनी यांच्यात रॅपॅलो करार झाला (१९२२). पाठोपाठ इंग्लंडबरोबर करार झाला. म्हणजे भांडवलशाही देशांकडून रशियाच्या सार्वभौमत्वाला मान्यता मिळाल्यासारखी झाली.
१९२८ पासून स्टालिनच्या नेतृत्वाखाली औद्योगिकीकरण, सामूहिक शेती, केंद्रीय आर्थिक नियोजन इ. कार्यक्रम झपाट्याने अंमलात आले. या साऱ्या गोष्टी कम्युनिष्ट पक्षआमार्फत व्हाव्यात, असा स्टालिनचा हट्ट होता. म्हणून पक्षाच्या शिस्तबद्ध चौकटीबरोबरच देशात पक्षाची सर्वंकष सत्ता रूढ झाली. पक्षनेतृत्वास विरोध करणाऱ्यांचा बीमोड करण्यात येऊ लागला.
स्टालिनच्या काळात ‘शुद्धीकरणाच्या’ नावाखाली लक्षावधी विरोधकांना कारावासात व सायबीरियातील बंधनागारांत पाठविण्यात आले. त्यांपैकी अनेकांची हत्या करण्यात आली. प्रतिगामी प्रतिक्रांतिकारक, पक्षद्रोही, भांडवलशाही देशांचे हस्तक इ. आरोप विरोधकांच्यावर लादण्यात आले. प्रथम १९२९ मध्ये, नंतर १९३३ मध्ये व पुन्हा १९३४ मध्ये ही पक्ष शुद्धीकरणे झाली. १९३४ मध्ये लेनिनग्राडचा पक्षचिटणीस ‘कीरोव्ह’ याचा खून झाला व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत १९३८ पर्यंत तीन ऐतिहासिक खटल्यांमधून झ्यझिनॉव्हयी, कामिन्यिव्ह, बूखाऱ्यिन, रिकव्ह या नेत्यांना ठार मारण्यात आले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त निरनिराळे सरकारी अधिकारी, कारखान्यांचे व्यवस्थापक, लेखक व वरिष्ठ सैनिकी अधिकारी हेदेखील पक्षशुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून सुटले नाहीत. स्टालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) ही परिस्थिती पालटली. १९५६ मध्ये ख्रुश्चॉव्हच्या पुढाकारामुळे यांपैकी अनेकांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला व स्टालिनप्रणीत ‘ शुद्धीकरणामुळे’ रशियाचे प्रचंड नुकसान झाले, अशी कबुली देण्यात आली.
स्टालिन संविधान १९३६ मध्ये मंजूर झाले. या संविधानात सार्वत्रिक मताधिकार, प्रत्यक्ष निवडणूक, गुप्तमतदान या महत्त्वाच्या तरतुदी होत्या. १९१७ नंतर सोव्हिएटांच्या आधारावर उभा राहिलेला सांगाडा रद्द करण्यात आला व काँग्रेस ऑफ सोव्हिएट आणि मध्यवर्ती कार्यकारी समिती या संस्थांना सुप्रीम कौन्सिलशी जोडून देण्यात आले. स्टालिन संविधानाने रशियन नागरिकांना निरनिराळे हक्क बहाल केले. कम्युनिस्ट पक्षाकडे सर्वांना मार्गदर्शन करण्याचे दायित्व राखून युवक संघटना, सांस्कृतिक मंडळे, कामगार संघटना, सहकारी संस्था वगैरे मंडळांचे अस्तित्व मान्य करण्यात आले कम्युनिस्ट पक्षामध्ये पॉलिटब्यूरोचे व त्याहूनही सरचिटणीसाचे स्थान सर्वोच्च असेल. हेही प्रत्यक्ष व्यवहारातून दिसून आले.
स्टालिनच्या काळातच रशियाला दुसऱ्या महायुद्धास तोंड द्यावे लागले. १९३३ मध्ये जर्मनीत हिटलरकडे चँसेलरपद आले. तेव्हापासून जर्मनीच्या महत्त्वकांक्षी धोरणामुळे रशियाची सुरक्षितता धोक्यात आली. तेव्हा जर्मनविरोधात फ्रान्स व इंग्लंड या देशांशी मैत्री वाढवावी, ही विदेशनीती स्टालिनला स्वीकारार्ह वाटली, १९३९ मध्ये जर्मनी बरोबरच मैत्रीचा तहनामा करून भांडवलशाही देशांमध्ये सुंदोपसुंदी वाढवावी, आपण मात्र या झगड्यांपासून अलिप्त रहावे, असाही विचार स्टालिनच्या दृष्टीने श्रेयस्कर ठरला असावा. माल्युटॉव्ह-रिबेनट्रॉप करार या विचारातून निष्पन्न झाला. हिटलरने मात्र या कराराची पर्वा न करता २२ जून १९४१ रोजी रशियावर हल्ला केला. या युद्धात सु. २ कोटी रशियन नागरिकांचे बलिदान व कोट्यवधी रूबलांचे नुकसान झाले पण एक पराक्रमी महासत्ता हा लौकिक रशियाला लाभला.
दुसऱ्या महायुद्धानंतर स्टालिनने आपली हुकूमशाही चौकट अधिक मजबूत केली. भांडवलशाही देश साम्यवादाच्या विस्ताराला शह देत आहेत, असे त्याचे मत बनले व त्याने समाजवादी गटाचे नेतृत्व रशियाकडे आहे, या भूमिकेचा प्रचार सुरू केला आणि देशांतर्गत शुद्धीकरण मोहीम आखली. व्हझ्नयस्येस्की, कुझनेट्स्क वगैरेंची हत्या करण्यात आली. १९५२ च्या पक्षपरिषदेत देशद्रोह्यांना धमक्या देण्यात आल्या. यूरी आन्द्रपॉव्ह, व्हरशिलॉव्ह, माल्युटॉव्ह, मिकोयान या पक्षश्रेष्ठींविरूद्धसुद्धा संशयाचे जाळे टाकण्यात आले. १९५३ च्या मार्चमध्ये स्टालिन मरण पावला व कैक लोकांच्या हत्या टळल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट व बिगर कम्युनिस्ट देशांच्या गटांत शीतयुद्धास प्रारंभ झाला, पोलंड, रूमानिया बल्गेरिया, हंगेरी व पूर्व जर्मनी या देशांत रशियांकित गजवटी निर्माण झाल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विसर्जित झालेल्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल नामक संघटनेऐवजी ‘कॉमिनफॉर्म’ नामक संघटना जन्माला आली. या संघटनेमार्फत रशिया निरनिराळ्या देशांत साम्यवादाचा प्रसार करील व त्याच्याशी निष्ठा बाळगणारी सरकारे उभी करील, असे भय उत्पन्न झाले. तशात चीनमध्येही साम्यवादी क्रांती झाली (१९४९). तेव्हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पश्चिम यूरोपीय देशांनी नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक आघाडीची स्थापना केली तर रशियाने प्रत्युत्तर वॉर्सा कराराच्या रूपाने पूर्व यूरोपातल्या राष्ट्रांची फळी उभी केली. शीतयुद्धात रशियालाही बरीच झळ सोसावी लागली. इराण, तुर्कस्तान, ग्रीस या देशांमधून रशियाला काढता पाय घ्यावा लागला. बंड करून उठलेल्या यूगोस्लाव्हियाच्या मार्शल टिटोसमोरही नामुष्की पतकरावी लागली व अतिपूर्वेकडील कोरियाचे विभाजन मान्य करावे लागले. स्टालिनच्या मृत्यूनंतर ⇨ न्यिक्यित ख्रुश्चॉव्ह कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस झाला व पंतप्रधान म्हणून माल्येनकॉव्हची नियुक्ती झाली. फेब्रुवारी १९५५ मध्ये बुल्गान्यिन हे राष्ट्राध्यक्ष झाले.
न्यिक्यित ख्रुश्र्वॉव्हने पक्षीय नेतृत्वाच्या सत्तास्पर्धेत व्यवहार्य धोरण स्विकारून आपल्या विरोधातील माल्येनकॉव्ह,माल्युटॉव्ह आदी नेत्यांना प्रिसिडियममधून बाजूला सारून बुल्गान्यिनला विश्वासात घेतले व पंतप्रधान केले आणि स्टालिनविरोधी मोहीम सुरू केली. पक्षाच्या १४ फेब्रुवारी १९५६ च्या बैठकीत स्टालिनच्या एकूण धोरणावर व त्याच्या व्यक्तिपूजेवर त्याने सडेतोड टीका केली. या बैठकीत स्टालिनच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला आणि स्टालिनकडून ज्यांची हत्या झाली होती, त्या पक्षकार्यकर्त्यांना मरणोत्तर बक्षिसे जाहीर केली. पुढे १९५८ मध्ये त्याने पंतप्रधानपदही आपणाकडे घेतले. सत्ता मिळताच १९६१ च्या बाविसाव्या पक्षपरिषदेत स्टालिनचे प्रेत मॉस्कोतील इतिहासप्रसिद्ध लालचौकातील स्मारकातून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला. बंधनागारांतील सु. दोन-तृतीयांश कैद्यांना मुक्त केले, वेठबिगारी बंद केली व गुप्त पोलिसांच्या कारवायांवर बंधने घातली. यामुळे स्टालिनच्या काळातील दहशतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले.
खुश्चॉव्हने देशांतर्गत पडिक जमिनी लागवडीखाली आणून शेतीला उत्तेजन दिले आणि सप्तवार्षिक योजना आखून शैक्षणिक व न्यायदानक्षेत्रांत काही मौलिक सुधारणा केल्या. शारीरिक श्रमाचे महत्त्व त्याने वाढविले.
रशियाच्या परराष्ट्रीय धोरणात त्याने सामान्यतः शांततामय सहजीवनाचा पुरस्कार केला आणि अमेरिका, भारत इ. देशांना भेटी दिल्या. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याची घोषणा करून त्याने भारतीयांच्या मनात रशियाबद्दल आपुलकी निर्माण केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्याने विश्वशांतीवर भर देणारे भाषण दिले तथापि नाटोला शह देण्याविषयीचे त्याचे डावपेच-, अमेरिकेशी जर्मन शांतता तह व क्युबाची नाकेबंदी-यांविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांच्याशी मतभेद झाले. परिणामतः रशियाला क्यूबातून क्षेपणास्त्रे काढून घेण्याची वेळ आली आणि बर्लिन भिंतीची निर्मिती झाली. पुढे रशिया व चीन यांतही संघर्ष निर्माण झाले. सहकाऱ्यांशी सल्लामसलत न करणे, पोकळ आश्वासने देणे आणि नोकरशाहीचा अधिक्षेप करणे यांसारखे आरोप ठेवून खुश्र्वॉव्हला पंतप्रंधानपदावरून १९६४ मध्ये दूर करण्यात आले.
खुश्चॉव्हनंतर १९६४ च्या ऑक्टोबरमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या चिटणीसपदी ⇨ल्येऑन्यीट इल्यिच ब्रेझन्येव्ह याची निवड झाली. १९६६ मध्ये स्वतःकडे सरचिटणीसपद घेऊन तो सर्वसत्ताधारी बनला आणि कोसाजिनच्या सहकार्याने त्याने आपले राजकीय वर्चस्व वाढविण्यास प्रारंभ केला. ब्रेझन्येव्हच्या सु. १८ वर्षाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत रशियातील अंतर्गत राजकारणात आमूलाग्र बदल झाले. स्टालिन आणि खुश्र्वॉव्ह यांच्या काळातील व्यक्तिपूजेचा प्रभाव संपुष्टात येऊन अंतर्गत आंतरराष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत ब्रेझन्येव्हने जबाबदारीचे धोरण पुरस्कृत केले. त्याने रशियाचे लष्करी सामर्थ्य वाढविले. चेकोस्लोव्हाकिया (१९६८), पोलंड (१९८०) या अंकित राष्ट्रांतील अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून त्याचे समर्थन केले. रशिया-अफगाणिस्तान यांच्यातील १९७८ च्या मैत्रीच्या तहानुसार रशियाने डिसेंबर १९७९ मध्ये आपले सैन्य अफगाणिस्तानात पाठविले. तेथील क्रांतिकारक समितीचा अध्यक्ष आणि नंतरचा राज्यप्रमुख बाब्रक कर्माल याच्या विनंतीवरून हा सैनिकी हस्तक्षेप करण्यात आला. ⇨देतान्तच्या तत्त्वानुसार १९७२–७४ दरम्यान अमेरिकेबरोबर अण्वस्त्रांचा वापर व निःशस्त्रीकरण यांबाबतीत मर्यादित सहकार्य केले. हेलसिंकी करार (१९७५) व सॉल्टर (स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन ट्रिटी – १९७९) हे अमेरिकेबरोबर केलेले करार त्याचेच द्योतक होत. ब्रेझन्येव्हच्या कारकीर्दीत भारत-रशिया पूर्वापार संबंध अधिक दृढ झाले. दोन्ही देशांत विविध क्षेत्रांतील सहकार्य करण्याचे करार झाले. ब्रेझन्येव्हने तीन वेळा भारतात भेट दिली (१९६१, १९७३, व १९८०).
त्याच्या कारकीर्दीत रशियात शेती व उद्योग यांत मोठी प्रगती झाली. आर्थिक सुबत्तेबरोबरच विज्ञान क्षेत्रातही रशियाने प्रगती केली. ब्रेझन्येव्हने १९७७ मध्ये नवीन संविधान कार्यवाहीत आणले. राजकीय धोरणात काही मूलभूत बदल केले. हेच संविधान ब्रेझन्येव्ह संविधान म्हणून ओळखले जाते. १९३६ च्या स्टालिन संविधानात रशियाचे वर्णन ‘कामगारांची हुकूमशाही’ असे केलेले होते. नव्या संविधानात ‘संपूर्ण जनतेचे समाजवादी राज्य’ असा निर्देश केलेला आहे. १९७७ मध्ये ब्रेझन्येव्हने न्यिकॉल्सी पोडगोर्न्यी याची प्रिसिडियमच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
ब्रेझन्येव्हच्या मृत्यूनंतर (१९८२) यूरी आंद्रपॉव्ह हा प्रथम कम्युनिस्ट पक्षाचा चिटणीस व नंतर १९८३ मध्ये सरचिटणीस झाला. त्याने भ्रस्टाचाराविरूद्ध मोहीम उभारून उत्पादनावर भर दिला आणि अनेक अधिकाऱ्यांना अकार्यक्षम म्हणून बडतर्फ केले. आंद्रपॉव्ह ९ फेब्रुवारी १९८४ रोजी मरण पावला आणि रशियाची राजकीय सूत्रे कॉन्स्टॅन्टिन चेर्नेन्को याच्याकडे गेली. त्याची १३ फेब्रुवारीला सरचिटणीसपदी निवड झाली. चेर्नेन्कोने ब्रेझन्येव्हच्या धोरणाचाच पाठपुरावा केला.
आजारीपणामुळे चेर्नेन्को हेसुद्धा अल्पकाळाचेच सत्ताधीश ठरले व मार्च १९८५ पासून म्यिखइल गार्बाचॉव्ह हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाले. गार्बाचॉव्ह यांच्या कारकीर्दीत सत्ताविसावी पक्षपरिषद पार पडली. या परिषदेत पक्षाच्या तिसऱ्या कार्यक्रमाची नवी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. गार्ब्राचॉव्हप्रणित नव्या धोरणाची मुख्य सूत्रे म्हणजे खुलेपणा (ग्लासनोस्त) आणि पुनर्रचना (पेरेस्त्रोइका). सामाजिक व विशेषतः आर्थिक क्षेत्रातील अंतर्विरोध दूर करणे, लोकांची उपक्रमशीलता व विधायक कार्याचा जोम यांना उत्तेजन देणे व कालच्युत कल्पना, दृष्टिकोन दूर करणे ही देशाची ऐतिहासिक गरज आहे, यांवर भर देणारे हे धोरण क्रांतिकारक आहे.
लेखक : मोडक, अशोक
राजकीय स्थिती : पहिल्या सोव्हिएट काँग्रेस अधिवेशनात झालेल्या करारानुसार (३० डिसेंबर १९२२) रशियन सोव्हिएट फेडरल सोशॅलिस्ट रिपब्लिक, युक्रेन, बेलोरशिया आणि ट्रान्स कॉकेशिया यांचे मिळून संघराज्य अस्तित्वात आले. या संघराज्यात उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या स्वायत्त प्रजासत्ताकांचा(१९२४) आणि ताजिकिस्तान (१९२९) यांचाही समावेश करण्यात आला. ५ डिसेंबर १९३६ रोजी झालेल्या आठव्या सोव्हिएट काँग्रेसमध्ये देशासाठी नवे संविधान स्वीकारण्यात आले. या संविधानानुसार ट्रान्स-कॉकेशिया प्रजासत्ताकाचे आर्मेनिया, आझरबैजान आणि जॉर्जिया या तीन प्रजासत्ताकांत वा घटक राज्यांत विभाजन करण्यात आले. त्याचप्रमाणे पूर्वी रशियन सोव्हिएट फेडरल प्रजासत्ताकात स्वायत्ततेचा दर्जा असलेल्या कझाकस्तान व किरगीझिया या दोन प्रजासत्ताकांना स्वतंत्र घटक राज्यांचा दर्जा देण्यात आला. १९३९ मध्ये रशियन सैन्याने कर्झनरेषेपर्यंतचा पोलंडचा पूर्व भाग आपल्या ताब्यात घेतला आणि युक्रेन आणि बेलोरशिया हे भाग आपल्या प्रजासत्ताकात समाविष्ट करून घेतले. १९५१ साली युक्रेन आणि पोलंड यांतील काही प्रदेशाची अदलाबदली करण्यात आली. १९४० साली रशियन संघराज्यातील बारावे राज्य म्हणून कारेलो-फिनिश सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिक स्थापन करण्यात आले. यात रशियाच्या कारेलिया प्रांतात फिनलंडचा काही प्रदेश अंतर्भूत होता. १९५६ साली कारेलियन प्रांत रशियन सोव्हिएट फेडरल सोशॅलिस्ट या प्रजासत्ताकांतर्गत स्वायत्त गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला. १९४० साली मॉल्डेव्हिया प्रजासत्ताक (संघराज्यातील तेरावे) अस्तित्वात आले. त्यात आधीच्या मॉल्डेव्हिया स्वायत्त प्रजासत्ताकातील प्रदेशात रूमानियाचा काही प्रदेश समाविष्ट होता. रशिया रूमानियातील सरहद्द १९४७ च्या शांतता तहानुसार निश्चित करण्यात आली. १९४५ साली चेकोस्लोव्हाकियाशी केलेल्या करारानुसार रूथीनीया युक्रेन प्रजासत्ताकात समाविष्ट करण्यात आला. १९४० साली लिथ्युएनिया, लॅटिव्हिया व एस्टोनिया ही रशियन संघराज्यातील अनुक्रमे चौदावी, पंधरावी व सोळावी संघराज्ये म्हणून अस्तित्वात आली तथापि कारेलो-फिनिश राज्यात स्वतंत्र संघराज्य म्हणून असलेला दर्जा काढून घेतल्याने रशियातील संघराज्याची संख्या पंधराच राहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर पॉट्सडॅम करारानुसार पूर्व प्रशियाचा काही भाग आर्. एस्. एफ्. एस्. आर्. मध्ये अंतर्भूत करण्यात आला. १९४६ साली फिनलंडला दिलेला (१९२०) प्येचिंगा प्रांत पुन्हा रशियाकडे आला. १९५५ पर्यंत फिनलंडशी असलेले प्रादेशिक वाद संपुष्टात आले. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर सॅकालीन बेटांचा दक्षिणार्ध व कूरील बेटे ही रशियाच्या ताब्यात आली.
पक्षसंघटना :कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएट युनियन हा रशियातील एकमेव राजकीय पक्ष. १९७७ च्या संविधानातील सहाव्या अनुच्छेदात सोव्हिएट समाज, शासनव्यवस्था तसेच सर्व शासकीय व सार्वजनिक संघटना यांचे नेतृत्व व मार्गदर्शन करणे, असे या पक्षाचे स्थान व महत्त्व नमूद केले आहे. १८९८ साली रशियन मार्क्सवाद्यांची पहिली काँग्रेस भरली. त्यानंतर लंडन येथे १९०३ मध्ये त्यांची दुसरी परिषद झाली. त्या सभेत सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टीची स्थापना करण्यात आली. पुढे या पक्षात बोल्शेव्हिक (बहुमतवाले) व मेन्शेव्हिक (अल्पमतवाले) असे दोन स्वतंत्र तट पडले. बोल्शेव्हिकांचे नेतृत्व लेनिनकडे होते, तर मेन्शेव्हिकांचे जीऑर्जी प्ल्यिखानव्ह याच्याकडे होते. १९१८ मध्ये रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर बोल्शेव्हिकांनी आपल्या पक्षाचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएट युनियन (सी. पी. एस्. यू.) असे नामांतर केले. या पक्षाचे १९८२ मध्ये १,७७,६९,६६८ सभासद असून एकूण मतदारांपैकी हा आकडा जवळजवळ १०% आहे.
पक्षाची सु. १०,००० शब्दांची घटना असून तीत संरचना, संघटना, कार्य, सभासद-प्रवेश इत्यादींचे तपशील नमूद केले आहेत. प्राथमिक पक्ष संघटना (पी. पी. ओ.) ही कम्युनिस्ट पक्षाची पायाभूत संघटना होय. कारखाने, कृषी केंद्रे, भांडारगृहे इ. ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या प्राथमिक संघटना होत. देशात अशा
सोव्हिएट संघराजयातील प्रशासकीय विभाग
अ. क्र. | प्रजासत्ताकाचे नाव | प्रजासत्ताकांतर्गत स्वायत्त गणराज्ये | प्रजासत्ताकांतर्गत स्वायत्त प्रदेश (ओब्लास्ट) |
१ | आझरबैजान | नाखिचेव्हान | नगॉर्न-करबाख |
२ | आर्मेनिया | — | — |
३ | उझबेकिस्तान | काराकाल्पाक | — |
४ | एस्टोनिया | — | — |
५ | कझाकस्तान | — | — |
६ | किरगीझिया | — | — |
७ | जॉर्जिया | १. ॲब्कॅझिया
२. आजार (आजारीया) |
दक्षिण ऑसीशन |
८ | ताजिकिस्तान | — | गॉर्नो बदक्शान |
९ | तुर्कमेनिस्तान | — | — |
१० | बेलोरशिया | — | — |
११ | मॉल्डेव्हिया | — | — |
१२ | युक्रेन | — | — |
१३ | रशियन सोव्हिएट | १. बश्किर | १. आडगे |
फेडरल सोशॅलिस्ट | २. बुर्यात | २, गॉर्न अल्ताई | |
रिपब्लिक (आर. | ३. चिचेन-इंगूला | ३. ज्यूईश | |
एस्.एफ्.एस्.आर्) | ४. चूव्हाश | ४. कार्चायेव्ह- चिर्केस | |
(या प्रजासत्ताकात १६ स्वायत्त गण-राज्ये, ५ स्वायत्त प्रदेश यांखेरीज १० स्वायत्त क्षेत्र- विभागही (ओक्रुग)
आहेत. |
५. डग्यिस्तान | ५. खाकास | |
६. कबार्डीनी-बॉल्कार | — | ||
७. कॅल्मिक | — | ||
८. कारेलिनयन | — | ||
९. कोमी | — | ||
१०. मरी | — | ||
११. मॉर्ड्व्हिनीयन | — | ||
१२. ऑसीशन | — | ||
१३. तातार | — | ||
१४. तूव्हा | — | ||
१५. उदमुर्त | — | ||
१६. याकूत | — | ||
१४ | लॅटिव्हिया | — | — |
१५ | लिथ्युएनिया | — | — |
प्राथमिक पक्षसंघटना सु. ४,२५,००० होत्या (१९८३). या संघटनांचे सचिव हे पूर्णवेळ काम करणारे सवेतन सेवक असतात. यांतूनराजकीय प्रशिक्षण, कृषी उत्पादन, कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या, क्रीडा-मनोरंजन इत्यादींवर देखरेख ठेवण्यात येते. महिन्यातून एकदा या संघटनेची सभा घेण्यात येते. या प्राथमिक संघटनेवर चढत्या पक्षाच्या इतर संघटना असून त्या प्रदेशापरत्वे आढळतात. उदा., रेऑन (जिल्हा), गोरॉड (नगर), ओक्रुग (स्वायत्त क्षेत्र), ओब्लास्ट (प्रांत)व क्राई (क्षेत्रीय). राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस, मध्यवर्ती समिती, पॉलिटब्यूरो व सचिवालय अशी पक्षाची प्रमुख चार अंगे आहेत. पक्ष सभा (काँग्रेस) हे सर्वोच्च अंग आहे. तिची सभासदसंख्या पाच हजार होती. (१९८१) काँग्रेस मध्यवर्ती समितीची नियुक्ती करते आणि मध्यवर्ती पॉलिटब्यूरो व सचिवालय यांची तसेच पहिल्या चिटणीसांची निवड करते. पॉलिटब्यूरो आणि सचिवालय ही पक्षाची सर्वांत प्रबळ अंगे आहेत. काँग्रेसची सभा दर पाच वर्षांनी एकदा भरते. मध्यवर्ती समिती पक्षाच्या सर्व कार्याचे सूत्रचालन करते. तिचे एकूण ४७० सभासद असून त्यांपैकी ३१९ सभासद मतदान करतात व १५१ सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही (१९८१). या सभासदांत देशातील प्रमुख लष्करी अधिकारी, मुत्सद्दी, शास्त्रज्ञ, लेखक, वृत्तपत्रकार वगैरेंना सहभागी करून घेण्यात येते. सरचिटणीस हा पक्षाचा सूत्रधार असतो. म्यिखइल गार्बाचॉव्ह हे पक्षाचे विद्यमान सरचिटणीस आहेत (१९८८). सामान्यतः पॉलिटब्यूरो हा धोरणात्मक निर्णय घेणारा घटक असून सचिवालय ही प्रशासकीय कामकाज पाहणारी संघटना आहे. या दोन्ही संघटनांची सभासदसंख्या निश्चित नाही तथापि साधारणपणे ही संख्या दहा ते पंधरा असते. १९८७ साली पॉलिटब्यूरोतील सदस्यसंख्या बारा असून त्यांपैकी सात सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. सचिवालयात सरचिटणीसासह दहा सभासद असतात. अनेक वेळा दोन्ही संघटनांच्या बैठकीत दोन्हींकडील सभासद भाग घेतला. पॉलिटब्यूरोत परराष्ट्रीय व संरक्षण मंत्री आणि सुरक्षा संघटनेचा (के. जी. बी.) प्रमुख यांनाही स्थान आहे. सचिवालयाचा प्रत्येक विभागाकडे एक स्वतंत्र खाते असते. त्यात आर्थिक घडामोडी, परराष्ट्रीय धोरण, सांस्कृतिक व्यवहार, प्रचार आणि प्रसार, वैज्ञानिक, शैक्षणिक, प्रशासकीय बाबी आणि कर्मचारी वर्ग इत्यादींचा समावेश होतो. अनेक सचिवांमार्फत देशातील राजकीय आर्थिक, सामाजिक इ. घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येते.
आठवड्यातून एकदा पॉलिटब्यूरो व सचिवालय यांची बैठक होते. सरचिटणीस हा बैठकीचे नियोजन करतो. पक्षरचनेत सरचिटणीस हे पद अत्यंत प्रभावी आहे. पॉलिटब्यूरो, सचिवालय, मध्यवर्ती समिती व पक्षपरिषद यांच्या सभांना अध्यक्ष या नात्याने सरचिटणीस उपस्थित राहतो. रशियाच्या राजकीय, शासकीय पद्धतीत सरचिटणीसाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
आर्थिक दृष्ट्या पक्ष स्वयंपूर्ण असून सभासद वर्गणी तसेच प्रकाशनांच्या विक्रीद्वारे येणारे उत्पन्न यांतून पक्षाला अर्थप्राप्ती होते. पक्षाची प्रशिक्षण केंद्रे असून प्रकाशनकेंद्रे, मुद्रणालये व अन्य पूरक उद्योगही पक्षातर्फे चालविण्यात येतात. देशातील सर्व प्रचारमाध्यमांद्वारे पक्षाच्या कार्याचा प्रचार केला जातो.
कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र प्राषदा (सत्य) हे होय. याशिवाय पक्षाची तात्विक भूमिका मांडणारी दोन प्रमुख मासिकेही आहेत.
देशातील कम्युनिस्ट पक्षाच्या युवकसंघटनाही आहेत. त्यांपैकी प्रमुख म्हणजे कॉमसोमोल (यंग कम्युनिस्ट लीग-१४ ते २८ वर्षे वयाच्या युवकांसाठी) व यंग पायोनिअर्स ( १० ते १४ वर्षे वयोगटातील युवकांसाठी) या होत. त्याखेरीज लिट्ल ऑक्टोबरिस्ट (५ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी) अशीही संघटना आहे.
शासनयंत्रणा : रशियातील विद्यमान शासनयंत्रणा १९७७ च्या संविधानानुसार असून, या शासनयंत्रणेतील प्राथमिक राजकीय घटक म्हणजे लोकनिर्वाचित प्रतिनिधी मंडळे म्हणजे सोव्हिएटे होत. १९७७ पूर्वी देशात १९२२, १९२४ व १९३६ साली वेगवेगळी संविधाने व त्यानुरूप असलेल्या शासकीय यंत्रणा कार्यान्वित होत्या. पंधरा प्रमुख राज्ये किंवा प्रजासत्ताके, तदंतर्गत वीस स्वायत्त गणराज्ये, आठ स्वायत्त प्रदेश व दहा स्वायत्त क्षेत्रे मिळून रशियाचे संघराज्य बनले आहे. संघराज्याच्या (केंद्रीय) धर्तीवर घटक प्रजासत्ताकांच्या शासनयंत्रणा आहेत.
देशात कम्युनिस्ट हा एकमेव राजकीय पक्ष असून त्याने पुरस्कृत केलेले उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात असतात. एका जागेसाठी एकच उमेदवार असतो व त्याचेच नाव मतपत्रिकेवर असते. मतदाराने या उमेदवाराला निवडावे अथवा नाकारावे. त्याला दुसरा पर्याय मान्य असेल, तर त्याने उमेदवाराच्या नावावर काट मारावी, अशी पद्धत आहे.
संघराज्याचे निर्वाचित प्रतिनिधिमंडळ म्हणजे सुप्रीम सोव्हिएट देशाची ही संसदच होय. ती द्विसदनी आहे. दोन्ही सदनांस समान वैधानिक हक्क आहेत. एकास, सोव्हिएट संघराज्याची विधान परिषद (सोव्हिएट कॉन्सिल ऑफ द युनियन) आणि दुसऱ्यास सोव्हिएट राष्ट्रिकांची परिषद (सोव्हिएट कौन्सिल ऑफ द नॅशनॅलिटीज) म्हणतात. प्रत्येक सदनात ७५० प्रतिनिधी असतात. यांतील प्रतिनिधींची निवड दर पाच वर्षांनी प्रौढ मताधिकारांद्वारे होते. अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असून उमेदवाराची किमान वयोमर्यादा २१ वर्षे आहे. विधान परिषदांचे प्रतिनिधी समान लोकसंख्येच्या तत्त्वावर निवडले जातात. साधारणपणे ३,६०,००० मतदारांचा एक मतदारसंघ असतो. याप्रमाणातच राष्ट्रिकांच्या विधान परिषदेचे प्रतिनिधी राष्ट्रीय समूहांच्या मतदारसंघांतून निवडले जातात. प्रत्येक प्रजासत्ताकातून बत्तीस, प्रत्येक स्वायत्त गणराज्यातून अकरा, प्रत्येक स्वायत्त प्रदेशातून पाच आणि प्रत्येक स्वायत्त क्षेत्रविभागातून एक याप्रमाणे त्यांची निवड केली जाते.
सर्वोच्च सोव्हिएटची वर्षातून दोन (जून ते डिसेंबर) अधिवेशने होतात. ही अधिवेशने दोन किंवा तीन दिवस चालतात. सर्वोच्च सोव्हिएट विविध खात्यांसाठी सोळा स्थायी समित्यांची तसेच अध्यक्षमंडळाची (प्रिसिडियम) नियुक्ती करते. प्रत्येक समितीत सामान्यतः ३५ प्रतिनिधी असतात. मात्र आर्थिक नियोजन व अर्थसंकल्प यांवरील समितीत ४५ सभासद असतात. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत देशाच्या मंत्रिमंडळाची निवड करण्यात येते. मंत्रिमंडळ द्विस्तरीय असते. मंत्रिमंडळात पंतप्रधान, त्याचे सहकारी म्हणजे निराळ्या खात्यांचे आणि घटक प्रजासत्ताकांचे पंधरा प्रतिनिधी सभासद असतात. सुमारे शंभर सदस्यांचे हे मंत्रिमंडळ जगातले बहुधा सर्वांत मोठे मंत्रिमंडळ असावे.
संघराज्याचा कारभार पाहणारे खातेनिहाय मंत्री (ऑल युनियन मिनिस्ट्रीज) व घटक प्रजासत्ताकांच्या त्या त्या खात्यांच्या कारभारावर देखरेख ठेवणारे मंत्री (युनियन रिपब्लिक मिनिस्ट्रीज) असे संघराज्याच्या मंत्रिमडळाचे दोन स्तर असतात. केंद्रीय मंत्रिमंडळावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. उदा., देशाची अंतर्बाह्य सुरक्षितता, आर्थिक विकास, उत्पादन व वितरण, राजकीय व विचार प्रणालीय प्रशिक्षण इत्यादी.
सर्वोच्च सोव्हिएटच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीस अध्यक्षमंडळाची निवड करण्यात येते. यात एक अध्यक्ष, एक पहिला उपाध्यक्ष, पंधरा घटक प्रजासत्ताकांचे प्रत्येकी एक याप्रमाणे पंधरा उपाध्यक्ष, २१ सभासद व १ सचिव असतो. मंडळाची एकूण सभासदसंख्या ३९ असते. संसदेच्या दोन अधिवेशनांमधील काळात सर्व शासकीय जबाबदारी अध्यक्षमंडळ पार पाडते. संसदेचे अधिवेशन बोलवणे, स्थायी समित्यांच्या कार्यात समन्वय साधणे, विधिमीमांसा करणे इ. महत्त्वाची कामे या मंडळाकडे असतात.
रशियातील शासकीय सुरक्षासमिती (के. जी. बी.) उल्लेखनीय आहे. ही एक गुप्त पोलीस यंत्रणा असून कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीमार्फत तिचे धोरण, कार्य व नेतृत्व इ. बाबी ठरविण्यात येतात. देशाची सुरक्षितता तसेच सक्तीची श्रमव्यवस्था इ. गोष्टी या समितीच्या कार्यक्षेत्रात मोडतात. प्रत्यक्ष कामकाजाबाबत ही समिती केंद्र सरकारच्या सुप्रीम सोव्हिएटला जबाबदार असून तिचे मुख्य कार्यालय मॉस्कोमध्ये आहे. देशातील प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा असून त्या त्या प्रांतिक सुप्रिम सोव्हिएटला त्या जबाबदार असतात. अगदी स्थानिक पातळीवरसुद्धा या समितीच्या शाखा आहेत. या समितीच्या हस्तकांकरवी सुरक्षाविरोधी कृत्ये करणाऱ्यांची माहिती मिळवण्यात येते.
देशातील केंद्रीय शासनयंत्रणेच्या धर्तीवरच रशियातील १५ प्रजासत्ताके आणि त्यांच्या अंतर्गत असलेली स्वायत्त गणराज्ये यांची शासनयंत्रणा आहे.
देशात प्रमुख पंधरा प्रजासत्ताके असून त्यांपैकी ‘रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिक’ (आर्. एस्. एफ्. एस्. आर्. ) या सर्वांत मोठ्या प्रांताचा अपवाद वगळता इतर सर्व प्रांत सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिक म्हणून ओळखले जातात. या प्रजासत्ताकांची नावे त्यातील बहुसंख्य लोकांच्या वांशिक-राष्ट्रीय वैशिष्ट्यांनुसार पडलेली आहेत. रशियनेतर अशा मोठ्या वांशिक-राष्ट्रिय समाजांची त्या त्या प्रजासत्तकांच्या अंतर्गत स्वायत्त गणराज्ये आहेत. त्यांची संख्या वीस आहे. त्याखेरीज वांशिक अल्पसंख्याकांच्या समूहांचे प्रशासकीय स्वायत्तता असलेले विभाग देशात आढळतात. त्यांना ‘ओब्लास्ट’म्हणतात. देशात आठ ओब्लास्ट असून त्यांपैकी पाच रशियन प्रजासत्ताकात (आर्. एस्. एफ्. एस्. आर्.) आणि जॉर्जिया, अझरबैजान व ताजिकिस्तान या प्रजासत्ताकांत प्रत्येक एक आहेत. ओब्लास्टच्या प्रशासनाखालीच प्रशासकीय स्वायत्त क्षेत्र विभागांचा अंतर्भाव होतो, त्यांना ओक्रूग म्हणतात. असे एकूण दहा ओक्रूग असून ते रशियन प्रजासत्ताकात आहेत.
रशियातील १९७७ च्या नव्या संविधानानुसार पंधरा प्रजासत्ताके व तदंतर्गत स्वायत्त गणराज्ये यांची स्वतंत्र वेगवेगळी अशी संविधाने आहेत. परदेशी संबंध, संरक्षण, आर्थिक नियोजन, शिक्षण, कायद्याची मूलतत्त्वे इ. विषय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत तथापि संविधानाच्या ७२ व्या अनुच्छेदानुसार प्रांतांना सोव्हिएट संघराज्यातून बाहेर पडण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
प्रजासत्ताके व तदंतर्गत गणराज्ये यांची एकसदनी सुप्रिम सोव्हिएट म्हणजे लोकप्रतिनिधींची विधिमंडळे असून त्यातून अध्यक्ष मंडळ निवडण्यात येते. या मंडळातर्फे मंत्रिमंडळाची नेमणूक करण्यात येते. प्रांतिक सुप्रिम सोव्हिएटमधील लोकप्रतिनिधींची निवड दर पाच वर्षांनी करण्यात येते. १९८५ च्या प्रांतिक निवडणुकांत एकूण १०,१८८ लोकप्रतिनिधी निवडून आले. त्यात स्त्रिया, औद्योगिक कामगार यांचे प्रतिनिधी जास्त होते.
रशियात प्रांतिक प्रशासनाच्या दृष्टीने केलेले १२९ विभाग (टेरिटरीज) व प्रदेश (रिजन) ३,२१३ जिल्हे २,१३८ शहरे आणि ३,९३७ नागरी वसाहती होत्या (१९८४). प्रांतिक प्रशासनात ओब्लास्ट, क्राय (फक्त रशियन प्रजासत्ताकातच), रेयॉन शहरे आणि ग्रामीण परिसरातील गावे व वस्त्या अशी प्रशासकीय घटकांची उतरंड आढळते. या स्थानिक पातळीवरही लोकप्रतिनिधिंची सोव्हिएटे शासकीय कारभार पाहतात. देशात अशी सोव्हिएटे एकूण ५१,२२३ होती (१९८४). लोकप्रतिनिधींची निवडणूक दर अडीज वर्षांनी होते. स्थानिक प्रशासनात विविध कामांसाठी स्थायी वा कार्यकारी समित्या असतात. त्या समित्यांवर स्वीकृत सदस्य नेमण्याची पद्धत आहे. १९८४ मध्ये अशा सदस्यांची संख्या तीन कोटी होती. १९८५ मध्ये झालेल्या जिल्हा पातळीवरील निवडणुकात एकूण २३,४०,७०३ लोकप्रतिनिधी निवडण्यात आले.
न्यायव्यवस्था : राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च न्यायालय, त्याखाली प्रत्येक संघराज्यातील आणि स्वायत्त राज्यातील प्रांतिक न्यायालये, त्याखाली विभागीय, प्रादेशिक, क्षेत्रिय आणि जिल्हा पातळीवरील लोकन्यायालये अशी न्यायालयीन व्यवस्था रशियात आढळते. रशियन न्यायव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये अशी : सबंध देशातील अधिनियमांची किंवा कायदेकानूंची तत्वे केंद्रीय सुप्रीम सोव्हिएटमार्फत ठरविली जातात. प्रांतिक आणि त्याखालील पातळ्यांवर त्या त्या विभागाला अनुरूप असे कायदेकानू करण्यात येतात. न्यायालयीन कारभाराची भाषा म्हणजे ती ती प्रादेशिक भाषा होय. सामान्यपणे न्यायाधिशांची नेमणूक पाच वर्षांसाठी असते. स्थानिक, प्रादेशिक किंवा प्रांतिक सोव्हिएटे न्यायाधिशांची निवड करतात. जिल्हा पातळीवरील लोकन्यायालयातील एक न्यायाधीश आणि दोन ॲसेसर (मुदत अडीच वर्षे) यांची निवडणूक मात्र थेट लोकांमार्फत करण्यात येते. लोकन्यायालयातील न्यायाधिशांना परत बोलावण्याचा लोकांना अधिकार एसतो. सर्वोच्च न्यायालयावरही ॲसेसर असतात आणि त्यांना किमान दोन वर्षांचा कामगार संघटनेच्या कार्याचा किंवा सार्वजनिक कार्याचा अनुभव असावा लागतो. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील खटलेही लोकन्यायालयांतर्फेच खास कामगार-सत्र विभागातर्फे चालविले जातात. शासनसंस्थांतील वादग्रस्त विषय लवाद मंडळाकडे सोपविले जातात. शासन संस्था आणि परदेशी व्यापार संस्था यांच्यातील खटले केंद्र शासनाच्या चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नेमलेल्या परदेशी व्यापार लवाद आयोगातर्फे चालवले जातात. संबंध देशासाठी महाधिवक्ता असून त्याची पाच वर्षासाठी नेमणूक केंद्रीय सुप्रीम सोव्हिएटमार्फत करण्यात येते. संघराज्यातील आणि स्वायत्त राज्यांतील अधिवक्त्यांती नेमणूक (मुदत ५ वर्षे) महाधिवक्ताच करतो. देशातील सर्व कायदेकानूंची वैधिकता व त्यांची यथार्थ अंमलबजावणी यांवर देखरेख करण्याचे काम महाधिवक्त्याचे असते. १९४७ साली देशात फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली तथापि १९५०, १९५४, १९५८, १९६१ आणि १९६२ या वर्षी केलेल्या दुरूस्त्यांनुसार काही गुन्ह्यांच्या बाबतीत देहान्त शासनाची तरतूद करण्यात आली आहे. उदा., राजद्रोह, हेरगिरी, सरकारी पैशाचा अपहार, लाचलुचपत, बलात्कार यांसारखे गुन्हे. राजद्रोह, हेरगिरी यांसारख्या खटल्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली असून या गुन्हांतील अटक केलेल्या अथवा सिद्धदोषी ठरलेल्या व्यक्तींना योग्य ते कायदेशीर संरक्षण देण्यासाठी महाधिवक्त्याला अधिकार देण्यात आले आहेत. कामगार संघटना, युवक संघटना आणि स्थानिक शासकीय संस्था यांच्या प्रतिनिधींचे आयोग देशातील स्थानबद्धांच्या व्यवस्थेवर देखरेख करतात. १९५८ साली देशातील दिवाणी आणि फौजदारी विधिसंहितांत सुधारणा करण्यात आल्या. गुन्हेगारी उत्तरदायित्वाचे वय १४ वरून १६ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आणि तडिपार व हद्दपार करण्याच्या तरतुदी रद्द करण्यात आल्या. गुप्त न्यायालयीन चौकशी बंद करण्यात येऊन लोकशत्रुत्त्वाचा आरोप अग्राह्य ठरविण्यात आला. फौजदारी विधिसंहितेतील अनुच्छेद क्र ७० व १९० महत्त्वाचे आहेत. राष्ट्रविरोधी चळवळी आणि प्रचार तसेच प्रशासनाविरूद्ध कृती यांसारख्या गुन्ह्यांच्या बाबतीत वरील अनुच्छेदात तरतुदी आहेत. सेनादलांसाठी सैनिकी न्यायाधिकरणे आहेत. १९७७ च्या संविधानातील अनुच्छेद क्रमांक १५१ ते १६८ यात देशातील न्यायालयीन व्यवस्थेच्या तरतुदी अंतर्भूत आहेत.
लेखक : देशपांडे, सु. र.; जाधव, रा. ग.
संरक्षणव्यवस्था :पूर्वेतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपली संरक्षणक्षमता इतरांपेक्षा वरचढ राखणे, हे रशियन सुरक्षानीतीचे इतिहासक्रमाने उत्क्रांत झालेले तत्व आहे. भयगंडापोटीच गुप्ततेचीही वृत्ती रशियन राज्यकर्त्यांत मुरलेली आहे. कधीकधी आक्रमक भासणारे आणि जागतिक साम्यवादी नेतृत्वाच्या आधारे समर्थन केले जाणारे रशियाचे संरक्षणविषयक धोरण हे मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षेच्या तत्त्वावरच अधिष्ठित आहे, असे म्हणता येईल.
शस्त्रास्त्रांचे विविध प्रकार, त्यांची गुणवत्ता, संख्या आणि त्यांचा प्रत्यक्ष उपयोग यांबाबतीत कोणत्याही राष्ट्राच्या, विशेषतः महाबलाढ्य अमेरिकेच्या तुलनेत आपण मागासलेले, हिणकस व कमजोर असणार नाही, असे रशियाचे उघड धोरण असून त्यानुरुप अंमलबजावणी करण्यात येते.
ज्या ज्या राष्ट्रांबरोबर रशियाने शांतता, मैत्री आणि परस्परसहकार यांसंबंधी करार किंवा तह केले आहेत, त्या त्या राष्ट्रांच्या संरक्षणव्यवस्थेतील आणि अंतर्गत कारभारातील परकीय हस्तक्षेप निवारण्यासंबंधीच्या तरतुदी व मर्यादा यांबद्दलचे रशियाचे धोरण व कार्यवाही हाही रशियन संरक्षणनीतीचा अभ्यसनीय पैलू आहे.
रशियातील बलविभाग, बलसंख्या, बलाचे पाखरण, बलसंरचना आधिपत्य आणि नियंत्रणव्यवस्था यांचा विविध तपशील पुढीलप्रमाणे आहे : संरक्षणबलाचे व्यूहतंत्रीय व विविध युद्धकार्यबळ असे दोन प्रमुख भाग आहेत. ही विभागणी विशिष्ट युद्धकार्यानुसार केलेली आहे.
व्यूहतंत्रीय बळाचा पाया अण्वस्त्रे होत. रशियाच्या संपूर्ण सैनिकी शक्तीचाच तो पाया आहे. शत्रूला अण्वस्त्रांचा उपयोग करण्यापासून
प्रक्षेपणास्त्रांचा प्रकार | पाखरण संस्था | पल्ला | राखीव |
(१) आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे (१९८३) ११, १३, १७, १९, २४, २५ | १,३७३ | ९,४०० ते १३,००० | ६,८०० – १,३०० |
(२) अणुऊर्जाप्रचलित पाणबुडीतून मारा करणारी प्रक्षेपणास्त्रे – एस्.एस. एन्. ५, ६, ८, १७, १८, २०, २३ | ९८३ | १,४०० ते ८,३०० | २,३०० – ४,००० |
(३) बाँबफेकी विमानाद्वारा सुटणारी प्रक्षेपणास्त्र-विमाने-बायझन बेअर | १८-३३ | ८,००० ते ८,३०० | ४४० – ९३० |
(४) प्रक्षेपणास्त्रविरोधी अस्त्रे – | १०० | ७५० | १०० – २०० |
प्रक्षेपणास्त्रांत असलेल्या आण्विक संहारशीर्षाचे प्रक्षेपक व त्यांचे अणुकेंद्रित स्फोटक वजन यांचा तपशील दिलेला नाही.
परावृत्त करु शकेल, एवढी अणुयुद्धक्षमता संपादन करणे, हा रशियाच्या व्यूहतंत्रीय बळाचा सिद्धांत आहे. ‘उभयतांचा अटळ विनाश’ (म्युच्युअल ॲशुअर्ड डिस्ट्रक्शन) या अमेरिकन सिद्धांताशी रशिया सहमत नाही. अण्वस्त्रांचा मारा केल्याने शत्रूच्या २० ते ३३ टक्के लोकसंख्येचा व ५० ते ७५ टक्के औद्योगिकक्षमतेचा विध्वंस होईल. या बाबतीत शत्रूने आघात करण्यापूर्वीच आपण शत्रूवर आघात करण्याची संधी मिळविणे, अशी रशियाची भूमिका आहे.
अणुयुद्धामुळे घडणारी प्राणहानी टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी रशियाने नागरी संरक्षणव्यवस्था केलेली आहे. मॉस्को राजधानीच्या संरक्षणासाठी ‘गलोश’ नावाची यंत्रणा असून तिच्याद्वारा प्रक्षेपणास्त्रविरोधी मोर्चे उभारलेले आहेत. या यंत्रणेत संशोधन, प्रयोग व सुधारणा चालू असतात. रशिया व अमेरिका यांच्यातील १९७२ च्या प्रक्षेपणास्त्रविरोधी संरक्षण तहाप्रमाणे ही व्यवस्था केलेली आहे. तथापि तहाच्या अटींचा भंग होत आहे, असे आरोप हे दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. यातूनच अमेरिकेच्या ‘नक्षत्र-युद्ध’ (स्टार वॉर) ऊर्फ युद्धनैतिकी संरक्षण उपक्रम (स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह) या योजनेची २५ मार्च १९८३ रोजी घोषणा करण्यात आली. रशिया या उपक्रमातही अमेरिकेच्या अगोदर युद्धनैतिकी संरक्षणाचे उद्दिष्ट गाठेल किंवा संपूर्ण संरक्षण मिळविण्यासाठी अमेरिकेशी सहकार्य करण्यात तयार होईल, असा संभव आहे. औद्योगिक कारखान्यांच्या रक्षणाच्या संदर्भात १९६० सालापासून, नवीन करखान्यांची स्थापना एक लक्ष लोकवस्तीपेक्षा कमी असलेल्या शहरात तसेच सायबीरियासारख्या दूरच्या प्रदेशात करण्याचे धोरण जारी आहे. सैनिकी ठाण्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना संकटसमयी दुसरीकडे हलविण्याची व्यवस्था आहे. बहुतांश शासकीय अधिकारी नागरी संरक्षणास जबाबदार आहेत. हे शासकीय अधिकारी सैनिकी अधिकारीच असतात. प्रत्येक गणराज्य, क्षेत्र, विभाग, जिल्हा व शहर येथे नागरी संरक्षण कार्यालये आहेत. हवाई संरक्षण संरचना व कार्यपद्धती वरीलप्रमणेच आहे.
युद्धनैतिकी संरक्षणाची उपकरणे व साधने पुढील प्रकारची आहेत. (१) लक्ष्य-संनिरीक्षण-संपादन : या साधनाद्वारे प्रक्षेपण व प्रक्षेपणास्त्रसंख्या या बाबी निश्चित केल्या जातात. त्याचबरोबर आक्रमक अस्त्रांच्या लक्ष-स्थानांची माहिती मिळते. (२) अस्त्रभेदभाव : प्रक्षेप्य, संहारशीर्षवाहन व प्रलोभक (डीकॉय) यांच्यातून खरे संहारशीर्ष ओळखणे. (३) दर्शक व मार्गनिरीक्षण : शत्रूचे अस्त्र ओळखून त्याच्या गतिमार्गाची माहिती पुरविणे. (४) संहार-निर्धारण : या उपकरणाद्वारे आक्रमकास्त्रांचा झालेला व न झालेला संहार यांची माहिती पुरविणे.
वरील साधनांमध्ये विविधोपयोगी रडार व प्रकाशीय उपकरणी यांचा उपयोग करण्यात येतो. देशातील संरक्षक केंद्रांत ही साधने उपलब्ध असतात. स्टालिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्वॉव्हच्या कारकीर्दीत ‘स्पुटनिक’चे प्रक्षेपण करण्यात रशियाला यश मिळाले (१९५७). त्यामुळे आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे बनवून अमेरिकेशी बरोबरी करण्यास फार वेळ लागणार नाही, असे त्याला वाटू लागले. ‘सुएझ’ संघर्षाच्या वेळी (१९५६) ब्रिटन व फ्रान्स यांनी आक्रमण न थांबविल्यास त्यांच्यावर रॉकेटचा मारा करण्यात येईल, अशी ख्रुश्वॉव्हने धमकी दिली. ख्रुश्वॉव्हच्या रॉकेट-मुत्सद्देगिरीचा हा प्रारंभ होय. ख्रुश्वॉव्हपासूनच प्रक्षेपणास्त्रांच्या बाबतीत रशियाची प्रगती सुरु झाली, असे म्हणावे लागेल.
त्याच्यानंतर ब्रेझन्येव्ह यांनी एका बाजूला शांततायुक्त सहजीवनाचा पुरस्कार केला व दुसऱ्या बाजूने रशियाची संरक्षणशक्ती वाढवली. १९६४ ते १९७० या काळात अमेरिकेबरोबर बळाच्या बाबतीत बरोबरी करण्यात त्यांनी यश मिळविले. परराष्ट्रीय धोरण व योजना आखण्यात ब्रेझन्येव्हने लष्करी नेत्यांना बरेच महत्त्व दिले. राष्ट्रीय अभिमान, शक्ती व प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणजे संरक्षण सेना ही समजूत त्याने रुढ केली. ब्रेझन्येव्हने आशियाई सामूहिक सुरक्षा योजनेचे सूतोवाच केले (१९६९). ब्रेझन्येव्हनंतरचे रशियन राज्यकर्ते त्याचेच धोरण पुढे चालवीत आहेत असे दिसते. रशियन दृष्टिकोनानुसार साम्राज्यवादी किंवा पुंजीवादी राष्ट्रांनी जर युद्धाचा उपक्रम केला, तर ते साम्यवादी व पुंजीवादी अशा परस्परविरोधी मतप्रणालीमधील युद्ध ठरते व म्हणून आजपर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धापेक्षा ते अटीतटीचे ठरुन भयंकर क्रूरतेने लढले जाईल. प्रारंभी काही काळ हे युद्ध पारंपारिक शस्त्रास्त्रांनी (रणगाडे, पायदळ, विमाने इ.) लढले जाईल तथापि पुढे सर्वकष अणुयुद्धात त्याचे रुपांतर होईल. तसेच ते दीर्घकालपर्यंत लढले जाईल. त्यात बहुतांश प्रक्षेपणास्त्रे खर्ची पडतील. तथपि जगाचा संपूर्ण नाश होणे वा करणे शक्यच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील सैन्यबळाचा नाश करणे शक्य होणार नाही. हे सैन्य दीर्घकालपर्यंत लढा देऊ शकेल. म्हणून जे राष्ट्र दीर्घकाळ युद्ध लढू शकेल, तेच शेवटी विजयी होईल.
रशियन युद्धविचारप्रणालीनुसार दुसऱ्या महायुद्धात पिछाडीची स्थिरता, सैन्याचे मनोधैर्य, लढाऊ दलांची संख्या व गुणवत्ता, शस्त्रास्त्रे आणि अधिकाऱ्यांची संघटनात्मक क्षमता व कौशल्य या बाबींवर चढाईच्या तत्त्वावर भर दिला गेला असला, तरी नंतरच्या काळात शत्रुबल व आपले बळ यांचा तौलनिक विवेक करुन आक्रमक वा संरक्षणात्मक कारवाई करण्याचे रशियन धोरण दिसते.
दुसऱ्या महायुद्धात राजकीय साध्यासाठी बर्लिन, व्हिएन्ना यांसारखी पश्चिम आघाडीवरील प्रमुख शहरे अमेरिकेच्या अगोदर जिंकण्यासाठी रशियन सैन्याला मोठी प्राणहानी सोसावी लागली. परिणामतः आपल्या देशाच्या पश्चिमेला आपल्या अंकित राष्ट्रांचा अडसर घालण्यात रशियाला यश मिळाले.
कम्युनिस्ट पक्षाची पॉलिटब्यूरो ही समिती देशातील सैनिकी बलाचे नियंत्रण करते. पराकोटीच्या संकटकाळात कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस सर्वोच्च सरसेनापती म्हणून निवडला जातो. संरक्षण यंत्रणेद्वारा संरक्षणविषयक आणि सैनिकी धोरण ठरविले जाते. पक्षाचा सरचिटणीस या यंत्रणेचा अध्यक्ष आणि संरक्षणमंत्री व उच्च राजकीय व सैनिकी नेते सदस्य असतात. युद्धकाळात या यंत्रणेचे राज्यसंरक्षण समितीत रुपांतर होते व युद्धप्रक्रियेशी संबंधित सर्व शासकीय कार्यालयांच्या कार्याचे ती संचालन करते.
संरक्षण यंत्रणेची दुय्यम यंत्रणा म्हणजे सैनिकी यंत्रणा होय. संरक्षणमंत्री तिचा अध्यक्ष असतो आणि सर्व सेनादलांचे सेनापती व काही प्रमुख सैनिकी सेनाधिकारी तिचे सदस्य असतात. शांतताकाळात युद्धनैतिकी संचालन व सैनिकी बळाचे नेतृत्व ही समिती करते. युद्धकाळात राज्यसंरक्षणसमितीच्या आदेशानुसार ती कार्य करते. प्रधानसैनिकी कार्य संघटना ही प्रमुख सैनिकी यंत्रणेला दुय्यम असते. सर्व सेनादलांच्या कार्य संघटना, पिछाडी सैनिकी संघटना, नागरी संरक्षण संघटना, सैनिकी विभाग, संरक्षण मंत्रालय इत्यादींच्या कार्याचे सुसूत्रीकरण ही संघटना करते.
रशियाच्या एकंदर संरक्षण सेनांची पाच अंगे आहेत : (१) युद्धनैतिकी ऊर्फ रॉकेट सेना, (२) भूसेना, (३) राष्ट्रीय हवाई संरक्षण सेना, (४) वायुसेना आणि (५) नौसेना, रॉकेट सेना ही जेष्ठ सेना मानली जाते. रॉकेट सेना एक हजार किमी. पल्ल्याहून अधिक अशी जमिनीवरील मध्यम आंतरखंडीय अणुकेंद्रीय प्रक्षेपणास्त्रे हाताळते. रॉकेट सेनेच्या कार्याला वायुसेना व नौसेना यांचा एकेक पूरक विभाग जोडलेला असतो.
गुप्ततेच्या परंपरेमुळे रशियन संरक्षणविषयक निश्चित आकडेवारी उपलब्ध होणे कठीण असते, तथापि पश्चिमी सूत्रांनी प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवरुन सामान्यतः रशियन आकडेवारी देण्यात येते. १९८६ सालाअखेर रशियाचे एकूण सशस्त्र सेनाबळ ५१ लक्ष १५ हजार आहे. (सीमा संरक्षक़ देशांतर्गत सुरक्षा, रेल्वे व बांधकाम दळे वगळता). यांपैकी सु. १८ लक्ष ४० हजार भूसैनिक आहेत. यांपैकी सु. १४ लक्ष सैनिक हे सक्तिसैनिक (दोन वर्षे) आहेत. भूसेनेचा ढोबळ तपशील : रणगाडा डिव्हिजन ५० विमानगामी ७ मोटर रायफल १३६ तोफखाना १५ शस्त्रास्त्रे रणगाडे ५१,००० चिलखतबंद लढाऊ वाहने ७०,००० तोफा ३४,००० क्षेपणास्त्रे क्षेपक यंत्रे १,४०० हेलिकॉप्टर ४,१००.
नौसेनेत [नौवायुसैनिक, नाविक पायदळ (मरीन) सागरीकिनारा तोफेची व क्षेपणास्त्र सैनिक धरुन] ४ लक्ष ७० हजार सैनिक आहेत. यापैकी सु. ७०% सक्तिसैनिक आहेत. शस्त्रास्त्रसंभारामध्ये पाणबुड्या २७८, युद्धनौका १,०९०. वरील संभाराशिवाय १११ पाणबुड्या व ३० युद्धनौका राखीव ठेवल्या आहेत. नाविक वायुसेनेत ७०,००० वायुसैनिक व ८३९ लढाऊ विमाने आणि २६५ लढाऊ हेलिकॉप्टर आहेत.
वायुसैनिक सु. ४ लक्ष आहेत. ३,२६० लढाऊ व ७५० वाहतुकी विमाने आहेत. आवश्यक वाटल्यास २,५५० नागरी विमाने संरक्षणासाठी वापरण्यात येतात. लढाऊ सैनिकांच्या मदतीला, पोलीस, के. जी. बी.चे सव्वादोन लक्ष सीमा सैनिक, त्यांचे रणगाडे, युद्धनौका वगैरे दिले जातात. एम्. व्ही. डी. (देशांतर्गत सुरक्षा दल) चे ३ लक्ष सैनिक रणगाडे, चिलखती गाड्या, संरक्षण सेनाच्या दिमतीला मिळतात.
भूसेनेपैकी ६५% बल नाटो संघटनेच्या मोर्चाच्या आसपास आहे. सुमारे ३०–३३% चिनी केंद्राना प्रतिकार करणारे आहे.
एकूण तीन युद्धनैतिकी आधिपत्य कक्ष आहेत (अ) पश्चिमी : याकडे १४ रणगाडा, १२ यंत्रसज्ज रशियन आणि ४५ बिगर रशियन (पोलंड, पूर्व जर्मनी वगैरे) दिले आहेत. यांशिवाय यूरोपीय रशियांतील, ३१ रणगाडा, २९ यंत्रसज्ज व दोन हवाई पायदळ दले आहेत.
(आ) दक्षिण : ३० दले ही बहुतांश यंत्रसज्ज दले आहेत. शिवाय अफगाणिस्तानातील सु. १,१५,००० सैनिक असलेली रणगाडा व तोफखाना दलेही आहेत.
(इ) अतिपूर्व : या कक्षाखाली ७ रणगाडा व ४५ यंत्रसज्ज दले आहेत. याखेरीज सिरिया, व्हिएटनाम व क्यूबा या देशांतही रशियन सैन्य आहे. अल्जीरिया, इथिओपिया, इराक, लाओस, लिबिया व येमेन या राष्ट्रांतूनही रशियन सैन्य आढळते. बॉर्सा करारान्यये रशियाने पूर्व जर्मनीत २०, पोलंडमध्ये २ व हंगेरीत ४ अशी दले ठेवली आहेत.
पारंपरिक हवाई-संरक्षण व्यवस्थेखेरीज अणुकेंद्रीय प्रक्षेपणास्त्रांच्या हल्ल्यापासून रशियाचे संरक्षण करण्यासाठी युद्धनैतिकी संरक्षण सेना आहे. या सेनेत ६,३५,००० सैनिक, १,२०० विमानप्रतिरोधक विमाने ९,६०० भू-हवाई क्षेपणास्त्रे आहेत.
अनेक तऱ्हेची शस्त्रास्त्रे, त्यांचे नावीन्य, संख्या पाहून संरक्षण खर्च प्रचंड होत असावा असे म्हटले जाते. अमेरिकेत त्यांच्या अंदाजपद्धतीनुसार रशियन खर्चाचा अंदाज करतात, त्यामुळे अमेरिकन खर्चापेक्षा रशियाचा खर्च जास्ती दिसतो.
जिनिव्हा संकेतानुसार बिषारी वायूच्या उपयोगावर बंदी घालण्यात आली. १९७० सालापासून रासायनिक, जैव आणि किरणोत्सारयुक्त दूषित पर्यावरणांतही रशिया युद्ध लढण्याची तयारी करत आहे. असे अमेरिका व त्याची दोस्त राष्ट्रे यांना वाटते. रशियाकडे ५०,००० ते ८०,००० रासायनिक युद्धविरोधी प्रशिक्षित सैन्य असल्याचा दावा केला जात आहे. तिसऱ्या जगातील संघर्षाविषयी रशियन धोरण व आवरण पुढीलप्रमाणे दिसते : (१) रशियन प्रभाव विस्ताराच्या दृष्टीने अनुकूल राष्ट्रांना लष्करी व आर्थिक मदत करणे. (२) पाश्चात्त्य राष्ट्रांनी रशियन विस्ताराला आळा घालण्यासाठी ज्या संघटना स्थापल्या (उदा., बगदाद संघटना, सेंटो, सिटो इ.), त्यांना शह देण्यासाठी त्या त्या भौगोलिक क्षेत्रांतील रशियाधार्जिण्या किंवा गरजू राष्ट्रांना मदत देणे, उदा., इंडोनेशिया, अफगाणिस्तान, ईजिप्त, येमेन इत्यादी. १९६५–६९ या काळात साम्राज्यवादी आक्रमणाला बळी पडू शकणाऱ्या व राष्ट्रीय मुक्तीसाठी उद्युक्त झालेल्या देशांना रशियाने शस्त्रास्त्रे देण्यास सुरुवात केली. उदा., सिरिया ईजिप्त, इराक व लिबिया. १९७५–८० या काळात मार्क्सवादी राष्ट्रांना व गनिमी संघटनांना (पॅलेस्टिनी मुक्ति संघटना) सर्वप्रकारची उघड मदत देण्यास सुरुवात झाली. उदा., अंगोला, इथिओपिया, सोमाली प्रजासत्ताक इत्यादी, अफगाणिस्तानात साम्यवादी शासनाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी रशियन सैन्य घुसविण्यात आले (१९७९). या नवीन रशियन तंत्राला सहकारी हस्तक्षेप म्हटले जाते. म्हणजे एखाद्या राष्ट्रातील दोन गटांत राजकीय सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष होत असताना, एका गटाने रशियाकडे सैनिकी मदतीची मागणी केल्यावर त्या गटाच्या सहकार्याने रशियन सैन्य त्या राष्ट्रात घुसविणे. भारताला रशियाकडून १९५४ ते १९८० या काळात सु. चार अब्ज अमेरिकी डॉलर किंमतीची लढाऊ विमाने, युद्धनौका, रणगाडे, तोफा, दारुगोळा, क्षेपणास्त्रे, रडार, संगणक इ. शस्त्रास्त्रे मिळाली. यांशिवाय मिग नावाची लढाऊ विमाने व त्यांची एंजिने तयार करण्याचे कारखाने रशियन सहकार्याने भारतात सुरु झाले आहेत. उदा., नाशिकजवळ ओझर येथील विमानाचा कारखाना व भिलाई येथील लोह उत्पादनही संरक्षणकार्यांस अप्रत्यक्षपणे उपयुक्त आहे. भारताला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या व अत्याधुनिक मिग २९ लढाऊ विमाने पुरविण्याचे व त्यांचे उत्पादन करण्यास आर्थिक व तांत्रिक साहाय्य देण्याचे रशियाने आश्वासन दिले आहे.
लेखक : दीक्षित, हे. वि.
आर्थिक स्थिती : रशिया हा जगातील पहिलाच समाजवादी देश. १९१७ मध्ये क्रांती होण्यापूर्वी रशिया हा एक मागासलेला शेतीप्रधान देश होता. सतराव्या शतकापर्यंत रशिया तत्कालीन यूरोपच्या तुलनेने औद्योगिक द्दष्ट्या अप्रगत होता. तथापि अठराव्या शतकाच्या प्रारंभी पीटर द ग्रेटने जेव्हा औद्योगिकीकरणास चालना दिली, तेव्ह्या रशिया यूरोपातील इतर देशांपेक्षा औद्योगिक दृष्ट्या फार मागे नव्हता. परंतु अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपातील देशांनी, जागतिक बाजारपेठांमधून येणाऱ्या संपत्तीच्या जोरावर, औद्योगिक-आर्थिक आघाडीवर बराच पुढाकार मिळविला होता. उरल भागातील लोखंडाच्या खाणी, वाढते लोहमार्ग, खनिज तेल तसेच इतर धातुउद्योग असा औद्योगिक व्याप असूनही यूरोपच्या तुलनेने रशिया मागेच होता. शेती हाच येथील अर्थव्यवस्थेचा पाया होता. दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, रशियातील पुष्कळसे कारखाने परकीयांच्या मालकीचे, परकीय भांडवलावर उभारलेले आणि परकीय संचालक व तंत्रज्ञ यांच्या मदतीने चालले होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत व १९१४ चे पहिले महायुद्ध सुरु होण्यापूर्वी सर्वसाधारणपणे २० कोटी रुबल इतके परकीय भांडवल रशियामध्ये गुंतविण्यात आले होते. त्यातील काही भाग झार सरकारने काढलेल्या कर्जाच्या रुपात होता. लोखंड व पोलाद उद्योग किंवा खनिज तेल उद्योग यांत गुंतलेल्यापैकी ८०% भांडवल परकीय होते १८ मोठ्या संयुक्त भांडवली बँकांतून गुंतविलेल्या भांडवलापैकी ४२% भांडवल परकीय होते. परकीय भांडवलात बहुतांश हिस्सा फ्रेंच व जर्मन भांडवलदारांचा होता.
पहिल्या महायुद्धात तर रशियाची अर्थव्यवथ्या अधिकच उद्ध्वस्त झाली. तयार वस्तुंबरोबर अन्नधान्याचाही तुटवडा होता आणि विकासाचे मार्ग खुंटले होते. १८८३ ते १९१७ हा रशियन कामगार-वर्गप्रणीत क्रांतिकारक चळवळीच्या बांधणीचा काळ होता. कामगारवर्गाला भांडवलशाहीविरुद्ध व झारच्या सरंजामी राजवटीविरुद्ध लढ्यासाठी उभे करणे, हे लेनिनचे उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे क्रांती पुरी करण्याकरिता कामगारवर्गाने ग्रामीण जीवनातील स्थित्यंतरेही लक्षात घेतली पाहिजेत, असे त्याचे म्हणणे होते. म्हणजेच शेतमजूर व गरीब शेतकरी यांच्याशी निकटचे संबंध बांधीत असताना मध्यम शेतकऱ्यांना सधन शेतकऱ्यांच्या वर्चस्वापासून मुक्त केले पाहिजे, असा लेनिनचा आग्रह होता.
रशियाच्या भांडवली अर्थव्यवस्थेचे अरिष्ट १९०३ साली तीव्र होत असताना क्रांतिकारक व्यूहरचनेविषयीचे मतभेद रशियातील सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पक्षात प्रगट होऊ लागले. ‘बोल्शेव्हिक’ म्हणजे बहुमतवाले आणि ‘मेन्शेव्हिक’ म्हणजे अल्पमतवाले, असे स्पष्ट गट पडले. या मतभेदांचे परिणाम देशातील पुढील आर्थिक घडामोडींवर झाले.
झारशाहीने १८६१ मध्ये भूदासपद्धती नष्ट करण्याचा कायदा केला होता परंतु जमिनीचे वाटप न झाल्याने शेतीव्यवस्थेवरील सरंजामी पगडा टिकून राहिला. १९०५ मध्ये केलेल्या एका पाहणीनुसार १०% शेतकरी कुटुंबांकडे प्रत्येकी २२ हे. जमीन होती ५०% शेतकरी कुटुंबांकडे प्रत्येकी ८·९ हे. इतकी जमीन असून एकून लागवडीखालील जमिनीपैकी २०% जमीन होती. सुमारे १७% शेतकऱ्यांकडे दर कुटुंबामागे ४ हेक्टरांहून कमी जमीन होती पण त्यांच्याकडे एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ४% कमी जमीन होती. थोडक्यात १०% सधन शेतकऱ्यांच्या वर्चस्वाखाली गरीब शेतकरी व भूमिहीन मजूर राबत होते.
रशियातील ८०% लोक ज्या शेतीव्यवस्थेवर अवलंबून होते. त्या शेतीची उत्पादनक्षमताही निकृष्ट होती. शेतीचे तंत्र मागासलेले होतेच, शिवाय जवळजवळ ३५% जमीन पडीत राहत असे. बाजारात येणारे धान्य मुख्यतः मध्यम व गरीब शेतकऱ्यांच्या जमीनीवरचे असे. सधन शेतकरी आणि सरदार, जहागिरदारांचा कल व्यापारी पिके घेण्याकडे असे.
देशाच्या आयात-निर्यात व्यापाराचाही शेतीवर परिणाम होत असे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत स्वस्त दरांमुळे गरीब शेतकरी टिकू शकत नसे. प्रामुख्याने परकीय भांडवलाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या औद्योगिकीकरणासाठी लागणारी यंत्रसामग्री या शेतमालाच्या निर्यातीवर अवलंबून असे. शिवाय पुरेशा औद्योगिक विकासाच्या अभावामुळे याच शेतमालाच्या निर्यातीवर पक्क्या मालाची आयातही अवलंबून असे. परिणामी ग्रामीण भागात असंतोष धुमसत होता. देशोधडीला लागलेला शेतमजूर, गरीब शेतकरी शहरांकडे वळत होता आणि अगोदरच अपुऱ्या असलेल्या कारखान्यांमधून वेतनाचे दर घटत होते.
अशा अंतर्गत अरिष्टांच्या भोवऱ्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का बसला, तो रशिया-जपान युद्धातील रशियाच्या पराभवामुळे. रशियन लष्करशाहीचा पराभव झाला आणि पाठोपाठ कामगार-शेतकरी समूहात क्रांतीची लाट उसळली. ही लाट म्हणजेच १९०५–०७ या काळातील कामगार-शेतकरी क्रांतीची तालीम होय. १९१७ च्या क्रांतिनाट्याची ही नांदीच होती.
ही लाट जॉर्जिया, युक्रेन यांसारख्या रशियन साम्राज्यातील राष्ट्रगटातही पसरली. या उठावातूनच सोव्हिएट हे लोकप्रतिनिधींचे संघटना-स्वरुप निर्माण झाले. ‘कसेल त्याची जमीन’ ही घोषणा याच काळात खेडोपाडी पसरली. झारशाहीला धक्का बसला, पण तिचे उच्चाटन झाले नाही, कारण सोव्हिएटांनी पुरेशी शस्त्रसिद्धता केली नव्हती आणि शेतमजूर, गरीब व मध्यम शेतकरी कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली पुरेसा एकवटला नव्हता.
राजकीय आणि आर्थिक विचार १९०५ च्या अयशस्वी क्रांतीनंतर नव्या जोमाने सुरु झाला. या विचाराला प्रत्यक्ष लढ्याची पार्श्वभूमीही होती. १९१२ साली लीना खोऱ्यातील सोन्याच्या खाणीतील कामगारांनी संप पुकारला. संपाचे लोण पसरत असतानाच गरीब शेतकऱ्यांनी सधन शेतकऱ्यांच्या विरुद्ध हल्ले करण्यास सुरुवात केली. १९१० ते १९१४ या काळात शेतकऱ्यांच्या असंतोषातुन सु. १०,००३ लढे उद्भवले. ठिकठिकाणी झालेल्या संपांत १९१४ साली १५ लाखांहून अधिक कामगार सामील झाले होते.
अशा रीतीने उठावाची पुनश्च सिद्धता होत असतानाच पहिल्या महायुद्धाच्या फैरी झडू लागल्या. जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीचा फायदा घेऊन झारने बोल्शेव्हिक संस्थांवर हल्ला चढविला. क्रांतीला दडपण्याचा झारशाहीचा तो अखेरचा प्रयत्न होता.
पहिल्या महायुद्धात रशिया दोस्तसंघाच्या बाजूने, म्हणजे फ्रान्स, ग्रेट ब्रिटन यांच्या बाजूने सामील झाला हा केवळ योगागोग नव्हता. रशियातील बहुतेक उद्योगधंदे या दोस्त राष्ट्रांतील भांडवलदारांच्या हाती होते. शिवाय झारने फ्रान्स व ब्रिटनकडून अब्जावधी रुबलचे कर्ज काढले होते. परंतु युद्धाच्या द्दष्टीने झारची काहीच तयारी नव्हती. जुनाट पद्धतीचे कारखाने, मागास उत्पादनतंत्र, अर्ध-भूदास पद्धतीवर आधारलेली जमीनमालकी आणि कंगाल शेतकऱ्यांची प्रचंड संख्या यांमुळे युद्धाच्या विविध गरजा भागविण्याची क्षमता रशियन अर्थव्यवस्थेत नव्हती. जमीनदार वर्ग हाच झारचा मुख्य आधारस्तंभ होता आणि भांडवलदारवर्गाला युद्ध म्हणजे नवीन बाजारपेठा मिळविण्याची संधी वाटत होती.
या युद्धात लेनिनने जे विश्लेषण केले, ते रशियाची पुढील अर्थनीती ठरविणारे मुख्य मार्गदर्शक तत्त्व बनले. साम्राज्यशाहीच्या काळात भांडवलशाहीतील अंतर्गत विरोध वाढत जातात. बाजारपेठा, भांडवल निर्यातीची क्षेत्रे, वसाहती व कच्च्या मालाची उत्पत्तिस्थाने यांचा कब्जा मिळविण्यासाठी लढा सुरु होतो. त्यामुळे जगाची फेरवाटणी करण्याच्या उद्देशाने वरचेवर साम्राज्यशाही युद्धे उद्भवणे अपरिहार्य ठरते.
लेनिनचा आणखी एक सिद्धांत रशियाची अर्थनीती घडविण्यात मार्गदर्शक ठरला आहे. या सिद्धांतानुसार एकाच देशात भांडवलशाही निष्प्रभ करुन समाजवाद विजयी होणे शक्य असते. त्या देशातील विजयशाली कामगारवर्ग समाजवादी पद्धतीने आपल्या उत्पादनाची नवी संघटना करु शकेल. अशा रीतीने तो देश व बाकीचे जग यांमधील भेद स्पष्टपणे नजरेस येतील व इतर देशांतील गांजलेले वर्ग त्या देशाकडे आकर्षित होतील.
भांडवलशाहीचा विकास निरनिराळ्या देशांत विषम रीतीने होत असतो. क्रयवस्तु-उत्पादनाच्या अर्थव्यवस्थेत ही गोष्ट अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व देशांत एकाच वेळी समाजवाद विजयी होणे शक्य नाही. आरंभी तो एका वा काही देशांत विजयी होईल व बाकीचे देश काही काळपर्यंत भांडवलशाहीच्या अवस्थेत किंवा भांडवलशाही-पूर्व अवस्थेत राहतील. त्यामुळे संघर्ष उद्भवणे अपरिहार्य आहे. इतर देशांतील भांडवलदारवर्ग समाजवादी देशांतील विजयी कामगारवर्गाला नष्ट करण्याचा प्रत्यत्नसुद्ध करतील. अशा प्रसंगी समाजवादी देशाने चालविलेले युद्ध न्याय्य ठरेल.
वरील सूत्रांनुसार बोल्शेव्हिकांनी कामगार-शेतकऱ्यांमध्ये व सैन्यात-आरमारातही व्यापक प्रमाणावर चळवळ सुरु केली. उभय पक्षांच्या सैनिकांनी एकमेकांशी दोस्ती करुन जागतिक भांडवलदारवर्ग हाच आपला शत्रू आहे हे ओळखून, या साम्राज्यशाही युद्धाचे स्वकीय युद्धात रुपांतर करावे व स्वतःच्या भांडवलदारांविरुद्ध आपली शस्त्रे शेवटी उलटवावीत, असा त्यांचा प्रचार होता.
युद्धही आता शेवटच्या पर्वात आले होते. युद्धाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत लाखो रशियन रणांगणावर ठार झाले होते जायबंदी झाले होते वा युद्ध परिस्थितीमुळे उद्भवलेल्या रोगांना बळी पडले होते. भांडवलदार-जमीनदार वर्गांची मात्र नफेबाजी चालू होती. देशाचे आर्थिक जीवन पूर्ण विस्कळित झाले होते. सुमारे १ कोटी ४० लक्ष सुदृढ माणसे उत्पादक धंद्यातून काढून घेण्यात येऊन त्यांची सैन्यात भरती करण्यात आली. गिरण्या व कारखाने बंद पडू लागले होते. लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांची व मजुरांची दुर्दशा झाली.
झारच्या सैन्याला एकामागून एक पराभवाचे धक्के बसत होते. जर्मन तोफखान्याला रोखण्याइतकी शस्त्रसामग्री झारच्या सैन्याजवळ नव्हती. त्यातच झारचे काही मंत्री व सेनापतीच जर्ननांना फितूर झाले होते आणि काही सेनापती ब्रिटिश व फ्रेंच भांडवलदारांच्या मदतीने दरबारी कट करुन सत्ता पालटण्याची कारस्थाने रचत होते. या सर्व गोष्टीमुळे झारविरुद्ध कामगारांचा, शेतकऱ्यांचा, सैनिकांचा व बुद्धिजीवी लोकांचा असंतोष अनावर झाला होता. बोल्शेव्हिकांच्या चालू असलेल्या चळवळीमुळे या असंतोषाला क्रांतिकारक वळण मिळत होते.
देशभर १९१७ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत संपाची लाट उसळली ‘झारला जमीनदोस्त करा’, ‘युद्ध हाणून पाडा’ , ‘आम्हाला अन्नधान्य द्या’ अशा घोषणांनी रशिया दुमदुमू लागला. सैनिक व कामगार एकत्र आले आणि त्यांनी झारच्या अंमलदारांना हाकलून लावून स्थानिक सत्ताकेंद्रे काबीज केली. हीच फेब्रुवारीची क्रांती होय. १९०५ ते १९०७ या तीन वर्षांत क्रांतीने जो मार्ग खुला केला होता आणि १९१० ते १९१४ या काळात त्या मार्गावर कामगार-शेतकऱ्यांनी जे लढे दिले होते, त्यामुळेच फेब्रुवारी क्रांती यशस्वी झाली व झारचे उच्चाटन झाले. परंतु, ही क्रांतीसुद्धा पुढील क्रांतीच्या अगोदरचा एक टप्पाच होता. एका बाजूला कामगार-सैनिक आणि लोकप्रतिनिधींची सोव्हिएटे (कौन्सिले) स्थापन झाली होती, तर दुसऱ्या बाजूला तडजोडवाद्यांनी व भांडवलदारांनी एक हंगामी सरकार स्थापिले होते. या सरकारात मेन्शेव्हिक आणि सोशालिस्ट रेव्हलूशनरी पक्षांचा समावेश होता.
जर भांडवलदारी हंगामी सरकारऐवजी सोव्हिएट सरकार अस्तित्वात आणले नाही, तर युद्धसमाप्ती घडवून आणणे, जमीन मिळविणे व एकूण अर्थव्यवस्थेची क्रांतिकारक पुनर्मांडणी करणे या गोष्टी शक्य होणार नाहीत, हे बोल्शेव्हिकांनी जनतेस पटवून देण्यास सुरुवात केली. हंगामी सरकारने युद्धसमाप्ती केली नाहीच, उलट ब्रिटिश व फ्रेंच भांडवलदारांच्या मदतीने युद्धात चढाईचेच धोरण स्वीकारले. शिवाय मूलगामी असा आर्थिक कार्यक्रमही हंगामी सरकारकडे नव्हता. त्यामुळे बोल्शेव्हिकांचे म्हणणे जनतेला पटू लागले. सरकारला हे आव्हान होते. सरकारने लेनिनच्या अटकेचे फर्मान काढले. बोल्शेव्हिकांचे अटकसत्र सुरु झाले. झपाट्याने परिस्थिती पालटली आणि क्रांतीला पूरक वातावरण तयार झाले.
रशियातील समाजवादी क्रांतीचा प्रत्यक्ष विजय तुलनात्मक दृष्ट्या अगदी सुलभतेने झाला. त्याचे एक कारण म्हणजे, रशियातील अगोदरच क्षीण असलेला भांडवलदारवर्ग युद्धामुळे अधिकच दुर्बल झाला होता. मार्च ते नोव्हेंवर १९१७ या आठ महिन्यांत लेनिनच्या मार्गदर्शनाखाली बोल्शेव्हिक पक्षाने स्वीकारलेली धोरणे व भूमिका तसेच परिणामकारक प्रचारयंत्रणा यांमुळे लोकांच्या राजकीय जाणिवा प्रगल्भ झाल्या होत्या. त्या मानाने भांडवलदारवर्ग राजकीय दृष्ट्या अननुभवी होता व हंगामी सरकारला जनतेचे नैतिक पाठबळ नव्हते.
विजय मिळेपर्यंत युद्ध चालू ठेवले पाहिजे, हे हंगामी सरकारचे धोरण झारप्रमाणेच अवास्तव होते. पुरेशी जमीन नसल्यामुळे आणि जमीनदारांच्या पिळवणुकीमुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता, तरीसुद्धा बड्या जमीनदारांच्या, जमिनी मुख्यांशाने कायम ठेवण्याचे धोरण झारप्रमाणे भांडवलदारवर्गाने, हंगामी सरकारमार्फत चालू ठेवले होते. कामगारवर्गाबद्दलचा द्वेष तर वाढला होता आणि टाळेबंदीची लाटच देशात उसळली होती.
कामगारवर्गाचे संघटन, संयोजन आणि सज्जता अपूर्व होती आणि क्रांतीत कामगारवर्गाचे मित्रबळ म्हणजे शेतकरीवर्ग होता. शेतमजूर, भूदास, गरीब शेतकरी आणि मध्यम शेतकरी अशी एक अभेद्द फळी श्रीमंत शेतकरी आणि जमीनदार यांच्या विरोधात तयार झाली होती.
ऑक्टोबर क्रांती ज्यावेळी सुरु झाली, त्यावेळी पहिले महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे युद्धमग्न राष्ट्रांना रशियाच्या कारभारात परिणाकारक हस्तक्षेप करणे शक्य झाले नाही. क्रांती यशस्वी होण्यास ही परिस्थिती उपयोगी पडली. क्रांती यशस्वी झाल्याबरोबर सर्वप्रथम आर्थिक धोरण स्वीकारणे भाग होते आणि त्या नव्या क्रांतिकारक धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. नाहीतर क्रांतीचे मुख्य उद्दिष्ट अधुरे राहिले असते.
सोव्हिएट सत्ता स्थापन होताच जमीनदारांची जमिनीवरील मालकी रद्द करण्यात येऊन जमीन शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी देण्यात आली. देशातील सर्व जमीन राष्ट्रीय मालकीची करण्यात येऊन भांडवलदारांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मोठ्या कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. स्त्रियांना समान आर्थिक व राजकीय हक्क देण्यात आले आणि झारने व हंगामी सरकारने परकीयांकडून घेतलेले सर्व कर्ज रद्द करण्यात आले. आपला देश परकीय भांडवलदारांवर अवलंबून राहू नये, या हेतूने हे कर्ज फेडण्याचे नाकारण्यात आले.
या आर्थिक उपायांना पूरक अशी सामाजिक धोरणे अंमलात आणली गेली. सरंजामशाहीचे अवशेष, स्थावरजंगम मालमत्तेचे वंशपरंपरागत हक्क नष्ट करण्याच्या हेतूने फर्मान काढण्यात आले. रशियातील बहुराष्ट्रीय समाजांना समान हक्क देण्याचे घोषित करण्यात आले. क्रांतिकारक सरकारने युद्धसमाप्तीचे प्रयत्न ताबडतोब सुरु केले परंतु जर्मन फौजांनी कोणतेही विधिनिषेध न पाळता रशियावरील आक्रमण चालूच ठेवले. अखेरीस जर्मन फौजांचा पराभव झाला तेव्हाच युद्धतहकुबी पूर्ण झाली. परंतु, सोव्हिएट सत्तेचे मूलगामी आर्थिक धोरण अंमलात आणण्यासाठी काही ठोस पावले टाकणे आवश्यक होते. वरिष्ठ राष्ट्रीय आर्थिक मंडळ (सुप्रीम कौन्सिल ऑफ नॅशनल इकॉनॉमी) स्थापन करण्यात आले. लाल फौज व लाल आरमार स्थापन झाल्याचे जाहीर करण्यात येऊन आणि सोव्हिएट सत्तेचे आसन भक्कम करण्यासाठी नव्या सोव्हिएट उद्योगधंद्यांच्या संघटनेची तत्त्वे निश्चित करण्यात आली. ग्रामीण पुनर्रचनेचे कामही हाती घेण्यात आले. क्रांतीपाठोपाठच्या कालखंडात सोव्हिएट जनतेला महाकठिण समस्यांना तोंड द्यावे लागले, तीव्र संघर्षांमधून जावे लागले आणि नैसर्गिक आपत्तींवर मात करावी लागली.
पहिल्या महायुद्धामुळे अर्थव्यवस्था विस्कळित झाली होती. भांडवलदार वर्गाने क्रांतिकारकांचा पराभव करुन पुन्हा सत्ता संपादण्याचे प्रयत्नही लगोलग सुरु केले होते. घातपात, परकीय हस्तक्षेप आणि प्रतिक्रांतिकारकांनी सुरु केलेले यादवी युद्ध यांमुळे जनतेला उसंतच मिळाली नाही. नवजात सोव्हिएट प्रजासत्ताकाविरुद्ध चौदा परकीय राष्ट्रांनी हस्तक्षेपाचे युद्ध सुरु केले त्यात भर पडली दुष्काळाची.
भूमिहीन शेतमजूर देशोधडीला लागला अल्पभूधारक उजाड झाला मध्यम शेतकऱ्याचे जीवन खालावले श्रीमंत शेतकऱ्यांनी खेड्यांमधून क्रांतीला सशस्त्र विरोध करावयास सुरुवात केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लेनिनने पुढील संदेश लोकांना दिला. “कामगारांनो, या क्रांतीचा बचाव फक्त तुम्हीच करु शकाल. त्यासाठी तुम्हाला ग्रामीण कष्टकऱ्यांना बरोबर घेऊन प्रतिक्रांतिकारकांविरुद्ध संघर्ष करावा लागेल. भाकरीसाठी लढणे म्हणजेच समाजवादासाठी लढणे होय”.
या भूमिकेला अनुसरुन खेड्यांमध्ये कामगारांच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या. अन्नधान्य सामग्रीच्या वसुलीवर व वितरणावर कडक नियंत्रणे घालणारी फर्माने काढण्यात आली. गरीब शेतकऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यासंबंधीचे आदेश दिले गेले जप्त केलेल्या जमिनीची फेरवाटणी करण्यात, शेतीची अवजारे वाटण्यात, श्रीमंत शेतकरी कुलकांकडून अन्नधान्य सामग्री जमा करण्यात या समित्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्यांच्यामार्फतच लाल फौजेत शेतकऱ्यांची भरती करण्यात आली. १९१८ च्या अखेरीस या समित्या ग्रामीण सोव्हिएटांत विलीन करण्यात येऊन त्यांचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात आले.
इतर अनेक देशांप्रमाणे बेकारी ही एक महाभयंकर अशी समस्या रशियाला तेव्हा भेडसावत होती. खेड्यांतून परागंदा व उद्ध्वस्त झालेली माणसे शहरांमध्ये येऊन थडकली होती कामाच्या शोधात इतस्ततः भटकत होती. पण अनेक कारखाने बंद पडल्यामुळे लक्षावधी कामगारच बेकारीच्या खाईत लोटले गेले होते. या बेकारीचा फायदा घेऊन मालकांनी वेतनाची पातळी आणखी खाली आणली होती. कामाचा दिवस बारा, चौदा किंवा सोळा तासांचा असे, स्त्रिया आणि मुले यांना हलाखीच्या परिस्थितीत काम करावे लागे. या अन्यायाविरुद्ध कोणतीही कृती केल्यास झारचे पोलीस व लष्कर ती निर्दयापणे चिरडून टाकीत.
क्रांतीनंतर रोजगार उपलब्ध करुन देणे हे पहिले काम होते. राष्ट्रीयीकरण करुन प्रथम सर्व कारखाने सुरु केले गेले. सर्व जमीन राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित झाल्यानंतर १५ कोटी हेक्टरांहून जास्त क्षेत्रफळाची जमीन शेतकऱ्यांना मोफत कसणुकीसाठी देण्यात आली. लक्षावधी भूमिहीनांना स्वतःची जमीन मिळाली. ती ते स्वतःसाठी कसू लागले. यामुळे रोजगाराच्या प्रश्नाची धार आणि खेड्यांतून शहरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपाययोजनांमुळे बेकारी निर्मूलनासाठी संघटनात्मक पाया निर्माण झाला. उपलब्ध श्रमशक्तीची नोंद घेऊन आणि तिचे योग्य प्रकारे वितरण करुन लोकांना रोजगार पुरविण्याची आणि त्याचबरोबर देशाचा विकास साधण्याची जबाबदारी सोव्हिएट शासनाने उचलली. एक खास हुकूमनामा काढून आठ तासांचा कामाचा दिवस जारी करण्यात आला. बेकारीविरोधी विम्याची योजना अंमलात आणण्यात आली. बेकारांना वस्तुरुपाने व धान्यरुपाने साहाय्य करण्यासाठी खास निधी उभारण्यात आला. परंतु, १९१७ ते १९२१ हा काळ यादवी युद्धाचा होता त्यामुळे नवीन आर्थिक नियोजनाची सुरुवात व्यवस्थितपणे झाली नव्हती. हे यादवी युद्ध संपुष्टात आल्यावर लेनिनने नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली रद्द करण्यात येऊन उत्पादनाला उत्तेजन दिले गेले. पैशाच्या रुपाने शेतीवर कर लादण्यात आले धान्यविक्रिसाठी खुला बाजार पुन्हा प्रस्थापित करण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातही, मोठे उद्योगधंदे सोडल्यास, काही प्रमाणात खाजगीरीत्या धंदे व व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली.
या काळात आर्थिक विकास संथ गतीने झाला, पण तणाव कमी झाले. रशियातील तत्कालीन अर्थतज्ञांमध्ये दोन प्रमुख विचारप्रवाह होते आणि त्या प्रवाहांमधील संघर्षाचा पुढील आर्थिक धोरणांवर अपरिहार्य असा परिणाम होणार होता. ट्रॉट्स्की गटाचे म्हणणे असे की, नव्या आर्थिक धोरणामुळे औद्योगिकीकरण द्रुतगतीने होणार नाही ते वेगाने करावयाचे, तर गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल हवे आणि ते निर्माण करण्यासाठी शेतकरीवर्गाकडून अधिकर घ्यावा, सरकारी कारखान्यांचा नफा वाढवावा आणि आधुनिक तंत्रांचा अधिकाधिक वापर करावा. थोडक्यात, औद्योगिक विकास हे मुख्य लक्ष्य असले पाहिजे.
दुसऱ्या गटाच्या मते शेती व उद्योगधंदे ह्या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास करणे जरुरीचे आहे. औद्योगिकीकरणाचा वेग अवास्तव ठेवला, तर परकीय मदत अटळ ठरण्याची शक्यता होती आणि परकीय मदतीशिवाय आर्थिक विकास करावयाचा, तर देशातील आर्थिक व्यवस्थेवर सरकारचा पूर्ण ताबा हवा. म्हणजेच शेती व उद्योगधंदे यांचा समतोल विकास साधण्याचा पर्याय लेनिनने स्वीकारला. एकूणच सर्व धोरणांचा रोख असा होता की, देशातील उत्पादन व उपभोग यांवर क्रांतिकारक व्यवस्थापनाचा पूर्ण ताबा असला, म्हणजे संतुलित पद्धतीने विकास साधता येईल.
संतुलित पद्धतीने विकास, सामाजिक न्याय आणि राष्ट्रातील सर्व साधनसंपत्तीचा यथायोग्य वापर करण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीने आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता होती. कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, कसे करावे, किती प्रमाणात करावे, कोणते तंत्र वापरून करावे, कोणत्या ठिकाणी करावे, त्याचप्रमाणे उपलब्ध श्रमशक्तीचा वापर करावा आणि निर्माण होणाऱ्या राष्ट्रीय संपत्तीचा किती भाग उपभोगासाठी दिला जावा आणि किती संचय करावा, यांसारख्या निर्णयांवर विचार करण्यासाठी एक नियोजन मंडळ नेमले गेले. अशा सर्वकश नियोजन-युगास १९२९ पासून सुरुवात झाली.
पहिली पंचवार्षिक योजना १९२९ सालापासूनच सुरू झाली (१९२९–३२). भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण, त्याची विविध उद्योगशाखांतून विभागणी, औद्योगिकीकरणाचा अपेक्षित वेग इ. बाबी ठरविण्यात आल्या. विशेष म्हणजे जागतिक महामंदीच्या काही महिने अगोदरच रशियात ही पंचवार्षिक योजना पूर्ण झाली. त्यामुळे रशियाला या महामंदीची झळ पोहोचली नाही.
पहिली पंचवार्षिक योजना पूर्ण झाली, त्याच सुमारास जर्मनीत नाझीवादाचा आणि इटलीत फॅसिझमचा उदय झाला होता. पुंडशाही करून आणि जागतिक भांडवलदारांची मदत घेऊन हे महाभयंकर असे लष्करी यंत्र उभारले जात होते. पहिल्या महायुद्धातून पुरते सावरायच्या आतच यूरोपात दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. या घटनांचा परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवरही होणे अपरिहार्य होते.
दुसरी पंचवार्षिक योजना (१९३३–३७) अधिक महत्त्वकांशी उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून जाहीर झाली. रशिया जर स्वावलंबी, औद्योगिक दृष्ट्या विकसित आणि लष्करी दृष्टिकोनातून समर्थ असेल, तरच पुढील काळाला तोंड देऊ शकेल हे ओळखून स्टालिनने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याची मांडणी केली होती. या काळात सामुदायिक शेतीचा प्रयोग व्यापक प्रमाणावर हाती घेण्यात आला. अगदी सुरूवातीला सामुदायिक शेतीच्या प्रयोगाला सुरुवात झाली. तेव्हाचे व नंतरचे स्वरूप भिन्न असले, तरी प्रयोगाचे लक्ष्य तेच होते.
सुरुवात कम्यून पद्धतीने झाली होती. दहा-बारा शेतकरी कुटुंबाच्या गटाला ‘कम्यून’ म्हणत. हा गट सामुदायिकपणे शेती करीत असे व निघणारे उत्पन्न विभागून घेत असे. ह्या गटातील सहकाऱ्यांनी निवडून दिलेले पंच एकत्रितपणे शेतीची देखभाल पाहत असत. परंतु कम्यून पद्धतीला सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळेना तेव्हा ‘कोलखोज’ आणि ‘सोव्हखोज ’ अशा दोन प्रकारच्या प्रयोगांना सुरुवात झाली.
कोलखोजमध्ये बहुतेक जमीन ही सामुदायिक मालकीची असते व सामुदायिकपणे कसली जाते. प्रत्येक सदस्याला स्वतःचे असे घर असते, स्वतःच्या मालकीचा जमिनीचा लहानसा तुकडाही असतो. त्यावर त्याला भाजीपाला, दुधदुभते, डुकरे, कोंबड्या इत्यादींचे उत्पादन घेण्याची मुभा असते. काही ठराविक दिवस कोलखोजचे सदस्य सामुदायिक शेतीवर काम करतात, तर काही दिवस स्वतःच्या जमिनीवर. लहानमोठ्या जमिनदारांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेऊन कोलखोजमध्ये सामील करण्यात आल्या होत्या. कोलखोज-कामगारांना पैशाच्या आणि धान्याच्या रूपाने मोबदला मिळे. कोलखोज हे एका अर्थाने सहकारी तत्त्वावर चालत असे.
सोव्हखोजवर मात्र संपूर्ण मालकी सरकारची (स्टेट फार्मिंग). त्यांचा व्यवहारही सरकारच पाहते. या सरकारी शेतांचा आकारही कोलखोजांपेक्षा मोठा असतो. या सोव्हखोज शेतीवर काम करणाऱ्या शेतकऱ्याला कारखान्यातील कामगाराप्रमाणे ठराविक वेतन मिळते. कोलखोज सदस्याचे उत्पन्न त्या अर्थाने ठराविक नसते. त्याचप्रमाणे सोव्हखोजवरील शेतकऱ्याला कोलखोजवरील शेतकऱ्याप्रमाणे खाजगी उत्पन्न नसते.
सुरुवातीला कोलखोज शेतीचा आकार ४०४ ते ४८५ हेक्टरांच्या आसपास असे. पुढील काळात मात्र सोव्हखोजलाच प्राधान्य देण्यात आले. १९५० नंतर कोलखोज शेते सोव्हखोजांमध्ये विलीन करण्यात आली. त्यामुळे सरकारी शेतीखालील क्षेत्र खूप वाढले. १९५० साली कोलखोजांची संख्या पंचवीस लाख होती, ती १९६० मध्ये चोपन्न हजारांवर आली. १९५० मध्ये या शेतांचा सर्वसाधारण आकार ६४७ हेक्टर होता. तो पुढे ४,०४६ हेक्टरांवर नेण्यात आला. सामुदायिकी करणाबरोबरच यांत्रिकीकरणावरही भर देण्यात आला.
शेतीसुधारणेमुळे झपाट्याने गरिबी दूर होऊ लागली आणि शेतीतील उत्पादन वाढू लागले. हे जरी खरे असले, तरी जमिनीवरचा खाजगी मालकी हक्क गमावल्याने सुस्थित व सधन शेतकऱ्यांमध्ये असमाधान पसरले. या असमाधानातून ग्रामीण भागात पुन्हा एका वर्गसंघर्षाला तोंड फुटले. हा वर्गसंघर्ष सामुदायिकीकरणाचा प्रयोग निर्णायकपणे यशस्वी होईपर्यंत चालू राहिला. या प्रक्रियेतून ग्रामीण जीवन आमूलाग्र ढवळून निघाले. समाजवाद आणि पुरोगामी राष्ट्रवाद ही मूल्ये खोलवर रूजली आणि त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी ग्रामीण भाग भौतिक व मानसिक दृष्टिकोनातून सज्ज झाला.
शेतीप्रमाणेच कारखान्यांतूनही उत्पादन वाढविण्यासाठी उत्पादन समित्या नेमल्या गेल्या. महत्त्वाकांक्षी उत्पादन लक्ष्ये ठरविली गेली. तज्ञ संचालकांच्या मदतीने अत्याधुनिक तंत्र वापरून कारखान्यांची उत्पादकता वाढविली गेली. विकासासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीबरोबरच संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या युद्धसामग्रीचे उत्पादनही वाढविण्यात आले. हिटलर-मुसोलिनी यांच्या आक्रमक शक्तींना तोंड देण्याची तयारीही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सूरू झाली. अनेक अडचणींवर मात करून या योजनेच्या काळात (१९३३–३७) सोव्हिएट संघराज्य अमेरिकेच्या खालोखालचे दुसरे प्रमुख औद्योगिक राष्ट्र बनले.
जर्मनी व त्याच्या दोस्त राष्ट्रांनी १९४१ मध्ये रशियाविरूद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध जवळजवळ चार वर्षे चालू होते. या काळात रशियाच्या सु. दोन कोटी लोकांचा संहार झाला तीस टक्के राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली. कित्येक अर्थतज्ञांनी असे भाकित केले की, रशियाला पुन्हा उभे राहायला २५ ते ३० वर्षे लागतील. परंतु १९४६ ते १९५० या एका पंचवार्षिक योजनेच्या काळात रशियन अर्थव्यवस्थेने पुन्हा आपले सामर्थ्य सिद्ध केले. १९२९ ते १९५२ या काळात पायाभूत उद्योगधंद्यांवर ३,८३० कोटी रूबल इतकी गुंतवणूक करण्यात आली. तर वाहतुकीवर १,९३० कोटी रूबल दुय्यम प्रकारचे उद्योगधंदे आणि शेती यांवर याच काळात अनुक्रमे ७२ कोटी रूबल आणि ९४० कोटी रूबल इतकी गुंतवणूक झाली. यावरून हे लक्षात येईल की, पायाभूत उद्योगधंद्यांना व त्याखालोखाल वाहतुकीला महत्त्व दिले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती त्याच्या आशियाई भागात पसरलेली होती, तर औद्योगिक केंद्रे यूरोपातील भागात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा होता.
ही सर्वंकष नियोजन पद्धत व तिची कठोर अंमलबजावणी यांचा परिणाम वेगाने राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यात झाला. १९२९ ते १९५२ या काळात उत्पादनवाढीचे सरासरी वार्षिक प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास राहिले. याच काळात जर्मनी, स्वीडन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांचे उत्पादनवाढीचे सरासरी प्रमाण २ ते ४ टक्यांच्या आसपास होते. युद्धाची चार वर्षे वगळली, तर देशातील उत्पादनवाढीचे सरासरी प्रमाण अधिक वाढलेले दिसते. पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या काळात देशाचे राष्ट्रीय उत्पन्न १६ टक्क्यांनी वाढले, असा सोव्हिएट सरकारचा दावा आहे.
याबरोबरच मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, अत्यंत मामूली दरांत सर्वाजनिक वाहतूक सेवा, प्रचंड प्रमाणावरचा घरबांधणी कार्यक्रम, बालकांसाठी सुखसोयी, वृद्धांसाठी सुविधा असा अनेक योजनांमुळे देशातील जीवनमानही उंचावत राहिले. निरक्षरतेचे समूळ उच्चाटन झाले, अद्ययावत कारखाने चालविणारे तज्ञ आणि कुशल कामगार यांच्या फौजा तयार झाल्या शास्त्रीय संशोधनात नवनवीन दालने उघडली गेली. सामाजीक जीवनही अधिक समृद्ध होत गेले. बागबगीचे, ग्रंथालये, प्रदूषंणविरोधी प्रकल्प, करणणुपकीचे विविध प्रकार यांना शासनाच्या मदतींने उत्तेजन दिले गेले.
दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत देशाने मोठीच प्रगती केली. त्यांतील काही क्षेत्रांचा थोडक्यात आढावा पुढे घेण्यात आला आहे.
लेखक : केतकर, कुमार
शेती : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सबंध जगात सोव्हिएट रशियाचा सर्वात मोठा देश म्हणून प्रथम क्रम लागत असला, तरी त्याच्याजवळ चांगली कृषियोग्य अशी जमीन थोडी आहे. एकूण कृषियोग्य क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र (५०%) रशियाचाया अतिशय थंड प्रदेशात-शेती करावयास अयोग्य अशा प्रदेशात-मोडते. जवळजवळ सर्व सोव्हिएट मध्य आशियाई भाग हा जबर वाहतूक खर्च आणि अतिशय मोठ्या प्रमाणात होणारे वाष्पीभवन यांमुळे शेती करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी ठरला आहे. देशाचे इतर भाग अतिशय शुष्क, अती दलदलीचे, नापीक किंवा दुर्लंघ्य असे आहेत. लोकसंख्येचे मोठे प्रमाण, देशातील मोठी शहरे आणि रेल्वे ही सर्व ५० लक्ष चौ. किमी. क्षेत्रात किंवा एकूण देशाच्या २२·४% क्षेत्रात वसलेली असून यामध्येच सर्वांत सुपीक कृषिक्षेत्र वा कृषिविभाग (कृषिप्रदेश) एकवटलेले आहेत. १९८१ मध्ये निव्वळ पिकांखालील क्षेत्र २,२६० लक्ष हे. (देशातील सु. १०% भाग) होते. शेतीची पैदास कमी प्रतीची अथवा वेभरंवशाची असल्यामुळे दलदलीचे निःसारण, वाळबंटांचे सिंचन, कोरडवाहू कृषितंत्रे वापरून स्टेप प्रदेश लागवडीखाली आणणे, अशा विविध उपायांचा अवलंब करून सोव्हिएट शासन शेतजमीन वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.
नोव्हेंबर १९८० मध्ये कृषिउद्योगासाठी वापरली जाणारी जमीन १०५·१५ कोटी हे. होती १९७५ मध्ये ओलिताखालील क्षेत्र १४४·४६ लक्ष हे. होते, ते १९८१ मध्ये १८०·२९ लक्ष हे. वर गेले. रशियातील महत्त्वाची धान्यपिफे म्हणजे गहू, सातू, ओट, राय व मका ही होत. तर महत्त्वाच्या पिकांमध्ये वटाटे, साखरवीट, कापूस, अल्पाल्फा गवत, तंवाखू, फळफळावळ, पालेभाज्या, तेलबिया इत्यादींचा अंतर्भाव होतो. गहू व इतर धान्यपिके मुख्यत्वे कझाकस्तान, प. सायबीरिया, युक्रेन, व्होल्गा खोरे व उ. कॉकेशस या भागांत घेण्यात येतात युक्रेन व आर्एस्एफ्एस्आर् प्रजासत्ताकाचा काळी मृदा असणारा विभाग यामंध्ये मुख्यतः साखरवीट पिकविला जातो उझबेकिस्तानमध्ये कापूस, तर फ्लॅक्स व बटाटे ही पिके वायव्य रशियात प्रमुख्याने घेतली जातात. १९८५ मधील रशियातील प्रमुख पीक उत्पादन,अन्न व शेती संघटनेच्या (फाओच्या) अंदाजांनुसार पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे, टनांत) : गहू ८३० सातू ४८५ मका १५० ओट १६० बटाटे ८७० भात २६ राय १२० बारीक तृणधान्ये २२ इतर तृणधान्ये ११·०८ सूर्यफूल वी ४५ मसूर व इतर डाळी १८·४४ टोमॅटो ७७ कांदे २२ सरकीयुक्त कापूस ५३·५ रुई २४ (१९८४) कोबी १०५ द्राक्षे ७५ साखरवीट ८५३ सफरचंदे ७५ अलुबुखार ११ तंबाखू ३·७१.
रशियातील शेती सामुदायिक (कलेक्टिव्ह-कोलखोज) व सरकारी (स्टेट-सौव्हखोज) अशा दोन प्रकारांत विभागलेली आहे. १९८१ मध्ये देशात २६,३०० सामुदायिक, तर २१,६०० सरकारी शेते होती. १९७३ ते १९८१ यांदरम्यान सामुदायिक शेते ५,१०० नी कमी झाली, तर सरकारी शेते ४,३०० शेतांनी वाढली कारण त्यांमध्ये ही सामुदायिक शेते विलीन करण्यात आली. १९८१ मधील सरकारी शेतांवरील एकूण पीकक्षेत्र १,२०८ लक्ष हे., १९८१ मधील सरकारी शेतांवरील एकूण पीकक्षेत्र १,२०८ लक्ष हे., तर सामुदायिक शेतीखालील एकूण पीकक्षेत्र १,०२४ लक्ष हे. होते. १९८४ मध्ये सामुदायिक व सरकारी शेतांवर अनुक्रमे १२६·४५ लक्ष व १२२·०६ लक्ष माणसे काम करीत होती.
रशियन शेतीमध्ये मधूनमधून, विशेषतः १९८०–८५ च्या कालखंडात अनेक त्रुटी आढळतात. पहिल्या पंचवर्षीय विकास योजनाकाळात (१९२८–३२) प्रतिमाणशी धान्योत्पादनात लक्षणीय घट होत गेल्याचे दिसून येते. १९६० मध्ये ते १९१३ च्या मानाने १०% अधिक होते. याला वाढती लोकसंख्या कारण झाली. कृषिविकास मंदगतीने होण्याची ठळक कारणे पुढीलप्रमाणे होत : शेतकऱ्यांना शेतमालाच्या कमी किमती देण्यात आल्या सरकारी मालकीच्या व सरकार चालवीत असलेल्या कृषियंत्रे व ट्रॅक्टर केंद्रांनी आपले दर वाढविले वाढत्या करदरांची कार्यवाही व खतांच्या उत्पादनात पुरेशा प्रमाणात न झालेली वाढ. स्टालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) जलद कृषिविकास घडून येण्याच्या दृष्टीने अनेकविध सुधारणा राबविण्यात आल्या.
शेतीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदींत वाढ, सामुदायिक व सरकारी शेतांना तांत्रिक व वित्तीय साहाय्य, त्याचप्रामाणे शासकीय खरेदी किंमत बाजारभाव या सर्वामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली कृषियंत्रे व ट्रॅक्टर केंद्रांची पुनर्रचना करण्यात येऊन त्यांचे दुलस्ती व तांत्रिक केंद्रामंध्ये परिवर्तन करण्यात आले १९५४–५८ यांदरम्यान शेती उत्पादन ५१ टक्क्यांनी वाढले, सरासरी वार्षिक विकास दर ८·५% होता. १९५९–६५ ही कृषिविषयक सप्तवार्षिक योजना मात्र यशस्वी ठरली नाही.
तेविसाव्या सोव्हिएट पक्षाच्या बैठकीत तसेच पुढील अनेक बैठकांतून जलद कृषिविकासावर व त्याबाबतच्या उपाययोजनांवर विचार करण्यात आला : शेतीमध्ये अधिक गुंतवणूक, सामुदायिक व सरकारी शेतांकरिता होत असलेल्या कृषियंत्रांच्या पुरवठ्यामध्ये अधिक वाढ, शेतमाल खरेदीसंबंधी निश्चित योजना आखणे व शेतमाल भावांमध्ये आणखी वाड करणे. या उपाययोजनांच्या कार्यवाहीमुळे कृषिक्षेत्रामध्ये सरकारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत गेली. सामुदायिक व सरकारी शेतांवर काम करणाऱ्या यंत्रचालकांच्या संख्येत ३७·९७ लक्षांवरून (१९७३) ४४·९९२ लक्षांपर्यंत (१९८२) वाढ झाली ट्रॅक्टरांची संख्या १६·१३ लक्षांवरून (१९६५) २८·५० लक्षांवर (१९८१) तसेच कापणी यंत्राची संख्या ५·२० लक्षांवरून (१९६५) ७·३२ लक्षांपर्यंत (१९८१) वाढली . तथापि १९७२, १९७५ व १९८०-८१ या वर्षी अतिशय खराब शेतमाल उत्पादनामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर धान्याची आयात करावी लागली. कमी शेतमाल पैदाशीमागे खराब हवामान हा जरी प्रमुख घटक असला, तरी यांत्रिकीकरण, संशोधन व प्रशासन यांतही मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या.
बोल्शेव्हिक क्रांतिपूर्वकाळात पशुजन्य पदार्थांच्या उत्पादनाची जी पातळी होती, ती पुनश्च गाठावयास १९५५ साल उजाडावे लागले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत (१९२८–३२) प्रतिमाणशी मांस व मांसपदार्थाचे उत्पादन अतिशय घटले यामागे १९२८–५३ या कालखंडात शेतीचे सक्तीने करण्यात आलेले सामूहिकीकरण व पशुजन्य पदार्थांना दिले गेलेले कमी भाव, ही दोन महत्त्वाची कारणे होती. १९५३ पासून मात्र पशुपालनाकडे अधिक लक्ष देण्यात येऊ लागले. परिणामी पशुधन-संख्येत निश्चितच वाढ होत गेल्याचे आढळते. १९५० ते १९८० यांदरम्यान मांस उत्पादन ४० लक्ष टनांवरून १५१ लक्ष टनांपर्यंत वाढले दूध उत्पादन ३५३ लक्ष टनांवरून ९०७ लक्ष टन लोणी ३·३६ लक्ष टनांवरून १२ लक्ष टन लोकर १·८० लक्ष टनांवरून ४·६२ लक्ष टन आणि अंडी १,१७० कोटींवरून ६,७७० कोटींपर्यंत वाढली.
रशियातील १९८५ मधील पशुधनाची अन्न व शेती संघटनेनुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्षांत) : गाईगुरे १,२१०·५५ डुकरे ७७९.१४ मेंढ्या १,४२८·७६ बकरे ६३·२५ रेडे ३·३० घोडे ५८·०० कोंबड्या ११,४३०·००. पशुजन्य पदार्थ असे होते (१९८५ आकडे लक्ष मे. टनांत) गाईगुरांचे व रेड्यांचे मांस ७५ मटन व बकऱ्यांचे मांस ८·२५ डुकराचे मांस ५९·८५ कोंबड्यांचे मांस २८·४० दूध (गाय व म्हैस) ९८८·० शेळीचे दूध ०·९५ बकऱ्यांचे दूध ३·३५ लोणी १६·० चीज १७·०४ कोंबड्यांची अंडी ४४ मध २·०८.
वनसंपत्ती : वनविषयक साधनसंपत्तीबाबत सबंध जगात रशिया अग्रेसर असून ती प्रामुख्याने सायबीरिया, अतिपूर्व प्रदेश, उत्तर व ईशान्य रशिया (यूरोपीय भाग) या प्रदेशांत एकवटल्याचे आढळते. १ जानेवरी १९७८ रोजी जंगलांनी देशाच्या एकूण क्षेत्राचा ३३% भाग (७,९१६ लक्ष हे.) व्यापला होता. यापैकी ७,७२२ लक्ष हे. क्षेत्र शासनाच्या अखत्यारीत येत असून १९४ लक्ष हे. शेतकऱ्यांना वापरण्यासाठी मोफत वाटण्यात आले. वनक्षेत्राचे वितरण पुढीलप्रमाणे आढळते : आशियाई रशिया ५·१५० लक्ष हे. उत्तरीय सागरी किनारी प्रदेश ५१४ लक्ष हे. उरल २५४ लक्ष हे. आणि वायव्य रशिया १७९·५ लक्ष हेक्टर.
एकूण वनक्षेत्रापैकी ७३% क्षेत्रात कोनिफर वृक्षांचे आधिक्य असून इतर वृक्षप्रकारांत लार्च, पाइन, स्प्रूस, सीडार, फर यांचा अवरोही क्रम लागतो. पानझडी वृक्षप्रकारांत अवरोही क्रम पुढीलप्रमाणे आहे : भूर्ज, ॲस्पेन, ओक, बीच, मॅपल व लिंडेन, कठिण सालाचे वृक्षप्रकार देशात जवळजवळ नाहीत. रसियाच्या अनेक भागांत सर्वांत स्वस्त इंधनप्रकार म्हणून त्याचप्रमाणे रेल्वेस्लीपर, उद्योगधंदे, बांधकाम इ. क्षेत्रांतही लाकडाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असला, तरी वने व जंगले यांची अफाट वाढ होत असल्याने लाकडाचा साठा संपून जाण्याची शक्यता नाही. तथापि, सोव्हिएट कालखंडात २०० लक्ष हे. हून अधिक क्षेत्रात पुनर्वनीकरण करण्यात आले.
सबंध जमामधील अग्रेसर इमारती लाकूड उत्पादक देशांमध्ये रशियाचा अंतर्भाव होत असला, तरी १९७३ मधील इमारती लाकूड उत्पादन ३,८७६ लक्ष घ. मी.वरून १९८१ मध्ये ३,५८२ लक्ष घ.मी. पर्यंत घसरले याच काळात बांधकामासाठीचे इमारती लाकूड उत्पादन ३,०४२ लक्ष घ.मी. वरून २,७७३ लक्ष घ.मी. पर्यंत घटले. देशाच्या उत्तर व पूर्व भागांत ७०% इमारती लाकडाकरिता झाडतोड केली जाते. ५०% इमारती लाकूड १,४०,००० किमी. लांबीच्या जलप्रवाहांतून वाहून नेण्यात येते.
विविध प्रकारच्या कापीव लाकडांचा उत्पादनउद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. १९८२ मधील विविध लाकूडउत्पादन आकडेवरी पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्ष घ. मी.) : कापीव लाकूड, व्हिनीअर लाकडाचे व स्लीपरसाठीचे ओंडके : १,४९४ खाणकामासाठीचे १०५ लगद्याचे ३७१ इतर औद्योगिक उपयोगांसाठीचे ७५६ इंधनासाठी ८३३ एकूण ३,५५९. याच वर्षी मऊ व कठिण लाकूडउत्पादन अनुक्रमे पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष घ. मी. मध्ये) : ८५३ १२२ एकूण ९७५.
खनिज संपत्ती : रशिया विविध खनिज इंधने व खनिजे यांबाबत समृद्ध असून इतर कोणत्याही देशांपेक्षा येथे विविध खनिज-साठ्यांचे वैपुल्य असल्यामुळे साहजिकच तो स्वयं-निर्भर व मोठा खनिज निर्यातक देश म्हणून ओळखला जातो. जगामध्ये आतापर्यंत रशिया प्रमाणे अन्य कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात खालील खनिजांच्या साठयांचे शोध लागले नसल्याचा रशियाचा दावा आहे: दगडी कोळसा, अशुद्ध खनिज तेंल, नैसर्गिक वायू, लोहधातुक, मँगॅनीज, तांबे, शिसे, जस्त, निकेल, बॉक्साइट, टंगस्टन, पारा, अभ्रक, पोटॅश सॉल्ट व पीट. त्याचप्रमाणे फॉस्फेट, टिटॅनियम, मॉलिब्डेनम, युरेनियम व गंधक यांचेही मोठे साठे देशात आहेत.
लोहधातुकाच्या उत्पादनात रशियाचा जगातील आघाडीच्या देशातही वरचा क्रम आहे. १९८१ मध्ये या खनिजाचे उत्पादन रशियात २,४२० लक्ष टन म्हणजे संबंध जगातील विक्रीयोग्य लोहधातुकापैकी २५% लोहधातुकाचे उत्पादन एकट्या रशियामध्येच झाले. देशातील लोहधातुकाच्या एकूण साठ्यांपैकी जवळजवळ ५०% युक्रेनच्या परिसरात, क्रिव्हाइ रोग, कूर्स्क व केर्च या ठिकाणी सापडते. केर्च येथे उच्च प्रतीच्या लोहधातुकाचे व लोह क्वॉर्ट्झाइटाचे जगातील सर्वांत मोठे साठे आढळले आहेत. उरलच्या आसमंतातही लोहधातुकाचे मोठे साठे मिळाले आहेत. देशात लोहधातुकाचे १०,००० कोटी टन साठे उपलब्ध असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. देशात मँगॅनीजच्या खनिजाचे साठेही विपुल असून युक्रेन व जॉर्जिया या प्रचासत्ताकांत त्याच्या खाणी आहेत. व्यापारी तत्त्वावर मँगॅनिजचे उत्पादन १९६० मधील ५९ लक्ष टनांवरून १९८१ मध्ये ९१·५ लक्ष टनांवर गेले. १९३५ पर्यंत रशियाला क्रोमाइटाची आयात करावी लागत असे तथापि दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या सुमारास कझाकस्तानमध्ये क्रोमाइटाच्या साठ्यांचा शोध व विकास करीत गेल्यापासून क्रोमाइटाचे उत्पादन सतत वाढत गेले आणि सांप्रत रशिया हा क्रोमाइटाचे साठे, उत्पादन व निर्यात या तिन्ही बाबींत जगातील अग्रेसर देशांच्या मालिकेत जाऊन बसला आहे. इल्मेनाइट-मॅग्नेटाइट खनिज साठे य़ुक्रेन, कोमी स्वायत्त प्रजासत्ताक, यूरोपीय रशियाचे मध्यवर्ती प्रदेश, द. उरल भाग व प. सायबीरिया यांमध्ये मोट्या प्रमाणात सापडले असून त्यांचे उत्पादनही सुरू आहे. निकेल साठे व उत्पादन यांबावतही रशियाचे स्थान जगातील निकेल उत्पादक देशांमध्ये लक्षणीय आहे. हे साठे कोला द्वीपकल्प व क्रॅस्नोयर्स्क विभागातील तांबे-निकेल खनिज पट्ट्यात आढळतात. औद्योगिक दृष्ट्या लागणारे टंगस्टन साठे मध्य-कझाकस्तान, उझबेकिस्तान, ट्रान्स-बैकल विभाग, उत्तरीय कॉकेशस या प्रदेशांत आढळले असून त्यांचे उत्पादन चालू आहे, १९८१ चे टंकस्टन सेंद्रियांचे उत्पादन अंदाचे ८,८५० टन होते. ट्रान्सकॉकेशिया, कझाकस्तान, उ. कॉकेशस, ट्रान्स-बैकल विभाग व क्रॅस्नोयार्स्क प्रदेश यांमध्ये मॉलिव्डेनम साठे एकवटलेले आहेत. येनिसे, लीना व कोलीमा नदीखोरे प्रदेशांत सोन्याचे मोठे साठे असल्याचे आढळले असून १९८१ मधील सुवर्णउत्पादन अंदाजे २६२ टन होते. व्हिस्यूत नदीखोऱ्यात हिऱ्यांच्या खाणी असून १९८१ मध्ये हिऱ्यांचे अंदाजे उत्पादन १०,६०० कॅरट होते.
रशियातील प्रमुख खनिजांचे १९८३ मधील उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे. टनांत) : कठिण दगडी कोळसा ५,५४० बदामी कोळसा व लिग्नाइड १,६२० पीट ६०० लोहधातुक २,४५० बॉक्साइट ४६ क्रोमियम ३४ तांबे १०·३० मॅग्नेसाइट २५ मँगँनीज ३१ मीठ (अपरिष्कृत) १६२ फॉस्फेटी खडक २७० पोटॅशसॉल्ट ९३ गंधक २६ ॲस्बेस्टस २२·५ अशुद्ध खनिज तेल ६,१६०. (आकडे हजार मे. टनांत) : कोबाल्ट २४: मॉलिब्डेनम ११·१ निकेल १७० टंगस्टन संद्रावके ९·१. सोने २६७ मे. टन चांदी १·४६५ मे. टन हिरे ११० लक्ष मे. कॅरट नैसर्गिक वायु ५३,६०० कोटी घ. मी.
ऊर्जा व शक्तिसाधने : जगातील दगडी कोळसा उत्पादक देशांमध्ये रशियाचा अग्रक्रम लागतो. रशियातील दगडी कोळशाचे उत्पादन १९५८ मध्ये ४,९३० लक्ष टन होते, ते १९८१ मध्ये ७,०४० लक्ष टन झाले. हे प्रमाण जागतिक उत्पादनाच्या २०% होते. विट्यूमिनी व लिप्नाइट कोळशाचे साठे सबंध देशभर विखुरलेले आहेत. दगडी कोळशाचे साठे ५०,००० कोटी टन असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. ऑइल शेल (खनिज तेलयुक्त शेल) खडकांचे निक्षेप रशियाच्या विस्तृत भागात आढळतात. त्यांचे एकूण साठे १९५ अब्ज टन असून १९८१ साली देशात ३७२ लक्ष टन ऑइल शेल काढण्यात आले.
क्रांतिपूर्व रशियामध्ये खनिज तेल मुख्यतः ट्रान्स-कॉकेशिया क्षेत्रात उत्पादित करण्यात येत असे. विसाव्या शतकारंभी बाकू तेलक्षेत्रातून जागतिक उत्पादनाच्या ५०% तेलउत्पादन होऊ लागले. सतत करण्यात येत असलेल्या तेलअन्वेषणामुळे उरल व व्होल्गा यांच्यामधील क्षेत्रे, कॉकेशस पर्वतभाग, सॅकालीन, सायबीरिया यांसारखे नवनवीन तेलसमृद्ध प्रदेश उदयास आले. १९६० च्या पुढील काळात ९०० हून अधिक खनिज तेल, खनिज तेल-वायू व वायुक्षेत्रे तसेच १,५०० हून अधिक निक्षेप शोधून काढण्यात आले, १९७४ च्या सुमारास खनिज तेलउत्पादनाबाबत रशियाने सर्व राष्ट्रांना मागे टाकले. हे उत्पादन १९६० मधील १,४७० लक्ष टनांवरून १९८३ मधील ६,१६० लक्ष टनांपर्यंत वाढले. पश्चिम सायबीरियाचे उत्तरीय विभाग, सोव्हिएट मध्यवर्ती आशिया (ताश्कंदपरिसर), उत्तर कॉकेशस, युक्रेन, व्होल्गा विभाग आणि प. कॉकेशमधील आझरबैजानचा आसमंतीय प्रदेश यांमध्ये नैसर्गिक वायुक्षेत्रे प्रामुख्याने आढळतात. नैसर्गिक वायूचे उत्पादन १९५८ मधील २,८००० कोटी घ. मी. वरून १९८३ मधील ५,३६० कोटी घ. मी. पर्यंत वाढले.
रशियात १९८० मध्ये ६९,७०० किमी. लांबीचे तेलनळ होते त्यांद्वारा बाकू तेलक्षेत्रे बाटूमीशी ग्रॉझ्नी तैलक्षेत्रे कॅस्पियन समुद्री प्रदेश व डॉनबॅस प्रदेश यांच्याशी उरल-व्होल्गा तैलक्षेत्रे सायबीरिया व आर्एस्एफ्एस्आर् यांच्याशी आणि कित्येक इतर तैलक्षेत्रे मध्य आशिया प्रदेश व सायबीरिया यांच्याशी जोडण्यात आलेली होती. ड्रूझ्बा तेलनळाद्वारा व्होल्गा प्रदेश पोलंड, पू. जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी या देशांशी जोडण्यात आला आहे.
रशियाला १९८० मध्ये विविध ऊर्जा स्रोतांपासून पुढीलप्रमाणे पुरवठा होत होता : खनिज तेल व नैसर्गिक वायू ६८% दगडी कोळसा २५% जलविद्युत् ३% अणुकेंद्रीय १%, इतर ३%. १९८२ च्या अखेरीस रशियाच्या अशुद्ध तेलाची किंमत प्रत्येक पिंपाला ३१·५० डॉलर होती, ती मार्च १९८३ च्या सुमारास पिंपामागे २७ डॉ. झाल्यामुळे रशियाला पश्चिमी रष्ट्रांना निर्यात करीत असलेल्या खनिज तेलामध्ये १९८२ मधील प्रतिदिनी ११ लक्ष पिंपावरून प्रतिदिनी १५ लक्ष पिपांपर्यंत वाढ करावी लागली. नैसर्गिक वायूच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी रशियाने १९८२–८४ यांदरम्यान सायबीरियातील यूरेनगॉय वायुक्षेत्रापासून प. यूरोपपर्यंत ४,४६४ किमी. लांबीचा तेलनळ १० अब्ज डॉलरहून अधिक खर्च करून बांधला. खनिज तेल व वायू वाहून नेण्याचे तंत्रज्ञान रशियाला पुरविल्या जाण्याच्या प. यूरोपीय देशांच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा अमेरिकेने चालविलेला प्रयत्न प. यूरोपीय देशांनीच हाणून पाडला.
रशियन विद्युत्निर्मितियंत्रणेची बरोबरी केवळ अमेरिकेच्या यंत्रणेशीच होऊ शकेल. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात हा विकास जलद होत गेल्याचे आढळते. १९४५ मधील १११ लक्ष किवॉ. वीजउत्पादनक्षमता १९८१ मध्ये २७६७ लक्ष किवॉ. एवढी वाढली. १९८१ मध्ये जलविद्युत्निर्मितिकेंद्रांची वीजउत्पादनक्षमता ५४१ लक्ष किवॉ. किंवा एकूण वीजउत्पादनाच्या २०% होती औष्णिक वीजउत्पादनक्षमता ७४% तर अणुकेंद्रीय वीजउत्पादनक्षमता ६% होती. १९४५ मध्ये एकूण वीजउत्पादन ४,३३० कोटी किवॉ. ता. होते तेच १९८२ मध्ये १,३६,७१० कोटी किवॉ. ता. झाले यांपैकी जलविद्युत्निर्मितिकेंद्रांचा वाटा १४%, औष्णिक विद्युत्निर्मितिकेंद्रांचा ८१%, तर अणुकेंद्रीय केंद्रांचा ५% होता. देशातील औष्णिक वीजनिर्मितिक्षमता प्रतिवर्षी ३,५००० अब्ज किवॉ. ता. असून तीपैकी बव्हंशी उत्पादन पूर्व सायबीरियात होत असते.
रशियाने जगातील सर्वात मोठी धरणे व जलविद्युत्निर्मितिकेंद्रे बांधली असून सर्वात मोठी जनित्रे, तसेच सर्वांत लांब प्रेषणमार्ग उभारले आहेत. झापरॉझे येथील नीपर नदीवरील ६·५ लक्ष किंवॉ. क्षमतेचे जलविद्युत्निर्मितिकेंद्र हे कित्येक वर्षे सबंध यूरोपमध्ये सर्वांत मोठे म्हणून गणले जात होते. अलीकडे ब्रात्स्कजवळील बैकल सरोवराच्या ईशान्येस अंगारा नदीवर बांधण्यात आलेले ४६ लक्ष किंवॉ. क्षमतेचे ब्रात्स्काया बीजनिर्मितिकेंद्र आणि अशीच आणखी सहा प्रचंड जलविद्युत्निर्मितिकेंद्र ही सर्वांत मोठी जलविद्युत्केंद्रे गणली जाऊ लागली आहेत. अलीकडे उरल व सायबीरिया भागांत २४ ते ३६ लक्ष किवॉ. क्षमतेची अनेक औष्णिक विद्युत्निर्मितिकेंद्रे (संयंत्रे) उभारण्यात आली आहेत.
जगामधील ५,००० किवॉ. क्षमतेचे पहिले अणुकेंद्रीय विद्युत्निर्मितिकेंद्र मॉस्कोच्या आग्नेयीस १०० किमी. वरील ऑब्निन्स्क येथे १९५४ मध्ये कार्यान्वित झाले. अनधिकृत अंदाजांनुसार १९८२ मध्ये रशियात ३८ अणुगर्भीय विक्रियक (अणुभट्ट्या) असून, आणखी २३ अणुभट्ट्यांची उभारणी चालू होती. यांपैकी ३० लक्ष किवॉ. क्षमतेची सर्वांत मोठी अणुभट्टी लेनिनग्राड येथे आहे. १९८० च्या पुढील काळात अणुकेंद्रीय विद्युत्निर्मितिकेंद्राची क्षमता दुप्पट करण्याची शासनाची योजना आहे.
उद्योग : आर्थिक व तांत्रिक अशा दोन्ही दृष्टींनी मागासलेल्या रशियाचे एका प्रचंड औद्योगिक व सामर्थ्यशाली राष्ट्रात परिवर्तन घडून आले. याची कारणे खनिज संपत्तीचे वैपुल्य आणि औद्योगिक विकासावर भर देण्याचे प्रथमपासूनचे शासकीय धोरण, ही होत.
औद्योगिक क्षेत्रापासून (यातच खाणकाम क्षेत्र अंतर्भूत) देशातील सु. ६६% निव्वळ उत्पादन उपलब्ध होते व यासाठी एकूण श्रमबळापैकी ३३ टक्क्यांहून अधिक आर्थिक दृष्ट्या क्रियाशील श्रमबल गुंतलेले होते. औद्योगिक क्षेत्राचा विकास अतिशय जलद झाल्याचे दिसून येते. विसाव्या शतकाच्या अंतिम चरणात विकसित देशांपैकी केवळ जपाननेच आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला राखला. मात्र रशियाने जड व अवजड उद्योगांच्या विकासावर अधिक भर दिल्याने उपभोक्त उद्योगांचा विकास मात्र मंदावला व त्या उद्योगांमधील उत्पादकताही जड व अवजड उद्योगांच्या मानाने कमी झाली.
भांडवली वस्तु-उत्पादानाद्वारे एकूण औद्योगिक उत्पादनाच्या ७५% उत्पादन साध्य होत असून यामध्ये यंत्राची निर्मिती, धातुकाम, धातुविज्ञान व रसायनोद्योग यांचा समावेश होतो. हे उद्योग एकत्रितपणे रशियन उद्योगांचा कणाच मानले जातात. रसायनोद्योगाचा १९५० पासून पुढील काळात, विशेषतः खनिज तेल व नैसर्सिगक वायू यांचे जलद उत्पादन सुरू झाल्यापासून, झपाट्याने विकास होऊ लागला आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तर त्या उद्योगाची द्रुतगतीने भरभराट झाल्याचे दिसून येते. परिणामी मूल रसायनांची (उदा., सोडा ॲश, गंधकाम्ल, कॉस्टिक सोडा) व रासायनिक खतांची विपुल प्रमाणात उपलब्धता तसेच मोठ्या आकाराचे कृत्रिम तंतु-उद्योग व प्लॅस्टिक उद्योग यांची संस्थापना यांवर अधिकाधिक भर देण्यात आला. या विकासामध्ये पश्चिमी राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणात उपकरणे व साधने, तंत्रज्ञान, काही वेळा पूर्ण संयंत्रे यांची आयातही करण्यात आली. धातुविज्ञानविषयक उद्योगांच्या विकासावरही अधिकाधिक भर देण्यात आला असून त्याकरिता आर्थिक तरतूद करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. परिणामी पोलाद, मँगॅनीज, इतर अनेक धातू यांची, अंतर्गत गरज भागवूंन, मोठ्या प्रमाणात निर्वात करण्यात येऊ लागली आहे.
सरासरी वार्षिक औद्योगिक उत्पादनाचा वृद्धिदर १९५०–८० च्या दरम्यान ८·९% होता. १९६०–८० यांदरम्यान एकंदर औद्योगिक उत्पादनमूल्य चार पटींनी वाढले. १९६५ पासून कञ्चे लोखंड, पोलाद, वेल्लित धातू यांसारख्या अतिमहत्त्वाच्या उद्योगांचे उत्पादन दुपटीने तर खनिजीय उर्वरके, रासायनिक तंतू, मोटारगाड्या यांचे उत्पादन तिपटीने वाढले. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून औद्योगिक उत्पादनात अनुक्रमे १९५०, १९६०, १९७४ व १९८१ मध्ये पुढीलप्रमाणे लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते (आकडे लक्ष टनांत) : कञ्चे लोखंड १९२, ४६८,९९९,१,०८० पोलाद २७३, ६५३, १,३६०, १,४८४ वेल्लित पोलाद २०९, ५१०, १,०९०, १,१८२ धातू कापणारी अवजारे ०·७०६, १,५६, २·२४, २·०५ टरबाइने (लक्ष किवॉ,) २७, ९२, १७३, १५६ उत्खनफ (हजार नग) ३·५, १२·६, ३७·१, ४२·३ मोटारगाड्या ३·६२९, ५·२३६, १८·४६, २१·९८ ट्रॅक्टर १·१७, २·३९, ५·३१, ५·५९ सिमेंट (लक्ष टनांत) १०२, ४५५, १,१५१, १,२७० सर्व प्रकारची वस्त्रे (लक्ष चौ.मी.) ३३,७४०, ६६,३६०, ९८,२५०, १,०९,५१० कातडी पादत्राणे (जोड) २,०३०, ४,१९०, ६,८४०, ७,३८० साखर २५, ६४, ९५, ९५. वृत्तपत्री कागद १४·८२ (१९८३) १९८४ सालचे प्रमुख वस्तूंचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे. टनांत) : परिष्कृत साखर १२४·६४: मार्गरीन १४·२७: लोकरीची वस्त्रे (चौ. मी.) ८,७२३: सुती वस्त्रे ८३,१३० चौ.मी. चामड्याची पादत्राणे (जोड) ७,६३५ रबरी टायर ६३७ गंधकाम्ल २५३·३८ कॉस्टिक सोडा २९·७ नायट्रोजनची उर्वरके १३३·२८ फॉस्फेटी उर्वरके ७६·९५ पोटॅश उर्वरके ९७·७६ प्लॅस्टिके व रेझिने ४८ सिमेंट १,२९८·६ काँक्रीट उत्पादने [ठोकळे, विटा, नळ (घ.मी.)] १,३२४ कच्चे लोखंड (बीड) (लोह मिश्रधातू अंतर्भूत) १,१०८ अशुद्ध पोलाद १,५४२ वेल्लित पोलाद उत्पादने १,०७३ पोलादी नळ्या सांधारहित व वितळजोडीच्या) १८८·८ ॲल्युमिनियम (न घडविलेले) २१ परिष्कृत तांबे (न घडविलेले) १३·८ मॅग्नेशियम १·०३ जस्त ८·५ विद्युत् मोटरी ५३८ किवॉ. (लक्ष नगांत) रेडिओ संच ९३·९ दूरचित्रवाणी संच ८९·९ घड्याळे ६७० प्रवासी मोटारगाड्या १३·७ मोटारसायकली, स्कूटरी इ. ११·५ ट्रॅक्टर ५·७१ कापणी-मळणी यंत्रे १·१८ घरगुती प्रशीतक ५७ वीजउत्पादन १,४९,३०० कोटी किवॉ. ता. मद्य ३४१ हेक्टो लि. सिगरेटी ३,७३७·९४ कोटी नग.
जड व अवजड उद्योगांच्या विकासार्थ १९१८–८१ यांदरम्यान रशियन शासनाने सु. ८६९·३४ कोटी रुबल इतकी नव्याने गुंतवणूक केली, तर याच काळातील उपभोक्ता उद्योगांच्या विकासाकरिता फक्त १०·६८ कोटी रुबलंची गुंतवणूक केल्याचे दिसून येते. १९८१ मध्ये एकूण औद्योगिक गुंतवणूक ४,९९० कोटी रुबल एवढी होती.
मॉस्को हे उद्योगांचे प्रमुख केंद्र असून देशाच्या एकूण निर्मिति-उद्योगांपैकी १६% हिस्सा या शहराकडे जातो. मॉस्कोच्या प्रमुख औद्योगिक उत्पादनांमध्ये मोटारी, विद्युत्उ पकरणे, विशिष्ट पोलाद वस्तू, यांत्रिक अवजारे, रासायनिक पदार्थ, प्रक्रियित अन्नपदार्थ, छपाईकाम, कापड व वस्त्रे यांचा अंतर्भाव होतो. देशाच्या एकूण निर्मितिउद्योगांमध्ये लेनिनग्राडचा वाटा १२% असून तेथील उद्योगांपासून विद्युत्साधने यांत्रिक अवजारे, संदेशवहन साहित्य व उपकरणे, सूक्ष्म यंत्रे, रसायने रबरी वस्तू, कागद, फर्निचर, सुती कापड-वस्त्रे, कापडउत्पादन यंत्रे व जहाजे यांची निर्मिती करण्यात येते. युक्रेन हे रशियाचे अग्रेसर औद्योगिक प्रजासत्ताक तसेच प्रमुख धातुविज्ञानविषयक केंद्र आहे. पोलादनिर्मितिकेंद्रांमध्ये झापरॉझे, क्रिव्हाइ रोग, इदानव्ह, डोनेट्स्क, मक्येफ्का, नेग्रोपट्रॉफ्स्क, नेप्रोझेर्झिन्स्क इ. शहरांच्या अंतर्भाव होतो. नेप्रोपट्रॉफ्स्क व नीपर नदीवरील इतर शहरे यांमध्ये मिश्रधातू, पोलाद, रसायने, ॲल्युमिनियम यांचे उत्पादन होते. खारकॉव्ह येथील कारखान्यांमधून ट्रॅक्टर, कृषियंत्रे व उपकरणे रेल्वे एंजिने व डबे, यांत्रिक हत्यारे विजेची उपकरणे इत्यादींचे उत्पादन होते. उरल भागातील मॅग्नीटोगॉर्स्क व निझ्नितागिल या शहरांमध्ये पोलदनिर्मितीचे प्रचंड कारखाने आहेत. चिल्याबिन्स्क येथे ट्रॅक्टर, स्व्हर्डल़ॉफ्स्क येथे अवजड यंत्रे आणि निझ्नितागिल येथे रेल्वे सामग्री यांचे निर्मितिउद्योग आहेत. नोव्होसिबिर्स्क हे सायबीरियातील प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.
औद्योगिक क्षेत्राचा (प्रामुख्याने खाणकाम व निर्मितिउद्योग) देशाच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नातील १९८४ मध्ये ४६% हिस्सा होता. कार्यक्षमता व उत्पादन या दोहोंमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ च्या सुरुवातीस पाच औद्योगिक खात्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काही सुधारणा कार्यवाहीत आणल्या गेल्या, त्यांनुसार सरकारी उद्योगांच्या व्यवस्थापकांना अधिक स्वायत्तता, तसेच जादा श्रमबळ कमी करणे व कामगारांची मजुरी आणि उत्पादकता यांची सांगड घालणे यांविषयीचे अधिकार बहाल करण्यात आले. ही प्रक्रिया १९८७ अखेरपर्यंत सबंध रशियन उद्योगांना लागू करण्यात यावयाची होती. १९८५ मध्ये कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने यंत्रनिर्मितीची अनेक खाती एकमेकांत विलीन करण्यात आली. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये (१९८६–९०) उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी २०,००० कोटी रुबलहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली असून नवीन मोठ्या प्रकल्पांऐवजी चालू प्रकल्प उपकरणांच्या योगे अधिक सुसज्ज, कार्यक्षम व उत्पादक होण्यावर भर, त्याचप्रमाणे संगणक तंत्रविद्या आत्मसात् करण्याकडेही अधिक लक्ष देण्यात यावयाचे होते. औद्योगिक यांत्रिकीकरण प्रक्रिया आणि स्वयंचलित दूरवर्ती नियंत्रण अधिष्ठापन या दोन्ही अवस्थांची कार्यवाही देशात झपाट्याने चालू आहे. सुमारे ९३% कञ्चे लोखंड तसेच ८७% पोलाद यांचे उत्पादन पूर्णतया स्वयंचलित भट्ट्यांमधून करम्यात येते. देशातील सर्व जलविद्युत् उत्पादन-संयंत्रे पूर्णपणे स्वयंचलित आहेत.
मासेमारी : जगातील मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालणाऱ्या देशांत रशियाचा बराच क्रम लागतो. १९३८ मधील १५ लक्ष मे. टन मत्स्योत्पादन १९८१ मध्ये ९६ लक्ष मे. टनांवर गेले. नशियाचे वार्षिक मत्स्योत्पादन सु. ९८ लक्ष मे. टन असून सबंध जगात जपाननंतर रशियाचा दुसरा क्रम लागतो.
मत्स्योद्योगाचे भौगोलिक वितरण देशांतर्गत सरोवरे व समुद्री क्षेत्राकडून महासागर व खोल समुद्रक्षेत्रांपर्यंत गेले आहे. प्रमुख मत्स्योत्पादन क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत : पॅसिफिक महासागर क्षेत्र : या क्षेत्रातून एकूण मत्स्योत्पादनाच्या सु. २८% मत्स्योत्पादन होत असून त्यात हेरिंग, सामन व खेकडे यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कॅस्पियन समुद्रातून सु. ६% मत्स्योत्पादन होत असून त्यामध्ये हेरिंग, स्टर्जन व स्प्रॅट या माशांचा अंतर्भाव असतो. बॅरेंट्स समुद्र व श्वेत समुद्र यांमधून ८% मासेमारी चालत असून तीत हेरिंग आणि कॉड माशांचा प्रमुख वाटा असतो. साधारणतः ८०% मासेमारी महासागर व समुद्रक्षेत्रांतून केली जाते. मुरमान्स्क, कालीनिनग्राड, ॲस्ट्राखान, व्ह्लॅडिव्हस्टॉक, पेत्रोपेव्हलॉफ्स्क ही प्रमुख मासेमारी बंदरे होत.
खाऱ्या पाण्यातील माशांचे संवर्धन (मरिकल्चर) : या प्रकाराला रशियात अतिशय महत्त्व देण्यात येते एक हेक्टर क्षेत्रफळाच्या सागरी शेतातून (मरीन फार्म) ८० टन मासे व १२० टन मसेल मांस मिळाल्याचा रशियनांचा दावा आहे. पॅसिफिक महासागरात स्कॅलप व ट्रेपँग, बाल्टिक व ॲझॉव्ह समुद्रांत ट्राउट व बेस्टर (बेलूगा व स्टर्लेंट यांचा संकर), तर ओखोट्स्कच्या समुद्रात हेरिंग माशांचे संवर्धन करण्यात येते. मासे प्रक्रिया केंद्रांचे देशात जाळेच उभारण्यात आले आहे. भर समुद्रात दूरवर जाऊन मासेमारी करणाऱ्या व त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री व उपकरणे बाळगणारा मोठा जहाजताफा रशियाजवळ उपलब्ध आहे. वाराव्या पंचवार्षिक योजनेत (१९८६–९०) रशियातील अंतर्गत मत्स्यक्षेत्रे व मत्स्यसंवर्धन क्षेत्रे यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचा महत्त्वाकांशी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
रशियातील एकूण मस्त्योत्पादन १९८४ मध्ये सु. १,०५,९२,९०० मे. टन एवढे झाले, त्याचे वितरण पुढीलप्रमाणे (आकडे मे. टनांत) : अंतर्गत जलाशय, नद्या इ. ८,८१,५०० आर्क्टिक समुद्र व अटलांटिक महासागर ३०,९४,५०० भूमध्य व काळा समुद्र ४,२०,५०० हिंदी महासागर ६०,५०० पॅसिफिक महासागर ६१,३६,०००.
कामगार व कामगारकल्याण : १९८१ मधील एकूण श्रमवलाच्या (विद्यार्धी व लष्करी दळांतील लोक वगळून) वितरणाची टक्केवारी पुढीलप्रमाणे होती : उद्योग व बांधकाम ३९ शेती व वने २० शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, संशोधन व कला १७ वाहतूक व संदेशवहन ९ व्यापार, सार्वजनिक धान्य वितरण संस्था, साठवण, तांत्रिक सामग्री पुरवठा उद्योग ८ सार्वजनिक प्रशासन, पतपुरवठा व बिमा २ इतर उद्योग व सेवा ५. याच वर्षी कामकरी लोकसंख्येपैकी ७३·९% लोक उत्पादक उद्योगांत (मालवाहतूक, व्यापारी संदेशवहन, व्यक्तिगत शोती यांतच अंतर्भूत) तर २६·१% अनुत्पादक उद्योगांत (यांतच शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, विज्ञान, संशोधन, कला, शासकीय प्रशासन ही क्षेत्रे समाविष्ट) गुंतलेले होते.
देशात १९८५ मध्ये विविध क्षेत्रांत गुंतलेल्या लोकांची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्षांत) : उद्योग ३८१·०० [यामध्ये निर्मितिउद्योग (छपाई व प्रकाशन सोडून), खाणकाम, वीज, वायु, पाणी, लाकूडतोड व मासेमारी हे उद्योग समाविष्ट] शेती (सरकारी शेते अंतर्भूत) १२२·० वने ४·५६ वाहतूक १०९·२ संदेशवहन १६·७० बांधकाम ११४·७५ वितरण, पुरवठा व खाद्यपेयव्यवस्था १००·२० इतर उत्पादक व्यवसाय १६·३० सामुदायिक सेवा व गृहनिवास ४८·७० सामाजिक कल्याण, सार्वजनिक आरोग्य, आरोग्य संवर्धन ६७·६० सार्वजनिक शिक्षण ९८·७० सांस्कृतिक बाबी १३·८० कला ४·५७ विज्ञान व तदनुषंगिक सेवा ४५·३० पत व राज्यविमा ६·८२ शासकीय प्रशासन, सहकारी आणि सार्वजनिक संघटनांचे प्रशासन २६·६० एकूण १,१७७·०.
एकूण श्रमबलापैकी ५१% स्त्रिया असून त्यांचे विविध क्षेत्रांत असे प्रमाण आहे : उद्योगधंदे ४९% बांधकाम २९%, आरोग्य व सामाजिक सेवा ८२%, व्यापार ८३%, शिक्षण ७४%, विज्ञान ४९%, शासकीय सामाजिक विमापद्धतीच्या योग औद्योगिक व कार्यालयीन तसेच सामुदायिक शेतांवरील कामगारांसाठी अनेक सुविधा (निवृत्तीवेतने व इतर लाभ) आणि कामगार व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येतात.
रशियन राज्यकर्त्यांचा देशात १९३० पासून बेकारी नसल्याचा दावा आहे. सामान्यतः ३९·४ तासांचा कामाचा आठवडा असून शनिवार व रविवार हे विश्रांतीचे दिवस असतात. सहा दिवसांचा ३६ तासांचा अथवा पाच दिवसांचा ३५ तासांचा कामाचा आठवडा, हे शासनाचे अंतिम लक्ष्य आहे. १९८६ मध्ये सर्व सोव्हिएट कामगारांचे सरासरी मासिक वेतन १९५ रुबल होते, हेच १९७५ मध्ये १४६ रुबल होते.
रशियामध्ये १९८७ साली ३१ कामगार संघटना-शाखा असून त्यांचे एकूण १४ कोटी सदस्य होते. औद्योगिक तत्त्वांवरंच येथील कामगार संघटना उभारल्या जातात (उदा., एकाच कारखान्यात व कार्यालयात काम करणारे कामगार एकाच संघटनेला बांधील असतात प्रत्येक कामगार संघटनेमध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विविध विभागांत काम करणारे लोक असतात).
कामगार संघटनाचा देशाच्या सामाजिक व राजकीय घडामोडींत सक्रिय सहभाग असतो. राज्य शासनाच्या विविध घटकशाखांच्या निवडणुकांत त्यांना भाग घेता येतो सोव्हिएटांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार ठरविण्याचा (निवडण्याचा) त्यांना अधिकार असतो उत्पादन, श्रम, जीवनमान, सांस्कृतिक कार्यक्रम यांसंबंधी कायदे करण्याच्या यंत्रणेत त्यांना भाग घेता येतो. औद्योगिक व्यवस्थापनात, विशेषतः स्थायी उत्पादन परिषदांमध्ये, त्यांना आपले प्रतिनिधी पाठविता येतात. कामगार कायद्यांच्या उल्लंघनास प्रतिरोध, कामगार कलहांच्या निवारणास साहाय्य, औद्योगिक व्यवस्थापनाबरोबर सामुदायिक वाटाघाटी करणे, कारखाने व कार्यालये यांमधील कामगारांना आपली कार्यकौशल्ये सुधारण्यासाठी साहाय्य, क्रियाशील संघटना रुदस्यांना प्रशिक्षणसुविधा उपलब्ध करून देणे इ. विविध कार्ये या संघटना पार पाडतात. राज्य सामाजिक विम्याचे व्यवस्थापन या कामगार संघटनाच चालवितात, १९८६ सालचा या यंत्रणेचा अर्थसंकल्प ५,१८७·७ कोटी रुबलचा होता. गृहनिवसन, तसेच गाळ्यांचे वाटप यांसंबंधीही या संघटना लक्ष घालतात.
या कामगार संघटनांची ‘ऑल युनियन सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी शिखर संघटना असून तिची दर पाच वर्षांनी परिषद भरते. मार्च १९८२ मध्ये या शिखर संस्थेची सतरावी परिषद भरली होती.
गृहनिवसन : यादवी युद्धापासून (१९१८–२०) रशियात घरटंचाईची जटिल समस्या उभी राहिली होती कारण त्या वेळी सु. १४% निवासजागा नष्ट करण्यात आल्या होत्या. टंचाईची इतर कारणे म्हणजे लोकसंख्यावृद्धी, औद्योगिकीकरणामुळे नागरी लोकसंख्येत होत गेलेली जलद वाढ, दुसऱ्या महायुद्धात सु. १२ लक्ष घरांचा झालेला विध्वंस, तसेच घरबांधणीला व्यवसाय वा उद्योग म्हणून दिले गेलेले अतिशय कमी महत्त्व, ही होत. तथापि गेल्या काही दशकांत देशात घरबांधणीला इतका प्रचंड वेग आलेला आहे की, जगात रशिया हाच घरबांधणीच्या क्षेत्रात अग्रेसरत्व मिळविणारा पहिला देश असल्याचा रशियाचा दावा आहे.
सरकार व सहकारी संस्था यांनी मिळून १९७६–८० यांदरम्यान ८,६३० कोटी रुबल (केवळ १९८० या एकाच वर्षात १,७९० कोटी रुबल) एवढी घरबांधणी क्षेत्रात गुंतवणूक केली. याच काळात, प्रतिवर्षी सु. २० लक्ष नव्या घरांची भर पडत होती. देशात घरभाडी कमीच असतात, त्यांचे प्रमाण कुटुंबाच्या अंदाजपत्रकाच्या ४% ते ५% एवढेच असते. घरांसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा-सूची असलेल्या आढळतात. खाजगी रीत्या बांधण्यात यावयाच्या घरांकरिता (८%) शासन विशेष प्रोत्साहने उपलब्ध करते.
व्यापार, बँकिंग, अर्थकारण इ. : रशियात राज्य, सहकारी संस्था व सामुदायिक शेते यांच्यामार्फत व्यापारयंत्रणा राबविली जाते. १९८१ मध्ये सर्व प्रकारच्या किरकोळ व्यापारात (एकूण उलाढाल २९,३९० कोटी रुबल) राज्य, सहकारी संस्था व सामुदायिक शेते यांचा हिस्सा अनुक्रमे ६९·८:, २७·४: व २·८: होता. राज्य शासनाच्या मालकीच्या दुकानांमार्फत नागरी भागातील नागारिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांच्यावर अंतर्गत व्यापार मंत्रालयाची देखरेख असेत. सहकारी भांडारे (दुकाने) मुख्यतः ग्रामीण भागात असून त्यांच्यावर स्थानिक ग्राहक सहकारी संस्थांचे नियंत्रण राहते. सामुदायिक शेतांच्या बाजारांमध्ये सामुदायिक शेतांवरील अतिरिक्त मालाची चालू बाजारभावाने विक्री केली जाते. किरकोळ व्यापाराचे प्रमाण मर्यादितच असून आवश्यक त्या खाद्यपदार्थांची विक्री शिधावाटपपद्धतीने होते. मोठ्या राज्य व्यापारी भांडारांमध्ये विक्रीसाठी कमी वस्तू व त्यांचे मोजके प्रकार मिळतात. पश्चिमी यूरोपीय देश वा अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांमधील लहानशा विभागीय भांडारांमध्येही यापेक्षा विविध प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. १९८३ मध्ये किरकोळ व्यापाराची उलाढाल ३१,४३० कोटी रुबल एवढी झाली त्याच वर्षी किरकोळ व्यापरात ७५ लक्ष लोक गुंतलेले होते.
शासनामार्फतच घाऊक व किरकोळ व्यापाराच्या किंमती नियंत्रित केल्या जातात. पाव, भरडधान्य यासारख्या प्रमुख पदार्थांच्या किंमती १९५७ मध्ये जेवढ्या होत्या, तेवढ्याच १९८२ मध्येही स्थिर राहिल्या. त्याचप्रमाणे १९६२ मध्ये असणाऱ्या दूध, मांस, साखर यांच्या किंमतीही वीस वर्षानंतर बदललेल्या आढळत नाहीत. काही उपभोग्य वस्तूंच्या किंमती थोड्याफार महाग झाल्या असल्या, तरी काही सुती वस्त्रे, सौंदर्य प्रसाधने, विद्युत् उपकरणे इत्यादींच्या किंमती १९८१ मध्ये १२ ते ३७ टक्क्यांनी उतरल्या. त्याच वर्षी दागिने (जडजवाहीर), चामड्याच्या वस्तू, फर, फर्निचर, सिगारेटी, अल्कोहॉलयुक्त पेये इत्यादींच्या किंमती १७ ते ३० टक्क्यांनी वाढल्या. अन्नधान्याची दुकाने सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत, तर विभागीय भांडारे ११ ते ८ अशी उघडी असतात.
परदेशी व्यापार ही सरकारची मक्तेदारी असून तो परदेशी व्यापार खात्याच्या अखत्यारीत चालतो. हे खाते परदेशी व्यापाराची दिशा, धोरण व करार यांबाबत सर्वसाधारण स्वरूप निश्चित करते आणि शासनाच्या वतीने व्यापारी करार अंमलात आणते. प्रत्यक्ष व्यापारी घडामोडी परदेशी व्यापार संघटना व उत्पादन संस्था यांमार्फत चालतात.
गेल्या काही दशकांत रशियाचा व्यापार आधिक्य (अनुकूलता) दर्शविणारा ठरला आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून रशियाच्या परदेशी व्यापारात सु. १०० पटींनी वाढ झाल्याचे खालील आकडेवरीवरून स्पष्ट होते : (आकडे कोटी रुबलमध्ये).
वर्ष | निर्यात | आयात | एकूण व्यापार |
१९४६ | ५८·८० | ६९·२० | १२८·०० |
१९५३ | २६५·३० | २४९·२० | ५१४·५० |
१९६० | ५००·७० | ५०६·६० | १,००७·३० |
१९७० | १,१५२·०० | १.०५५·९० | २,२०७·९० |
१९८१ | ५,७१०·८० | ५,२६३·१० | १०,९७३·९० |
१९८५ | ७,२४६·४० | ६,९१०·२० | १४,१५६·६० |
आयातीमध्ये यंत्रसामग्री व उपकरणे, बीड, रेल्वेसाहित्य, कथिल पत्रा, लोकर, पीठ चहा, मांस व तज्जन्य पदार्थ, वनस्पती तेले, साखर सुती कापड, विणमाला व फर्निचर यांचा अधिककरून भरणा असतो. निर्यातीमध्ये यंत्रसामग्री व उपकरणे खनिज तेल व तज्जन्य पदार्थ, लोहधातुक, मॅगॅनीजाचे खनिज बीड, रेल्वेसाहित्य, कथिल पत्रा अमोनियम सल्फेट इमारती लाकूड, प्लायवुड, कागद लगदा व कागद, फर, तंबाखू, घड्याळे (भिंतीवरील व मनगटी), कॅमेरे यांचा प्रमुख्याने समावेश असतो. १९८१–८४ या चार वर्षांतील रशियाची व्यापारविषयक आकडेवारी (अनुक्रमे आयात व निर्यात, कोटी रुबलमध्ये) पुढीलप्रमाणे दिलेली आहे : आयात ५,२६३·१ ५, ६४१·१ ५,९५८·९ ६,५३२·७ निर्यात ५,७१०·८ ६,३१६·५ ६,७८९,१ ७,४३४·८. रशियाचा कॉमेकॉन देशांशी एकूण व्यापाराच्या ५७·५% एवढा व्यापार चालतो, तर पश्चिमी औद्योगिक भांडवलशाही राष्ट्रांशी त्याचे व्यापारप्रमाण २९% एवढे आहे. पश्चिमी राष्ट्रांचा रशियाशी चालणाऱ्या व्यापारातील हिस्सा १९७० मध्ये २१·३% होता, तो १९८१ मध्ये ३२·२ टक्क्यांपर्यंत वाढला. या राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने क्रमवारीने प. जर्मनी, फिनलंड, इटली, फ्रान्स, जपान व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांचा अतंर्भाव होतो. १९८५ मध्ये रशियाचा या देशांबरोबरील व्यापारशेष प्रतिकूल ठरला, याचे कारण जागतिक बाजारपेठांत खनिज तेल व तज्जन्य पदार्थ यांना मंदी आली (निर्यात १,८६० कोटी रुबल, तर आयात १,९२० कोटी रुबल). १९८४ मध्ये रशियाचा भारताशी एकूण व्यापार २८०·९ कोटी रुबलचा (आयात १२७·२ व निर्यात १५३·७ कोटी रुबल) होता.
देशात आयात व निर्यात व्यापार करणारे २९ शासकीय निगम असून मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेलाही परदेशी व्यापार करण्याची मुभा आहे. १९५० मध्ये रशियाचा परदेशी व्यापार ४५ देशांशी होता तो १९८४ मध्ये १४३ देशांशी झाला. १९४० ते १९८३ यांदरम्यान यंत्रे व उपकरणे-साधने यांची आयात ३२·४ टक्क्यांवरून ३८·२ टक्क्यांवर गेली, तर खनिजे व सांद्रके यांची २६·६ टक्क्यांवरून ८·८ टक्क्यांपर्यंत घटली अन्नधान्यांची आयात १४·९ टक्क्यांवरून २०·५ टक्क्यापर्यंत तसेच उपभोग वस्तूंची १·४ टक्क्यांवरून ११·५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते.
गॉस बँक (स्टेट बँक, स्था. १९२१) ही देशाच्या चलनाचे निर्गमन व त्याच्या प्रसारावर नियंत्रण, सरकारी उद्योगधंद्यांना अर्थप्रबंध, शेती व ग्राहक सहकारी संघटना यांमध्ये भांडवल गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय लेख्यांची जमाबंदी करणे, तसेच परदेशी चलने, सोने व इतर मौल्यवान धातू यांचा व्यवहार, इ. मध्यवर्ती बँकेची सर्व कामे पाहते. रशियाच्या प्रत्येक घटक प्रजासत्ताकात स्टेट बँकेची शाखा असून १५८ विभागीय व शहरी कार्यालये, ४,००० वर लहान शाखा आणि ७९,७०० च्यावर बचत बँकशाखा देशभर पसरलेल्या आहेत. स्ट्रॉइबँक (भांडवल गुंतवणूक बँक, स्था. १९२२). १९५९ मध्ये देशातील भांडवल गुंतवणूक यंत्रणेचे पुनःर्संघटन करण्यात आले आणि स्ट्रॉइबँकेने भांडवल गुंतवणुकीचे सर्व कार्य स्वतःकडे घेतले. हे कार्य पूर्वीं प्रॉमबँक (औद्योगिक), सेल्खोजबँक (कृषिविषयक) व त्सेकोमबँक (गृहनिवसन व नगररचना) या बँकांमध्ये विभागलेले होते. शेतीक्षेत्र वगळता अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांतील संघटना-संस्था तसेच सरकारी उपक्रम (उद्योगधंदे) यांना भांडवल पुरविण्याची जबाबदारी स्ट्रॉइबँकेवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय ती बांधकाम क्षेत्रातील संघटना-संस्थांना दीर्घमुदती कर्जपुरवठा उपलब्ध करते. हिच्या १,३०० शाखा आहेत. विदेश-व्यापार बँकेकडे (स्था. १९२४) रशियाचा आंतरराष्ट्रीय व्यापार (आयात-निर्यात), आंतरराष्ट्रीय स्तरावरील रशियाचे उद्योगधंदे व त्यांचे अर्थकारण, परदेशी बँकांबरोबरील वित्तसंबंध, परदेशी व्यापार संस्थांचे बँकव्यवहार इ. कार्ये सोपविण्यात आली असून आयात-निर्यातीच्या संबंधात अंतर्गत व्यापार व उद्योग यांचा विकास करण्याचे काम ही बँक पार पाडते. हिच्या १७ शाखा आहेत. १९८४ च्या आरंभी देशात 79700 बचत बँका (खाजगी ठेवींची रक्कम १८,६९० कोटी रुबल व १५·८१ कोटी ठेवीदार) कार्य करीत होत्या.
विमा ही शासनाची मक्तेदारी असून १९५८ पासून प्रजासत्ताकांच्या वित्तमंत्रालयांच्या अखत्याराखाली ही बाब सोपविण्यात आली आहे. सामुदायिक शेते, सहकारी संघटना-संस्था व वैयक्तिक स्थांवरसंपदा यांना विम्याचे संरक्षण मिळते. १९७४ च्या सुमारास ऐच्छिक व्यक्तिगत विमासंरक्षण मु. दोन कोटी लोकांना मिळाले.
अर्थकारण : देशाचा अर्थसंकल्प प्रतिवर्षी सुप्रीम सोव्हिएटकडून संमत करण्यात येतो. देशाच्या वित्तीय साधनसामग्रीचा प्रमुख स्तोत म्हणजे रशियन अर्थव्यवस्थेच्या समाजवादी क्षेत्राचे उत्पन्न (सु. ९०%) होय. अर्थसंकल्पीय महसुली उत्पन्नाच्या सु. ६०% उत्पन्न पण्यावर्तकर (उलाढाल कर) व सरकारी उद्योगधंद्यांना होणारा नफा यांपासून मिळते. राष्ट्रीय अर्थसंकल्पातील सु. ८०% रक्कम लोकांचे भौतिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावण्यासाठी खर्च करण्यात येते. १९८१ च्या अर्थसंकल्पात संरक्षणखर्चासाठी केवळ ५·५% एवढीच तरतूद केली असल्याचा रशियन शासनाचा दावा असला (कारण त्याच वर्षींच्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात संरक्षणखर्चासाठी २४·७% एवढी तरतूद होती), तरी पश्चिमी विश्लेषकांच्या मते रशियन अर्थसंकल्पाच्या अनेक बाबींमध्ये संरक्षणखर्चाचे आकडे गुप्त ठेवण्यात आलेले असतात. पश्चिमी तज्ञांच्या मते १९८३ मधील रशियाच्या संरक्षणखचोतील वाढीचे प्रमाण २% ते ४% होते. हेच प्रमाण अमेरिकेमध्ये ९·५% एवढे होते.
रशियाच्या १९८५ च्या अर्थसंकल्पात महसूल आणि खर्च अनुक्रमे ३९,७४० कोटी व ३९,७०० कोटी रूबल होते. महसूल उत्पन्नाच्या बाबी पुढीलप्रमाणे (आकडे कोटी रूबल) : उलाढाल कर १०,१०० सरकारी उद्योगधंदे व संघटना यांच्या नफ्यांवरील कर ११,७८० व्यक्तिगत प्राप्तिकर २,९७०. खर्चाच्या बाबी : राष्ट्रीय अर्थव्यवस्था २२,८३० सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि विज्ञान १२,५१० संरक्षण १,९०६.
दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून अर्थव्यवस्थेच्या सर्व शाखांमध्ये उत्पादन वाढत गेल्यामुळे महसुली उत्पन्नात मोठ्या प्रामाणात भर पडत गेल्याचे आढळते. प्रत्यक्ष करापासून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे दिसते (१९८० मध्ये ते ८·१% एवढेच होते). नागरी लोकसंख्येवर आकारण्यात येणारा वर्धमान प्राप्तिकर हा प्रमुख कर असून त्याचे दल ०·७% ते १३% यांदरम्यान असतात. वैयक्तिक भूखंडधारकांना भूखंडाच्या आकारानुसार कर द्यावे लागतात. मालकीचे घर असणाऱ्यांना घराच्या खर्चाच्या १% मालमत्ताकर भरावा लागतो. अपत्यहीन पुरुषांना व जोडप्यांना जादा कर भरावा लागतो.
रुबल हे रशियाचे अधिकृत चलन असून एका रुबलचे १०० कोपेक होतात. १, २, ३, ५, १०, १५, २० व ५० कोपेकांची नाणी आणि एका रुबलचे नाणे असून १, ३, ५, १०, २५, ५० आणि १०० रुबलच्या नोटा प्रचारात आहेत. ३१ डिसेंबर १९८५ रोजी १ स्टलिँग पौंड = १·०९५८ रूबल आणि १ अमेरिकी डॉलर = ७६,४२ कोपेक होत असून विदेश विनिमय दर १०० रुबल =९१·२६ स्टर्लिंग पौंड = १३०·८६ अमेरिकी डॉलर असा होता. भारतीय रुपया व रशियन रुबल यांच्यामधील विदेश विनिमय दर प्रतिरुबलला १६·३९ रुपये असा ५ जून १९८८ पासून सुधारण्यात आला.
नियोजन व आर्थिक विकास : रशियन अर्थव्यवस्था ही नियोजनबद्ध व सामुदायिक अथवा सरकारी मालकीच्या तत्त्वावर आधारित असून उत्पादन लक्ष्ये ही विकासात्मक योजनेच्या चौकटीत मांडलेली असतात. १९१९–२८ यांदरम्यान वार्षिक योजना आखण्यात येत असत १९२९ मध्ये स्टालिनने पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली. पहिली (१९२९–३२), दुसरी (१९३३–३७) व तिसरी (१९३८–४२. तिसऱ्या योजनेला दुसऱ्या महायुद्धामुळे अडथळा आला होता), अशा तीन पंचवार्षिक योजनांच्या यशस्वितेमुळे कृषिप्रधान सोव्हिएट रशियाचे एका अतिशय विकसित अशा औद्योगिक दृष्ट्या समर्थ राष्ट्रामध्ये रूपांतर (परिवर्तन) झाल्याचे दिसून येते. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमुळे (तिसऱ्या योजनेची पहिली तीन वर्षे) रशियाच्या औद्योगिक उत्पादन मूल्यात अनुक्रमे ११८%, १२१% व ४५ टक्क्यांनी वाढ झाली चौथ्या (१९४५–५०) व पाचव्या (१९५१–५५) पंचवार्षिक योजनादरम्यान मूल्यवृध्दी अनुक्रमे ८८% व ८५% झाली. सहावी योजना (१९५६–६०) ही मध्येच अवरुद्ध झाल्याने तिचे सातव्या सप्तवर्षीय योजनेत (१९५९–६५) रूपांतर करण्यात आले. या योजनेची फलिते म्हणजे औद्योगिक उत्पादन ८४ टक्क्यांनी, मालाची उलाढला ७२ टक्क्यांनी, राष्ट्रीय उत्पन्न ५३ टक्क्यांनी, भांडवल उभारणी ४९ टक्क्यांनी व कृषिउत्पादन १४ टक्क्यांनी वाढले, ही होत.
आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये (१९६६–७०) अने महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा कार्यवाहीत आणल्या गेल्या. औद्योगिक उपक्रमांमध्ये (उद्योगांमध्ये) उत्पादनाला नफा-प्रोत्साहने ही पायाभूत (आधरभूत) ठरविण्यात आली. उत्पादक हे आपला माल खपविण्याच्या प्रयत्नांत उत्पादन लक्ष्यांऐवजी नफा हा निकष ठरवू लागले. कामगारांना बोनस व आर्थिक प्रोत्साहने देण्यात येऊ लागली. जरी उत्पादन परिमाण, किंमत व नफा पातळी ही केंद्राकडून ठरविण्यात (निर्धारित) येत असली, तरी इतर निर्देशांक-उदा., कामगार उत्पादकता, उत्पादन परिव्यय, कामावर असलेल्या कामगारांची संख्या, प्रशासकीय संरचना, तसेच मजुरी-हे त्या त्या उद्योगाने वा उपक्रमाने निर्धारित करावयाचे असे मान्य करण्यात आले. आठवी पंचवार्षिक योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आणि खनिज तेल, अलोहधातू, अभियांत्रिकी आणि खनिज उद्योगांची लक्ष्ये ओलांडण्यात आली. याच काळात राष्ट्रीय उत्पादनात (निव्वळ भौतिक उत्पादन-नेट मटीरियल प्रॉडक्ट) ४१ टक्क्यांनी, तर औद्योगिक उत्पादनात ५० टक्क्यांनी वाढ झाली. नवव्या पंचवार्षिक योजनेचे (१९७१–७५) महत्त्वाचे उद्दिष्ट, उपभोग्य वस्तूंचे उत्पादन व उपलब्धता अधिकाधिक वाढवून जनतेचे जीवनमान उंचावणे, हे होते. तथापि हे लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही उपभोग्य वस्तूंचे उत्पादन लक्ष्य ४४% चे ४८% असे असताना केवळ ३७% च उत्पादन होऊ शकले. कमी शेतमाल उत्पादनामुळे असे घडल्याचे सांगितले जाते. याच काळात औद्योगिक उत्पादनातही नियोजित लक्ष्यापेक्षा कमी वाढ झाली (४३%). कामगार उत्पादकतेमध्ये सरासरीने प्रतिवर्षी ६% दराने वाढ झाल्याचे आढळते. या योजनेच्या काळात निम्न आणि मध्यम श्रेणींमधील कामगारांचे वेतन सु. १५ ते २० टक्क्यांनी वाढले. त्याचप्रमाणे निवृत्तिवेतने व शिष्यवृत्त्या यांमध्येही वाढ करण्यात आली. दहाव्या पंचवार्षिक योजनेते (१९७६–८०) प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कृषिउत्पादनात अधिक वाढ करण्याच्या इराद्याने साधनसामग्री त्या क्षेत्राकडे वळविण्यात आली. या क्षेत्रातील उत्पादनात नियोजित १४ ते १७ टक्क्यांच्या वाढीऐवजी ९ टक्के वाढ झाली. याच काळात औद्योगिक उत्पादनात नियोजित ३५ ते ३९ टक्के या वाढीऐवजी २४ टक्के वाढ झाली आणि राष्ट्रीय उत्पन्न नियोजित २४-२८ टक्के एवढ्या वाढीऐवजी २३ टक्क्यंनी वाढले. अकराव्या पंचवार्षिक योजनेत (१९८१–८५) अवजड व जड उद्योगांच्या वाढीवर भर देण्याऐवजी उपभोग्य वस्तूंच्या उत्पादन उद्योगांवर अधिक प्रमाणात भर देण्यात आला. १९८६ मध्ये अकराव्या योजनाकाळात औद्योगिक उत्पादन २० टक्क्यांनी, तर शेती उत्पादन ६ टक्क्यांनी वाढल्याचे तसेच राष्ट्रीय उत्पन्न १७ टक्क्यांनी वाढल्याचे घोषित करण्यात आले. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (१९८६-९०) स्वरूप १९८५ मध्ये जाहीर करण्यात आले. या योजनाकाळात राष्ट्रीय उत्पन्नात १९ ते २२ टक्क्यांची नियोजित वाढ अपेक्षित होती त्याच काळात एकूण औद्योगिक उत्पादनातही २१ ते २४ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा होती. नवीन प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी कामगार उत्पादकतेमध्ये वाढ करून औद्योगिक उत्पादनवृद्धी साध्य करावयाचे उद्दिष्ट होते. बाराव्या योजनेमध्ये खनिज तेलाच्या नव्या साठ्यांचा, विशेषतः सायबीरिया व बॅरेंट्स समुद्र या भागांत, शोध घेण्याचे त्याचप्रमाणे नवीन उपकरणांमध्ये भांडवल गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक वायूचे वार्षिक उत्पादन १९९० पर्यंत ८५० अब्ज ध. मी. पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
गॉसप्लॅन ही रशियन शासनाची योजना – उद्दिष्टे, लक्ष्ये आणि कार्यवाही-साध्य करणारी प्रमुख यंत्रणा आहे. [⟶गॉसप्लॅन].
राष्ट्रीय उत्पन्न : १९८१ मधील रशियांचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन सु. १,११६.२ अब्ज रुबल (१९७५ मध्ये ८६२.६ अब्ज रुबल) असल्याचे शासकीय सूत्रांनुसार घोषित करण्यात आले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रांचा पुढीलप्रमाणे वाटा (हिस्सा) होता : उद्योग ६३%, कृषी १४%, बांधकाम १०%, व्यापार९% व वाहतूक-संदेशवहन ४%.
राष्ट्रीय उत्पन्नापैकी १९८१ मधील (४८२.१ अब्ज रुबल) उद्योगाचा हिस्सा५१%, कृषी १५%, व्यापार १८%, बांधकाम १०% व वाहतूक व संदेशवहन ६% असे प्रमाण होते. १९८२ मधील राष्ट्रीय उत्पन्नवृद्दिदर २.६% – दुसऱ्या महायुद्दोत्तर काळातील निम्नतम दरएवढा होता. १९८४ मधील राष्ट्रीय उत्पन्नापैकी (५६९.६ अब्ज रुबव) उद्योगाचा हिस्सा ४६%, कृषी १९%, बांधकाम १०.६%, वितरण व पुरवठा १७.५% आणि वाहतूक व संदेशवहन ६% असे प्रमाण होते.
परदेशी गुंतवणूक :रशिया अन्य देशांत गुंतवणूक करीत नाही अथवा अन्य परकीय उद्योगांना रशियात गुंतवणूक करू देत नाही. तथापि रशियन शासनाने अनेक परदेशी उद्योगांबरोबर करार केले असून त्यांअन्वये रशियामध्ये उभारण्यात यावयाच्या औद्योगिक संयंत्रांच्या व सुविधांच्या बदल्यात, तंत्रज्ञान, वा तंत्रविद्या पुरविणाऱ्या परकीय उद्योगाला संयंत्रांच्या उत्पादनापासून उपलब्ध होणाऱ्या पैशातून त्याचा मोबदला देण्यात येतो. कामा नदीकाठी एका प्रचंड ट्रकनिर्मितिसंयंत्राच्या उभारणीबाबत रेनॉल्ट ह्या फ्रेंच कंपनीशी आणि प. जर्मनीच्या डेम्लर-बेन्झ कंपनीशी १९७० मध्ये एक करार करण्यात आला. १९८३ च्या सुमारास ब्रेझनेव्ह या कामा नदीस्थित शहरामधील ट्रककारखान्यातून प्रतिवर्षी १.५ लक्ष ट्रकवाहनांचे उत्पादन सुरू झाले. फ्रान्स, स्वीडन आणि फिनलंड या दिन्ही राष्ट्रांकडून लाकूड-प्रक्रिया साधनसामग्री घेऊन त्यावदली या राष्ट्रांना रशिया कागदलगदा उपलब्ध करतो. १९८०-८५ च्या दरम्यान, ऑक्सिडेंटल पेट्रोलियम या अमेरिकन कंपनीने रशियात खनिजउर्वरकनिर्मितिप्रकल्प उभारण्याचा करार केला. फ्रेंच व प. जर्मन उद्योंगांनी अनुक्रमे रासायनिक आणि विद्युत्-धातुविज्ञानविषयक (धातुकर्मक) निर्मितिउद्योग उभारणीसाठी सहकार्य करार केले होते. सायबीरियातील दगडी कोळसा व लाकूड उद्योगांचा विकास करण्याबाबत रशिया व जपान यांमध्ये एक अब्ज डॉलर कर्जाचा दीर्घमुदतीचा करार झाला आहे.
सोव्हिएट रशिया आणि बेलोरशिया व युक्रेन ही प्रजासत्ताके संयुक्त राष्ट्रांचे संस्थापक सदस्य (२४ ऑक्टोबर १९४५) असून तिघेही यूरोपीय आयोगाचे सदस्य आहेत. केवळ रशियालाच सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व असून तो एस्कॅपच्या कार्यात भाग घेऊ शकतो. यांशिवाय रशिया संयुक्त राष्ट्रांच्या अ-प्रादेशिक संघटनांचा सदस्य असून फक्त अन्न व शेती संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था, आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधी आंतरराष्ट्रीय अर्थ निगम व आंतरराष्ट्रीय चलन निधी या संयुक्त राष्ट्रांतर्गत संस्था-संघटनांचे सदस्यत्व त्याला अद्यापि मिळालेले नाही. नुकतेच रशियाने गॅट व आंतरराष्ट्रीय चलन निधी या दोन संस्थांच्या सदस्यत्वासाठी संयुक्त राष्ट्रांकडे विनंती केली आहे. कॉमेकॉन (स्मिआ-कौन्सिल फॉर म्युच्युअल इकॉनॉमिक ॲसिस्टन्स) या साम्यवादी राष्ट्रांनी स्थापिलेल्या (१९४९) संघटनेमध्ये रशियाने प्रारंभापासूनच महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. [⟶ समाईक वाजारपेठा].
वाहतूक व संदेशवहन : रशियाचा विस्तीर्ण प्रदेश व रशियन अर्थव्यवस्थेचा जलद वेगाने झालेला विकास या दोन्ही गोष्टींचा देशाच्या वाहतूक यंत्रणेवर फार मोठा परिणाम झाला असून त्या यंत्रणेवर ताणही पडला आहे. रेल्वेचे जाळे सु. १,४५,२९२ किमी. एवढे पसरले असून (१९८५) त्यांपैकी ४९,३०० किमी. लोहमार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. ट्रान्स-सायबीरियन रेल्वेवरील माल व प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने टाइशेट ते कोम्सोमोल्स्कऑन-अमूर येथपर्यंत पसरलेला आणि वैकल-अमूर (बँम) या नावाने ओळखला जाणारा ३,१४५ किमी. लांबीचा हा प्रमुख लोहमार्ग टाकण्याचे काम ऑक्टोबर १९८४ मध्ये पूर्ण करण्यात आले. ऑक्टोबर १९८४ पर्यंत या मार्गावरून थेट वाहतूक, तर १९८५ च्या अखेरपर्यंत यांतील काही भागाचे विद्युतीकरण करण्याची योजना होती. येकुत्स्ककडे जाणाऱ्या बॅम रेल्वेच्या एका फाट्याचे बांधकाम १९८४ मध्ये चालू होते. टिफ्लिस व येरेव्हान यांना जोडणारा (व त्यामुळे अंतर कमी होणारा) १८० किमी. लांबीचा ट्रान्स-कॉकेशियन लोहमार्ग बांधण्याची योजना होती. १९८५ मध्ये रशियन रेल्वेने ३९५.१० कोटी टन मालाची व ४१६.६० कोटी प्रवाशांची वाहतूक केली. देशातील नऊ शहरांमधून भुयारी रेल्वेचे जाळे कार्यवाहीत असून त्यांपैकी मॉस्को मेट्रो ही १८४ किमी. लांबीची सर्वांत मोठी भुयारी रेल्वे समजली जाते. इतर १५ शहरांमध्ये भुयारी रेल्वेचे काम चालू आहे. रेल्वे मंत्रालय २६ रेल्वे मंडळांमार्फत रेल्वेचे प्रशासन पाहते. १९८४ च्या अखेरीस रस्त्यांची एकूण लांबी १५,१६,७०० किमी. असून त्यांपैकी १०,९७,१०० किमी. कठीण पृष्ठभागाचे (पक्के) रस्ते होते. मॉस्को हे देशातील मोठ्या शहरांशी प्रमुख मार्गांनी जोडण्यात आले आहे. १९८५ मध्ये या रस्त्यांवरून २,५५० कोटी टन मालाची व ४,७०० कोटी प्रवाशांची वाहतूक झाली.
देशात १९८४ मध्ये १,३६,७०० किमी. लांबीचे अंतर्गत जलमार्ग असून लाकूड, अवजड माल यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने रशियाला त्यांचे मोठे महत्त्व आहे. मोठ्या जहाजांची कालव्यांतून वाहतूक होत असून १९८५ मध्ये नदीमार्गांतून जहाजांनी सु. १,३३० लक्ष प्रवासी व सु. ६,३२० लक्ष मे. टन माल यांची वाहतूक केली. देशातील अंतर्गत जलमार्गांची एकूण लांबी सु. १,५०,००० किमी. असून त्यांपैकी २०,००० किमी. लांबीचे कालवे आहेत. ब्होल्गा, नीपर, डॉन, ओव, येनिसे, लीना, अमूर, अमुदार्या या देशातील प्रमुख जलमार्ग संहती होत. व्होल्गा ही सर्वांत मोठी जलप्रणाली असून तिच्यातून सु. ५०% मालवाहतूक करण्यात येते. कालव्यांद्वारे व्होल्गा ही डॉन नदी, काळा, बाल्टिक व श्वेत समुद्र यांना जोडण्यात आली आहे. व्होल्गा-डॉन नदीप्रणालीवरील महत्त्वाची अंतिम बंदरे म्हणजे अस्ट्रॉखान, रॉस्टॉव्ह-ऑन-डॉन, मॉस्को, लेनिनग्राड, प्येर्म तर व्होल्गोग्राड, साराटॉव्ह, क्वीविशेव्ह, कझॅन, गॉर्की, यारोस्लाव्ह्ल ही स्थानांतरण बंदरे होत.
देशात पुढील नऊ महत्त्वाचे कालवे आहेत : (१) मॉस्को-व्होल्गा कालावा : १२८ किमी. लांब. (२) श्वेतसमुद्र-बाल्टिक कालवा : २२७ किमी. लांब. (३) नीपर-बग कालवा : २०२ किमी, लांबीचा हा कालवा युक्रेन व बेलोरशिया ही दोन्ही प्रजासत्ताके बाल्टिक देशांना जोडतो. (४) काराकुम कालवा : ८५० किमी. लांब. याच्यामुळे अमुदर्या, टेडझेन, मुरगाब या नद्या अश्काबादशी जोडण्यात आल्या आहेत. (५) नॉर्थ-क्रिमियन कालवा : ४०० किमी. लांबीचा हा कालवा क्रिमियाच्या स्टेप प्रदेशाचे सिंचन करतो. (६) व्होल्गाबाल्टिक कालवा : ३६२ किमी. लांब. १९६४ मध्ये हा पुन्हा बांधण्यात आला. हा कालवा बाल्टिक, श्वेत, काळा, कॅस्पियन व ॲझॉव्ह हे समुद्र जोडतो. (७) व्होल्गा-डॉन कालवा : १०१ किमी. लांब, (८) डोनेट्स-डॉनबॅस कालवा : युक्रेनमध्ये हा सु. १२० किमी. लांब असून १९५८ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आला. हा कालवा रशियाच्या सर्वांत मोठ्या औद्योगिक भागाला उपयुक्त ठरला आहे. (९) गलॉदनाया-स्टेप कालवा : हा उझबेकिस्तान प्रजासत्ताकात असून त्याची लांबी १,३०० किमी. आहे. बराचसा वाळबंटी भाग असलेल्या या प्रजासत्ताकातील जमीन या कालव्यामुळे मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आली आहे. १९६० मध्ये या कालव्याचा ६० मिमी. भाग बांधून झाला होता.
जगामधील व्यापारी जहाजांचा ताफा असलेल्या सर्वांत मोठ्या देशांमध्ये रशियाचा समावेश होतो. देशात १६ जहाजकंपन्या आहेत. १९८६ मध्ये या सर्व कंपन्यांची मिळून १,९२६ जहाजे (१४६ लक्ष स्थूल नोंदणीकृत टनभार) होती. जागातिक मालवाहू परिपदांचे पूर्ण सदस्यत्व रशियन जहाजकंपन्यांना मिळालेले आहे. १९८७ मध्ये त्या ५९ समुद्र व सागरी मार्गांवर नियमित (यांतच २० आंतरराष्ट्रीय महासागर मार्ग अंतर्भूत) जहाजवाहतूक करीत होत्या. रशियाचे जहाज नोंदणी कार्यालय लेनिनग्राड येथे आहे. १९८४ मध्ये सु. ६.४८० लक्ष मे. टन खनिज तेलाची ४९७ अब्ज घ. मी. नैसर्गिक वायूची वाहतूक नळावाटे करण्यात आली. पश्चिम सायबीरियातील उरेंगॉई वायुक्षेत्रामधून प. यूरोपला नैसर्गिक वायूची वाहतूक १९८४ पासून कार्यान्वित झाली.
एरोफ्लोट ही रशियन विमानवाहतूक कंपनी (स्था. १९२३) जगामधील सर्वांत मोठी समजण्यात येत असून देशातील सर्व प्रकारची हवाई वाहतूक (नियमित प्रवासी व मालवाहतुकीखोरीज, कृषिविषयक सर्वेक्षण व वैद्यकीय साहाय्य सेवा) त्याचप्रमाणे विमानतळ आणि मार्ग-निर्देशन-उपकरण साधने यांची देखभाल व व्यवस्था तिच्यामार्फत पाहिली जाते. अंतर्गत हवाई वाहतुकीच्या बाबतीत या कंपनीद्वारा सु. १० लक्ष किमी. हवाई वाहतूक केली जात असून तिच्या वाहतूक सेवेमध्ये सर्व प्रजासत्ताकांच्या राजधान्या व ३,६०० इतर गावे यांचा अंतर्भाव होतो तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रात या कंपनीची २.५ लक्ष किमी. वाहतूक होत असून जगातील ९७ देशांमधील १२२ शहरांना हवाई वाहतूक सेवा पुरविली जाते. १९८६ मध्ये एरोफ्लोटने सु. १,१६१ लक्ष प्रवाशांची व सु. ३१.-५७ लक्ष मे. टन मालाची वाहतूक केली.
संदेशवहन : मॉस्को नभोवाणीवरून (रेडिओ मॉस्को) प्रतिदिनीदोन वाहिन्यांद्वारा (चॅनेल) रेडिओ कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. पहिल्या वाहिनीवरून जवळजवळ सर्व रशियाभर प्रसारण केले जाते. दुसऱ्या वाहिनीवरून (मायाक) सु. ८०% लोकांना ही सेवा उपलब्ध होते. रेडिओ प्रसारण ७१ भाषांतून करण्यात येते. १९८५ मध्ये प्रतिदिनी १,४०० तासांचे विविध कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. रेडिओ मॉस्को ७५ भाषांमधून परदेशांसाठी कार्यक्रम प्रसृत करतो. दूरचित्रवाणी सेवा देशातील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला उपलब्ध होते. प्रतिदिनी सु. ३,७०० तास दूरचित्रवाणीच्या विविध केंद्रांवरून कार्यक्रम प्रसारित केले जातात. १९८५ मध्ये देशात ११५ दूरचित्रवाणी केंद्रे होती. मॉस्कोहून प्रतिदिनी १३ वाहिन्यांद्वारा सु. १५० तासांचे कार्यक्रम दूरचित्रित केले जातात. १९८४ मध्ये देशात ८१२ लक्ष रेडिओ संच व ८०३ लक्ष दूरचित्रवाणी संच होते. १९८६ च्या आरंभी सु. ९२,२०० डाक-तार व दूरध्वनिकार्यालये आणि सु. ३१२ लक्ष दूरध्वनियंत्रे होती.
पर्यटन : रशियामध्ये १८८५-९० यांदरम्यान सेंट पीटर्झबर्ग, टिफ्लिस व ओडेसा येथे प्रथमच पर्यटक संघटना स्थापन झाल्या. १९०१ मध्ये रशियन पर्यटक संस्था स्थापण्यात आली १९१४ मध्ये तिचे सु. ५,००० सभासद होते. १९२०-२५ यांदरम्यान संघटित पर्यटन सुरू झाले ‘इन्टूरिस्ट’ ह्या शासकीय पर्यटनसंस्थेची १९२९ मध्ये स्थापना झाली. मोठ्या प्रमाणावरील पर्यटनास दुसऱ्या महायुद्धोत्तर काळापासून सुरुवात झाली.
विदेशी पर्यटकांसाठी १९६० मध्ये २२२ हॉटेल (३६,००० पर्यटकांसाठी निवास उपलब्धता) होती १९८४ मध्ये हॉटेलांची संख्या ९६८, तर ३.८७ लक्ष पर्यटकांची निवासव्यवस्था झाली. त्याच वर्षीं सु. ४५७ लक्ष पर्यटकांनी देशातील सर्व प्रकारच्या पर्यटक-आवासांचा लाभ घेतला.
रशियन अर्थव्यवस्थेत विदेश पर्यटन हे महसुलाच्या दृष्टीने फार मोठी बाब नसली, तरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे परकीय चलन म्हणून त्याकडे पहिले जाते. ‘इन्टूरिस्ट’ ही शासकीय संघटना विदेशी पर्यटकांना रशिया पाहण्याच्या कार्यात, तर रशियन नागरिकांना परदेशांत पर्यटनाच्या दृष्टीने साहाय्य करते. अखिल कामगार संघटनांची केंद्रीय परिषद, आंतरराष्ट्रीय युवा पर्यटन कार्यालय (स्पुटनिक), मैत्री व सांस्कृतिक संबंध संस्था यांसारख्या संघटनाही रशियामधील पर्यटनदौरे आयोजित करतात. मॉस्को, कीव्ह, लेनिनग्राड, ओडेसा, काळा समुद्र् व बाल्टिक समुद्र यांवरील आरोग्यस्थाने, उरल व अल्ताई पर्वतराजी, समरकंद व बूखारा ही प्राचीन शहरे इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे होत. १९७० मध्ये रशियाला २०,५९,३३८ विदेशी पर्यटकांनी (ग्रेट ब्रिटनचे ४३,४९० तर अमेरिकेचे ६६,३६५) भेट दिली १९८० मद्ये हीच संख्या ५५.९० लक्ष एवढी झाली. सबंध यूरोपणध्ये मॉस्कोमधील ‘हॉटेल रशिया’ (आवासव्यवस्था ५,५००) हे सर्वांत मोठे गणले जाते.
लेखक : गद्रे, वि. रा.
लोक व समाजजीवन : रशियातील समाज बहुराष्ट्रीय आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या विविध वांशिक गटांनी तो बनलेला असून असे सु. १०४ अधिकृत मान्यता असलेले समाज देशात आहेत. राजकीय दृष्टिने देशातील मोठी प्रजासत्ताके, त्यांच्या अंतर्गत असलेली स्वायत्त गणराज्ये व स्वायत्त क्षेत्रे अशी व्यवस्था करून देशातील बहुराष्ट्रीय समाजांच्या सांस्कृतिक पृथगात्मतेचे जतन करण्यात येते. १९७७ च्या नव्या रशियन संविधानातील शहात्तराव्या अनुच्छेदानुसार वेगवेगळ्या वंशांच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या नागरिकांना समान हक्क देण्यात आले आहेत. देशभक्ती आणि समाजवादी आंतरराष्ट्रीयत्व यांची शिकवण देऊन बहुराष्ट्रीय समाजांत ऐक्य निर्माण करणे व त्यांचा विकास करणे हे उद्दिष्ट याच अनुच्छेदात नमूद केले आहे. यासाठी विविध प्रादेशिक भाषांचा विकास करण्याची तरतूदही संविधानात केलेली आहे. शहात्तराव्या अनुच्छेदानुसारच वंश आणि राष्ट्रीयत्व यांच्या आधारे नागरिकांचे हक्क वाधित करणाऱ्या कृती आणि व्यक्ती कायद्याने शिक्षापात्र ठरविलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वंश आणि राष्ट्रीयता यांच्या बळावर विशेषाधिकार किंवा फुटीरपणा यांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती आणि कृती तसेच वंशद्वेष किंवा वंशविरोध या गोष्टी कायद्याने शिक्षापात्र आहेत. अल्पसंख्या समाजांच्या आपापल्या भाषा असून त्यांपैकी त्या ३०% लोकांना आपल्या मातृभाषेशिवाय रशियन भाषाही अवगत आहे.
रशियाची १९७९ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २६,२४,००,००० होती. तीतील विविध वांशिक समाजांची लोकसंख्या पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्षांमध्ये) : १,३७४ रशियन ४२३ युक्रेनियन ९५ बेलोरशियन १२ पोल १२५ उझबेक ६६ कझाक ६३ तातार ५५ आझरवैजानी, ४१ आर्मेनियन ३६ जॉर्जियन ३० मॉल्डेव्हियन, २९ ताजिक २९ लिथ्युएनियन २० तुर्कमेनी १९ जर्मन १९ किरगीझ १८ चूव्हाश १४ लॅट्व्हियन १४ बश्कीर १२ मॉर्डोव्हियन १० एस्टोनियन.
देशातील लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण दर चौ. किमी. स. १२.३ होते (१९८४). मोठी शहरे, उद्योगधंदे आणि चांगली शेतजमीन असलेल्या देशाच्या पश्चिम सरहद्दीपासून बैकल सरोवरापर्यंतच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता अधिक आहे. मॉस्कोचा परिसर, डोनेट्स नदीखोऱ्यातील खाणविभाग व औद्योगिक क्षेत्र, मॉक्सोच्या आग्नेय व दक्षिण भागांतील कृषिक्षेत्र, काळ्या समुद्राचा उत्तर भाग, मध्य आशियातील मरुद्याने या भागांत दाट लोकसंख्या आढळते. अतिपूर्व आणि अतिउत्तरेकडील प्रदेश तसेच सायबीरिया येथे विरळ लोकसंख्या आहे.
साधारणपणे एक कोटीहून अधिक लोक प्रतिवर्षी स्वेच्छेने आपल्या वांशिक राष्ट्रीय परिसरात स्थलांतर करीत असतात. रोजगारासाठी किंवा सरकारी आदेश म्हणून सु. १०% लोक प्रतिवर्षी स्थलांतर करतात. सायबीरिया, कझाकस्तान, अतिउत्तरेकडील प्रदेश इ. विरळ लोकवस्तीच्या भागांत औद्योगिक आणि कृषिविषयक प्रकल्प उभारून तेथील लोकवस्ती वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चिनी सरहद्दीलगतच्या प्रदेशातही वस्ती वाढविण्यात येत आहे. कौटुंबिक कारणांव्यतिरिक्त इतर कारणांस्तव देशांतर करण्यास रशियन नागरिकांना बंदी आहे. रशियातून देशांतर करणाऱ्यात ज्यू लोकांचे प्रमाण अधिक आहे.
शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या अनुक्रमे १६ कोटी ३६ लक्ष व ९ कोटी ८९ लक्ष होती (१९७९). औद्योगिकीकरण, नागरीकरण इ. कारणांनी शहरी लोकसंख्येत १९७० ते १९७९ यांदरम्यान २ कोटी ७६ लक्ष इतकी भर पडली. १९७७ च्या संविधानातील बाविसाव्या अनुच्छेदानुसार शेतीकामाचे औद्योगिक कामात रूपांतर करण्याची, तसेच खेडी व ग्रामीण वस्त्या यांचे सुनियोजित आधुनिकीकरण करण्याची तरतूद आहे. त्या दृष्टींनी खेड्यांचा कायापालट घडून येत आहे. रशियन खेड्यांतील परंपरागत अशा एका खोलीच्या घराला ‘इझ्बा’ म्हणतात. अजूनही काही भागांत ही घरे दिसून येतात. अलीकडे दोन खोल्यांची घरे ग्रामीण भागातही दिसून येतात. विजेच्या दिव्यांची सोय खेडोपाडी झाली आहे. पाण्यासाठी मात्र सार्वजनिक विहिरींचा उपयोग अजूनही बऱ्याच ठिकाणी केला जातो. घराच्या परिसरात बटाटे, कांदे, काकडी इत्यादींचे उत्पादन काढले जाते. कोंबड्या, हुकरे व चाऱ्याची सोय असल्यास गुरे पाळली जातात. सामूहिक कृषिक्षेत्र हे ग्रामीण जीवनाचे केंद्र असते. खेड्यात प्राथमिक शाळा, शिशुशाळा, करमणूक केंद्रे व सार्वजनिक वस्तुभांडार या सुविधा असतात. ग्रामीण आहारात पाव तसेच बटाटे व इतर भाज्यांचा अंतर्भाव असतो. व्हॉड्का हे लोकप्रिय मद्य आहे. उन्हाळ्यात शेतीकाम व बांधकाम यांसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिवर्ग खेड्यात येतो. ग्रामीण समाजरचनेत सामुदायिक शेतीचा अधिकारीवर्ग, त्याखाली कुशल कारागीर, तंत्रज्ञ-यंत्रज्ञ यांचा वर्ग, त्याखाली कुक्कुटपालक व शेवटी शेतमजूर अशी श्रेणी आढळते. काही खेड्यांत सार्वजनिक स्नानगृहे आहेत. शहरी कुटुंब सामान्यतः पति-पत्नी, एक वा दोन मुले असे मर्यादित असते. सामान्यतः दोन खोल्यांच्या घरातून हे कुटुंब राहते. १९७१-८० च्या दशकात सरकारतर्फे प्रतिवर्षी सु. २१ लक्ष घरे बांधण्यात आली.
१९७९ च्या जनगणनेनुसार एकूण २६ कोटी २४ लक्ष लोकसंख्येपैकी स्त्रियांची संख्या १४ कोटी १ लक्ष म्हणजे पुरुषांच्या संख्येपेक्षा (१२ कोटी १३ लक्ष) सु. २ कोटींनी जास्त होती. रशियात स्त्री-पुरुष समानता आहे. याच वर्षी देशातील एकूण कामगारसंख्या १३,५४,२३,६४२ होती. त्यांपैकी स्त्रियांची संख्या ६,७५,०४,८७४ होती. आरोग्यसेवा, शिक्षण, कनिष्ठ प्रशासकीय पदे, किरकोळ व्यापार, त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग यांतून स्त्रियांची संख्या अधिक आहे. रशियन कुटुंबातील स्त्री सामान्यतः मिळवती असते. शेतीकामात अजूनही स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. विद्यापीठीय प्राध्यापकवर्गात त्यांचे प्रमाण १०%, तर कनिष्ठ शालेय शिक्षकांत त्यांचे प्रमाण ८०% आहे. सामान्यपणे देशात क्रांत्युत्तर काळातही स्त्रियांचे पारंपरिक कौटुंबिक स्थान आणि कार्य यांवरच भर देण्यात आला. १९३६ साली गर्भपातावर कायद्याने बंदी घालण्यात आली असून घटस्फोटाला वाव नसे. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड मनुष्यहानीमुळे (सु. २ कोटी) महायुद्धोत्तर काळात जननमान कमी झाल्याने ते वाढविण्यासाठी सरकारतर्फे खास प्रयत्न करण्यात आले. गरोदर स्त्रिया, लहान मुले असलेल्या स्त्रिया यांच्यासाठी खास सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. कर्मचारी मातांसाठी शिशुशाळा, वालोद्याने इत्यादींची सोय शहरांतून तसेच सामुदायिक शेतीच्या परिसरात करण्यात येत आहे.
देशातील १९७७ च्या संविधानातील पस्तिसाव्या अनुच्छेदानुसार स्त्री आणि पुरुष यांना शिक्षण, रोजगार, वेतन या सर्व बाबतीत समान अधिकार देण्यात आले आहेत. अशा मातांना योग्य अशा कामाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद असून गर्भवती स्त्रियांना कामकाजाच्या वेळात सवलती देण्याचीही सोय आहे.
धर्म : १९७७ च्या संविधानातील बाबन्नाव्या अनुच्छेदानुसार रशियन नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. अधिकृतपणे मान्यता असलेल्या विविध धार्मिक संघटनांची संख्या सु. ४० आहे. १८ वर्षे वयावरील वीस किंवा त्यांहून अधिक व्यक्ती असलेल्या विशिष्ट धर्माच्या समूहाला देशात अधिकृतपणे स्वतंत्र धार्मिक समूह म्हणून मान्यता मिळते. धर्मद्वेष व धार्मिक शत्रुत्व यांवर बंदी आहे. चर्च हे शासनापासून तसेच शैक्षणिक संस्थांपासून अलग करण्यात आलेले आहे. २ फेब्रुवारी १९१८ च्या अधिकृत हुकूमनाम्यानुसार देशातील मोठे ऑर्थोडॉक्स चर्च वंद करण्यात येऊन त्याच्या मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, तथापि १९८६ साली देशात सु. २०,००० चर्च आणि १८ धर्मप्रसार करणाऱ्या पाठशाळा कार्यरत होत्या. धर्मशिक्षण खाजगी रीतीने किंवा चर्चमध्ये मिळू शकते. १८ वर्षांखालील व्यक्तींना धर्मशिक्षण देण्यास बंदी आहे. बायबल, कुराण वा तत्सम इतर धार्मिक ग्रंथांच्या प्रकाशनासाठी शासनातर्फे छपाईच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. विविध धर्मसमूहांतील परस्परसंबंधांवर देखरेख करण्याचे काम ‘कौन्सिल ऑफ रिलिजिअस अफेअर्स’ ही समिती करते. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत ही समिती आहे. मॉस्कोतील ऑर्थोडॉक्स चर्चच्या अनुयायांची संख्या सु. तीन कोटी असावी (१९८३).
ऑर्थोडॉक्स चर्चच्या अनुयायांखालोखाल दुसरा मोठा खिस्ती धर्मसमूह आर्मेनियन लोकांचा होय. त्याखालोखाल जॉर्जियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या अनुयायांचा क्रम लागतो. प्रॉटेस्टंट पंथाचे अनुयायीही रशियात आढळतात. इव्हँजेलिकल स्विश्चन बाप्तिस्त या शाखेचे सु. ५,१२,००० सदस्य असून त्यांच्या चर्चची संख्या ५,००० आहे. एस्टोनिया आणि लॅट्व्हिया या प्रांतांत ल्यूथरनपंथीय लोक आढळतात. त्यांची सदस्यसंख्या सु. ९,५०,००० आहे. युक्रेनमध्येही प्रॉटेस्टंट पंथाच्या एका शाखेचे (द रिफॉर्म) अनुयायी (सु. ७०,०००) आढळतात. लिथ्युएनिया आणि प. युक्रेन यांत रोमन कॅथलिकांची संख्या अधिक आहे. लिथ्युएनियात तर ६३० चर्च आहेत. रशियातील मुस्लिमांची संख्या तीन कोटी असून ते मुख्यतः सुन्नीपंथीय आहेत. मध्य आशिया व कझाकस्तान, यूरोपीय रशिया व सायबीरिया आणि उत्तर कॉकेशस अशा तीन प्रमुख प्रशासकीय विभागांत विखुरलेल्या या मुस्लिम नागरिकांचा धर्मप्रमुख म्हणजे मुफ्ती होय. ट्रान्स-कॉकेशिया या चौथ्या प्रशासकीय विभागाचा शेख-उल्-इस्लाम हा धर्मप्रमुख असून वाकू हे या विभागाचे केंद्र आहे. मध्य आशियात एक मुस्लिम अकादमी व मद्रसा असून कुराणाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. रशियात ज्यू नागरिकही-विशेषतः मॉस्को व कीव्ह येथे-एकवटलेले आढळतात (सु. २० लाख-१९८४ अंदाज). ज्यू धर्मप्रमुखाचे केंद्र मॉस्को येथे असून देशात सु. १८० सिनॅगॉग आहेत. रशियात सु. ४ लाख बुद्धधर्मी लोकही आहेत (१९७९). सेंट्रल बुद्धिस्ट कौन्सिल देशात असून लामा हा त्याचा प्रमुख आहे.
देशातील १९१७ सालच्या राज्यक्रांतीनंतर सु. दोन-तृतीयांश धार्मिक स्थाने व संस्था बंद करून त्यांच्या वास्तूंत संग्रहालये किंवा करमणूक केंद्रे सुरु करण्यात आली. जागतिक आर्मेनियन पंथाचे केंद्र रशियात आहे. प्रार्थनास्थळे गरजेनुसार लोकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य शासकीय यंत्रणेद्वारा करण्यात येते. देशातील धर्मकार्यार्थ होणाऱ्या खर्चाची जबावदारी त्या त्या संस्थेला घ्यावी लागते. ज्यूंना मात्र राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय संघ स्थापन करण्यात बंदी आहे. तथापि देशात ज्यूविरोधवादालाही बंदी आहे.
आरोग्य व समाजकल्याण : रशियात सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. केंद्रीय व प्रांतिक आरोग्य मंत्रालयांच्या अखत्यारीत देशातील सर्व आरोग्यविषयक सेवासंस्था, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था व आहोग्यधामे येतात. तथापि देशात खाजगी वैद्यकीय सेवाही उपलब्ध आहे.
अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस १९४४ साली स्थापन करण्यात आली. देशात ३९३ वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था असून त्यांवर या अकादमीचे नियंत्रण असते. देवी, हिवताप, खुपऱ्या यांसारख्या साथीच्या रोगांचे देशातून जवळजवळ निर्मूलन झालेले आहे.
देशात १९८६ साली एकूण २३,१०० शासकीय रुग्णालये असून त्यांत ३६ लक्ष खाटांची सोय होती. शासकीय आरोग्यसेवेतील डॉक्टरांची संख्या ११,३६,००० होती. बाह्यरुग्णांसाठी ३७,००० वैद्यकीय उपचारकेंद्रे असून स्त्रीरुग्ण व बालरूग्ण यांच्या उपचारार्थ २७,५०० केंद्रे होती. देशातील १९८५ सालचे जन्म-मृत्युचे दरहजारी प्रमाण अनुक्रमे १९.४ आणि १०.६ असून बालमृत्युमान दरहजारी २६ होते. रशियन नागरिकांचे सरासरी आयुर्मान ६९ वर्षांचे आहे.
देशात आरोग्यधामांचीही सोय आहे. येथील आरोग्यधामांची संख्या १९८२ साली २,३५२ असून ५,६७,००० लोकांची सोय त्यांत होऊ शकते. बहुतेक आरोग्यधामे काळा समुद्र, बाल्टिक समुद्र इ. भागांत एकवटली आहेत. मोठमोठ्या कारखान्यांशी संलग्न अशी २,७६६ आरोग्यधामे असून त्यांचा लाभ सु. २,३३,००० कर्मचाऱ्यांना होतो. कामगार संघटनांच्या व्यवस्थापनाखाली असलेली १,२०८ विश्रामधामे असून त्यांचा लाभ सु. ३,८०,००० कामगारांना मिळतो. देशातील बहुतेक मोठे कारखाने आणि संस्था यांचे स्वतंत्र दवाखाने असून त्यांची संख्या ३६,१२३ होती (१९८०).
रशियातील सामाजिक सुरक्षा विमापद्धती विकसित झालेली आहे. या पद्धतीचा लाभ कामगार, प्रशासनातील कर्मचारी, सामुदायिक शेतीतील कर्मचारी, लष्करातील व्यक्ती, विद्यार्थी, लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ इत्यादींना मिळतो. वार्धक्य वेतन, अपंगता वेतन, प्रसूती वेतन अशा विविध प्रकारे गरजूंना आर्थिक मदत दिली जाते. ६० वर्षांवरील पुरुषांना व ५५ वर्षावरील महिलांना सेवानिवृत्ती वेतन मिळते. अत्यंत कष्टप्रद अशा नोकरीतील स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांना वरील वयोमर्यादेच्या आधी ५ ते १० वर्षे सेवानिवृत्ती वेतन मिळू शकते. १९८६ साली,५,५७,००,००० सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतन मिळत होते. सामुदायिक शेतांवरील कामगारांसाठी नवी सुरक्षा योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची वर्गणी आणि शासकीय मदत यांतून एक स्वतंत्र निधी जमा करण्यात येतो व त्यातून गरजू कामगारांना मदत देण्यात येते. सैनिकी सेवेतील व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत इत्यादींनाही शासनामार्फत आर्थिक मदत देण्यात येते. उञ्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन मिळते. रशियात अपत्यहीन जोडण्यांवर कर आकारण्यात येतो. मोठी कुटुंबे व कुमारी माता यांना अशा करापोटी जमलेल्या निधीतून मदत देण्यात येते. सामाजिक सुरक्षा वेतनाची यंत्रणा कामगार संघटनांच्याच ताब्यात आहे. कारखाने, मोठे उद्योगधंदे आणि संस्था यांच्या स्वतंत्र समित्या हे काम पाहतात. अशा समित्यांतील स्वयंसेवकांची संख्या सु. ५० लक्ष आहे. देशाच्या १९८४ च्या अर्थसंकल्पापैकी १५% रकमेची तरतूद सामाजिक सुरक्षा योजनांसाठी करण्यात आली होती.
शिक्षण : क्रांतिपूर्व काळात देशातं तीन-चतुर्थांश लोक निरक्षर होते. लोकशिक्षण हे झार राजवटीत झार सत्तेला धोक्याचे म्हणून सहेतुकपणेच दुर्लक्षित करण्यात आले. देशातील विद्यमान साक्षरतेचे प्रमाण (९ ते ५० वर्षे वयोगटांमधील) ९९.८% आहे. क्रांत्युत्तर रशियन राज्यकर्त्यांनी शिक्षित जनता हेच आपले खरे बळ आहे, हे ओळखले होते. १९१७ नंतर धार्मिक श्रद्धा आणि कल्पना, पारंपरिक साचेबंद समाजरचना, उञ्च वर्गींयांचे परंपरागत विशेषाधिकार यांसारख्या गोष्टींचा कळतनकळत पुरस्कार करणारी शिक्षणव्यवस्था वदलून टाकण्यात आली. त्याचप्रमाणे लेनिनच्या अभिप्रायाप्रमाणे शुद्ध ज्ञानविज्ञानाबरोबरच त्यांच्या समाजिक आणि व्यावहारिक उपयुक्ततेवर भर देणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यात आली. तथापि क्रांतीनंतरच्या लगतच्या काळात अमेरिकन शिक्षणपद्धतीच्या धर्तीवर आधारलेली आणि पाठ्यपुस्तके, गृहपाठ, परीक्षापद्धत, शिक्षक व त्याची छडी यांसारख्या गोष्टींना वाद करणारी मुक्त शिक्षणपद्धती काही काळ राबविण्यात आली. या पद्धतीतील दोष लवकरच लक्षात आले. आन्तोन माकारिएन्को या रशियन शिक्षणतज्ञाने या पद्धतीच्या मर्याता दाखवून दिल्या. व्यक्तीच्या जडणघडणीपेक्षा समूहाची जडणघडण ही अधिक फलदायी ठरेल, असे त्याचे मत होते. स्टालिनच्या कारकीर्दीत पुन्हा पाठ्यपुस्तके, परीक्षा, पाठांतर यांवर भर देणारी शिक्षणपद्धती सुरू झाली.
रशियात सर्व शिक्षण मोफत देण्यात येते. त्याचप्रमाणे सर्व सैक्षणिक संस्था, मुख्यतः शासन आणि काही प्रमाणात सहकारी आणि सार्वजनिक संस्था, यांच्या अखत्यारीत आहेत. १९८४ सालची शिक्षण व विज्ञान यांसाठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद ४७२ कोटी रूबल एवढी होती. देशातील शालेय शिक्षण एकूण ४६ भाषांतून देण्यात येते. रशियात शंभरांहून आधिक वेगवेगळे वांशिक आणि राष्ट्रीय समाज वा समूह आहेत. प्रत्येक नागरिकाला आपापल्या मातृभाषेतून शालेय शिक्षण घेता येते.
अगदी पूर्वप्राथमिक स्तरापासून विद्यापीठीय स्तरापर्यंत अशा सर्व अभ्यासक्रमांतून लेनिन व मातृभूमी यांबद्दलचा आदरभाव व कम्युनिस्ट वितारप्रणालीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर विंबविण्यात येते. या दृष्टीने यंक पायोनिअर्स (१० ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत) आणि कॉम्सोमोल-यंग कम्युनिस्ट लीग – (१४ वर्षांपुढील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत) या कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना विशेष लक्ष घालतात. त्यांची सदस्यसंख्या अनुक्रमे २.५ कोटी व ४.१८ कोटी होती (१९८६).
आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रांतील विशेषज्ञ विद्यार्थी तयार करण्यावर रशियातील विद्यापीठीय व तत्सम उच्च शिक्षणाचा भर आहे.यासाठी नियोजन आयोग आणि शिक्षण मंत्रालय परस्परांच्या विचार विनिमयाने विविध क्षेत्रांतील विशेषज्ञांच्या गरजांचा आधी मागोवा घेतात आणि या गरजांनुसार त्या त्या विषयातील उञ्च शिक्षणक्रमासाठी आवश्यक तेवढ्या विद्यार्थांना प्रवेश दिला जातो.
शैक्षणिक पुनर्रचनेचा १९८४ साली एक दशवार्षिक कार्यक्रम (१९८६-९५) निश्चित करण्यात आला. रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करणे, शिक्षकांचा दर्जा व कामाच्या सुविधा यांत सुधारणा करणे, प्रयोग आणि कार्यानुभव यांवर भर देणे आणि देशाच्या अधिकृत विचारप्रणालीवरील विद्यार्थांची निष्ठा दृढ करणे इ. गोष्टींवर या कार्यक्रमात भर दिला आहे. शालेय शिक्षणक्रमही १० ऐवजी ११ वर्षांचा करण्यात आला व त्याचा आरंभ विद्यार्थांच्या वयाच्या सातव्या वर्षाऐवजी सहाव्या वर्षापासून करण्यात आला. सर्वसामान्य शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शाळांचे हळूहळू एकीकरण होईल, अशी ही नवी शैक्षणिक योजना आहे.
ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत पडणारा फरक कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या दृष्टीने सायबीरियातील नोव्होसिबिर्स्क येथे दरवर्षी विज्ञान व गणित विषयांचे एक सत्र भरविण्यात येते. माध्यमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांची या शिबिरात चाचणीपूर्वक निवड करण्यात येऊन त्यांच्या पुढील शिक्षणाची खास व्यवस्था केली जाते. देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वाच्या लोकांमधील शिक्षणाचे प्रमाण एकसारखे नाही. त्याही दृष्टीने प्रयत्न करण्यात येतात.
देशात १ लक्ष २७ हजार १०० शिशुशाळा व बालक मंदिरे असून त्यांतून सु. १ कोटी ५५ लक्ष मुले शिक्षण घेत होती. प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या १ लक्ष ४० हजार होती (१९८५-८६). देशात तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या प्राथमिक शाळा आणि आठ व दहा वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या माध्यमिक शाळा आहेत. सर्वसामान्य विषय, खास विषय व तंत्रविद्या शिकविणाऱ्या अशा तीन प्रकारच्या शाळा आहेत. आठ वर्षांचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील विद्यार्थांना धंदेशिक्षणाच्या शाळेत प्रवेश मिळू शकतो. साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारच्या १,३०० धंद्यांचे शिक्षण उपलब्ध आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थास त्या त्या धंद्यात रोजगार दिला जातो. खास विषयांच्या माध्यमिक शाळांतून सामान्य शिक्षणाबरोबरच विशिष्ट व्यवसायाचे शिक्षण दिले जाते. परदेशी भाषांचे शिक्षण देणाऱ्याही खास शाळा आहेत. त्यांतही सात वर्षे वयाच्या विद्यार्थाला प्रवेश मिळतो. संगीत व तत्सम कला यांत गती असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही खास शाळा आहेत. १९८५-८६ मध्ये शालेय विद्यार्थ्याची व शिक्षकांची संख्या अनुक्रमे ४ कोटी ४५ लक्ष आणि २९ लक्ष होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना गुणवत्तेनुसार १ ते ५ क्रमांकांपर्यंत श्रेण्या दिल्या जातात. माध्यमिक शाळेत तीस तासांचा आठवडा असतो.
श्रमिकांच्या राखीव शाळा १९४० सालानंतर सुरु करण्यात आल्या होत्या. १४ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांत प्रवेश असे. १९५९ नंतर या शाळांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यांतून धंदेशिक्षणाची व तंत्रविद्यांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली. सर्व सामान्य धंदेशिक्षणाच्या शाळांची संख्या सु. ४,३०० होती (१९८१).
विद्यापीठे आणि त्यांसारख्या उञ्च शिक्षण देणाऱ्या सु. ८९४ संस्था व सु. ५१ लक्ष विद्यार्थी देशात होते (१९८५-८६). त्यांतून उञ्च व्यावसायिक शिक्षण दिले जाते. अभियांत्रिकी व वैद्यक या विषयांचे अभ्यासक्रम अनुक्रमे ५ व ६ वर्षांचे असतात. विधी, कृषी यांसारख्या विषयांतील पदविका अभ्यासक्रम ४ वर्षांचे असतात. सामान्यपणे विशिष्ट विषयांतील तज्ञ तयार करणे हे उच्च शिक्षणाचे कार्य असते. विद्यापीठीय शिक्षणासाठी प्रवेशपरीक्षा असते, तसेच मुलाखतही घेतली जाते. कॉमसोमोल या संघटनेचे शिफारसपत्रही आवश्यक असते. विद्यापीठीय विद्यार्थ्याला शासनाकडून विद्यावेतन व इतर सुविधा प्राप्त होतात. देशातील एकूण विद्यापीठांची संख्या ६९ असून (१९८६) मॉस्को, गॉर्की, लेनिनग्राड, कीव्ह येथील विद्यापीठे विशेष महत्त्वाची आहेत.
सामूहिक जीवन : १९७७ च्या संविधानातील अनुच्छेद क्रमांक १९ ते २७ यांत देशातील सामाजिक विकास व संस्कृती यांसंबंधीच्या तरतुदींचा अतंर्भाव आहे. त्यांनुसार कामगार, शेतकरी व बुद्धिजीवी यांच्यातील अभंग एकात्मता हेच देशातील समाजरचनेचे अधिष्ठान मानलेले आहे. या दृष्टीने समाजातील एकजिनसीपणा वाढविण्यासाठी समाजातील वर्गभेद, ग्रामीण व शहरी तसेच वौद्धिक आणि शारीरिक श्रम यांतील भेद दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे समाजाच्या सांस्क़ृतिक वारसाचे जतन करून सर्वांची सांस्कृतिक पातळी उंचावण्याचे शासनाचे ध्येय नमूद केले आहे. संविधानाच्या सातव्या विभागातील ३९-६९ या अनुच्छेदांतून रशियन नागरिकांचे मूलभूत हक्क, स्वातंत्र्ये व कर्तव्ये यांविषयी तरतुदी केलेल्या आहेत. त्यांत कामाचा हक्क, विश्रांतीचा हक्क, वृद्धांचा, रुग्णांचा आणि अपंगांचा उदरनिर्वाहाचा हक्क त्याचप्रमाणे इतरही प्रकारचे नागरी हक्क नमूद केलेले आहेत. त्यांत धार्मिक स्वातंत्र्याचाही अंतर्भाव आहे. एकोणसाठाव्या अनुच्छेदानुसार नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्ये ही त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांचा अविभाज्य भाग आहे, असे म्हटले आहे. लष्करातील सेवा हे एक गौरवास्पद कर्तव्य आहे, असे त्रेसष्टाव्या अनुच्छेदात म्हटले आहे.
सामूहिक जीवनमूल्यांचे संवर्धन करण्यावर रशियात विशेष भर देण्यात येतो. हे काम अनेक पातळ्यांवर केले जाते. कम्युनिस्ट पक्षसदस्यत्व, युवक संघटना, कामगार संघटना, कारखाने, गिरण्या व शैक्षणिक संस्थांशी संलग्न असलेले खेळ-मनोरंजनाचे विभाग किंवा मंडळे यांसारख्या विविध संघटनांतून रशियन व्यक्ती स्वेच्छेने भाग घेत असते. या सर्वच प्रकारच्या संघटनांतून देशभक्ती, पक्षनिष्ठा, सामूहिक जीवनमूल्ये इत्यादींचे महत्त्व पटविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
रशियांतील कॉम्सोमोल ही युवक संघटना प्रामुख्याने विद्यार्थिवर्गाची आहे. देशातील विविध प्रकल्पांत काम करण्यासाठी ही संघटना स्वयंसेवक पुरविते. याखेरीज यंग पायोनिअर्स, कमिटी ऑफ सोव्हिएट वुमेन (स्त्रीहक्क संरक्षक संस्था), कमिटी फॉर सोव्हिएट यूथ ऑर्गनायझेशन (व्यापारी व व्यावसायिक युवक संघटनांची संलग्नक संस्था) व सोव्हिएट वॉर व्हेटेरन्स कमिटी यांसारख्या संस्थांतूनही रशियन नागरिकांच्या सामूहिक जीवनाची जडणघडण होत असते.
विज्ञान-तंत्रविद्या यांमधील विकास : विज्ञानक्षेत्रात कार्य करणारी देशातील सर्वोच्छ संस्था म्हणचे ‘ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस’ ही होय. विज्ञान आणि तंत्रविद्याविषयक शासकीय समिती आणि गॉसप्लॅन म्हणजे नियोजन आयोग यांच्या सहकार्याने ही विज्ञान अकादमी संशोधन आणि विकासाच्या योजना तयार करते. वरील शासकीय समिती १९६५ पासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे. संशोधन संस्था, संग्रहालये, वेधशाळा, ग्रंथालये अशा विविध स्वरूपाच्या दोनशेंहून अधिक संस्था विज्ञान अकादमीच्या कक्षेत मोडतात. यांपैकी बहूसंख्य संस्था मॉस्को व लेनिनग्राड येथे आहेत. विज्ञान अकादमींचे स्वतंत्र अध्यक्षीय मंडळ (प्रिसिडीयम) असून त्याचे चार विभाग आहेत. अकादमीच्या १६ शाखांना या ४ विभागांतर्फे मार्गदर्शन करण्यात येते. वर्षातून दोन वेळा अकादमीच्या वैठका भरतात व त्यांत देशातील प्रमुख शास्त्रज्ञ आपापले अहवाल सादर करतात.
रशियातील १५ प्रजासत्ताकांतही स्वतंत्र विज्ञान अकादमी आहेत. वैज्ञानिक, तांत्रिक व औद्योगिक स्वरूपाच्या प्रादेशिक गरजांनुसार या प्रांतिक अकादमींतून संशोधन कार्य केले जाते. त्याचप्रमाणे केंद्रीय विज्ञान अकादमीशी संलग्न संस्थाही आहेत.
रशियातील काही महत्त्वाच्या विज्ञानसंस्था पुढीलप्रमाणे आहेत : कृषिविषयक संशोधन करणारी ऑल युनियन व्ही. आय. लेनिन अकॅडेमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस (मॉस्को), अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस (मॉस्को), जॉइंट इन्स्टिच्यूट फॉर न्यूक्लिअर रिसर्च (डूब्नॉ), इन्स्टिट्यूट ऑफ हाय एनर्जी फिजिक्स (सेर्पूकॉफ), इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स (नोव्होसिबिर्स्क) इत्यादी.
अवकाशविज्ञानच्या क्षेत्रात रशिया जगाच्या अग्रभागी आहे. रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह (स्पुटनिक-१ )हा ४ ऑक्टोबर १९५७ रोजी अवकाशात सोडला. त्याचप्रमाणे १२ एप्रिल १९६१ रोजी व्होस्टोक-१ या अवकाशयानातून अवकाशात प्रथम प्रवास करण्याचा विक्रम रशियाच्या यूरी गागारीनने केला. ल्यूना या अवकाशयानाच्या मालिकेतून (२ जानेवारी १९५९ पासून) चंद्राच्या पृष्ठभूमीचे नमुने मिळविण्यात रशियाने यश मिळविले. व्हीनस-१५ या अवकाशायानामार्फत शुक्र ग्रहावरील पृष्ठभागाची छायाचित्रे मिळविण्यात आली (ऑक्टोबर १९८३). ‘कॉसमॉस’ या मालिकेतून १९८४ पर्यंत सोळाशेहून अधिक कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. इंटर-कॉसमॉस मालिकेत रशियाबरोबर आणखी नऊ देशांचा समावेश होता. या मालिकेचा प्रारंभ १९६९ साली झाला. व्होस्टोक, व्होकशोड आणि सोयूझ या मालिकांतून मानवासहित अवकाशयाने पृथ्वीभोवतालच्या कक्षांत पाठविण्यात आली.
सॅल्यूत-७ हे रशियाचे अवकाशस्थानक १९८२ पासून पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. या स्थानकाला पृथ्वीवरून पाठविलेले अवकाशयान जोडून प्रत्येक वेळी तीन अंतराळवीर पाठविण्यात आले. त्यांत एप्रिल १९८४ मध्ये रशियन अंतराळवीरांबरोबर राकेश शर्मा या भारतीय अंतराळवीराचाही समावेश होता. सॅल्यूत-७ वर २३७ दिवस राहण्याचा विक्रम करून तीन रशियन अंतराळवीर ऑक्टोबर १९८४ मध्ये परत पृथ्वीवर आले. अवकाशात कायम मानवी वास्तव्य करण्याच्या दृष्टीने रशियाने ‘मीर’ (शांतता) हे अवकाशस्थानक १९८६ मध्ये प्रक्षेपित केले असून या स्थानकामध्ये अधिक संशोधन चालू आहे.
लष्करी हेतूने अवकाशयानाचा उपयोग करण्यावर बंदी घालण्याचा करार १९६७ मध्ये रशिया, अमेरिका व ग्रेट ब्रिटन या देशांत झाला. चंद्रावरील नमुने एकमेकांना देण्याचा, त्याचप्रमाणे सोयूझ व अपोलो ही अवकाशयाने जोडण्याचा करार झाला व जुलै १९७५ मध्ये हा प्रयोग यशस्वीपणे पार पाडण्यात आला. अवकाशविज्ञानातील संशोधन कार्यांत सहकार्य करण्यासंबंधीच्या रशियाबरोबर झालेल्या करारांच्या नूतनीकरणास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी नकार दिला (१९८२).
अणुऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही रशिया जगात अग्रेसर आहे. १९५४ साली ऑबनिन्स्क येथे ५,००० किवॉ. ता. क्षमतेचे अणुऊर्जा केंद्र सुरु करण्यात आले. ते जगातील पहिले केंद्र होय. १९६९ आणि १९७३ साली उल्यानफ्स्क व शिफ्केन्क येथे अणुऊर्जा विक्रियक केंद्रे सुरु करण्यात आली. १९८३ अखेल रशियात चौदा अणुशक्तिनिर्मिती केंद्रे कार्यान्वित होती व त्यांची एकूण क्षमता १ कोटी ८० लक्ष किवॉ. ता. होती. आणखी अशा १५ केंद्रांची उभारणी सुरु होती. देशातील ७.५% विद्युत् पुरवठा या अणुऊर्जा केंद्रांमार्फत करण्यात येतो. १९९० अखेर देशातील एकूण अणुऊर्जानिर्मितिक्षमता १० कोटी किवॉ. ता. पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. १९८३ साली व्होल्गोडोन्स्क येथील अणुविक्रियक केंद्रात झालेल्या अपघातानंतर रशियन सरकारतर्फे एक सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. काही नागरी अणुऊर्जा केंद्रे तपासण्याची मुभा इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या प्रतिनिधींना देण्याची तयारी या देशाने दाखविली आहे (१९८४). स्टेट कमिटी फॉर द युटिलायझेशन ऑफ ॲटॉमिक एनर्जी देशातील अणुऊर्जा निर्मिती व विकास कार्यावर नियंत्रण ठेवते. अणुऊर्जा केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणारीही एक सरकारी समिती आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथून १४० किमी. उत्तरेकडे असलेल्या चेर्नोबिल अणुऊर्जा निर्मिती केंद्रात २६ एप्रिल १९८६ रोजी स्फोट होऊन तेथील चौथ्या विक्रियकाचे फार मोठे नुकसान झाले आणि दोन तंत्रज्ञ मरण पावले. स्फोटामुळे लागलाली आग विझविण्यासाठी दोन आठवडे लागले. या स्फोटामुळे झालेल्या किरणोत्सर्गाचा विपरीत परिणाम यूरोपातील नजीकच्या देशांतील लोकांवरही होईल व हा धोका दीर्घकाळ टिकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
रशियात उपयोजित संशोधनावर भर दिला जातो. तथापि काही शुद्ध विज्ञानांच्या क्षेत्रात हा देश अग्रेसर आहे. कृत्रिम अवयवारोपणाच्या संसोधनात रशियाने प्रगती केली आहे. गणितात मॉस्को हे जगातील एक अग्रेसर केंद्र मानले जाते. त्याचप्रमाणे आयनद्रायू भौतिकी, सैद्धान्तिक अवकाश भौतिकी इ. क्षेत्रांत रशियन शास्त्रज्ञ अग्रगण्य मानले जातात. यांखेरीज उष्णता आणि द्रव्यमान संक्रमण, अर्धसंवाहकता, औष्णिक विद्युत्, भूमौतिकी, लेसर या क्षेत्रांतही देशातील संशोधनकार्य प्रगत आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र या क्षेत्रांत १९६० नंतरच विशेष प्रगती दिसून येते. स्टालिन व ख्रुश्र्चॉव्ह यांच्या कारकीर्दीत टी. डी. लायसेंको या शास्त्रज्ञाचा राजकीय प्रभाव मोठा होता. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांची वरीचशी कुचंबणाही झाली. अनुवांशिकी, कृषिविज्ञान इ. विज्ञानक्षेत्रांतील प्रगतीला त्यामुळे बरीचशी खीळ बसली.
देशातील प्रत्येक वैज्ञानिक संस्थेवर कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी नेमलेले असून ते त्या संस्थेचे धोरण, संशोधनविषय, व्यवस्थापन इ. बाबतींत पक्षधोरणाचा पाठपुरावा करतात. १९६६ पासून देशातील शास्त्रज्ञांच्या संदर्भात पक्षनिष्ठेच्या मागणीला जोर चढला आणि १९७१ पासून अकाडमीच्या संस्थांच्या प्रशासकीय नियंत्रणाचा अधिकार पक्षसमित्यांनी मिळविला. आंद्रेई साखॅरोव्ह, झेड, ए. मेडव्हेडेव्ह, व्ही. एन्. शलिद्झे यांसारख्या नामवंत रशियन शास्त्रज्ञांनी मानवी हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली.
संगणक आणि इतर उञ्च दर्जाचे तांत्रिक उद्योग या क्षेत्रांत मात्र रशियाची प्रगती अमेरिका, जपान इत्यादींच्या तुलनेने फारशी झालेली नाही. तथापि १९८३ साली रशियन शासनातर्फे तांत्रिक संशोधन आणि विकास यांसंबंधी एक नवीन कार्यक्रम हाती घेण्यात आला. या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना, तंत्रज्ञांना प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर करण्यात आले. १९८५ अखेर देशात ५,३०० विज्ञानसंस्था, १४.६० लक्ष शास्त्रज्ञ आणि संशोधक होते. १९७६-८० या पंचवार्षिक योजनेत विज्ञानावरील अर्थसंकल्पीय खर्च ९७.९ महापद्म रुबल होता.
रशियातील पुढील काही नामवंत शास्त्रज्ञ उल्लेखनीय आहेत : अयुक्लिडीय भूमितीचा प्रवर्तक निकोलाय इव्हानोव्हिच लोबाचेव्हस्की (१७९२-१८५६) शरीरक्रिया वैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार विजेता (१९०४) ⇨इव्हान प्यिट्रॉव्हिच पाव्हलॉव्ह (१८४९-१९३६), नोबेल पुरस्कार विजेता जीववैज्ञानिक म्येचून्यिकॉव्ह (१८४५-१९१६), भौतिकी सरायनशास्त्रज्ञ न्यिकली न्यिकलाएव्ह्यिच स्यिमॉनॉव्ह (नोबेल पुरस्कार, १९५६), भौतिकीविज्ञ पाव्ह्येल आल्यिक्स्येयेव्ह्यिच चेरेनकॉव्ह (नोबेल पुरस्काराचा सहविजेता, १९५८), भौतिकीशास्त्रज्ञ इल्या मिखायलव्ह्यिच फ्रांक (नोबेल पुरस्कार सहविजेता), भौतिकीविज्ञ ल्येअव्ह डव्ह्यीडव्ह्यिच लँडा (१९०८-६८), गणिती व भौतिकीविज्ञ न्यिकली निकलाएव्ह्यिच बगल्यूबॉफ, अल्यिक्सांदर म्यिखायलव्ह्यिच प्रॉचोरॉव्ह व एन. जी. बासव्ह हे दोन शास्त्रज्ञ १९६४ च्या भौतिकीय नोबेल पुरस्काराचे सहविजेते, आंद्रेई साखॅरोव्ह हा नोबेल शांततापुरस्कार विजेता (१९७५) इत्यादी.
भाषा-साहित्य : रशियन ही देशाची अधिकृत भाषा असून १९७९ च्या जनगणनेनुसार देशातील सु. ५८.०५% लोकांची ती मातृभाषा आहे. प्रांतिक व स्थानिक प्रशासनात त्या त्या प्रादेशिक भाषांचा वापर करण्यास मुभा आहे. देशातील रशियनेतर समाजांतील सु. ६ कोटी १३ लक्ष लोकांना दुय्यम भाषा म्हणून रशियन भाषा अवगत आहे. १९७९ च्या जनगणनेनुसार अल्पसंख्याकांतील १ कोटी ६३ लक्ष लोकांनी मातृभाषा म्हणून रशियन भाषेचा निर्देश केला आहे. यांत ज्यू, पोल, फिन, वश्कीर, कारेलियन, जर्मन, मॉर्डोव्हियन, बेलोरशियन, युक्रेनियन इत्यादींचा समावेश होतो. इंडो-यूरोपियन भाषासमूहातील रशियन भाषेप्रमाणे बाल्टिक (लिथ्युएनियन व लॅटव्हियन लोकांची भाषा), इराणी (ताझिक, कुर्दिश इत्यादींची भाषा), रोमान्स (मॉल्डेव्हियनांची रूमानियन भाषा), इंडिक (जिप्सी लोकांची रोमानी भाषा), जर्मॅनिक, आर्मेनियन इ. भाषासमूहांतील भाषाही देशात वापरल्या जातात. बहुसंख्य ज्यू त्या त्या स्थानिक भाषा वापरत असले, तरी काही मात्र यिद्दिश भाषा वापरतात. फिनो-उग्रिक भाषासमूहापैकी रशियात एस्टोनियन, फिनिश, कारेलियन इ. भाषा वापरात आहेत. तुर्की भाषासमूहातील भाषा किरगीझ, कझाक, तातार, उझबेक, तुर्कमेनियन, आझर इ. लोक वापरतात. मंगोल, तुंगूझ व कॉकेशियन भाषासमूहांतील काही भाषाही देशात रूढ आहेत. सायबीरियात चुकची, कोर्याक यांसारख्या व इतरही काही भाषा रूढ असून पॅलिओ-एशियाटिक भाषासमूहात त्यांचा अंतर्भाव होतो. रशियन साहित्यावर विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंद घेण्यात आली आहे.
वृत्तपत्रे : रशियातील मुख्य वृत्तसंस्था म्हणजे टास (टेलिग्राफ एजन्सी ऑफ द सोव्हिएट युनियन) ही होय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत ती मोडते. देशातील आणि देशाबाहेरील बातम्यांचे संपादन व वितरण या वृत्तसंस्थेमार्फत करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांखेरीज प्रांतिक आणि त्याखालील अगदी जिल्हा पातळीपर्यंत वृत्तपत्रे देशात प्रकाशित होतात. प्रावदा हे कम्युनिस्ट पक्षांचे, तर इझव्हस्तिया हे रशियन शासनाचे मुखपत्र आहे. प्रावदा देशातील ४४ शहरांत छापण्यात येते. त्याचा खप १ कोटी ७ लाख आहे. इझव्हेस्तियाचा खप ७० लाख आहे (१९८५). कॉम्सोमोल या युवक संघटनेचे कॉमसोमोल-स्काय प्रावदा हे मुखपत्र असून (खप १ कोटी) ट्रेड हे कामगार संघटनांचे मुखपत्र आहे (खप १ कोटी ३५ लक्ष). व्यावसायिक पत्रकारांची देशात संघटना असून ती कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याची सोय वृत्तपत्रविद्येच्या स्वतंत्र संस्थांतून त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाच्या खास प्रशिक्षण केंद्रातून उपलब्ध आहे. संपादकीय पदांवरील नेमणुकी सामान्यतः कम्युनिस्ट पक्ष संघटनेतर्फे करण्यात येतात. रशियन वृत्तपत्रांचा एक विशेष म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार. यात मुख्यतः पक्षसदस्य किंवा सेवानिवृत्त व्यक्ती अधिक भाग घेतात. वाचकांच्या पत्रव्यवहारात पक्षाचे व शासनाचे धोरण आणि पक्षातील व शासनातील व्यक्ती यांच्यावरील टीका सामान्यतः प्रसिद्ध केली जात नाही. काही अभ्यासकांच्या मते रशियन वृत्तपत्र-वाचकांना आंतरराष्ट्रीय वृत्त अधिक प्रिय असते. म्हणूनच इतर संपर्कमाध्यमांपेक्षा वृत्तपत्रांतून परदेशी वातम्यांना अधिक प्रसिद्धी दिली जाते.
रशियातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके ही कम्युनिष्ट पक्ष, केंद्रीय व प्रांतिक शासने, कामगारसंघटना, कारखाने, सामुदायिक कृषिकेंद्रे, उञ्च शैक्षणिक व सांकृतिक संस्था यांच्यामार्फत प्रसिद्ध केली जातात. देशात सर्व प्रकारांच्या प्रकाशनांसाठी औपचारिक अभ्यवेक्षणाची पद्धत असून हे काम चीफ ॲडमिनिस्टेशन फॉर अफेअर्स ऑफ लिटरेचर अँड पब्लिशिंग हाउसेस या संस्थेकडे आहे (स्थापना १९२२). नऊपेक्षा अधिक प्रती असलेल्या कोणत्याही प्रकाशनासाठी या संस्थेची मान्यता घ्यावी लागते. वृत्तपत्रांचा व नियतकालिकांचा संपादकवर्ग हा पक्षमान्यतेने नेमला जात असल्याने वृत्तपत्रीय अभ्यवेक्षणाची गरज क्वचितच निर्माण होते.
देशात ५५ देशी आणि १० परदेशी अशा एकूण ६५ भाषांतून सु. ८,१०० वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असून त्यांपैकी दैनिकांची संख्या ६४० होती (१९८५). त्यांव्यतिरिक्त ४८ देशी आणि परदेशी भाषांतील सु. ५,२०० नियतकालिके आणि ज्ञानपत्रिका (जर्नल्स) प्रसिद्ध होत होती (१९८५). क्रॉकोडाइल हे विनोदी उपरोधप्रचुर मासिक, नॉव्ही मीर हे वाङ्मयीन मासिक उल्लेखनीय आहेत. शेती, कला आणि संस्कृती, शिक्षण, आंतरराष्ट्रीय घटना, भाषा आणि साहित्य, क्रीडा आणि मनोरंजन, स्त्रिया आणि युवकवर्ग इ. विषयांना वाहिलेली स्वतंत्र नियतकालिकेही देशात प्रसिद्ध होतात.
कला-क्रीडा : विद्यमान रशियाची कलासृष्टी तेथील बहुराष्ट्रीय समाजांच्या वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण कला-परंपरांनी घडविलेली आहे. तथापि ऐतिहासिक दृष्टिने पाहता, जिला खास रशियन म्हणता येईल, अशा पृथगात्म कलानिर्मितीस रशियन स्लाव्ह लोकांनी सुरुवात केली. इ. स. दहाव्या शतकात वायझंटिन साम्राज्याच्या प्रभावामुळे या लोकांनी खिस्ती धर्म स्वीकारला. धर्मांतराचा नवा उत्साह आणि बायझंटिन राजेशाहीचा आदर्श या गोष्टी आद्य रशियन कलानिर्मितीस मोठ्या प्रेरक ठरल्या. साधरणपणे बायझंटिन कलापरंपरेच्या प्रभावाचा मध्ययुगीन कालखंड (सु. दहावे ते तेरावे शतक), त्यापुढील मॉस्कोच्या प्रभावाचा कालखंड (सु. चौदावे ते सतरावे शतक), त्यानंतरचा यूरोपीय प्रभावाचा कालखंड (अठरावे ते एकोणिसावे शतक) व क्रांत्युत्तर (१९१७) आधुनिक कालखंड, असे रशियन कलेतिहासाचे कालखंड पडतात.
खिस्ती धर्मांतरापूर्वीच्या म्हणजे इ. स. दहाव्या शतकापूर्वी स्थानिक कलात्मक परंपरेचे अवशेष मुख्यतः काही जडजवाहीर, सूर्यादी देवदेवतांच्या प्रतिमांचे ताईत, काही मूर्ती या स्वरूपात आढळतात. खिस्तेतर म्हणजे पेगन अशी प्रतिमाने-उदा., जीवनवृक्ष, पशुपक्ष्यांच्या प्रतिमा-नंतरही टिकून राहिल्याचे दिसून येते. धर्मांतराच्या नव्या उत्साहमुळे मध्ययुगीन काळात चर्चवास्तूंच्या उभारणीवर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे रशियन राजघराण्यांनी बायझंटिन राजेशाहीचे अनुकरण करण्यासाठी मोठमोठे राजवाडे (क्रेमलिन) बांधण्यावर भर दिला. कीव्ह, नॉव्हगोरॉड व प्यिस्कॉफ्क ही मध्ययुगीन कलानिर्मितीची केंद्रे होती. रशियात बांधकामाच्या दगडांची वानवा असल्याने वास्तुरचनेत लाकडाचा जास्त उपयोग करण्यात येई. दगडांचा वापर हासुद्धा बायझंटिन अनुकरणातूनच आला व त्यासाठी बायझंटिन कारागीर बोलवण्यात आले. बायझंटिन शैलीत वांधलेल्या कीव्ह येथील सेंट सोफिया कॅथीड्रलमध्ये (१०१८-३७) दगडाचाही वापर केल्याचे दिसते. हळूहळू अत्यंत उतरत्या छपरांची, उंच भिंतींची, बहुघुमटी व बहुदालनी अशी खास रशियन चर्चवास्तुशैली विकसित झाली. नॉव्हगोरॉड येथे बाराव्या शतकाच्या मध्यास बांधलेल्या सेंट सोफिया कॅथीड्रलमध्ये भव्य घुमट दिसून येतो. बाराव्या शतकात व्ह्लॅदिमिर-सूझडल प्रदेश महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र ठरला. तेथील राजवाडे व चर्चवास्तू यांच्या उभारणीत पश्चिमी रोमनेस्क आणि वायझंटिन शैलीविशेषांचे संमिश्र दर्शन घडते. व्ह्लॅदिमिर-सूझडल वास्तुशैली म्हणून तिचा उल्लेख करण्यात येतो.
चर्चवास्तूंच्या सजावटीसाठी भित्तिलेपचित्रे व आयकॉन म्हणजे खिस्ती संतमहंतांच्या चित्रचौकटी यांचीही निर्मिती होऊ लागली. प्रारंभीचे धार्मिक चित्रकार हे प्राधान्याने ग्रीक परंपरेत तयार झालेले रशियन मठाधिकारीच होते. बायझंटिन नमुन्यावर त्यांनी आयकॉन चित्रे निर्माण केली. बायझंटिन व्यक्तिचित्रे अत्यंत नियमबद्ध होती. ख्रिस्ती धर्मपरंपरेतील प्रसंग, साधुसंत आणि धर्मकल्पना यांचे चित्रण त्यांतून करण्यात येई. या चित्रणपरंपरेत रशियन कलावंतांनी अनेक नव्या साधुसंताची भर टाकली. व्ह्लॅदिमिर, ऑल्गा, बोरिस, ग्ल्येप, आलेक्सांद्र नेव्हस्की इ, संतांची चित्रेही पुनःपुन्हा चित्रकारांनी हाताळलेली आहेत. तेराव्या शतकाच्या मध्यापासून चौदाव्या शतकापर्यंत तार्तारांच्या आक्रमणामुळे कीव्ह येथील कलानिर्मिती मागे पडली. या काळात नॉव्हगोरॉड आणि प्यिस्कॉफ्क या आक्रमणमुक्त शहरांतून मात्र रशियन कलासंस्कृतिचे संवर्धन करण्यात आले. पुढे १४५३ मध्ये कॉन्स्टॅटिनोपलचा पाडाव झाला आणि ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चपासून रशियन चर्च हे स्वतंत्र झाले. तिसरे रोम म्हणून मॉस्कोच्या राजकीय केंद्राचा उदय झाला व ते रशियन कलानिर्मितीचे केंद्र बनले. रशियन धर्मसत्ता व राजसत्ता या दोहोंची अधिमान्यता या केंद्राला लाभली.
कंदर्पाकार बहुघुमट, चांदईकडील फुगीर त्रिकोणी शृंगरचना ही वैशिष्ट्ये असलेल्या नॉव्हगोरॉड येथील ट्रान्सफिगरेशन चर्चमध्ये ग्रीक कलावंत थीआफनीझ याने अत्यंत बोलकी भित्रिलेपचित्रे चित्रित केलेली आहेत (१३७८). मॉस्को येथील ट्रिनिटी चर्चमधील आंद्रेय रुव्लेव्ह या रशियन चित्रकाराच्या भित्तिलेपचित्रांत ग्रीकांश चित्रशैलीचे परिणत स्वरूप स्पष्टच दिसून येते. डायोनिशिअस हा त्या वेळचा एक श्रेष्ठ चित्रकार. आयकॉन चित्रांतील प्रतिमाने, धार्मिक चमत्कारदृश्ये इ. बाबतींत त्याने एक नवे चैतन्यशाली वळण रशियन आयकॉननिर्मितीला दिले.
सोळाव्या शतकात मॉस्कोच्या राज्यकर्त्यांनी कलेचा वापर आत्मगौरवार्थ केला. चौथ्या इव्हानच्या (इव्हान द टेरिबल) राजप्रसादातील भित्तिलेपचित्रांतून ‘परमेश्वराच्या हातात झारचे हृदय आहे’ अशा मथळ्याची चित्रमाला दिसून येते. सतराव्या शतकापर्यंत रशियन आयकॉन चित्रांचा कलात्मक विकास विविध अंगांनी होत राहिला. त्यांनतर मात्र त्यांत निर्जीव साचेबंदपणा आणि आंधळी सांकेतिकता आली.
पंधराव्या शतकात मॉस्को येथील क्रेमलिन राजवाडा बांधण्यासाठी इटालियन वास्तुविशारद बोलावण्यात आले. मॉस्को येथील डॉर्मिशन कॅथीड्रल (१४७५-७९) हे प्रबोधनकालीन वास्तुकलेचा नमुना आहे. सेंट मायकेल कॅथीड्रलमध्ये केलेल्या सजावटीत इटालियन प्रभाव दिसून येतो. तथापि चौथ्या इव्हानच्या कारकीर्दीत रूसोबायझंटिन मिश्रकलेला अधिक राजमान्यता लाभली. सेंट वाझेल कॅथीड्रलमध्ये (१५५५-६०) रशियन वास्तुविशारदांनी रुसोबायझंटिन वास्तुकलेचे एक भव्य आणि अनन्यसाधारण स्वरूप सिद्ध केले. त्याची उभारणी पोस्टनिक व बार्मा या वास्तुविशारदांनी केली. सतराव्या शतकाअखेरपर्यंत हे कॅथीड्रल आदर्श मानले जाई. सतराव्या शतकात लिथ्युएनिया व पोलंड यांचा प्रभाव रशियन कलेवर पडला. सर्वसामान्यांच्या जीवनदर्शनाकडे ती हळूहळू वळू लागली. पुढे पीटर द ग्रेटच्या कालखंडात रशियन कलापरंपरेला यूरोपीय वळण लागले. १७१२ मध्ये पीटरने आपली राजधानी मॉस्कोहून सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) येथे हलविली. यूरोपातून नामवंत वास्तुविशारद बोलावण्यात आले. त्यांपैकी काँत बॉर्थोलोम्यू फ्रान्सेस्को रास्ट्रेली हा वास्तुविशारद प्रसिद्ध आहे. सेंट पीटर्झबर्ग येथील हिवाळी राजवाडा (विंटर पॅलेस), स्मोलेनी कॅथीड्रल इ. वास्तूंचे अभिकल्प त्यानेच तयार केले. पीटरची बायको कॅथरिन हिने नवअभिजाततावादी वास्तुशैलीला प्रोत्साहन दिले. इटालियन, फ्रेंच आणि स्कॉटिश वास्तुविशारदांनी कॅथरिनच्या उत्तेजनामुळे नवअभिजातवादी शैलीतील नव्या वास्तू निर्माण केल्या. बॅझेनॉव्ह (१७३७-९९) आणि स्टारोव्ह (१७४४-१८०८) हे या काळातील प्रसिद्ध रशियन वास्तुविशारद होत. यांपैकी स्टारोव्हने सेंट पीटर्झबर्ग येथे टॉरिड राजवाडा बांधला.
अठराव्या शतकापासून यूरोपीय चित्रशैलीचा प्रभाव रशियात वाढू लागला. त्याचप्रमाणे एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणून शिल्पकलेस प्रारंभ झाला. काही यूरोपीय कलावंत सेंट पीटर्झबर्ग येथे आले, तर रशियन कलावंत यूरोपात जाऊन कलाशिक्षण घेऊ लागले. व्यक्तिचित्रे आणि ऐतिहासिक चित्रे हे प्रकार विशेष प्रभावी ठरले. पहिल्या अलेक्झांडरच्या कारकीर्दीत यूरोपीय वास्तुविशारद रशियात आले. त्यांपैकी मॉस्को येथील प्रसिद्ध बॉल्शॉय रंगमंदिराचा निर्माता टॉमस दी थोमान विशेष उल्लेकनीय आहे. ग्रीक वास्तुशैलीचे आणि मध्ययुगीन रशियन वास्तुकलेचे पुन्हा अनुकरण होऊ लागले.
एकोणिसाव्या शतकातच रशियन स्वच्छंदतावादी चित्रकला उदयास आली. कार्ल ब्रियुलॉव्ह (१७९९-१८५२), एफ्. ए. ब्रूनी (१८००-७५) व ए. ए. इव्हानॉव्ह (१८०६-५८) हे या वर्गातील उल्लेखनीय चित्रकार होत. त्यांनी चित्रकलेतील महाकाव्ये म्हणता येतील, अशी चित्रनिर्मिती केली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र वास्तववादाचा प्रभाव वाढला. व्हि. जी. पेरोव्ह (१८३३-८२) आणि आय्, वाय्, ऱ्येप्यिन हे वास्तववादी चित्रकलेचे प्रवर्तक होत. क्रांतीचा एक अग्रदूत म्हणून ऱ्येप्यिनचा गौरव केला जातो. म्यिखईल ब्रुबेल (१८५६-१९१०) हा एक प्रतिभावंत आणि आघाडीचा आधुनिक चित्रकार. कीव्ह येथील सेंट सिरिल चर्चमध्ये त्याची उत्कृष्ट सजावट आढळते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस यूरोपमधील आर्ट नूव्होप्रमाणे एक स्वतंत्र व आधुनिक कलासंघटना रशियात उदयास आली. अप्रतिरूप आणि आधुनिक रशियन कलानिर्मितीची पार्श्वभूमी या संघटनेने तयार केली. कझ्यीम्यीर मल्येव्ह्यिच, नायूम गाब, व्हस्यील्यूई कंड्यीन्स्कई, मार्क शगाल, अलेक्झांडर आर्किर्पेको, शाइम, सुतीन, व्ह्लॅदिमिर तात्ल्यिन इ. प्रयोगशील व प्रतिभावंत कलावंत पुढे आले.
क्रांत्युत्तर कलाखंडात कम्युनिस्ट पक्ष व शासन या दोहोंतर्फे समाजवादी वास्तववादाचा पुरस्कार करण्यात आला. व्यक्तिवादी कलेला रशियन क्रांतीच्या नेत्यांचा विरोध होता. क्रांतीचा नायक असलेला कामगार व अन्य श्रमजीवी लोक हे कलासाहित्यांचे विषय असावेत आणि समाजवादी क्रांतीला परिपोषक आणि भव्यदिव्य अशी कलानिर्मिती व्हावी, असा त्यांचा दृष्टिकोन होता.
म्हणूनच क्रांत्युत्तर कालखंडात सार्वजनिक इमारती, औद्योगिक प्रकल्प, कारखाने व गिरण्या, कामगारांची घरे, धरणे व बंधारे यांसारख्या सार्वजनिक वास्तुनिर्मितीवर भर होता. तीत भव्यता, उपयुक्तता, कार्यसुलभता व सजावट या घटकांना प्राधान्य होते. मॉस्कोतील प्रावदा बिल्डिंग या दृष्टीने उल्लेखनीय आहे. अभिजात-श्रमिक वास्तू असे या वास्तुकलेचे वर्णन केले जाते. मॉस्को विद्यापीठ, मॉस्को आणि लेनिनग्राड येथील भुयारी मार्ग व स्थानके, मॉस्कोतील मध्यवर्ती लेनिन क्रीडागार हे आधुनिक रशियन वास्तुकलेचे काही नमुने होत.
ग्रंथसजावट हा रशियन कलेचा एक उल्लेखनीय भाग आहे. मध्ययुगीन ग्रंथसजावटीत पशूंची चित्रे, वेलबुटी अथवा भौमितिक आकृतिबंध दिसून येतात. स्वॅत्तोम्लाव्ह कोडेक्स (१०७३), खित्रोव्होगॉस्पेल्स या प्राचीन ग्रंथांतील सुनिदर्शने उल्लेखनीय आहेत. पंघराव्या –सोळाव्या शतकांत धार्मिक ग्रंथांवरोबरच लौकिक विषयांवरील ग्रंथांचीही सजावट करण्यात येई. तीतून तत्कालीन जीवनाचे चित्रण दिसून येते. लाकडी ठशांचा उपयोग हा यूरोपच्या प्रभावातून निर्माण झाला.
रशियन धातुकामही प्रसिद्ध आहे. कीव्हचे कारागीर जडजवाहीर तसेच सोन्याचांदीचे जडावकाम केलेली धातुपात्रे तयार करीत. फुलांची, पशुपक्ष्यांची चित्रे असलेली व भौमितिक नक्षीची तबके उल्लेखनीय आहेत. व्ह्लॅदिमिर-सूझडल परिसरातील सोन्याचांदीचे जडावकाम विशेष प्रसिद्ध होते. चर्चमधील व राजप्रसादांतील दारांच्या चौकटीवरही जडावकाम करण्यात येई.
आधुनिक आरेख्यक (ग्राफिक) कलाक्षेत्रात मात्र रशिया आघाडीवर आहे. मुद्रणयोजन तसेच सचित्र प्रसिद्धफलक, भित्तिचित्रे, त्याचप्रमाणे सचित्र ग्रंथ व नियतकालिके, विशेषतः सचित्र बालसाहित्य, यांतील रशियन कलात्मकतेचा दर्जा विशेष मोठा आहे.
काव्यवाचनाचे कार्यक्रम रशियात विशेष लोकप्रिय आहेत. कॅफेमधून तसेच मोठ्या सार्वजनिक उद्यानांतून हे कार्यक्रम केले जातात. मॉस्को शहरातील माय्कोव्हस्कीच्या पुतळ्याजवळ प्रतिवर्षी होणाऱ्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला हजारो रसिक उपस्थित असतात.
रंगभूमी : ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन आदी यूरोपीय रंगभूमींच्या तुलनेने रशियन रंगभूमीचा उदय आणि विकास काहीशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडतच झाल्याचे दिसते. साधारणपणे अकराव्या शतकापासून ‘स्कोमोरोखी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भटक्या लोककलावंतांनी रशियन रंगभूमीचा पाया घातला. दहाव्या शतकात रशियात खिस्ती धर्माचा प्रसार झाला. रशियातील चर्च संघटना आणि सतराव्या शतकात झालेल्या झारच्या राजेशाहीचा उदय यांचा रशियन रंगभूमीशी सतत संबंध येत राहिला. चर्च आणि राजेशाही या दोहोंनी आपापल्या उद्दिष्टांनुरूप रंगभूमीचा साधन म्हणून उपयोग करून घेतला. झारसत्तेच्या प्रदीर्घ काळात शाही घराणे आणि उमराववर्ग या दोहोंनीही रशियन भाषा-साहित्यांची उपेक्षाच केली. इटालियन, फ्रेंच, जर्मन कला आणि कलावंत यांचे अनुकरण करण्यावर या वरिष्ठ वर्गाचा भर होता. पीटर द ग्रेट, पहिली कॅथरिन इत्यादींनी उद्दिष्टांनुसार रशियन रंगभूमीला चालना देण्याचा प्रयत्न केला. कीव्ह, सेंट पीटर्झबर्ग, मॉस्को ही सामान्यतः रशियन रंगभूमीची केंद्रस्थाने होती. एकोणिसाव्या शतकात पुश्किन, गोगोल, चेकॉव्ह, गॉर्की यांसारखे श्रेष्ठ नाटककार, आयसेन्स्तीनसारखे दिग्दर्शक, श्केपकिनसारखा श्रेष्ठ अभिनेता इत्यादींनी रशियन रंगभूमीच्या आधुनिकीकरणास मोठा हातभार लावला. मॉस्को आर्ड थिएटर (१८८९) हे आधुनिक रशियन रंगभूमीचे प्रमुख केंद्र होय. रशियन राज्यक्रांतीनंतर (१९१७) रशियन रंगभूमीच्या विकासाला मोठीच चालना मिळाली. तथापि समाजवादी वास्तववादाचा दंडक, स्टालिनच्या कारकीर्दीतील जाचक निर्बंध यांमुळे १९३० नंतर रशियन रंगभूमीचा विकास होऊ शकला नाही. स्टालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) रशियातील इतर कलांप्रमाणेच रंगभूमीलाही विकासाचे खुले वातावरण उपलब्ध झाले.
बहुजिनसी राष्ट्रीय परंपरेमुळे रशियात प्रांतिक समाजांच्या स्वतंत्र रंगभूमीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत या प्रांतिक समाजांच्या रंगभूमींचा विकास होत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभापर्यंत देशात ८०० व्यावसायिक नाट्यसंस्था असून त्यांपैकी ४१० नाट्यसंस्था रशियनेतर भाषांतील प्रयोग सादर करीत. देशात १९८४ अखेर ६२६ रंगमंदिरे होती. [⟶ रंगभूमि (रशियन)].
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपमध्ये बॅलेला उतरती कळा लागली असता, रशियामध्ये बॅलेचे पुनरुज्जीवन घडून आले आणि त्यामुळे यूरोपातील कलेला नवे चैतन्य लाभले. सेंट पीटर्झबर्ग व मॉस्को येथे राजाश्रयाखाली बॅले विद्यालये दीर्घकाळ चालू होती. अनेक परदेशी नृत्यविशारदांच्या तेथील वास्तव्यामुळे बॅलेच्या विकासात भर पडत गेली. मार्यूस पेतिपा हा फ्रेंच नृत्यविशारद व त्याचा रशियन सहकारी ल्येअव्ह इव्हानॉव्ह (१८३४-१९०१) यांनी रशियात बॅलेची स्वतंत्र परंपराच विकसित केली. द स्लीपिंग ब्यूटी (१८९०), स्वॉन लेक (१८९३) हे अभिजात रशियन बॅले जगप्रसिद्ध आहेत. प्रख्यात रशियन संगीतकार चायकॉव्हस्की याने या बॅलेसाठी संगीतरचना केल्या होत्या. स्थिरग्येई द्यागिल्येफ (१८७२-१९२९) हा आधुनिक बॅलेचा प्रवर्तक मानला जातो. यांखेरीज प्रसिद्ध नर्तक व नृत्यालेखक ⇨मीशेल फॉकीन (१८८०-१९४२) आणि संगीतकार स्ट्रॉव्हिन्स्की (१८८२-१९७१) हेही अन्य महत्वाचे प्रयोगशील बॅले कलावंत होत. त्यांनी अभिजात बॅलेमध्ये काही अभिनव कल्पना रुजबिल्या, फॉकीनने प्रख्यात रशियन नर्तकी ⇨आन्न पाव्हलॉव्ह (१८८२ – १९३१) हिच्यासाठी द डाइंग स्वॉन हे सुविख्यात नृत्य रचले. द्यागिल्येफने बॅलेमधील नाट्यगुणांचा अधिक परिपोष केला. त्याने बॅले नृत्याला संगीत, चित्रमय रूपबंध व आत्माविष्कार ह्यांची जोड दिली. त्याने ‘बॅले रूस’ ही स्वतःची नृत्यसंस्था स्थापन केली व यूरोपभर दौरे काढले. नवअभिजात आणि वास्तव, आदर्श व राष्ट्रीय अशी लक्षणे अंतर्भूत करून द्यागिल्येफप्रभृतींनी खास रशियन बॅले निर्माण केला. पुरुष नर्तकास महत्त्व, नाट्यात्मकतेस विशेष प्राधान्य, कथानकाचा अधिक भरीवपणा इ. रशियन बॅलेची वैशिष्ट्ये होत. बॅले रूसचे पहिले पर्व पहिल्या महायुद्धापर्यंत टिकून होते. मीशेल फॉकीनचे नृत्यालेखन, वाक्स्ट व ब्यिनॉई यांचे नेपथ्य आणि वेशभूषा, तसेच आन्न पाव्हलॉव्ह, तमार कार्साव्ह्यिन व व्हल्सलाव्ह न्यिझीन्स्कई (१८९०-१९५०) यांची नृत्ये यांमुळे हा काळ गाजला. आन्न पाव्हलॉव्हनेही स्वतःची नृत्यसंस्था स्थापन करून देशोदेशी दौरे काढले व बॅले नृत्यास जगन्मान्यता मिळवून दिली. न्यिझीन्स्कईने बॅलेमध्ये पुरुष नर्तकांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. प्रसिद्ध नर्तक व नृत्यालेखक लेऑनीद मस्यीन (१८९६-१९७९), व्हत्सलाव्हची बहीण ब्रोनिस्लाव्हा (१८९१-१९७२) आदींनीही रशियन बॅलेच्या विकासात महत्त्वाची भर घातली. १९१७ च्या दरम्यान बॅले रूसचे नवीन पर्वसुरू झाले. ते साधारण १९२९ पर्यंत टिकून होते. अलीकडच्या काळातील रूडॉल्फ नुरेयेव्ह (१९३८- ) ह्या नर्तकानेही बॅलेमधील पुरुष भूमिकांचे महत्त्व अधिक वाढवून त्यांस अधिक अर्थपूर्ण, गतिमान व मर्दानी रूप दिल्याचे दिसून येते.
लेखक : जाधव, रा. ग.
संगीत : रशियात १७०० पूर्वीं फक्त लोकसंगीत आणि धर्मपर संगीत अस्तित्त्वात होते, असे म्हटल्यास हरकत नाही. सेंट व्ह्लॅदिमिर याने ९८७ मध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तेव्हापासून रशियातील धर्मपर संगीतपरंपरेचा प्रारंभ मानता येतो. धर्मपर संगीतामध्ये वाद्ये निषिद्ध मानली गेली असल्याकारणाने, कंठसंगीत व समूहगायन यांवरचन भर राहिला. रशियन समूहगायकांचे ढाले आवाज प्रसिद्ध आहेत.
यांखेरीज सरदार-दरकदाराखंडे वाद्यवृंद असत. एकेका वादकाने एकच शिंग, इतकेच नव्हे तर एकेक स्वर वाजवून सिद्ध होणारे वृंदही असत.
पीटर द ग्रेट (१६७२-१७२५) आणि कॅथरिन द ग्रेट (१७२९-९६) यांच्या काळात इटालियन ऑपेराचा रशियात पगडा होता. तत्कालीन रचनाकारांना इटालियन शैली अनुकरणीय वाटे. इटलीच्या सांगीतिक वर्चस्वाविरुद्ध आवाज उठविला गेला, तो नेपोलियनबरोबरच्या युद्धांनंतर. पुश्किनने वाङ्मयात राष्ट्रवादी सूर उमटविल्याचा हा एक परिणाम म्हणता येईल, कारण पुश्किनच्या साहित्यकृतींवर पुढील सु. पन्नास वर्षे ऑपेरांची उभारणी होत राहिली. ह्यापेक्षा अधिक सांगीतिक म्हणता येण्यासारखे पाऊल म्यिखईल ग्ल्यींका (१८०४-५७) या रचनाकाराने उचलले. रशियन लोकसंगीताचा आधार घेऊन त्याने कलासंगीत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ‘रशियन संगीताचा पिता’ असा किताब मिळालेल्या ग्लींकच्या अ लाइक फॉर द झार (१८३६) आणि रुस्लान अँड ल्यूदमिला (१८४२) ह्या ऑपेरा-रचना प्रसिद्ध आहेत. या संगीतिकांचा विषय व सांगीतिक आशय या दोहोंचा रशियन आधार सहज ध्यानात येण्यासारखा आहे. दरगमिश्स्कईंची (१८१३-६९) द स्टोन गेस्ट ही (१८७२ मध्ये मरणोत्तर प्रसिद्ध झालेली) रचनाही राष्ट्रवादी आहे, पण तीत नाट्यात्मता अधिक आढळते. यानंतरच्या कालखंडात मुख्यतः दोन प्रवाह चालू राहिले : एक राष्ट्रवादी व दुसरा पाश्चिमात्य संगीतप्रेरित. राष्ट्रवादी संगीतपरंपरेस आकार देणारे पाच संगीतकार प्रख्यात आहेत, ते पुढीलप्रमाणे : बलाक्यिर्येव्ह (१८३७-१९१०), क्यूई (१८३४-१९१८), बरद्यीन (१८३३-८७), मुसॉर्गस्कई (१८३९-८१) आणि ऱ्यीम्स्कइकरसकॉव्ह (१८४४-१९०८) ह्या सर्वांनी रशियन लोकसंगीताचा वापर केला. हे पाचही रचनाकार सुखवस्तू वर्गातील असून, संगीत हा त्यांचा षौक होता.
रशियातील सरकारी संगीतशाळा ही महत्त्वाची संगीतपीठे होत. सेंट पीटर्झबर्ग आणि मॉस्को येथील संगीतशाळांत तंत्राची सफाई इ. बाबींवर भर असून वर उल्लेखिलेल्या संगीतकार –पंचायतनाकडे तिथे काहीसे वक्र दृष्टीने पाहिले जाई. राष्ट्रीय आणि मुक्त अशा दोन्ही दृष्टिकोणांचा संगम प्रथमतः ⇨प्यॉटर चाय्कॉव्हस्की (१८४०-९३) या श्रेष्ठ संगीतकारात दिसतो, असे म्हणण्यास हरकत नाही. चाय्कॉव्हस्कीचा निर्देश पहिला रशियन प्रतिभावंत सिंफनीकार म्हणून केला पाहिजे. त्याच्या संगीतरचनांत मायनर स्वरग्रामावर भर असल्याकारणाने त्याचे संगीत औदासीन्यपूर्ण वाटते. याउलट वर उल्लेखिलेल्या पंचायतनाच्या रचनांतून जोरदारपणा जाणवतो. रशियन कलासंगीताच्या आधुनिक कालखंडात स्क्रयाव्यिन (१८७२-१९१५) आणि रखमान्यिनॉव्ह (१८७३-१९४३) हे प्रमुख संगीतकार होत. मात्र त्यांहूनही आधुनिक व जागतिक महत्त्वाचा संगीतकार म्हणजे ⇨ईगॉरय स्ट्राव्हिन्स्की (१८८२-१९७१) होय. त्याने द्यागिल्येफ या प्रख्यात नृत्यकलाविदाच्या नृत्यनाट्यासाठी १९११ मध्ये संगीत दिले त्याचा भर रशियन लोकसंगीतावरच होता. सूक्ष्म भेद करावयाचा झाला, तर स्ट्राव्हिन्स्कीच्या सांगीतिक प्रेरणा अधिककरून आदिम संगीताच्या होत्या, असे म्हटले पाहिजे, नंतरच्या काळात नव-अभिजाततावादी दृष्टिकोण आणि स्वरावली (सिरीअल) तंत्राचा अवलंब केल्याकारणाने त्याचे संगीत पूर्णतः निराळे ठरले. रशियन संगीतपरंपरेतच नव्हे, तर एकंदर पाश्चिमात्य संगीतपरंपरेतच त्याने बदल घडवून आणल्यामुळे विसाव्या शतकात स्ट्राव्हिन्स्कीला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले. प्रकोफ्येव्ह (१८९१-१९५३) ह्या एक कुशल पियानोवादक होता. १९१८ ते १९३२ या कलाखंडात अमेरिकेत वास्तव्य करून परत रशियात स्थायिक झालेल्या या रचनाकाराने आघातपूर्ण पियानो संगीतरचनेची एक नवी शैली रूढ केली. त्याच्या वरही आदिम संगीताचा असर होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकंदरीने पाहता, १८३६ ते १९१३ ह्या कालखंडात पृथगात्म रशियन संगीताची घडण झाली.
राज्यक्रांतीनंतरच्या (१९१७) सोव्हिएट कालखंडातील शस्तकोव्ह्यिच (१९०६- ) हा प्रमुख संगीतकार होय. खात्चातुरीअन (१९०३- ), कबाल्येव्हस्की (१९०४- ), खेनिकोव्ह (१९१३- ) इ. अन्य संगीतकारही उल्लेखनीय होत.
कला सामाजिक उद्दिष्टांसाठी राबविली गेली पाहिजे, अशी सोव्हिएट विचारधारा असल्याकारणाने ‘रशियन असोसिएशन ऑफ प्रोलेटेरिअन म्यूझिशिअन्स’ स्थापण्यात आली (१९२४). सोव्हिएट दृष्टिकोणामुळे ज्या इतर सुधारणांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला, त्यांतील पुढील उल्लेखनीय होत : (१) समान स्वरांतरे झुगारून देता यावीत, म्हणून पियानो नष्ट करावेत, असे मत हिरिरीने पुढे मांडण्यात आले. (२) कारखान्यांतले वगैरे ध्वनी वापरूनच संगीतरचना व्हाव्यात, असा आग्रह धरण्यात येऊ लागला. (३) संगीतात साम्यवाद हवा, म्हणून वाद्यवृंदरचनांचे निर्देशकरहित सादरीकरण झाले (१९२२). (४) रचनांच्या शीर्षकांतूनही साम्यवाद प्रकट व्हावा, म्हणून रचनांची नावे वदलण्यात येऊ लागली. उदा., अ लाइफ फॉर द झार याऐवजी फॉर साइद अँड हॅमर इत्यादी.
प्रस्तुत प्रयत्नांना काही काळ कमीअधिक यश मिळाले. १९३० च्या आसपास एक सर्वंकष कलातत्त्वज्ञान म्हणून समाजवादी वास्तववादाची घोषणा करण्यात आली. यामधून हाती लागणारे निकष घेऊन प्रावदा या अधिकृत मुखपत्राद्वारे १९३६ मध्ये शस्तकोव्ह्यिचचे उदाहरण घेऊन सांगीतिक आधुनिकता आणि तिच्यामागील पाश्चिमात्य स्फूर्ती यांवर कडाडून टीका करण्यात आली. १९४८ मध्ये इदानॉव्हचे कुप्रसिद्ध फतवे निघाले. संगीतात रशियाई वास्तव कसे ऐकू यावे, त्याची सूत्रे घालून देण्यात आली. तथापि सु. १९६० पासून घोषणा कायम राहिली, तरी भूमिकेचे कडवेपण कमी झाले. सोव्हिएट रचनाकार स्वरावलीतंत्र वा योगायोगाधार यांसारख्या आधुनिक कल्पनांचा वापर करू लागले. कलासंगीताबाबत तरी दहाव्या शतकापासून एकदम विसाव्या शतकात रशियाने उडी मारली, असे म्हटल्यास ते फारसे चूक होणार नाही.
लेखक :रानडे, अशोक दा.
चित्रपट : रशियातील पहिले चित्रपटगृह १८९६ मध्ये सेंट पीटर्झबर्ग येथे ल्यूम्येअर बंधूंनी सुरु केले. १९०८ साली अलेक्झांडर ड्रँकॉव्हने स्टेंका राझियन हा मूकपट निर्माण केला. १९१० मध्ये टॉलस्टॉयच्या निधनावर आधारित वार्तापट दाखविण्यात आला. १९०७ ते १९१७ या काळात पूर्ण लांबीचे सु. दोन हजार मूकपट रशियात तयार झाले होते. खाजगी मालकीच्या या व्यवसायात ह्या काळात विलक्षण चढाओढ होती. पहिल्या महायुद्धपूर्वकाळात इव्हान मॉझ्युकीन हा अभिनेता व व्हेरा खोलोज्ञा ही अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर होते. राज्यक्रांतीनंतर लेनिनच्या धोरणानुसार १९१९ मध्ये चित्रपटव्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. परिणामी चित्रपटगृहांच्या संख्येत वाढ झाली. राष्ट्रीयीकरणाच्या काळात कूलेशोव्ह हा दिग्दर्शक व तंत्रज्ञ आधाडीवर होता. ⇨स्यिर्ग्येई आवसेन्स्तीन (१८९८-१९४८) व ⇨व्हस्येव्हलत पूडॉव्हकिन (१८९३-१९५४) हे जागातिक कीर्तीचे श्रेष्ठ दिग्दर्शक व चित्रपटतंत्रज्ञ होत. आयसेन्स्तीनचा द बॅटलशिप पोटेम्किन (१९२५) व पूडॉव्हकिनचा, गॉर्कीच्या कादंबरीवर आधारित, मदर (१९२६) या दोन मूकपटांनी रशियन चित्रपटकलेला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला. आयसेन्स्तीनच्या अलेक्झांडर नेव्हस्की (१९३८), इव्हान द टेरिबल (१९४५) आणि पूडॉव्हकिनच्या द एंड ऑफ सेंट पीटर्झबर्ग (१९२७) व स्टॉर्म ओव्हर एशिया (१९२८) या मूकपटांनी त्यांना आंतरराष्ट्रीय मानमान्यता मिळवून दिली. नंतरची चित्रपटकलावंतांची एक पिढी त्यांनी प्रभावित केली. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभकाळात क्रांती या विषयावर अनेक चित्रपट निर्माण झाले. गोगोल, पुश्किन, चेकॉव्ह, गॉर्की, डॉस्टोव्हस्की, शेक्सपिअर श्रेष्ठ साहित्यिकांच्या कृतींवर चित्रपट काढण्यात आले तसेच लेनिनच्या जीवनावर म्यिखईल रोम्म याने अनेक चित्रपट काढले. ओकिव हा नट लेनिनच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध होता. दुसऱ्या महायुद्धकाळात देशभक्तिपर चित्रपटांची लाट आली.
दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक चित्रपटांवर कमीअधिक काळ बंदी घालण्यात आली. स्टालिनच्या राजवटीत चित्रपटावरील निर्बधही अधिक जाचक झाले. १९५० साली फक्त सहा चित्रपट प्रदर्शित झाले.
ख्रुश्चॉव्हच्या कारकीर्दीत रशियन चित्रपटसृष्टीत पुन्हा चैतन्य निर्माण झाले. म्यिगॉर्यइ चुखराय या चित्रपटनिर्मात्याचे द फॉर्टी फर्स्ट (१९५६), द बॅलड ऑफ अ सोल्जर (१९५९) आणि स्टालिनविरोधी चित्रपट क्लिअर स्काइज (१९६१) या चित्रपटांनी या चैतन्याचा प्रत्यय घडविला. द क्रेन्स आर फ्लाईंग (१९५७) हा म्यिखईल काल्टझोव्ह याचा चित्रपट छायाचित्रणकला आणि व्यक्तिजीवनाचा भावपूर्ण आविष्कार या दृष्टींनी एक मोठा मानदंड समजला जातो. क्वाएट फ्लोज द डॉन (१९६०), फेट ऑफ ए मॅन हे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट. कॅन (फ्रान्स) येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यास सुवर्णपदक लाभले. १९६० च्या दशकात चेकॉव्ह, सव्हँटिस, शेक्सपिअर यांसारख्या श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींवरील चित्रपट निर्माण झाले व रशियन चित्रपटसृष्टीचे हे वैशिष्ट्य पुन्हा दिसून आले. त्याचप्रमाणे जर्जिया, आर्मेनिया, युक्रेन या प्रजासत्ताकांतूनही दर्जेदार चित्रनिर्मिती होऊ लागली. त्यांपाकी युक्रेनियन चित्रपट हीट (१९६१), आर्मेनियन चित्रपट शॅडोज ऑफ अवर फर्गॉटन ॲन्सेस्टर्स (१९६४) व वादग्रस्त ठरलेला जॉर्जियन चित्रपट आय ॲम ट्वेंटी (१९६३) हे उल्लेखनीय आहेत. १९६४ साली वेलकम हा ख्रुश्चॉव्ह व रशियन समाज यांवरील उपरोधिक चित्रपट निर्माण झाला पण तो प्रदर्शित होऊ शकल नाही. तसेच आंद्रेई रूब्लेव्ह (१९६६) हा चित्रपटही १९७१ पर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही. बॅलड ऑफ अ सोल्जर (१९५९), द लेडी विथ द लिटल डॉग (१९६०) हे जागतिक चित्रपटस्पर्धेतील पारितोषिकविजेते चित्रपट होत. १९७० नंतरच्या काळातील काही उल्लेखनीय रशियन चित्रपटर्निमाते म्हणजे म्यिखईल वोगीन, पॉव्हेल लूबीमोव्ह, अलेक्झांडर मित्ता व्हलॉदिमिर फेतीन, व्हॉसिली शुक्शीन व ग्लेयप पॅनफीलॉव्ह हे होत.
रशियात २० चित्रपटनिर्मितिगृहे असून ती दिग्दर्शकांना वाटून दिलेली असतात. अधिकृत शासकीय मंडळामार्फत (कमिशन) प्रत्येक चित्रपट आधी संमत केला जातो. मंडळास नापसंत असलेला चित्रपट देशात प्रदर्शित केला जात नाही.
रशियन चित्रपटसृष्टी सरकारी मालकीची असल्याने तेथे स्पर्धा, जाहिरातबाजी इत्यादींना वाव नाही. तसेच भडक दिखाऊपणा, उत्तान शृंगार हेही आढळत नाहीत. कथाविषयांकडे पाहण्याचा दिग्दर्शक-निर्मात्यांचा आगळा दृष्टिकोण व वास्तववादाकडे जास्त कल, ही रशियन चित्रपटांची ठळक वैशिष्ट्ये मानता येतील. व्यंगपट, कळसूत्री बाहुल्यांचे चित्रपट, बालचित्रपट व वैज्ञानिक चित्रपट यांच्या निर्मितीत रशियाने आपले स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. मॉस्कोमध्ये चित्रपट प्रशिक्षण देणारी संस्था आणि चित्रपटांचे अभिलेखागारही आहे. दूरचित्रवाणीची स्पर्धा असूनही रशियात चित्रपटांची लोकप्रियता कमी झालेली नाही. देशात एकूण १,४१,७०० चित्रपटगृहे असून त्यांव्यतिरिक्त ९,६०० फिरती चित्रपटगृहेही आहेत (१९८४).
संग्रहालये व कलावीथी : रशियात विविध प्रकारची संग्रहालये व कलावीथी असून ती सामान्यतः शासनाच्या अखत्यारीत आहेत. छोटी शहरे व ग्रामीण परिसर यांतून मात्र काही खाजगी संग्रहालये आढळतात. मॉस्को शहरातील सेंट्रल लेनिन म्यूझीयम, क्रेमलिनमधील आर्मरी म्यूझियम, पुश्किन म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स, त्रेत्याकॉव्ह कलावीथी इ. प्रसिद्ध असून लेनिनग्राडमधील ‘हर्मिटेज’ व रशियन म्यूझीयम, कीव्ह येथील युक्रेनियन आणि रशियन कलासंग्रहालये उल्लंखनीय आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीचे दर्शन घडविणारे एक कायमचे प्रदर्शन मॉस्कोमध्ये आहे.
क्रीडा : रशियातील क्रीडाक्षेत्र हे लहानमोठ्या मंडळांनी (क्लबांनी) गजबजलेले आहे. विविध खेळांची ही मंडळे सामान्यतः कामगार संघटना, शिक्षणसंस्था, कारखाने, मोठे उद्योगधंदे यांच्याशी संलग्न असून ती प्रत्येक शहरात आढळतात. ही मंडळे खेळांचे प्रशिक्षण व सामान्यांचे नियोजन करतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडासामन्यांत अशा मंडळांना आणि त्यांच्या सदस्यांनाच भाग घेता येतो. देशात सु. दोन लक्ष क्लव असून त्यांची सदस्यसंख्या सु. पाच कोटी आहे (१९८१). केंद्रीय शासनातर्फे खेळ आणि क्रीडा यांचे नियंत्रण करण्यात येते. मॉस्को, लेनिनग्राड, कीव्ह, आल्माआता यांसारख्या अनेक शहरांत मोठी क्रीडागारे आहेत. उत्तम क्रीडापटू तयार करण्यासाठी ‘रेडी फॉर लेबर अँड डिफेन्स’ (जीटीओ) या नावाचा एक अधिकृत कार्यक्रम स्टालिनच्या कारकीर्दीत शासनातर्फे सुरू करण्यात आला होता. सर्व वयोगटांतील व्यक्तींना खेळात भाग घेण्यास प्रवृत्त करणे, हा त्याचा हेतू आहे. या योजनेत उत्तरोत्तर सुधारणा करण्यात आल्या व १९५९ साली शासनातर्फे ‘युनियन ऑफ स्पोर्ट्स सोसायटीज अँड ऑर्गनायझेशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली. चांगल्या खेळांडूना श्रेणी देण्याची त्याचप्रमाणे प्रशिक्षण देण्याची सोय देशात आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, नौकानयन यांसारखे सांघिक खेळ विशेष लोकप्रिय असून वास्केटबॉल व व्हॉलीबॉल यांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये रशियन पुरुष व महिला संघांचे वर्चस्व आहे. त्याचप्रमाणे व्यक्तिगत स्वरूपाच्या खेळांत टेनिस, गिर्यारोहण, स्कीइंग, मासेमारी इ. खेळ खेळले जातात. बुद्धिबळात रशिया जगामध्ये आघाडीवर आहे. बोटविनिक (१९४८-५७, १९५८-६०, १९६१-६३), स्मायस्लॉव्ह (१९५७-५८), ताल (१९६०-६१), पेत्रोशियन (१९६३-६९), स्पास्की (१९६९-७२) आणि कार्पोव्ह (१९७५-८१), कास्परॉव्ह (१९८७) हे बुद्धिबळातील जागतिक अजिंक्यवीर रशियनच आहेत. धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळी फेक, भाला फेक, पोहणे, मुष्टियुद्ध, नेमवाजी, अडथळाशर्यत यांसारख्या व्यायामी व मैदानी खेळांत रशियन क्रीडापटूंनी जागातिक उञ्चांक प्रस्थापित केलेले आहेत. व्यायामी खेळांत रशियन खेळांडूंचे विशेष वर्चस्व असून या सर्व प्रकारांमध्ये रशियन स्त्रिया आघाडीवर आहेत.
म्यूनिक येथील ऑलिंपिक क्रीडासामन्यांत (१९७२) सर्वांत जास्त म्हणजे १२१ देशांनी भाग घेतला होता. त्यांतही रशियाने ९९ पदके मिळवून (५० सुवर्ण, २७ रौप्य व २२ कांस्यपदके) आपले सर्वश्रेष्ठत्व सिद्ध केले होते, १९७६ च्या माँट्रिऑल येथील ऑलिंपिक क्रीडासामन्यांत जगातील ९३ देशांनी भाग घेतला होता. त्यांत रशियन क्रीडापटूंनी सर्वांत जास्त म्हणजे १२५ पदके (४७ सुवर्ण, ४३ रौप्य व ३५ कांस्य) मिळविली होती. १९८० साली मॉस्कोमध्ये भरविण्यात आलेल्या ऑलिंपिक क्रीडासामान्यांत ८१ देशांनी भाग घेतला होता. ग्रामीण भागातील रशियन लोक बेसबॉलसारखा एक खेळ (लाप्ता) अजूनही खेळतात. लाकडी खुंट्या वसविलेल्या चौकटीवर काठी फेकून त्या खुंट्या पाडणे असाही एक खेळ (गोरोडकी) हे लोक खेळतात. शीडजहाजांच्या शर्यती एस्टोनियात विशेष लोकप्रिय आहेत. बश्कीर आणि किरगीझ लोक अश्वारोहण व तत्सम खेळ आवडीने खेळतात. पुरुषांच्या बाबतीत हठयोग, कराटे, ब्रिज यांसारख्या खेळांना रशियात जवळजवळ मनाई आहे. कुस्त्यांचे विविध प्रकार हे स्थानिक समाजांत, विशेषतः मध्य आशियात आणि कॉकेशस प्रदेशात, लोकप्रिय आहेत. रेनडिअरच्या व कुत्र्यांच्या घसरगाड्यांच्या शर्यती अतिउत्तरेकडील बर्फाळ प्रदेशात लोकप्रिय आहेत.
फावल्या वेळात मनोरंजनासाठी रशियन नागरिक सामान्यपणे घराबाहेर पडतात. छोट्याछोट्या सहलींना जाणे त्यांना विशेष आवडते. ‘डाचा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिथिगृहांची व्यवस्था देशात सर्वत्र आढळते. बागकाम किंवा वनविहार हे अशा अतिथिगृहातील वास्तव्यातील आवडीचे मनोरंजनप्रकार आहेत. तरुणांना लांबवरच्या सफरी करणे आवडते. सांस्कृतिक व नैसर्गिक विविधता असलेल्या विविध प्रदेशांत फिरणे हा तरुणांच्या साहसी व जिज्ञासू वृत्तीला आव्हानात्मक व आनंददायक प्रकार ठरतो. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम पाहणे हाही रशियन लोकांचा आवडता मनोरंजन प्रकार आहे. सामुदायिक कृषिकेंद्रांवर चित्रपट दाखविण्याची सोय असते. त्याचप्रमाणे नाटकांचे व संगीताचे प्रयोगही सादर करण्यात येतात. रशियातील खेडोपाडी अजूनही ॲकॉर्डियन व गिटारसारखे एक वाद्य (बालालाइका) वाजविणारे कलावंत आढळतात.
लेखक : जाधव, रा. ग.
ग्लासनोस्त व पेरेस्त्रोइका : सोव्हिएट सरचिटणीस म्यिखईल गार्बाचॉव्ह यांनी स्वीकारलेल्या अत्यंत क्रांतिकारक धोरणाच्या निदर्शक अशा या दोन संज्ञा आहेत. ‘ग्लासनोस्त’ म्हणजे खुलेपणा, मोकळेपणा. ‘पेरेस्त्रोइका’ म्हणजे पुनर्रचना. ग्लासनोस्त म्हणजे विचारांचे मोकळेपणाने केलेले आदान-प्रदान, किंबहुना तसे करण्याचे स्वातंत्र्य. या संकल्पनेचा पुरस्कार गार्बाचॉव्ह १९८५ पासूनच करीत आहेत. रशियन जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत म्लासनोस्तमुळे अधिक मोकळेपणाचे वातावरण निर्माण होईल. २५ फेब्रुवरी १९८७ रोजी गार्बाचॉव्ह यांनी पुनर्रचनेसंबंधीचा आपला प्रस्ताव मांडला. त्याचा रोख मुख्यतः आर्थिक परिवर्तनावर आहे. सुप्रीम सोव्हिएटने अनेक नवीन सुधारणा करण्याचे घोषित केले आहे : त्यांनुसार कारखान्यांचे वा सुपरबाजारांचे व्यवस्थापक कामगारांच्या व ग्राहकांच्या शंकांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यास जबाबदार राहतील व्यवस्थापकांना खाजगी तज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल तसेच सरकारी उद्योगधंदे व मंत्रालयीन खाती यांनाही खाजगी अर्थशास्त्रज्ञांचा सल्ला घेता येईल.
प्रस्तावित सुधारणांमध्ये रशियन रुबलची आंतरराष्ट्रीय परिवर्तनीयता, ही महत्त्वाची सुधारणा होय. त्यामुळे रशियाच्या जागतिक व्यापारातील हिश्श्यात वाढ होऊ शकेल (सांप्रत हा हिस्सा ४.५% आहे). याखेरीज नवीन वित्तसंस्थांची स्थापना, भांडवली बाजारांची उभारणी, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलन निधी या संस्थांचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न, तसेच लवचिक विनिमय दरांचा अवलंब इत्यादींचा आर्थिक पुनर्रचनेच्या कार्यक्रमात अंतर्भाव आहे. रशियन शास्त्रज्ञांना आपल्या शोधांबद्दलचे एकस्वाधिकार तसेच स्वामित्वशुल्क प्रदान करणारे विधेयकही येऊ घातले आहे.
रशियातील या आर्थिक पुनर्रचनेचा लाभ विकसनशील देशांतील उद्योजकांनाही मिळू शकेल. आजपर्यंत रशियाचे परदेशी आर्थिक धोरण मालाच्या खरेदी-विक्रीपुरतेच मर्यादित होते यापुढे रशियन उद्योगधंद्यांना आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत विकण्यासाठी परदेशांशी स्वतंत्रपणे (शासकीय पातळीवरून न करता) व्यापारी करार करण्याची मुभा मिळणार असून त्यांना अन्य देशांतील संबंधित उद्योगांबरोबर संयुक्त प्रकल्प उभारता येणेही शक्य होणार आहे. रशियन उद्योगधंद्यांना परदेशांत मोकळेपणाने आपल्याला लागणारा कञ्चा माल, उपकरणे, सामग्री यांची खरेदी करता येणार आहे. संयुक्त प्रकल्पांकरिता आवश्यक कर्जपुरवठा रशियन बँका करणार असून अशा उद्योगांची संख्या सहाशेवर आहे. त्यांमध्ये यंत्रनिर्मिती, उपकरणे, मोटारी, हॉटेलउभारणी, रसायने, रंग, जंतुनाशके, कागद, अन्नप्रक्रिया, प्रक्षालके इ. उद्योगांचा अंतर्भाव आहे.
रशियात परदेशी कंपन्यांना संयुक्त प्रकल्प उभारणीमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत भाग-भांडवल पुरविता येईल या प्रकल्पाच्या संचालक मंडळावर दोन्ही उद्योगांचे प्रतिनिधी राहतील मात्र मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रशियन असतील, परदेशी भागीदारांना नफाहस्तांतरणाचा किंवा फेरगुंतवणुकीचा हक्क राहील, मात्र हा नफा रशियाबाहेर हस्तांतरित करावयाचा असल्यास त्यासाठी २०% जादा कर रशियन शासनाला द्यावा लागेल.
लेखक : गद्रे, वि. रा.
महत्त्वाची स्थळे : रशियात दहा लाखांवरील लोकसंख्येची शहरे पुढीलप्रमाणे होती (१ जानेवरी १९८६) : मॉस्को (८७,०३,०००), लेनिनग्राड (४९,०१,०००), कीव्ह (२४,९५,०००), ताश्कंद (२०,७३,०००), बाकू (१७,२२,०००), खारकॉव्ह (१५,६७,०००), मिन्स्क (१५,१०,०००), गॉर्की (१४,०९,०००), नोव्होसिबिर्स्क (१४,०५,०००), स्व्हर्डलॉफ्स्क (१३,१६,०००), क्विबिशेव्ह (१२,६७,०००), टिफ्लिस (११,७४,०००), नेप्रोपट्रॉफ्स्क (११,६६,०००), येरेव्हान (११,४८,०००), ओडेसा (११,३२,०००), ऑम्स्क (११,२४,०००), चिल्याबिन्स्क (११,०७,०००) आल्माआता (१०,८८,०००), डोनेट्स्क(१०,८१,०००), उफा (१०,७७,०००), प्येर्म (१०,६६,०००) व कझान (१०,५७,०००). मॉस्को, लेनिनग्राड ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. मॉस्को येथील लाल चौक, सेंट बाझेल कॅथीड्रल, क्रेमलिन, लेनिनचे स्मारक, वेगवेगळी वस्तुसंग्रहालये तसेच लेनिनग्राडमधील पीटर व पॉल यांची सुप्रसिद्ध गढी, हर्मिटेज, म्यूझीयम इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. रशियातील वेगवेगळे राजप्रासाद, कॅथीड्रल व चर्च, झारकालीन शासकीय कार्यालयांच्या वास्तू इ. पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मॉस्को, लेनिनग्राड, कीव्ह, व्ह्लॅदिमिर-सूझडल व यारोस्लाव्ह्ल ही ठिकाणे मुख्यतः ऐतिहासिक वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत तर बैकल सरोवराचा परिसर भूशास्त्रीय दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. यांशिवाय काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील याल्टा, ओडेसा व इतर पर्यटन केंद्रे, वाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील, व्होल्गा खोऱ्यातील कॉकेशस, उरल व अल्ताई पर्वत प्रदेशांतील पर्यटन स्थळे, मध्य आशियातील समरकंद व बूखारा, युक्रेनमधील कीव्ह ही प्राचीन शहरे अशी रशियात शेकडो प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच हौशी प्रवासी मॉस्को-नाखॉट्का (व्ह्लॅडिव्हस्टॉकजवळील बंदर) यांदरम्यानचा सात दिवसांचा प्रवास ट्रान्स-सायबीरियन रेल्वेने करतात.
रशियातील पर्यटन व्यवसाय अलीकडील काही वर्षात, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, वाढलेला आहे. १९७९ मध्ये ४३ लक्ष रशियन नागरिक देशाबाहेर पर्यटनास गेले तर ५० लक्षांपेक्षा अधिक परदेशी पर्यटक देशात आले. १९७६-८० या पाच वर्षांच्या काळात अडीच कोटी पर्यटकांनी रशियाला भेट दिली. यांत यूरोपीय पर्यटकांची संख्याच सर्वाधिक होती. स्वतंत्र बोटी, रेल्वे किंवा बसमधून सहली काढण्याकडे लोकांचा वाढता कल दिसतो. पर्यटन व मनोरंजनादी सेवा रशियन कामगार संघटनांकडून पुरविल्या जातात. ‘इन्टूरिस्ट’ (स्था. १९२९) ही संघटना पर्यटन व्यवसायाचा सर्वतोपरी विकास घडवून आणण्याचे कार्य करते. देशात येणाऱ्या तसेच देशाबाहेर जाणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व प्रकारची सेवा पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. या संघटनेने जगातील अनेक देशांत आपली कार्यालये उघडली आहेत. याशिवाय ‘सेंट्रल बोर्ड ऑफ टूरिझम’, ‘इंटरनॅशनल यूथ टूरिझम ब्यूरो’ (स्पुटनिक), ‘युनियन ऑफ सोव्हिएट सोसायटीज फॉर फ्रेंडशिप अँड कल्चरल रिलेशन्स विथ फॉरिन कंट्रीज’ या व इतर सार्वजनिक संस्थांकडूनही सहली आयोजित केल्या जातात. मॉस्कोमधील ‘हॉटेल रशिया’ हे यूरोपमधील सर्वांत मोठे हॉटेल असून त्यात एका वेळी ५,५०० प्रवाशांची सोय होऊ शकते.
सार्वजनिक उद्याने : रशियातील सार्वजनिक उद्याने ही शासनाच्या कामगार संघटनांच्या प्रशासनात मोडतात. मॉस्को येथील गॉर्की पार्क, सकान्यिकी व इज्मायलॉव्हस्की पार्क आणि लेनिनग्राडमधील कीरफ पार्क ही उद्याने उल्लेखनीय आहेत. रशियातील सार्वजमिक उद्याने ही सांस्कृतिक केंद्रे असतात आणइ व्याख्याने , बुद्धिबळांचे सामने, काव्यवााचन यांसारखे अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम तेथे साजरे होतात. (चित्रपत्रे ९, ३३).
लेखक : चौधरी, वसंत
संदर्भ ꞉
- Alex, Inkeles, Social Change in Soviet Russia, Cambidge, 1968.
- Atkinson, Dorothy and Others, Women in Russia. California, 1977.
- Backwell, W. L. Ed., Russian Economic F Development from Peter the Great to Stalin, New York, 1974.
- Brine, Jenny, Home, School and Leisure in the Soviet Union, 1980.
- Brace, Parrott, Politics and Technology in the Soviet Union, Cambridge, 1983.
- Buxton, D. R., Ration Medieval Architecture, Cambridge, 1934.
- Carr, Hallett, A History of Soviet Russia, 14 Vols, London, 1951-78.
- Clarke, R. A.; Malco, D. J. I. Ed., Soviet Economic Facts, 1917-80, London, 1983.
- Cole, J. P., Geography of the Soviet Union, London, 1984.
- Duncan, R. W., Soviet Policy in Developing Countries, London, 1981.
- Fischer, Look, The Soviets in World Affairs, 2 Vols, 1975.
- Florinsky, M. T., Rassin : A History and an Interpretation, 2 Vals, London, 1953.
- Government of USSR, Constitu Fundamental Law) of the USSR, Moscow, 1977.
- Government of USSR, Rales of the Communist Party of the Seder Union, Moscow, 1977.
- Gray, Cambilla, Great Experiment : Russian Art 1863-1922, London, 1962.
- Gruzinov, V. F., The USSR’s Management of Foreign Trade, London, 1980.
- Haros, G. H.; Bushnell, Kristine; Russell, Ken, Trans., History of The USSR, 3 Parts, Moscow, 1977.
- Hanson, Phillip, Trade and Technology in Soviet Union,
- Hazard, J.; Butler, W. E.; Maggs, P., The Soviet Legal System, New York, 1977.
- Howe, G. M., The Soviet te fare Union : A Geographical Survey, London, 1983.
- Inozemtser, N. N. Ed., Peace and Disarmament, Moscow, 1982.
- Jensen, R. C., Soviet Natural Resources in the World Economy, Chicago, 1983.
- Lazarev, V. N., Old Russian Fe Murals and Mosaics, London, 1966.
- Letchuk, V.; Polyakov, Y.; Protopopov, A Short History of Soviet Society, Moscow, 1971.
- Leyda, Jay, Kino : A History of the Russian and Soviet Film, London, 1960.
- Madison, B. Q., Soviet Social Welfare System, 1982.
- Matthews, M., Education the Soviet Union, London, 1982.
- Matthews, W. K., Languages of the USSR, Cambridge, 1951.
- Menhert, Klaus, Soviet Man and His World, Westport, 1976.
- Nove, Alec, The Economic History of the USSR, Harmondsworth, 1982.
- Rice, T. T., A Concise q History of Russian Art, London, 1963.
- Rubenstine, A. Z., Russian Avantgarde Art : The George Costakis Collection, 1981.
- Salisbury, H. E., Black Night White Snow, England, 1978.
- Schiavone, Giuseppe, The Institutions of Comecon, 1981.
- Scott, H. F.; Scott, W. F., The Armed Forces of the USSR, Boulder, 1979.
- Smith, M. J., The Soviet aftr Navy, 1941-1978: A Guide to Sources in English, Oxford, 1981.
- Sokolovskiy, V. D.; Scott, H. T. Ed., Soviet Military Strategy, Stanford, 1975.
- Stern, B. I.; Smith, Samuel, Understanding the Russians : A Study of Soviet Life and Culture, 1971.
- Symons, S. L., The Soviet Union : A Systematic Geography, London, 1983.
- Tiknonov, N. A., Guidelines for the Economic and Social Development of the USSR for 1981-1985 and for the Period Ending in 1990, Moscow, 1981.
- Vernadsky, George, A Source Book for Russian History from Early Time to 1917. 3 Vols., New Haven, 1972.
- Vronskaya, Jeanne, Young Soviet Film Makers, London, 1972.
- Westwood, J. N., Endurance and Endeavour: Russian History 1812-1971, Oxford, 1973.
- Wixman, R., The Peoples of Russia and the USSR, London, 1984.
- Yampolskaya, T., Social Organisations in the Soviet Union, Moscow, 1975.
- Zauberman, Alfred, Mathematical Theory in Soviet Planning, Oxford, 1976.