मॅटरहॉर्न शिखर मॅटरहॉर्न : यूरोपातील मध्य पेनाईन आल्प्समधील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर. उंची  सस.पासून ४,४८१ मीटर. हे शिखर स्वित्झर्लंड व इटली यांच्या सीमेवर स्वित्झर्लंड मधील त्सेर्मात गावाच्या नैर्ऋत्येस सु. १० किमी. वर असून स्वित्झर्लंडच्या बाजूने ते पिरॅमिड सारखे दिसते. सामान्यपणे ⇨ प्रशिखा (अरेट) या संज्ञेने ज्या भौगोलिक आविष्काराचा निर्देश केला जातो, त्याचे हे शिखर एक उदाहरण होय. या प्रकारात हिमाच्छादित भागातील परस्पर निकट अशा हिमगव्हरांच्या उभ्या कडा झिजत जाऊन त्यांचे उभे भाग एकमेकांस भिडून गिरिशृंपग तयार होते. मॅटरहॉर्न हे या प्रकारे तयार झालेले गिरिशृंग होय.

मॅटरहॉर्न शिखराच्या उंचीपेक्षा त्याचे उभे-सरळ कडे, बर्फाच्छादित भाग व तीव्र उतार गिर्यारोहकांना आव्हाने ठरतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे शिखर सर करण्याचे बहुतेक प्रयत्न इटलीच्या बाजूने करण्यात आले परंतु १८६५ मध्ये ब्रिटिश गिर्यारोहक एडवर्ड व्हिंपर व त्याच्या साथीदारांनी स्वित्झर्लंडच्या बाजूने हे शिखर प्रथम जिंकले. खाली उतरताना मात्र अपघात होऊन हॅडो, क्रोझ, हडसन व डग्लेस हे त्याचे सहकारी मरण पावले. व्हिंपरच्या यशस्वी चढाईनंतर तीनच दिवसांनी जोव्हान्नी आंतॉन्यो कारेलने आपल्या तीन इटालियन सहकाऱ्यांसमवेत इटलीच्या बाजूने हे शिखर सर करण्याचा मान मिळविला तर १८६८ मध्ये जॉन टिंड्लने इटलीच्या बाजूने आरोहण करून स्वित्झर्लंडच्या बाजूने उतरण्याचा विक्रम केला. ल्यूसी वॉकर ही मॅटरहॉर्न शिखर सर करणारी (१८७१) पहिली महिला गिर्यारोहक असून एका बाजूने आरोहण करून दुसऱ्या बाजूने उतरण्याचा विक्रम करणारी  मीटा ब्रेव्होर्ट ही पहिली अमेरिकन गिर्यारोहक आहे. कारेलनंतर अनेकांनी या शिखरावर पोहोचण्याचा मान मिळविला आहे. विसाव्या शतकापर्यंत या शिखराच्या बहुतेक सर्व बाजूंनी आरोहण करण्यात आले असून त्याची वेगवेगळ्या बाजूंनी उंचीही मोजण्यात आली आहे. गिर्यारोहकांच्या मार्गावर अनेक सुविधा व साधने उपलब्ध करण्यात येतात.

चौंडे, मा. ल.