रिहांड : भारतातील मध्ये प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांतून वाहणारी शोण नदीची उपनदी व याच नदीवरील बहूद्देशाय प्रकल्प. नदी सु. १९३ किमी. लांब असून ती मध्ये प्रदेश राज्याच्या सुरगुजा जिल्ह्यातील मानिपत टेकड्यांत उगम पावते व उत्तरेस वाहत जाऊन उत्तर प्रदेश राज्याच्या मिर्झापूर जिल्ह्यात शोण नदीला मिळते. या जिल्ह्यात नदी कठीण अशा ग्रॅनाइटी खडकांच्या अरूंद व कोल घळईतून तीव्र उताराने वाहत असून सु. १३,३३३ चौ. किमी. क्षेत्रातून प्रतिवर्षी सु. ६५,३७० लक्ष घ. मी. पाणी वाहून आणते. या तीव्र उताराचा वीज निर्मितीसाठी उपयोग व्हावा म्हणून याच भागात ⇨पिप्री येथे रिहांड धरण बांधण्यात आले आहेय याचा गोविंद वल्लभपंत सागर हा जलाशय उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत पसरलेली आहे. रिहांड धरणाचा देखावा

रिहांड धरण मिर्झापूरच्या दक्षिणेस सु.१६० किमी. वर असून ते जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, जमिनीची धूप रोखणे इ. उद्देशांनी बांधण्याचे १९४५ मध्ये ठरविण्यात आले. मध्ये धरणाचा आराखडा तयार करण्यात आला व १९६६ मध्ये ते बांधून पूर्ण झाले.

रिहांड हे भारस्थायी, काँक्रीटचे धरण ९९० मी. लांब व ९२ मी. उंच आहे. धरणाला १३ दरवाजे असून याच्या जलाशयाचे क्षेत्र ४६१ चौ. किमी. व जलसंचयक्षमता १,०६० कोटी घ. मी. आहे. धरणाच्या उजव्या बाजूस वीजनिर्मिती केंद्र असून त्यात प्रत्येक ५०,००० किवॉ. क्षमतेचे ६ यंत्रसंच बसविण्यात आले आहेत. येथून वायव्येस कानपूर, उत्तरेस बहरइच आणि ईसान्यस बलियापर्यंत सु. ४,८२८ किमी. लांबीचे विद्युत्जालक पसरण्यात आले आहे. त्यांद्वारे या प्रदेशांतील सिमेंट, ॲल्युमिनियम, दाहक सोडा, खत, चिनी मातीची भांडी, कागद, विद्युत् रसायने इत्यादींच्या निर्मितिउद्योगांना वीज पुरविली जाते. काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीसाठीही या विजेचा वापर करण्यात येतो. उत्तर प्रदेशातील माऊ, गोरखपूर, कानपूर येथील औष्णिक वीजकेंद्रांशी तसेच उत्तर प्रदेश विद्युत् जालिका, ओब्रा जलविद्युत् केंद्र यांच्याशी रिहांडवरील वीजकेंद्र जोडण्यात आले आहे. या वीजकेंद्रातून बाहेर पडणारे पाणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे शोण नदी बारमही वाहते. पुढे बिहार राज्यात डेहरी येथील बंधाऱ्यात हे पाणी अडविण्यात आले असून तेथून कालव्यांद्वारे शेतीस पुरविले आहे.

चौंडे, मा. ल.