स्ट्रॅस्‌बर्ग : फ्रान्सच्या ॲल्सेस-लॉरेन विभागातील बा-रँ विभागाची राजधानी, प्रमुख नदीबंदर आणि सांस्कृतिक, औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या ७,५९,८६८ ( उपनगरांसह २००९). हे पॅरिसच्या पूर्वेस ४३२ किमी., हाईन व ईल नदी संगमाच्या पश्चिमेस ४ किमी. फ्रान्स–जर्मनीच्या सरहद्दीजवळ, ईल नदीच्या दोनही काठांवर वसलेले आहे. शहराच्या पूर्वेस हाईन नदीवर नदीबंदर असून ते कालव्याने होन व मार्न या नद्यांशी जोडलेले आहे. स्ट्रॅस्बर्ग हे आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र आहे. हे फ्रान्सचे प्रमुख धान्यबंदर असून येथून अन्नपदार्थ, इंधन तेल, पोटॅश, लोखंड, कोळसा, औद्योगिक उत्पादने इत्यादींची वाहतूक होते.

नोत्रदाम गॉथिक कॅथीड्रल, स्ट्रॅस्बर्ग

हे शहर मूलतः केल्टिकांचे होते. रोमनांच्या अखत्यारित यास ‘ ऑर्जेनटारेटम ’ म्हणत. पाचव्या शतकात फ्रँक या राजसत्तेने हे जिंकले होते. तेव्हा यास स्ट्रिटबर्गम ( सिटी ऑफ रोडवेज ) म्हणत. फ्रँकचा राजा चार्ल्स द बाल्ड ( दुसरा चार्ल्स ) व जर्मनीचा पहिला लूइस यांनी ८४२ मध्ये येथे मैत्रीची शपथ घेतली होती. मध्ययुगीन काळात येथे शहरवासी व बिशप यांमध्ये तंटे होत असत. तेराव्या शतकात पवित्र रोमन सामाज्यात हे मुक्त शहर झाले होते. १५२० मध्ये मार्टीन बूटसर याच्या नेतृत्वाखाली सुधारणावादाचा पुरस्कार करण्यात येऊन हे प्रॉटेस्टंटांचे प्रमुख केंद्र बनले होते. १६८१ मध्ये हे फ्रान्सचा चौदावा लूई याच्या आखत्यारित आले. फेंच राज्यक्रांती दरम्यान शहरास विशेषाधिकार होते. १७९२ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीवेळी स्ट्रॅस्बर्ग येथे फ्रेंच कवी, संगीतकार रुझे द लील याने हाईन सैन्याचे ‘ ला मार्से ’ हे स्तुतिगीत रचले होते, तेच फ्रान्सचे राष्ट्रगीत आहे. फ्रँको–जर्मन युद्धात (१८७०-७१) जर्मनीने या शहरास ५० दिवसांचा वेढा घातला. नंतर फ्रँकफुर्ट तहान्वये हे जर्मनीच्या अंमलात आले. पहिल्या महायुद्धानंतर हे फ्रान्सच्या आधिपत्याखाली आले (१९१९). दुसर्‍या महायुद्धात पुन्हा एकदा जर्मनीच्या, तर १९४४ ला शेवटी हे फ्रान्सच्या आधिपत्याखाली आले.

दुसर्‍या महायुद्धानंतर हे प्रमुख औद्योगिक शहर बनले असून येथे मद्यनिर्मिती, छपाई, जहाजबांधणी, फर्निचर, कागद, रसायने, वस्त्रोद्योग, कातडी कमावणे, खनिज तेलशुद्धीकरण, अन्नप्रक्रिया इ. उद्योग चालतात. इटली, फ्रान्स, मध्य यूरोपशी जोडणार्‍या मोक्याच्या स्थानामुळे हे व्यापारी केंद्र बनलेले ऑफ यूरोप ’ आणि ‘ यूरोपियन कोर्ट ऑफ ह्यूमन राईट्स ’ या संस्थांचे मुख्यालयही आहे. मध्ययुगीन काळात साहित्यक्षेत्रात हे अग्रस्थानी होते. पंधराव्या शतकात येथे योहान गूटेनबेर्क या साहित्यिकाचा छापखाना होता. येथील नोत्रदाम गॉथिक कॅथीड्रल अकराव्या—पंधराव्या शतकांदरम्यान बांधण्यात आले आहे. यामधील खगोलशाखीय घड्याळ १५७४ मध्ये बसविण्यात आलेले आहे. या कॅथीड्रलची उंची १३९ मी. आहे. येथील सेंट थॉमस चर्च, स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठ (१५३८), शॅटो देस रोहॅन या बिशप राजवाड्यातील ( अठरावे शतक ) तीन संग्रहालये प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.