सुरत शहराचे एक दृश्यसुरत : भारताच्या गुजरात राज्यातील शहर व सुरत जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४४,६२,००२ (२०११). हे मुंबईच्या उत्तरेस २४१ किमी. तापी नदीच्या मुखापासून आत १६ किमी.वर तापी नदी आग्नेयेकडून एकदम नैर्ऋत्येकडे जेथे वळते, त्या वळणावर तिच्या किनाऱ्यावर विस्तारले आहे. गुजरातच्या सुलतानाकडे असलेल्या सुलाबतखान नावाच्या तुर्की सैनिकाने येथे इ. स. १५४० मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याभोवती नदीकाठावर हे शहर वर्तुळाकृती पसरलेले आहे. ते लोहमार्ग व रस्ते यांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी गोपी नावाच्या हिंदू व्यापाऱ्याने आधुनिक शहराचा पाया घातला. येथे त्याने अनेक सुधारणा केल्या असे मानतात. गुजरात सल्तनतमध्ये समाविष्ट असलेले हे शहर इ. स. १५७३ मध्ये मोगलांच्या आधिपत्याखाली आले. मोगल साम्राज्यात सुरत हे प्रमुख बंदर होते व या काळातच येथून अन्य देशांशी व्यापार चाले परिणामी या कालावधीत शहराची भरभराट झाली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर येथील मोगलांचे वर्चस्व कमी होऊन मराठयंचे वर्चस्व वाढले. नंतर शहर इंग्रजांच्या आधिपत्याखाली आले. हिंदुस्थानातील ज्या भागाशी युरोपियन लोकांचा प्रथम संबंध आला, त्यामध्ये सुरत हे शहर आहे. ग्रीक भूगोलशास्त्रवेत्ते टॉलेमी ( इ. स. १५०) यांनी (पुलिपुल म्हणजे कदाचित सुरत शहरातील फुलपाद हा भाग ) या व्यापारी ठाण्याविषयी लिहिले आहे तर पोर्तुगीज प्रवासी ॲर्टी बार्बोसाने सुरत हे तत्कालीन प्रमुख बंदर असल्याचे वर्णन केले आहे. प्रारंभीच्या काळातील सुरतच्या व्यापारी महत्त्वामुळे व पोर्तुगीजांच्या येथील सागरी वर्चस्वामुळे त्यांनी सुरत शहर इ. स. १५१२, १५३०, १५३१ मध्ये लुटले होते. इंग्रजांनी आपली वखार येथे इ. स. १६१३ मध्ये, तर डचांनी इ. स. १६२० मध्ये स्थापन केली होती. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हे शहर दोनदा लुटले.

इंग्रजी अंमलात बंदर म्हणून मुंबईचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी आपला व्यापार सुरतऐवजी मुंबईतून सुरु केला. यामुळे सुरतचे महत्त्व कमी झाले. इ. स. १८३७ मधील आगीमुळे व महापुरामुळे तसेच इ. स. १६३०–३१, १६८४, १७९०, १८१२–१३ मध्ये या प्रदेशात पडलेला दुष्काळ यांमुळे शहराची हानी झाली. इंग्रज अमदानीत लोहमार्गाची सुविधा झाल्यामुळे हे शहर पुन्हा भरभराटीस आले.

येथे तलम मलमल, जरीचे नक्षीकाम, हिरे व सोन्या-चांदीचे अलंकार यांच्या निर्मितीचे उद्योग चालतात तथापि कापडनिर्मिती हा येथील प्रमुख उद्योग होय. येथे उच्च शिक्षणाच्या सुविधा आहेत.

येथील गोसावी महाराज मंदिर, हनुमान मंदिर, नवसय्यद मशीद, सय्यद इद्रू मशीद, पारशांची अग्निमंदिरे, बिशप हेबरने बांधलेले चर्च, सुरतेच्या रेशमी कापडाचे, कशिदा कामाचे व जंगलातील पदार्थांचे नमुने असलेले विंकेसर संग्रहालय, घड्याळ मनोरा, गांधी बाग व तेथील रंगा उपवन (खुले प्रेक्षागृह) इ. प्रसिद्घ आहेत.

राऊत, अमोल