हैनान : दक्षिण चिनी समुद्रातील चीनचे एक बेट आणि प्रांत. तैवानखालोखाल चीनचे हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. चीनच्या मुख्य भूमीवरील अगदी दक्षिण भागात असलेल्या लईजोऊ द्वीपकल्पाच्या दक्षिणेस हे बेट असून हैनान सामुद्रधुनीमुळे ते मुख्य भूभागापासून ( ग्वांगटुंग प्रांतापासून) अलग झाले आहे. बेटाच्या पूर्वेस आणि दक्षिणेस दक्षिण चिनी समुद्र तर पश्चिमेस टाँकिनचे आखात आहे. एके काळी हे बेट पर्ल क्लीफ्स, फाइन याद क्लीफ्स, फाइन याद लँड या नावांनी ओळखले जाई. बेटाचा पूर्व-पश्चिम विस्तार सु. २६० किमी. व उत्तर--दक्षिण विस्तार सु. २१० किमी. असून क्षेत्रफळ ३३,५७२ चौ. किमी. आहे. हैनान प्रांताचे क्षेत्रफळ सु. ३४,३०० चौ. किमी. असून याक्षेत्रफळापैकी सु. ९७% क्षेत्र हैनान बेटाचे आहे. हैनान प्रांतात हैनान या प्रमुख बेटाशिवाय झिशा, नानशा व इतर अनेक छोट्या छोट्या बेटांचा समावेश होत असून पॅरासेल व स्प्राटली या बेटांवरही चीनने आपला हक्क सांगितला आहे. बेटाची लोकसंख्या ८९,००,००० होती (२०१२). बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले हैको (लोकसंख्या २०,४६,१८९-२०१२ अंदाजे) ही या प्रांताची राजधानी आहे. 

 

भूवर्णन : बेटाचा मध्यवर्ती भाग पर्वतीय असून दक्षिण भाग वगळता या पर्वतीय प्रदेशाभोवती अरुंद सागरी मैदाने आहेत. या मैदानांची रुंदी उत्तरेकडे अधिक तर दक्षिणेकडे कमी आहे. बेटाच्या दक्षिणेकडील एकतृतीयांश प्रदेशात वेगवेगळ्या पर्वतश्रेण्या आहेत. मध्यवर्ती भागातील मौंट वे-चीह (उंची १,८६७ मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर आहे. पश्चिमेस थिंगके व या-चि-ता या पर्वतश्रेण्या पसरलेल्या असून त्यांची सरासरी उंची ४९० मी. ते १,००० मी. च्या दरम्यान आहे. बेटाच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात गाळाची मृदा असलेली खोरी व लहान सागरी मैदाने आढळतात. 

 

बेटावरील बहुतांश नद्या बेटाच्या मध्यवर्ती भागात उगम पावतातआणि वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. त्यामुळे अरीय नदीप्रणालीनिर्माण झाली आहे. ईशान्यवाहिनी नानतू (लांबी ३३४ किमी.), पूर्व-वाहिनी वान (१६२ किमी.), पश्चिमवाहिनी जांगह्वा (२३० किमी.), उत्तर भागातील नांदू (३१४ किमी.) व तिची उपनदी झिन्वू (१०९किमी.) या हैनान बेटावरील प्रमुख नद्या आहेत. कोरड्या ऋतूत किनारी भागातील बाष्पीभवनामुळे नद्यांमधील पाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. बेटावर अगदीच मोजकी नैसर्गिक सरोवरे आहेत. उत्तर भागातील सांगताओ हा प्रसिद्ध जलाशय आहे. 

 

हवामान : हैनानचे हवामान प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. उत्तर भागात मात्र आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आढळते. सागरसान्निध्यामुळे येथे हिवाळा अनुभवास येत नाही. जानेवारीचे सरासरी तापमान १८° से., तर जूनचे २९° से. असते. पर्वतीय प्रदेशात वर्षभर तापमान १०° से. पेक्षा अधिक असते. बेटाच्या बहुतांश भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान १५०–२०० सेंमी. च्या दरम्यान असून अंतर्गत पर्वतीय प्रदेशात ते सु. २५० सेंमी. असते. नैर्ऋत्य भागातील किनारी प्रदेशात सर्वांत कमी म्हणजे ९० सेंमी. पर्जन्यमान आहे. बेटाचे स्थान टायफून वादळाच्या मार्गात येते. एकूण वार्षिक पर्जन्यापैकी ७०% पर्जन्य उन्हाळी मोसमी वारे व टायफूनपासून मिळते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये प्रामुख्याने बेटाच्या किनारी प्रदेशात आणि उत्तर भागात दाट धुके असते. उत्तरेकडून येणारी हिवाळी थंड हवा उबदार सागराच्या संपर्कात आल्यामुळे हे दाट धुके निर्माण होते. त्यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहते, तसेच उष्णता कमी झालेली असते. 

 

वनस्पती व प्राणी : हैनान बेटाचे सु. १,५०० चौ. किमी. पेक्षा अधिक क्षेत्र उष्ण कटिबंधीय अरण्यांखाली असून त्यात सु. ४,६०० जातींचे वृक्ष आढळतात. परंतु विलायती वृक्षांचे आक्रमण, पर्यटन, वृक्षतोड, वातावरणात मिसळणारी विविध प्रदूषके यांमुळे वृक्षांच्या अनेक जाती धोक्यात आल्या आहेत. हैनान प्रांताच्या भूमी, पर्यावरण व संसाधन विभागाच्या अहवालानुसार सु. २०० वृक्षांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सीडार, रोजवुड, आयर्नवुड, ताड, बांबू, वेत, चंदन, नारळ इ. उष्णकटिबंधीय वृक्ष येथे आढळतात. बरेचसे वृक्ष कठीण लाकडाचे आहेत. पर्वतीय प्रदेशात दाट उष्णकटिबंधीय वर्षारण्ये आढळतात. पूर्व भागातील ७९० मी. उंचीपर्यंतच्या पर्वतीय प्रदेशात उष्णकटिबंधीय घनदाट वर्षारण्ये आहेत. बेटाचा पश्चिम भागही वनाच्छादित आहे. पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील सखल भागांत उष्णकटिबंधीय सॅव्हाना प्रकारचे वनस्पतिजीवन आहे. वन्य जमातींनी स्थलांतरित शेतीसाठी जंगलतोड केल्यामुळे अनेक भागांतील मूळचे वनाच्छादन बरेच कमी झाले आहे.

 

बेटावर विविधतापूर्ण असे पुष्कळ प्राणी व पक्षी आढळतात. अनेक ठिकाणी संरक्षित प्रदेश आणि वन्यजीव परिरक्षण विभाग आहेत. जंगलात मृग, गिबन, आंधळा साप इ. आढळतात. बेटावरील प्रवाहात तसेच अपतट सागरी भागांत देवमासे, डॉल्फिन व इतर जातींचे जलचर मोठ्याप्रमाणावर सापडतात. विविध प्रकारचे सागरी पक्षी येथे दिसतात. 

 

इतिहास : इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या अखेरीपासून हैनानवर चीनचा अंमल होता. चीनच्या लिखित इतिहासात हैनान बेटाचा पहिला उल्लेखइ. स. पू. ११ मधील आहे. त्या वेळी येथे हान सत्ता होती. हान सत्तेनेयेथे लष्करी दुर्ग रक्षक सेना स्थापन केली होती. याच सुमारास चीनच्या मुख्य भूमीवरील हान लोकांनी या बेटाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. परंतु बेटावरील आद्य रहिवाशांनी सातत्याने या राजवटी-विरोधात बंड केले होते. त्यामुळे इ. स. पू. पहिल्या शतकात चीननेआपली सत्ता काढून घेतली. थांग वंशाची (इ. स. ६१८–९०६) प्रभावी सत्ता येण्यापूर्वी हैनानवर चीनची नामधारी सत्ता होती. सुंग घराण्याच्या (९६०–१२७९) राजवटीत हैनान बेट हे क्वांगसी या प्रांताचा एक भाग होते. या काळात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर हान चिनी लोकांनी या बेटाच्या उत्तर भागात स्थलांतर केले. इ. स. बाराव्या व तेराव्या शतकांत बेटाच्या उत्तर भागातील मैदानी आणि उच्चभूमी प्रदेशांत चिनी लोकांनी वस्ती केली आणि येथील मूळ ली लोकांना हळूहळू अंतर्गत भागातील अरण्यमय पर्वतीय भागाकडे सक्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडले. युआन या मंगोल वंशाच्या राजवटीत (१२६०–१३६८) या बेटाचा स्वतंत्र प्रांत होता. मिंग राजवटीत (१३६८–१६४४) बेटाचा कारभार पुन्हा ग्वांगटुंग प्रांताकडे सोपविण्यात आला. बेटावरील हैकाऊ आणि चीयूंगशान ही बंदरे १८५८ मध्ये विदेशी व्यापारासाठी खुली करण्यात आली. १९१२ मध्ये हैनान बेट पुन्हा चीयूंगयाई नावाने स्वतंत्र झाले परंतु हा दर्जा १९२१ पर्यंतच राहिला. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९–४५) हैनानवर जपानचा ताबा होता. कम्युनिस्ट आणि ली लोकांनी जपानी सत्तेविरुद्ध मोठी चळवळ उभारली. परिणामतः १९४५ नंतर चीनने पुन्हा याचा ताबा घेतला. १९५० मध्ये कम्युनिस्ट फौजांनी याचा ताबा घेतल्यानंतर स्वायत्त हैनान व प्रशासकीय जिल्हा म्हणून ग्वांगटुंग प्रांतात हे बेट समाविष्ट केले. १९८८ मध्ये हैनान बेट हा चीनचा स्वतंत्र प्रांत बनला. 


 

आर्थिक स्थिती : हैनानची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिआधारित असून एकूण निर्यातीच्या निम्म्यापेक्षा अधिक निर्यात कृषी उत्पादनांची असते. वर्षभर उपलब्ध असलेला शेतीचा हंगाम, सुपीक जमीन, उष्ण- कटिबंधीय समूह वनसंपदा, खनिज साठे आणि लगतच्या सागरी प्रदेशातून माशांची मोठ्या प्रमाणावरील उपलब्धता यांमुळे पूर्वीच्या तुलनेत सांप्रत विकासाची गती अधिक आहे. बेटावरील मूळ जमाती शतकानुशतके स्थलांतरित शेती, शिकार, मासेमारी, लाकूडतोड, अरण्योत्पादने गोळा करणे आणि काही प्रमाणात भातशेती करत आहेत. चीनच्या मुख्य भूमी-पासून हैनान फारशा अंतरावर नसले, तरी किनारी प्रदेशातील चाचेगिरी, मलेरियाचा प्रादुर्भाव आणि स्थानिक जमातींकडून वारंवार होणारी बंडखोरी यांमुळे चिनी लोकांनी या बेटाकडे विशेष स्थलांतर केले नाही किंवा त्यांनी येथे वसाहती केल्या नाहीत. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत हे मागासलेले व दुर्लक्षित राहिले. चीनने येथील खनिज संसाधने आणि उष्णकटिबंधीय कृषी विकासाचे कार्य हाती घेतले असले, तरी चीनमधील कमी विकसित प्रांतांपैकी हा एक प्रांत राहिला आहे. येथे व्यापारी तत्त्वावरील उष्ण- कटिबंधीय कृषी विकासास वाव असून अशा शेतीसाठी चीनमधीलहा एकमेव योग्य प्रदेश आहे. जपानचा ताबा असताना (१९३९–४५) बेटावरील रबर व इतर उष्णकटिबंधीय उत्पादनांत वाढ झाली. तसेच येथील खनिज संसाधनांचे, प्रामुख्याने लोहखनिजाचे, उत्पादन घेण्यातआले. नैर्ऋत्य भागातील चांग जीआंग व तीएन तू येथून लोहखनिजाचे, याई श्येन येथून बॉक्साइटाचे, तर उत्तर किनाऱ्यावरील दानश्येन येथून कथिलाचे उत्पादन घेण्यासाठी जपानने रस्ते व लोहमार्ग निर्माण केले. १९४९ पासून येथे रबर उत्पादन आणि त्याच्यावरील प्रक्रिया उद्योग बऱ्यापैकी वाढला आहे. चीनला लागणारे सर्वाधिक रबर या बेटावरून मिळते. याशिवाय नारळ, तेलमाड, कापूस, ताग, उष्णकटिबंधीय फळे, काळी मिरी, मिरची, अननस, चहा, कॉफी, केळी, काजू, ऊस इ. कृषी उत्पादने येथे घेतली जातात. मैदानी प्रदेश मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी वापरला जातो. गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हे प्राणी पाळले जातात. येथून मांस व कातडी या प्राणिज उत्पादनांची निर्यात केली जाते. लाकूडतोड हा व्यवसायही महत्त्वाचा आहे. अरण्यात साग, चंदन यांसारखे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष आढळतात. लोहखनिज, मँगनीज, बॉक्साइट, कथिल, टिटॅनियम, टंगस्टन, मॉलिब्डेनम, कोबाल्ट, सोने, चांदी, तांबे, लिग्नाइट, खनिज तेल व नैसर्गिक वायू या खनिजांचे साठे येथे आहेत. येथून मिळणाऱ्या उच्च प्रतीच्या लोहखनिजावर आधारित लोह-पोलाद उद्योग विस्तारत आहे. १९५० च्या दशकापासून येथे यंत्रसामग्री व कृषी अवजारांची निर्मिती आणि वस्त्रोद्योग स्थापन झाले आहेत. सभोवतालच्या सागरी भागात व्यापारी तत्त्वावर मासेमारी केली जाते. मॅकरेल, ट्यूना, कोळंबी इ. जातीचे जलचर मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. मोती मिळविण्याचा व्यवसायही येथे चालतो. यिंग-को-हाई येथे दक्षिण चीनमधील सर्वाधिक विस्ताराची मिठागरे आहेत. अलीकडच्या काळात रस्ते, लोहमार्ग, जलवाहतूक व हवाई वाहतुकीचा आणि दळणवळण सुविधांचा बऱ्यापैकी विकास करण्यात आला आहे. बेटावर दोन दीपगृहे असून ती जगातील सर्वांत उंच दीपगृहांपैकी आहेत. वंचांग शहराजवळ चीनचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. हैनानच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला महत्त्वाचे स्थान आहे. किनाऱ्यावरील पुळणी, हिरवीगार दाट वनश्री, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथे वैद्यकीय पर्यटन व्यवसायाचाही विकास केला जात आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक हैनानला भेट देतात. हैनान बेटाच्या जलद विकासाच्या दृष्टीने तसेच येथील संसाधनांचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टीने चीनने याचा विशेष आर्थिक क्षेत्रात समावेश केला आहे (१९८८). हे देशातील सर्वांत मोठे आर्थिक क्षेत्र मानले जाते. 

 

लोक व समाजजीवन : हैनान बेटावरील एकूण लोकसंख्येत हैनानी (हान चिनी) ८४%, ली १४.७%, मीआऊ ०.७% आणिझुआंग ०.६% अशी वांशिक संख्या येथे आढळते. याशिवाय हूई, टांका, लिमगाओ लोक येथे आढळतात. ली व मीआऊ हे येथील मूळ रहिवासी आहेत. हे लोक प्रामुख्याने वनांमध्ये आढळतात. ली लोक प्रामुख्याने मध्य व दक्षिण भागातील परगण्यांत अधिक प्रमाणात असूनहे लोक नैर्ऋत्य चीनमधील थाई जमातींशी निगडित आहेत. प्राचीनकाळी चीनच्या मुख्य भूमीवरून स्थलांतर करून आलेल्या जमातींचे ली लोक वंशज असावेत. मीआऊ लोक चीनच्या मुख्य भूमीवरील म्याव ह्या मोठ्या समाजाचा फुटून आलेला एक छोटासा गट आहे. १९५२ मध्ये बेटाच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागात ली-मीआऊ या स्वायत्त जोड प्रदेशाची स्थापना करण्यात आली होती. ईशान्य भागातील वेनचिआंगप्रदेशात दक्षिण फूक्येन प्रांतातून आलेल्या लोकांचे प्रभुत्व आहे. वायव्य भागात हाक्का जमातीच्या लोकांची तर डानश्येन प्रदेशात हूनानीन लोकांची वस्ती आढळते. बेटावरील एकूण लोकसंख्येत बौद्ध धर्मीयांचे प्रमाण सर्वाधिक असून त्याशिवाय मुस्लिम व अल्प प्रमाणात ख्रिश्चन आहेत. नानशान उद्यान हे बौद्ध धर्मीयांचे प्रमुख केंद्र असून येथे अनेक मंदिरे, पुतळे आणि बागा आहेत. चीनमधील किनारी प्रांतांच्या तुलनेत या बेटावरील लोकसंख्या विरळ आहे. हैनान प्रांताची लोकसंख्येची घनतादर चौ. किमी.स २५३ होती (२०१०). 

 

राजधानी हैको हे प्रमुख शहर व बंदर असून तेथे ऐतिहासिक दृष्ट्या अनेक महत्त्वाची स्थळे आहेत. बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले यूलिन हे दुसरे महत्त्वाचे शहर व बंदर असून तेथे चीनचा प्रमुख नाविक तळ आहे. दक्षिण किनाऱ्यावरच वसलेले सान्या हे प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. वेनचँग, किऑनघई, वॉनिंग, वूझीशान, लिग्श्‍वे ही बेटावरील इतर प्रमुख शहरे आहेत. 

चौधरी, वसंत. पवार, डी. एच्.